#वर्तुळ
"कितीदा नव्याने तुला आठवावे... " हे गाणं कानावर पडल आणि मंदारची आठवण आली. गेल्यावर्षी ऑफिसच्या ॲन्युअल इव्हेंटला हे गाणं किती मस्त म्हटल होतं त्याने. अस वाटत होतं गाण्याचे सूर त्याच्या हृदयातून येत आहेत; खरोखरच कोणाला तरी आठवून गातोय हा. खरच मंदारच प्रोफेशन चुकलय. संगीत त्याच्या रक्तात भिनलय. खरतर त्याने कलाक्षेत्रात असायला हवं होतं. पण आज फायनान्स सारख्या रुक्ष सेक्टरमध्ये नोकरी करतोय. त्यादिवशी गिटारही किती छान वाजवत होता. त्याला गिटार वाजवताना बघून "तुमसेही दिन होता हैं..." या गाण्यातला शाहिद कपूर आठवला होता.
खरतर शाहिद कपूर म्हटल की मला नेहमी स्वरुप आठवतो. स्वरुप तर शाहिद कपूरची झेरॉक्स कॉपी आहे. मायाच लग्न ठरलं तेव्हा "ऑखोंमे तेराही चेहरा...." म्हणणाऱ्या शाहिदसारखीच अवस्था झाली होती त्याची. तेव्हा रुपालीने मात्र त्याला सावरल ते नेहमीसाठीच. आज दोघ अगदी सुखाचा संसार करत आहेत. खरतर स्वरुपसाठी नेहमी रुपालीच योग्य होती.
रुपाली!!! कुरळ्या केसांची, घाऱ्या डोळ्यांची गोड मुलगी. कॉलेजला असताना कितीतरी मुलं वेडी झाली होती तिच्यासाठी. पण तिने मात्र सुरवातीपासूनच फक्त स्वरुपवरच प्रेम केलं. काय बरं चिडवायची तिला स्नेहा? हा ॐकार स्वरुपा ....
स्नेहा!!! रुपालीची अगदी जीवलग मैत्रीण. स्नेहा आणि रुपाली शाळेपासूनच्या खास मैत्रीणी. पुढे कॉलेजला आल्यावरही त्यांची मैत्री कायम राहिली. स्नेहाला खरतर केदार मनापासून आवडायचा पण पठ्ठीने कधीही मान्य केलं नाही ते. मी आणि केदार एकाच शाळेत असल्यामुळे सतत आडूनआडून माझ्याकडून केदारबद्दल जाणून घ्यायची.
केदार!!.... लहानपणापासूनच बघितलेल US ला जाऊन सेटल व्हायचं स्वप्न अगदी जिद्दीने पूर्ण केल त्याने. आता रियाशी ब्रेक अप झाल्यानंतर जणू भारताशी संबंधच संपला त्याचा.
रिया तरी कशी आहे. मनापासून प्रेम करणाऱ्या जेंटलमन केदारशी ब्रेकअप करून सतत मुलींशी फ्लर्ट करणाऱ्या जतीनसोबत लग्न केल तिने.
जतीन!!! माझा बॉस! एकेकाळी माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा. मी रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यावर अक्षरशः चरफड व्हायची त्याची. गेल्यावर्षी ऑफिसच्या ॲन्युअल गॅदरिंगच्या वेळी तर अगदी गळ्यातच पडत होता माझ्या. सुदैवाने समीर तिथे आला आणि मी सुटले.
समीर!!!!.... कुठलाही विषय मनात आला की नेहमी तुझ्यापाशीच का येउन थांबतो? मी खरच प्रेमात पडलेय का तुझ्या? गार्गीही असच म्हणायची. पण मलाच काही कळत नाहीये.
गार्गी!!! आजही आठवतोय तो दिवस आणि वॉशरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गार्गी... त्यानंतर सुरु झालेला पोलिस तपास आजही चालू आहे. खरच तो एक अपघात होता का खून?
आदल्या रात्री मी उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबले होते. समीरही होता माझ्यासोबत; खरतर मी होते समीरसोबत. भरपूर वर्कलोड त्यामुळे सहाजिकच भरपूर कामं पेंडिंग होती. मी नेहमीच सकाळी लवकर जाऊन कामं पूर्ण करते. पण त्यादिवशी समीर थांबणार होता. त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळणार म्हणून मी मुद्दाम थांबले होते. खरच आवडतो मला समीर. त्याच बोलणं, हसणं सगळच. सतत त्याच्यासोबत रहावस वाटत. ऑफिसमध्ये मात्र कामात कधी गुंग झाले ते माझ मलाच कळल नाही. घडाळ्यात नऊचे ठोके पडले आणि मी एकदम भानावर आले. सात वाजता समीरसोबत घेतलेली मगभर कॉफी पोटात इतकी गच्च बसली होती की भूकेची जाणीवही झाली नाही. कॉफीमुळे शरीर रिफ्रेश झाल आणि समीरच्या गप्पांमुळे मन.. पण नेमकी तेव्हा आमच्याबरोबर गार्गी होती. पण आत्ता मी आणि समीर एकत्र डिनर करु शकतो. फक्त मी आणि समीर..... या कल्पनेनेही हुरळून गेले होते मी. समीर अजूनही केबिनमध्येच होता. काय कराव काहीच कळत नव्हतं. समीरच्या केबिनमध्ये जाऊन समीरला डिस्टर्ब करण माझ्या प्रोफेशनल मनाला पटत नव्हतं. पण माझ प्रेमात पडलेल मन मला सांगत होतं जा त्याच्या केबिनमध्ये आणि आग्रहाने त्याला डिनरला घेऊन जा, "everything is fair in love & war." जवळपास अर्धा तास याच विचारात गेला आणि अखेर हिम्मत करुन मी समीरच्या केबीनमध्ये गेले. पण तिथे मी जे काही बघितल ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली.
.....तिथे गार्गी आणि समीरला "त्या अवस्थेत" एकत्र बघून मला धक्काच बसला. मी आल्या पावली माघारी फिरले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. सुदैवाने दोघांनाही कळल नव्हतं मी तिथे जाऊन आलेले. ते दोघेही एकमेकांमध्येच मश्गूल होते. डोकं सुन्न झालं होतं. मनातले विचार थांबत नव्हते... "म्हणजे इतके दिवस गार्गी खेळत होती माझ्या भावनांशी? जर तिच आणि समीरच अफेअर होत तर का नाही सांगितल तिने मला? का लपवलं सगळं माझ्यापासून? का माझी मजा बघत राहिली? राग, संताप, दु:ख सगळ्या भावना मनात एकत्र दाटल्या होत्या. मनात सतत एकच वाक्य घोळत होतं, "everything is fair in love & war."
नाही नाही. मी नाही मारलं गार्गीला तो एक अपघात होता. ती वॉशरुममध्ये घसरुन पडली. माझा चुकून धक्का लागला तिला. तिथे सांडलेल्या हॅन्डवॉशवरुन ती घसरली आणि भिंतीवर जाऊन आदळली. तो हॅन्डवॉशही माझ्या हातून चुकून सांडला होता. तिथे हात धुण्यासाठी हॅंडवॉश हातावर घेत होते तर हॅन्डवॉशची बॉटल खाली पडली आणि हॅन्डवॉश सांडला. खरतर त्यावेळी हॅंडवॉश सांडला होता हे लक्षातसुद्धा आल नाही माझ्या. गार्गी ऑफिसमध्ये आहे हेसुद्धा मला माहिती नव्हतं.
......हे सगळ मी पोलिसांच्या जबानीत सांगितल आणि त्यांनीही ते खर मानलं. नशीब वेळीच लक्षात आल म्हणून ऑफिसमधला सिसिटिव्ही मी बिघडवून ठेवला आणि तो बिघडवण्यापूर्वी मी आठवणीने आधीच्या काही तासांचे फुटेज डीलिट करुन ठेवले होते. पोलिसांना माझ्यावर संशय यायला कुठलीही जागा ठेवली नाही मी. सिसिटिव्हीचे फुटेज डिलिट करुन वॉशरुममध्ये गेले आणि समीरला हाक मारली. मी ही मला धक्का बसल्याच दाखवल आणि पुन्हा समीरने मला आधार दिला. त्यानिमित्ताने निदान काही क्षण त्याच्या मिठीत घालवता आले. पोलिस जबानी घेत असतानाही समीर सावलीसारखा माझ्यासोबत होता. पण आता वेळ घालवायला नको आता समीरला तरी आपल्या प्रेमात पाडायलाच हवं.
