Saturday, 14 April 2018

एका आईचे मनोगत

बास करा एका निष्पाप मुलीच्या दु:खद कहाणीचा राजकारणासाठी, टीआरपीसाठी वापर करणे. आधी निर्भया आता असिफा आणि न जाणो अशा अजून किती असतील?
    बलात्काऱ्याला आणि पीडिताला जात, धर्म नसतो. एकाची असते ती गलिच्छ वासना आणि दुसरी असते ती त्या वासनेला  बळी पडलेली निष्पाप कळी.
     सत्ताधारी आणि विरोधी दोघेही या प्रसंगाचा आपआपल्या पक्षासाठी वापर करुन घेणार. मीडिया सतत तेच तेच दाखवून आपला टिआरपी वाढवायचा प्रयत्न करणार. उद्या न्याय मिळेलही आसिफाला, जसा निर्भयाला मिळाला; पण तिच्या आई वडिलांच काय ? त्यांना त्यांची मुलगी कधीच परत मिळणार नाही.
     असिफाच्या जागी पूजा, जसविंदर, ज्यूली  कोणीही असू शकत. कधी त्यांच्या कपड्यांवर टिका/ चर्चा तर कधी त्यांच्या धर्मावर .. पण कधीतरी विचार करा त्या जीवाचे किती हाल होत असतील. मन, शरीर, आत्मा सगळ्याचीच अवहेलना, कूचेष्टा सहन करताना काय परीस्थीती ओढावत असेल त्या निष्पाप जीवावर?
       "मन चिंती ते वैरी न चिंती" असं म्हणतात ते खरच आहे. कधीकधी मनात विचार येतो,  "या जागी आपली मुलगी असती तर?" काळजात धस्स होतं मग.... ज्या गोष्टीची कल्पनाही सहन करु शकत नाही ती गोष्ट कोणाच्यातरी लेकीच्या बाबतीत घडलेय .... नाही नाही .....कल्पनाच करु शकत नाही मी त्या आई-वडिलांच्या दु:खाची. ज्या मुलीला नऊ महिने आपल्या पोटात वाढवल आणि त्यानंतर आठ वर्ष फुलासारख जपल, तिच्यासाठी अगणित स्वप्न पाहिली ... त्या लेकीची अशी अवस्था?.... कस सहन करत असेल ती माऊली? असं म्हणतात, 'एक पुरुष आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करत असेल तर ते आपल्या मुलीवर.' काय अवस्था झाली असेल त्या बापाची आपल्या मुलीच शव बघितल्यावर?
      अशा दु:खद घटनांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची प्रवृत्ती खरच चीड आणणारी आहे. मी कुठल्याही पक्षाची समर्थक नाही. मला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. मी एका मुलीची आई आहे आणि अशा प्रसंगानंतर एका आईच्या मनात ज्या गोष्टी येत असतील त्याच गोष्टी माझ्या मनात आल्या. जे घडल ते खूपच दूर्दैवी होत पण त्याहीपेक्षा या घटनेच  स्वार्थासाठी जे भांडवल केल जातय  ते यापेक्षाही दु:खद आहे.
  आपण चार दिवस चर्चा करु, काही जण नराधमांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मोर्चे निघतील तिथेही पुन्हा दगडफेक, जाळपोळ यासारखे प्रकार घडतील, पण पुढे काय? मुळात ही नीच प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे यासाठी काय करता येइल याचा निदान विचार तरी करतो का आपण? खरच हा विचार करायला हवा अस नाही वाटत तुम्हाला ?

©मानसी जोशी

Thursday, 12 April 2018

Law

                           Law

Law! Law is the base of judicial system of every country. There are too many definitions of law  available in various books. But simple definition of law is, “Law is nothing but common sense.”
   Law is a set of rules which must be followed  by each & every citizen of the country, for smooth functioning & running of the society.
  
