Monday, 17 January 2022

आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचा वर्धापन दिन

"नमस्कार! आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे." माझ्यासारख्या कित्येकांची सकाळ या वाक्याने किंवा "अरुण उगवला, प्रभात झाली….." अशा एखाद्या भूपाळीने झाली असेल. 

जगभरातील घडामोडी असोत किंवा क्रिकेट कॉमेंट्री, सुरेल गाणी, नाट्यवाचन, कथाकथन, रेसिपीज असे मनोरंजनाचे अनेक पर्याय त्या काळात आकाशवाणीने उपलब्ध करून दिले होते. भारतातील जवळपास सर्व भागात आकाशवाणीचे केंद्र सुरू झालं होतं. 


आजही मी आकाशवाणीवरचा एखादा कार्यक्रम ऐकला की, मला माझं बालपण आठवतं. घरात जवळपास साडेसहा पासून रेडिओ लावलेला असायचा. बहुदा उठून आवरून झालं की रेडिओ लावायचा हा अधोरेखित नियमच होता त्याकाळी. कोकणातले थंडीचे दिवस, चुलीवरच्या हांड्यावर आंघोळीचं पाणी तापत असायचं. स्वयंपाकघरात आई पोळ्या भाजत असायची. पाखरांची किलबिल ऐकू यायची अशा वातावरणात, लवकर उठायची इच्छा व्हायची पण, "मनात हाय निस्त, पण बॉडी नाय म्हणते", अशी अवस्था असायची. 


अशातच, "नमस्कार! आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. "सकाळचे ७ वाजून ५ मिनिटं झाली आहेत…" असा मंजुळ आवाज कानावर पडायचा आणि लागोपाठ, "उठा आता सात वाचून गेले", असा खर्जातला आवाजही कानावर आदळायचा. 


कार्यक्रमांची रूपरेखा, बातम्या, सूर मनी रंगती, नभोवाणी, असे कित्येक कार्यक्रम त्यावेळी लोकप्रिय होते. घरात टीव्ही होता, पण सकाळच टीव्ही लावून बसण्याची पद्धत मात्र नव्हती. अपवाद फक्त 'रंगोली' या कार्यक्रमाचा. दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा अँटेना सेट करणं हा एक मोठा कार्यक्रम अधूनमधून केला जात असे.


आकाशवाणीवरच्या बातम्या मात्र लोकांच्या विशेष जिव्हाळ्याच्या होत्या. ब्रेकिंग न्यूज म्हणून बेंबीच्या देठापासून केलेला आरडाओरडा नाही की कर्णकर्कश्य म्युझिक नाही. अतिशय शांतपणे बातम्या सांगितल्या जात. मुळात कुठल्यातरी गल्लीच्या कोपऱ्यावर घडलेल्या थातुरमातुर वादाला, ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेझेंट करण्याइतका वेळच नसायचा. त्यामुळे केवळ महत्वाच्या बातम्या दिल्या जायच्या. 


मला आठवतंय १९९६ साली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच रंगात आली होती आणि अचानक टीव्ही दिसायचा बंद झाला, बहुदा नेहमीप्रमाणे अँटेना हलला होता. रात्रीची वेळ असल्याने अँटेना ऍडजस्ट करणं शक्य नव्हतं त्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. पण अशावेळी कामी आला तो रेडीओ! रेडिओवर मॅच ऐकायला मजा आली होती.


महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत सर्वदूर पसरलेली आकाशवाणी आजच्या इंटरनेटच्या जगात काहीशी दुर्लक्षित झाली असली, तरी ज्यांनी रेडिओचा काळ अनुभवला आहे त्यांच्या आयुष्यात आकाशावाणीशी निगडित काही ना काही आठवणी नक्की असणार.


लॉ कॉलेजला असताना जवळपास पाऊण महिना आकाशवाणीच्या रत्नागिरी कार्यालयात ट्रेनिंगला जात होते. त्यामुळे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र अगदी जवळून अनुभवले आहे. त्यावेळी, "नमस्कार! आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे", हे वाक्य म्हणताना 'लै भारी' वाटलं होतं. 


हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे आज आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचा वर्धापनदिन असतो. १८ जानेवारी १९७६ रोजी म्हणजे तब्बल ४६ वर्षांपूर्वी आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र सुरू झालं होतं. पुढेही अगदी केबलच्या आगमनपर्यंत घराघरात रेडिओ मोठ्या प्रमाणावर ऐकला जात असे. आता रेडीओ ऐकणं ही खूप दुर्मिळ गोष्ट झाली असली तरी तेव्हा तो आयुष्याचा एक आमूलाग्र भाग होता. 


- मानसी जोशी






Tuesday, 3 September 2019

कथा - सँडविच

"विसर्जनाचा पाट विहिरीतल्या पाण्यावर तरंगू लागला आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. अवघ्या दीड दिवसांसाठीच येतो घरात, पण जाताना मात्र रडवून जातो. आता घरात जाऊन सामानाची बांधाबांध करायची आणि निघायचं. मनातल्या मनात ऋषीने उसासा टाकला.
"ऋषी, अगदी आजच निघायला हवं का?" आईने काकुळतीला येऊन विचारलं.
"हो आई. आजची रजाच कशीबशी मिळवली. सध्या ऑफिसमधलं वातावरण ठीक नाही. अचानक कोणालाही काढून टाकतात. अशा परिस्थितीत मी रिस्क नाही घेऊ शकत." ऋषी.
तू येतानाच ठरवून आलायस सगळं, तर काय बोलणार मी? यावर्षी निदान गौरीपर्यंततरी थांबशील असं वाटलं होतं. सणावाराला नको वाटतं एकट्यानेच राहणं. एकट्यानेच करायचं आणि एकट्यानेच खायचं. असो." आई.
"तू स्वतःच्या मर्जीने करतेयस हे सगळं आई. बाबा गेल्यानंतर मी तुला सांगितलं होतं आता आमच्या फ्लॅटवर आणूया गणपती. पण तुला काहीच मान्य नाही." ऋषी.
"वृंदाला काय हरकत आहे ८ दिवस यायला? कुळाचार तिनेच करायला हवेत आता." आई.
"ती कुठे नाही म्हणतेय आई. ती तर सगळं करायला आनंदाने तयार आहे. पण तिची बँकेतली नोकरी आठ दिवस रजा कुठून मिळणार?" ऋषी.
"का? तुम्ही फिरायला जाता तेव्हा मिळतेच की तिला रजा. घरच्या सणावारालाच बरी मिळत नाही. मंदासुद्धा नोकरी करत होती, तरी भावजी आणि मंदा, रोहन अगदी वर्षाचा असतानपासून येतच होते की प्रत्येक सणाला. तेव्हा अगदी प्रत्येक सण म्हणजे सोहळा असायचा. तू, रोहन आणि पूर्वा किती धमाल करायचात." आई.
"मंदा काकूची शाळेतली शिक्षिकेची नोकरी होती. तिला भरपूर सुट्ट्या मिळायच्या. वृंदाची परदेशी बँकेतली नोकरी. त्यात तिची मॅनेजरची पोस्ट. रजा अशी सहजासहजी नाही मिळू शकत. आणि आम्ही फिरायला जातो तेव्हा सुट्ट्या, मुलांच्या परीक्षा, क्लास सगळं मॅनेज करून प्लॅनिंग करतो आणि मगच जातो. सणवार काय हे सगळं मॅनेज करून येतात का?"ऋषी.
"अगदी बायकोचाच झालास रे. तिच्याबद्दल जरा म्हणून बोललेलं खपत नाही. अगदी लगेच बाजू सावरून घेतोस तिची. कधीतरी आईचाही विचार केलास तर बरं वाटलं मला." आई.
"तुझा विचार करतो म्हणूनच तर एवढी ओढाताण करून दीड दिवसांसाठी तरी येतो ना? आजपर्यंत नेहमी वृंदालाच बोलत आलो. तुला कधी काही बोललो नाही. पण आज अगदी राहवत नाहीये म्हणून बोलतो, प्रत्येकवेळी तू तुझा हेका चालवत आलीस. परिस्थितीशी जुळवून घेणं जमतंच नाही तुला कधी. तेव्हाही तुझं काकूशी कुठे पटायचं? मंदा काकूच जुळवून घाययची तुझ्याशी. वृंदा आधी येतंच होती की सणावाराला. पण तुला मात्र घरातली तुझी सत्ता सोडायची नव्हती. त्यामुळे सगळं तुझ्या मर्जीप्रमाणेच व्हावं हा तुझा अट्टाहास. तिने केलेलं तुला कधी पटायचं नाही. सतत तिच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायचीस. काकूच्या बाबतीतही असंच कारायचीस. पण वृंदा म्हणजे काकू नाही. ती आजच्या काळातली आहे. ती कसं जुळवून घेईल प्रत्येकवेळी? मान्य आहे ती तुझ्यातकी सुगरण नसेल, अग पण मुळात ही तुलना करणंच चुकीचं नाही का? तुझ्याहून निम्म्या वयाची मुलगी सगळंच उत्तम कसं करू शकेल? पूर्वा ताईला तरी कुठे येत होतं सगळं?" ऋषी.
"पूर्वा सगळे कुळाचार करते हो घरातले. सासूचा काहीही उपयोग नाही तिला. उलट तिचं सगळं करून पूर्वा सगळं करते घरातलं. तरी कधी तक्रार नाही करत ती." आई.
