Thursday, 13 September 2018

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक हा निव्वळ एक पदार्थ नाही. इतर पदार्थांप्रमाणे उकडीच्या मोदकांची रेसिपी वाचली किंवा you tube वर रेसिपी बघितली आणि केले असं इतक साधं सरळ गणित नाही. अगदी तांदूळ धुवून, वाळवून, त्याच पीठ करण्यापासून सुरु होणारी ही प्रक्रिया थेट मोदक नैवेद्याच्या ताटात ठेवल्यानंतरच पूर्ण होते.
   मला आठवतय, आमच्याकडे धुतल्या तांदूळाच पीठ तस वर्षभर कायमच असतं. पण तरीही गणपती जवळ आले की खास उकडीच्या मोदकांसाठी म्हणून तांदूळ धुवून वाळवले जायचे. यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे हे तांदूळ सावलीत वाळवावे लागतात. त्यावर उन्हाचा कवडसाही पडता कामा नाही.
   लग्न ठरलं त्यावर्षी आजी म्हणाली, “आज मोदकाची उकड करताना माझ्याजवळ थांब. तुला उकड करायला शिकवते. पुढच्या वर्षी सासूने सांगितल ‘उकड कर’ तर तुला आली पाहिजे".
  मोदकाची उकड करणं हे काम मला तसं कटकटीचच वाटलं होत तेव्हा. दरवर्षी साच्यात पीठ घालून मोदक  करायची सवय असणाऱ्या मला त्यावर्षी आजीने साच्याशिवाय मोदक करायला लावले. एकंदरीतच वैताग आला होता. माझे ओबडधोबड मोदक बघून मलाच ते खावेसे वाटत नव्हते, तर बाकीचे काय कप्पळ खाणार? सगळ्यांनी चेष्टा केली. मी सुद्धा, ‘ये अपने बस की बात नहीं’ असं म्हणून विषय सोडून दिला. तसही मोदकापेक्षा जास्त माझं निवग्र्यांवर प्रेम आहे. त्यामुळे साच्यातले चार/पाच मोदक करुन, निवेग्रीसाठी मदत करायला आणि ती करताना ते कच्च पीठ खायला मला प्रचंड आवडायच.
   लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी गणपतीत माहेरच्या  गणपतीची खूप आठवण येत होती. पूजा झाली आणि मी सासूबाईंबरोबर मोदक करायला बसले. त्यांनी काहीशा नाराजीनेच विचारले, ‘तुला येतात ना मोदक करायला?’    
“हो येतात. पण सुबक नाही.” मी  
"बरं. बघुया. नाहीतर नैवेद्याचे मोदक मी करते. तू निवेग्र्या कर नंतर."
मला तर संकट टळल्यासारखं वाटलं क्षणभर. पण तेवढ्यात सासरे म्हणाले, “करु दे की तिला. असे लगेचच कसे जमतील? मानसी तू कर मोदक. कसेही झाले तरी चालतील. कोणी नाही खाल्ले तरी मी खाईन"
   सासऱ्यांच बोलणं ऐकून बरं वाटल आणि अचानक कॉन्फिडन्स आला. मी मोदक वळायला घेतले. जसे जमतील तसे करत होते. मध्येच मोदक फूटत होते. त्यावर पॅचवर्क लावायचा आणि ताटलीत ठेवायच काम चालू होतं. सासूबाई तशा नाराजच होत्या.
   तेवढ्यात सासरे आत आले आणि म्हणाले, “जमतायत की तुला. फक्त एक काम कर, ‘जरा हलक्या हाताने पारी कर आणि मोदकाच्या पाकळ्या जवळजवळ कर. मग बघ मोदक सुबक दिसेल"
     मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. मोदक सुबक तर झालाच. शिवाय ‘पॅचवर्क’ पण करावा लागला नाही.
  मला इतका चांगला मोदक करता आला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. उकड मळतानाही आधी वाटीने मळून घ्यायची आयडीया त्यांनी दिली आणि ‘महाबोअर’ वाटणारं उकडीचं कामही सोपं झालं.
   यावरुन एक गोष्ट कळली, "नेमकं आपल काय चुकतय, हे जर का लक्षात आलं ना तर कुठलीही गोष्ट कठीण नसते.
   आज मी मोदकावर मोदकही (डबल डेकर मोदक ) अगदी सहज करते. पण निव्वळ माझ्या सासऱ्यांमुळे मला मोदक करता आले.
  आज माझे सासरे हयात नाहीत. पण जेव्हा जेव्हा मी मोदक करते तेव्हा प्रत्येकवेळी त्यांची आठवण  आवर्जून येते.

©मानसी जोशी

Thursday, 6 September 2018

LBGT

#LGBT
 काल  सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ मधील LGBT बद्दलची तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी यावर टिका केली. याविषयी कोणाची काय मते आहेत, ती चूक आहेत का बरोबर याबद्दल मला काहीच बोलायच नाही. तो या पोस्टचा मुद्दाही नाही. फक्त काही पोस्ट्स व कमेंट्स वाचून जाणवलं अनेकांना IPC च कलम 377 काय आहे हेच माहिती नाही. निव्वळ अर्धवट माहिती  आणि पूर्वग्रहदूषित विचांरांमुळे सर्वोच्च न्यायालयावर ताशेरे ओढायच काम चालू आहे. मुळात IPC हा 150 वर्षांहूनही जुना  ब्रिटिशकालीन  ॲक्ट आहे. भारताच संविधान(constitution) त्यानंतर अस्तित्वात आलं.  त्यामुळे संविधानातील तरतूदींच्या विरोधात जाणार कुठलही कलम अथवा त्यामधील तरतूद रद्द करणे हे आवश्यक होतं.कारण संविधान  हे सर्वात महत्वाच आहे. देशातील सर्व कायदे संविधानातील तरतुदींचा विचार करुनच तयार करणे आवश्यक आहे.

Section 377 of IPC, 1862

"Unnatural offences: Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine."
    This involves sexual acts between consenting adults (both homosexual and heterosexual adults), even within the privacy of their rooms.

यामधील voluntarily  carnal आणि against the order of nature हे शब्द महत्वाचे आहेत कारण हे शब्द वापर  संदिग्ध आहेत.  अनेकांनी LGBT हे अनैसर्गिक मानलं आहे. पण मुळात जी भावना नैसर्गिक आहे ती   अनैसर्गिक कशी असू शकेल?  मला नाही वाटत कोणी स्वतःहून मुद्दाम असं बनत असेल. काहींनी या मुद्द्यावर टिका करताना या लोकांची तुलना रेपिस्ट लोकांशी केली. अशा लोकांनी यातील voluntarily या शब्दाचा नक्की विचार करावा. कारण voluntarily म्हणजेच ऐच्छिक म्हणजेच इथे दोघांचीही संमती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बलात्कारामध्ये संमती नसते, बळजबरी असते.
     भारताच्या संविधानानुसार Right to Privacy  हा  Fundamental Right आहे. त्यामुळे IPC चा कलम 377 हा Right to privacy च्या विरोधात आहे. या मुद्द्यावर विचार करुन सुप्रिम कोर्टाने कलम 377 LGBT संबंधित तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली.
     ही माणसं त्यांच आयुष्य जगत असतात. त्यांना निसर्गानेच अस घडवल आहे,  यामध्ये त्यांचा काय दोष? तसही जो मुद्दा निव्वळ त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे त्यावर इतरांनी चर्चा करण्याच कारणच काय? जोपर्यंत या व्यक्ती कोणाला त्रास देत नाहीत तोपर्यंत या व्यक्तींवर टिका करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा व्यक्तीही एक माणूसच आहेत. त्यांच्याबाबतीत दुजाभाव कशासाठी?
थोडसं विषयांतर होतय असं वाटेल कदाचित पण कालच एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये एक स्त्री तिच्या घरात काम करणाऱ्या लहान मुलीला  बेमालूमपणे मारत होती. अशी उदाहरणं द्यायची तर शेकड्यांनी देता येतील. मुद्दा हा आहे की काही कालवधींनंतर अशा व्यक्तींनाही समाजात माणूस म्हणून स्थान मिळतं. पण LGBT व्यक्ती कोणाच्या अध्यात मध्यात नसूनही   समाज त्यांना सहजी स्विकारत नाही. का? ती सुद्धा माणसच आहेत.  त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
   या पोस्टमधून काय चूक काय बरोबर, संस्कृती वगैरे कुठल्याही मुद्द्यावर मला काहीच बोलायच नाही. मला फक्त एवढच म्हणायचय 'जगा आणि जगू द्या' हे तत्व जर प्रत्येकाने स्विकारल तर बरेचसे सामाजिक प्रश्न सुटतील.
©मानसी जोशी

 

Sunday, 2 September 2018

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे

"मनाची मनाला लागतसे आस
प्रीतीच्या फुलांना चांदण्यांचा वास"
  काही वर्षांपूर्वी झी मराठीवर गुंतता हृदय हे नावाची मालिका आली होती. झी मराठीच्या काही उत्कृष्ट मालिकांपैकीच ही  एक मालिका. अवघ्या १६० भागांची ही मालिका  विवाहबाह्य संबंधावर आधारीत  एक रहस्यकथा होती. मला वाटत रात्री १०.३० वाजता लागणारी झी मराठीवरची ही पहिलीच मालिका असावी.
    मृणाल कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी अवंतिकानंतर तब्बल आठ वर्षांनी एकत्र आले होते. यांच्या जोडीला मोहन आगाशे पल्लवी सुभाष सारखे तगडे कलाकार होते.
     मृणाल कुलकर्णी(नयना) आणि संदीप कुलकर्णी(विक्रम)  यांच्या सुखाच्या संसारात एक रहस्य वादळ बनून येतं.  अचानक घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे दोघही पुरती हादरुन जातात. या दोघांबरोबरच अजून एका व्यक्तीला या साऱ्याची झळ पोचत असते ती म्हणजे विक्रमची प्रेयसी अनंन्या(पल्लवी सुभाष). अनंन्या विक्रमच्या ऑफिसमध्ये काम करत असते. तिचा नवरा  नेव्हीमध्ये नोकरीला असल्यामुळे ती तिच्या रिटायर्ड आर्मी ऑफिसर असलेल्या आंधळ्या सासऱ्यांसोबत (मोहन आगाशे) राहत असते. या सगळ्या गूढ घटनेमागे नक्की कोण आहे? हे सगळ का घडतय?त्याचा उद्देश काय? याचा  प्रेक्षक आपाआपल्या परीने तर्कवितर्क लावत बसतात. कधी संशयाची सुई विक्रमचा बिझनेस पार्टनर मयंक (सागर तळाशीकर) कधी त्याच्या घरात काम करणारी मोलकरीण, कधी नयनाचे बाबा तर कधी  अनंन्या सासऱ्यांभोवती फिरत रहाते. आणि अगदी सुरुवातीच्या भागापासून उत्कंठा वाढवणारी ही मालिका जसजशी  पुढे सरकत जाते तसतसं  विक्रम, नयना आणि अनंन्या  सोडून प्रत्येकजणच संशयीत वाटू लागतो. रहस्याचा उलगडा जितका धक्कादायक तितकाच  सिरिअलचा शेवट वास्तववादी  आहे.
     यामध्ये विक्रम आणि अनंन्याचे विवाहबाह्य संबंध दिग्दर्शकाने  खूप वेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. सिरिअल बघताना कुठेही या दोघांचा राग येत नाही. दोघांनाही आपापले संसार टिकवायचे आहेत. इतकच नाही तर दोघही एकमेकांच्या संसारात काही प्रॉब्लेम येऊ नये याची सर्वोतपरी काळजी घेत असतात. पण मनाने मात्र दोघही एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. कुठेही उथळपणा नाही आहे ते फक्त  एक हळवं नातं.  इथे  विवाहाबाह्य संबंधाचा एक वेगळा काहीसा पॉझिटिव्ह असा हळवा कप्पा  दाखवण्याचा आला आहे. पण हे करताना दिग्दर्शकाकडून( सतीश राजवाडे)  अशा संबंधांच  समर्थन केल जातय अस मात्र एकदाही जाणवत नाही.  एकमेकांमध्ये गुंतलेले विक्रम आणि अनंन्या,त्यांचे प्रामाणिक जोडीदार, त्यांची भावनिक गुंतागुंत आणि सरतेशेवटी एकमेकांपासून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय हे सारे प्रसंग पाहताना वास्तववादी वाटतात.  कुठेही नाटकीपणा जाणवत नाही.
    मालिकेचे शीर्षक आणि शीर्षकगीत  दोन्हीही अगदी विषयाला समर्पक. रात्र अंधारली, गूढ रानातूनी .... अशा शब्दांनी सुरू झालेले  शीर्षकगीत धृवपदानंतर मात्र अचानक  हळव्या प्रेमाकडे वळते. अवघ्या दीड मिनिटांच्या गाण्यामध्ये मालिकेच्या कथेचा पूर्ण आशय दडलेला आहे. हे गाणं गाणाऱ्या देवकी पंडित या परीक्षक म्हणून मला कधीही आवडल्या नाहीत. पण त्यांची गाणी मात्र नेहमीच मनाला स्पर्श करतात.
     वादळवाट, पिंपळपान, प्रपंच, उंच माझा झोका, असंभव, एका लग्नाची गोष्ट अशा एकापेक्षा एक सरस मालिका देणाऱ्या झी मराठीवरच्या आजच्या मालिका पाहून मात्र, "कोण होतास तू, काय झालास तू" , अस म्हणायची वेळ आली आहे.

©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...