Showing posts with label आठवणींची डायरी. Show all posts
Showing posts with label आठवणींची डायरी. Show all posts

Wednesday, 6 March 2019

ज्वाला मंदिर - एक अविस्मरणीय अनुभव

ट्रिपचं प्लॅन करत असताना नेटवर अचानक एक ठिकाण दिसतं आणि ते ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये must visit place मध्ये ऍड केलं जातं.अगदी तसंच झालं…
हिमाचल प्रदेशमधील टुरिस्ट प्लेसेस नेटवर सर्च करत असताना ज्वालामुखी मंदिराची माहिती मिळाली. का कुणास ठाऊक पण या मंदिराबद्दल मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि नेटवरून त्याबद्दलची अजून माहिती मिळवली. जितकी माहिती मिळत गेली तितकी उत्सुकता वाढत गेली आणि काही झालं तरी या ठिकाणी जायचंच असं ठरवलं.
ट्रिपच्या सुरुवातीच्या दोन दिवसांचं प्लॅनिंग पाऊस आणि स्नो फ़ॉलमुळे विस्कळीत झालं होतं. मी नेटवर सतत तिथलं वेदर फोरकस्ट बघत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथलं वेदर फोरकस्ट अगदी परफेक्ट येत होतं. तिसऱ्या दिवशी ऊन पडावं म्हणून सतत मनात देवाला प्रार्थना करत होते. पहिल्यांदा बघताना स्नो फॉल कितीही आनंददायी वाटत असला तरी सततच्या स्नो फॉलमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मनात एक प्रकारचं डिप्रेशन येतं. त्यात तिकडचं मायनस टेम्प्रेजरही सोसवत नव्हतं. ही ट्रिप अशीच फुकट जाणार असा निगेटिव्ह विचार सतत मनात येत होता.
तिसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर सर्वात आधी रूममधल्या खिडकीचे पडदे बाजूला करून बाहेर बघितलं आणि तिथलं सुंदर दृष्य बघून हरखून गेले. बर्फाची शाल पांघरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणे. सृष्टीच्या सौंदर्याचा अवर्णनीय नजारा! तब्बल दोन दिवसानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले होते. क्षणात रूमचा दरवाजा उघडून गॅलरीत गेले आणि सर्वात आधी सूर्यनारायणाला नमस्कार केला. सूर्य म्हणजे ऊर्जेचा स्रोत! मनातली सगळी मरगळ दूर करण्याचं त्या कोवळ्या किरणांमधील सामर्थ्य बघून नकळतपणे या सृष्टीच्या निर्मात्यासमोर मी नतमस्तक झाले. जणू काही खूप वर्षांनी सूर्योदय बघतेय असं वाटत होतं. नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये उगवत्या सूर्याचे रूप साठवून लगेच मोबाईलकडे धाव घेतली.
 त्यानंतर त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं. रात्री रूममध्ये आल्यावरही फ्रेश वाटत होतं. रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीचं वेदर फॉरकस्ट बघितलं आणि  mostly sunny हे शब्द बघून मन सुखावलं. आत्तापर्यंतचं सगळं फोरकास्ट अगदी बरोबर येत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ऊन असणार याबद्दलचा विश्वास हळूहळू वाढू लागला होता. तरीही मनातून मात्र कुठेतरी भीती होतीच. अपेक्षेनुसार दुसऱ्या दिवशीही ऊन पडलं. मनातून खूप आनंद झाला कारण त्या दिवशी या ट्रिपमध्ये must visit लिस्टमध्ये ऍड केलेल्या ठिकाणी म्हणजेच ज्वालामुखीला जायचं होतं.
   सगळं आवरून निघालो आणि नेमकं बाहेर पडायच्या वेळी अचानक कंबरेतून जोरात कळ आली. ज्वालादेवीची माहिती मिळाल्यापासून काहीही झालं तरी ज्वालादेवीला जायचंच हा निश्चय मनात केला होता. पण कंबरेतून आलेल्या कळीमुळे मला जागेवरून हलताही येत नव्हतं. बाम, तेल लावून थोडं बरं वाटलं. पण तरीही अधूनमधून कंबरेतून जोरदार कळा येतच होत्या. शेवटी पेनकिलर घेतली. खरंतर पेनकिलर घेणं मी नेहमी टाळत असते. पण त्या दिवशी काहीच पर्याय नव्हता   
मी आस्तिक किंवा देवभोळी नाही आणि नास्तिकही नाही. माझा कर्मावर प्रचंड विश्वास आहे. पण काही काही वेळा मात्र मी प्रचंड धार्मिक होते. त्या दिवशीही तसंच झालं. दर्शनाची ओढ एवढी तीव्र होती की शारीरिक त्रासावर तिने सहज मात केली. का माहिती नाही पण त्या जागेविषयी मला प्रचंड ओढ वाटत होती. अगदी नेटवर जेव्हा हे ठिकाण पहिल्यांदा बघितलं तेव्हापासूनच तिथे जायची जबरदस्त आंतरिक ओढ मनात निर्माण झाली होती.
  ज्वालामुखीला जायला धरमशालाहुन थेट बसेस आहेत. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस बरोबरच प्रायव्हेट बसचा पर्यायही आहे. पण तरीही  डायरेक्ट बसची संख्या मर्यादित आहे. सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे धरमशाला वरून कांग्राला जायचं. कांग्रा बस स्टँडवरून स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट बसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हिमाचल प्रदेशमधील जवळपास सर्व बस स्टँडवर आलेला सुखद अनुभव म्हणजे तिथे चौकशी केल्यानंतर अगदी शांतपणे सविस्तर माहिती सांगितली जाते. बसमध्येही कंडक्टर अगदी व्यवस्थित माहिती सांगतात. विशेष म्हणजे इथल्या बस स्टँडवर स्टेट ट्रान्सपोर्ट बससोबतच प्रायव्हेट बसही लागतात. स्थानिकांना दोन्हीतला फरक पटकन ओळखता येत असला तरी बाहेरच्या लोकांना मात्र सहजी कळत नाही. टुरिझम हा तिथला मुख्य व्यवसाय असल्यामुळे असेल कदाचित पण तिथली माणसं मुळातच अगत्य करणारी वाटली. दुसरी नोटिस करण्यासारखी गोष्ट म्हणजे बसमध्ये अगदी शेवटच्या सीटवर जरी बसलं तरी उडायला होत नव्हतं. अगदी वळणावळणाचे छोटे छोटे रस्ते असूनही प्रवासाचा त्रास अजिबात जाणवत नाही. तिथले रस्ते बघून मला आमच्या कोकणातले रस्ते आठवले. “हिमाचल म्हणजे कोकणचा मोठा भाऊ आहे.” माझं हे वाक्य अनेकांना अतिशयोक्ती वाटेल किंवा पटणार नाही. पण तिथले रस्ते आणि एकंदरीतच सगळं वातावरण बघुन काही क्षण कोकणचा फील आल्याशिवाय रहात नाही. कोकणात सह्याद्रीच्या डौलदार रांगा तर इथे हिमालयाच्या पर्वतरांगा. कोकणात उंच उंच वाढणारी नारळ, पोफळी तर इथे देवदार आणि ओकचे वृक्ष.  समुद्रकिनारी वसल्यामुळे कोकणातली हवा दमट तर इथली प्रचंड थंड. वातावरणातील हा मुख्य फरक हिमाचल आणि कोकणास वेगळे करतो. तसं बघायला गेलं तर हिमालयाची निर्मिती समुद्रापासूनच झाली आहे. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत क्षणभर का होईना कोकणचा भास होणं, यामध्ये काहीच विशेष नाही.
  ज्वालादेवी मंदिर परिसरातच बस स्टॉप असल्यामुळे बसमधून उतरल्या उतरल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रसाद, पूजेची थाळी, देवतेवतांच्या मूर्ती, कीचेन इत्यादींची दुकाने दिसत होती. मला वाटतं भारतातल्या कुठल्याही प्रदिद्ध मंदिरात अथवा मठात जाताना सर्वप्रथम  रस्त्याच्या दुतर्फा मांडलेली ही दुकाने आपलं स्वागत करतात. संपूर्ण प्रवासात कंबरेतून येणाऱ्या कळा अधूनमधून त्रास देत होत्या. ज्वालामुखी मंदिरात जाताना थोडं चढावं लागतं. त्यामुळे पायऱ्या चढतानाही थोडासा त्रास होत होता. पण हा त्रास सहन करण्यासारखा होता. खरंतर दर्शनाची आंतरिक उर्मी होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होती. थोडंस चालून गेल्यावर डाव्या बाजूला चपला स्टँड आहे. विशेष म्हणजे तिथे आपल्या चपला ज्या कप्प्यात ठेवलेल्या असतील तो नंबर आपण लक्षात ठेवायचा. तिथे कोणीही माणूस उपलब्ध नसतो. इतर ठिकाणी असतात तशी पूजेच्या थाळीच्या बदल्यात चपला ठेवून घेणारी दुकानेही तिथे आहेत. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला ‘लंगर’ आहे. तिथे एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांना मोफत भोजन दिले जाते. हॉलमधून सरळ आत गेल्यावर आतमध्ये ताट, वाटी, भांड, चमचे सर्व ठेवलेलं असतं. त्यामधलं आपल्याला जे हवं ते घेऊन हॉलमध्ये अंथरलेल्या बैठकांवर जेवायला बसायचं. जेवण वाढतानाही शांतपणे वाढलं जातं.  जेवणानंतर आपलं ताट, वाटी जे काही असेल ते स्वच्छ धुवून जागेवर ठेवायचं. एकंदरीत स्वावलंबन हा या मंदिराचा पहिला नियम आहे असं वाटत होतं आणि हे नक्कीच कौतुकास्पद होतं.
   ज्वालादेवी मंदिर प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. प्रजापती दक्ष यांच्याकडून एक यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी भगवान शंकर सोडून इतर सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या अशा वागण्यामुळे अपमानित झालेल्या सतीने स्वतःला हवनकुंडात झोकून दिले. हे कळल्यावर अतीव दुःख आणि रागामुळे वेडेपिसे झालेले भगवान शंकर सतीचे जळलेले शरीर घेऊन त्रैलोक्यात धावू लागले. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णुंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पृथ्वीवर जिथे जिथे हे तुकडे पडले ती जागा शक्तीपीठ समजली जाते. ज्वालामुखी मंदिराच्या जागी सतीची जीभ पडली अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मुख्य मंदिरामध्ये देवीची मूर्ति नसून देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. खड्डयाच्या आंतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणींहि डाव्या व मधल्या खडकांतून अशाच तर्‍हेच्या ज्वाला बाहेर पडतांना दिसतात. मुख्य मंदिर आणि आणि परिसर मिळून एकूण सात ज्वाळा आहेत. या ज्वाळा सात देवीचं प्रतिनिधित्व करतात.
मुगल सम्राट अकबरने मुख्य मंदिरामधील ज्वाळा विझवायचा खूप प्रयत्न केला होता. ज्वाळेवर सतत पाण्याचा मारा होईल अशी व्यवस्था केली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यावर लोखंडाची मोठी ढाल ठेवून ज्वाळा विझवायचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात ते लोखंड वितळून ढालीला भोक पडलं. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या अकबर राजाने आपले प्रयत्न थांबवले. ही ढाल परिसरातील एका मंदिरात काचेच्या बंद पेटीत ठेवण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या मुख्य मंदिरात फोटो काढायला मनाई असल्यामुळे तिथला फोटो काढता येत नाही. पण आजूबाजूच्या इतर मंदिरांमध्ये तसेच या ढालीचा फोटो काढायला मात्र परवानगी आहे.
मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरेही आहेत. यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे गोरखडीब्बी. निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक चमत्कार इथे पहायला मिळतो. येथील एका कुंडात पाणी उकळत असल्यासारखे वाटते पण प्रत्यक्षात हात लावल्यावर मात्र हाताला थंडगार पाण्याचा स्पर्श होतो. याबद्दलची आख्यायिका अशी आहे की, गोरखनाथांच्या तपश्चर्येने देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एक दिवस गोरखनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी मातेला पाणी गरम करायला सांगितले व स्वतः भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत आणि देवी माता आजही त्यांची वाट बघते आहे. याबद्दल असंही सांगितले जाते की कलियुग संपून सत्ययुग सुरू झाल्यावर गोरखनाथ परत येतील.