  Constitution!  A constitution is a set of fundamental principles or established precedents according to which a state or other organization is governed. Constitution is the base of every law. Lawful remedies, rules & regulations and basic principles of laws are defined in the constitution. Every country has its own Constitution. Sometimes it become necessary to make changes into the law or laws of the nation. That changes should be made by following fundamental principles of the constitution. Sometimes it is required to declare National emergency on the basis of external aggression or armed rebellion;  this time top authority has empowered by extraordinary powers, by constitution. It is not easy to make changes into the constitution of the country. Constitution is most important part of the judiciary system.

     Legal language! It is one of the important aspect of every law. This language is different from spoken language. Every law is written by using legal language. Legal language is little bit complicated to understand. It may create chaos into the mind of general public. But person who studied or studying the law can easily understand the legal language and its importance. It is necessary to cover each & every meaning of the word/ sentence while writing laws to avoid double meaning of the word/sentence.
  Why  legal language is necessary ? In simple words, culprit should not get free by taking undue  advantage of another meaning of words/ sentence of the provisions/ sections of the law.

   Each country has its own judiciary system and set of rules. Basic concept of Jurisprudence is, “100 culprits may let go free but no innocent should be punished.” Almost all  countries follows this basic principle of jurisprudence while making laws of the country.

  In India there are two ways to become a law graduate. Students can start Law course after 12th (5 years course) and after graduation ( 3 years course). Admission procedure is not so easy. Students should have to clear entrance exam to seek the admission. After successful completion of law course students will become eligible to get  license from ‘Bar council’ of the state to start legal practice. The law degree also have local, international, and world-wide aspects. Becoming an international law attorney requires completing at least a Juris Doctorate (J.D.) degree program with courses in comparative or international law. Some international law professionals go on to pursue a Master of Laws (LL.M.), adding an additional 12-18 months of education.

  As a already said, Law is nothing but common sense. But tragedy is that this common sense is usually uncommon.  People should aware about the rules & regulations of the society, rights & duties towards the society. It is not wrong if I said legal education is necessary to each & every citizen of the country. We must know laws of our country.

©Manasi joshi
  
 






Tuesday, 10 April 2018

उन्हाळी सुट्टी आणि मी

संपली एकदाची परीक्षा!
आता सुट्टी!
माझ्यासाठी एक परीक्षा संपली दुसरी सुरु झाली. आता पसारे, मस्ती, धुडगूस, सगळं चालू.
सुदैवाने आमच्या सोसायटीमध्ये लेकीच्या वयाची  भरपूर मुलं आहेत त्यामुळे "सुट्टीत काय?" हा प्रश्न मला अजिबात पडत नाही. वेगवेगळे खेळ, भांडणं,छोट्या पार्टीज आता सुरु होतील.

   उन्हाळी सुट्टी लागली की हमखास nostalgic व्हायला होतं. आजकाल मुलांना खेळायला वेगवेगळे गेम्स उपलब्ध आहेत. आमच्या वेळी कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, नवा व्यापार एवढेच गेम आम्हाला माहिती होते. त्यात पत्ते सगळ्यांच्या आवडीचे. खेळायला मेंबर्स जास्त असल्यामुळे बाकीच्या इतर खेळांपेक्षा पत्ते जास्त खेळले जात. मेंढीकोट, लॅडिज, झब्बू, बदाम सात किती प्रकार खेळायचो आम्ही.  दिवसा पत्ते, संध्याकाळी क्रिकेट किंवा समुद्र. समुद्रावर जायच म्हणजे भेळ खाल्लाशिवाय परत यायच नाही असा जणू नियमच होता. पुन्हा रात्री पत्ते.. खेळताना भांडणं ,पत्ते फेकणं, रडारड हे सगळ अनेकदा घडायच. मग घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती या भांडणांमुळे वैतागून खेळ बंद करायची. मग कॅरम किंवा बाकीचे डाव मांडले जायचे.

    आमच मुळ घर देवगडला त्यामुळे आईच्या शाळेला सुट्टी लागली की आम्ही तिकडे जायचो. तिकडे  गेल्यावर  नुसती धमाल असायची. सकाळी निरशा दुधाचा चहा घेऊन आजीबरोबर रतांबे(कोकम) किंवा काजू गोळा करायला जायच. दुपारी बारा वाजता नैवेद्य झाला की हसत खेळत जेवणं व्हायची. जेवणात जवळपास रोजच आमरस असायचा. "पानात वाढलेल काही टाकायच नाही" हा नियम ठरलेला. या नियमामुळे मात्र मी एकदा रडत  रडत वांग्याची भाजी पाण्याबरोबर अक्षरशः गिळली होती. जेवणानंतर मग  झोपाळ्यावर  बसून गप्पा रंगायच्या. आठवड्यातून दोन दिवस आंबे घेऊन जाणारा ट्रक यायचा; मग दुपारी आंबा कॅनिंगच्या ठिकाणी कोणालातरी जबरदस्तीने(?) पाठवल जायच. बहुतेक वेळा यात मिच सापडायचे.
       घरी सतत कोणी ना कोणी येत असायच. मला वाटत, मी पुण्यात जेवढा चहा एका महिन्यात करते तेवढा चहा देवगडच्या घरी एका आठवड्याला करत असतील.  एखाद्या वेळी गावातल एखाद नमुना कॅरॅक्टर घरी येई  आणि आमची भरपूर करमणूक होत असे.

     संध्याकाळी  क्रिकेटपासून अगदी खांब-खांब पर्यंत अनेक खेळ खेळायचो . भांडण झाली की खेळ थांबायचा. मग थोड्या वेळाने अंताक्षरी रंगायची.  कधीकधी बाहेर फिरायला जायच आणि येताना  करवंद, जांभळ गोळा करुन घरी यायच. त्यातली निम्मी-अधिक  करवंद वाटेतच खावून संपलेली असायची.     

     दिवेलागणीच्या वेळी झोपाळ्यावर बसून शुभंकरोती, रामरक्षा, (लहान असताना तर पाढेही ) हा एक मोठा कार्यक्रम असे.  आठ साडेआठच्या दरम्यान रात्रीच जेवण झाल्यावर पुन्हा अंगणात बसून गप्पा रंगत. मी आणि माझी आत्ये बहीण तर अंथरुणावर पडल्यावरही खूप वेळ गप्पा मारत बसयचो. अर्थात यावरुन कित्येकदा बोलणी खाल्ली आहेत. अशा  लिहिण्यासारख्या खूप आठवणी  आहेत.
 
   आता प्रत्येकजण आपाआपल्या व्यापात अडकल आहे . लहानपणी भांडणं सोडवताना मावशी म्हणायची, "आत्ता एवढ भांडताय, पुढे लग्न झाल्यावर एकमेकांना भेटायची दूरच पण बघायची इच्छा झाली तरी ते ही शक्य होणार नाही." खरच आज असच घडतय. सगळ्यांनी एकत्र जमण्यासाठी ठरवून प्लॅनिंग कराव लागतय. अस वाटत जसजस आपण मोठं होत जातो तसतस #सहज सोप  अस काही घडतच नाही आयुष्यात.

©मानसी जोशी

Tuesday, 3 April 2018

Men will be men

काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकातल्या एका दुकानात गेले होते. दुकानात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे माझं पुस्तक मिळायला मला वेळ लागणार होता. मी जरा बाजूलाच थांबले. तिथे एका दुकानासमोर काही वाहने उलट सुलट पार्क केलेली होती. बाजूच्या दुकानातून एक "सुंदरा" बाहेर पडली आणि त्या अस्ताव्यस्त पार्किंगमधून स्वतःची ॲक्टिवा बाहेर काढायचा आटोकाट प्रयत्न करु लागली. समोरच चार/पाच कॉलेजकुमार उभे होते. त्यातला  एकजण तिला मदत करायला पुढे सरसावला आणि तिला तिची गाडी पार्किंगमधून बाहेर काढून दिली. सुंदरा गोड हसून "थॅंक्स" म्हणाली.
   "बास! याचसाठी केला होता सगळा अट्टाहास", असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले.
    तो तिच्या गोड हसण्याकडे बघत कसबसं  "ओह! दॅट्स फाईन मेंशन नॉट प्लीज”.. म्हणेपर्यंत ती निघूनही गेली होती. तो मात्र ती दिसेनाशी होइपर्यंत तिच्याकडे बघत राहिला.
     थोड्या वेळाने तिथे एक मुलगा आला. या मुलीची गाडी पार्किंगमधून काढताना त्याच्या पल्सरचा बळी गेला होता. त्याची पल्सर अनेक गाड्यांचा चक्रव्यूहामध्ये अडकली होती. इथे प्रचंड उलथापालथ झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं. शेवटी पाच मिनिटं अथक परिश्रम करुन त्याने त्याची पल्सर बाहेर काढली. त्या चार/पाच मुलांचा ग्रूप तिथेच मजा बघत उभा होता पण  बिचाऱ्याच्या मदतीला कोणीही आलं नाही.
 "स्त्री ही स्त्री ची शत्रू असते" हे  ऐकलं होतं पण 'पुरुष हा पुरुषाचा शत्रू असतो', हे त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवलं. 😂😝

