काल लेकीने सांगितले आई आम्ही शाळा सुटल्यावर स्कूलबसमध्ये छोटीशी पार्टी करणार आहोत. उद्या मला टिफिनबरोबर रव्याचा केक पण देशील प्लीज. आता असं लाडात येउन लेकीने काही विचारलं की मग नाही म्हणता येत नाही. सकाळच्या डब्याच्या गडबडीत अजून एक काम वाढलं. पण काही इलाज नव्हता. झोपताना जरा पाच मिनिटे आधीचा गजर लावून झोपले. दुसऱ्या दिवशी सगळं रुटिनप्रमाणे चालू होतं. सकाळच्या घाईच्या वेळी शक्यतो 'किती वाजले?' हा मुद्दा सोडला तर विशेष काही बोलतच नाही आम्ही मायलेकी. आज मात्र अचानक लेकीने विचारलं, "आई कसं काय मॅनेज करतेस ग तू सगळं? गॅसवर एकाच वेळी दूध तापतय, भाजी पण शिजतेय आणि पोळ्या पण करतेयस. दुसरीकडे मायक्रोवेव्हमध्ये केकपण ठेवला आहेस. आणि हे सगळं करताना कुठेही चूकत नाहीस तू. ना दूध उतू जातं, ना भाजी बिघडते आणि पोळीही करपत नाही. हे मल्टिटास्किंग कसं जमतं ग तुला? मला कधी जमेल का ग एवढं सगळं करायला?" आता गडबडीच्या वेळी हिच्याशी बोलत बसले तर उशीर झालाच समजायचा. म्हणून मी जास्त काहीही न बोलता तिला सांगितलं, "काही विशेष नाही ग, ' Its just a matter of practice” हे ऐकून मात्र ती गोड हसली आणि आवरायला गेली. मी ही सुटकेचा निश्वास टाकला. बाकी काही सांगितल असतं तर तिला कदाचित पटलं नसतं पण या एका वाक्याने तिच्या सगळ्या शंका दूर केल्या. याचं कारण म्हणजे गेल्यावर्षीच्या इंग्लिशच्या पुस्तकात तिला, Its just a matter of practice या नावाचा चिनी लोककथेवर आधारीत एक धडा होता.
अगदी साधी आणि छोटी गोष्ट होती ती. एका रस्त्यावर एक प्रसिद्ध आर्चर(धनुर्धारी) त्याच्या कलेचा शो करुन लोकांची वाहवा मिळवत असतो. तेवढ्यात तिथून जाणारा एक सामान्य तेलविक्रेता त्याला म्हणतो, "यात अभिमान वाटण्यासारखं काय आहे? Its just a matter of practice…" हे ऐकून त्या आर्चरचा इगो दुखावला जातो. तिथे जमलेली लोकंही त्या तेलविक्रेत्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. तेव्हा तो तेलविक्रेता सांगतो, "यात मी वेगळं असं काहीच बोललेलो नाही. आणि मी माझं म्हणणं सिद्धही करु शकतो, असं म्हणून आपल्या पाठीवरचा तेलाचा गॅलन खाली ठेवतो. तेलाचा एक कॅन घेतो. त्यावर मध्ये होल असणारं एक नाणं (पूर्वीचं चिनी नाणं) कॅनमध्ये व्यवस्थित तेल ओतता येइल अशाप्रकारे ठेवतो. मग तेलाच्या गॅलनमधून खूप उंचावरून तो कॅन भरेपर्यंत कॅनमध्ये तेल ओततो. तेल ओतून झाल्यावर ते नाणं अलगदपणे उचलून तिथे जमलेल्या लोकांना व त्या आर्चरला दाखवतो. आश्चर्य म्हणजे त्या नाण्याला अजिबात तेल लागलेलं नसतं व आजूबाजूला कुठेही तेलाचा थेंबही सांडलेला नसतो. हे बघून त्या आर्चरसकट सगळ्यांनाच त्या तेलविक्रेत्याचं कौतुक वाटतं. पण तरीही स्वतःच कौतुक करुन न घेता तो म्हणतो, "यात काही विशेष नाही, Its just a matter of practice….."
नंतर मात्र कितीतरी वेळ माझ्या मनात ती कथा घोळत होती. मनात आलं, Its just a matter of practice………..खरच होत असेल का असं? साईटवरच झोपड्या बांधून रहाणाऱ्या कामगारांच्या बायका ज्या पद्धतीने हातावर मोठमोठ्या भाकऱ्या पटापट थापतात त्या स्पीडने भाकऱ्या थापणं जगप्रसिद्ध शेफलाही जमणार नाही. आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार, येशुदास इ. थोर गायकांची गाणी मनाला स्पर्श करतात त्यांची जागा घेणं दुसऱ्या कोणालाही इतक्या सहजी शक्य नाही. सचिन तेंडुलकरसारखा बॅटमन हा शतकात एखादाच असतो. हे सगळं खरच .... just matter of practice असतं का? असेलही कदाचित पण काही गोष्टी मात्र just matter of practice असूच शकत नाहीत. जसं कितीही प्रयत्न केला तरी आईच्या किंवा आजीच्या हातच्या एखाद्या पदार्थाची चव तो पदार्थ आपण किंवा दुसऱ्या कोणीही केला तरी त्याला येत नाही.मावशी किंवा आत्ये ज्या स्टाईलमध्ये आपली वेणी घालून देते तशी मात्र अगदी आईलाही जमत नाही. ताईसारखी मेंदी काढणं कोणालाच जमणार नाही. दादाच्या बाईक चालवण्याच्या स्टाईलची कॉपी कोणीच करु शकत नाही. अमुक एक सर किंवा मॅडम जशी गणितं समजावतात ना तसं नाही जमत कोणाला....... एक ना अनेक. अशा किती गोष्टी आपण आपल्या मनात पक्क्या केलेल्या असतात. या गोष्टी just matter of practice नसतात आणि असूही शकत नाहीत. कारण त्या कुठेतरी आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात.
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment