Tuesday, 27 March 2018

कथा - जखम

जखम

संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या त्या तिघींनी एका पडक्या वाड्याचा आसरा घेतला. तसा बऱ्यापैकी निर्मनुष्य रस्ता, मुसळधार बरसणारा पाऊस, पावसामुळे झालेला काळोख, सोबत ढगांचा गडगडाट आणि वीजेचा कडकडाट....
     खरंतर अशा वातावरणात त्या पडक्या वाड्यात कोणीही घाबरलं असतं. पण त्या तिघी मात्र निर्विकार होत्या.
रात्रीचे साडेआठ वाजून गेले तरी पावसाचा जोर काही ओसरत नव्हता. मोबाईललाही नेटवर्क नव्हतं.  इतका वेळ शांत बसलेल्या त्या तिघी हळूहळू एकमेकींशी संवाद साधू लागल्या.

या मुसळधार पावसासारखेच माझ्या डोळ्यातूनही असेच अश्रू वाहत असतात... खूप खोल जखम झाली आहे हृदयात... अशाच मुसळधार पावसात मला एकटीला सोडून निघून गेला तो  ... कोणा दुसरीसाठी! ज्याच्यासाठी घरदार सोडलं, आई वडिलांशी नातं तोडलं; तो माझ्या आयुष्याचा जोडीदार मला वाऱ्यावर सोडून निघून गेला....काय कमी होती माझ्यात? माझ्या प्रेमात ? हे प्रश्न निरुत्तरीत ठेवून,  माझ्या आत्मसन्मानाचा अपमान करुन...  माझ्या हृदयावर असंख्य जखमा करुन निघून गेला मला सोडून.... कायमसाठी! आई वडीलांनी घराची दारं कायमसाठी बंद केली होती. माझी चूक ही त्यांच्या दृष्टीने अक्षम्य अपराध होता. माझ्यामुळे त्यांची बेअब्रू झाली होती. त्यामुळे त्यांनीही माफ केलं नाही आणि मी पूर्णपणे एकटी पडले. पण ज्याच्यामुळे हे घडलं तो मात्र सुखात आहे; तिच्यासोबत! शरीरावरच्या जखमा भरुन येतात पण मनावर झालेल्या जखमेच काय?  जगावरचा आणि जगण्यावरचा विश्वासच उडाला आहे आता. पुन्हा दुसरं नातं जोडण्याची  हिम्मतच उरली नाही;  इच्छाही नाही आणि नात्यांवर  विश्वासही उरला नाही.  तरीही मी जगतेय ... का जगतेय? आयुष्य संपवायची हिम्मत नाही म्हणून जगतेय....

       ..... कोणी सांगितल तुला शरीरावरच्या जखमा भरुन येतात म्हणून. काही वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार केला त्या नराधमाने. ओरबडून काढलं मला. बड्या बापाचा बेटा होता. त्याला वाटलं सुटेल तो आरामात. पण मी लढले. एकटीने लढले. शिक्षा झाली त्याला, अगदी फाशीची शिक्षा झाली. त्यावेळी त्याला लाचार झालेलं बघताना आत्मसन्मान सुखावला माझा. अशीच अगतिक झाले होते मी. तेव्हा हात जोडून, 'मला सोड'  म्हणून विनंती करत होते त्याच्याकडे. पण नाही सोडलं त्याने मला. तिच अगतिकता त्याच्या डोळ्यात बघताना मनातून आनंदाच्या लाटा उसळल्या होत्या. पण त्याचा तो किळसवाणा स्पर्श आजही आठवतो मला. कितीतरी वेळा तासनतास  शॉवरखाली उभी रहाते त्या बलात्काराच्या जखमा धुवून टाकण्यासाठी. टर्किश टॉवेलने अंग घासून अंगावर ओरखडे उठतात पण तरीही  नाही भरुन येत  त्या जखमा. एखादा तर आंघोळ करताना डेटॉलची पूर्ण बाटली ओतली होती आंघोळीच्या पाण्यात. पण त्या नराधमाच्या स्पर्शामुळे अंगावर झालेल्या असंख्य  जखमा नाही भरुन येत....  आई बाबा म्हणतात,  "त्याला शिक्षा झाली पण आपलीही बदनामी झाली या प्रकरणात. आता कोण करणार तुझ्याशी लग्न?" ... पण खरं सांगू? नाही करायचं मला लग्न. त्या किळसवाण्या स्पर्शाच्या जखमा जोपर्यंत भरुन येत नाहीत, तोपर्यंत त्यावर हळूवार हलके स्पर्श विसावणार नाहीत......

       ......मला तर शरीर  आणि मन  आहे का? असाच प्रश्न पडतो अनेकदा. गेल्या कित्येक रात्री बेडरूममध्ये अंगावर नवऱ्यानेच केलेले बलात्कार झेलतेय मी . तो शरीराजवळ यायचा नेहमी पण मनाजवळ यायला त्याला कधी जमलं नाही. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता; कारण माझं शरीर हे जणू त्याची प्रॉपर्टी होतं. निर्विकारपणे सहन करत होते सगळं. पण त्यादिवशी मात्र अंगात ताप असताना नको म्हटलं म्हणून चक्क जबरदस्ती केली त्याने माझ्यावर. माझ्या  आत्मसन्मानाला अक्षरशः पायदळी तुडवलं त्याने आणि माझ्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या. त्यानंतर अनेकदा हे असे मन आणि शरीर दोन्हीवर झालेले बलात्कार झेलले मी; आजही झेलतेय. दोन्हीवरच्या जखमा कधीही भरुन येणार नाहीत. निव्वळ मुलांसाठी सगळ सहन करतेय. बेडरूमबाहेर अगदी आदर्श माणूस आहे तो. मी त्याच्या विरोधात बोलले तर बाकीचे जाऊ देत माझे आई वडीलही मलाच वेड्यात काढतील. त्यामुळे कोणालाही काही सांगू शकत नाही मी. म्हणूनच  मी ठरवलं आहे आता,  आपल्याला मन आणि शरीर नाही असं समजूनच जगायचं......

त्या तिघीही बोलून शांत झाल्या. जिथे आपले परके झाले तिथे अनोळखी असूनही त्या तिघी एकमेकींशी मोकळेपणाने बोलल्या. पाऊस थांबल्यानंतर सगळा रस्ता स्वच्छ झाला. हवेतला उकाडा जाऊन निवांत गारवा आला. त्या तिघीही आपआपल्या वाटेने निघून गेल्या. तिघींचंही आयुष्य जसं आहे तसंच चालू रहाणार होतं...त्यांच्या जखमा सहन करतच त्या जगणार होत्या. पण या पावसामुळे आज कितीतरी दिवसांनी  त्यांच्या मनात साचलेला गाळ स्वच्छ झाला होता.