"सासूची मदत नाही, तशी तक्रारही नाही पूर्वा ताईबद्दल. आज तिची सासू आजारी आहे म्हणून सगळं एकट्या ताईवर पडतंय. पण ताईचं लग्न झालं तेव्हा काय येत होतं ग ताईला? सगळं तिच्या सासुनेच तिला शिकवलं ना? सोहम आणि सईसुद्धा दरवर्षी म्हणतात आपण आपल्या घरी, इथेच गणपती आणूया. त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घरचे गणपती बघून त्यांनाही वाटतं आपल्याकडे पण गणपती आणावा. शेवटी मुलांनाच जास्त हौस असते." ऋषी.
"तुझ्या मुलांची हौस इथे येऊनही पूर्ण होऊ शकते की. पण तुझ्या बायकोला ते मान्य नाही. तसंही तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तू काय माझ्यावरच दोषारोप करणार. ही आपली मूळ वास्तू आहे. सगळे कुळाचार इथेच झाले पाहिजेत. अरे गाडगीळांचा रवी दरवर्षी येतो गणपतीला चांगली आठ दिवस रजा घेतो.  वर्षानुवर्षे घर बंद आहे त्यांचं. तरीही सगळं कुटुंब येऊन झाडलोट करून गणपती बसवतं दरवर्षी. त्याची बायकोही नोकरी करते. मुलांच्या शाळा असतात. पण इथे यायचा नेम काही चुकत नाही त्याचा. " आई.
"आई अग प्रत्येकाची परिस्थिती, विचारसरणी वेगळी असते. मंदा काकू नाही का रोहनकडे अमेरिकेला जाऊन राहिली. तू का नाही आलीस आमच्याकडे राहायला? सोहम सईच्यावेळीही पहिलं बाळंतपण माहेरी करतात सांगून सगळी जबाबदारी झटकलीस. मी असं म्हणतंच नाहीये सगळं तुझंच चुकतंय. पण आत्ता परिस्थितीच अशी आहे की जे आहे तसं चालू ठेवणं किंवा कोणीतरी परिस्थितीशी जुळवून घेणं. यापैकी एक काहीतरी करावं लागणार आहे. नेहमी म्हणतेस, 'तुला सुनेच्या घरी राहायचं नाही', अग पण ते घर तुझ्या मुलाचं पण आहेच की. पण तुझं आपलं एकच, 'माझं घर माझी सत्ता'. तिकडे सत्ता गाजवायला वृंदा घरी तरी असते का? तरीही इतकी वर्षे ते घर ती तिच्या पद्धतीने सांभाळतेय.  सकाळी ८ वाजता जाते ती रात्री उशिरा परत येते. तू आलीस तर तिला आवडेलच. आम्ही चार जणांनी ऍडजस्ट करून इथे यायचं का तू एकटीने? प्रत्येक पिढीला 'जनरेशन गॅप' सहन करावीच लागते. बाकी सगळं जाऊदे, तुझ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन सणवार साजरे करणं महत्वाचं आहे का, या घरात एकट्याने सणवार करणं, हे तुझं तूच ठरव. मूळ घर आहे मान्य. मलाही वाटतं, पण काळानुसार बदलणं आवश्यक आहे. अगदी आपल्या शास्त्रांनाही हे मान्य आहे. म्हणूनच त्यांनी यासाठीही पर्याय सुचवले आहेत. पण, तू तुझा हट्ट सोडणार नाहीस. त्यामुळे आता जास्त चर्चा न केलेलीच बरी. दोन दिवस यायचं आणि निघताना मनात कटुता घेऊन जायचं असं नको व्हायला." ऋषी.
संध्याकाळी सदाच्या रिक्षेचा आवाज आल्यावर ऋषी देवाला नमस्कार करायला देवघरात गेला. देवघरातून बाहेर येऊन आजी आजोबा आणि बाबांच्या फोटोला नमस्कार करून आईजवळ आला. सदा एव्हाना ओटीवर येऊन बसला होता.
"काळजी घे आई. जमल्यास मी काय म्हणतोय त्याचा विचार कर", असं म्हणून ऋषी नमस्कारासाठी वाकला.
तेवढ्या वेळात डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसून घेत आईने ऋषीला आशीर्वाद दिला. 
"काळजी करू नकोस ऋषी, आम्ही आहोत सगळे. दोन तीन दिवसांतून माझी एक खेप असतेच इथे. चल निघुया आता गाडीची वेळ झालेय", असं म्हणत सदाने त्याची बॅग उचलली. 
रिक्षेत बसल्यावर पुन्हा एकदा त्याने घराकडे नजर टाकली आणि मनात म्हणाला, "गणपती बाप्पा निदान पुढच्या वर्षी तरी माझ्या घरी या. पुन्हा एकदा गोकुळात आल्यासारखं वाटेल. अगदी पूर्वीसारखं!" 

© मानसी जोशी 

Thursday, 25 July 2019

कथा: टू बी ऑर नॉट टू बी...

हॉस्पिटलच्या वेटिंग रूम मध्ये सायली उदास बसून होती. आज शुभमने तिची साथ द्यावी असं तिला खूप मनापासून वाटत होतं. अचानक तो येईल अशी पुसटशी अशाही तिच्या मनात होती. पण त्याचवेळी तसं होणार नाही याची खात्रीही तिला होती 
     तिला मूल नको होतं. त्यामुळे अबॉरशन करण्याचा तिचा निर्णय पक्का होता. वेटिंग रूममध्ये बाजूला बसलेल्या आणि एका स्त्रीने खरं तर मुलीने तिला विचारलं, “कितवा महिना?” तिला काहीच उत्तर न देता ती गप्प बसून राहिली.  
“माझा पाचवा महिना आहे. हे मूल हवंय मला. माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे ही. दोन महिन्यापूर्वीच ते अपघातामध्ये गेले.” 
सायलीला तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नव्हती. पण एकतर ती खूप लहान दिसत होती आणि त्यात नवरा गेलाय हे तिने सांगितल्यामुळे तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती. त्यामुळे मनात नसतानाही सायलीने तिला विचारलं, “तुम्ही एकट्याच आल्यात? तुमच्यासोबत अजून कोणी नाही आलं?”
“तुम्हीही एकट्याच आला आहात की”, ती बाई हसून म्हणाली. 
यावर सायली काहीच बोलली नाही.थोडावेळ शांततेत गेल्यावर ती बाई म्हणाली, “नवरा गेल्यावर सासरच्यांनी काही दिवस माहेरी पाठवलं. दोन्ही घरं तुझीच आहेत तू कुठेही रहा. सासू-सासरे,आई- वडील, भाऊ- वहिनी सगळी चांगली आहेत. पण या मुलाचा जन्म कोणालाच नकोय. मला माहिती आहे त्याचं कारण, काही दिवसांनी दुसरं लग्न करताना हे मूल त्यामध्ये अडसर ठरेल असं वाटतंय सगळ्यांना. 
“मग बरोबरच आहे त्यांचं. तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. त्यात अजून एका जीवाची जबाबदारी कशासाठी? आयुष्य इतकं सोपं नाही. इथे प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. आठवणींवर आयुष्य नाही जगता येत”, सायली.
“मी काही उच्चशिक्षित नाही. मला नोकरी नाही. आणि बाळाला जन्म द्यायचा तर अजून किमान वर्षभर तरी पैसे कमावण्यासाठी  काहीच करू शकत नाही मी. पण आपण खंबीर नाही यामध्ये त्या बाळाचा काय दोष? जन्माला येण्यापूर्वीच त्याचं अस्तित्व का संपवून टाकायचं? गावातल्या सरकारी दवाखान्यात रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या बायकांपासून ते आंधळ्या पांगळ्या बायकांपर्यंत सगळ्यांना बाळं झालेली बघितली आहेत मी. कमी का होईना पण शिक्षणाची शिदोरी आहे माझ्याजवळ. सुदैवाने देवाने मला अगदी धडधाकट शरीर दिलं आहे. मग सगळं असताना या बाळाची जबाबदारी नाकारणं निदान मला तरी पटत नाही.” आठवणींवर जगता येत नाही पण आठवणींशिवायही माणूस जगू शकत नाही.” ती 
“या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचायला छान वाटतात पण प्रत्यक्ष आयुष्यात निभावणं खूप कठीण आहे”, सायली.
“काय कठीण, काय सोपं, हे सगळं आपल्या मानण्यावर असतं. बारावी झाल्यावर लग्न झालं माझं. शिकायची इच्छा होती खूप, पण नाही जमलं. तेव्हा परिस्थितीमुळे मनाविरुद्ध लग्नाला तयार झाले. संसार करणं जमेल का? हा मोठा प्रश्न होता. तेव्हा आजीने सांगितलं होतं. कुठलीही गोष्ट मनापासून केली की  सगळं जमतं. सुदैवाने नवरा चांगला होता. त्यामुळे दोन वर्षात या संसारात कधी गुंतून गेले कळलंच नाही. माझ्या शिक्षणाच्या आवडीबद्दल त्याला सांगितल्यावर त्याच दिवशी कॉलेजच्या अॅडमिशनचा फॉर्म घेऊन आला. ज्या दिवशी ऍडमिशन घेतली त्याच दिवशी ही गोड बातमी मिळाली. पण तरीही तो मागे आला नाही. त्याही परिस्थितीत त्याने मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एके काळी नको असणाऱ्या नात्यानेही भरभरून सुख दिलं मला. त्या नात्याची शेवटची आठवण असणारं बाळ मी कसं नाकारू?” दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाल तर अवघे दोन महिने झाले माझा नवरा जाऊन इतक्या लवकर त्याला विसरून कोणा दुसऱ्याचा विचार कसा करू? पुढे काय होईल माहिती नाही पण जे नातं निर्माण होईल की नाही माहिती नाही त्यासाठी मी या बाळाशी निर्माण झालेल्या नात्याला का संपवू?” ती.
  सायली काही बोलणार एवढ्यात त्या बाईचा नंबर आला आणि ती निघून गेली. स्वतच्याही नकळत ती त्या बाईच्या बोलण्याचा विचार करायला लागली होती. तिला आठवलं, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर शुभम किती खुश झाला होता. पण तिच्यासाठी मुलाची जबाबदारी घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. बाळामुळे शुभमची नोकरी, त्याचं करिअर जसं आहे तसं चालू राहणार होतं. फरक पडणार होता तो तिच्या करिअरवर तिच्या आयुष्यावर. बस फक्त हे एवढंच कारण होतं ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचं. 
तिला आठवलं, "निव्वळ तिला नॉन-व्हेज आवडत नाही म्हणून व्हेजिटेरिअन झालेला शुभम,
तिच्यासाठी कित्येक पार्टीज कॅन्सल करणारा शुभम,
निव्वळ तिच्यासाठी न आवडणाऱ्या टिपिकल बॉलिवूड मुव्हीज बघणारा शुभम,
आज त्याच्या मनाचा विचार न करता मी हा निर्णय घेतेय. त्याला काय वाटत असेल? 
हा कसला विचार करतेय मी?  इमोशनल फुल असल्यासारखा विचार करून माझं करिअर पणाला लावतेय मी. यावर्षी प्रमोशन ड्यू आहे. माझी गेल्या पाच वर्षांची मेहनत आता कुठे फळाला येतेय. त्यात ही जबाबदारी? काय करू मी? उगाच बोलले त्या बाईशी खरंतर मुलीशी. तिला काय कळतंय करिअर म्हणजे काय? गेले पाच वर्षे मी या संधीची वाट बघतेय. यासाठी घेतलेली मेहनत तिला कुठे माहिती आहे?”
    सायली सुन्न झाली होती. काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. रिसेप्शनिस्टने तिचे नाव घेतलं. तिचा नंबर आला होता. ती चेकअप साठी केबिनमध्ये गेली. पण अबॉरशनबद्दल बोलायची किंवा विचारायची तिची हिम्मत झाली नाही. 
    डॉक्टरनी तिला तपासून टॅब्लेट्स आणि टेस्ट लिहून दिल्या व तिला इतर सूचना देऊन पुढची अपॉइंटमेंट दिली . सायली काहीही न बोलता यांत्रिकपणे वावरत होती. केबिनमधून बाहेर आल्यावर तिला स्वतःचाच राग येत होता. का बोलले नाही मी अबॉरशनबद्दल? मी बोलायला हवं होतं. हताश होऊन ती हॉस्पिटलमधून घरी जायला निघाली. 
    ती घरी आली. ती लॉक उघडणार तेवढ्यात शुभमने दार उघडलं. शुभमला घरी बघून तिला आश्चर्य वाटलं. ती आत येऊन सोफ्यावर बसली. तू गेला नाहीस ऑफिसला? तुझी महत्वाची मिटिंग होती ना आज?”
यावर उत्तर न देता शुभम म्हणाला, “झालं सगळं? केलंस तुझ्या मनासारखं? कधी करणार आहेस अबोर्शन? सगळं ठरवूनच आलीस का? अग काय वाटत होतं तुला, या बाळाच्या जन्मानंतर माझं आयुष्य सुरळीत चालू राहील? माझ्या करिअरवर त्याचा काहीच परीणाम होणार नाही?  अग 'यूएस'ला पाठवतेय कंपनी मला, एक वर्षासाठी. पण निव्वळ या बाळासाठी अजून होकार दिला नाही मी. तुझ्यासाठी नॉनव्हेज सोडण्यापासून हा फ्लॅट खरेदी करण्यापर्यंत सगळ्या अडजस्टमेंट्स केल्या तर तुला बाळाला सांभाळायला मदत नाही करणार? आयुष्य आपल्या दोघांचंही बदलणार. मी तयार होतो या बदलाला, अजूनही आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. थोडा विचार कर ग. अजून वेळ गेलेली नाहीये. नको करुस हे अबॉरशन. हे मूल हवंय ग मला. प्लिज फक्त एवढी गोष्ट ऐक माझी. पुन्हा कधीही काहीही मागणार नाही.”
 बोलता बोलता शुभमचे डोळे भरून आले होते. सायली अजूनही शांत होती. शुभम हतबल होऊन खाली बसला. काही क्षण तसेच शांततेत गेले.  
  "मला प्रमोशन हवंय पण त्यासाठी शुभमच्या भावनांचा आणि या बाळाचा बळी द्यावा लागेल. अचानक आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालंय. हा निर्णय कठीण असला तरी घ्यावा तर लागणारच आहे. पण इतक्या वर्षांच्या मेहनतीचं काय? प्रमोशन स्वीकारलं तर बाळ आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळू शकेन का मी? दोन्ही ठिकाणी न्याय देऊ शकेन का?  ही तारेवरची कसरत झेपेल का मला? अखेर विचार करून सायलीने तिचा निर्णय घेतला. 
  “शुभम, उद्या रजा घेशील प्लिज? डॉक्टरांनी काही टेस्ट्स आणि सोनोग्राफी करायला सांगितली आहे. आणि हो घराचं इंटेरिअर थोडं चेंज करूया. अरे हो महत्वाचं म्हणजे आत्ता तू बाहेर जाऊन या टॅब्लेट्स आणशील? विशेष नाही मल्टिव्हिटॅमिन आणि फॉलिक ऍसिडच्या टॅब्लेट्स आहेत आणि येताना बाळाचं एक सुंदर  पोस्टर घेऊन ये तुझ्या आवडीचं! आणि …..” 
“म्हणजे सायली तू …. आपण… आय मिन आपल्या …. ”
“मी आपल्या बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतलाय शुभम”, सायली.
सायली? म्हणजे? खरंच? आय लव्ह यु सायली, तू आयुष्यातलं खूप मोठं सुख दिलयस मला आज. आपण सेलिब्रेट करू हा क्षण. मी आधी बाहेर जाऊन टॅब्लेट्स घेऊन येतो आणि संध्याकाळी आपण पोस्टर आणू आपल्या दोघांच्या आवडीचं. तू रेस्ट घे. मी आलोच जाऊन”, असं म्हणून शुभम जायला निघाला. 
सायलीला आता खूप शांत वाटत होतं. मनातले सगळे संभ्रम दूर झाले होते. एका अनोळखी व्यक्तीशी झालेल्या त्या काही मिनिटांच्या संभाषणाने तिच्या विचारांना, आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती. "To be or not to be" च्या चक्रव्यूहातून तिची सुटका केली हाती.

©मानसी जोशी 

Tuesday, 9 July 2019

मावळतीचे रंग

"राघव,  हे काय? दिवा नाही लावलात अजून?"
"अगं, संध्याकाळ होऊन गेली ते लक्षातच नाही आलं."
"कशामध्ये रमला होतात एवढं? फेसबूक का मेसेंजर? रिटायर्ड झाल्यापासून सतत त्या मोबाईलला चिकटून असता. अहो एवढा वेळ तरुण पोरं पण त्या मोबाईलला चिकटून राहत नसतील."
"चालतं ग. तरुण वयात कुठे होते मोबाईल साधा लँडलाईनही फारसा वापरला नाही. जीव रमवतो आपला. आणि तू कुठे रमली होतीस आज? तुला पण उशीर झाला."
"अहो कट्ट्यावर त्या क्रिकेट मॅचवाल्या आजीबाईंची चर्चा रंगली होती त्यामुळे वेळेचं भान राहिलं नाही."
"अच्छा. पण काही म्हण रमा मानलं त्या बाईला. या वयातही किती उत्साह, अगदी एखाद्या लहान मुलांसारखी निरागस वाटत होती ती.
"हूं, तुम्हाला पण पडली का तिची भुरळ. कट्ट्यावरच्या सगळ्या बायकांचे नवरे फिदा आहेत तिच्यावर. 😏  काय ते पोरांसारखं पेपाटणं वाजवत होती. नाचत काय होती. उड्या काय मारत होती. ध्यान नुसतं."
"अगं किती चिडतेस? उलट मला कौतुक वाटतंय तिचं."
"करा तुम्हीपण त्या बयेचं कौतुक करा. काय नशीब असतं एकेकीचं म्हातारपणात पण चाहते मिळतात."
"आता या वयात काय मागणी घालणार आहे का मी तिला?"
"फेसबुकवर तरी नक्की शोधाल. मिळाली तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवाल. आणि तिने ती स्वीकारली तर बघायलाच नको. रोजच चॅटिंग चालू. अगदी कौतुकाचा वर्षाव कराल तिच्यावर."
"कौतुक तुझंही आहे रमा. अगदी या वयातही तू कट्ट्यावर जातेस, स्विमिंग, योगा, हास्यक्लब, समाजसेवा सगळं करतेस. ज्या गोष्टी तरुण वयात करायच्या राहून गेल्या त्या सगळ्या गोष्टी अगदी उत्साहाने करतेस."
"आता नको उगाच मस्का मारू. उगाच खोटं खोटं कौतुक."
"नाही ग. खोटं नाही अगदी मनापासून बोलतोय. आपला एकुलता एक मुलगा असा अचानक आपल्यातून निघून गेल्यावर मी तर कोसळलोच होतो. पण तू स्वतःसकट मला सावरलंस. आज आयुष्याच्या मावळतीच्या दिवसांत कसं जगायचं? या प्रश्नावर 'मुक्तपणे' असा तू काढलेला तोडगा अगदी संजीवनीसारखं काम करतोय. पण तुला अगदी मनापासून सांगतो, या मुक्तपणाला पोक्तपणा नकोय, थोडा निरागसतेचाही स्पर्श होऊदे. कुठल्याही वयात आपल्यातलं लहान मूल जपता यायला हवं, जसं त्या #मॅचवाल्या_आजींनी जपलंय. हे जमलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर लहान मुलांसारखी निरागसता जपली ना तर आयुष्य एकदम सोपं होऊन जातं."
"खरं आहे हो तुमचं. प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद मिळायला हवा. आपला एकुलता एक मुलगा देवाने आपल्यापासून हिरावून नेला. तो परत येणार नाही. पण एकाकी असलं तरी उरलं आयुष्य जगावं तर लागणारच आहे. मग ते रडत नाही तर हसत जगायला हवं."
दोघांच्याही डोळ्याच्या ओलावलेल्या कडा एकमेकांच्या नकळत पुसल्या जातात. हे दोघांच्याही लक्षात येतं.
राघव उठून देवासमोर दिवा लावतो. काही क्षण घरात शांततेत गेल्यावर, आता राघव भावुक होणार हे लक्षात येताच नेहमीप्रमाणे वातावरणाचा भार हलका करत रमा म्हणते, "पण तरीही तुम्ही कोणासमोरही त्या बयेचं कौतुक अजिबात करायचं नाही. 'माझा नवरा तिचा फॅन नाही', असं सांगून मला कट्ट्यावर मिरवता आलं पाहिजे.
रमाच्या या वाक्यावर दोघेही हसतात आणि अजून एक दुखरी संध्याकाळ हसत हसत मावळते.

©मानसी जोशी

Monday, 24 June 2019

स्कुल बस स्टॉपची अनोखी दुनिया

स्कुल बसचा स्टॉप ही जागा म्हणजे आई वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जणींच्या ओळखी तिथे होतात. सकाळच्या वेळेत तर इथली मजा अनुभवण्यासारखी असते. अनेकदा कित्येक दिवस आपण जिच्याशी बोलत असतो तिचं नावही माहिती नसतं. खरंतर त्याची गरजही नसते. अमुक अमूकची आई एवढी ओळख पुरेशी असते. पहाटे लवकर उठून लेकरांना आणि त्यांच्यासाठी डबा तयार करून बसची वेळ गाठण्यासाठी धावत पळत येणाऱ्या समस्त आयांचा थकवा बस स्टॉपवरच्या एखादया गॉसिपनेही कुठल्या कुठे पळून जातो..
    एरवी अगदी टापटीप आवरल्याशिवाय सोसायटीच्या गेटपर्यंतही न जाणाऱ्या, बस स्टॉपवर जायला निघताना मात्र ड्रेसला लागलेलं पोळीचं पीठ झाडत केसांवरून कंगवा नाही हात फिरवून केस सारखे करत बस स्टॉप गाठतात.
     मुलं गेली की, "जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी" अशा थाटात मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या; शाळा, सोसायटी, क्लास, सासू, नणंद, जाऊ अशा अनेक जिव्हाळ्याच्या विषयावर गॉसिप करत अर्धा एक तास स्टॉपवरच उभ्या राहणाऱ्या; ऑफिस आहे म्हणत निव्वळ गॉसिप ऐकण्यासाठी दोन मिनिटं थांबून नाईलाजाने निघून जाणाऱ्या अशा  विविध वैशिष्ट्यपूर्ण जमाती या स्टॉपवर पहायला मिळतील.
   तसंच नाईलाजाने जीवावर उदार होऊन,अर्धवट झोपेतून उठून आलेले, प्रत्येक येणाऱ्या बसकडे आशेने बघणारे, मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभं राहणारे (हे करताना हळूच एखादा चोरटा कटाक्ष एखाद्या देखण्या चेहऱ्याकडे टाकणारे), अशा प्रजातीही इथे पहायला मिळतात.
    प्रत्येक बसची वेळ ठरलेली असते, इतकंच काय त्या येण्याचा सिक्वेन्सही माहिती झालेला असतो. छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मोठ मोठ्या गाड्या चालवणाऱ्या  स्कुल बस ड्रायव्हर्सचं मला प्रचंड कौतुक वाटतं.
   एरवी सुट्टीत यातल्या कोणाशी फारसा संबंध येत नाही. क्वचित रस्त्यात दिसल्यावर दुरूनच एक 'स्माईल' फेकलं जातं. पण शाळा सुरू झाल्यावर आयुष्य पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटतं. मे मध्ये शांत असणाऱ्या रस्त्यावर पुन्हा रहदारी वाढते. कधी कधी सगळ्या गाड्या एकाच वेळी येतात आणि गोंधळ होतो. मुलं मात्र ही धमाल एन्जॉय करत असतात.
      गप्पात रंगलेल्या आया बघून दगड, पानं, फुलं गोळा करणारी, मस्ती करणारी आणि मधूनच एखादा दणका खाणारी मुलं बघितली की रस्त्यावरचं हरवलेलं चैतन्य परत आल्यासारखं वाटतं. कधी कधी मुलांचं नाव माहिती नसतं पण त्याची बस मात्र माहिती असते. कधी आरामात चालत येणाऱ्या एखादया मुलाची बस येताना दिसली की पालक ड्रायव्हरला थांबायला सांगतात तर मुलं इतक्या मोठ्या आवाजात त्याला/ तिला हाका मारतात की, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये झोपलेली लोकं खडबडून जागी होत असतील. अशी ही स्कुल बस स्टॉपची #एक_वेगळीच_दुनिया आणि इथली एक #वेगळीच_दुनियादारी!

Tuesday, 18 June 2019

अंकांमधील बदल कितपत योग्य ?

महाराष्ट्रात दर १४ मैलावर भाषा बदलते असं म्हणतात. एकच मराठी भाषा पण त्यामध्ये एकूण ५२ प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात. पण यामध्ये गमतीचा भाग म्हणजे प्रत्येक बोलीभाषेत  #मराठी_आकडे मात्र सारखेच आहेत. (उच्चाराचा फरक असूच शकतो कारण उच्चारांवर बोली भाषेचं प्रभुत्व असतं).
    तर मुद्दा तोच जो गेले ४/५ दिवस सोशल मीडियावर गाजतोय.
दहा दोन, पन्नास सहा, दहा सात….. ( लक्षात आलं असेलच)
    हा बदल करण्यामागे जी काही स्पष्टीकरणं देण्यात येत आहेत ती अजिबात म्हणजे अजिबातच पटणारी नाहीत.
स्पष्टीकरण क्र. १
जोडाक्षरे: हे अतिशय हास्यास्पद स्पष्टीकरण आहे.  
इतकी वर्षे मुलं शिकत आली आहेत, हा मुद्दा तर आहेच, पण जाऊदे हा मुद्दा बाजूला ठेवूया उगाच 'भूतकाळावर बोलू काही… ' असं नको.
आमच्या महाराष्ट्रात आम्ही मुलांना लहानपणी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे सर्व किंवा यातलं काही ना काही शिकवत असतो. त्यामुळे आकड्यांची जोडाक्षरे उच्चारताना त्यांना कठीण वाटण्याचा संबंधच नाही.
बरं धरून चालू नाही शिकवत आम्ही यातलं काहीच. पण शाळेत जन-गण-मन आणि प्रतिज्ञा तरी मुलं म्हणत असतीलच ना?
जोडाक्षरांच्या उच्चारामुळे मुलांचे उच्चार अधिक स्पष्ट होतात, हे तर सिद्ध झालं आहे.
बरं या सगळ्या अवांतर गोष्टी जाऊदेत.
  सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये 'फॉनिक्स' नावाचा प्रकार अनेक शाळांमध्ये शिकवला जातो. अगदी मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही पहिलीपासून इंग्रजी शिकवले जात असल्यामुळे अनेक शाळांमध्ये हा प्रकार शिकवला जातो.
    'फॉनिक्स'मध्ये इंग्रजी अल्फाबेट्सचा उच्चार कसा करायचा हे शिकवतात.  सुरवातच A says 'अॅ' …. 'E says ए'....G says 'ग'…. या पद्धतीने उच्चार शिकवले जातात.  पण यामध्ये मुलांचं #confusion होत नाही. इतकंच काय तर मुलांना 'फॉनिक्स' हा शब्द उच्चारणे सत्तेचाळीस, त्रेपन्न, नव्वद अशा शब्दांपेक्षा सोपा वाटत असेल नाही?
  बरं ते फॉनिक्स बाजूला ठेवू. पण इतर इंग्लिश आकडे तरी पहिलीपासून शिकवत असतील? मग Three, six, Twelve, Thirteen…. हे सगळे उच्चार सोपे आहेत आणि ही जोडाक्षरे नाहीत हे मला नव्यानेच कळलं.
बरं उच्चारही बाजूला ठेवूया. मुलांना जोडाक्षरे लिहिणं कठीण जातं, हा मुद्दा धरला तर अनेक मुलांना त्यांचं नाव, वडिलांचं नाव, आण्णाव, घर/ गाव/ तालुका/ जिल्हा/ क्वचितप्रसंगी शाळेचं नावही लिहिणं कठीण होत असेल, तर ते ही बदलायचं का? (मी इथे आपल्या राज्याच्या नावविषयी काहीही लिहीत नाही. उगाच बदललं जाण्याची भीती ओ दुसरं काही नाही.)
 आमच्या इथल्या भाजी मंडईत शाळेत न जाणारी, जेमतेम ५ वी/ ६वी शिकलेली असतील/ नसतील, अशी मुलं भाजी विकायला बसलेली असतात. ती मुलं ज्या पद्धतीने हिशोब करतात त्याचं खूप कौतुक वाटतं मला. अगदी कमी शिकूनही मराठी आकडे उच्चारणे, हिशोब करणं त्यांना कठीण वाटत नाही. असो.

स्पष्टीकरण २:
संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा संदर्भ
हे स्पष्टीकरण अतिशय कीव आणणारं आहे. प्रत्येक भाषा वेगळी असते. त्यामुळे एका भाषेची तुलना दुसऱ्या भाषेशी करण्याची गरजच काय? कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली तरी तिला भाषा बदलण्याचा अधिकार अजिबात नाही.
     "संस्कृत ही मराठीची जननी आहे." १००% मान्य! पण मुलीने आईसारखेच असले पाहिजे हा अट्टाहास चुकीचा नाही का? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये वेगळी असतात. तशीच प्रत्येक भाषा व तिची रचना, तिची वैशिष्ट्ये ही वेगळीच असतात. त्यामुळे या स्पष्टीकरणाला तर अजिबात अर्थ नाही.

आता प्रॅक्टिकल मुद्दा - खरंतर मुलांना दुसरीत नाही तर खूप लहान वयातच आकडे शिकवले जातात. अगदी सिनिअर केजी किंवा मोठ्या गटात फारफार तर पहिलीत शंभर पर्यंतचे आकडे शिकवले जातात.  मग मुलांना गेली २/३ वर्ष जे शिकलात ते चुकीचं होतं, असं सांगायचं का? यामुळे मुलांचा गोंधळ उडणार नाही?
या साऱ्यांमुळे किती गोंधळ होणार आहे याचा विचार शिक्षणमंडळाने केला नाही की त्यांना तो करायचा नाहीये?

तळटीप: मी कोणीही भाषा अभ्यासक नाही. पण भाषा बदलण्याचा अधिकार कोणालाच नसतो. हा बदल हा मराठी भाषेचा अपमान तर आहेच. पण त्या पेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल एकूणच शिक्षण पद्धतीला धोकादायक आहे, म्हणून हा पोस्टप्रपंच!

©मानसी जोशी

Monday, 3 June 2019

मिस यु युवराज..

तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं…!!!
२००० साली अंडर १९ क्रिकेट टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपचा #प्लेअर_ऑफ_द_सिरीज होता #युवराज_सिंग.
२००७ साली T20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपनंतर २००८ साली एका भारतीय खेळाडूला आयसीसी अवॉर्डस मध्ये #टी_२०_इंटरनॅशनल_प्लेअर_ऑफ_द_इअर  पुरस्काराने गौरविण्यात आले, तो प्लेअर म्हणजे युवराज सिंग.
२०११ साली भारतीय क्रिकेट जगतात वानखेडे स्टेडिअमवर माहिच्या टीमने इतिहास घडविला. भारताने वर्ल्ड कप तर जिंकलाच शिवाय #मॅन_ऑफ_द_सिरीज चा किताबही भारतीय खेळाडूला मिळाला, तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग!
त्यानंतर त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण म्हणतात ना दुर्धर इच्छाशक्ती आणि आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न जाच्याजवळ असतील तो नियतीलाही हरवू शकतो. आणि झालंही तसंच, कॅन्सरवर मात करून युवराज परत आला आणि त्याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये पुनरागमन केले.
   कॅन्सरचं निदान होईपर्यंतचा काळ, ते निदान झाल्यानंतरचा आणि उपचारादरम्यानचा काळ युवराजसाठी सोपा नव्हता. त्याची खालावत जाणारी तब्बेत आणि ठासळत जाणारी मनस्थिती त्याला निराशेच्या खोल गर्तेत ढकलत होती. पण या निराशेवर मात करून त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. युवराजच्या #द_टेस्ट_ऑफ_माय_लाईफ या पुस्तकात युवराजने त्याचं बालपण, क्रिकेट करिअर, कॅन्सरची सुरुवात झाल्यापासून बरं होऊन पुन्हा मैदानात खेळायला उतरेपर्यंतचं संपूर्ण वर्णन केले आहे. कॅन्सरच्या आजारादरम्यान त्याची बदलत जाणारी मनस्थिती आणि क्रिकेटपासून सुरू होऊन क्रिकेटपर्यंतच येऊन थांबणार प्रश्न  वाचून गहिवरून जायला होतं.
  "Whatever happens tomorrow I just want God above to give us the 'World Cup'. He can take whatever he wants, take away my life, giving me pain…..God, just give me World Cup."
फायनल मॅचच्या आदल्या दिवशी रात्री गोळ्या द्यायला आलेल्या  संघाच्या डॉक्टरांशी युवराज भावूक होऊन बोलत होता. युवराजच्या आजाराच्या लक्षणाची सुरुवात २०११ च्या वर्ल्ड कपच्या आधीच झाली होती. संघाच्या डॉक्टरांनी त्याला चेक अप करुन घ्यायचा सल्लाही दिला होता. परंतु त्याने तो गांभीर्याने घेतला नाही. मॅचदरम्यान खेळताना त्याला होणारा त्रास त्याने निव्वळ वर्ल्ड कप जिंकायच्या इच्छाशक्तीच्या जोरावर सहन केला होता.
 युवराज केवळ चांगला खेळाडू नव्हे तर तो एक चांगली व्यक्तीही आहे. म्हणूनच स्वतः बरं झाल्यानंतर कॅन्सर पेशंट्सच्या मदतीसाठी  #You_can नावाची संस्था सुरू केली आहे.
 पण या साऱ्यानंतर २०१५ सालच्या वर्ल्ड कपमधून युवराजला वगळण्याची न्यूज आली आणि धक्का बसला. आधीच्या वर्ल्ड कपचा हिरो वर्ल्ड कप खेळणार नाही हेच मनाला पटत नव्हतं. त्याची निवड न होण्यामागची कारणे काहीही असुदेत पण प्रत्येक वेळी युवराज हवा होता हेच वाटत होतं.
 या वर्ल्ड कपमध्येही युवराज नसणार हे माहिती होतं, तरीही एक वेडी आशा होती. पण …
   कितीही नाकारलं तरी यापुढच्या कुठल्याच वर्ल्ड कपमध्ये युवराज खेळणार नाही हेच खरं आहे.  
   वर्ल्ड कप सुरू होऊन आठवडा होत आला. उद्या भारताची वर्ल्ड कपमधली पहिली मॅच आहे. पण मनात सतत एकच विचार येतोय ….  #Miss_you_Yuvaraj

© मानसी जोशी
फोटो: गुगलावरून साभार


Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...