सुप्रभात
आजची सुप्रभात जरा खास आहे. आज एक तारीख! इंग्रजी कॅलेंडरनुसार आज ऑगस्ट महिना सुरु झाला. २०१७ सालातले सात महिने संपले. ऑगस्ट या शब्दाचं 'डिक्शनरी मिनिंग' आहे 'respected and impressive'. तर असा हा सुंदर अर्थ असणाऱ्या ऑगस्ट महिन्याचा आज पहिला दिवस. श्रावणातले बरेचसे सण बहुतांश वेळा ऑगस्टमध्येच येतात. पावसाचा जोर ओसरलेला असतो. अधूनमधून सूर्यनारायणही दर्शन देउ लागलेले असतात. सृष्टीने जणू हिरवी शाल पांघरलेली असते. रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा, गोकुळाष्टमी अशा सणांचा महिना म्हणजे ऑगस्ट असं एक समीकरण लहानपणी माझ्या मनात पक्क झालं होतं. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर जवळपास दोन महिने, रविवार सोडून क्वचितच एखादी सुट्टी मिळत असे. पण ऑगस्ट महिन्यात मात्र भरपूर सुट्ट्या मिळायच्या म्हणून लहानपणी मला हा महिना खूप आवडायचा.
आजकालच्या मुलांना ऑगस्ट म्हटलं की फ्रेंडशिप डे आठवतो. पण मी शाळेत/ कॉलेजला असताना 'फ्रेंडशिप डे' हा प्रकारच मला माहिती नव्हता. त्यावेळी आकर्षण असायचं ते वेगवेगळ्या सणांच. तेव्हा सणही आजच्यासारखे साजरे होत नसत. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ बहिणींना कॅडबरी वगैरे काही देत नसत. त्यामुळे रक्षाबंधनचं विशेष असं आकर्षण नव्हतं. पण नारळी पोर्णिमेचं मात्र खास आकर्षण वाटायचं. कारण पाऊस सुरु झाल्यानंतर आमचं समुद्रावर जाणं बंद झालेलं असे. पण नारळी पोर्णिमेच्या दिवशी मात्र पाऊस असला तरी समुद्रावर जायची परवानगी मिळायची. खवळलेला समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांवर तरंगणारे नारळ हे सारं बघण्याची मजा काही वेगळीच असायची.
आमच्या गावात एक कृष्णाचं देऊळ होतं. दरवर्षी तिथे गोकुळाष्टमीचा उत्सव असायचा. दिवसभर तिथे वेगवेगळे कार्यक्रम असायचे. दुपारनंतर देवळाबाहेरच्या अंगणात वेगवेगळे खेळ खेळले जायचे आणि नंतर प्रसाद म्हणून डीशभरुन दही पोहे वाटले जायचे. एरवी दही पोहे कधी विशेष आवडायचे नाहीत पण उत्सवाच्या दिवशी प्रसादाचे दही पोहे मात्र दोन वेळा घेऊन खात असे. आजही त्या दही पोह्यांची चव जिभेवर रेंगाळतेय. १५ ऑगस्टची स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आणि १७ तारखेची पारशी नववर्ष दिनाची सुट्टी या दोन्ही सुट्ट्या जवळपास जोडून येतात. शाळेत असताना मात्र १५ ऑगस्टला सुट्टी असूनही झेंडा वंदनासाठी शाळेत जावं लागत असे. १५ ऑगस्ट म्हटलं की आठवते ती या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमांसाठी शाळेत पंधरा दिवस आधी सुरु होणारी कवायतींची आणि लेझीमची प्रॅक्टिस. ग्राऊंडवर बऱ्याच ठिकाणी चिखल साठलेला असायचा पण तरीही त्याची पर्वा न करता आमची प्रॅक्टिस चालू असायची. एक वेगळाच उत्साह संचारलेला असायचा तेव्हा. त्यावेळी ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना चिखलाची घाण वाटत नसे. तेव्हा हायजीन वगैरे संकल्पनांपासून कोसो दूर होते मी. म्हणूनच असेल कदाचित तेव्हा हे सगळं खूप छान एंजॉय करता आलं. आता मात्र सगळेच संदर्भ बदलले आहेत.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऑगस्टमध्ये सण आणि सुट्ट्या भरपूर आहेत आणि विशेष म्हणजे एरवी सप्टेंबरमध्ये येणाऱ्या गणरायांचं आगमनही याच महिन्यात होत आहे. त्यामुळे आधीच मंगलमय झालेल्या या महिन्याची प्रत्येक सकाळ मंगलमय होवो, ही सदिच्छा!
©मानसी जोशी
०१/०८/२०१७

No comments:
Post a Comment