सेल्फ मेडिकेशन
….My favorite part of the chemist is the guy who stands behind the counter. Because abroad Pharmacies are very strict and they will not give you medicines without a prescription. But, in India guy behind the counter gives you prescription…
स्टँड अप कॉमेडीचा एक व्हिडिओ बघताना लक्षात राहिलेला हा पार्ट. . खरंच बरेचदा असं होतं. काही होत असलं की डॉक्टरांकडे न जाता डायरेक्ट मेडिकल स्टोअर गाठायचं आणि तो देईल ते औषध घ्यायचं. किती तो आंधळा विश्वास त्या मेडिकल स्टोअरमधल्या माणसावर?
अगदी मेडिकल स्टोअर कशाला मित्र मैत्रिणी, नातेवाईक, कलीग, इत्यादी कोणाच्याही सल्ल्याने अनेकदा औषधं घेतली जातात. आजकाल तर सोशल मीडियावर सल्ले मागायचं नवीन फॅड आलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना आपण ओळ्खतही नाही, ज्यांना कधी भेटलो नाही इतकंच काय तर बघितलंही नाही, अशा व्यक्तींनी सांगितलेल्या औषधांचा प्रयोग आपल्या शरीरावर करायचा?
या सगळ्यांच्या पलीकडे एक एक्सपर्ट सगळ्यांच्या आयुष्यात आहे. सगळे त्याच्याकडून सल्ला घेतात. मी अगदी प्रांजळपणे कबूल करते की मी सुद्धा त्याचा सल्ला घेतला आहे. ते म्हणजे “गूगल सर्च इंजिन!”
जरा काय झालं की गुगल करायची जवळपास सगळ्यांनाच सवय असते. इतकंच काय तर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या औषधांची माहिती, त्याचे साईड इफेक्ट्स याबद्दलची माहितीही गुगल करणारे महाभाग कमी नाहीत.
हे सगळं का?
डॉक्टरांकडे जायचा आळस? त्यासाठी नसणारा पैसा किंवा वेळ? का पैसा खर्च करायची नसणारी तयारी?
सेल्फ मेडिकेशनचा अजून एक मार्ग म्हणजे आयुर्वेदिक औषधे घेणे. अनेकांचा असा (गैर)समज असतो आयुर्वेदिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. माझाही होता. ज्यांना असं वाटतं त्यांनी याबद्दल फक्त आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून बघा, म्हणजे खरं काय आहे ते लक्षात येईल.
कारण काहीही असुदे. सेल्फ मेडिकेशन करताना आपण आपल्याच आरोग्याशी खेळत असतो.
2015 साली टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार भारतामध्ये 52% लोक सेल्फ मेडिकेशन करतात. डॉक्टरांच्या मते हे धोकादायक आहे. कारण आजार जरी सारखा असला तरी प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. अनेक क्रोनिक आजारांचं कारण हे “सेल्फ मेडिकेशन किंवा चुकीचे औषधोपचार” हे आहे. सेल्फ मेडिकेशनमुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
“जरा काय झालं की डॉक्टर कशाला हवेत?”
माझं असं अजिबात म्हणणं नाही की सेल्फ मेडिकेशन संपूर्णतः चुकीचच आहे. सर्दी झाली की घरगुती काढा घेणे, वाफारा घेणं असे उपाय आपण करू शकतो, करतोच. पण तीच सर्दी जर दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिली तर तिसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाणं हिताचं आहे.
काही दिवसांपूर्वी माझी मुलगी दुपारी शाळेतून रडतच घरी आली. तिच्या पोटात दुखत होतं. आदल्या दिवशीच घरी पाणीपुरी केली होती. ती भरपूर खाल्ल्यामुळेच हा त्रास होतोय, हे माझ्या चटकन लक्षात आलं. त्यामुळे पोट शेकण्यापासून, पाचक देण्यापर्यंत सगळे घरगुती उपाय मी केले. पण तरीही काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेले. पोटदुखीचं कारण तेच होतं, अजीर्ण. पण डॉक्टरांच्या औषधांमुळे तिला एका रात्रीत आराम पडला.
पूर्वीच्या काळी घरात अनुभवी आजी आजोबा असायचे. त्यामुळे, घरात कोणाला काही झालं की आजीच्या बटव्यातली औषधं हा बरेचदा रामबाण उपाय ठरायचा. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. आता अनुभव कमी आणि बटवा मात्र भरलेला अशी परिस्थिती आहे.
“एवढ्या टेस्ट्स? नक्कीच लॅबवाल्याशी त्यांचं कनेक्शन असणार.”
“इतकी औषधं? नक्कीच मेडिकलवाल्याकडून त्यांना कमिशन मिळत असणार.
हे असे विचार अनेकांच्या मनात सतत घोळत असतात. चांगलं आहे तिथे वाईट असणारच. मेडिकल फिल्डही यासाठी अपवाद नाही. त्यामुळे एकवेळ धरून चालू तुमच्या मनात येणाऱ्या शंका खऱ्या आहेत.
पण त्यावर उपायही आहेत.
अनेक नामांकित लॅब टेस्टसाठी खूप चांगलं डिस्काउंट ऑफर करतात…
मेडिकल शॉप्स तर आजकाल गल्लोगल्ली आहेत. त्यामुळे अमुक एका मेडिकल स्टोअरमधूनच औषधं घ्या असं कुठले डॉक्टर सांगत असतील असं मलातरी वाटत नाही. शिवाय आता ऑनलाईन मेडिकल खरेदीचा पर्यायही सध्या उपलब्ध झाला आहे.
तुम्हाला पटत नसल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गरज वाटल्यास सेकंड ओपिनिअन घ्या. पण तब्येतीच्या बाबतीत हेळसांड करु नका. चार पैसे वाचविण्यासाठी तुमचा लाख मोलाचा जीव धोक्यात घालू नका.
कोणी आपला पैसा कुठे व कसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून 500 रुपयांचा पिझ्झा खा किंवा मॉलमध्ये हजारो रुपयांचे शॉपिंग करा, तो तुमचा अधिकार आहे. पण डॉक्टर, औषधे, लॅब यावर खर्च करायला नको म्हणून सेल्फ मेडिकेशनचा पर्याय मात्र निवडू नका. काय माहिती, आज वाचवलेले शेकडो रुपये उद्याच्या लाखो रुपयांच्या खर्चाचे कारण ठरू शकतील. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन करण्यापेक्षा सेल्फ- मेडिटेशन करा, त्याने जास्त फायदा होईल.
©मानसी जोशी