खरतर गार्गीसाठी मी मंदारची निवड केली होती पण.... ती शेवटी आपल्या कर्मानेच मेली. मंदारसोबत सुखाने राहिली असती जशी आज स्वरुप आणि रुपाली रहात आहेत.
तो मूर्ख जतीन त्याला फक्त वन नाईट स्टॅंडसाठी माझं शरीर हवं होतं. प्रेमाच नाटक करत होता माझ्याशी आता हॅऱॅशमेंटच्या केसमध्ये असा अडकला आहे की सहजी बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळेच रियाचीही जिरली. आधी माझ्या आणि केदारच्या मध्ये आली. तिच्यामुळे केदार दुरावला माझ्यापासून. नाहीतर मी आज केदारसोबत अमेरिकेमध्ये छान सेटल झाले असते. रियालाही आता चांगलच कळलं असेल, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने दुसऱ्या मुलीमध्ये इंटरेस्ट घेतला की कसं होतं ते.
खरतर स्नेहानेही प्रयत्न केला होता माझ्या आणि केदारच्या मध्ये यायचा, पण मोठ्या हुशारीने तिला केदारपासून लांब ठेवल होतं. तिला आणि केदारला एकत्र आणणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे रुपाली. रुपालीचा स्वरुपकडचा ओढा बघितला आणि तिला स्वरूपमध्ये गुंतवण्याची युक्ती मला सुचली पण तो बावळट स्वरुप रूपालीसारखी सुंदर मुलगी सोडून त्या मायाच्या प्रेमात पडला होता. पण सुदैवाने मायाच लग्न ठरल आणि माझा रस्ता मोकळा झाला. पण शेवटी रिया आलीच माझ्या वाटेत. अर्थात त्याचाच परिणाम भोगतेय ती. खूप प्रयत्न करावे लागले मला तिला केदारपासून वेगळं करण्यासाठी. तिच आणि जतीनचं जुळणं तस कठीण नव्हतं. पोरी पटवण्यात जतीन हुशारच. फक्त माझ्यासमोर त्याची डाळ शिजली नाही. पण दु:खात बुडालेल्या रियाला त्याने अगदी सहज सावरलं आणि रिया केदारपासून दुरावली. रियाला दु:खात बुडवण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या अपघाती मृत्यूची बातमी केदारपर्यंत पोचू नये याची मी पुरेपूर काळजी घेतली.
नाही.... मी नाही मारलं तिच्या आईवडिलांना. तो मात्र खरच एक अपघात होता. मी फक्त त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करुन ठेवले होते. काय करणार दुसरं? केदारच्या घरी दोघांच लग्न ठरवायला जात होते ते. मग मी कशी सहन करणार होते ही गोष्ट. आई वडील जाऊनही केदार आला नाही. इतकच काय तर त्याने साधा फोनही केला नाही म्हणून रिया भडकली तर रियाने कळवलं नाही म्हणून केदार तिच्यावर चिडला. या भांडणाचा फायदा जतीनने उठवला आणि तो रियाच्या जवळ आला. केदारला रिया आणि जतीनविरुद्ध भडकवण्यासाठी मला तसे फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. रियाच्या बाबतीतला त्याचा पझेसिव्हनेस पुरेसा होता यासाठी. पण या ब्रेकअप प्रकरणामुळे केदारचं इंडियात येणं लांबणीवर पडल. नेमका त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात समीर आला.
आता मला समीरला गमवायच नाहीये. माझ्या आयुष्यातल हे वर्तुळ समीर माझा झाल्यावरच पूर्ण होइल. या वर्तुळात अनेकजण आले आणि गेले पण हे वर्तुळ अजूनही पूर्ण झाल नाही. लवकरच समीरला माझ्यात गुंतवायला हवं नाहीतर या वर्तुळाचा व्यास वाढतच जाईल.
मी कोणालाही मारलं नाही. हे सगळे अपघात होते. पण आता मला अजून कुठलाही अपघात बघायची इच्छा नाही. त्यामुळे हे वर्तुळ पूर्ण झालच पाहिजे....
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment