Thursday, 28 December 2017

चारोळ्या / मुक्तछंद

दाटून आलेल्या मेघांनी
बरसावं असं काही नसतं
प्रत्येकवेळी भावना व्यक्त करायला
शब्दच हवेत असही काही नसतं
अव्यक्त राहीलं तरीही
प्रेम हे प्रेमच असतं
अधूरी असली तरीही
ती एक प्रेमकहाणीच असते
©मानसी जोशी
_______________________

तू असा अचानक निघून गेलीस 
माझ्या आयुष्यातून 
थोडं थांबायचस ना....
मनातले भाव वाचायचे होते तुझ्या डोळ्यात.....

©मानसी जोशी 
___________________________________

सागराला भरती येते ना 
पोर्णिमेच्या चंद्राला पाहून 
तसच होतं मला 
तुझ्या आठवणीत असताना तुला पाहून....

©मानसी जोशी 
________________________________________

तुला पहिल्यांदा पाहिल तेव्हा 
रातराणी दरवळत होती 
चंद्राची कोर ढगांमागे न लपता 
तुझ्या ओठांवर उमटली होती... 

©मानसी जोशी 
__________________________________________

नजरेत जरी अश्रू असले 
तरी ओठांवरती हास्य असावं 
ओठावरच्या हास्यामागे 
नजरेतल्या अश्रूंना लपवावं

©मानसी जोशी 
___________________________________________



कविता

कॉफी

एक निवांत संध्याकाळ
वाफाळणारी कॉफी
राहून गेलेली स्वप्ने आणि
तुझ्या आठवणींची चाहूल

सळसळणारा वारा
लाटांची गाज
भरुन आलेलं आभाळ आणि
तुझ्या आठवणींचा पाऊस

हळवं झालेलं मन
हरवलेले शब्द
हातातून सुटलेला हात आणि
एक मोकळी पायवाट......

©मानसी जोशी
******************************************

आठवण

तुझी आठवण आली जेव्हा -
              मी लावलेल्या गुलाबावर
              पहिली कळी उमलली
तुझी आठवण आली जेव्हा-
          पावसाची पहिली सर बरसली
तुझी आठवण आली जेव्हा -
           पहाटेच्या गारठ्याने पाने फूले शहारली
तुझी आठवण आली जेव्हा -
             मृदगंधात अक्षयगंधी फूले मिसळली
तुझी आठवण आली जेव्हा -
           सागराच्या लाटांमधून सप्तसूर झंकारले
तुझी आठवण आली जेव्हा -
            सांजवेळी क्षितिजाचे गीत स्मरले
तुझी आठवण आली जिथे
           सागराला नदी मिळाली
तुझी आठवण आली तिथे
             अश्रूंची फूले झाली.

©मानसी जोशी
******************************************


Wednesday, 27 December 2017

कथा - निरोप


निरोप

चहा करण्यासाठी तिने पातेल्यात पाणी ओतून गॅसवर ठेवलं. सहज कानावर रेडिओवरच्या गाण्याच्या ओळी आल्या

"निरोप कसला माझा घेता..."

तिच्या मनात आलं; "आज अचानक गीत रामायण मधलं गाणं कस काय लागलं?"
    तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, तिने फक्त पातेल्यात पाणी घालून पातेलं गॅसवर ठेवलंय. गॅस लावलाच नाहीये. तिने पटकन लायटर हातात घेऊन गॅस लावला.

मनातले विचार अजूनही चालूच होते. "खरंच निरोप घेताना जीव व्याकूळ होत असेल का? पण आपलं काय होणार आहे? एखादं गाणं ऐकून जीवाला जशी अनामिक हूरहूर लागते; अगदी तशीच हूरहूर लागलेय आज आपल्याला. 'तो' जाणार आहे आज;  खूप दिवसांसाठी! क्षणभर तिच्या मनात आलं; थांबवावं त्याला आणि सांगावं, "असा जाऊ नकोस ना मला एकटीला सोडून...".
    डोळ्यात टचकन पाणी आलं. समोर चहाच्या पातेल्यात पाणी उकळत होतं. तिने चटकन गॅस लहान करुन त्यामध्ये आलं आणि साखर घातली.

      आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य अगदी साधं सरळ होतं. अल्लड, अवखळ अशी ती आता मोठी झाली होती. तिचं लग्नही ठरलेलं होतं. आणि आज 'तो' त्याच्या कामाच्या ठिकाणी परत जाणार होता.  बसस्टॉपजवळच तिचं घर असल्यामुळे त्याच्या घरचे त्याला निरोप द्यायला तिच्याकडेच येणार होते. अर्थात 'तो' ही येणार होता. तिच्या हातचा 'आलं घातलेला चहा' ही खास त्याची फर्माईश होती.

      पाण्यात विरघळणारी साखर बघून तिच्या मनात आलं; "त्याच्यावर कितीही चिडले, तरी त्याने गोड हसून मारलेल्या प्रेमाच्या हाकेने मी अगदी सहज विरघळून जाते, अगदी या साखरेसारखंच! पण 'तशी' हाक परत कधी ऐकेन मी? आता त्याच्या आठवणी छळतील मला. त्याला पण येईल ना माझी आठवण? येईलच की! कशी नाही येणार? इतकं प्रेम करतो माझ्यावर. आठवण कशी येणार नाही."

     पाण्यात साखर पूर्णपणे विरघळल्यावर तिने पटकन चहा पावडर घातली. चहा उकळू लागला. सगळीकडे चहाचा सुगंध दरवळायला लागला.
    "असाच सुगंध दरवळूदे आमच्या नात्यामध्येही; अगदी हवाहवासा!

    छान उकळी आल्यावर तिने चहामध्ये दूध घातलं. दूध घातल्यानंतर येणारा चहाचा रंग तिला प्रचंड आवडायचा.
"असा परफेक्ट रंग आला पाहिजे तरच चहा पिण्यात खरी मजा!" असं म्हणत ती स्वतःशीच हसली.

    तो खरच परत येइल ना? मनात आलेल्या या विचारासरशी तिला धडकी भरली. रेडिओवरच गाणं कधीच संपलेल होतं. तिच्या कानावर आता हॉलमधल्या टीव्हीवरच्या न्यूज चॅनेलवर लागलेल्या बातम्यांचे आवज येत होते. मृत्यू पावलेल्या जवानांची नावं कानावर पडली आणि तिच्या मनात आलं; त्याचंही नाव असंच ऐकू आलं तर? ......क्षणभर काळजाचा ठोका चुकला.  नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले. समोरच्या पातेल्यातला चहा उतू जाणार तेवढ्यात पटकन तिने गॅस बंद केला.
    "त्याच्याशिवाय जगायची कल्पनाही सहन होत नाहीये मला. सांगू का त्याला नको जाऊस? पण तो ऐकणार आहे थोडंच. युद्ध सुरु झाल्यावर तातडीने रजा कॅन्सल करुन बॉर्डरवर हजर रहायचा आदेश मिळालाय त्याला. हा आदेश म्हणजे तो स्वतःचा सन्मान समजतो. मातृभूमीवर त्याचं जिवापाड प्रेम आहे आणि आपला देश संकटात असताना तो इथे स्वस्थ बसूच शकणार नाही. का करतात युद्ध? काय मिळतं यातून? फक्त सर्वनाश... आर्थिक नुकसान तर होतंच. पण ते भरुन  निघतं. पण माझ्यासारख्या अनेकांच नुकसान झालं तर काही लाखांनी भरुन नाही निघू शकत. सैनिक तर त्यांचेही मरतात आणि आपलेही. त्यांचेही जीवलग दु:खी होतात आणि आपलेही. मग हा सगळा अट्टाहास कशासाठी? तो तिकडे बॉर्डरवर डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगणार. कुठल्यातरी  गोळीवर त्याच नाव लिहिलेल असेल तर ? नाही नाही असं होणार नाही....".

     एव्हाना कपात चहा ओतून कप ट्रेमध्ये ठेवून ती सगळ्यांना चहा नेऊन देते. तेवढ्यात दरवाज्यातून 'तो' आत आला; निरोप घेण्यासाठी! चहा घेऊन दोघंही घराच्या गच्चीवर गेली.
      काही क्षण दोघंही नि:शब्द. तिचे डोळे एव्हाना शुष्क झाले होते. "सैनिकाच्या जीवनसंगिनीने रडायच नसतं." त्याने आधीच बजावलं होतं तिला.

"परत कधी येशील?" तिने आर्त स्वरात विचारलं आणि संभाषण सुरु झालं.

"माहिती नाही! पण मी येईन हे नक्की. मी येइपर्यंत आपली सगळी स्वप्न, सगळ्या आठवणी जपून ठेव; माझी ठेव म्हणून!" तो.

      तिने फक्त मान हलवली. बसची वेळ झाली. घराजवळ असलेल्या बस स्टॉपवर ती त्याला सोडायला गेली. तिथे गेल्यावर ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, "लवकर ये मी वाट बघतेय...".

   आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवून तो मंद हसला आणि तिला डोळे भरुन बघू लागला. तिचं रुप आपल्या नजरेत साठवून घेत होता. तेवढ्यात बस आली. तिने घट्ट धरून ठेवलेला त्याचा हात अलगदपणे सोडवून तो बसमध्ये जाऊन बसला.
    "नेमका हाच क्षण नको होता; जीवाला चटका लावणारा निरोपाचा क्षण. ती स्तब्ध तो प्रवाही.
    "तिने हात हलवून त्याला निरोप दिला. बस निघून गेल्यावरही कितीतरी वेळ ती दूरवर पसरलेल्या एकाकी रस्त्याकडे बघत तिथेच उभी राहिली. इतका वेळ डोळ्यात साचलेले अश्रू गालावरुन घळाघळा ओघळत होते.
     "आता उरला तो फक्त विरह! आठवणींच्या जीवावर किती दिवस जगायचं? या आठवणी खूप त्रास देतील. बेचैन करतील. पण तरीही मी त्या जपेन, त्याची ठेव म्हणून! पुन्हा भयंकर उकाड्यानंतर पावसाची सर बरसावी तसा तो येइल. कधी वळवाचा पाऊस बनून तर कधी मान्सूनच्या  पावसासारखा! पण त्यानंतर काय ? पुन्हा हा जीवघेणा क्षण निरोपाचा! आता मात्र तिला त्याचं म्हणणं पटत होतं, "सहवासातल्या आनंदापेक्षा विरहाचं दु:खच आंतरीक ओढ निर्माण करतं."

     "नाही, पण आता मी रडणार नाही. 'सैनिकाच्या जीवनसंगिनीने रडायचं नसतं त्याने बजावलय मला", असं मनाशी पक्क ठरवून डोळे पुसून ती बस स्टॉपवरुन घरी जायला निघाली. सहज तिची नजर बाजूच्या चहाच्या टपरीवर गेली. तिथे चहा उकळत होता. टपरीवाला पातेल्यातला चहा चमच्याने ढवळत होता. त्यातून निघणाऱ्या वाफांमधून हवेत चहाचा सुगंध दरवळला आणि ती मंद हसली. चहाचं अस्तित्व नसणाऱ्या वाफेतून दरवळणारा गंध आणि प्रत्यक्ष भेट नसताना निव्वळ आठवणींतून भेटणं दोन्ही जवळपास सारखंच. दोन्हीमध्ये प्रत्यक्ष भेटीचं समाधान नसलं तरी अस्तित्वाचा गंध  दरवळतो, तो ही अगदी हवाहवासा!

©मानसी जोशी









Saturday, 23 December 2017

कॉलेज जीवनातील एक अनुभव

ग्रॅज्युएशन झाल्यावर कॉलेज ग्रूपमधल्या प्रत्येकाच्या वाटा वेगवेगळ्या होतात. प्रत्येकाने पोस्ट ग्रॅज्युएशनचं काहीना काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं. पण या साऱ्याबरोबर सुरु होतात सुगरिणीचे सल्ले. ज्यांना धड ते स्वतः १०/१२ वी पास कि नापास ते त्यांच त्यांनाच सांगता येत नाही अशी लोक मोठ्या मोठ्या गोष्टी  सांगायला सुरुवात करतात. खर तर ग्रॅज्युएशननंतर मी सुद्धा MBA करायच ठरवलं होत. पण काही वैयक्तिक कारणांमुळे ते शक्य झाल नाही. मग रत्नागिरीला असणाऱ्या काही ऑप्शन्सपैकी L.LB हा ऑप्शन निवडून मी. L.LB ला ॲडमिशन घेतली आणि मग गमतीजमतींना सुरुवात झाली.
      व्यक्ती तितक्या प्रकृती याचा प्रत्यय मला तेव्हा आला जेव्हा प्रत्येकाने आई बाबांसमोर आपआपली मते मांडण्यास सुरुवात केली. एक काका मोलाचा सल्ला देत  मला म्हणाले, "ग्रॅज्युएशनला फर्स्ट क्लास मिळाला म्हणजे वकीलीचा अभ्यास जमेल अस नाही. फार कठीण असतो तो अभ्यास, खायचा भात नव्हे. आजकाल तर फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट कोणीही होत. गल्लोगल्ली पडलेत असे अनेक".
 मग मी ही हसून म्हणाले, "अहो म्हणूनच तर मी L.LB करतेय ना नाहीतर मी पण त्या गल्लोगल्ली पडलेल्यांपैकीच एक नाही का होणार?"
     काका गप्प बसले पुढे काय बोलायचं सुचलं नाही बहुदा  म्हणून मग त्यांनी आपला मोर्चा माझ्या आईकडे वळवला आणि म्हणाले, "तुमची मुलगी फाटकन बोलते कोणालाही. आता तर काय वकील होणार मग तर बघायलाच नको......माझं काही नाही हो  पण बघा विचार करा. वकील मुलींची लग्ने सहजासहजी जमत नाहीत हो".
      त्यांच्या या दोन परस्परविरोधी वाक्यांवर मात्र मला प्रचंड हसायला आलं. मला वकीलीचा अभ्यास झेपणार नाही अस इनडायरेक्टली बोलणारे काका चक्क मी वकील झाल्यानंतरही काळजी करत होते. काहींना तर माझ्या लग्नाची फारच चिंता अशा लोकांनी चक्क स्थळ सांगायला सुरुवात केली.
         या साऱ्यात भरीस भर म्हणजे लॉ कॉलेजच टायमिंग संध्याकाळी ५ ते ८ होतं. हे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्याचा प्रकार झाला होता. त्यामुळे M.Com करायच इथपासून जीवाला घोरपर्यंतच्या विषयांवर चर्चा सुरु झाली होती आणि होणाऱ्या प्रत्येक चर्चेबरोबर माझी चिडचिड वाढत होती. काही लोकांची बोलणी ऐकून तर सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी माझी अवस्था झाली होती. त्यातच आमच्याकडे नेहमी येणारे एक सद्गृहस्थ त्या दिवशी आमच्याकडे आले होते. खरेदी विक्री आणि एकूणच ॲग्रीमेंट वगैरेची कामे ते करत असत. शिक्षण जेमतेम ग्रॅज्युएट असेल नसेल. मी L. LB करतेय म्हटल्यावर त्यांनी मला विविध प्रश्न विचारायला सुरुवात केली ..... यावर मी त्यांना फक्त एवढच सांगितल की आत्ता आम्हाला यातलं काहीच शिकवलं नाहीये. पहिल्या सेमिस्टरला लीगल लॅंग्वेज, कॉंस्टिट्यूशन असेच विषय आहेत. 'बरं' अस म्हणत आपलं जमिनींच्या व्यवहारासंबधीतलं ज्ञान किती महान आहे आणि प्रक्टिसिंग ॲडव्होकेटपेक्षा मी कसा हुशार आहे  हे सांगायला सुरूवात केली.  त्यानंतर अस बरेचदा घडलं. मी मनातून त्या काकांवर फार वैतागले होते पण आई बाबांसमोर त्यांना काही बोलूही शकत नव्हते. अखेर मला ती संधी मिळाली. त्या दिवशी संध्याकाळी मी कॉलेजला जायच्या गडबडीत होते. तेवढ्यात ते काका आले. नेहमीप्रमाणे प्रश्न विचारायला सुरुवात केली, " काय मग पहिल्या सेमिस्टरला  किती विषय राहिले?" मी काहीस चिडूनच सांगितल, "एकही नाही कॉलेजमध्ये सेकंड आले मी. सगळे विषय क्लिअर आहेत.”  यावर काका हसत म्हणाले, "सोपेच तर विषय होते सगळे काय बरोबर ना?" मला खर तर मनातून प्रचंड राग आला होता पण तरीही मी गप्प राहिले. मग पुढचे प्रश्न सुरु झाले कुठले विषय कोण शिकवत वगैरे. मी नाईलाजाने इच्छा नसताना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. अशातच त्यांचा पुढचा प्रश्न आला, "मग ते  ×××× वकील काय शिकवतात कि नाही तुम्हाला?" "IPC " मी सांगितले. मग त्यांनी ×××× हे वकील कितीही मोठे असले तरी त्यांच्यासमोर मी कसा ग्रेट आहे याची टिमकी वाजवायला सुरुवात केली. मी मनातून वैतागले होते. एवढ्यात परत त्यांनी विचारले, " मग काय काय झालं शिकवून?" या माणसाला IPC म्हणजे काय हे नीटस कळलेलं नाही हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होत. मिळालेल्या संधीचा सदुपयोग करुन घेणे या वकीलीच्या पहिल्या धड्याचा वापर करत मी त्यांना सांगितल,  "Section 494- Bigamy  अर्थात बहुपत्नित्व" IPC म्हणजेच Indian Penal Code नुसार हा गुन्हा आहे आणि त्यासाठी ७ ते १० वर्षांपर्यंतची शिक्षा होवू शकते” (त्या काकांच्या नात्यातल्या कोणीतरी बहुदा त्यांच्या भावाने दोन लग्ने केली होती आणि दोन्ही बायका एकाच घरात रहात होत्या.) माझ उत्तर ऐकून त्यांचा चेहरा खर्र्कन पडला. खर तर मला  सगळा सेक्शन त्यांना डिटेलमध्ये समजावायचा होता पण  माझ्या आई बाबांनी माझ्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि मी उशीर होतोय अस म्हणत चटकन बॅग घेवून कॉलेजला निघून गेले. त्यानंतर मात्र आजतागायत त्या काकांनी मला लॉ या विषयावर एकही प्रश्न विचारला नाही. पुढे एकही ATKT न लागता सहाही सेमिस्टर्स पूर्ण झाली. खर तर हे त्या काकांना सांगायची खूप इच्छा होती पण  ते काही  जमलं नाही.
©मानसी जोशी 

रेसिपीज

बटर चॉकलेट कूकीज

१ वाटी लोणी/ बटर
२ ते ४ चमचे दूध
१ वाटी पिठीसाखर किंवा अर्धी वाटी साखर आणि अर्धी   
   वाटी पिठीसाखर
१ चमचा व्हॅनिला/ चॉकलेट इसेन्स
१ ते सव्वा वाटी कणिक
३ ते ४ चमचे कोको पावडर
१ चमचा बेकिंग पावडर
अर्धा चमचा सोडा

लोणी चांगल फेसून घेऊन त्यामध्ये दूध,  साखर घालून चांगल फेसून व्हॅनिला इसेन्स घालावा.
      दुसऱ्या भांड्यात कणिक, कोको पावडर, सोडा, बेकिंग पावडर एकत्र करुन चाळून घ्यावी.
     दोन्ही मिश्रण एकत्र करुन सैलसर पीठ तयार कराव. लिंबाएवढे गोळे करुन (किंचित चपटे)  प्रीहिटेड मायक्रोवेव्ह मध्ये 180°  वर १८ ते २० मिनिटे बेक करुन कूकिज थंड होण्यासाठी वायर रॅक किंवा चाळणीवर ठेवून मगच एअर टाईट डब्यात भाराव्यात.
   **मायक्रोवेव्ह मधून काढल्यावर थोड्या मऊ वाटतात पण नंतर क्रिस्पी होतात. शक्यतो २० मिनिटांच्या वर वेळ लागत नाही.

