Tuesday, 30 May 2017

कथा - भेट

भेट

संध्याकाळी अमर त्याच्या मैत्रीणीच्या म्हणजेच श्वेताच्या  साखरपुड्याला जायच्या तयारीत होता. तेवढ्यात मोबाईल वाजला. स्क्रीनवर आईचं नाव बघून अमर काहीसा वैतागलाच. कारण त्याला खात्री होती आईने लग्नाच्या विषयावर बोलायलाच फोन केलेला असणार. काहीसं वैतागूनच त्याने फोन घेतला. अपेक्षेप्रमाणे आईने लग्नाचा विषय काढलाच. हो नाही एवढं जुजबी बोलून, "आत्ता बाहेर निघालोय आल्यावर फोन करतो", असं सांगून काहीही ऐकून न घेता त्याने पटकन फोन ठेवला.
     गेले दोन दिवस आई लग्नासाठी त्याच्या मागे लागलेली होती. त्याच्या मामीच्या माहेरच्या कुठल्यातरी मुलीचं स्थळ त्याच्यासाठी आलेलं होतं.  चार वर्षांपूर्वी ग्रॅज्युएशन झाल्यावर तो मामाकडे एका फंक्शनसाठी गेला होता. तेव्हा ती मुलगी आणि तिची फॅमिलीही तिथे आली होती. त्याला तर आठवतही नव्हती ती मुलगी; तरी आई मात्र हे स्थळ बघण्यासाठी गेले दोन दिवस त्याच्या मागे होती. मनातून तो वैतागला होता. त्याला आत्ता लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. नुकतंच प्रमोशन झालं होतं. त्यामुळे जबाबदारी वाढली होती. आणि मुख्य म्हणजे निदान अजून एक दोन वर्ष तरी त्याला सिंगल असणं एंजॉय करायचं होतं. त्यात मामीच्या माहेरची मुलगी म्हणजे टिपिकल काकूबाई टाईपची असणार, असा त्याचा पक्का समज होता. त्यामुळे मुळात हे स्थळ बघायचीच त्याला इच्छा नव्हती. पण आई मात्र दोन दिवस या स्थळासाठी सारखे फोन करत होती आणि अमर प्रत्येकवेळी बिझी आहे सांगून फोन ठेवत होता.
     श्वेता अमरची कॉलेजपासूनची मैत्रीण. दोघही एकाच ग्रूपमधली. त्यामुळे सहाजिकच तिच्या साखरपुड्याला कॉलेजचा अख्खा ग्रूप येणार होता. जवळपास ४ वर्षांनी सगळे एकत्र भेटणार होते. त्यामुळे अमरपण खूप खूश होता. श्वेताच्या साखरपुड्याचा हॉल तसा शहराबाहेर हायवेलगत होता. त्यामुळे अमरला निघायची जरा जास्तच घाई होती. चुकून हायवेला ट्रॅफिक लागलं तर पोचायला उशीर व्हायचा. त्यामुळे तो घाई गडबडीतच घरुन निघाला होता.  अपेक्षेप्रमाणे श्वेताच्या साखरपुड्याला सगळा ग्रूप जमला होता. धमाल, मस्ती जुन्या आठवणी यात वेळ कसा गेला ते कळलंच नाही. अखेर सगळ्यांचा निरोप घेऊन, अमर रात्री ११.३० च्या दरम्यान घरी जायला निघाला.
      पोर्णिमेची रात्र होती. बाहेर छान टिपूर चांदणं पडलं होतं. हवेत छान गारवा होता. सगळं वातावरण अगदी रोमॅन्टिक होतं. अमरने म्युझिक प्लेअर ऑन केला. त्यावर नेमकं त्याच्या आवडीचं गाणं सुरू झालं.....
मृगनयना_रसिकमोहिनी_.........
तो मजेत शिळ घालत गाडी चालवत होता. तेवढ्यात अचानक एक मुलगी हातवारे करत त्याच्या गाडीसमोर आली. त्याने करकचून ब्रेक मारला आणि चिडून काही  बोलणार इतक्यात ती मुलगी गाडीजवळ येउन म्हणाली, " please help me ! माझी गाडी बंद पडलेय आणि इथे रस्ताही सुनसान आहे मला हायवे संपेपर्यंत लिफ्ट द्याल का? पुढे सिटीत गेल्यावर मी ऑटो किंवा टॅक्सी करेन पण प्लिज मला आत्ता लिफ्ट द्या."
   खरंतर अमर ती समोर आल्यापासून फक्त तिच्याकडे बघत होता. तिचं सौदर्य बघून म्युझिक प्लेअरवर चालू असणाऱ्या गाण्यातल्या ओळी त्याच्या मनात घोळू लागल्या ...

 "कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी..."