©मानसी जोशी











Sunday, 25 March 2018

ऊर्मिला- रामायण

रामनवमी म्हटल की  मला  दोनच गोष्टी आठवतात; पहिली म्हणजे "गदिमा" आणि "सुधीर फडके" यांनी अजरामर केलेलं गीत रामायण. पूर्वी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज आकाशवाणीवर गीत रामायण सादर केल जात असे. गीत रामायणातील  काही गाणी ऐकताना आजही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत.
      रामनवमीच्या दिवशी आवर्जून आठवते ती ऊर्मिला! लक्ष्मणाची पत्नी!. बारावीला असताना मराठीच्या पुस्तकात "उर्मिले त्रीवार वंदन तुला" नावाची कविता होती. ती कविता वाचल्यावर उर्मिलाच्या एकूणच व्यक्तिरेखेबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण झाल. त्यानंतर मी  उर्मिलाबद्दल शक्य तितक वाचण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी एके ठिकाणी रामनवमीच्या किर्तनात किर्तनकारांनी आवर्जून उर्मिलेचा उल्लेख केला होता तेव्हा मात्र खूप छान वाटल होतं.
    रामायणातील प्रत्येक पात्र हे आदर्श आहे. अगदी आदर्श पित्यापासून आदर्श पतीपर्यंत; आदर्श मित्रापासून आदर्श शत्रूपर्यंत प्रत्येक पात्र आदर्श पद्धतीने रेखाटल आहे. पण रामायणात सर्वात जास्त #अंडररेटेड कोण असेल तर ती उर्मिला; लक्ष्मणाची पत्नी आणि सीतेची बहीण असूनही हिच्या वाटेला एकाकीपण आलं. राजवैभवाचा त्याग करुन आपल्या पतीसोबत वनवासात निघून गेलेली सीता महान झाली पण ऊर्मिलेच काय? जिच्या पतीने एका क्षणासाठीही तिचा विचार न करता रामासोबत जायचा निर्णय घेतला तिची मानसिक अवस्था काय झाली असेल? रामासोबत वनवासात जाऊन लक्ष्मण  'आदर्श बंधू'  झाला पण आदर्श पती नाही होऊ शकला.
     रामायणात जिला "आदर्श पत्नी" म्हणून सन्मान मिळतो त्या सीतेइतकाच मान किंबहूना थोडा जास्तच मान उर्मिलेलाही  मिळायला हवा होता. पण तो नाही मिळाला; का? निव्वळ ती राजवैभव सोडून वनवासात गेली नाही म्हणून? १४ वर्षे तिनेही पत्नीधर्म निभावला.  आपल्या बंधूप्रेमापाई जो पती आपल्याला वाऱ्यावर सोडून गेला अशा पतीवर जीवापाड प्रेम करुन त्याच्याशी एकनिष्ठ रहाणं ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही.  खरतर उर्मिलाही लक्ष्मणाबरोबर वनवासात जायला तयार होती परंतू लक्ष्मणाने तिला राज्यातच थांबून कुटूंबाची सेवा करायला सांगितले.  उर्मिलानेही पतीच्या इच्छेचा मान ठेवला व ती अयोध्येतच राहिली असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळला. तर काही ठिकाणी ऊर्मिलाला 14 वर्षे झोपण्याचा शाप मिळाला होता आणि तो या कालावधीत तिला उपयोगी पडल्याचा उल्लेख वाचनात आला पण हे कितपत विश्वसनीय आहे ते मला माहिती नाही.
    ऊर्मिलाला, तिच्या त्यागाला नेहमीच दुर्लक्षीत केलं गेल. इतकच काय तर अजरामर गीत रामायणातही उर्मिलेचा विशेष  उल्लेख कुठे आढळला नाही  याचच वाईट वाटतय. Pervin Sanket नावाच्या लेखिकेने उर्मिलाच्या व्यक्तीरेखेने प्रेरित होवून "ऊर्मिला" नावाच एक सुंदर पुस्तक लिहिल आहे. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणी केला आहे का नाही याबद्दल काही माहिती नाही; पण #उर्मिला  या व्यक्तिरेखेवर कोणालातरी विचार करुन लिहावस वाटल हिच आनंदाची गोष्ट आहे.

©मानसी जोशी
   


Friday, 23 March 2018

परीकथा

चैत्र पाडव्याचा दिवस होता. संध्याकाळी तो आणि ती गच्चीवर बसून भविष्याची स्वप्न रंगवत बसलेले होते.
   अचानक ती त्याला म्हणाली, "नको ना जाऊस आज. बघ तू आज जाशील आणि उद्या मला ॲडमिट केलय म्हणून फोन येइल आणि उद्या लगेच तुला निघावं लागेल."
    तो  हसून म्हणाला, "अगं जावं लागेल मला मार्च महिना आहे. आत्ता रविवारला जोडून सुट्टी आली म्हणून जमलं यायला.  पुढे रजा लागतील त्यामुळे आत्ता रजा नाही घेता येणार."
    "बघ हा मी आधीच सांगितलय तुला. नाहीतर नंतर म्हणशील मी सांगितल नाही म्हणून," ती.
    "बरं मॅडम निघतो मी आता मला निघावं लागेल”, तो हसून म्हणाला.
   "थांब ना थोडावेळ आजचा दिवस फक्त माझ्या एकटीचा हक्क आहे तुझ्यावर. पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्या हक्कात कोणीतरी वाटेकरी आलेल असेल", ती.
   "वेडी आहेस तू खरच! खरं सांगू माझाही पाय निघत नाहीये ग. पण ऑप्शन नाही. जायलाच हवं मला आणि  कोणीतरी नाही हा; एक गोड परी आलेली असेल," असं म्हणून तो जायला निघाला. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.
    दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तिला सुखरुप घरी पोचल्याचा फोन केला. घरात तिची आई आणि ती दोघीच होत्या. बाबांची ट्रान्सफर मुंबईला असल्यामुळे आणि भावाचं ट्रेनिंगही नेमकं त्याचवेळी मुंबईला आल्यामुळे, दोघही आदल्या रात्रीच मुंबईला गेले होते.
    सकाळी चहा घेऊन झाल्यावर तिने कशीबशी एक पोळी खाल्ली. घशाशी प्रचंड जळजळ होत असल्यामुळे तिला काहीही खायची इच्छाच होत नव्हती. थोड्यावेळाने तिच्या कंबरेतून बारीकशी कळ आली. पण तिने दुर्लक्ष केलं. पुन्हा 10/15 मिनिटांनी अजून एक कळ आली. तरीही ती काहीच बोलली नाही. तिसऱ्या वेळी मात्र जरा जोरात कळ आली. आता मात्र तिने आईला सांगितले.
आई म्हणाली, "उगाच रिस्क नको, दिवस भरत आले आहेत. आपण डॉक्टरांकडे जाऊया. नेमक घरात कोणी नाहीये".
     "आई काळजी करु नकोस मी रिक्षा स्टॅंडपर्यंत चालत येते. जाऊया आपण", ती शांतपणे म्हणाली.
डॉक्टरांनी तपासलं आणि लगेचच ॲडमिट करुन घेतलं.
    "आत्ता कुठे सुरुवात आहे संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी होइल. काळजी करु नका व्यवस्थित आहे सगळ", असं बोलून डॉक्टरनी आईला धीर दिला.
     मॅडम 'प्रायव्हेट' रुम आत्ता अवेलेबल नाहीये. आत्ता तुम्हाला 'सेमी प्रायव्हेट रुम' देते. संध्याकाळी मिळेल 'प्रायव्हेट रुम', नर्सच्या या वाक्याने आईला पुन्हा टेंशन आलं.
    "आई ठिक आहे नो प्रॉब्लेम. मी करेन ॲडजस्ट", ती शांतपणे म्हणाली आणि आई निर्धास्त झाली.
आईने त्याला फोन करुन तिला ॲडमिट केल्याचं सांगितल. त्याला संध्याकाळच तिचं बोलणं आठवल आणि मनापासून हसायला आलं.
    तिला ॲडमिट करुन सलाईन लावण्यात आल. तिच्या आईने कोणी तरी मोठं हव हव म्हणून स्वतःच्या काकूला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. सेमी प्रायव्हेट रुममध्ये दोन्ही डिलिव्हरी झालेल्या स्त्रीया होत्या.
तिला सतत त्याचं वाक्य आठवत होतं, "कोणीतरी नाही एक गोड परी येणार आहे....." समोरच्या बेडवरच बाळ रडू लागल. त्या पेशंटच्या नातेवाईकानी नर्सला बोलावल. नर्स आतमध्ये आली आणि बाळाला ड्रॉपरने दूध पाजू लागली. हा काय प्रकार आहे. कोणालाच कळत नव्हतं. नर्सने सांगितल, "त्या बाळाला जीभेच्या वरची टाळूच नाहीये..."
       हे ऐकून तिला धडकी भरली... , "देवा मुलगा किंवा मुलगी कोणीही होवूदे पण हेल्थी असूदे ..,अशी तिने देवाकडे मनोमन प्रार्थना केली.
      दुपारनंतर चारच्या सुमारास तिला लेबररुममध्ये नेण्यात आलं. जीवघेण्या कळा येत होत्या. सगळ सहन करत होती ती.  असिस्टंट डॉक्टर, नर्स सगळेजण तिला धीर देत होते. जरा वेळाने असिस्टंट डॉक्टरने तपासल आणि तिच्या लक्षात आलं , बाळाचे ठोके कमी झाले आहेत. तिने लगेच डॉक्टरना फोन लावला. डिलिव्हरी नॉर्मल होण्यासारखी वाटत होती म्हणून डॉक्टरनी सांगितल पेशंटला ऑक्सिजन लाव.   तिच्या आईला लेबर रुममध्ये आत बोलावण्यात आलं. ज्या मुलीला कधी साध सलाईन लावलेलही बघितल नव्हतं त्या मुलीला ऑक्सिजन लावलेला बघून मात्र  आई थोडीशी घाबरली.
       ऑक्सिजन लावूनही काही फायदा झाला नाही . अखेर डॉक्टरनी सिझरचा निर्णय घेतला. थोड कॉंप्लिकेशन आहे हे आईला स्पष्ट जाणवत होतं. आईने थरथरत्या हाताने फॉर्मवर सही केली.
ऑपरेशन थिएटरमध्ये लगबग चालू झाली आणि अखेरीस 4. 55 ला एक गोंडस परी जन्माला आली. मुलगी झाली हे ऐकताक्षणी ती खूदकन हसली. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
         रात्री निघायच म्हणून तो ऑफिसमधून जरा लवकरच निघाला. वाटेतच त्याचा मोबाईल वाजला. त्याने गाडी बाजूला लावून फोन घेतला. मुलगी झाल्याच कळताक्षणी प्रचंड  आनंद झाला. 'या क्षणाला आपण तिकडे का नाही', असं त्याला सारखं मनातून वाटत होतं.  त्याला आदल्या रात्रीच तिच बोलण  आठवून हसायला आलं. त्याला आता त्याच्या प्रिंसेस ला बघायची घाई झाली होती.
   आज तिच प्रिंसेस अकरा वर्षांची झाली. तुझ्या आयुष्यात तुला सगळी सुखं मिळूदेत; वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा चिन्मयी...