  सर्वात वरती शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जायला पुन्हा काही पायऱ्या चढून जाव्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर माझ्याबरोबरची सगळीजणं देवळात आतमध्ये गेली पण नेमकं त्याचवेळी माझ्या कंबरेतून जोरात कळ आली आणि मी तिथेच खाली बसले. समोरच्या होमकुंडाजवळ बसलेल्या पुजाऱ्यांनी दुरूनच मला बघितले. त्यांच्यासमोर बसलेली लोकं उठून गेल्यावर त्यांनी दुरूनच विचारले, “ कुछ तकलीफ हो रही है क्या बेटी?”  
“नहीं ठीक हैं बस कमरमें थोडी मोच आ गयी..” असं म्हणून पुन्हा देवळात जायच्या उर्मीने मी त्या अवस्थेतही पटकन उठून उभी राहिले. नंतर आम्ही दर्शन आटपून होमकुंडाजवळ गेलो. तिथल्या पुजाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली व म्हणाले, “रुको चाय लेके जाओ.” आम्ही नको म्हणत असतानाही आग्रह करत म्हणाले, “भगवान का प्रसाद हैं बेटा, मना मत करो.” या वाक्यामुळे मात्र आम्ही नाही म्हणू शकलो नाही. त्या दिवशी प्रत्यक्ष देवीच्या द्वारी जेवण आणि चहा दोन्हीचा योग होता. चहा घेऊन गुरुजींना नमस्कार करून आम्ही तिथून निघालो. तिथल्या बस स्टँडवर गेल्या गेल्या लगेचच धरमशालाला जाणारी बसही मिळाली. वाटेतच संध्याकाळ झाली होती. परतीच्या प्रवासात मात्र कंबरदुखीचा जराही त्रास झाला नाही आणि मावळत्या सूर्याच्या दर्शनाने मनही तृप्त झाले. जवळपास तीन चार दिवसांनी मी सूर्यास्त बघत होते. सूर्यास्त म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा एक अप्रतिम नजारा असतो. अनेकांना संध्याकाळ आणि सूर्यास्त निराशाजनक वाटतात. पण मला मात्र या दोन्हीही गोष्टी खूप आवडतात. खरतर सूर्यास्त आणि सूर्योदय यामध्ये मुळातच इतके सौंदर्य आहे की ते बघण्यासाठी कुठल्याही ‘पॉईंट’वर जायची गरज नाही. ते कुठूनही पाहिलं तरी सुंदरच दिसतात.
सकाळी झालेलं सुर्यनारायणाचे दर्शन आणि त्यानंतरच्या ज्वालादेवीच्या दर्शनाने मन शांत झालं होतं. या ज्वाळांमागील भौगोलिक किंवा शास्त्रीय कारण शोधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. सतराव्या दशकात भारत सरकारने यामागील भौगोलिक कारण अथवा तेथील नैसर्गिक वायूच्या साठ्याची शक्यता शोधण्याचे काम एका परदेशी कंपनीला दिले होते परंतु अनेक वर्षे काम करूनही न त्यांना कोणता गॅस सापडला ना या ज्वाळांमागचे भौगोलिक कारण. काही जणांच्या मते लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवून ‘नैसर्गिक गॅसचं’ सत्य लोकांपासून लपविण्यात येत आहे. काय खरं, काय खोटं, हे सांगता येणं कठीण आहे. नेटवर सर्च केल्यास ज्वालादेवीचे अनेक थक्क करणारे अनुभव वाचायला मिळतील. तसंही सगळ्या गोष्टी मानण्यावर असतात. माझा अनुभव मी सांगितला तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण ही पोस्ट लिहायला घेतल्यावर माझ्या कंबरेतून तशाच कळा येत होत्या जशा दर्शनाच्या दिवशी येत होत्या. आत्ता हा शेवटचा परिच्छेद लिहताना मात्र कंबरदुखी पुर्णपणे थांबली आहे. हे काय आहे? का आहे? मला खरच काही कळत नाही. पण हा योगायोग नक्कीच नाही. शेवटी काय, मानला तर देव नाहीतर दगड. तसच मानली तर देवी नाहीतर नॅचरल गॅसची ज्वाळा. जे काही नाव असेल ते चमत्कारी आहे हे मात्र नक्की.