"Please believe me!  मी कोणी चोर लुटारू नाहीये." त्या मुलीच्या आवाजाने अमर भानावर आला.
    "ओके ! या ना आत बसा", असं म्हणत त्याने गाडीच दार उघडलं.
 'Thanks' म्हणत ती गाडीमध्ये बसते.
  अमरही 'वेलकम' म्हणून फॉर्मलिटी पूर्ण करतो. खरंतर 'ती पहाताच बाला' अशी त्याची अवस्था झालेली असते. 'लव्ह  ॲट फर्स्ट साईट' होवू शकतं असं एक क्षण त्याला वाटून जातं आणि त्याचं त्यालाच हसू येतं.
     काही वेळ कोणीच काही बोलत नाही. मग शांतता भंग करत ती म्हणते, "माझं नाव राधा. मी मित्राच्या साखरपुड्यासाठी गेले होते. घरी जाता जाता वाटेत गाडी बंद पडली. Thanks खरच  तुमची खूप मदत झाली."
   "Its ok,  होतं असं कधीकधी. बाय द वे माझं नाव अमर आणि कोइन्सिडन्स म्हणा किंवा अजून काही मी सुद्धा आत्ता माझ्या मैत्रीणीच्या  साखरपुड्यालाच गेलो होतो”.
    यावर दोघही हसतात आणि हळूहळू त्यांच्यात मोकळ्या गप्पा सुरू होतात. तिच्याशी बोलता बोलता अमर घरी कधी पोचतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. घरी पोचल्यावर त्याच्या लक्षात येतं राधा त्याच्याबरोबरच आहे. तो राधाला म्हणतो, "सॉरी ! बोलण्याच्या नादात तुम्हाला हायवे एंड ला ड्रॉप करायचं लक्षातच नाही आलं नाही.”
 "अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चूक तर माझीच आहे. माझ्या लक्षात यायला हवं होतं." राधा
"बरं तुम्ही कुठे राहता? म्हणजे जवळ असेल तर मी तुम्हाला ड्रॉप करतो." अमर
"MG Road निर्माण सोसायटी",  इथून ती खूप लांब आहे. डोन्ट माईंड तुम्ही मला रिक्षा स्टॅंडपर्यंत सोडा मी जाईन." राधा.
  खर तर यावेळी राधासारख्या सुंदर मुलीला एकटीने घरी जाऊ देणं त्याला बरोबर वाटत नव्हतं. पण MG Road म्हणजे शहराचं दुसरं टोक तिथे सोडायला जायचीही त्याची तयारी होती. पण येताना त्याला एकट्यालाच यावं लागल असतं. शेवटी हिम्मत करुन तो तिला विचारतो, "जर तुमची हरकत नसेल, तर तुम्ही माझ्या घरी थांबू शकता. उद्या सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या घरी जा. आत्ता यावेळी तुमचं एकटीने रिक्षाने एवढ्या लांब जाणं बरोबर नाही."
     राधा काही क्षण विचार करते. खरंतर रात्री असं अनोळखी माणसाबरोबर त्याच्या घरी राहणं म्हणजे तिला जरा विचित्रच वाटत असतं. पण तरीही ती होकार देते कारण दुसरा ऑप्शनच तिच्याकडे नसतो.
    दोघंही अमरच्या घरी जातात. अमर आपल्या बेडरुममध्ये राधाला झोपायला सांगतो आणि स्वतः हॉलमध्ये सोफ्यावर येऊन झोपतो. पण निद्रादेवी काही त्याच्यावर प्रसन्न होत नसते. डोळे मिटल्यावर त्याच्या डोळ्यासमोर सतत राधाचा चेहरा येत असतो आणि डोळे उघडल्यावर राधाबरोबरचा आजचा प्रवास आणि प्रवासातल्या आठवणी!
     रात्री कधीतरी त्याला झोप लागते. त्याला जाग येते ती मोबाईलच्या रिंगमूळे. सकाळी साडेसहाच्या सुमारास अमरचा फोन वाजतो अर्धवट झोपेत तो फोन घेतो. फोन आईचा असतो.
पलिकडून आई सांगते, "अमर राधा गेली"
राधाचं नाव ऐकून अमरची झोप उडते... "कोण राधा?" अमर जरा चाचपडतच विचारतो.
   अरे तिच मुलगी जिचं तुला स्थळ आलं होतं. काल तू ज्या साखरपुड्याला गेला होतास ना ती पण तिथेच आली होती. पण वाटेत येताना एका टर्नवर तिचा अपघात झाला आणि ती जागीच ..... बोलता बोलता आईला रडू येतं. अमर सुन्न होवून सगळं ऐकत असतो.......
 "चार वर्षांपूर्वी जेव्हा मामाच्या घरी तिने तुला बघितलं ना तेव्हाच तू तिला आवडला होतास. तेव्हापासूनच ती एकतर्फी प्रेम करत होती तुझ्यावर. तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची खूप इच्छा होती तिची. म्हणूनच  काल मी तुला हेच सांगायला फोन केला होता की तू ज्या साखरपुड्याला जाणार आहेस तिथे राधा पण येणार आहे. तुला भेटेल तिथे ती. पण तू लग्न म्हटलं की विषयच टाळत होतास..."  आई राधाबद्दल बोलत होती आणि अमर सुन्नपणे सगळं ऐकत होता.
     तिने राधाबद्दल सांगितलेली प्रत्येक गोष्ट रात्री भेटलेल्या राधाशी जुळत होती. म्हणजे,"काल रात्री मला भेटलेली राधा ....."मनात आलेल्या या विचारासरशी तो दचकला, "आई मी तुला नंतर फोन करतो असं म्हणून त्याने फोन कट केला आणि बेडरूममध्ये राधाला बघायला गेला. बेडरूममध्ये कोणीच दिसत नाही. तरीही तो राधाला हाका मारत घरभर फिरतो. हॉलमध्ये आल्यावर त्याच्या लक्षात येतं; मेन डोअरला आतून कडी आहे म्हणजे राधा बाहेर गेलेली नाही. पण मग ती घरात पण नाही याचा अर्थ ..... "काल रात्री मी एका भूतासोबत होतो. मी जिच्या प्रेमात पडलो ती भूत होती ?" तो मटकन खाली बसून डोळे मिटून घेतो. डोळे मिटताक्षणी त्याच्या डोळ्यासमोर राधाचा चेहरा येतो आणि मनात आपोआपच सुर उमटतात....
"कामिनी होती ती मंजूळ मधुरालापिनी..."
©मानसी जोशी

Wednesday, 24 May 2017

कथा - स्विकार

स्विकार

पार्किंगमध्ये गाडी पार्क करुन विक्रांत  लिफ्टजवळ आला. त्याने आज  जरा जास्तच प्यायली होती. पण तो काय करणार आजचा दिवसच तसा होता. आज बरोबर १० वर्षे झाली 'ती' त्याच्या आयुष्यातून निघून जाऊन. 'ती' निघून गेल्यावर तो  जगणच विसरला होता. एक जिवंत पुतळा बनून राहिला होता तो. विचारांच्या तंद्रीतच तो लिफ्टजवळ गेला. त्याने इतकी प्यायली होती कि लिफ्टमध्येही त्याच्या झेपा जात होता. कसाबसा तो फ्लॅटसमोर आला. बेल वाजवणार इतक्यात त्याच्या कानावर ठुमरीचे बोल ऐकू आले...

जौबन_बीता_जाए_रे_हाय_राम_याद_पिया_की_आए.....

      तानपुऱ्यावर आतमध्ये कोणीतरी सुंदर आवाजात गात होतं.  त्या सुंदर स्वरांनी  त्याची नशा खाडकन उतरली. एकेकाळी याच ठुमरीच्या स्वरांची त्याला नशा चढत होती. आणि आज तेच स्वर त्याची नशा उतरवत होते. "कोण गात असेल ? रिचा? आवाज तर रिचाचाच वाटतोय.  रिचा इतकं सुंदर गाऊ शकते?"  त्याच्या मनात आलं.
    आतमध्ये रिचा भान हरपून गात होती आणि तो  दरवाज्याबाहेर उभा राहून त्याच्या भूतकाळात हरवून जातो.
     तिला त्याने पहिल्यांदा बघितले तेव्हा तेव्हाच त्याला ती आवडली होती. मधुरा तिचं नाव. ती त्याचा आईकडे गाणं शिकायला यायची. सुरांची तशी पक्की नव्हती पण आवाज मात्र इतका गोड कि तिने बोलत राहवं  आणि समोरच्याने फक्त ऐकत राहवं.  कित्येक दिवस, कित्येक महिने सरतात. पण तिच्याशी साधं दोन शब्द बोलण्याचीही त्याची हिम्मत होत नव्हती. त्याच्या आईच्या तालमीत तिच्या सूरांमध्ये  कमालीची  सुधारणा होते.
      तसं त्याच आयुष्य साधं सरळ. वडीलाचं छत्र लहानपणीच हरपलेलं. आई शाळेत म्युझिक टिचर. आणि घरीही गाण्याचे  क्लासेस घ्यायची. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अगदीच गरिबी नसली तरी थोडीफार ओढाताण होतच असे. त्यामुळेच तो  MBA करता करता एका ट्युशन क्लासेसमध्ये लेक्चररचा जॉबही करत होता. त्या दिवशी घरात हॉलमध्ये मधुराची शिकवणी चालू होती. तसं त्याला गाण्यामध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता पण निव्वळ मधुरासाठी तो मुद्दाम क्लासच्या वेळी घरीच थांबायचा. त्या दिवशीही तो घरात होता. त्याच्या MBA च्या प्रोजेक्टच काम करत होता. बाहेर मधुराचा क्लास चालू होता आणि तेवढ्यात  अतिशय सुंदर स्वरांनी त्याचं लक्ष वेधलं....

जौबन_बीता_जाए_रे_हाय_राम_याद_पिया_की_आए

    गाण्याच्या या सुरांनी विक्रांतला वेड लावलं. हो मधुराच गात होती. तो आतल्या खोलीतून बाहेर येउन क्लासच्या ठिकाणी येउन बसला. मधुरा गात होती आणि तो भान हरपून तिचं गाणं ऐकत होता. तिच्या सुंदर चेहर्‍यावरून त्याची नजरच हटत नव्हती. ठुमरी संपली तरी तो मात्र भारावलेलाच होता.  तिच्या सुरात कमालीची सुधारणा झाली होती खुद्द विक्रांतच्या आईने तिला पोचपावती दिली होती. ही ठुमरी ऐकावी तर मधुराच्या आवाजातच !
       त्यानंतर त्यांच्यात जुजबी बोलणं चालू झालं. हळूहळू दोघं एकमेकांत गुंतत गेली. खऱ्या भावनेला शब्दांची गरज नसते त्यामुळे त्या दोघांनी मनातल्या भावना एकमेकांसमोर कधीच व्यक्त केल्या नाहीत. असेच दिवस जात होते आणि सरणाऱ्या दिवसांबरोबर त्यांच प्रेमही बहरत होतं. विक्रांतच्या आईलाही याची कुणकुण लागली होती. पण ती मनोमन खूश होती. कारण सुस्वभावी सुंदर आणि मुख्य म्हणजे गाण्याची आवड असणारी मधुरा त्यांना सून म्हणून पसंत होती. पण नियतीच्या मनात काही वेगळच होतं. एक दिवस अचानकपणे मधुरा क्लासला यायची बंद झाली. तिचा फोनही लागत नव्हता. असेल काहीतरी प्रॉब्लेम अस समजून विक्रांत आणि त्याच्या आईने जवळपास दहा बारा दिवस तिच्या फोनची वाट पाहीली पण ना मधुरा आली ना तिचा फोन. तिचा पत्ता विक्रांतला नीटसा माहिती नव्हता पण तरीही त्याने तिचं घर शोधून काढलं. पण घराला कुलूप होतं. आजूबाजूला चौकशी केली तर त्यांनाही काहीच माहिती नव्हती. विक्रांत मनाने खचला. मधुराचं असं अचानक निघून जाणं त्याने चांगलंच मनाला लाऊन घेतलं होतं. विक्रांतच्या आईला त्याची अवस्था बघवत नव्हती पण ती हतबल होती.                                       असाच महिना सरला एक दिवस विक्रांतच्या नावावर एक पत्र आलं ..... मधुराने पाठवलेलं .... त्यात लिहिलं होतं , "मा‍झ्या घरातल्या माणसांनी माझ्या इच्छेविरूद्ध माझं लग्न एका श्रीमंत बिजवराशी लावून दिलं आहे. मला माफ कर विक्रांत,पण मला हे लग्न करावं लागलं. काकूंचीही माफी मागते कारण माझ्या नवऱ्याला माझं गाणं पसंत नाही. त्यामुळे लग्न झाल्या दिवसांपासून मी गाणं सोडलं. मला माहिती आहे आता तुला काही सांगण्याचा अधिकार मी गमावला आहे तरी कधीकाळी असलेल्या हक्काने सांगते, ' आयुष्यात खूप यशस्वी हो, खूप पैसा कमव कारण पैसा हेच सर्वस्व नसलं तरी पैशाच्या जोरावर अनेक सुखं विकत घेता येतात. पत्राच्या शेवटी लिहिलं होतं, तुझी न होवू शकलेली तरीही मनाने फक्त तुझीच असणारी.. मधुरा”.
    पत्र वाचून विक्रांत खूप रडला. पण त्या दिवशी तो रडला ते शेवटचं. त्यानंतर त्याने पैसा मिळवणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवलं. त्याच्या सुदैवाने MBA झाल्यावर त्याला एका उत्तम पगाराची नोकरी मिळाली. झोकून देउन काम केल्यामुळे यशाचं एकएक शिखर तो सहज पार करत गेला अवघ्या काही वर्षात तो  कंपनीमध्ये एका उच्च पदावर पोचला. त्याची आई त्याच हे यश डोळे भरून बघत होती. पण तरीही कुठूनतरी आतून तुटत होती. विक्रांतने लग्न करावं अशी तिची मनोमन इच्छा होती पण विक्रांत लग्नाला तयार होणार नाही हे तिला माहिती होतं.
     अशीच अजून काही वर्ष सरली. एका अपघातामध्ये विक्रांतची आई त्याला सोडून निघून गेली. आईच्या जाण्याने विक्रांत पूर्णपणे खचला. तो अगदी एकटा पडला होता. आता त्याचा दिवस ऑफिसमध्ये आणि रात्र बारमध्ये जाऊ लागली. अशातच एके  दिवशी त्याचा मित्र त्याला डान्सबारमध्ये घेऊन गेला. तिथे त्याची ओळख रिचाशी झाली. दारू आणि रिचा दोन्हीची नशा त्याला हवीहवीशी वाटू लागली. पैशाची त्याला कमी नव्हती. त्यामुळे रिचाबरोबर अनेक रात्री घालवणे त्याच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. रिचाच्या सहवासात फक्त त्याची शारीरिक गरज पूर्ण होत होती. मनातून मात्र तो आजही मधुराला विसरू शकत नव्हता. रिचा मात्र भावनिकदृष्ट्या कुठेतरी त्याच्यात गुंतत चालली होती. अशातच डान्सबारवर बंदी आली. विक्रांतशिवाय कधीही कोणाला जवळ येऊ न दिल्याने रिचाकडे इतर बारबालांएवढा रग्गड पैसा आणि कॉन्टॅक्ट्सही नव्हते. अखेर विक्रांतने आपला एक फ्लॅट तिला रहाण्यासाठी म्हणून दिला. पण त्या मोबदल्यात विक्रांत म्हणेल तेव्हा तिने त्याला खूश करायच ही अट विक्रांतने तिला घातली. हतबल रिचासमोर त्याची मागणी मान्य करण्याव्यतिरिक्त कुठलाही पर्याय नव्हता. रिचा मनातून खूप दुखावली गेली होती. ती विक्रांतवर मनापासून प्रेम करत होती पण विक्रांत मात्र तिच्याकडे फक्त भोगवस्तू म्हणून बघत होता. तशी रिचा चांगल्या घरातली मुलगी पण वडीलांवर आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि त्या धक्क्याने आईने अंथरुण धरले. हळूहळू कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि नाईलाजाने रिचाला डान्सबारमध्ये बारबाला म्हणून काम करावं लागलं. काही दिवसांत तिची आईही तिला सोडून कायमची निघून गेली आणि रिचा एकटी पडली. या एकटेपणातच तिला विक्रांत भेटला आणि ती त्याच्यात गुंतत गेली पण त्याला तिच्या मनाची  नाही तर शरीराची गरज होती.पण तरीही ती विक्रांतवर मनापासून प्रेम करत होती.
       फ्लॅटमधून येणारा गाण्याचा आवाज थांबला. आणि विक्रांत भूतकाळातून बाहेर आला.त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते. रिचाच्या बाबतीत आपण केवढं चुकलो याची जाणीव त्याला झाली. आज रिचाच्या आवाजातली ठुमरी ऐकताना त्याला रिचा नाही मधुरा गातेय अस वाटत होतं.आपल्या जवळच्या किल्लीने त्याने फ्लॅटचे दार उघडले. आतमध्ये तानपुऱ्यासमोर बसलेली रिचा दिसली. आज त्याला रिचामध्ये; तिच्या सुरांमध्ये मधुरा सापडली आणि त्याने रिचाचा आपली पत्नी म्हणून स्विकार करायचा निर्णय घेतला. त्याच्या गळ्यातून  नकळत ठुमरीचे सुर बाहेर पडले......

#जौबन_बीता_जाए_रे_हाय_राम_याद_पिया_की_आए

©मानसी जोशी


     





Tuesday, 23 May 2017

कथा - निर्णय

निर्णय
दुपार टळून संध्याकाळ सुरु झाली होती. त्याच्या लॅविश फ्लॅटच्या ओपन टेरेसमध्ये सिगारेट शिलगावत तो उदास उभा होता. बाहेर आभाळ भरुन आलं होतं. कुठल्याही क्षणी पाऊस सुरु होइल असं वाटत होतं. प्रत्येकालाच पावसाच्या आधी घरी पोचायची घाई होती. त्याने मात्र मनाशी एक निर्धार पक्का केला होता. बस थोडी हिम्मत झाली कि तो त्याच्या बाराव्या मजल्यावरच्या प्लॅटच्या टेरेसमधून स्वतःला खाली झोकून देणार होता. हिम्मत गोळा करता करता सिगारेटच पाकीट संपत आलं होतं.  सोसाट्याचा वारा सुटला आणि बघता बघता अचानक  मुसळधार पाऊस सुरु झाला. ढगांचा गडगडाट, विजेचा कटकटाट आणि त्यात सोसाट्याचा वारा सगळं वातावरण क्षणात पालटून गेलं होतं. अचानक आलेल्या या पावसामुळे सगळ्यांचाच गोंधळ उडाला होता. या पावसात तो ही भिजत होता पण उदासपणे .....त्याचवेळी समोरच्या चाळीतली मुले या पहिल्या पावसाचा आनंद घेत पावसात भिजत होती. त्या मुलांना बघून क्षणभर त्याला त्यांचा हेवा वाटला. एरवी या चाळीतल्या  मुलांकडे तो तुच्छतेने बघत असे. त्याच्या सो कॉल्ड 'हाय-फाय' लाईफच्या कन्सेप्टनुसार ही चाळ म्हणजे त्यांच्या लॅविश एरियातली घाण होती. पण आज का कुणास ठावूक अचानक त्याच्या मनात या चाळीबद्दल आपुलकी दाटून आली होती. गेल्या काही दिवसांत तो जे अनुभवत होता त्यातून त्याला माणसांची किम्मत कळायला लागली होती. पैशाच्या धुंदीत नेहमी हवेत  वावरणारा तो आता हळूहळू जमिनीवर येत होता.
       गेल्या चार महिन्यात त्याचं आयुष्यच  बदलून गेलं होतं. एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत मोठ्या पोस्टवर आणि गलेलठ्ठ पगारावर काम करणारा तो आज बेकार म्हणून घरी बसला होता. अचानक आलेल्या रिसेशनच्या  लाटेत त्याची नोकरी गेली होती. गेले चार महिने तो नोकरीच्या शोधात वणवण फिरत होता. अगदी होता त्यापेक्षा कमी पगारावर काम करायचीही त्याची तयारी होती. पण जिथे तिथे 'नो वेकन्सी' ऐकून तो हतबल झाला होता. आधी नोकरी गेली आणि त्यामागोमाग त्याची गर्लफ्रेंडही त्याला सोडून निघून गेली. 'जोवरी पैसा तोवरी बैसा' याची प्रचिती त्याला गेल्या चार महिन्यात आली होती. त्याच्या मित्र मंडळीनीही आता  त्याच्याकडे पाठ फिरवली होती. दर विकेंडला पब, पिकनिक, आउटिंग हे सगळं त्याचे मित्र नियमितपणे करत होते, पण त्याला मात्र मुद्दाम टाळलं जात होतं. एकेकाळी 'अरे यार चल ना, तू नही तो मजा नही', म्हणणारे त्याचे मित्र असे वागू शकतात, हेच त्याच्यासाठी धक्कादायक होतं.
      त्याला आठवलं; समोरच्या चाळीत रहाणाऱ्या विलासची नोकरी गेली तेव्हा अख्खी चाळ त्याला मदत करायला पुढे आली होती. त्याच चाळीतच रहाणारी विलासची गर्लफ्रेंड त्याला सोडून न जाता खंबीरपणे त्याला साथ देत होती. त्याला डिप्रेशन येउ नये म्हणून जिवापाड जपत होती. अगदी विलासशी कुठलाही संबंध नसताना त्याच्याकडे कामाला येणाऱ्या कामवाल्या बाईनेसुद्धा त्याच्याकडे विलासच्या नोकरीसाठी शब्द टाकला होता. अर्थात तेव्हा पैशाच्या आणि सो कॉल्ड स्टेटसच्या धुंदीत असणाऱ्या त्याने ते तेवढं सिरिअसलीही घेतलं नव्हतं. आज त्याला तो विलास त्याच्यापेक्षा श्रीमंत वाटत होता. 
      पाकिटातली शेवटची सिगारेट त्याने शिलगावली. एक झुरका घेतला आणि उडी मारण्यासाठी कठड्याजवळ गेला पण तेवढ्यात त्याला समोरच्या रस्त्यावर एक कुत्र्याचं पिल्लू दिसलं अगदी पाढरं शुभ्र, पावसात भिजल्यामूळे कुडकुडणारं. गेल्या आठवड्यात त्या रस्त्यावरच्या कूत्रीला चार पिल्ल झाली होती. हे त्यातलच एक  पिल्लू होतं. "पण हे एकटं कसं? नेहमी तर सगळी पिल्ल एकत्र असायची ..." त्याच्या मनात विचार आला. त्याने आजूबाजूला बघितलं तर बाकीची पिल्ल आणि त्यांची आई कुठेच दिसेनात. गारठलेलं ते पिल्लू शक्य तितकं अंग चोरुन बसायचा प्रयत्न करत होतं आणि मध्येच  कुठे आडोसा मिळतोय का ते शोधत होतं. त्यात जिथे तिथे साठलेलं पाणी, ढगांच्या गडगडाटाचा आवाज, रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या साऱ्यामूळे ते खूपच बावरुन गेलं होतं. त्याला अचानक त्याची आणि पिल्लाची अवस्था सारखीच वाटली..... आणि क्षणात मनात विचार आला, "गेल्या आठवड्यात जन्मलेलं कुत्र्यासारख्या सामान्य प्राण्याचं पिल्लू जर जगण्यासाठी एवढी धडपड करतय तर मी का असा विचार करतोय? त्या बिचाऱ्याच्या डोक्यावर हक्काचं छप्पर पण  नाही तरी ते जगण्याची लढाई लढतंय आणि मी मात्र ...... नाही ! मला लढायलाच हवं ....." त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि कसलाही विचार न करता तो बिल्डिंगखाली आला. धावतच पटकन रस्त्याच्या पलीकडे जाऊन त्या पिल्लाला उचलून घरात घेउन आला.  त्याचं अंग टॉवेलने पुसलं. रुममध्ये हिटर चालू केला आणि एका डिशमध्ये दुध ठेवून ते त्या पिल्लाला पाजलं. हे सगळं करताना त्याला प्रचंड मानसिक समाधान मिळत होतं. गेल्या कित्येक वर्षात त्याने हे समाधान अनुभवलच नव्हतं. आज मरणाच्या दाराशी जाता जाता त्याला जगण्याचा खरा अर्थ उमजला आणि त्याने जगायचं ठरवलं. आठवड्यापूर्वी जन्मलेल्या एका सामान्य कुत्र्याच्या पिल्लामूळे तो भानावर आला होता. त्याने निर्णय घेतला होता या पिल्लाला सांभाळण्याचा ....... आता त्याला जगायचं होतं त्या पिल्लासाठी ; स्वतःसाठी आणि जगण्यासाठी लढायचं होतं...न थकता, न थांबता, न हरता जगण्याची लढाई जिंकायची होती.

©मानसी जोशी



Thursday, 18 May 2017

कथा - विकेन्ड ब्रेक

विकेन्ड ब्रेक

"बघ शेवटी उशीर केलासच निघायला. आपलं ठरलं होतं ना सकाळी लवकर निघायचं.......", गाडीत बसल्यावर ती त्याच्यावर वैतागून बोलत होती. तर  तो अतिशय शांतपणे सगळं ऐकत गाडी चालवत होता. तशी ती थोडीशी शॉर्ट टेम्पर्ड. पण तेवढीच समजूतदार. तो मात्र शांत. क्वचितच चिडणारा पण जेव्हा चिडेल  तेव्हा आकाश पाताळ एक करेल असा.  थोड्याच वेळात गाडी हायवेला लागते. तो तिला सिटबेल्ट लावायला सांगतो. "हो लावते," असं म्हणून काहीसं वैतागून ती सिटबेल्ट लावते. तिला सिटबेल्ट लावायला अजिबात आवडत नसे. पण हायवेवर तरी निदान लावावाच लागत असे. थोड्याच वेळात तो गाडीच्या काचा वर करुन ए.सी. ऑन करतो. ती काहीसं रागानेच त्याच्याकडे बघते. पण बोलत मात्र काहीच नाही.  तिला ए. सी. च्या गारव्यापेक्षा खिडकीतून येणारा वाराच जास्त आवडायचा. दोन मिनिटे तशीच जातात. ती मोबाईलमध्ये गर्क होते. तो म्युझिक प्लेअर ऑन करतो आणि गाणं सुरु होतं ......
"साथिया ....मद्धम मद्धम  तेरी गीली हंसी..... ".
    ती चटकन मोबाइलमधून डोकं बाजूला करुन त्याच्याकडे बघते. तो गालातल्या गालात हसत असतो. तिच्याही नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. त्याने तिला डेडीकेट केलेलं पहिलं गाणं असतं ते.
   "हसती रहे तू हसती रहे, हया की लाली खिलती रहें, जुल्फ के नीचे गर्दनपे सुबह ओ  शाम मिळती रहे  ....",
    गाण्याच्या ओळींबरोबर तिचं मनही भूतकाळात जातं. तिला आठवत  त्यावेळी तिला नुसतं बघण्यासाठी तो तासनतास तिची वाट बघत बसायचा. ती दिसल्यावर मात्र त्याचा सगळा थकवा निघून जायचा. तासनतास तिच्या बोलण्यात हरवून जायचा. सगळी कामं बाजूला ठेवून नुसतं तिच्याशी बोलण्यासाठी, तिला बघण्यासाठी ती भेटण्याच्या ठिकाणी जाऊन थांबायचा. सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पण दुसऱ्या क्षणाला तिच्या  मनात विचार येतो, "तेव्हा मला नुसतं बघण्यासाठी तासनतास ताटकळत रहायचा पण  आज मी कितीही नटून सजून त्याच्या समोर गेले तरी याचं माझ्याकडे लक्षच नसतं. बरं लक्ष वेधून घेउन कशी दिसतेय विचारलं तरी मोबाईल किंवा लॅपटॉपमधून एक सेकंदासाठी डोकं वर करुन बघितल्यासारखं करुन म्हणतो वा ! छान दिसतेयस". मनात आलेल्या या विचारामुळे तिच्या चेहऱ्यावरच हसू मावळतं. ती पुन्हा खिडकीबाहेर बघायला लागते. तेवढ्यात म्युझिक प्लेअरवर दुसरं गाणं सुरु होतं.
 तुने ना जाना ये दिल दिवाना....... सुनो ना सुनो ना सुनलोsना हमसफर मुझीको चुनलो ss  ना ....".
त्याने तिला डेडीकेट केलेलं दुसरं गाणं. गाणं ऐकून ती चमकून त्याच्याकडे बघते. तो गालातल्या गालात मिश्किल हसत असतो. तिच्याही चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटतं. त्याने तिला प्रपोज केलेला दिवस तिला आठवतो. तसा तो साधा सरळ. रोमॅन्टिक होणं वगैरे उसके बस की बात नही. त्यामुळे प्रपोज करतानाही कुठलीही फिल्मी स्टाइल न वापरता फक्त एवढच म्हणाला होता,  "तू मला आवडतेस, I love you". तिने मात्र विचार करण्यासाठी वेळ मागितला होता. त्याने तिला प्रपोज केल्यावर   अनेक मैत्रीणी तिला सांगत होत्या, " विचार कसला करतेस ? डायरेक्ट हो म्हणायचं ते. एवढा डिसेंट मुलगा शोधून पण सापडणार नाही”. ती मात्र तेव्हा मैत्री का प्रेम यातच अडकलेली होती. इतकी वर्ष झाली लग्न होवून पण  सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटत होतं तिला. तेवढ्यात तो गाण्यावर शिळ घालतो. ती  त्याच्याकडे बघते नेमकं त्याच वेळी तो ही तिच्याकडे बघतो. दोघांची नजरानजर होते. ती गोड हसते. कितीतरी दिवसांनी नव्हे महिन्यांनी त्यांच्यामध्ये नजरेचा संवाद होतो.त्याचं असं गाण्यांवर शिळ घालणं तिला खूप आवडायचं. म्युझिक प्लेअरवर एकामागून एक त्याने तिच्यासाठी डेडिकेट केलेली गाणी वाजत असतात. हे सारं त्याने ठरवून केल आहे हे एव्हाना तिच्या लक्षात येतं. ती मनोमन सुखावते. तिच्या मनातला राग, चिडचिड कुठल्या कुठल्या कुठे निघून गेलेली असते. त्या चार/पाच डेडिकेटेड गाण्यांमूळे त्यांच्यामध्ये आलेला गेल्या काही महिन्यातला दुरावा कमी झालेला असतो.
       हायवे संपून गाडी साध्या रस्त्याला लागते. ती सिटबेल्ट काढणार तेवढ्यात तो तिला खूणेनेच नको सांगतो. ती विचारते, "का? हायवे  तर संपला ना?" तो म्हणतो, "अग राणी सिटबेल्ट आपल्या सेफ्टीसाठी असतो. तुझी सेफ्टी महत्वाची आहे  माझ्यासाठी." ती काही न बोलता सिटबेल्ट तसाच ठेवते. एरवी तिने कदाचित वाद घातला असता पण तो एवढ्या प्रेमाने सांगतोय म्हटल्यावर ती त्याचं म्हणणं टाळत नाही. हळूहळू त्या दोघांमध्ये छान संवाद सुरु होत असतो. गाडी हॉटेलवर पोचेपर्यंत त्यांच्या मनातला दुरावा जवळपास संपलेला असतो. दुरावा तर संपला पण तेवढच पुरेसं नसतं. मनं पुन्हा जुळणं हे पण तितकच महत्वाचं असतं. आणि हे काम करते  ती  समुद्रकिनऱ्यावरची रम्य संध्याकाळ!
     तिने त्याला होकार दिल्यानंतर दोघांच्या  प्रत्येक रविवारची संध्याकाळ समुद्रावरच जात असे. तिला संध्याकाळ खूप आवडायची आणि समुद्राच्या पाण्यामध्ये  बुडणारा सूर्य, त्याचवेळी आकाशात पसरलेले  मावळतीचे रंग बघत समुद्राच्या लाटांशी खेळत त्याच्या सहवासात हरवून जायचं  आणि  रात्री चांदण्यांनी भरलेलं आभाळ बघूनच मग घरी जायचं. हे तिचं साधं सरळ स्वप्न. पण तेव्हा बरेचदा त्याला उशीर व्हायचा आणि मावळतीचे रंग बघायचे राहून जायचे. मग सहाजिकच तिची चिडचिड व्हायची. पण ही संध्याकाळ मात्र  तिच्यासाठी खासच असते. तो आधीच आवरुन तयार होतो. तरी कुठलीही घाई न करता तो  तिला तिच्या मनाप्रमाणे आवरु देतो. ती जेव्हा तयार होवून त्याच्यासमोर येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावरुन नजर न हटवता म्हणतो, "खूप छान दिसतेयस आज. असच बघत रहावसं वाटतय तुझ्याकडे”. त्याचं हे बोलण ऐकून ती चक्क लाजते. गेल्या कित्येक महिन्यात त्याने तिला अशी लाजलेली बघितलेलीच नसते. तो तिला जवळ ओढतो आणि म्हणतो, "अशी लाजू नकोस नाहीतर  समुद्र कॅन्सल करावा लागेल मला." ती पुन्हा लाजून त्याच्या मिठीत शिरते. एक क्षण तर तिला असं वाटत आपण स्वप्नात तर नाही ना?
   " चला मॅडम निघुया आपण, नाहीतर सुर्यास्त होवून जायचा." त्याच्या या बोलण्याने ती भानावर येते. आणि  त्याच्या मिठीतून बाजूला होते. दोघही रुममधून  बाहेर पडतात. गाडीत बसल्यावर ती आठवणीने सिटबेल्ट लावते. तो सुखावतो.
   समुद्रावर गेल्यावर दोघंजण खुप वेळ पाण्यात घालवतात. पाण्यातून फिरताना कधी सेल्फी , कधी सनसेटचे फोटोज, तर कधी एखादी मोठी लाट कॅमेरामध्ये कॅप्चर करायची धडपड, हे सगळं करता करता दोघहीजण एकमेकांमध्ये हरवून जातात. सुर्याचा गोळा आता पाण्यात पूर्णपणे बुडालेला असतो. ती दोघं जवळच्याच एका खडकावर बसतात. तिने पाहिलेलं 'रोमॅन्टिक इव्हिनिंगच'  स्वप्न  आज इतक्या वर्षांनी पूर्ण होत असतं. ती खूप खूश असते. काही क्षण शांततेत गेल्यावर ती त्याच्याकडे बघून म्हणते, "थॅक्स”.तो विचारतो, "कशाबद्दल?"
ती: अशी रम्य हवीहवीशी वाटणारी संध्याकाळ दिल्याबद्दल. खरं तर आजच्या पूर्ण दिवसासाठीच थॅंक्स.
तो: तू खुश आहेस ना ? माझ्यासाठी तेच खूप आहे.
काही क्षण तसेच शांततेत गेल्यावर तो तिला  म्हणतो,  "सॉरी".
ती: आता हे काय मध्येच?
तो: गेल्या काही महिन्यात खूप दुर्लक्ष झालं तुझ्याकडे. खूप वेळा दुखावली गेलीस तू माझ्यामुळे. पण खरं सांगतो ग इतकं बिझी शेड्युल असतं आपलं कि आपल्याला एकमेकांसाठी वेळच मिळत नाही.संसाराचा गाडा रेटता रेटता मनातल्या भावना, हळूवारपणा रोमान्स सगळच हरवून गेलय कुठेतरी पण याचा अर्थ हा नाही  कि आता माझं तुझ्यावर प्रेमच उरलं नाही. प्रेम तर आहेच अगदी पूर्वीइतकं किंवा कदाचित त्यापेक्षाही जास्त.
ती: (त्याचं बोलणं मध्येच तोडत) पण प्रेमाचं व्यक्त होणं कुठेतरी हरवून गेलय.
तो: अगं इतकी वर्ष झाली लग्नाला आता खरच गरज आहे का व्यक्त होण्याची? तू तर मला माझ्यापेक्षाही जास्त ओळखतेस. माझ्या मनातलं  तुला अगदी सहज कळतं. म्हणून मुद्दाम व्यक्त नाही केलं जात.i
ती: बुद्धीला पटतात रे या गोष्टी पण मनाचं काय ? मनाला तर कायमच गरज असते या साऱ्याची. खूप छान वाटतं हे ऐकताना कि कोणी आपल्यावर जिवापाड प्रेम करतं. सगळा शिण, ताण निघून जातो आणि एकदम प्रसन्न वाटू लागतं.
तो: पटलं तुझं म्हणणं मला. अगदी मनापासून पटलं. यापुढे अशी चूक नाही होणार; प्रॉमिस .
ती : "I am also sorry . चूका तर माझ्याकडून पण झाल्यात.
तो: बास ना आता. आपण इथे एकमेकांच्या चूकांची कबूली द्यायला नाही आलोय. जे घडायचं ते घडून गेलं. ते आता बदलता नाही येणार.जे झालं ते विसरुन जाऊया आणि  जे क्षण मिळालेत ते आनंदात घालवूया. कितीतरी दिवसांनी फक्त दोघांचा असा वेळ मिळालाय आपल्याला.
ती: मग बोल ना काहीतरी रोमॅन्टिक....
तो: (हसून) ते रोमॅन्टिक होणं वगैरे नाही जमत मला पण एक सांगतो अगदी मनापासून ....
  तुला वजा केल्यावर
  बाकी काही उरत नाही
  तुझ्याशिवाय आयुष्य मी
  आयुष्यच धरत नाही.
ती सुखावते आणि अलगद त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. आयुष्यातला सगळ्यात सुखाचा दिवस आज तिने अनुभवलेला असतो. थोड्या वेळाने ती त्याला विचारते, "निघुयात?" तो म्हणतो, थांबना थोडावेळ... त्याच्या या वाक्यावर दोघही हसतात. लग्नापूर्वीचे त्यांचे डायलॉग्ज आज एक्सचेंज झालेले असतात. ती म्हणते, "मलाही तुला काहीतरी सांगायचं आहे”. "सांग ना मग" – तो.
तू सोबत असलास कि
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.....
तो तिचा हात हातात घेतो. पुन्हा नजरेचा नजरेशी संवाद होतो. दोन दुरावत चाललेली  मनं आज पुन्हा जुळलेली असतात.
  बाकी काही नको असतं नात्यांना फक्त थोडा वेळ हवा असतो आणि थोडी आपुलकी. बस एवढं दिलं ना  कि बहरत जातं नातं..... आणि यासाठी हवा असतो  एखादा विकएंड ब्रेक !
©मानसी जोशी

Wednesday, 17 May 2017

कॉम्प्लिमेंट

कॉम्प्लिमेंट !  जेव्हा कोणी मनापासून तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतं तेव्हा खूप आनंद होतो. परवा अलिबागच्या चौपाटीवर फिरण्याचा योग आला. अतिशय स्वच्छ समुद्रकिनारा बघून बरं वाटलं. तेवढ्यात एक शेंगदाणे विकणारे काका शेंगदाण्यानी भरलेली  जड टोपली डोक्यावर घेऊन oफिरताना दिसले. माझ्या 'अहो'नी   त्यांच्याकडून उकडलेल्या शेंगा घेतल्या.  कागदाच्या कोनात त्यांनी शेंगा भरून दिल्या. पैसे घेऊन ते निघणार तेवढयात मी त्यांना विचारलं , काका अजून एक कागद मिळेल का ?  त्यांनी लगेच टोपली खाली ठेवून त्यातला एक कागद काढून मला दिला आणि  जाता जाता मला म्हणाले , "हे आवडलं हा मला ताई, खूप छान वाटलं तुम्ही कागद मागीतालात, मी बऱ्याचदा स्वतःहुन विचारतो पण बरीच जणं नको म्हणतात. शेंगाची टरफलं इकडे तिकडे फेकण बरोबर नाही .  मला खूप आनंद झाला. कॉम्प्लिमेंट कोणाकडून मिळालं यापेक्षा ते मनापासून मिळालं की जास्त आनंद होतो.  त्याक्षणी माझ्या मनात आलं , फेरीवाले असूनही किती समज आहे या काकांना. लाखो रुपयांच्या फोर व्हीलर मधून फिरणारे जेव्हा गाडीच्या काचा खाली करून रस्त्यावर पचापचा थुकतात किंवा बिस्लरीच्या बाटल्या, कुरकुरे, चिप्स इत्यादीच्या रिकाम्या पिशव्या अगदी सहज रस्त्यावर फेकतात तेव्हा कुठे जातो यांचा सो कॉल्ड सुसंस्कृतपणा. शेवटी शिक्षणाने माणूस नुसताच शिक्षित होतो सुशिक्षित नाही हे पुन्हा एकदा पटले.
©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...