©मानसी जोशी



Tuesday, 13 March 2018

कथा - वर्तुळ

#वर्तुळ

"कितीदा नव्याने तुला आठवावे... " हे गाणं कानावर पडल आणि मंदारची आठवण आली. गेल्यावर्षी ऑफिसच्या ॲन्युअल इव्हेंटला हे गाणं किती मस्त म्हटल होतं त्याने. अस वाटत होतं गाण्याचे सूर त्याच्या हृदयातून येत आहेत; खरोखरच कोणाला तरी आठवून गातोय हा. खरच मंदारच प्रोफेशन चुकलय. संगीत त्याच्या रक्तात भिनलय. खरतर त्याने कलाक्षेत्रात असायला हवं होतं. पण आज फायनान्स सारख्या रुक्ष सेक्टरमध्ये नोकरी करतोय. त्यादिवशी गिटारही किती छान वाजवत होता. त्याला गिटार वाजवताना बघून "तुमसेही दिन होता हैं..." या गाण्यातला शाहिद कपूर आठवला होता.

   खरतर शाहिद कपूर म्हटल की मला नेहमी स्वरुप आठवतो. स्वरुप तर शाहिद कपूरची झेरॉक्स कॉपी आहे. मायाच लग्न ठरलं तेव्हा "ऑखोंमे तेराही चेहरा...." म्हणणाऱ्या शाहिदसारखीच अवस्था झाली होती त्याची. तेव्हा रुपालीने मात्र त्याला सावरल ते नेहमीसाठीच. आज दोघ अगदी सुखाचा संसार करत आहेत. खरतर स्वरुपसाठी नेहमी रुपालीच योग्य होती.

   रुपाली!!! कुरळ्या केसांची, घाऱ्या डोळ्यांची गोड मुलगी. कॉलेजला असताना कितीतरी मुलं वेडी झाली होती तिच्यासाठी. पण तिने मात्र सुरवातीपासूनच फक्त स्वरुपवरच प्रेम केलं. काय बरं चिडवायची तिला स्नेहा? हा ॐकार स्वरुपा ....

     स्नेहा!!! रुपालीची अगदी जीवलग मैत्रीण. स्नेहा आणि रुपाली शाळेपासूनच्या खास मैत्रीणी. पुढे कॉलेजला आल्यावरही त्यांची मैत्री कायम राहिली. स्नेहाला खरतर केदार मनापासून आवडायचा पण पठ्ठीने कधीही मान्य केलं नाही ते. मी आणि केदार एकाच शाळेत असल्यामुळे सतत आडूनआडून माझ्याकडून केदारबद्दल जाणून घ्यायची.

   केदार!!.... लहानपणापासूनच बघितलेल US ला जाऊन सेटल व्हायचं स्वप्न अगदी जिद्दीने पूर्ण केल त्याने. आता रियाशी ब्रेक अप  झाल्यानंतर जणू भारताशी संबंधच संपला त्याचा.

   रिया तरी कशी आहे. मनापासून प्रेम करणाऱ्या जेंटलमन केदारशी ब्रेकअप करून सतत मुलींशी फ्लर्ट करणाऱ्या जतीनसोबत लग्न केल तिने.

  जतीन!!! माझा बॉस! एकेकाळी माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा. मी रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यावर अक्षरशः चरफड व्हायची त्याची. गेल्यावर्षी ऑफिसच्या ॲन्युअल गॅदरिंगच्या वेळी तर अगदी गळ्यातच पडत होता माझ्या. सुदैवाने समीर तिथे आला आणि मी सुटले.

  समीर!!!!.... कुठलाही विषय मनात आला की नेहमी तुझ्यापाशीच का येउन थांबतो? मी खरच प्रेमात पडलेय का तुझ्या? गार्गीही असच म्हणायची. पण मलाच काही कळत नाहीये.

   गार्गी!!! आजही आठवतोय तो दिवस आणि वॉशरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गार्गी... त्यानंतर सुरु झालेला पोलिस तपास आजही चालू आहे. खरच तो एक अपघात होता का खून?