     काही महिन्यांपूर्वी एका कामानिमित्त कोथरूडला गेले होते. परत येताना कॉलेजमधला एक मित्र भेटला. जुन्या आठवणी निघाल्या. बोलता बोलता म्हणाला, "इथे उन्हात उभं राहून बोलण्यापेक्षा कॉफी घेऊया का?" 
     मलाही वेळ होता म्हणून समोरच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलो.  मस्त कॉफी आणि सॅण्डविच घेऊन झाल्यावर वेटरने बिल आणून दिल. मी पर्समधून पैसे काढणार इतक्यात त्याने पटकन बिल दिलं आणि  म्हणाला, “अग काय तू ? हे कॉलेज कॅंटिन नव्हे TTMM  करायला." मी हसून लगेच पर्स बंद केली. स्त्री दाक्षिण्य का काय म्हणतात ते हेच असावं बहुदा.

   काही दिवसांपूर्वी लेकीने मला सांगितल, "आई काल ना बसमध्ये माझ वरुणशी भांडण झाल. मी त्याच्याशी बोलत नव्हते तर कालपासून तो मला २० वेळा सॉरी म्हणाला. खरंतर मी त्याला कालच माफ केल होतं, पण तो कितीवेळा सॉरी म्हणतो ते बघायचं होतं मला." यावर काय बोलावं तेच कळत नव्हतं मला.
    लेकीने सांगितलेला दुसरा किस्सा ऐकल्यावर मात्र आपली लेक आता मोठी होतेय याची जाणीव झाली. त्या दिवशी घरी आल्यावर म्हणाली, "आई बॉइज काय एवढे पण वाईट नसतात जेवढे मला वाटत होते. आज माझा इरेझर मिळत नव्हता तर माझ्या बेंच पार्टनरने त्याच्याजवळचा extra इरेझर  मला दिला. पुढची गम्मत म्हणजे नंतर मला माझा इरेझर मिळाला म्हणून मी त्याचा इरेजर त्याला परत दिला. नंतर  मागच्या बेंचवरच्या मुलाने त्याच्याकडे इरेझर मागीतला. पण त्याने त्याला नाही दिला  इरेजर आणि सांगितलं, 'आपल्या वस्तू आपण घेऊन यायच्या."

   मनात आलं काल परवापर्यंत मुलींशी शत्रू असल्याच्या थाटात वावरणारे,  मुलींशी भांडणारे मुलगे मुलींना कधी फेवर करु लागतात ते त्यांचं त्यांना पण कळत नसेल.

    मध्यंतरी एका टिव्ही शो मध्ये एक वाक्य ऐकलं होतं, "पुरुषप्रधान संस्कृती म्हणता म्हणता पुरुष प्रधानच बनून राहिले आणि स्त्रीया मात्र राण्या बनून राज्य करु लागल्या." हे वाक्य पटलं नाही पटलं हा मुद्दा वेगळा. पण ज्या पद्धतीने प्रधान आणि राणीचा संदर्भ जोडला ते बघता हे वाक्य मला खूप आवडलं. 

©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...