Thursday, 29 June 2017

पावसाळा

असेल बुवा रोमॅन्टिक वगैरे वाटत हा पावसाळा! पण मला मात्र हा पावसाळा कधीच आवडला नाही. हा तसं रोमॅन्टिक कथा कविता वाचून पावसाळा आवडून घ्यायचा खूप प्रयत्न केला मी, पण नाहीच आवडला कधी मला.
     शाळेत असताना पावसाळा न आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे पी.टी. च्या पिरिएडला खेळायला बाहेर जायला मिळायचं नाही.( आमच्या शाळेत गेम्स आणि पी.टी. असे वेगळे पिरिएड्स नव्हते. फक्त शनिवारी त्या कवायती वगैरे व्हायच्या पी.टी. च्या पिरिएडला बाकी इतर दिवशी फक्त खेळ). मग शिक्षकांचा मूड चांगला असेल तर वर्गात भेंड्या, नाव-गाव-फळ-फूल, असे खेळ खेळले जायचे. मूड नसेल तर संपलच.. करा अभ्यास,  सोडवा गणितं किंवा अगदीच काही नसेल तर कविता पाठ करा असं सांगण्यात यायचं. शाळेत तर नाहीच पण घरी आल्यावर पण अंगणात साचलेल्या पाण्यामुळे  आणि  चिखलामुळे खेळायला मिळायचं नाही.  दुसरं कारण म्हणजे पावसाळी सॅन्डल्स! आमच्या शाळेत पायातले शूज हा स्कूल युनिफॉर्मचा एक भाग नव्हता. त्यामुळे ऋतूप्रमाणे चप्पल खरेदी व्हायची. त्यात त्या पावसाळ्यात वापरायच्या 'चपाक चपाक' आवाज करणाऱ्या सॅन्डल प्रचंड बोअर प्रकार असे. त्याच्यात ठरलेली डिझाइन्स त्यामुळे अनेक जणींच्या सॅन्डल्स एकसारख्याच असायच्या. बरं त्या वापरुन  चिखल उडत नाही असं कधी घडलं नाही. मग त्या का वापरायच्या हे आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे.
     पुढे कॉलेजला जायला लागल्यावर तर पावसाने माझा अक्षरश: छळ मांडला. कॉलेजला युनिफॉर्म हा प्रकार नव्हता त्यामुळे रोज वेगवेगळे ड्रेस घालायचं स्वातंत्र्य तिथे मिळालं. माझा वाढदिवस मे  महिन्यामध्ये येत असल्याने मला  अनेक नवीन ड्रेस तेव्हा मिळत असत. ते नवीन ड्रेस कॉलेजला वापरायची प्रचंड उत्सुकता तेव्हा असायची पण पावसामुळे ते कधीच शक्य झालं नाही आणि  पावसाळा संपेपर्यंत त्या ड्रेसबाबतचा  सगळा उत्साह मावळलेला असायचा. सगळ्यात जास्त वैताग यायचा तो सुट्टीच्या दिवशी. दिवसभर घरात बसून वैताग यायचा; खासकरून संध्याकाळ जास्त कंटाळवाणी जायची. कारण मला संध्याकाळी घरात बसायला कधीच  आवडत नाही. पण पावसामुळे कुठे जायची पण इच्छा व्हायची नाही. पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रावर जायलाही  घरातून परवानगी मिळायची नाही. कारण समुद्राला उधाण आलेलं असायचं.
    मी घरातून कॉलेजला  जायला निघायची आणि पावसाची वेळ नेहमी एक असायची. अगदी पाच मिनिटांपूर्वी उन असायचं आणि मी घरातून  निघाले की अचानक अंधारुन यायचं आणि पावसाला सुरुवात व्हायची. मी वैतागायचे मग आई म्हणायची, "अगं चिडतेस काय पावसाचेच दिवस आहेत मग पाऊस पडणारच ".
   तर एकूणच पावसाळा हा मला लहानपणापासूनच न आवडणारा. त्या ओल्या चिखल पसरलेल्या रस्त्यावरुन छत्री सावरत चालायचं. कधी वाऱ्यामूळे छत्री उलटी होते तर कधी कोणाला तरी लागायची भीती.  या सगळ्या प्रकारात अंग अर्धअधिक भिजलेलं असतं.  बरं रेनकोट तर त्याहीपेक्षा बोअर!
    त्यातल्या त्यात या पावसाळ्यात आवडणारी एकच गोष्ट म्हणजे; घरातल्या खिडकीत बसून बाहेर मुसळधार पडणारा पाऊस बघत आवडती गाणी ऐकणे आणि जोडीला आलं घातलेला कडक चहा किंवा वाफाळणारी कॉफी!  पण पुण्यात आल्यापासून मुसळधार पाऊस क्वचितच बघायला मिळतो.
    मला पाऊस आवडत नसला तरी पावसामुळे हिरवीगार झालेली सृष्टी बघायला मात्र फार आवडते.पावसात फिरायला आवडत नसलं तरी  पाऊस पडून गेल्यावर बाईकवरुन फिरण्याचा आनंद काही वेगळाच.
   सुदैवाने 'अहों'नाही पाऊस आवडत नाही त्यामुळे मी निर्धास्त झाले आणि पाऊस आवडून घेण्याचा अट्टाहास किंवा प्रयत्न अगदी आनंदाने सोडून दिला.
©मानसी जोशी

Sunday, 18 June 2017

प्रिय बाबांस....

प्रिय बाबांस,
  आज खरं तर लिहू का नाही हा विचारच करत होते मी. पण नंतर विचार केला आज नाही लिहिलं तर कधी लिहिणार? आज फादर्स डे! खरं तर हे डेज वगैरे असल्या गोष्टी तुम्हाला माहितही नसतील. पण तरीही आजपर्यंत ज्या गोष्टी कधी बोलून दाखवता आल्या नाहीत त्या थोडक्यात लिहायचा प्रयत्न करते. खूप काही लिहावसं वाटतय पण मनातल्या भावना शब्दात मांडणं तसं कठीण आहे. तरीही मी प्रयत्न करते.
       लहानपणीचं फार काही नाही आठवत पण तुम्ही, आईने आणि इतरांनी सांगीतलेले माझ्या बालपणीचे काही किस्से मात्र चांगलेच लक्षात आहेत. त्यावेळी तुमच्याकडे 'स्पार्क' का 'लूना' कुठलीतरी गाडी होती. तुम्ही ऑफिसमधून आल्यावर आधी मला गाडीवर बसवून दोन राउंड अंगणात मारायचे आणि मग घरात यायचं, हा तुमचा ठरलेला दिनक्रम. अर्थात मला आठवत नाही काही यातलं पण एक गोष्ट मात्र जाणवतेय हे सारं तुम्ही आनंदाने करायचात ते सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन; १०/१२ किलोमीटरचा प्रवास, तो ही डांबरी किंवा सिमेंट कॉन्क्रिट रस्त्यावरचा नव्हे तर साध्या लाल मातीचा धुरळ्याच्या रस्त्यावरचा प्रवास करुन आल्यावर.  पण कॉलेजला गेल्यावर जेव्हा मला स्वतःची गाडी घेउन दिलीत तेव्हा मात्र कुठलही काम सांगताना तुम्ही 'जमेल का' असं आवर्जून विचारत होतात. अर्थात आजही त्यात काहीच बदल झालेला नाही. आईची शाळेतली शिक्षिकेची नोकरी. त्यावेळी तिची शाळा दोन शिफ्टमध्ये चालायची. आईची सकाळ शिफ्ट होती. त्यामुळे तिला  पहाटे चार वाजताच उठावं लागे. आई उठली की मी पण लगेच उठून बसायचे. मग सहाजिकच आई वैतागायची पण तेव्हा आईला त्रास नको आणि ती माझ्यावर वैतागायला नको म्हणून तुम्हीसुद्धा पहाटे उठून मला सांभाळत होतात. या सगळ्या झाल्या ऐकिवातल्या गोष्टी. पण एक प्रसंग मात्र मला चांगलाच आठवतोय. मी तेव्हा सहावीत होते. तुमची ट्रान्स्फर तेव्हा मुंबईला होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा अनुभव अगदी ताजाच होता. त्यावेळी तुम्ही मुंबईला परत जायला निघाल्यावर मात्र मी तुम्हाला घट्ट मिठी मारुन रडत नको जाऊ म्हणून विनवत होते.कारण एकच; बॉम्बस्फोटची भीती! मला कसंबसं समजावून  जडावलेल्या पावलांनी तुम्ही मुंबईला गेलात.
    जसजसं वय वाढत गेलं तसतशी माझी स्वतःची मतं बनत गेली. तुमची आणि माझी मतं फारशी कधीच जुळली नाहीत. तुमचा दिलदार आणि साधा भोळा स्वभाव, चटकन कोणालाही मदत करण्याशी वृत्ती, या उलट मी मात्र माणूस पारखून वागणारी. यावरुन अनेकदा आपले वाद व्हायचे/ होतात. लॉ कॉलेजला असताना कॉलेज डेजच्या वेळी रात्री घरी यायला उशीर झाला म्हणून झालेली तुमची चिडचिड आजही आठवतेय.तसं लॉ कॉलेजचं टायमिंगही संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ. म्हणूनच कदाचित जेव्हा मोबाईल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा स्वतःसाठी मोबाईल न घेता तुम्ही आधी माझ्यासाठी मोबाईल घेतलात.
    लग्नाच्या दिवशी पाठवणीच्या वेळी ओक्साबोक्शी रडणाऱ्या मला बघून कधीही न रडणारे तुम्हीही खूप हळवे झाला होतात.  तुमचेही डोळे पाणावले होते. त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माहेरी आले तेव्हा सगळ्यांनी रडूबाई म्हणून खूप चिडवलं पण नेहमी रडत कसली बसतेस म्हणणारे तुम्ही मात्र अगदी गप्प बसला होतात.
     लग्नानंतर तुम्ही लहानपणापासून सांगितलेल्या पण तेव्हा  फारशा सिरिअसली न  घेतलेल्या गोष्टी हळूहळू पटत गेल्या. त्यांचं महत्व लक्षात आलं.  आयुष्यात कधीही कुठलाही प्रॉब्लेम येउदे  'बाबा' आहेत हा विश्वास होता/आहे.
     प्रत्येक बाबांची मुलगी लाडकी असते आणि आईचा मुलगा हे तर निर्विवाद सत्य आहे. आईचा मयुरेश जास्त लाडका आहे हे ती कधीच मान्य करत नाही पण तुम्ही मात्र मी जास्त लाडकी आहे हे प्रामाणिकपणे मान्य करता. गेल्यावर्षी तुम्ही ॲडमिट असताना मला पुण्याहून भर पावसात रत्नागिरीला यावं लागलं याचं तुम्हाला वाईट वाटत होतं पण त्याचवेळी मी भेटल्याचा आनंदही झाला होता आणि म्हणूनच कि काय तुम्ही फ्रेश दिसू लागलात. तेव्हा तुमच्यातला हा बदल बघून हॉस्पिटलमधली नर्सही हसून म्हणाली, 'काका लेक आल्यावर अर्धा आजार पळाला तुमचा....'
    तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहात असं मी कधीही म्हणणार नाही. पण तुम्ही माझा आधार आहात बाबा! आणि जगण्यासाठी आधाराचीच गरज असते.अजून काय लिहू ? लिहिण्यासारखं खूप काही आहे पण प्रत्येक गोष्ट शब्दात नाही मांडता येत. खरं सांगायचं तर एका मुलीवर जेवढं प्रेम तिचे वडील करतात तेवढं जगात कोणीच करु शकत नाही. अगदी आईसुद्धा नाही! म्हणूनच असेल कदाचित पण मुली 'डॅडाज गर्ल' असतात.
©मानसी जोशी

Thursday, 8 June 2017

वटपौर्णिमा आणि मी

मी नाही करत वडाची पूजा;
   जरीची साडी नेसून, दागिने घालून नटून सजून वडाच्या झाडाची पूजा करुन वाण वाटणे.... नाही साजरी करत अशी वटपोर्णिमा. पण नवऱ्यावर जीवावर बेतणारं संकट आलं तेव्हा मात्र वेस्टर्न कपडे घालूनच खंबीरपणे त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याची सेवा केली. प्रसंगी दागदागिने विकायचीही तयारी दाखवली.
     नवऱ्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना नाही करत वडाकडे. पण त्याचं डाएट मात्र शक्य तेवढं सांभाळते. त्याची तब्बेत चांगली रहावी म्हणून सारे प्रयत्न करते.
      वडाला दोरा गुंडाळत नाही पण नात्यांची गुंफण करायला अगदी छान जमलं मला.
      वडाची पूजा करत नाही पण कुठलही झाड कधी तोडलं नाही. अगदी कुठल्या झाडाची फांदीही कधी तोडली नाही.
    मी वटपौर्णिमेच्या सणाच्या विरोधात नाही. मला धार्मिक प्रथांचा आदर आहे कारण त्यामागे सामाजिक आणि शास्त्रीय कारणे आहेत हे मला ठावूक आहे. खर तर मला त्या कारणांचाच  आदर जास्त आहे. म्हणूनच कुठलीही रुढी परंपरा आंधळेपणाने पाळणं मला जमत नाही. म्हणूनच साऱ्या निसर्गालाच  नमस्कार करते रोज कारण निसर्ग कोपला तर केवळ विनाशच ..

©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...