   आदल्या रात्री मी उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबले होते. समीरही होता माझ्यासोबत; खरतर मी होते समीरसोबत. भरपूर वर्कलोड त्यामुळे सहाजिकच भरपूर कामं पेंडिंग होती. मी नेहमीच सकाळी लवकर जाऊन कामं पूर्ण करते. पण त्यादिवशी समीर थांबणार होता. त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळणार म्हणून मी मुद्दाम थांबले होते. खरच आवडतो मला समीर. त्याच बोलणं, हसणं सगळच. सतत त्याच्यासोबत रहावस वाटत. ऑफिसमध्ये मात्र कामात कधी गुंग झाले ते माझ मलाच कळल नाही. घडाळ्यात नऊचे ठोके पडले आणि मी एकदम भानावर आले. सात वाजता समीरसोबत घेतलेली मगभर कॉफी पोटात इतकी गच्च बसली होती की भूकेची जाणीवही झाली नाही. कॉफीमुळे शरीर रिफ्रेश झाल आणि समीरच्या गप्पांमुळे मन.. पण नेमकी तेव्हा आमच्याबरोबर गार्गी होती. पण आत्ता मी आणि समीर एकत्र डिनर करु शकतो. फक्त मी आणि समीर..... या कल्पनेनेही हुरळून गेले होते मी. समीर अजूनही केबिनमध्येच होता. काय कराव काहीच कळत नव्हतं. समीरच्या केबिनमध्ये जाऊन समीरला डिस्टर्ब करण माझ्या प्रोफेशनल मनाला पटत नव्हतं. पण माझ प्रेमात पडलेल मन मला सांगत होतं जा त्याच्या केबिनमध्ये आणि आग्रहाने त्याला डिनरला घेऊन जा, "everything is fair in love & war." जवळपास अर्धा तास याच विचारात गेला आणि अखेर हिम्मत करुन मी समीरच्या केबीनमध्ये गेले. पण तिथे मी जे काही बघितल ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 

.....तिथे गार्गी आणि समीरला "त्या अवस्थेत" एकत्र बघून मला धक्काच बसला. मी आल्या पावली माघारी फिरले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. सुदैवाने दोघांनाही कळल नव्हतं मी तिथे जाऊन आलेले. ते दोघेही एकमेकांमध्येच मश्गूल होते. डोकं सुन्न झालं होतं. मनातले विचार थांबत नव्हते...  "म्हणजे इतके दिवस गार्गी खेळत होती माझ्या भावनांशी? जर तिच आणि समीरच अफेअर होत तर का नाही सांगितल तिने मला? का लपवलं सगळं माझ्यापासून? का माझी मजा बघत राहिली? राग, संताप, दु:ख सगळ्या भावना मनात एकत्र दाटल्या होत्या. मनात सतत एकच वाक्य घोळत होतं, "everything is fair in love & war."

   नाही नाही. मी नाही मारलं गार्गीला तो एक अपघात होता. ती वॉशरुममध्ये घसरुन पडली. माझा चुकून धक्का लागला तिला. तिथे सांडलेल्या हॅन्डवॉशवरुन ती घसरली आणि भिंतीवर जाऊन आदळली. तो हॅन्डवॉशही माझ्या हातून चुकून सांडला होता. तिथे हात धुण्यासाठी हॅंडवॉश हातावर घेत होते तर हॅन्डवॉशची बॉटल  खाली पडली आणि हॅन्डवॉश सांडला. खरतर त्यावेळी हॅंडवॉश सांडला होता हे लक्षातसुद्धा आल नाही माझ्या. गार्गी ऑफिसमध्ये आहे हेसुद्धा मला माहिती नव्हतं.

......हे सगळ मी पोलिसांच्या जबानीत सांगितल आणि त्यांनीही ते खर मानलं. नशीब वेळीच लक्षात आल म्हणून ऑफिसमधला सिसिटिव्ही मी बिघडवून ठेवला आणि तो बिघडवण्यापूर्वी मी आठवणीने आधीच्या काही तासांचे फुटेज डीलिट करुन ठेवले होते. पोलिसांना माझ्यावर संशय यायला कुठलीही जागा ठेवली नाही मी. सिसिटिव्हीचे फुटेज डिलिट करुन वॉशरुममध्ये गेले आणि समीरला हाक मारली. मी ही मला धक्का बसल्याच दाखवल आणि पुन्हा समीरने मला आधार दिला. त्यानिमित्ताने निदान काही क्षण त्याच्या मिठीत घालवता आले. पोलिस जबानी घेत असतानाही समीर सावलीसारखा माझ्यासोबत होता. पण आता वेळ घालवायला नको आता समीरला तरी आपल्या प्रेमात पाडायलाच हवं.
   
खरतर गार्गीसाठी मी मंदारची निवड केली होती पण.... ती शेवटी आपल्या कर्मानेच मेली. मंदारसोबत सुखाने राहिली असती जशी आज स्वरुप आणि रुपाली रहात आहेत.

   तो मूर्ख जतीन त्याला फक्त वन नाईट स्टॅंडसाठी माझं शरीर हवं होतं. प्रेमाच नाटक करत होता माझ्याशी आता हॅऱॅशमेंटच्या केसमध्ये असा अडकला आहे की सहजी बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळेच रियाचीही जिरली. आधी माझ्या आणि केदारच्या मध्ये आली. तिच्यामुळे केदार दुरावला माझ्यापासून. नाहीतर मी आज केदारसोबत अमेरिकेमध्ये छान सेटल झाले असते. रियालाही आता चांगलच कळलं असेल, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने दुसऱ्या मुलीमध्ये इंटरेस्ट घेतला की कसं होतं ते.

   खरतर स्नेहानेही प्रयत्न केला होता माझ्या आणि केदारच्या मध्ये यायचा, पण मोठ्या हुशारीने तिला केदारपासून लांब ठेवल होतं. तिला आणि केदारला एकत्र आणणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे रुपाली. रुपालीचा स्वरुपकडचा ओढा बघितला आणि तिला स्वरूपमध्ये गुंतवण्याची युक्ती मला सुचली पण तो बावळट स्वरुप रूपालीसारखी सुंदर मुलगी सोडून त्या मायाच्या प्रेमात पडला होता. पण सुदैवाने मायाच लग्न ठरल आणि माझा रस्ता मोकळा झाला. पण शेवटी रिया आलीच माझ्या वाटेत. अर्थात त्याचाच परिणाम भोगतेय ती. खूप प्रयत्न करावे लागले मला तिला केदारपासून वेगळं करण्यासाठी. तिच आणि जतीनचं जुळणं तस कठीण नव्हतं. पोरी पटवण्यात जतीन हुशारच. फक्त माझ्यासमोर त्याची डाळ शिजली नाही. पण दु:खात बुडालेल्या रियाला त्याने अगदी सहज सावरलं आणि रिया केदारपासून दुरावली. रियाला दु:खात बुडवण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या अपघाती मृत्यूची बातमी केदारपर्यंत पोचू नये याची मी पुरेपूर काळजी घेतली.

    नाही.... मी नाही मारलं तिच्या आईवडिलांना. तो मात्र खरच एक अपघात होता. मी फक्त त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करुन ठेवले होते. काय करणार दुसरं? केदारच्या घरी दोघांच लग्न ठरवायला जात होते ते. मग मी कशी सहन करणार होते ही गोष्ट. आई वडील जाऊनही केदार आला नाही. इतकच काय तर त्याने साधा फोनही केला नाही म्हणून रिया भडकली तर रियाने कळवलं नाही म्हणून केदार तिच्यावर चिडला. या भांडणाचा फायदा जतीनने उठवला आणि तो रियाच्या जवळ आला. केदारला रिया आणि जतीनविरुद्ध भडकवण्यासाठी मला तसे फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. रियाच्या बाबतीतला त्याचा पझेसिव्हनेस पुरेसा होता यासाठी. पण या ब्रेकअप प्रकरणामुळे केदारचं इंडियात येणं लांबणीवर पडल. नेमका त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात समीर आला.
आता मला समीरला गमवायच नाहीये. माझ्या आयुष्यातल हे वर्तुळ समीर माझा झाल्यावरच पूर्ण होइल. या वर्तुळात अनेकजण आले आणि गेले पण हे वर्तुळ अजूनही पूर्ण झाल नाही. लवकरच समीरला माझ्यात गुंतवायला हवं नाहीतर या वर्तुळाचा व्यास वाढतच जाईल.

  मी कोणालाही मारलं नाही. हे सगळे अपघात होते. पण आता मला अजून कुठलाही अपघात बघायची इच्छा नाही. त्यामुळे हे वर्तुळ पूर्ण झालच पाहिजे....

©मानसी जोशी








Saturday, 10 March 2018

जागतिक महिला दिन

काल जागतिक महिला दिन साजरा केला गेला. खरतर जागतिक या शब्दाची मला जरा गंमतच वाटते. बहुतांश वेळा #जागतिक असणाऱ्या गोष्टी या फक्त शहरांपुरत्याच किंवा "ठरावीक" क्लासपुरत्याच मर्यादित असतात. खेड्या पाड्यातल्या अनेक  लोकांना याबद्दल काहीच माहिती नसते किंवा माहिती असली तरी त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नसतं.

    अनेक महिला, "आमची कोणाला काळजी आहे?" असा सूर नेहमी आळवत बसतात. महिला दिनानिमित्त मेडिकल फिल्डमध्ये हेल्थ चेकअपवर विविध प्रकारची डिस्काउंट्स ऑफर केली जातात. किती महिला याचा लाभ घेतात? आणि ज्या महिला याचा लाभ घेतात त्यांच्यामध्ये गरीब किंवा गरजू महिलांच प्रमाण नगण्य आहे. ही खरोखरच खेदाची बाब आहे. आपली काळजी आपणच घ्यायला हवी हे कधी पटणार?

  काल स्त्री ची महती सांगणाऱ्या अनेक पोस्ट्स वाचनात आल्या. काही आवडल्या, पटल्या; काही नाही पटल्या. माझ्या मते खरा महिला दिन तेव्हाच सेलिब्रेट होइल जेव्हा स्त्री हिच स्त्री ची शत्रू असते हे वाक्य खोटं ठरेल.

बहुतांश वेळा "ती"ला समजून घेणारा "तो" असतो. हा "तो" कोणीही असू शकतो; भाऊ, मित्र, वडील, सासरा, दिर... कोणीही.
ऑफिसमध्ये लेडी बॉसपेक्षा जेड्स बॉसच अडचणी व्यवस्थित समजून घेतात.

   आज जवळपास ५०% ते ६०% घटस्फोटांच कारण हे मुलाच्या आईचा आणि बहिणीचा किंवा मुलीच्या आईचा संसारातला हस्तक्षेप हे आहे.

   आजही सर्रासपणे स्त्री भ्रूण हत्या होते. दुर्दैवाने याचं प्रमाण शिक्षित कुटुंबात जास्त आहे. हो शिक्षितच कारण शिक्षणाने माणूस फक्त शिक्षित होतो सुशिक्षित होतोच असं नाही.
   माझ्या माहितीतल्या एका कुटुंबातल्या मोठ्या मुलाला मुलगी होती. धाकट्या मुलाची बायको जेव्हा गरोदर राहिली तेव्हा त्या मुलाच्या आईचे उद्गार ऐकून मी थक्क झाले. त्या मुलाची आई म्हणाली, "मी आयुष्यात काही पुण्य केल असेन तर हिला मुलगा होइल." म्हणजे मुलगी जन्माला आली तर बाईसाहेबांनी पाप केल आहे असा अर्थ होतो का? हे असं बोलणं म्हणजे स्वतःच्या जन्माचा, स्त्रीत्वाचा अपमान आहे असा विचार एक क्षणही त्या बाईंच्या मनात आला नसेल? त्या मुलाची बहीण आपल्या भावाला मुलगा व्हावा म्हणून नवस बोलली होती. हे असे प्रसंग बघितले की खरच खूप संताप येतो.

   मॉर्निंग वॉकला बायकांचा ग्रूप चालताना दिसला की हमखास सूनेविषयी किंवा नणंदेविषयीच्या कागाळ्याच बहुतांश वेळा ऐकू येतात
  मध्यंतरी एक मैत्रीण बोलताना सहज म्हणाली, "माझी सासू माझा आधार आहे". हे ऐकल्यावर अगदी मनापासून त्या दोघींचही कौतुक वाटल. सूनेच्या करिअरसाठी घराची आणि नातवडांची जबाबदारी स्विकारणाऱ्या बायकाही आहेत अगदीच नाही असं नाही. पण त्याच प्रमाण खूप कमी आहे. पण हळूहळू हे प्रमाण वाढेल अशी आशा ठेवूयात. खरतर हे प्रमाण वाढायला हवं तरच भविष्यात खऱ्या अर्थाने "महिला दिन" साजरा होइल अन्यथा महिला "दीन" बनूनच रहातील.

©मानसी जोशी
   ०९/०३/२०१८

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...