Tuesday, 28 November 2017

इगो का स्वाभिमान

ती बॅग घेवून जायला निघाली.
भरलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितलं. तो तसाच शांत उभा होता.
तिने दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याच्याकडे वळूनबघितलं.
आता त्याच्याही मनात कालवाकालव होत होती. मनातून त्याला खूप वाटत होतं; सांगाव तिला, "अशी जावू नकोस ना मला एकट्याला सोडून......." पण त्याचा 'इगो' त्याला तसं करायची परवानगी देत नव्हता. कारण त्याने तिला जायला सांगितलं नव्हतं. ती स्वतःहून जात होती.
तो थांबवेल या आशेने काही क्षण ती दारातच उभी राहिली. मनातून तिला खूप वाटत होतं, परत फिरुन त्याला मिठी मारावी. पण तिचा 'इगोही' काही कमी नव्हता. तो थोडीच तिला असं काही करु देईल.
ती दार ओढून निघून गेली. दार बंद झाल्याचा आवाज आला आणि त्याने दचकून वळूनबघितलं. ती खरंच निघून गेली होती. तो हतबल होऊन खाली बसला.

त्या दोघांच 'लव्ह मॅरेज’-

त्यांच्या 'डेटला' तो बरेचदा उशीरा जायचा. ती कितीतरी वेळ त्याची वाट बघत बसायची. ती चिडली की तो कान धरुन तिची माफी मागायचा. कॅडबरी, रेड रोझ, गिफ्ट्स आणि रोमॅन्टिक बोलणं यामुळे ती ही विरघळायची. पण तरीही आतून कुठेतरी ती निदान एकदा तरी त्याने आपली वाट बघावी म्हणून तळमळायची .
       पुढे लग्नझालं. नव्याची नवलाई संपली. दोघांनाही एकमेकांच वागणं खटकायला लागलं. तो पक्का धार्मिक तर ती नास्तिक नसली तरी कर्मावर विश्वास ठेवणारी. त्याच्या रुढी परंपरा जपणाऱ्या घरात तिची घुसमट व्हायची पण तरीही ती सगळं ॲडजस्ट करत होती. त्याच्यासाठी!
     तिने केलेली बेचव कॉफीही आवडीने पिणाऱ्या त्याला तिने केलेली त्याची आवडती भरली वांगीही आवडत नाहीशी झाली.
     त्याचं ओला टॉवेल बेडवर टाकणं, नोकरी करणारी बायको असूनही तिने घरातले रितीरिवाज सांभाळावे, त्याला प्रायोरिटी द्यावी अशी इच्छा असणं हे सारं तिला खटकायला लागलं. नवरेशाही चालवून घेणाऱ्यातली ती नव्हतीच कधी.
    साध्या साध्या गोष्टीही आता वादाच कारण बनू लागल्या. एकमेकांची छोटीशी चूकही अक्षम्य अपराध असल्यासारखी  वाटू लागली. वाद वाढत गेले आणि तिने घर सोडून जायचा निर्णय घेतला.

ती माहेरी गेली. तिथे दादा वहिनीचा संसार अगदी जवळून बघत होती.
    तसं तिच्या लग्नाआधीच तिच्या भावाचं लग्न झाल होत. पण आज नव्यानेच एका वेगळ्या दृष्टीकोनातून ती त्यांचा संसार बघत होती. तिला त्यांच्या संसारात आपण अडचण आहोत असं उगाचच वाटू लागल. दादा वहिनी खूप चांगले होते. त्यांच्या मनात तसा विचारही नव्हता. पण आपण या चांगुलपणाचा फायदा घेणं योग्य नाही असा विचार तिच्या मनात येवू लागला.
     वहिनी करत असलेल्या ॲडजस्टमेंट ती अगदी जवळून बघत होती. दादासाठी ती अनेक गोष्टी जुळवून घेत होती. आईचा कडक शिस्तीचा काहीसा तापट स्वभाव,बाबांचं पथ्य पाणी, सगळं काही अगदी सहज सांभाळत होती. दादाही ॲडजस्ट करत होता. तिच्यासाठी काही प्रमाणात का होईना त्याने स्वतःला बदललं होतं.

      ती निघून गेल्यावर घरच काय त्याचंआयुष्यच रितं झाल्यासारख वाटलं त्याला. सकाळच्या कॉफीपासून प्रत्येक गोष्टीत त्याला तिची आठवण येत होती.
     त्याने ओला टॉवेल बेडवर फेकणं सोडून दिलं. त्याला आता स्ट्रॉंग कॉफीपेक्षा माईल्ड कॉफीच आवडायला लागली होती. कॅन्टिनच्या तिखट तेलकट भाज्या खाताना त्याला जाणवलं; ती आपलं डाएट किती व्यवस्थित सांभाळत होती. आपणच चुकलो निदान थोडं तरी तिला समजून घ्यायला हवं होत. पण परत कसं आणायच तिला ?

आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांचे, आपल्या मैत्रीणींचे संसार आता ती विचारपूर्वक बघू लागली. क्षणाक्षणाला तिला जाणवत होतं. तो खरच खूप ॲडजस्ट करत होता आपल्यासाठी. पण परत कसं जाणार आता ?
   
काही दिवस असेच सरले. त्यादिवशी ऑफिसमध्ये कामाच शेड्युल ठरवत असताना अचानक तिच्या लक्षात येतं; तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अगदी दहा दिवसांवर येउन ठेपला आहे. "गेल्यावर्षी याच वेळी मी किती खूष होते", या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं.

    आता तो खरच तिची खूप मनापासून वाट बघत होता. फरक फक्त एवढाच होता ती वाट बघायची तेव्हा तो येणार याची तिला खात्री असायची पण त्याच्यासाठी मात्र सगळच अनिश्चित होतं.

    खरच इगो इतका महत्वाचा असतो का ? की ज्यामुळे जे आपल्याला पटतंय, जे वाटतय ते आपण करुच शकत नाही?
   दोघांनाही आपाआपल्या चुकांची जाणीव झालेली होती. चूका सुधारायची, समोरच्याला माफ करायची तयारीसुद्धा होती; पण त्यासाठी पाऊल उचलायला मात्र कोणीच तयार नव्हतं.

       बाकीच्या गोष्टींसारखा या गोष्टीचाही शेवट गोड व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असेल. होईलही कदाचित कारण ही गोष्ट आहे,कल्पना आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात  खरच असं घडत असेल?
     इगो आणि स्वाभिमान यामध्ये अगदी बारीकसा फरक आहे. पहिल्याचं नसणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच दुसऱ्याच असणं आवश्यक आहे. असे किती 'तो' आणि 'ती' असतील ज्यांना मनापासून एकत्र यायचं आहे पण इगो आड येतोय. कोणीही पुढे पाऊल टाकायला तयार होत नाही. आयुष्य रेटत रहातात. समोरचा कधीतरी आपल्याकडे येइल याची वाट बघत रहातात. मग हळूहळू एकटेपणाचीच सवय होते. एकटेपणा आवडायला लागतो आणि एक नातं फुलायच्या आधीच कोमेजतं.
     कुठल्याही समस्येवर 'एक घाव दोन तुकडे' हे सोल्यूशन नसतं. चर्चा करुन अनेक प्रश्न सोडवता येतात.
पटत असेल तर विचार करा. शेवटी महत्व कशाला द्यायचं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं.

©मानसी जोशी











Tuesday, 21 November 2017

काल आणि आज


काल लेक शाळेतून घरी आली तेव्हा चेहरा पडलेला. मी विचारलं काय झालं कोणी रागावलं का? कोणाशी भांडण झाल का? तर मान हलवून नाही म्हणाली. मग थोडी साखरपेरणी केल्यावर म्हणाली, "आज आमच्या क्लासमध्ये सगळी मुलं मस्ती करत होती त्यामुळे टिचर वैतागल्या आणि शिक्षा म्हणून आम्हाला गेम्सच्या पिरिएडला वर्गातच बसवून ठेवलं."
     मला हसायला आलं. शाळेतले दिवस आठवले आणि मनात आल काहीच तर नाही बदलल इतक्या वर्षात.
  मागच्या आठवड्यात टर्मिनलचे पेपर्स दाखवले. आमच्या कन्यकेने 'Fill in the blanks' आणि  'Match the pair' ची फक्त उत्तरं उत्तरपत्रीकेत लिहिली. त्यामुळे उत्तरे बरोबर असूनही टिचरनी तिला मार्कस दिले नाहीत. मी टिचरना विचारल्यावर त्या म्हणाल्या, "वर्गात कितीतरी वेळा सांगून झालय fill in the blanks' ची संपूर्ण वाक्य लिहायची. Match the pair ची पूर्ण जोडी लिहायची नुसती उत्तरे लिहायची नाहीत. पेपरच्या दिवशीही या सूचना दिल्या होत्या. तरीही अनेक मुलांनी ही चूक केलेय. आता शिक्षा मिळाल्याशिवाय समज येणार नाही."
      मी ठिक आहे म्हणून तिथून निघाले. माझेही मार्क्स असेच एकदा कट झाले होते, हे आठवलं आणि मनात विचार आला, काहीच नाही बदललं.
     लेकीची वही चेक करताना मागच्या पानावर 'फुली गोळ्याचे' अनेक चौकोन दिसले. मी काही विचारणार तोच म्हणाली, "ऑफ पिरिएडला खेळतो ग आम्ही."....  काहीच नाही बदललं इतके वर्षात.
    आजही शाळांमध्ये तेच घडतं जे पूर्वी घडायचं. खरच काहीच बदललेलं नाही का?
बदललय ! बदलली आहे ती पालकांची मानसिकता. पूर्वी पालक स्वतःहून शिक्षकांना सांगत, " ऐकला नाही तर दोन रट्टे दिलेत तरी चालेल आम्ही कोणीही विचारायला येणार नाही”
पण आता शिक्षक मुलांना ओरडले तरी पालक मारहाण केल्यासारखे रिॲक्ट होतात.
मुलांना मारणं चूक का बरोबर हे मला माहिती नाही. मला त्या वादात पडायचही नाही. पण छडीचे घाव हातावर बसले म्हणून पाढे पाठ झाले. भुमितीतील अनेक सूत्र या छड्यांच्या धाकामुळेच डोक्यात पक्की बसली. '&' आणि 'and' मधला फरक कान पिरगळ्यामुळे लक्षात राहिला. (अनेकांना हा फरक आजही माहिती नसेल.)
शिक्षकांची मानसिकता बदलली आहे / नाही हे मला माहिती नाही. पूर्वी आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे 'परिक्षार्थी होऊ नका विद्यार्थी व्हा'.  आजही शाळेत 'मुलांच्या मार्कांकडे नको तर त्यांच्या चुकांकडे लक्ष द्या. त्या सुधारा" असच सांगितल जात.
    माध्यम कुठलंही असूदे. शाळेची फी कितीही असूदे. पण जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करतायत तोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधल नातं टिकून राहील.काही शिक्षक अपवाद असतीलही. हाताची सगळी बोटं सारखी नसतात. असे शिक्षक पूर्वीही होतेच फक्त तेव्हा पालकांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती.
मुलांचे शिक्षक हे मुलांचे शत्रू नाहीत. निदान  मुलांसमोर त्यांच्या शिक्षकांना नावं ठेवणं हे टाळलं पाहिजे. मुलांच्या बाबतीत पालक  'प्रोटेक्टिव्ह' असतात. असावच ते आवश्यकच आहे. फक्त 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' असू नये. हा ओव्हर बाजूला करा मग तुम्हीही म्हणाल, "खरच काहीच नाही बदललं इतके वर्षात!"
©मानसी जोशी

Sunday, 19 November 2017

तो

#तो

तो जन्माला येतो तेव्हाच त्याच्याकडे घराण्याचा वारस म्हणून बघितलं जात. कधी तो घरातला लाडका बाळकृष्ण असतो कधी खोड्या करुन ताईचा मार खाणारा खट्याळ भाऊ, तर कधी  धाकट्या बहि‍णीला मार पडू नये म्हणून खोटं बोलणारा  दादा  असतो.
     तो एखादीचा मित्र असतो. चेष्टा करुन सतावणारा पण त्याचवेळी तिची काळजी घेणारा.
तो प्रेयसीचा प्रियकर असतो. तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा. तिच्या स्वप्नांसाठी आपली स्वप्न विसरणारा.
तो एक पती असतो. आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करणारा. आपली सगळी स्वप्न तिच्या डोळ्यात बघणारा.!
तो बरेचदा बायको आणि आईच्या कात्रीत सापडतो. आईसाठी तो 'बायकोचा बैल' असतो तर बायकोसाठी 'श्रावणबाळ'. तरीही दोघींवरही तो मनापासून प्रेम करत असतो.
तो एक पिता असतो आपल्या मुलांच्या सुखासाठी राबराब राबणारा . खूप इच्छा असूनही त्यांच बालपण पहायच राहूल गेलेला.
तो एक पिता असतो कधीही न रडणारा. पण मुलीच्या पाठवणीच्या वेळी मात्र हळूच डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसणारा.
तो एक सासरा असतो. सुनेची लेकीप्रमाणे काळजी घेणारा आणि लेकीच्या सुखासाठी जावयालाही खूष ठेवायचा प्रयत्न करणारा.
तो भाचवंडांचा लाडका मामा असतो.  तो काका असतो, आजोबा असतो. तो घरातला #कर्ता असतो.
उच्चशिक्षित स्त्री पतीसाठी/ मुलांसाठी  हाऊसवाईफ बनली तर ती ग्रेट ठरते. पण हेच पुरुषाने केलं तर टिकेचा धनी होतो.
असतीलही काही पुरुष वाईट पण सगळेच काही वाईट नसतात. द्रोपदीच वस्त्रहरण करणारा दुर्योधन हा  पुरुष असला तरी तिच्या शिलाच रक्षण करणारा कृष्ण हादेखील पुरुषच होता. परस्त्रीला मातेसमान मानणारे शिवाजी महाराजही एक पुरुषच होते. बलात्कार करणारा पुरुष असला तरी त्या बलात्काऱ करणाऱ्याला पकडून देणारा इंस्पेक्टरही बहुतांश वेळा पुरुषच असतो.
स्त्रीला अबला बनवणारा पुरुष असेलही कदाचित पण तिला सबला बनविण्यासाठी झटणारे अनेक पुरुष होवून गेले. स्त्री शिक्षणाची कास धरणारे न्यायमूर्ती रानडे, महात्मा फुले; सतीची चळवळ, बालविवाह हे  बंद करायला लावणारे राजा राममोहन रॉय हे सारे पुरुषच होते.
चांगल किंवा वाईट ही एक प्रवृत्ती असते. ती स्त्री किंवा पुरुष दोघांमध्येही असते.
आज #International_Men's_Day असूनही त्याबद्दल फेसबूकवर अगदी अत्यल्प पोस्ट्स दिसल्या.काही पोस्ट्स तर खिल्ली उडवणाऱ्याच आहेत. याउलट Women's Day च्या दिवशी मात्र 'स्त्रीचा सन्मान करा, ती कशी ग्रेट आहे' अशाप्रकारच्या पोस्ट्सचा पाऊस पडलेला असतो. आज ना वर्तमानपत्रात पानभरुन जाहीरात, ना ऑनलाईन शॉपिंग साठी ऑफर्स. हे सारं कुठेतरी खटकतय. आपल्या आयुष्यातील वडील, भाऊ, नवरा, दिर, सासरा.....  या अशा अनेक रुपातील पुरुषांना योग्य तो मान द्या. त्यांचा  सन्मान करा. कारण हे देखील तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे घटक आहेत.
Happy Men's Day …..

©मानसी जोशी



Tuesday, 14 November 2017

भाजीमंडईबाहेरचा किस्सा

आत्ता घडलेला ताजा किस्सा
    संध्याकाळी भाजी मंडईबाहेर दोन अल्ट्रा मॉडर्न मॉम्सचा संवाद ऐकण्याचा दुर्मिळ योग आला .
-Hi ! after long time. परवा ओपन हाऊसला(पेरेंट्स मिटिंग) पण नव्हतीस तू.
-हो अग या वीकेंडला आउटिंग जायचं आधीच ठरलं होतं आमचं.
-अंशू कुठाय ?
-तो काय तिकडे गाडीवर बसलाय; त्याचा फेव्हरेट गेम खेळत. आज Children Day आहे ना, मग मला म्हणाला आज गिफ्ट म्हणून मला XXXX गेम डाउनलोड करुन दे.
-How Sweet!
-काय झालं ग मिटिंगला
-काही नाही नेहमीचच  मुलांची रिडिंग हॅबिट डेव्हलप करा. त्यांच्या हातात मोबाईल नको तर स्टोरी बुक्स  द्या. आता ही मुलं होमवर्क करताना मारामार स्टोरी बुक्स कुठून वाचणार?
-हो ना यार सिरिअसली. मागे मी विचारलं  kindle वर काही बुक्स आहेत का? तर म्हणाल्या  E-book नको.  आता Gadgets वापरली तर चांगलच आहे ना. पण जुनाट विचारातून बाहेरच येत नाहीत.
-नुसतच दाखवायच ग आमची शाळा किती मॉडर्न आहे . प्रत्यक्षात सगळ्या जुन्या मेथडच वापरतात
      हा सगळा संवाद चालू असताना ६/७ वर्षांचा मुलगा मात्र गेममध्ये तल्लीन झाला होता. आजूबाजूच्या जगाचं त्याला अजिबात भान नव्हतं. संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात मुलं मोबाईलवर गेम खेळण्यात कशी काय रमतात तेच कळत नाही. आमच्या सोसायटीमधली  मुलं  संध्याकाळी  पार्किंगमध्ये खेळत तरी असतात किंवा भांडत तरी असतात. पण खेळ म्हटला की भांडणं आलीच. त्यामुळे आम्ही कोणीच त्याकडे लक्ष देत नाही. असो. बाकी या अल्ट्रा मॉडर्न मॉम्सनी कितीही अक्कलेचे तारे तोडलेले असले तरीही E-books नको सांगणाऱ्या आणि मुलांना वाचनाची गोडी लावायचा प्रयत्न करणाऱ्या त्या टिचरचं मात्र मला मनापासून कौतुक वाटलं.

©मानसी जोशी


Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...