-मानसी जोशी



****        ****        ****        ****        **** 

मूगडाळ ढोकळा

साहित्य:
२ वाट्या मूगडाळीचं पीठ
५ चमचे साखर
५ चमचे तेल
१ चमचा खायचा  सोडा
अर्धा ते एक चमचा किसलेलं आलं
१ चमचा मिरची पेस्ट
१ चमचा सायट्रिक ॲसिड साधारणतः १ फुलपात्र      पाण्यात विरघळून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी: तेल, मोहरी, हिंग
सजावटीसाठी : खोबरं (खवलेला नारळ), कोथिंबीर

कृती:
१. मूगडाळीच पीठ, तेल, साखर, मीठ, किसलेलं आलं, मिरची पेस्ट हे  सगळं एकत्र करुन त्यामध्ये सायट्रिक ॲसिड विरघळवलेलं पाणी हळूहळू मिक्स करावे.
२. नंतर सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यावे( म्हणजे गुठळी रहात नाही).
३. नंतर या मिश्रणात सोडा घालून साधारणतः १ मिनिट चांगले फेटून घ्यावे.
४. तेल लावलेल्या कुकरच्या डब्यात अथवा भांड्यात हे मिश्रण ओतून कुकरमध्ये ठेवावे व भांड्यावर झाकण ठेवावे आणि कुकरचे झाकण लावावे(***शीट्टी लावू नये).
५. पहिली ५ मिनिटे गॅस हाय फ्लेमवर ठेवून नंतर २०/२५ मिनिटे मिडिअम फ्केमवर ठेवावा.
६. गॅस बंद करुन लगेचच कुकरचं झाकण काढून ढोकळ्यावरचं झाकण काढून सुरी किंवा टुथपिक घालून ढोकळा झालाय का ते बघून लगेचच डबा कुकरमधून बाहेर काढावा.
७. साधारण गार झाल्यावर ताटात उलटा करुन वरुन फोडणी घालून (***फोडणीत हळद घालू नये), नारळ कोथिंबीर घालावी.
****टिप: फोडणी करताना त्यामध्ये साखरेचं पाणी (अर्धा चमचा साखर पाव ते अर्धी वाटी पाण्यात विरघळवून ) घातल्यास फोडणी ढोकळ्यात आतापर्यंत पोचते आणि ग्लेझिंगही चांगले येते.

****        ****      ****      ****       ****


रवा चॉकलेट केक

साहित्य:
२ वाट्या रवा
२ वाट्या साखर
२ वाट्या दही
२ चमचे बेकिंग पावडर
२ चमचे कोको पावडर
२ चमचे व्हॅनिला इसेन्स किंवा चॉकलेट इसेन्स
१ चमचा सोडा
ग्रिसिंगसाठी तूप

कृती:
१. प्रथम रवा, साखर आणि दही एकत्र करुन घ्यावे
२. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा घालून
    मिश्रण व्यवस्थित फेसून घेणे.
३. त्यानंतर त्यामध्ये इसेन्स घालून मिश्रण पुन्ह व्यवस्थित
    फेसावे.
४. तूपाचे ग्रिसिंग केलेल्या केकच्या डब्यात अर्धे मिश्रण
    ओतावे
५. उरलेल्या मिश्रणात दोन चमचे कोको पावडर घालून
     मिश्रण एकत्रीत करुन घेउन मग ते  केकच्या डब्यात
    ओतावे
६. प्रिहिटेड मायक्रोवेव्हमध्ये १९० डिग्रीवर २५ ते ३०
    मिनिटे केक ठेवून द्यावा. (गॅसवर करायचा असल्यास
     फ्राइंग पॅनमध्ये ५ ते ७ मिनिटे हाय फ्लेमवर ठेवून   
     नंतर १२/१५ मिनिटे मिडिअम फ्लेमवर व नंतर ५/७
     मिनिटे सिमवर ठेवावा.)
७.केक मायक्रोवेव्हमधून काढल्यावर टूथपिक किंवा सूरी
   घालून केक तयार झाल्याची खात्री करुन केक  दहा
   मिनिटे  तसाच  ठेवावा.
८. त्यानंतर एका डिशमध्ये उलटा करुन त्याचे पिसेस
    करावेत.

©मानसी जोशी

****       ****      ****      ****      ****
 नवरतन  कोर्मा

साहित्य:
१. मध्यम आकारात चिरलेल्या भाज्या -
    फ्लॉवर , गाजर, फरसबी, बटाटे
२. मध्यम आकारात फळांचे तुकडे
      अननस , सफरचंद, पनीरचे चौकोनी तुकडे
३. १०/१२ काजूगर
४. एक मोठा कांदा
५. १ चमचा आलं लसूण पेस्ट, १/२ चमचे साखर, मीठ
६. १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची
७. १ चमचा धने-जीरे पावडर
८. खडा मसाला - ३/४ मीरीदाणे, १/२ लवंगा, १ वेलची
    बारीक चिरून, दालचिनीचा तुकडा, ३/४ तमालपत्र
९. १ चमचा केशर- विलायची सायरप
१०. २ चमचे साय किंवा फ्रेश क्रिम
११. सजावटीसाठी कोथिंबीर, डाळींबाचे दाणे, द्राक्षे,
       ड्रायफ्रूट्स- मनुका, बेदाणे, बदाम, ई.

कृती:

१. प्रथम एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात मीठ घालून 
    बटाट्याची फोडी आणि गाजराच्या फोडी घालून पाणी 
    उकळायला ठेवावे. पाणी उकळल्यावर त्यात फ्लॉवरचे
    तुकडे आणि फरसबी घालून भाज्या शिजेपर्यंत
    उकळून घ्यावे.
२. दुसऱ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये पाणी घालून
     काजूगर, तमालपत्र आणि चिरलेला कांदा घालून
     काजूगर शिजेपर्यत पाणी उकळवून घ्यावे.
३. शिजलेल्या भाज्या पाण्यातून काढून घ्याव्यात. आणि
    शिजलेल्या काजूगर आणि कांद्याची पेस्ट
    करावी(तमालपत्र बाजूला काढावीत)
४. कढईत तुप किंवा तेल गरम करुन त्यामध्ये खडा
    मसाला व आलं लसूण पेस्ट टाकून परतून काजूगर-
   कांद्याची पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं.
५. नंतर धना-जीरं पावडर व थोडं पाणी घालून उकळी
    आल्यावर भाज्या व मीठ घालून परतावे. आवश्यकता
    वाटल्यास थोडं पाणी घालावं. नंतर केशर विलायची
    सायरप, पनीर, चिरलेली फळे व साखर घालून परतावे.
६. चांगले परतून त्यामध्ये साय किंवा फ्रेश क्रिम घालून
    ड्रायफ्रूट्स, द्राक्ष, डाळींबाचे दाणे व कोथिंबीर घालून
     झाकण ठेवून साधारणतः अर्ध्या ते एक मिनिटांनी   
     गॅस बंद करावा.

©मानसी जोशी
****      ****       ****      ****        *****
चॉकलेट केक

साहित्य:
१. कणिक / मैदा १ वाटी
२. कोको पावडर ३ चमचे
३ साखर ३/४ (पाऊण) वाटी
४. बेकिंग पावडर १ चमचा
५. खायचा सोडा १/२ (अर्धा ) चमचा
६. लिंबू रस १ चमचा
७. तेल १/४ (पाव)वाटी
८. चिमूटभर मीठ
९. पाणी १ वाटीपेक्षा थोडे कमी
१०. चॉकलेट किंवा व्हॅनिला इसेन्स  १ चमचा
कृती:
१. प्रथम कणिक/ मैदा, कोको पावडर, मीठ, बेकिंग पावडर आणि खायचा सोडा एकत्र करुन चाळून घेणे.
२. दुसऱ्या भांड्यात पाणी घेउन त्यामध्ये साखर विरघळल्यावर लिंबूरस घालून मिक्स करुन घेणे.
३. दोन्ही मिश्रणे एकत्र करुन(कृती क्र. १ व २ )त्यामध्ये तेल आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण चांगले फेटून घेणे.
४. Microwave 200°  सेल्सियसवर prehit करुन घेणे.
५. केकपात्राला तेल लावून त्यावर थोडीशी कणिक भुरभुरुन डस्टिंग करुन घेणे.
६. तयार मिश्रण केकच्या भांड्यात ओतून 200° सेल्सियसवर २५ ते ३५ मिनिटे बेक करणे.
७. कुकरमध्ये करायचा असल्यास प्रथम कुकर कोरडा करुन ५ मिनिटे गरम करुन घ्यायचा गॅस लहान करून त्यामध्ये कुकरचा रिकामा डबा खाली ठेवून त्यावर मिश्रणाचा डबा ठेवून द्यायचा. कुकरचे झालण न लावता कुकरवर एक मापाची ताटली ठेवून गॅस मोठा करुन ५ ते ७ मिनिटांनी गॅस मध्यम आचेवर करणे. साधारणतः ४० ते ५० मिनिटे लागतात.
#चॉकलेटसॉस// Choco frosting
साहित्य:
१. पाव (१/४)कप बटर
२. अर्धा (१/२) कप कोको पावडर
३. साखर १ कप
४. दुध पाव (१/४) कप
५. चॉकलेट / व्हनिला इसेन्स
कृती:
१. बटर  मेल्ट करुन त्यामध्ये पिठीसाखर, कोको पावडर व  दुध मिक्स करुन घेणे. गुठळी रहाता कामा नये. चांगले मिक्स झाल्यावर अर्धा ते १ चमचा चॉकलेट/ व्हॅनिला इसेन्स टाकून चांगके मिक्स करुन घेणे.
२. एक ते दिड मिनिट मध्यम आचेवर ठेवणे. मिश्रण मधूनमधून ढवळणे गुठळी होवू देउ नये.
३.साधारण कोमट झाल्यावर ब्लेंडरने किंवा एग बिटरने २ मिनिटे चांगले फेसून घेणे. आवश्यकता वाटल्यास अजून दुध मिक्स करता येइल. साधारणतः मधाइतकी कन्सिस्टंसी झाली पाहिजे.
    केक तयार झाल्यावर त्याला थंड होवू द्यावा. थंड झाल्यावर मधोमध (आडवा )कापून  त्यावर चॉकलेट सॉस पसरवणे. त्यानंतरच्या त्यावर दुसरा लेअर ठेवून त्यावर चॉकलेट सॉस पसरवणे आणि सर्व बाजूंनी चॉकलेट सॉस लावून फ्रीजमध्ये ३ ते ४ तास सेट होण्यासाठी ठेवणे. सेट झाल्यावर गाळण्यात  कोको पावडर व पिठीसाखर घेवून त्यावर भुरभुरवणे.
-मानसी जोशी

Tuesday, 19 December 2017

कथा - लग जा गले..

लग जा गले..

पावसाळा नसताना अचानकपणे दाटून आलेले ढग.... त्यामुळे अमावस्या नसतानाही अंधारलेली एक भयानक रात्र.... ढगांचा गडगडाट..... वीजेचा कडकडाट  ..... मोकळा निर्मनुष्य रस्ता ....... मधूनच येणारा कुत्र्याच्या रडण्याचा आवाज तर कधी रातकिड्यांचा किर्र्रर्र्र असा आवाज.... आणि या वातावरणातून जाणारी एक सिदान क्लास लाल रंगाची होंडा सिटी....त्यामध्ये बसलेले प्रेमी युगुल.... दोघही हनीमूनला निघालेली असल्यामुळे रोमॅन्टिक मूडमध्ये. रोमॅन्टिक मूडमध्ये असल्यामुळे असेल कदाचित पण भयानक रस्त्यावरही दोघांना अजिबात भीती वाटत नव्हती. गाडीत म्युझिक प्लेअरवर मंद रोमॅन्टिक म्युझिक चालू होतं..... एक गाणं संपून दुसरं  गाणं सुरु झालं... 'लग जा गले .....' त्याने एकदम रोमॅन्टिक मूडमध्ये तिच्याकडे बघितल. ती लाजली. सहज  तिची नजर समोर गेली आणि ती घाबरली. एक पांढऱ्या कपड्यातली, केस मोकळे सोडलेली बाई त्यांच्या गाडीच्या समोर आली. त्या बाईला  डोळे नव्हते आणि तिची मान गोल गोल फिरत होती. गाडीमध्ये बसलेली तरुणी जोरात किंचाळली. त्याने गाडी थांबवायचा प्रयत्न केला पण ती बाई त्यांच्या गाडीच्या आरपार पलीकडे  चालत गेली. त्याने मिरर मधून मागे बघितलं. ती बाई दात विचकून विकृत हसत होती... आणि काही कळायच्या आत गाडी समोरच्या झाडावर आपटून गर्द झाडीत कोसळली. ती पांढऱ्या कपड्यातली बाई मात्र  गडगडाटी विकट हसत अजूनही तिथेच उभी होती.....
       आssssssss........ श्रेया जोरात किंचाळली आणि विक्रमने करकचून गाडीचा ब्रेक दाबला. विक्रमच्या बाजूला बसलेल्या त्याच्या गर्लफ्रेंडने- रियाने दचकून श्रेयाकडे बघितल. मधल्या सिटवर बसून पेंगत असलेले सोहम आणि नेहाही दचकून आजूबाजूला बघायला लागले. श्रेयाच्या  बाजूला बसलेला समीर मात्र मोठ्यामोठ्याने हसत होता.

विक्रम: आयला सम्या कशाला घाबरवतोस रे तिला.
समीर: मी काही नाही केलं यार. तिच म्हणाली मला तुझ्या नवीन स्क्रिप्टबद्दल सांग म्हणून सांगितलं.
रिया: सम्या तू कधीपासून हॉरर स्टोरीज लिहायला लागलास रे ?
श्रेया: (चिडून) बघ ना तो रोमॅन्टिक स्टोरीज लिहितो म्हणून सांग म्हणाले मी. हे असलं काही सांगेल असं वाटलही नव्हत मला. 
समीर: आमच्या चॅनेलला रोमॅन्टिक स्टोरीजची सिरिज बंद करुन हॉरर शो चालू करायचा आहे. त्यासाठीच एक हॉरर स्टोरी लिहितोय. श्रेयाने स्टोरी सांग म्हटल्यावर म्हटलं हॉरर स्क्रिप्ट ऐकवावं तिला. आज बाहेरच  वातावरण पण हॉरर आहे मजा येइल. 
विक्रम: सम्या XXXX  गेलो असतो खाली दरीत आपण कसला दचकलो मी. 
रिया: रोमॅन्टिक सिरिज बंद होतेय? का रे? मस्त चालली होती ती. आणि तुझ्या स्टोरीज तर रिॲलिस्टिक असतात ना ?
समीर: ना मुन्ना ना.... मी आधी स्टोरी लिहितो मग त्या खऱ्या होतात. 
श्रेया: ओ हिरो बास करा आता. म्हणे मी आधी लिहितो आणि मग त्या रिअल होतात.

      श्रेयाच्या या बोलण्यावर सगळेच हसले. श्रेया, समीर, विक्रम, रिया आणि सोहम हे पाचही जण कॉलेजपासूनचे मित्रमैत्रीणी होते.  कॉलेज संपवून प्रत्येक जण आपआपल्या करिअरमध्ये स्थिरावलेली होता. नेहा सोहमची गर्लफ्रेंड होती. ती या ग्रूपमध्ये नवीन होती. श्रेया आणि रिया 'आयटी' कंपनीत नोकरी करत होत्या तर विक्रम आपला फॅमिली बिझनेस सांभाळत होता. सोहम आणि नेका बॅंकेत नोकरी करत होते आणि समीर स्क्रिप्ट रायटर होता.

       रिया ही विक्रमची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड आणि त्याची होणारी बायको होती. विक्रम रियाच लग्न ठरल्याचं सेलिब्रेशन आणि पार्टीसाठी सगळे विक्रमच्या फार्महाउसवर जायला निघालेले होते. ते ज्या रस्त्याने जात होते तो रस्ता हॉन्टेड रस्ता म्हणून प्रसिद्ध होता. त्या रस्त्यावर अनेक अपघात झालेले होते. खास करुन नवीन लग्न झालेल्या किंवा लग्न ठरलेल्या जोडप्यांच्या गाडीचे. बाकी कोणाचा या गोष्टींवर विश्वास नसला तरी सोहमचा होता. त्यामुळेच सोहम या रस्त्यावरून जायला मनापासून तयार नव्हता. पण नेहाने समजावल्यामुळे तो तयार झाला होता . नेहाला बॅंकेतून निघायला उशीर झाल्यामुळे शहरातून निघायलाच अकरा वाजलेले होते   शॉर्टकटच्या रस्त्याने गेलो तर जवळपास दिड तास तरी लवकर पोचू असा विचार करुन सगळ्यांनीच या हॉन्टेड रस्त्यावरून जायचं ठरवल.

      शहराची गर्दी मागे सोडून गाडी निर्मनुष्य रस्त्याला लागली. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला गर्द झाडी त्यात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे विक्रम काळजीपूर्वक गाडी चालवत होता. श्रेयाच्या किंचाळण्यामूळे का होईना काही काळ  शांत झालेल्या गाडीत पुन्हा गप्पागोष्टी आणि हास्यविनोद चालू झाले होते.

      हसता हसता अचानक सोहमची नजर खिडकीबाहेर गेली आणि तो विक्रमला म्हणाला,  "विकी मगाशी त्या माईलस्टोनवर 'सारगाव' ३८ किमी. लिहिलं होतं आताही तेच दिसतंय. आर यू शुअर, आपण बरोबर रस्त्यानेच जातोय?"

"अरे असं होत अनेकदा. लास्ट टाईम आपण गोव्याला गेलो तेव्हाचं आठवतंय ना? असेच माईलस्टोन होते. जुने माईलस्टोन न काढताच नवीन बसवतात XXXX साले."  विकी.

"नाही विकी सोहम बरोबर बोलतोय. मला आत्ता परत तोच माईलस्टोन दिसला जो मगाशी दिसला होता." रिया

हे ऐकून मात्र सगळेच सावध झाले. थोड्याच वेळात सगळ्यांच्या लक्षात आलं की गाडी पुन्हा पुन्हा त्याच माईलस्टोनला क्रॉस करुन पुढे जातेय. कितीही नाही म्हटलं तरी सगळेच घाबरले होते.

"याचा अर्थ आपल्याला चकवा लागलाय. आता सकाळपर्यंत आपण असच फिरत रहाणार. तरी मी सांगत होतो हायवेवरुन जाऊया म्हणून. पण कोणी ऐकेल तर ना.” सोहम वैतागून म्हणाला.

"अरे ए गप ना. जरा विचार करु दे. आता काय करायचं ते ठरवायला हवं." विक्रम 

"विकी यार गाडी थांबव. असच फिरत राहिलो तर पेट्रोल संपेल गाडीतलं. त्यापेक्षा बाहेर पडून काही मदत मिळतेय का बघूया." समीर

"नाही! नको! गाडी थांबव पण बाहेर नका पडू कोणी. आपण गाडीत सेफ आहोत." नेहा.

"इनफ नाऊ यार. सम्या यू आर राईट", असं म्हणून विकीने गाडी थांबवली.

समीर आणि विक्रम गाडीबाहेर येऊन काही मदत मिळू शकेल का बघत होते. तेवढ्यात त्यांना एक झोपडीवजा घर दिसलं. सगळ्यांना सांगून दोघेही तिकडे जायला निघाले. पण श्रेया आणि रियाने त्यांना अडवलं. अखेर सगळ्यांनीच तिकडे जायचं ठरलं. पण यासाठी नेहा तयार झाली नाही. तिला सरपटणाऱ्या प्राण्यांची आणि जंगली जनावरांची प्रचंड भीती वाटत असे. त्यामुळे  गाडीत बसणं सुरक्षित आहे असं तिला वाटत होतं. सोहमने नेहाजवळ थांबायच ठरवलं. पण नेहाने त्याला बाकीच्यांबरोबर जायला सांगितलं अखेर नाईलाजाने नेहाला एकटीला गाडीत बसवून आणि गाडी व्यवस्थित लॉक करुन सगळे त्या घराजवळ जायला निघाले. घरात कोणी आहे नाही याचा काहीच अंदाज येत नव्हता. समीर हिम्मत करुन पुढे झाला आणि जरा घाबरतच त्याने घराचे दार वाजवलं. पण कोणीच दार उघडलं नाही. थोडा वेळ गेल्यावर त्याने पुन्हा दार वाजवलं. पुन्हा तेच. तिसऱ्या वेळेस त्याने दार वाजवले तेव्हा घरातून हलकीशी गार वाऱ्याची झुळूक आली आणि दार खाटकन उघडलं पण पलीकडे कोणीच दिसलं नाही. बंद दारामागून आलेली गार वाऱ्याची झुळूक आणि आत कोणीही नसताना अचानक उघडलेलं दार यामुळे सगळेजण घाबरुन तिथून पळत रस्त्यावर आले. तेवढ्यात त्यांना पाठमोरी नेहा रस्त्यावरुन चालत जाताना दिसली. गाडीच्या बाहेर पडायला घाबरणारी नेहा अशी एकटीच रस्त्यावरुन चालतेय म्हटल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. सगळेजण नेहाला हाक मारत तिच्या मागून धावत गेले. तेवढ्यात समोरुन एक लाल रंगाची होंडा सिटी आली आणि काही कळायच्या आत कार नेहाच्या आरपार जाऊन बाजूच्या झाडावर आपटली आणि वेडीवाकडी वळणं घेत गर्द झाडीत कोसळली. सगळेजण धावत तिकडे गेले पण आधीच अंधार आणि त्यात गर्द झाडी त्यामुळे नेहा आणि कार कुठेच दिसली नाही.

  "सम्या पोलिसांना फोन कर मी ॲंब्युलंस बोलावतो." विक्रम प्रसंगाच गांभीर्य ओळखून म्हणाला.
     
दुर्दैवाने कोणाच्याच फोनला रेंज नव्हती. तेवढ्यात रियाच्या फोनला नेटवर्क मिळालं आणि त्यावरून पोलिस आणि ॲंब्युलंस दोन्ही कॉल लागले. सगळेजण पुन्हा नेहाला शोधू लागले. थोड्याच वेळात त्यांना नेहा त्या मगाचच्या घराकडे जाताना दिसली. सगळेजण चक्रावले. पण कसलाही विचार न करता सगळे पुन्हा तिच्या मागून धावत गेले. पण आता तिथे घर नव्हतं होती ती फक्त गर्द झाडी. सगळेजण घाबरून पुन्हा पळत रस्त्यावर आले. काहीतरी विपरीत घडतंय यावर हळूहळू सगळ्यांचाच विश्वास बसू लागला होता. नेहाला एकटं सोडून गेल्याबद्दल सगळ्यांनाच पश्चात्ताप होत होता. आपण तिच्याजवळ थांबायला हवं होत असं प्रत्येकालाच वाटत होतं. हतबल होवून सगळी गाडीकडे जायला निघाली तेवढ्यात पोलिसांची गाडी येताना दिसली आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.     

      पोलिसांना बघून सगळे थोडेफार सावरले. विक्रमने त्यांना सगळी हकीगत सांगितली आणि अपघात झालेली जागा दाखवली. पण अंधारामुळे पोलिसांना अपघाताच्या खूणा स्पष्टपणे दिसत नव्हत्या. तेवढ्यात ॲंब्यूलन्स आली. पोलिसांचा तपास चालूच होता पण काहीच धागा मिळत नव्हता. काही वेळात अपघात झालाय का नाही, याबाबतच पोलिस साशंक होऊ लागले. ही पाचही जण पोलिसांना अपघात झालाय हे पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करत होती. थोडा वेळ शोधाशोध करुन पोलिस आणि ॲब्युलन्स जायला निघाले. सगळे हतबल झाले. तेवढ्यात गर्द झाडीतून गाण्याचा आवाज ऐकू आला, "लग जा गले........" पोलिस पुन्हा मागे फिरुन आवाजाच्या दिशेने शोधाशोध करु लागले. त्यांना तिथे लाल रंगाची होन्डा सिटी आणि त्यात अडकलेले एक जोडपं दिसल. त्यातील स्त्री चा आधीच मृत्यू झालेला होता पण पुरुष मात्र बेशुद्ध असला तरी जिवंत होता. पोलिसांनी तातडीने त्या पुरुषाला कारमधून बाहेर काढलं आणि ॲंब्युलन्स मधून हॉस्पिटलला पाठवलं. सगळ्यांना नेहाला शोधण्याची  खात्री देऊन परत जायची विनंती केली.

    सगळे उदास मनाने गाडीजवळ गेले, तेव्हा गाडीत शांतपणे झोपलेल्या नेहाला बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

   विक्रमने फोन करुन नेहा सापडल्याचं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी गाडीजवळ येउन नेहाची चौकशी सुरु केली. पण नेहाशी बोलल्यावर जेव्हा सगळ्यांना कळलं की नेहा गाडीतून बाहेर पडलेलीच नव्हती. तेव्हा मात्र इंस्पेक्टरसकट सगळेच  थक्क झाले.  जुजबी चौकशी करुन झाल्यावर इंस्पेक्टरनी सगळ्यांना जायला सांगितल. निघताना प्रत्येकाच्याच मनात एक विचार येत होता जर ती नेहा नव्हती तर मग 'ती' कोण होती? मृत्यूनंतरही आपल्या नवऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करणारी ती अपघातग्रस्त स्त्री च तर नेहा बनून आली नव्हती?

    सगळ्यांनी फार्म हाऊस वर पोचल्यावर सुटकेचा निश्वास टाकला. तिथे गेल्यावर समीरने आपलं स्क्रिप्ट श्रेयाच्या हातात दिलं आणि म्हणाला, "मी सांगितलं होतं ना, 'माझ्या कथा रिॲलिस्टिक नसतात. आधी मी कथा लिहितो आणि मग त्या खऱ्या होतात!!"

©मानसी जोशी

कथा - ब्युटी कॉन्टेस्ट

ब्युटी कॉन्टेस्ट

"विक्रांत ब्रेकफास्ट तयार आहे लवकर येsss"
रचनाचा आवाज ऐकून तिच्या सासूबाई आणि विक्रांतची आई विनिता उर्फ विन्स विक्रांतच्या आधी डायनिंग टेबलजवळ आल्या आणि तोंड वाकडं करुन म्हणाल्या, " हे काय गोडाचा शिरा?
"हो ! एवढ्या चांगल्या गोड पदार्थाच नाव तोंड आंबट करुन कशाला घेताय सासूबाई" रचना.
   "सासूबाई? तुला किती वेळा सांगितलय मला ममा म्हणायचं म्हणून, गावठी कुठली." विन्स अजूनच वैतागली.
     तेवढ्यात विक्रांत आणि त्याचे बाबा विनायकराव डायनिंग टेबलजवळ आले. साजूक तुपातल्या शिऱ्याचा खमंग वास आल्यावर त्या दोघांच्या तोंडाला पाणी सुटले.
    रचनाने डिश भरायला सुरवात केली तेवढ्यात विन्स कडाडली, "थांब विक्रांत! अजिबात खायचा नाही तो गोडाचा शिरा केवढं तूप आहे त्यात! शिवाय ते कमी म्हणून की काय बदाम, काजूगर अगदी मुक्तहस्ताने ओतले आहेत. अरे असलं खाणं खाशील तर लवकरच ढेरपोट्या होशील. आधीच बघ पोट किती सुटलय ते.
   आईच बोलणं ऐकून विक्रांतने आपलं पोट चटकन आत घेतलं.
"पण मी काय म्हणतो, एवढा केलाच आहे तिने शिरा तर खाऊ दे की त्याला", विनायकराव विक्रांतची बाजू घेत जरा घाबरतच म्हणाले.
"तुम्ही तर बोलूच नका. तुमच्या आईने हे असलं खायला घालूनच तुम्हाला ढेरपोट्या बनवलं आणि ही बया आता माझ्या मुलाला ढेरपोट्या बनवायला निघालेय. अग माझ्याकडे बघ. काल विक्रांतने मला क्लबबाहेर सोडलं तेव्हा माझ्या मैत्रीणी म्हणाल्या, "विन्स तुझा मुलगा अगदी तुझा भाऊ वाटतो हा!"
"छे काहीतरीच काय? विक्रांत काय एवढा म्हातारा वाटत नाही हा", रचना हसत म्हणाली.
    "अग मूर्ख मुली....... जाऊदे तुला काय कळणार? स्वतः  दुधी भोपळ्यासारखी ओबडधोबड आहेस आणि माझा मुलगा राजबिंडा, हे सहन होत नसेल तुला. देव सौंदर्य वाटत होता तेव्हा कुठे होतीस कुणास ठावूक? असशील आपल्या मिडलक्लास फॅमिलीबरोबर कुठली तरी हेवी डिश चाखत." विन्स
    "छे हो आई देव सौदर्य वाटत होता तेव्हा मी अक्कल घ्यायला गेलेले. त्यामुळे सौंदर्य नसलं तरी भरपूर अक्कल दिलेय देवाने मला. पण देव अक्कल वाटत होता तेव्हा तुम्ही मात्र ब्युटी पार्लरमध्ये गेला होतात बहुदा म्हणून कदाचित.... "रचना.
"कदाचित? कदाचित काय ? काय म्हणायच काय आहे तुला? क्लास वन ऑफिसर आहेस म्हणून जास्त शहाणपणा करु नकोस. मला अक्कल नाही असं म्हणायच आहे का तुला ? विन्स संतापून बोलत होती.
"अय्या मला काय म्हणायचं आहे ते चक्क कळलं तुम्हाला? तसं माझ्या संगतीत काही काळ घालवून तुम्हाला समोरच्याचं बोलणं थोडं तरी समजायला लागलं म्हणायचं." रचना
      या दोघींची जुगलबंदी चालू असताना विक्रांत आणि विनायकराव गुपचूपपणे दबकत दबकत पोटभर शिरा खाऊन आपआपल्या खोलीत निघून गेले.
     विनायकरावांच्या मते या दोघींची जुगलबंदी म्हणजे अर्ध्या तासाचं एक विनोदी नाटक. पण काही झालं तरी बोलण्यात काही विन्स रचनाला हरवू शकत नव्हती. विन्स अतिशय मॉडर्न बाई तर रचना साधी सरळ, एका मध्यमवर्गीय घरातली प्रचंड हुशार मुलगी.
     खरंतर विक्रांतचं लग्न विन्सची क्लबमधली मैत्रीण मोनाली उर्फ मोनाच्या मुलीशी व्हावं, अशी विन्स आणि मोना दोघींचीही इच्छा होती. पण विक्रांतला त्या मॉडर्न कसबसं ग्रॅज्युएट झालेल्या मुलीपेक्षा हुशार, कर्तुत्ववान रचना आवडली आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातली रचना या श्रीमंत घराची सून झाली. विक्रांतच्या नकारामुळे मोना आणि विन्सची मैत्रीही संपुष्टात आली.  विन्सच्या क्लबमधल्या सगळ्याच मैत्रीणी सुमार बुद्धीच्या आणि महिन्याला कित्येक हजार ब्युटी पार्लर, जीम, शॉपिंग यावर खर्च करणाऱ्या होत्या. अर्थात विन्सही याला अपवाद नव्हती. वेळ आणि पैसा कुठे घालवायचा? हा जगातला सगळ्यात  मोठा यक्षप्रश्न असणाऱ्या आणि अल्पबुद्धी असणाऱ्या बायकांनी एकत्र येवून स्थापलेल्या क्लबचे कार्यक्रमही तसे मनोरंजकच असायचे.

तर असो;

   भांडणानंतर विन्स आपल्या डाएटनुसार ब्रेकफास्ट घेऊन तरातरा क्लबमध्ये निघून गेली. रचनाही ब्रेकफास्ट करुन ऑफिसला निघून गेली.
     क्लबमध्ये आज "ब्युटी कॉन्टेस्टची" अनाऊन्समेंट करण्यात आली. विन्स आणि मोना त्यात मुख्य स्पर्धक होत्या. कॉन्टेस्टचे राउंड सोपे आहेत असं वाटत असताना विन्सवर एक बॉम्ब पडला. शेवटचे दोन राउंड्स जनरल नॉलेजवर आधारीत असल्याचा बॉम्ब!
क्लबमध्ये त्यातल्या त्यात मोनाच जनरल नॉलेज ठिक होतं.(ठिक म्हणजे फार काही नाही हो. वासरात लंगडी गाय शहाणी होती इतकच). त्यामुळे मोना ही ब्यूटी कॉन्टेस्ट जिंकणार असं क्लबमध्ये सगळ्यांनाच वाटत होतं.  विक्रांतच्या लग्नानंतर मोना विन्सला कमी लेखायची एकही संधी सोडत नसे. सहाजिकच यामुळे विन्सचा जळफळाट होत होता. तिने स्वतःचं जनरल नॉलेज सुधारायचा चंग बांधला आणि घरी जाताना डझनावारी जनरल नॉलेजची पुस्तके घेऊन गेली.
       विनायकराव रिटायर्ड बॅंक ऑफिसर  होते. आयुष्यभर खूप दगदग झाल्यावर आता रिटायरमेंटनंतरचा काळ  निवांत गाणी ऐकण्यात किंवा वाचनात घालवायचा असं त्यांनी ठरवून टाकलं होतं. सहाजिकच ते बरेचदा घरातच असत.
     विन्सच्या हातातील शॉपिंग बघून विनायकराव हसत म्हणाले, "हे काय आज चक्क पुस्तकं आणलीस तू? सुनेचे टोमणे चांगलेच मनावर घेतलेले दिसतायत.
 "तुमची सून गेली खड्यात. आमच्या क्लबमध्ये 'ॲडल्ट ब्युटी कॉन्टेस्ट' आयोजित केलेलं आहे. मी पार्टीसिपेट केलय त्यात. त्याची तयारी म्हणून आणली आहेत ही बुक्स.” विन्स
"ॲडल्ट ब्युटी कॉन्टेस्ट" हे शब्द ऐकून विनायकरावांना 440 व्होल्टचा जबरदस्त धक्का बसला.
"अग काहीतरीच काय बोलतेस अशा अश्लील कॉन्टेस्ट मध्ये तू भागच कसा काय घेऊ शकतेस? विनायकराव स्वतःला सावरत म्हणाले.
"अश्लील काय त्यात? साध्या ब्युटी कॉन्टेस्ट सारखं ब्युटी कॉन्टेस्ट” विन्स अगदी सहज विचारत होती.
"अग पण ॲडल्ट ब्युटी कॉंटेस्ट म्हणजे.... विनायकराव.
 "अहो ॲडल्ट म्हणजे आम्ही सगळ्या आता 45+ आहोत ना म्हणून ॲडल्ट. तुम्हाला 'ॲडॅल्ट' या शब्दाचा अर्थ माहिती नाही? कमाल आहे तुमची. अहो बॅंकेत ऑफिसर होतात ना तुम्ही." विन्स कपाळावर हात मारुन घेत म्हणाली.
विनायकरावांनी मान हलवली आणि लायब्ररीत जायला निघाले.
    "येताना कादंबऱ्या वगैरे नको जनरल नॉलेजची बुक्स असतील तर आणा लायब्ररीतून", विन्सने  धावत जाऊन विनायकरावांना सांगितले.
    दोन दिवस डोकफोड केल्यावर विन्सच्या लक्षात आलं जनरल नॉलेज हा काही आपला विषय नाही. पण ती हार मानणाऱ्यातली नव्हती. मोनाला कमी लेखायची संधी तिला सोडायची नव्हती. आपली जनरल नॉलेज ची तयारी करुन घ्यावी म्हणून तिने  विनायकरावांची पाठ धरली. विनायकरावांना आपल्या बायकोचं अगाध ज्ञान चांगलंच माहिती होतं. या त्रासापासून सुटका कशी करुन घ्यायची याचा ते विचार करु लागले. मुळातच हुशार असणाऱ्या विनायकरावांना एक अफलातून कल्पना सुचली. ज्यामुळे विन्सची जनरल नॉलेजची तयारीही होइल आणि घरातली भांडणही मिटतील.
      विनायकरावांनी विन्सला सांगितल, "हे बघ मी रिटायर्ड माणूस आहे. माझा सगळा वेळ गाणी ऐकणं, कादंबऱ्या वाचणं यातच जातो. जनरल नॉलेज हा असा विषय आहे ज्यात तुम्हाला नेहमी 'अप टू डेट' रहावं लागतं. त्यामुळे यामध्ये माझ्यापेक्षा चांगली मदत तुला रचना करु शकेल. मला माहिती आहे तुला हा सल्ला आवडणार नाही. पण हे बघ काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं. आणि मला मनापासून वाटतं तू विनर व्हावीस म्हणून मी तुला हे सांगतोय."
     विनायकरावांनी खूपच हुशारीने आपलं म्हणणं विन्सच्या गळी उतरवलं होतं. अखेर हो नाही करत विन्स रचनाकडून मदत घ्यायला तयार झाली. शेवटी तिला मोनाला हरवणं हे रचनापेक्षा जास्त महत्वाच वाटत होतं.
      विनायकरावांनी रचनालाही समजावलं. रचना तशी विचारी होती. तिलाही घरातल्या रोजच्या भांडणांचा कंटाळा आला होता. त्यामुळे तिनेही तयारी दर्शवली.
      विन्सची शिकवणी सुरु करण्यापूर्वी रचनाने क्लबची, इतर स्पर्धकांची आणि मुख्य म्हणजे परिक्षकांची माहिती मिळवली. त्यानंतर तिच्या लक्षात आलं अगदीच बेसिक जनरल नॉलेजचे प्रश्न यांना विचारण्यात येतील. तिच्यासाठी विन्सची शिकवणी म्हणजे हातचा मळ होता.
     विन्सची शिकवणी सुरु झाली. रचनाला जेवढं सोप वाटत होतं तेवढं हे काम सोपं नव्हतं. कारण विन्सच जनरल नॉलेज अगदीच भयंकर या कॅटॅगरीत मोडणारं होतं. "राज्य आणि राष्ट्र" यातला फरकही विन्सला कळत नव्हता.  पण रचनाने सगळ्या अडचणींवर मात करत विन्सची उत्तम तयारी करुन घेतली. इतकंच काय तर 'इन्ट्रो राउंडला' स्वतःची ओळख इंग्लिश ऐवजी संस्कृतमध्ये करुन द्यायला सुचवलं. विन्सही आनंदाने तयार झाली. मग दोघी सासवा सुना नऊवारी साडी आणि मोत्याच्या दागिन्यांच शॉपिंग करुन तडक बाहेरून जेवूनच घरी आल्या. दोघींना एकत्र बघून विनायकराव आणि विक्रांत मात्र सुखावले होते.
     "ॲडल्ट ब्युटी कॉन्टेस्ट"चा दिवस उगवला. क्लब मेंबर्सच्या फॅमिलीजनाही आमंत्रण होतं (दुसरं कोण बघणार होतं म्हणा हे कॉंटेस्ट). रचना, विक्रांत आणि विनायकरावही उपस्थित होते. विन्सचा परफॉर्मन्स बघून सगळ्यांच्याच तोंडात बोटं गेली. मोना तर चक्कर येवून पडायची बाकी होती. अपेक्षेनुसार विन्स 'ॲडल्ट ब्युटी क्वीन' झाली. ब्युटी क्वीन झाल्यावर सगळ्यांसमोर तिने रचनाला स्टेजवर बोलावून तिचं कौतुक केलं. आणि आपल्या यशाच श्रेय तिला दिलं. हे बघून मोनाचा अजूनच जळफळाट झाला आणि विन्सच्या विजयाला 'चार चॉंद' लागले.
    आज विन्स आणि रचना एकमेकींवर मायलेकींपेक्षा जास्त प्रेम करतात. आणि हो सांगायचच राहिलं. रचनानेही विन्सच्या मदतीने स्वतःला बदललं बरं का. टिपिकल काकूबाईच्या रुपाची कात टाकून ती आता चवळीच्या शेंगेसारखी बारीक आणि थोडा ॲटीट्यूड असणारी मॉडर्न सून झालेय. अगदी विन्सला हवी तशीच !

©मानसी जोशी















Wednesday, 13 December 2017

जाहिरात....Advt का जमाना हैं

काल एक सगळ्यात महत्वाची बातमी आली ती म्हणजे  सरकारने कंडोम ॲड बॅन केल्या आहेत(सकाळी 6 ते रात्री 10 ). खर तर हे खूप आधीच व्हायला हवं होतं. फक्त कंडोमचीच नाही तर इतर अनेक जाहिराती अशा आहेत ज्या खरोखरच बॅन करणं आवश्यक आहे.

    यामध्ये प्रामुख्याने काही  डिओ स्प्रेच्या  जाहिराती, "स्टॅमिना" वाढविणारी औषधे,  पेगान्यूज किंवा तत्सम प्रेग्नंसी किट, आय पिल,  अनवॉन्टेड 21 सारख्या टॅबलेट्स इतकच काय तर  मी म्हणेन सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातीसुद्धा बॅन करायला हरकत नाही.

काही डिओ स्प्रे च्या जाहिराती बघून असं वाटत; पुरुषांनी डिओ फक्त बायकांना आकर्षित करण्यासाठीच वापरायचा असतो.

पेगान्यूज किंवा तत्सम प्रेग्नंसी किट, अनवॉन्टेड 21 सारख्या टॅबलेट्स, आय पिल , "स्टॅमिना" वाढविणारी औषधे, या गोष्टी खर तर #मेडिसीन या कॅटॅगरीमध्ये मोडतात. त्याची जाहिरात करायची मुळातच गरज काय?

    थोड विषयांतर होतय असं वाटेल कदाचित पण मध्यंतरी वाचनात आलेली एक धक्कादायक आणि दुर्दैवी गोष्ट म्हणजे 'आय पिल', 'अनवॉन्टेड 21' या अशा प्रकारच्या टॅबलेट्स खरेदी करणार्‍यामध्ये अविवाहित तरुणी अग्रेसर आहेत. खास करुन 16 ते 20 या वयोगटातील मुली. विवाहित स्त्रियांच्या तुलनेत यांच प्रमाण कितीतरी पटीने जास्त आहे. बरेचदा या मुली अशा टॅबलेट्स  मेडिकल प्रिस्क्रिप्शन शिवाय खरेदी करतात. सतत या टॅबलेट्स घेतल्यामुळे पुढे जाऊन आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. पण दुर्दैवाने या मुली फक्त जाहिराती बघून अशा गोळ्या घेतात. खर तर मेडिकल प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय अशा टॅबलेट्स विकणं बेकायदेशीर आहे पण तरीही सर्रास बहुतांश मेडिकल स्टोअर्समध्ये  या टॅबलेट्स    प्रिस्क्रिप्शनशिवायच विकल्या जातात.

     टिव्हीवरचे अनेक कार्यक्रम घरात आबालवृद्ध एकत्र बसून बघतात. त्यावेळेस या अशा जाहिराती लागल्या की खूपच अवघडल्यासारख होतं. लहान मुलांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात.  मुलांना सगळ्या गोष्टींची माहिती द्यायला हवी अस सांगणारे अनेक महाभाग असतील. पण कुठली माहिती कुठल्या वयात द्यायची याला काही नियम आहेत .कुठल्याही गोष्टीची माहिती मुलांना योग्य वयात करुन देणं आवश्यक आहे. अन्यथा त्याचे विपरीत परीणाम होतात आणि मुलांच  बालपण हरवून जातं.

    माझ्या माहितीतल्या एका चौथीत शिकणाऱ्या मुलीने सहज कुतूहल म्हणून सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातीबद्दल स्कूल बसमध्ये चर्चा केली. त्यावेळी बसमधल्या एका आठवीत शिकणाऱ्या मुलीने तिला अमुल्य ज्ञान दिलं. त्या ज्ञानामूळे ती मुलगी इतकी घाबरली की बिचारी दोन दिवस झोपू शकली नाही. मग आईने कसबस समजावल्यावर थोडी नॉर्मल झाली. पण तरीही 'त्या चार दिवसांची' अनाठायी भीती तिच्या मनात थोड्या प्रमाणात अजूनही आहेच. या घोळाला काही प्रमाणात सॅनिटरी नॅपकिन्सच्या जाहिरातीही जबाबदार आहेत. बरं या जाहिरातींमध्ये अत्यंत आवश्यक असणारी नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची माहिती दिलीच जात नाही.

     गोरं बनविणाऱ्या क्रिम्सच्या जाहिरातींबद्दल तर जास्त काही न बोललेलच बरं. गोरेपणा म्हणजे सौदर्य या परंपरागत नियमाला कधी छेद जाणार कोणास ठावूक?
एक इटालियन नुडल्सची जाहिरात तर खरोखरच संतापजनक आहे. यामध्ये एक टिनएजर  मुलगी आईच्या तोंडावर दार बंद करुन घेते आणि नंतर आईने  'त्या' ब्रॅन्डच्या टेस्टी नूडल्स बनविल्यावर मात्र शेवटी मैत्रीणींसमोर 'मग आई कोणाची आहे ' असं निर्लज्जपणे म्हणते. आईच्या तोंडावर दार लावणारी मुलगी आणि त्याच काहीही न वाटणारी आई; हे बघून खरोखरच संताप येतो.

    मुलं कळत नकळत या अशा प्रकारच्या जाहिराती फॉलो करत असतात. जाहिरात ही एक कला आहे. अशा अनेक जाहिराती आहेत ज्या संस्मरणीय झाल्या आहेत. पण आजकाल जाहिरात म्हटल्यावर ॲटीट्यूड दाखवणारे  सेलिब्रेटीज, कमीत कमी कपडे, स्टंट्स, अशा अनेक गोष्टी प्रामुख्याने आढळतात. जाहिरात सुयोग्य पद्धतीने करणं ही प्रत्येक उत्पादकाची नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं.
   
या विषयावर लिहायचा कधी विचार नव्हता केला. पण परवा माझ्या एका आवडत्या काकूने या विषयावर लिहायला सांगितल आणि कालची बॅनची बातमी यामुळे ही पोस्ट लिहिली आहे.

©मानसी जोशी





Sunday, 10 December 2017

कथा - आरोह

आरोह

मध्यरात्र उलटून गेली होती. आरोही खिडकीत बसून समोर दिसणाऱ्या ऋषीच्या घराकडे मूकपणे पहात होती. रात्र सरुन पहाट सुरु होणार होती. "आता थोड्याच वेळात ऋषी रियाजासाठी उठेल तेव्हा त्याला गाताना बघता येईल, कदाचित शेवटचं! कदाचित!"
    आरोहीच्या मनात आलेल्या या विचाराने आत्तापर्यंत शुष्क झालेले तिचे डोळे पाणावले.  मी इथून गेले तर ऋषीला आठवण येइल का माझी? आरोहीच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तिची आणि ऋषीची ओळख होऊन वर्षही झालं नव्हतं. पण असं वाटत होतं की दोघं वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतात. ऋषीच्या पहिल्या भेटीपासूनचा प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर आला.
       आरोहीचा फ्लॅट शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या एका बिल्डींगमधे होता. पण ती बिल्डींग रिडेव्हलप्मेंटला गेल्याने आरोही तिच्या कुटुंबासह शहराबाहेर असणाऱ्या या बंगलो सोसायटीमध्ये शिफ्ट झाली होती. अगदी ऋषीच्या बंगल्याच्या समोरच्या बंगल्यात. तिला या एरियाबद्दल तशी फारशी माहिती  नव्हती. आजूबाजूचे बरेचसे बंगले बंदच होते. कोणाशीतरी ओळख करुन घ्यावी या हेतूने ती समोरच्या बंगल्यात गेली. कुत्रा नाही ना याची चाहूल घेत जरा घाबरतच तिने बेल वाजवली.
"नमस्कार! मी आरोही इथे समोरच्या बंगल्यात नवीनच  राहिला आलो आहोत आम्ही. सहजच ओळख व्हावी म्हणून तुम्हाला चहाला बोलवायला आले होते." आरोही आपली ओळख करुन देत म्हणाली.
 "मी शालिनी. मला शालिनीताई म्हटलस तरी चालेल. मी चहाला येईन तुझ्याकडे त्याआधी आमच्याकडची कॉफी टेस्ट करावी लागेल", शालिनीताई हसून म्हणाल्या.
    आरोही आतमध्ये आल्यावर तिला बसायला सांगून शालिनीताई कॉफी करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. आरोही सोफ्यावर बसणार तेवढ्यात तिला तानपूऱ्याचे स्वर ऐकू आले आणि तिची पावले नकळत आवाजाच्या दिशेने वळली. ऋषी त्याच्या खोलीमध्ये भान हरपून रियाज करत होता. आरोही दारातच थांबली. तिचं ऋषीकडे लक्षही गेलं नाही. ती डोळे भरुन तानपूऱ्याकडे बघत होती. मुग्ध करणाऱ्या ऋषीच्या स्वरांना आपल्या कानात साठवत होती. त्या दिवशी कितीतरी वर्षांनी ती तानपूरा बघत होती. तिला तिचा गाण्याचा क्लास आठवला. ती ही असच भान हरपून रियाज करत बसायची. पण बाबा गेले मग क्लास सुटला आणि गाणंही.
     "स्वर चुकतोय तुमचा 'म' शुद्ध लागतोय. 'यमन' रागामध्ये 'म' तीव्र असतो. आरोही नकळतपणे बोलून गेली. तिचा आवाज ऐकून ऋषी भानावर आला. इतका वेळ कोणी सुंदर तरुणी आपल्या दाराबाहेर उभी राहून आपलं गायन ऐकतेय याची साधी जाणीवही त्याला नव्हती. क्षणभर काय बोलावं हे दोघांनाही कळलं नाही. आरोहीला तर अगदीच शरमल्यासारखं झालं होतं. एका अनोळखी बंगल्यात, अनोळखी पुरुषाच्या खोलीबाहेर त्याच्या परवानगीशिवाय उभं राहून ती त्याचा रियाज ऐकत होती.
  "इथे आहेस होय तू मी म्हटलं  कुठे गायब झालीस?" शालिनीताईंच्या आवाजाने आरोही भानावर आली. 
 "सॉरी पण तानपुऱ्याचे स्वर ऐकले आणि नकळत पाय इकडे वळले." आरोही म्हणाली. 
"ठिक आहे ग हरकत नाही. कॉफी घे आधी थंड होईल नाहीतर." शालिनीताई हसून म्हणाल्या.
    त्यानंतर मात्र शालिनीताईंची आणि आरोहीची छान ओळख झाली. त्यांना आरोही खूप आवडली होती. आरोहीचंही त्यांच्या घरी जाणं येणं वाढलं. संगीताच्या आवडीमुळे सहाजिकच तिची आणि ऋषीची ओळखही वाढली.
    ऋषी हा शालिनीताईंचा भाचा आणि त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होता. साधारण दहा वर्षांपूर्वी शालिनीताई, ऋषी आणि त्यांचे सगळे कुटूंबीय फिरायला जात असताना त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातामध्ये ऋषीचे आई-बाबा, शालिनीताईंचे पती व त्यांच्या दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ऋषी आणि शालिनीताई मात्र वाचले होते. ऋषी तेव्हा बारावीला होता. या धक्क्यातून सावरणं दोघांनाही कठीण गेलं होतं पण शालिनीताईंनी मात्र हिम्मत दाखवून स्वतःला सावरलं आणि ऋषीलाही या धक्क्यातून बाहेर काढल. त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. दोघंही एकमेकांचा आधार झाले होते.
      ऋषी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होता. पण त्याला म्हणावं तसं यश येत नव्हतं. म्युझिक इंडस्ट्रीशी कनेक्टेड असल्यामुळे ऋषीला अनेक कार्यक्रमांचे पासेस मिळत असत. शालिनीताई क्वचितच कधीतरी त्याच्याबरोबर जायच्या. पण बरेचदा ऋषी एकटाच जायचा. एक दिवस ऋषीला पंडित जगन्नाथांच्या कार्यक्रमाचे दोन पासेस मिळाले होते. शालिनीताईंना शक्य नव्हतं म्हणून त्याने आरोहीला विचारलं. आरोहीला जायची खूप इच्छा होती पण कार्यक्रम रात्रीचा असल्यामुळे तिला जमणं शक्य नव्हतं. कारण तिचा सव्वा वर्षाचा मुलगा मिहिर तिच्याशिवाय झोपत नसे.
     आरोहीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे तिचा मुलगा मिहीर. आरोहीला कितीही इच्छा असली तरी मिहीरला सोडून कार्यक्रमाला जायला तिचं मन तयार होईना. पण तिच्या सासूबाईंनी मिहीरला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि तिला आग्रहाने ऋषीबरोबर पाठवलं. त्यानंतर मात्र आरोही आणि ऋषीमध्ये जवळीक निर्माण झाली. कधी कार्यक्रम, कधी ऋषीला काम मिळाल्याचं सेलिब्रेशन तर कधी शॉपिंग,  यासारख्या अनेक कारणांनी ऋषी आणि आरोही एकत्र बाहेर जाऊ लागले. दोघंही त्यांची सुख-दु:ख एकमेकांशी शेअर करत असत. हळूहळू नकळतपणे दोघं एकमेकांमध्ये गुंतत गेले. मिहीरचीही ऋषीबरोबर चांगली गट्टी झाली होती. ऋषी अनेकदा मिहीरला फिरायला घेऊन जात असे. तर कधी आरोही, मिहीर आणि ऋषी तिघंही एकत्रीत फिरायला जात असत. त्या तिघांना एकत्र बघून शालिनीताईंच्या मनात मात्र कालवाकालव होत असे. ऋषीनेही आता लग्न करुन सेटल व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. शिवाय त्यांना ऋषी आणि आरोहीची जवळीकही खटकायला लागली होती. एकदा त्यांनी तसं आरोहीच्या सासूबाईंजवळ हे बोलूनही दाखवलं होतं पण त्यांनी मात्र 'आजकाल स्त्री पुरुषामध्येही निखळ मैत्री असते' असं बोलून विषय तिथेच संपवला होता.
     दिवस भराभरा जात होते. आरोही आणि ऋषी एकमेकांमध्ये अधिकच गुंतत चालले होते. अशातच राहुलचा म्हणजेच आरोहीच्या नवऱ्याचा अमेरिकेहून फोन आला. तो दहा दिवसांनी भारतात परत येणार होता. त्याने आरोहीला व्हिसाची प्रोसिजरही सुरु करायला सांगितली. आरोही भानावर आली. त्या रात्री ऋषी आणि आरोही कॉन्सर्टसाठी म्हणून घरातून बाहेर पडले. पण कॉन्सर्टला न जाता दोघही लॉंग ड्राईव्हला गेले. आरोही ऋषीच्या मिठीत भरपूर रडली. बाबा गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी ती अशी रडत होती. ऋषी तिला लहान बाळासारखं थोपटत होता. खरंतर तो ही आज भानावर आला होता. आरोहीचं लग्न झालंय हे माहिती असूनही तो तिच्यामध्ये गुंतला होता. त्या रात्री दोघांनाही त्यांचं एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती.
    आरोही आणि ऋषीची अवस्था तिच्या सासूबाई आणि शालिनीताई या दोघींच्याही नजरेतून सुटली नाही. पण कोणीच काही बोललं नाही. त्या दिवशी पहाटेच घराची बेल वाजली. राहुल आला होता. त्याला बघून आरोहीला कणभरही आनंद झाला नाही. कसा होईल म्हणा सतत पैशाची भाषा करणाऱ्या, आपल्या स्टेटसची घमेंड असणाऱ्या राहुलमध्ये आणि तिच्यामध्ये भावनिक नातं कधी निर्माणच झालं नव्हतं. आरोहीच्या सासूबाईंनी आरोहीला एका लग्नात बघितलं आणि त्यांनी तिला राहुलसाठी मागणी घातली. काका काकूच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगणाऱ्या आरोहीला नाही म्हणण्याचा अधिकारच नव्हता. तसं सुरवातीला उच्चशिक्षित देखणा राहुल तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार वाटला होता. पण राहुलने मात्र कधीच तिच्या मनाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नाही. तिचं आणि राहुलचं लग्न झालं त्या रात्री राहुलने फक्त तिचा नवरा होण्याचा हक्क बजावला होता. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांतच राहुल अमेरिकेला निघून गेला. जाताना मात्र आपल्या पुरुषत्वाची निशाणी आरोहीला देऊन गेला होता. आरोही गरोदर होती पण त्याचं कुठलंच कौतुक राहुलला नव्हतं. राहुल क्वचितच आरोहीच्या मोबाईलवर फोन करत असे. आईच्या मोबाईलवर मात्र रोज फोन करत असे. तेव्हा त्या राहुलला आरोहीशी बोलायला लावत असत. आरोहीला सगळं कळत होतं पण ती काहीच बोलत नव्हती. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत अमेरिकेला निघून गेलेला राहुल मिहीरच्या जन्मानंतर एका महिन्याने भारतात परत आला होता. मिहीरचा मात्र त्याला चांगलाच लळा लागला होता. जवळपास महिनाभर राहून जेव्हा राहुल पुन्हा अमेरिकेला जायला निघाला तेव्हा मात्र त्याचा पाय निघत नव्हता. त्या दिवशी प्रथमच आरोहीला राहुलच्या डोळ्यात 'अहं' न दिसता भावना दिसल्या होत्या.  मिहीरसाठीचं प्रेम दिसलं होतं. आजही राहुल आला तेव्हा मिहीरला डोळे भरुन बघत होता. जवळपास सव्वा वर्षाने तो मिहीरला बघत होता. त्या रात्रीही राहुलने आरोहीला जवळ घेऊन फक्त आपला नवरा असल्याचा हक्क बजावला. आरोहीला त्याच्या स्पर्षाची घृणा वाटली. राहुल झोपल्यावर मात्र खोलीच्या बाहेर येऊन ती भरपूर रडली. तिला क्षणाक्षणाला ऋषी आठवत होता.
  "अजून किती दिवस सत्यापासून दूर पळणार आहेस आरोही?" सासूबाईंच्या आवाजाने आरोही दचकली.
"का निभावते आहेस हे नातं? मला माहिती आहे तू आणि ऋषी एकमेकांमध्ये गुंतला आहात. खरंतर माझच चुकलं. आज माझ्यामुळे तुझी ही अवस्था झालेय. राहुलला लग्नच करायचं नव्हतं ग. तो तिकडे अमेरीकेत रिटा नावाच्या मुलीसोबत 'लिव्ह इन' मध्ये रहात होता. पण माझ्या इच्छेसाठी त्याने तुझ्याशी लग्न केलं. मला वाटलं होतं लग्नानंतर आपोआपच संसाराची गोडी निर्माण होइल त्याला. पण तसं झालं नाही. आजही रिटाने त्याला सोडलं म्हणून तो तुला तिकडे घेऊन जातोय. मला माफ कर आरोही. झालेलं बदलता येणार नाही पण नशीबाने ऋषीच्या रुपाने तुझ्या आयुष्यात सुख आणलंय. तू राहुलला घटस्फोट देऊन ऋषीशी लग्न कर आणि सुखी हो. आरोही फक्त आठ दिवस आहेत तुझ्या हातात. अशी शांत राहू नकोस लवकर विचार कर." सासूबाई तिला समजावत म्हणाल्या.
       आज आठ दिवसांनंतरही आरोही शांतच होती. घटस्फोट घेऊन ऋषीशी लग्न करण्याची हिम्मत तिच्यामध्ये नव्हती. कॅन्सरच्या वेदना आणि उपचाराच्या खर्चाने हतबल होवून गेलेले बाबा,  त्यानंतरच काका काकूच्या उपकाराखाली जगणं, अगतिक झालेली आई हे सारं आठवलं.  तिच्या मोठ्या बहिणीचा घटस्फोट झालेला होता. त्यावरून तिची आई काकूचे टोमणे सहन  करत होती. धाकटी बहीण अजून शिकत होती. दोन बहि‍णींचा घटस्फोट झाल्यावर धाकट्या बहिणीचं लग्न कसं होणार? पण मग माझं काय? मी अशा व्यक्तीसोबत का राहू ज्याचं माझ्यावर प्रेमच नाही. प्रत्येकवेळी मी माझ्या स्वप्नांचा त्याग का करू? आधी गाणं आणि आता ऋषी. सगळ्यांच्या सुखासाठी मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या प्रेमाचा बळी का देऊ?
      पण मग मिहीरचं काय? राहुल कसाही असला तरी त्याचं मिहीरवर प्रेम आहे. पित्याचं प्रेम हा मिहीरचा अधिकार आहे. ऋषीही मिहिरला जीव लावतो पण कशावरून स्वतःच मुल झाल्यावर ऋषी मिहीरला अंतर देणार नाही? आज ना उद्या ऋषी हा त्याचा खरा बाप नाही हे सत्य मिहिरला कळेलच. राहुलचा स्वभाव आणि मिहिरवरचं प्रेम बघता काहीही झालं तरी तो मिहिरला स्वतःपासून दुरावू देणार नाही आणि मी मिहिरशिवाय जगूच शकत नाही. अजूनही स्वतःच्या करीयरसाठी स्ट्रगल करणारा ऋषी मिहीरला काय भविष्य देणार? कितीही नाकारलं तरी पैसा हेच अंतिम सत्य आहे. माझं जे झालं ते झालं पण निदान मिहीरला तरी उत्तम भविष्य मिळायला हवं जे ऋषी नाही राहुल देऊ शकतो.
    अखेर खूप विचार करुन आरोहीने राहुलबरोबर अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात आलं, "प्रसन्न भूपाळी असो वा धीरगंभीर मालकंस, जीवाला हूरहूर लावणारा आसावरी असो वा शृंगारीक काफी स्वरांचा आरोह हा चढताच असतो; माझ्या आयुष्यातल्या दु:खासारखा!" तिच्या डोळ्यातून बरसणारे अश्रू थांबतात आणि ऋषीचे आर्त स्वर तिच्या कानावर पडतात-
"रातभर आपकी याद आती रही...आपकी याद आती रही रातभर.."
©मानसी जोशी

Tuesday, 5 December 2017

लव्ह आज कल

सोनी चॅनेलवर सद्ध्या एक नवीन सिरिअल चालू झाली आहे.. "ये उन दिनों की बात हैं." या सिरिअलमध्ये ९० च्या दशकातील 'लव्ह स्टोरी' दाखवली जातेय. मी ही सिरिअल बघत नाही. आजवर त्याचा एकही एपिसोड मी बघितला नाहीये. पण त्याचे प्रोमोज मात्र इंटरेस्टींग आहेत. गेल्या आठवड्यातल्या प्रोमोमध्ये एक वाक्य ऐकलं ....."ये उन दिनोंकी बात हैं जब ब्रेक अप नही सचमें दिल तुटा करता था." एकदम क्लिक झाल हे वाक्य आणि मनोमन पटलही.

   त्या काळात gadgets ची तोंड ओळखही झाली नव्हती. त्यावेळी कॉलनीतल्या एखाद्या घरात असणारा टेलिव्हिजन (त्यातही तो बरेचदा 'ब्लॅक ॲन्ड व्हाईट') म्हणजे फक्त दूरदर्शन! सतत ॲडजस्ट करावा लागणारा ॲन्टेना आणि "रुकावट के लिए खेद हैं .... हे वाक्य. मोबाईल तर नव्हतेच पण लॅन्डलाईनही क्वचितच कोणाकडे असायचा. रेडिओ मात्र जवळपास प्रत्येक घरी सकाळीच चालू व्हायचा. सुट्टीचा दिवस किंवा मोकळा वेळ कॅरम, पत्ते, बुद्धिबळ किंवा मैदानी खेळ खेळण्यात संपायचा.

 ही परिस्थिती  20s पर्यंत बरीच बदलली. 'ब्लॅक ॲन्ड व्हाइट'चा जमाना जवळपास संपला. घरोघरी कलर टिव्ही आणि त्यासोबत केबल नेटवर्कही आले. झी, सोनी, स्टार प्लस, प्रादेशिक यासारखी वेगवेगळी चॅनेल्स सुरु झाली. पण तरीही काही गोष्टी मात्र हळूहळू बदलत होत्या.

    त्यावेळेस मुलगे आणि मुली हळूहळू एकत्र एकाच ग्रूपमध्ये येऊ लागले. तरीही बरेचदा मुलांचे आणि मुलींचे ग्रूप्स वेगवेगळे असायचे.

 प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यावेळेसही .... "प्यार किया नहीं जाता बस हो जाता हैं "....  हाच फॉर्म्युला लागू  होत होता. मग ते बघताक्षणी .. 'ती पहाताच बाला' वालं असो किंवा खूप दिवस एकत्र/ एकाच ग्रूपमध्ये  राहून मनात नकळत निर्माण झालेलं प्रेम असो. तिथे #क्रश वगैरे प्रकार अस्तित्वातच नव्हता.

       प्रेम ही एक भावना असायची आणि ती हळूवार जपली जायची. समोर बघताक्षणी मनातली धडधड, चोरुन बघणं हे सारं अगदी सहज घडत होतं. त्यावेळचे प्रेमी आजच्यासारखे एकमेकांच्या गळ्यात पडलेले नसायचे. नजरेतून किंवा ओझरत्या स्पर्षातूनही खूप साऱ्या भावना व्यक्त व्हायच्या.

#डेडीकेटेड_सॉंग्ज हा त्यावेळेचा सगळ्यात इंटरेस्टींग प्रकार. आपल्या आवडीची खास तिच्यासाठीची गाणी निवडून त्याची #ऑडिओ_कॅसेट बनवून तिला दिली जायची.

Mobile,  whats ap chat , messenger chat, IMO chat हे प्रकार अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे मनातल्या भावना कागदावर उतरवल्या जायच्या. मग वही किंवा पुस्तकातून त्याची देवाणघेवाण होत होती.

#ग्रिटिंग_कार्ड हे भावना पोचवण्याच सगळ्यात प्रभावी माध्यम होतं. #आर्चिस _गॅलरी आणि कंप्युटरचा क्लास हा एक डेडली कॉम्बो होता.

कॉलेजच्या जुन्या आयकार्डवरचा किंवा संपलेल्या परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा  पासपोर्ट फोटो अलगद काढून हळूच तो त्याला किंवा तिला दिला जायचा.

फोन करतानाही #कोड_लॅंग्वेज वापरली जात होती. दोन रिंग देउन फोन कट करायचा म्हणजे  'त्याचा' किंवा 'तिचा' फोन आहे हे बरोबर समजायचं आणि मग घरातल्या सगळ्यांच्या नकळत लगेच फोनजवळ जाऊन बसायचं. हे सगळं खूप थ्रिलिंग होतं. (हा माझा वैयक्तिक अनुभव नाही जनरल ऑब्झर्वेशन आहे. कृपया गैरसमज नसावा.)

#डेट वगैरे प्रकार हळूहळू अस्तित्वात येत होते. तरीही चोरुन भेटण्यातलं थ्रिल अजूनही कायम होतं . बरेचदा 'तिच्याबरोबर' तिची मैत्रीण असायची त्यामुळे 'प्रायव्हसी' जवळपास मिळतच नव्हती.

 त्यावेळेस प्रेम हे एका वेळेस एकाच व्यक्तीवर केल जात होतं. त्यामुळे जेव्हा नातं तुटायच (त्यावेळी नातं तुटायच #ब्रेक_अप होत नव्हता) तेव्हा खूप दु:ख व्हायचं. "आज पूजा तो कल कोई दुजा" अशी परिस्थिती त्यावेळेस क्वचितच आढळायची.
आजकाल तर व्हर्च्युअल प्रेम वेगळं, कॉलेजमधलं प्रेम वेगळं, क्लासमधल प्रेम वेगळं, आणि या सर्वांवर कडी म्हणजे लग्नासाठीच प्रेम वेगळं हे असे प्रकार बघायला मिळतात.
काय चूक काय बरोबर या वादात मी पडणार नाही तो माझ्या पोस्टचा भागही नाही. कालानुरूप सगळ्याच गोष्टी बदलत असतात. आणि ते आवश्यकही असतं. काही बदल पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह. जे काही असेल त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो. या पिढीचे विचार कसेही असले तरी मला त्यांच्या काही गोष्टी मनापासून पटतात.  त्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ब्रेकअप नंतरही यांच्यातली मैत्री कायम रहाते. पूर्वी असं होत नव्हतं. एकदा का नातं संपल की दोघांचे मार्ग वेगळे व्हायचे. ही पिढी समोरच्याला आपलं आवडणं अगदी सहज स्विकारते त्याच सहजतेने त्याला आपलं नावडणही स्विकारते.

आजची पिढी अगदी प्रॅक्टिकल विचार करुन आयुष्य जगते. फक्त स्वतःपुरता विचार करतात. 'प्रेम म्हणजे त्याग' असल्या विचारांमध्ये जास्त अडकत नाही. भावनांना फारसा वाव देत नाही,  असे अनेक आरोप या पिढीवर होतात. पण या पिढीच सगळं 100% चूक आहे असं मी कधीही म्हणणार नाही. उगाच स्वतःला भावनांमध्ये गुरफटून घेऊन दु:खी उसासे टाकत आयुष्य जगण्यापेक्षा त्यामध्ये न अडकणं केव्हाही चांगल. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

©मानसी जोशी
https://youtu.be/1S7nFVUsmJ4

https://youtu.be/B1wznN0Zmhw


Tuesday, 28 November 2017

इगो का स्वाभिमान

ती बॅग घेवून जायला निघाली.
भरलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितलं. तो तसाच शांत उभा होता.
तिने दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याच्याकडे वळूनबघितलं.
आता त्याच्याही मनात कालवाकालव होत होती. मनातून त्याला खूप वाटत होतं; सांगाव तिला, "अशी जावू नकोस ना मला एकट्याला सोडून......." पण त्याचा 'इगो' त्याला तसं करायची परवानगी देत नव्हता. कारण त्याने तिला जायला सांगितलं नव्हतं. ती स्वतःहून जात होती.
तो थांबवेल या आशेने काही क्षण ती दारातच उभी राहिली. मनातून तिला खूप वाटत होतं, परत फिरुन त्याला मिठी मारावी. पण तिचा 'इगोही' काही कमी नव्हता. तो थोडीच तिला असं काही करु देईल.
ती दार ओढून निघून गेली. दार बंद झाल्याचा आवाज आला आणि त्याने दचकून वळूनबघितलं. ती खरंच निघून गेली होती. तो हतबल होऊन खाली बसला.

त्या दोघांच 'लव्ह मॅरेज’-

त्यांच्या 'डेटला' तो बरेचदा उशीरा जायचा. ती कितीतरी वेळ त्याची वाट बघत बसायची. ती चिडली की तो कान धरुन तिची माफी मागायचा. कॅडबरी, रेड रोझ, गिफ्ट्स आणि रोमॅन्टिक बोलणं यामुळे ती ही विरघळायची. पण तरीही आतून कुठेतरी ती निदान एकदा तरी त्याने आपली वाट बघावी म्हणून तळमळायची .
       पुढे लग्नझालं. नव्याची नवलाई संपली. दोघांनाही एकमेकांच वागणं खटकायला लागलं. तो पक्का धार्मिक तर ती नास्तिक नसली तरी कर्मावर विश्वास ठेवणारी. त्याच्या रुढी परंपरा जपणाऱ्या घरात तिची घुसमट व्हायची पण तरीही ती सगळं ॲडजस्ट करत होती. त्याच्यासाठी!
     तिने केलेली बेचव कॉफीही आवडीने पिणाऱ्या त्याला तिने केलेली त्याची आवडती भरली वांगीही आवडत नाहीशी झाली.
     त्याचं ओला टॉवेल बेडवर टाकणं, नोकरी करणारी बायको असूनही तिने घरातले रितीरिवाज सांभाळावे, त्याला प्रायोरिटी द्यावी अशी इच्छा असणं हे सारं तिला खटकायला लागलं. नवरेशाही चालवून घेणाऱ्यातली ती नव्हतीच कधी.
    साध्या साध्या गोष्टीही आता वादाच कारण बनू लागल्या. एकमेकांची छोटीशी चूकही अक्षम्य अपराध असल्यासारखी  वाटू लागली. वाद वाढत गेले आणि तिने घर सोडून जायचा निर्णय घेतला.

ती माहेरी गेली. तिथे दादा वहिनीचा संसार अगदी जवळून बघत होती.
    तसं तिच्या लग्नाआधीच तिच्या भावाचं लग्न झाल होत. पण आज नव्यानेच एका वेगळ्या दृष्टीकोनातून ती त्यांचा संसार बघत होती. तिला त्यांच्या संसारात आपण अडचण आहोत असं उगाचच वाटू लागल. दादा वहिनी खूप चांगले होते. त्यांच्या मनात तसा विचारही नव्हता. पण आपण या चांगुलपणाचा फायदा घेणं योग्य नाही असा विचार तिच्या मनात येवू लागला.
     वहिनी करत असलेल्या ॲडजस्टमेंट ती अगदी जवळून बघत होती. दादासाठी ती अनेक गोष्टी जुळवून घेत होती. आईचा कडक शिस्तीचा काहीसा तापट स्वभाव,बाबांचं पथ्य पाणी, सगळं काही अगदी सहज सांभाळत होती. दादाही ॲडजस्ट करत होता. तिच्यासाठी काही प्रमाणात का होईना त्याने स्वतःला बदललं होतं.

      ती निघून गेल्यावर घरच काय त्याचंआयुष्यच रितं झाल्यासारख वाटलं त्याला. सकाळच्या कॉफीपासून प्रत्येक गोष्टीत त्याला तिची आठवण येत होती.
     त्याने ओला टॉवेल बेडवर फेकणं सोडून दिलं. त्याला आता स्ट्रॉंग कॉफीपेक्षा माईल्ड कॉफीच आवडायला लागली होती. कॅन्टिनच्या तिखट तेलकट भाज्या खाताना त्याला जाणवलं; ती आपलं डाएट किती व्यवस्थित सांभाळत होती. आपणच चुकलो निदान थोडं तरी तिला समजून घ्यायला हवं होत. पण परत कसं आणायच तिला ?

आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांचे, आपल्या मैत्रीणींचे संसार आता ती विचारपूर्वक बघू लागली. क्षणाक्षणाला तिला जाणवत होतं. तो खरच खूप ॲडजस्ट करत होता आपल्यासाठी. पण परत कसं जाणार आता ?
   
काही दिवस असेच सरले. त्यादिवशी ऑफिसमध्ये कामाच शेड्युल ठरवत असताना अचानक तिच्या लक्षात येतं; तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अगदी दहा दिवसांवर येउन ठेपला आहे. "गेल्यावर्षी याच वेळी मी किती खूष होते", या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं.

    आता तो खरच तिची खूप मनापासून वाट बघत होता. फरक फक्त एवढाच होता ती वाट बघायची तेव्हा तो येणार याची तिला खात्री असायची पण त्याच्यासाठी मात्र सगळच अनिश्चित होतं.

    खरच इगो इतका महत्वाचा असतो का ? की ज्यामुळे जे आपल्याला पटतंय, जे वाटतय ते आपण करुच शकत नाही?
   दोघांनाही आपाआपल्या चुकांची जाणीव झालेली होती. चूका सुधारायची, समोरच्याला माफ करायची तयारीसुद्धा होती; पण त्यासाठी पाऊल उचलायला मात्र कोणीच तयार नव्हतं.

       बाकीच्या गोष्टींसारखा या गोष्टीचाही शेवट गोड व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असेल. होईलही कदाचित कारण ही गोष्ट आहे,कल्पना आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात  खरच असं घडत असेल?
     इगो आणि स्वाभिमान यामध्ये अगदी बारीकसा फरक आहे. पहिल्याचं नसणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच दुसऱ्याच असणं आवश्यक आहे. असे किती 'तो' आणि 'ती' असतील ज्यांना मनापासून एकत्र यायचं आहे पण इगो आड येतोय. कोणीही पुढे पाऊल टाकायला तयार होत नाही. आयुष्य रेटत रहातात. समोरचा कधीतरी आपल्याकडे येइल याची वाट बघत रहातात. मग हळूहळू एकटेपणाचीच सवय होते. एकटेपणा आवडायला लागतो आणि एक नातं फुलायच्या आधीच कोमेजतं.
     कुठल्याही समस्येवर 'एक घाव दोन तुकडे' हे सोल्यूशन नसतं. चर्चा करुन अनेक प्रश्न सोडवता येतात.
पटत असेल तर विचार करा. शेवटी महत्व कशाला द्यायचं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं.

©मानसी जोशी











Tuesday, 21 November 2017

काल आणि आज


काल लेक शाळेतून घरी आली तेव्हा चेहरा पडलेला. मी विचारलं काय झालं कोणी रागावलं का? कोणाशी भांडण झाल का? तर मान हलवून नाही म्हणाली. मग थोडी साखरपेरणी केल्यावर म्हणाली, "आज आमच्या क्लासमध्ये सगळी मुलं मस्ती करत होती त्यामुळे टिचर वैतागल्या आणि शिक्षा म्हणून आम्हाला गेम्सच्या पिरिएडला वर्गातच बसवून ठेवलं."
     मला हसायला आलं. शाळेतले दिवस आठवले आणि मनात आल काहीच तर नाही बदलल इतक्या वर्षात.
  मागच्या आठवड्यात टर्मिनलचे पेपर्स दाखवले. आमच्या कन्यकेने 'Fill in the blanks' आणि  'Match the pair' ची फक्त उत्तरं उत्तरपत्रीकेत लिहिली. त्यामुळे उत्तरे बरोबर असूनही टिचरनी तिला मार्कस दिले नाहीत. मी टिचरना विचारल्यावर त्या म्हणाल्या, "वर्गात कितीतरी वेळा सांगून झालय fill in the blanks' ची संपूर्ण वाक्य लिहायची. Match the pair ची पूर्ण जोडी लिहायची नुसती उत्तरे लिहायची नाहीत. पेपरच्या दिवशीही या सूचना दिल्या होत्या. तरीही अनेक मुलांनी ही चूक केलेय. आता शिक्षा मिळाल्याशिवाय समज येणार नाही."
      मी ठिक आहे म्हणून तिथून निघाले. माझेही मार्क्स असेच एकदा कट झाले होते, हे आठवलं आणि मनात विचार आला, काहीच नाही बदललं.
     लेकीची वही चेक करताना मागच्या पानावर 'फुली गोळ्याचे' अनेक चौकोन दिसले. मी काही विचारणार तोच म्हणाली, "ऑफ पिरिएडला खेळतो ग आम्ही."....  काहीच नाही बदललं इतके वर्षात.
    आजही शाळांमध्ये तेच घडतं जे पूर्वी घडायचं. खरच काहीच बदललेलं नाही का?
बदललय ! बदलली आहे ती पालकांची मानसिकता. पूर्वी पालक स्वतःहून शिक्षकांना सांगत, " ऐकला नाही तर दोन रट्टे दिलेत तरी चालेल आम्ही कोणीही विचारायला येणार नाही”
पण आता शिक्षक मुलांना ओरडले तरी पालक मारहाण केल्यासारखे रिॲक्ट होतात.
मुलांना मारणं चूक का बरोबर हे मला माहिती नाही. मला त्या वादात पडायचही नाही. पण छडीचे घाव हातावर बसले म्हणून पाढे पाठ झाले. भुमितीतील अनेक सूत्र या छड्यांच्या धाकामुळेच डोक्यात पक्की बसली. '&' आणि 'and' मधला फरक कान पिरगळ्यामुळे लक्षात राहिला. (अनेकांना हा फरक आजही माहिती नसेल.)
शिक्षकांची मानसिकता बदलली आहे / नाही हे मला माहिती नाही. पूर्वी आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे 'परिक्षार्थी होऊ नका विद्यार्थी व्हा'.  आजही शाळेत 'मुलांच्या मार्कांकडे नको तर त्यांच्या चुकांकडे लक्ष द्या. त्या सुधारा" असच सांगितल जात.
    माध्यम कुठलंही असूदे. शाळेची फी कितीही असूदे. पण जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करतायत तोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधल नातं टिकून राहील.काही शिक्षक अपवाद असतीलही. हाताची सगळी बोटं सारखी नसतात. असे शिक्षक पूर्वीही होतेच फक्त तेव्हा पालकांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती.
मुलांचे शिक्षक हे मुलांचे शत्रू नाहीत. निदान  मुलांसमोर त्यांच्या शिक्षकांना नावं ठेवणं हे टाळलं पाहिजे. मुलांच्या बाबतीत पालक  'प्रोटेक्टिव्ह' असतात. असावच ते आवश्यकच आहे. फक्त 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' असू नये. हा ओव्हर बाजूला करा मग तुम्हीही म्हणाल, "खरच काहीच नाही बदललं इतके वर्षात!"
©मानसी जोशी

Sunday, 19 November 2017

तो

#तो

तो जन्माला येतो तेव्हाच त्याच्याकडे घराण्याचा वारस म्हणून बघितलं जात. कधी तो घरातला लाडका बाळकृष्ण असतो कधी खोड्या करुन ताईचा मार खाणारा खट्याळ भाऊ, तर कधी  धाकट्या बहि‍णीला मार पडू नये म्हणून खोटं बोलणारा  दादा  असतो.
     तो एखादीचा मित्र असतो. चेष्टा करुन सतावणारा पण त्याचवेळी तिची काळजी घेणारा.
तो प्रेयसीचा प्रियकर असतो. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. तिच्या स्वप्नांसाठी आपली स्वप्न विसरणारा.
तो एक पती असतो. आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करणारा. आपली सगळी स्वप्न तिच्या डोळ्यात बघणारा.!
तो बरेचदा बायको आणि आईच्या कात्रीत सापडतो. आईसाठी तो 'बायकोचा बैल' असतो तर बायकोसाठी 'श्रावणबाळ'. तरीही दोघींवरही तो मनापासून प्रेम करत असतो.
तो एक पिता असतो आपल्या मुलांच्या सुखासाठी राबराब राबणारा . खूप इच्छा असूनही त्यांच बालपण पहायच राहूल गेलेला.
तो एक पिता असतो कधीही न रडणारा. पण मुलीच्या पाठवणीच्या वेळी मात्र हळूच डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसणारा.
तो एक सासरा असतो. सुनेची लेकीप्रमाणे काळजी घेणारा आणि लेकीच्या सुखासाठी जावयालाही खूष ठेवायचा प्रयत्न करणारा.
तो भाचवंडांचा लाडका मामा असतो.  तो काका असतो, आजोबा असतो. तो घरातला #कर्ता असतो.
उच्चशिक्षित स्त्री पतीसाठी/ मुलांसाठी  हाऊसवाईफ बनली तर ती ग्रेट ठरते. पण हेच पुरुषाने केलं तर टिकेचा धनी होतो.
असतीलही काही पुरुष वाईट पण सगळेच काही वाईट नसतात. द्रोपदीच वस्त्रहरण करणारा दुर्योधन हा  पुरुष असला तरी तिच्या शिलाच रक्षण करणारा कृष्ण हादेखील पुरुषच होता. परस्त्रीला मातेसमान मानणारे शिवाजी महाराजही एक पुरुषच होते. बलात्कार करणारा पुरुष असला तरी त्या बलात्काऱ करणाऱ्याला पकडून देणारा इंस्पेक्टरही बहुतांश वेळा पुरुषच असतो.
स्त्रीला अबला बनवणारा पुरुष असेलही कदाचित पण तिला सबला बनविण्यासाठी झटणारे अनेक पुरुष होवून गेले. स्त्री शिक्षणाची कास धरणारे न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले; सतीची चळवळ, बालविवाह हे  बंद करायला लावणारे राजा राममोहन रॉय हे सारे पुरुषच होते.
चांगल किंवा वाईट ही एक प्रवृत्ती असते. ती स्त्री किंवा पुरुष दोघांमध्येही असते.
आज #International_Men's_Day असूनही त्याबद्दल फेसबूकवर अगदी अत्यल्प पोस्ट्स दिसल्या.काही पोस्ट्स तर खिल्ली उडवणाऱ्याच आहेत. याउलट Women's Day च्या दिवशी मात्र 'स्त्रीचा सन्मान करा, ती कशी ग्रेट आहे' अशाप्रकारच्या पोस्ट्सचा पाऊस पडलेला असतो. आज ना वर्तमानपत्रात पानभरुन जाहीरात, ना ऑनलाईन शॉपिंग साठी ऑफर्स. हे सारं कुठेतरी खटकतय. आपल्या आयुष्यातील वडील, भाऊ, नवरा, दिर, सासरा.....  या अशा अनेक रुपातील पुरुषांना योग्य तो मान द्या. त्यांचा  सन्मान करा. कारण हे देखील तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे घटक आहेत.
Happy Men's Day …..

©मानसी जोशी



Tuesday, 14 November 2017

भाजीमंडईबाहेरचा किस्सा

आत्ता घडलेला ताजा किस्सा
    संध्याकाळी भाजी मंडईबाहेर दोन अल्ट्रा मॉडर्न मॉम्सचा संवाद ऐकण्याचा दुर्मिळ योग आला .
-Hi ! after long time. परवा ओपन हाऊसला(पेरेंट्स मिटिंग) पण नव्हतीस तू.
-हो अग या वीकेंडला आउटिंग जायचं आधीच ठरलं होतं आमचं.
-अंशू कुठाय ?
-तो काय तिकडे गाडीवर बसलाय; त्याचा फेव्हरेट गेम खेळत. आज Children Day आहे ना, मग मला म्हणाला आज गिफ्ट म्हणून मला XXXX गेम डाउनलोड करुन दे.
-How Sweet!
-काय झालं ग मिटिंगला
-काही नाही नेहमीचच  मुलांची रिडिंग हॅबिट डेव्हलप करा. त्यांच्या हातात मोबाईल नको तर स्टोरी बुक्स  द्या. आता ही मुलं होमवर्क करताना मारामार स्टोरी बुक्स कुठून वाचणार?
-हो ना यार सिरिअसली. मागे मी विचारलं  kindle वर काही बुक्स आहेत का? तर म्हणाल्या  E-book नको.  आता Gadgets वापरली तर चांगलच आहे ना. पण जुनाट विचारातून बाहेरच येत नाहीत.
-नुसतच दाखवायच ग आमची शाळा किती मॉडर्न आहे . प्रत्यक्षात सगळ्या जुन्या मेथडच वापरतात
      हा सगळा संवाद चालू असताना ६/७ वर्षांचा मुलगा मात्र गेममध्ये तल्लीन झाला होता. आजूबाजूच्या जगाचं त्याला अजिबात भान नव्हतं. संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात कशी काय रमतात तेच कळत नाही. आमच्या सोसायटीमधली  मुलं  संध्याकाळी  पार्किंगमध्ये खेळत तरी असतात किंवा भांडत तरी असतात. पण खेळ म्हटला की भांडणं आलीच. त्यामुळे आम्ही कोणीच त्याकडे लक्ष देत नाही. असो. बाकी या अल्ट्रा मॉडर्न मॉम्सनी कितीही अक्कलेचे तारे तोडलेले असले तरीही E-books नको सांगणाऱ्या आणि मुलांना वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करणाऱ्या त्या टिचरचं मात्र मला मनापासून कौतुक वाटलं.

©मानसी जोशी


Tuesday, 31 October 2017

रायगड - एक अविस्मरणीय अनुभव

एखादी गोष्ट खूप प्लॅन करुनही व्यवस्थित घडून येत नाही. तर कधीकधी एखाद्या वेळेस अचानकपणे काही ठरतं आणि सगळं अगदी अनपेक्षितपणे छान होतं. अगदी असच झालं रायगड ट्रेक च्या बाबतीत. खरतर हा प्लॅन आधीच  ठरला होता. पण ऐनवेळेस पावसाने (नेहमीप्रमाणे) घोळ घातला आणि प्लॅन कॅन्सल करावा लागला.
     ही कल्पना मानसची. रायगड ट्रेक आणि तो ही नाईट ट्रेक करायचा. मी आयुष्यात आजवर कधीही नाईट ट्रेक केलेला नसल्यामुळे मी पण चटकन होकार दिला पण मुसळधार  पावसामुळे अगदी ऐनवेळी सगळ्यावर पाणी पडलं. पुन्हा 28 / 29 तारीख फिक्स झाली. पण त्या दिवशीसाठीचा माझा  दुसरा प्लॅन आधीच ठरल्याने मला जमणं जवळपास अशक्यच वाटत होतं. त्यात सर्दी आणि डोकेदुखीने मी बेजार झाले होते. अखेरीस हो नाही करता करता माझं जायचं ठरलं पण तोपर्यंत दहा जणं आधीच फिक्स झाली होती. दोन गाड्या आणि 11 मेंबर्स.... पुन्हा काय करायचं हा प्रश्न. बाकीच्यांचं आधीच ठरलेलं म्हणजे मी कॅन्सलच. पण मानस म्हणाला, 'होइल मॅनेज ये तू' आणि एकदाचं जाणं फिक्स झालं.
      दुपारी जवळपास तीन वाजता आम्ही पुण्यातून निघालो आणि रायगडाच्या पायथ्याशी साधारणतः आठ  वाजता पोचलो. सगळ्या सामानाची आवराआवरी करुन साधारणपणे सव्वाआठच्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. सुरवातीला जाणवलं हे जरा कठीणच दिसतय. मिट्ट काळोख, निर्मनुष्य रस्ता, उंच पायऱ्या हे सगळं बघून आपण कितपत चढू शकू अशी शंका मनात आली. मानस अनेक सुचना देत होता. सगळेजण शहाण्या बाळासारखं(?)  सगळ्या सुचनांचं पालन करत होते. सुरुवातीला खूपच अवघड अगदी जमेल की नाही असं वाटणारा ट्रेक हळूहळू 'आता जमेल आपल्याला' या वळणापर्यंत आला. मनात सारखं येत होतं,  "त्या काळी मावळे ढाल तलवार घेऊन इथून कसे काय धावत असतील?"  पायऱ्या नसताना सगळ्यांचा चालायचा स्पीड वाढायचा पुन्हा पायऱ्या दिसल्या की कपाळावर आठी यायची.  एकमेकांना सांभाळून घेत, गप्पा गोष्टी/ चेष्टा मस्करी करत जवळपास अर्धाअधिक गड सर झाला आणि मग थोडावेळ सगळेजण विश्रांतीसाठी थांबलो स्वप्नील भदे फोटो काढण्यात व्यस्त झाला. बाकीच्यांनी एनर्जी ड्रिंक, लिमलेटच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या इत्यादीची देवाणघेवाण सुरु केली. विश्रांतीनंतर  पुन्हा गड चढायला सुरुवात केल्यावर मात्र "आता कधी संपतील या पायऱ्या" असं वाटू लागलं होतं. अखेर दहा वाजता गडावर सुखरूपपणे पोचलो. अवघ्या दीड/पावणेदोन तासात गड सर झाला होता. आपण गडावर पोचलो हे कळताक्षणी प्रचंड आनंद झाला. पण अजूनही चालणं संपल नव्हतं. आमची राहायची व्यवस्था जिथे होती तिथपर्यंत पोचायला गडाच्या  थोडं खाली उतरुन चालायला लागणार होतं. पण उतरताना तसाही त्रास कमी असतो त्यात 'पायऱ्या' नाहीत म्हटल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
      एका झोपडीवजा घरात जिथे लाईट्स नाहीत फक्त कंदिलाचा प्रकाश अशा ठिकाणी रहायचं म्हटल्यावर थोडसं टेंशन आलं होतं पण गप्पागोष्टी इतक्या रंगल्या की नंतर त्याचही काही वाटेनासं झालं. गरमागरम भाकरी, मसुराची उसळ, आमटी -भात, लोणचं, पापड असा जेवणाचा बेत. अंगणात चटईवर बसून, कंदिलाच्या उजेडात साधं पण अतिशय चविष्ट असं जेवण जेवताना आलेल्या मजेची सर  कॅन्डललाईट डिनरलाही नाही.
      जेवणानंतर अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. रात्री दोन वाजेपर्यंत सगळेच जागे होते. त्यानंतर चार वाजताच कोंबड्यांनी बांग द्यायला सुरुवात केली आणि  पाच वाजता मुकुलच्या मोबाईल अलार्मने. तरीही कोणीही चिडचिड न करता हे सारं हसतखेळत एंजॉय केलं.
    सकाळी लवकर आवरुन आधी जगदीश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवाजी महाराजांची समाधी, टकमक टोक, राजवाडा ई. सगळं बघून आणि स्वप्नील भदेकडून भरपूर फोटो काढून घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाताना ओसंडून वाहणारा उत्साह जाऊन आता  थकवा जाणवायला लागला होता.  मानस आणि उन्मेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुणे टू रायगड ड्रायव्हिंग, त्यानंतर ट्रेक, जागरण  आणि पुन्हा परतीच्या प्रवासातही ड्रायव्हिंग. दोघेही दोन्ही वेळेला अतिशय शांतपणे व्यवस्थित ड्राईव्ह करत होते. उन्मेशचा पाय मुरगळलेला असूनही त्याने हे सगळं सहज जमवलं. सौरभ आणि स्वप्नील भदेने हिशोबाचं डिपार्टमेंट भ्रष्टाचार न(?) करता सांभाळलं. ट्रेकच्या निमित्ताने अनेक नवीन ओळखी झाल्या रुचिता, अदिती, मुकूल यांना भेटून छान वाटलं. स्नेहल आणि नेहा या गोडबोले भगिनींशी तर अगदी जवळचीच ओळख निघाली.  Archaeology शिकत असणाऱ्या श्रेयाकडून काही विषयांवर नवीन माहिती कळली. अशा अनेक नवीन ओळखी आणि ट्रेकचा अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही सगळे अखेरीस चार वाजता पुण्यात परतलो. मुकुलच्या घरी (तिने केलेला) आग्रहाचा चहा घेऊन सव्वापाचला घरी पोचले आणि एका अविस्मरणीय ट्रेकची सांगता झाली.
©मानसी जोशी

Monday, 23 October 2017

दिल चाहता हैं

[DCH
Friendship Lovestory]

रोमॅन्टिक मूव्ही म्हटलं की मला दिल चाहता हैं  हटकून आठवतो. माझ्या या वाक्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या असतील. नाही मला माहिती आहे ही मूव्ही म्हणजे तीन मित्रांच्या मैत्रीची कहाणी आहे. पण तरीही त्यातल्या प्रत्येक मित्राची प्रेमकहाणी वेगळी आहे आणि त्यामुळेच चित्रपट अधिक रंगतदार झाला आहे.
       आकाश (अमीर खान), समीर (सैफ अली खान) आणि सिद म्हणजेच सिद्धार्थ ( अक्षय खन्ना)  या तीन जिवलग मित्रांनी केलेली धमाल, त्यांची मैत्री, त्यांच्या प्रेमकहाण्या म्हणजे दिल चाहता हैं.  फरहान अख्तर यांचा पहिलाच प्रयत्न (कथा आणि दिग्दर्शन) असूनही चित्रपट पहाताना त्यांचा नवखेपणा कुठेही जाणवत नाही. आकाश, सिद आणि समीरची मैत्री, त्यांनी कॉलेजला केलेली धमाल, त्यांची गोवा ट्रिप हे सगळे प्रसंग भरपूर हसवतात त्याचबरोबर  सिद आणि आकाशमद्ध्ये झालेले मतभेद, त्यांच्यात आलेला दुरावा, ग्रॅज्युएशननंतर वेगळ्या झालेल्या वाटा अशा  हृदयस्पर्शीही प्रसंगांची मांडणीही अतिशय सुंदर.
    आकाशचा प्रेमावर अजिबात विश्वास नसतो. "जाने क्यों लोग प्यार करते हैं" म्हणणारा आकाश  आधीच कमिटेड असणाऱ्या आणि कॉलेजच्या पार्टीत जिच्या बॉयफ्रेंड करुन मार खावा लागलेला असतो अशा शालिनीच्या (प्रिती झिंटा)  प्रेमात कधी पडतो ते त्याचं त्यालाच कळत नाही.
    समीरची प्रेमाची व्याख्या क्लिअर नसते त्यामुळे एखाद्या मुलीने सॉफ्ट कॉर्नर दाखवला की लगेच तिच्या प्रेमात पडणारा समीर गोव्यामध्ये एका फॉरेनर मुलीकडून फसतो. त्यानंतर टिपिकल 'कांदेपोह्याचा' प्रोग्रॅम होतो. या प्रोग्रॅमसाठी आलेली मुलगी पूजा ( सोनाली कुलकर्णी) त्याला मनापासून आवडते. पण ती आधीच एंगेज्ड असते. मग तिला मिळविण्यासाठी त्याने केलेली धडपड,  पूजाचा बॉयफ्रेंड सुबोध; त्याचं प्रत्येक गोष्टीचं तारीखवार लक्षात ठेवणं हे सारे प्रसंग मस्त जमून आले आहेत.
    सिद्धार्थचं व्यक्तिमत्त्व एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतं. अतिशय शांत, विचारी सिद घटस्पोटित, प्रौढ आणि एका टिनएजर मुलीची आई असणाऱ्या तारा जैसवालच्या (डिंपल कपाडिया) प्रेमात पडतो. platonic love ही  कन्सेप्ट त्यावेळेस मला माहिती नव्हती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती कळली. त्यावेळी हे पचवणं थोडं जड होतं. पण अक्षयच्या सहज सुंदर अभिनयाने हे अलगद गळी उतरवलं.
     तारा जैसवाल वरील  सिदचं प्रेम  आकाशला  पटत नाही त्यामुळे आकाश आणि सिदमध्ये टोकाचे मतभेद होऊन दोघे दुरावतात. त्यानंतर आकाश सिडनीला निघून जातो. जाताना त्याला प्लेनमद्ध्ये शालिनी भेटते. पुढे सिडनीत दोघांच्या वारंवार भेटीगाठी होतात. आकाशच्या मनात नकळत निर्माण झालेलं प्रेम तो शेवटी शालिनीच्या लग्नाच्या वेळी व्यक्त करतो. हा प्रसंग थोडा टिपिकल बॉलिवूड स्टाईल झाला असला तरी चित्रपट पहाताना फारसा खटकत नाही.
      शेवटी आकाश आणि सिदमध्ये दिलजमाई होते. आकाश फोन करुन  सिदला  सॉरी म्हणतो. तिघेही मित्र पुन्हा एकत्र येतात. आणि सहा महिन्यानंतर पुन्हा गोव्याला जातात. तिथेच सिदला त्याच्या आयुष्याची नवी जोडीदार मिळते.
    चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांनी  संगीता दिले आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय तर आहेतच पण काही गाणी तर प्रेक्षणीयही झाली आहेत. 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' या गाण्यात अमीर प्रितीसमोर  गुलाबाचं फुल धरतो ती ते घ्यायला जाते तेव्हा तिच्या हातात फक्त देठ येतो, त्यावेळचा तिचा लटका राग आणि क्षणात गोड हसून अमीरच्या हातातील गुलाबाचं फुल ओढून घेणं; या प्रसंगातील प्रितीच्या चेहऱ्यावरील खट्याळ हावभाव अगदी कायम लक्षात राहण्यासारखे. 'जिसे धुंडता हूँ मैं' हे सैफ सोनालीचं गाणही सुंदर. 'कैसी हैं ये ऋत' हे गाणं तर एखाद्या निवांत संध्याकाळी ऐकत रहावं असं. सिडनीमधील 'ओपेरा' आणि अमीरवर चित्रीत झालेलं 'तनहाई' हे गाणं पाहताना डोळे पाणावतात. समीरचं अनेकींवरील प्रेम(?) जेवढं हसवतं तेवढच सिदचं एकतर्फी निरपेक्ष प्रेम खरं प्रेम म्हणजे काय असतं हे शिकवतं.  आकाश, समीर आणि सिदची मैत्री तर मैत्रीचं आदर्श उदाहरणच. या चित्रपटाला 2001 सालातील "सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
©मानसी जोशी



Thursday, 5 October 2017

आठवणी

आठवणी ! किती अद्भूत शब्द आहे ना हा!
नुसता ऐकला किंवा वाचला तरी मनातल्या मनात कोणाचीना कोणाची आठवण येते.
या आठवणी कधी मन हळवं करतात तर कधी रडता रडता हसायला लावतात.
कधी प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे डोळ्यातून टपटप ओघळतात
तर कधी रातराणीच्या गंधापरी मनात हळूवार दरवळतात.
एखाद्या दिवशी पहाटेची भूपाळी किंवा मंदिरातला घंटानाद ऐकून मन बालपणात जातं.
तर कधी एखाद्या सकाळी चहाचा दरवळणारा गंधही मनात माहेरची आठवण घेऊन येतो.
आई बाबांबरोबर गप्पा मारत प्यायलेला चहा, भावंडाबरोबरची भांडणं, सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं.
एखाद्या हळव्या रात्री झोपताना  गोधडी अंगावर पांघरली की आजीच्या आठवणीने मन भरुन येतं.
एखादं छोटं बाळ बघितलं की आपल्याच पिल्लाचं बालपण आठवतं.
लेकीचा अभ्यास घेताना शाळेतल्या आठवणी जाग्या होतात.
मग मनात येतं इतकी वर्ष झाली तरी काहीच बदलेलं नाही.
संध्याकाळच्या आठवणींबद्दल काय लिहू? ही संध्याकाळ तर अक्षरशः वेड लावते.
एखाद्या संध्याकाळी मित्र मैत्रीणींबरोबर घालवलेला वेळ आठवतो.
ती चेष्टा मस्करी, गॉसिप सगळं आठवून मनात हसू उमटतं.
 मग नकळत फोन हातात घेऊन त्यावेळच्या ग्रूपमधल्या कोणालातरी फोन करावासा वाटतो पण, 'बिझी असेल तर ?' हा विचार मनात येतो आणि मग विचार बदलतो.
 तर कधी एखाद्या निवांत संध्याकाळी हमखास 'तिची किंवा 'त्याची' आठवण येते आणि मन हेलावून जातं.
मनाला एक वेगळीच हुरहूर लागते. या आठवणींमधून बाहेर पडायला मनही सहजासहजी तयार होत नाही.
वेळ मात्र कापरासारखी निघून जात असते आणि नाखूषीने का होईना मनाला आठवणींच्या राज्यातून बाहेर यावच लागतं.
आठवणीत जागणाऱ्या रात्री मात्र बरेचदा डोळे शुष्क करतात.
मुक्याने अश्रू ओघळत रहातात आणि रात्रभर जागून पुन्हा पहाटही भिजवून टाकतात.
©मानसी जोशी

Tuesday, 3 October 2017

सनसेट पॉईंट

हिमाचल प्रदेशातल्या एका नदीवरच्या उंच पुलावर उभं राहून 'ती' त्याची वाट बघते असते. अंगावर शाल, मेंदीने भरलेले दोन्ही हात, डोळ्यात प्रचंड विश्वास आणि ओढ. सूर्य हळूहळू डोंगराआड जात असतो. एक क्षण तिच्या मनात विचार येतो,'आता झोकून द्यावं या पुलावरुन स्वतःला!' पण अचानक तिची नजर समोरच्या डोंगरावर जाते आणि ती तशीच शांत उभी रहाते.

तिला तिची आणि त्याची पहिली भेट आठवते.

  तिने त्याच्याकडे मागीतलेली लिफ्ट, पंक्चर झालेला गाडीचा टायर, गाडी स्टार्ट करताना तिच्या तोंडावर उडालेला चिखल आणि मग त्यानंतरचा दोघांनी एकत्र घालवलेला वेळ. याचवेळी त्यांना जाणवलेलं एकमेकांबद्दलच प्रेम आणि नंतरची निरोपाच्या वेळची तगमग. असे एकएक प्रसंग तिला आठवत असतात.

   तिचं लग्न ठरलेलं असतं. तिच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू असतो. तिचे डोळे त्याच्या आठवणींनी भरुन आलेले असतात.

  त्यानंतर कपातून त्याने पाठवलेली अंगठी. हिने बहिणीच्या हातावर मेहेंदीने लिहून दिलेला "sunset point" असा निरोप आणि मग घरातून तिचं पळून येणं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं.

सुर्यास्ताची वेळ अगदीच जवळ येउन ठेपते. त्याच्या येण्याची कुठलीच शक्यता तिला दिसत नाही. आता अंगावरची शाल बाजूला काढून ती पाण्यात उडी मारणार इतक्यात तिला त्याच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. तिचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर हसू येतं आणि मग गुलजार सरांच्या आवाजातली एक अप्रतिम ओळ ऐकू येते-

#वो_देर_से_पहूँचा_था_लेकीन_वक्तपे_पहूँचा...

 #Sunset_point या अल्बममधील कच्चे रंग या गाण्यामध्ये एक रोमॅन्टिक स्टोरी दाखविण्यात आली आहे. अतिशय सुंदर ग्रीनरी, चांगले कलाकार, गुलजार यांचे शब्द, भूपिंदरसिंग आणि चित्राचा आवाज; या सगळ्यामूळे हे गाणं नुसतच श्रवणीय नाही तर प्रेक्षणीयही झालं आहे.   

    मला  #sunset_point लक्षात राहिला तो खास करुन या शेवटच्या ओळींमुळे! "देरसे पहुचा था मगर वक्त पे ...." दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात वापरून किती सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आहे. यासाठी गुलजार सरांना हजारो Hats offfff!!!!!!

     आम्ही कॉलेजला असताना हा अल्बम खूप फेमस झाला होता. त्यावेळी गाण्याचे अनेक चांगले अल्बम्स आलेले होते. त्यावेळचे अल्बम्स ऐकले की nostalgic व्हायला होतं.

    आजकालची गाणी ऐकवत नाहीत. कानठळ्या बसवणारं म्युझिक आणि अर्थहीन शब्द; असली गाणी ऐकून कानावर हात ठेवावासा वाटतो. (अर्थात प्रत्येक पिढीला हे असच वाटत असतं.)  काही गाणी अपवाद असतात पण त्यांच प्रमाण फारच थोडं. आजकालचे अल्बम्स येतात कधी आणि जातात कधी तेच कळत नाही. कधीतरी मिरवणूकीत, दांडियामध्ये ही गाणी ऐकायला येतात. पण तेवढ्यापुरतीच. ती काही संस्मरणीय वगैरे होत नाहीत.

©मानसी जोशी






Tuesday, 26 September 2017

धोनी आणि पसारे

मुलांचे पसारे ही  समस्त आयांची एक मोठी समस्या आहे. कितीही वेळा सांगितल तरी पसारे करतातच. साम, दाम, दंड, भेद कशाचाच उपयोग होत नाही. माझ्या लेकीने एके दिवशी मात्र शहाण्या मुलीसारखं वागून पसारा आवरुन ठेवला. संध्याकाळी मला म्हणाली, "आई बघ मी सगळी वह्यापुस्तकं आवरुन ठेवली." मी कामात होते कामं करता करता very good म्हणून पुन्हा कामात गर्क झाले. तर वैतागून म्हणाली तुला माझं कौतुकच नाही. मला वाटलं होतं तू माझं कौतुक करशील ......."
      "अगं म्हटलं ना very good." आणि एवढं विशेष काय केलस तू ? आपलं सामान आपण आवरुन ठेवायचच असतं. त्यात कौतुक कसलं करायचं ? कामच आहे तुझं ते. आवरुन ठेवत नाहीस हे विशेष असतं." मी वैतागून म्हणाले.
        या प्रसंगाला खूप महिने होऊन गेले. मी तर विसरुनही गेले होते सगळं. एक दिवस आम्ही घरी क्रिकेट मॅच बघत होतो. कुठली सिरिज ते आठवत नाही पण तेव्हा धोनी कॅप्टन होता. धडाधड विकेट पडत होत्या. मॅच जवळपास हातातून गेल्यातच जमा होती. अशातच धोनी खेळायला आला. सुसाट फलंदाजी करत त्याने मॅचमध्ये पुन्हा जीव आणला आणि आपण ती मॅच जिंकलो. मी सहज म्हटलं, "धोनी खरच खूप ग्रेट आहे ना. कसला खेळला आज. अगदी कॅप्टनशीपला साजेशी खेळी खेळला."
     माझं बोलणं ऐकून बाजूलाच बसलेली माझी लेक म्हणाली, "आई त्यात विशेष काय आहे ? तो कॅप्टन आहे. त्याने आज खेळायलाच हवं होतं. त्याचं कामच आहे ते. तो खेळला नसता तर विशेष होतं. तूच  म्हणतेस ना आपलं काम आपण करायचच असतं. त्यात कौतुक करण्यासारखं काहीच नसतं. "
          हे ऐकून आम्ही सगळीजणं खूप हसलो. 'मेरी बिल्ली मुझेही म्याव' असं म्हणत लेकीला जवळ घेतलं आणि त्या दिवशी मात्र मी मनापासून लेकीचं कौतुक केलं.

©मानसी जोशी

Sunday, 17 September 2017

आठवणींचे पान उलगडताना

काल ATM बाहेर रांगेत उभी होते. बाजूला कॉलेजला एक ग्रूप गप्पा मारत उभा होता. त्यातला एक मुलगा आपल्या मोबाईलमधले फोटो बाकीच्यांना दाखवत होता. सहज त्यांच्यातला संवाद कानावर पडला.
"हा बघ "तिचा" लेटेस्ट DP. कसली सुंदर दिसते ना. पिंक कलर सूट करतो तिला"
 "अरे तू तर तिच्या फोटोंचा फोल्डरच केलायस. घरी कोणी बघितलं तर फुकट मरशील" ग्रूपमधला एकजण त्याला म्हणाला.
   "अरे काय येडा आहे का मी गॅलरीला पासवर्ड ठेवलाय. एकदा कॅम्पस मधून सिलेक्शन होवूदे मग प्रपोज करणार तिला." तो मुलगा हसत म्हणाला.
      त्या ग्रूपमधला हा संवाद ऐकून मला हसायला आलं आणि कॉलेजमधला एक किस्सा आठवला.
     तेव्हा कॉलेजचे डेज चालू होते. त्या दिवशी 'सारी डे' होता. त्यामुळे मी कॉलेजला कॅमेरा नेला होता. आमच्या वर्गातला एक मुलगा माझ्याजवळ येउन मला म्हणाला, "ए   'ती' मैत्रीण आहे ना तुझी. मला प्लीज तिचा एक फोटो काढून दे ना.
     यावर मी म्हणाले, "अरे मैत्रीण वगैरे नाही पण ओळखतो आम्ही एकमेकींना.पण असा फोटो काढायचा म्हणजे...
    "Please फक्त एवढं एक काम कर ना. Don't worry मी misuse नाही करणार. मी खरच खूप सिरिअस आहे तिच्या बाबतीत." माझा मित्र म्हणाला.
   "अरे एवढं आहे तर मग विचारत का नाहीस तिला? मी
   "अगं कुठल्या बेसवर विचारणार? मी स्वतः एक पैसा पण कमवत नाही. आणि पुढचं पुढे बघू."
    नंतर मी त्याला तिचा फोटो काढून दिला. तेव्हा कॅमेरा रोल डेव्हलप करायला लागत असत. तिच्या फोटोसाठी रोल डेव्हलप करुन आणायचं माझं कामही त्याने केलं.
   मनात आलं आज सोशल मिडीआमूळे सगळं किती सहज सोपं झालय. एक फोन नंबर असला किवा फेसबूक , इन्स्टाग्रामवर जॉइन असलं की झालं. असं फोटो मिळविण्यासाठी कोणाला विनवण्या करायला लागत नाहीत. पण असं असल तरी त्यावेळची मजा काही वेगळीच होती.
©मानसी जोशी

Thursday, 14 September 2017

डोरेमॉन

डोरेमॉन! अनेकांचे आवडते कार्टून. माझ्या लेकीलाही डोरेमॉन प्रचंड आवडतं. मध्यंतरी आमच्याकडे Disney चॅनल लागायचं अचानक बंद झालं होतं. मी मनातून देवाचे आभार मानले होते. पण लेकीच्या हट्टामुळे  दिवाळीच्या सुट्टीत कस्टमर केअरला कॉल करुन ते पुन्हा चालू केले. लेक खूश झाली. सगळं व्यवस्थित सुरु होतं पण प्रॉब्लेम तेव्हा निर्माण झाला जेव्हा लेकीच्या वहीवर 'Homework not done' आणि 'Notebook incomplete' हे दोन्ही रिमार्क्स एकाच दिवशी आले.  यासाठी डोरेमॉनच जबाबदार असल्याची मला खात्री होती म्हणूनच मी रागारागात Disney चॅनेल बंद करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला . या कस्टमर  केअर वाल्यांचा काय प्रॉब्लेम असतो कळत नाही; तुम्ही भाषा कुठलीही सिलेक्ट करा ते तुमच्याशी हिंदीमध्येच बोलायला सुरुवात करतात. मी माझ्या तोडक्या मोडक्या गावठी हिंदी भाषेत त्यांना Disney चॅनेल बंद करायची विनंती केली.
    "मॅम बहोतही अच्छा चॅनेल हैं आप क्यों बंद करना चाहती हो? इसपर बच्चोंके लिए कितने अच्छे अच्छे प्रोग्रॅम्स होते हैं प्रती महिना सिर्फ 18 रुपये कट होते हैं आपके अकाउंटमेसे........." कस्टमर केअरवाला मला समजवायचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
      "अच्छा हैं इसलिए तो बंद करना हैं| अभी एक्झॅम्स सरपर हैं , बच्चे सारा दिन टिव्ही देखते रहेंगे तो पढाई कब करेंगे ? और आप मुझे समझानेकी कोशिश ना ही करो तो  बेहतर हैं| मै आपको बोल रही हूँ चॅनेल बंद करना हैं तो बंद करना हैं | ( रागारागात फाडफाड इंग्लिश बोलतात तसं मी फाडफाड हिंदी बोलले.)
     कस्टमर केअरवल्या त्या मुलाने माझ्या बोलण्यावरून योग्य  तो अंदाज बांधून चॅनेल बंद करण्याची रिक्वेस्ट फॉरवर्ड केली आणि दहा मिनिटात चॅनेल बंद होइल अस सांगितलं. अर्थात या प्रकारानंतर लेक मनातून माझ्यावर प्रचंड चिडली होती.
     हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, D2h वाल्यांनी Disney चॅनेल पुन्हा बेसिक पॅकमध्ये इनक्लूड केल्याचा साक्षात्कार परवाच माझ्या लेकीला झाला.त्यामुळे  मी फोन करुन चॅनेल बंद करु शकत नसल्याचा आसुरी आनंद सद्ध्या लेकीच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहतोय.
©मानसी जोशी

Wednesday, 6 September 2017

एक जगावेगळी प्रेमकहाणी

एक जगावेगळी प्रेमकहाणी

ती आज खूपच छान दिसत होती. तशी ती नेहमीच छान दिसते पण आज तो तिला पहिल्यांदा साडीमध्ये बघत होता.  लंच ब्रेक संपता संपता तिला एकटीला बघून तो तिच्या समोर आला आणि तिला म्हणाला, "आज खूप छान दिसतेयस.
 ती हसून "थॅंक्स" म्हणाली.
तो म्हणाला, "तू आवडतेस मला खूप, I really love you very much"
त्याच्या या वाक्यावर ती म्हणाली, "अरे काहीतरीच काय बोलतोयस ? इतकं पण फ्लर्ट करु नकोस माझ्याशी.
"फ्लर्ट  करत नाहीये मी, अगदी मनापासून सांगतोय. तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच आवडली होतीस तू. तुझ्या  मोहक हसण्याची भूरळ पडली होती मला. नंतर तुझ्याशी ओळख झाली, आपली मैत्री झाली आणि तू मला समजत गेलीस. तू जितकी जास्त समजत गेलीस तितकीच मला आवडत गेलीस. तू सुंदर तर आहेसच पण तेवढीच हुशार आणि समजूतदारही आहेस.जेवढी विचारी तेवढीच निरागस आहेस. थोडी इमोशनल आहेस पण तेवढीच खट्याळपण आहेस. कुठे थांबायचं हे तुला बरोबर कळतं.  Beauty with brain च एक परिपूर्ण उदाहरण आहेस तू." तो हे सगळं अगदी सहज सांगत होता तिला.
        ती मात्र गप्प होती. हे सगळं तिच्यासाठी अनपेक्षित होतं. तरीही स्वतःला सावरत ती म्हणाली, तू काय बोलतोयस हे ? मी मॅरीड आहे आणि एका आठ वर्षाच्या मुलीची आईसुद्धा आहे.
   "मग काय झालं ? मॅरीड आहेस म्हणजे कोणाला आवडू नयेस असा नियम आहे का? प्रेम फक्त लग्न या एकमेव उद्देशानेच करतात का ग ? एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिच्यावर प्रेम करणं  आणि लग्नासाठी प्रेम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ग. तुझं सौंदर्य, तुझं व्यक्तिमत्त्व  यावर अगदी निरपेक्ष प्रेम करतो मी.
"अरे पण ....", ती
"हा 'पण' खटकतो ग मला खूप. मला आवडलं असतं रे लेट नाईट मूव्हीला यायला पण..... मुलगी झोपणार नाही माझ्याशिवाय. पावसात भिजायला खूप आवडतं पण.... लोकं  काय म्हणतील? पबमध्ये आले असते मी पण ... नातेवाईक काय म्हणतील ? मला खूप आवडतात वेस्टर्न ड्रेस घालायला पण...... सासू सासऱ्याना आवडले नाहीत तर ? मला डान्सच्या क्लासला जायचं होतं मनापासून पण.... बाबांना नसतं आवडलं. असे कितीतरी 'पण' तू मनात पक्के बांधून ठेवले आहेस. अगं किती दिवस असं मन मारुन जगणार आहेस? निदान कधीतरी स्वतःसाठी जगून बघ. अगदी थोडीशी का होईना मनमानी  करायला शिक. नेहमी नको करुस पण निदान एखाद्या वेळी तरी स्वतःचा विचार कर. स्वतःवर थोडसं प्रेम कर. तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. तू जर ठरवलस ना तर नाही अडवणार तो तुला. करेल ॲडजस्ट तुझ्यासाठी. फक्त तू या कोषातून बाहेर ये. हा 'पण ...' बाजूला ठेव. बस बाकी मला काही नको. तुझ्यावर दुरुनच प्रेम करतो मी आणि तसच प्रेम करायला आवडतं मला." एवढं सगळं एका दमात बोलून 'तो' जायला निघाला.
 "एक मिनिट थांब",  ती
'तो' गोड हसून म्हणाला, "बोल ! एक  मिनिट कशाला? तू म्हणशील तितका वेळ थांबतो मी. फक्त  तू मोकळेपणाने बोल."
  "मला  पण आवडतोस तू. तुझ्या गालावर पडणारी खळी आवडते. तुझ्याशी बोलायला आवडतं.  तुझं फ्लर्ट करणं आवडतं. तू नेहमी माझी तारीफ करतोस ते  आवडतं आणि माझी चेष्टा करतोस ते सुद्धा आवडतं. तुझं बिनधास्तपणे मनातल्या गोष्टी सांगणं आवडतं आणि सगळ्यांसमोर मला सांभाळून घेणं पण आवडतं मला. पण......"ती.
   आता हा 'पण'.... नको ना प्लीज. एवढं छान मनमोकळं बोलल्यावर आता कुठलाही 'पण.....' नको. जे तुला सांगायच आहे ते मला माहिती आहे. फक्त ते आत्ता ऐकायचं नाही मला. मूळात त्याची गरजच नाही. मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे तुझ्या नवऱ्यावर. अगं माझ्याबद्दल तुला जे वाटतं ते  बोलून तू त्याच्याशी प्रतारणा नाही ग  केलीस. आपण ज्याच्याशी कमिटेड असतो तो आपल्याला आवडतोच पण म्हणून जो आवडतो त्या प्रत्येकाशी आपण कमिटेड तर नाही होत ना. काय कळतय का काही?" तो
       तिने हसून मान हलवली आणि त्याला म्हणाली, "आयुष्याच्या या वळणावर तुझ्यासारखं कोणी  भेटेल असं  मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तू मला जगण्याचा नवा दृष्टीकोन दिलास  आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवलस. तू खरच खूप छान आहेस. तुझ्यामुळेच मी मनमोकळं बोलायला शिकले आणि...
   "आणि खूप काही सांगायचं आहे तुला पण.. आता लंच ब्रेक संपत आलाय त्यामुळे आपल्याला इथून निघावं लागणार आहे." त्याच्या या वाक्यावर दोघही मनमोकळं हसली.
©मानसी जोशी
फोटो - गूगलवरून साभार



 

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...