©मानसी जोशी





Tuesday, 20 November 2018

माहेर

“आत्या तू जाऊ नकोस ना….” भाचीने केलेलं गोड शब्दातलं आर्जव….
"बॅग भर आधी. नाहीतर पुण्यात गेल्यावर हे राहिलं, ते राहिलं करत बसशील.” बाबांचे दरवेळचे डायलॉग...
जाताना दोन आणि येताना चार होणाऱ्या बॅगा...
जड होत जाणारी प्रत्येक बॅग आणि भरुन आलेल्या दहा दिवसातल्या आठवणी ….
चार तास हिंडून मनसोक्त शॉपिंग म्हणजे खरेदी केलेली फक्त एक साडी...
जुन्या ड्रेसच्या दुकानात कुठलाच ड्रेस पसंत पडत नसताना नेमकं निघायच्या वेळी झालेली जुन्या ओळखीच्या सेल्समनची इन्ट्री... “ताई तू कधी आलीस म्हणत जीवाचा आटापिटा करून बरोबर आपल्याला हवा तसा आणि हव्या त्या किमतीचा शोधून दिलेला ड्रेस…
“तू पुण्यात राहतेस तरी रत्नागिरीला येऊन एवढं कसलं शॉपिंग करतेस ग”, मावशीचा दरवेळेचा प्रश्न….
रस्त्यात भेटलेली कॉलेजमधल्या मैत्रिणीची आई आणि तिने, “अजूनही तशीच आहेस” म्हटल्यावर उगीचच मूठभर मांस अंगावर चढेल असं वाटून झालेला भीतिमिश्रित आनंद....
आणि “अजूनही गाडी फास्ट चालवतेस का?” असं विचारून लमारलेली कोपरखळी.
उगाचच वाट वाकडी करून कॉलेजच्या रस्त्याला फिरवलेली गाडी आणि त्यामुळे कॉलेजच्या दिवसातल्या जाग्या झालेल्या खरंतर जाग्या केलेल्या आठवणी….
भाऊबीजेला झालेली भावंडांची भेट….
नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा भेटलेल्या मामेबहिणीची पोटभरून केलेली चेष्टा….
"पेट्रोल - डिझेल सगळं वाढतंय आता भाऊबीजही वाढवा", असं म्हणत समस्त भावांकडून उकळलेली जास्तीची भाऊबीज...
जुन्या मित्र-मैत्रिणींची झालेली भेट आणि राहून गेलेली समुद्रावरची फेरी….
नाईलाजाने बघाव्या लागणाऱ्या डेलीसोप….
आणि झोपाळ्यावर बसून प्यायलेला चहा…

“आत्ये तू लॅपटॉप ठेव आणि माझ्याशी खेळ ना थोडावेळ…” “पिल्लू काम आहे ग मला नाही झालं तर सर ओरडतील मला...
“ओरडूदेत, मला पण माझी आई ओरडते…”  
भाचीच्या अशा अनेक गंमती- जमती….

खूप दिवसांनी खूप दिवसांसाठी माहेरी आल्यावर चार दिवसांतच आलेली आपल्या घराची आठवण तरीही निघताना देवासमोर हात जोडून प्रार्थना करताना भरुन आलेले डोळे…
“पुढच्या महिन्यात लग्नात सगळी भेटातीलच पुन्हा”, असं स्वतःलाच समजवताना, “सगळी भेटतील पण घर नाही भेटणार”, या विचाराने दाटून आलेला हुंदका…
जडवलेल्या पावलांनी आणि भरलेल्या डोळ्यांनी सगळ्यांचा घेतलेला निरोप….
©मानसी जोशी
Maher_memories















Thursday, 13 September 2018

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक हा निव्वळ एक पदार्थ नाही. इतर पदार्थांप्रमाणे उकडीच्या मोदकांची रेसिपी वाचली किंवा you tube वर रेसिपी बघितली आणि केले असं इतक साधं सरळ गणित नाही. अगदी तांदूळ धुवून, वाळवून, त्याच पीठ करण्यापासून सुरु होणारी ही प्रक्रिया थेट मोदक नैवेद्याच्या ताटात ठेवल्यानंतरच पूर्ण होते.
   मला आठवतय, आमच्याकडे धुतल्या तांदूळाच पीठ तस वर्षभर कायमच असतं. पण तरीही गणपती जवळ आले की खास उकडीच्या मोदकांसाठी म्हणून तांदूळ धुवून वाळवले जायचे. यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे हे तांदूळ सावलीत वाळवावे लागतात. त्यावर उन्हाचा कवडसाही पडता कामा नाही.
   लग्न ठरलं त्यावर्षी आजी म्हणाली, “आज मोदकाची उकड करताना माझ्याजवळ थांब. तुला उकड करायला शिकवते. पुढच्या वर्षी सासूने सांगितल ‘उकड कर’ तर तुला आली पाहिजे".
  मोदकाची उकड करणं हे काम मला तसं कटकटीचच वाटलं होत तेव्हा. दरवर्षी साच्यात पीठ घालून मोदक  करायची सवय असणाऱ्या मला त्यावर्षी आजीने साच्याशिवाय मोदक करायला लावले. एकंदरीतच वैताग आला होता. माझे ओबडधोबड मोदक बघून मलाच ते खावेसे वाटत नव्हते, तर बाकीचे काय कप्पळ खाणार? सगळ्यांनी चेष्टा केली. मी सुद्धा, ‘ये अपने बस की बात नहीं’ असं म्हणून विषय सोडून दिला. तसही मोदकापेक्षा जास्त माझं निवग्र्यांवर प्रेम आहे. त्यामुळे साच्यातले चार/पाच मोदक करुन, निवेग्रीसाठी मदत करायला आणि ती करताना ते कच्च पीठ खायला मला प्रचंड आवडायच.
   लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी गणपतीत माहेरच्या  गणपतीची खूप आठवण येत होती. पूजा झाली आणि मी सासूबाईंबरोबर मोदक करायला बसले. त्यांनी काहीशा नाराजीनेच विचारले, ‘तुला येतात ना मोदक करायला?’    
“हो येतात. पण सुबक नाही.” मी  
"बरं. बघुया. नाहीतर नैवेद्याचे मोदक मी करते. तू निवेग्र्या कर नंतर."
मला तर संकट टळल्यासारखं वाटलं क्षणभर. पण तेवढ्यात सासरे म्हणाले, “करु दे की तिला. असे लगेचच कसे जमतील? मानसी तू कर मोदक. कसेही झाले तरी चालतील. कोणी नाही खाल्ले तरी मी खाईन"
   सासऱ्यांच बोलणं ऐकून बरं वाटल आणि अचानक कॉन्फिडन्स आला. मी मोदक वळायला घेतले. जसे जमतील तसे करत होते. मध्येच मोदक फूटत होते. त्यावर पॅचवर्क लावायचा आणि ताटलीत ठेवायच काम चालू होतं. सासूबाई तशा नाराजच होत्या.
   तेवढ्यात सासरे आत आले आणि म्हणाले, “जमतायत की तुला. फक्त एक काम कर, ‘जरा हलक्या हाताने पारी कर आणि मोदकाच्या पाकळ्या जवळजवळ कर. मग बघ मोदक सुबक दिसेल"
     मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. मोदक सुबक तर झालाच. शिवाय ‘पॅचवर्क’ पण करावा लागला नाही.
  मला इतका चांगला मोदक करता आला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. उकड मळतानाही आधी वाटीने मळून घ्यायची आयडीया त्यांनी दिली आणि ‘महाबोअर’ वाटणारं उकडीचं कामही सोपं झालं.
   यावरुन एक गोष्ट कळली, "नेमकं आपल काय चुकतय, हे जर का लक्षात आलं ना तर कुठलीही गोष्ट कठीण नसते.
   आज मी मोदकावर मोदकही (डबल डेकर मोदक ) अगदी सहज करते. पण निव्वळ माझ्या सासऱ्यांमुळे मला मोदक करता आले.
  आज माझे सासरे हयात नाहीत. पण जेव्हा जेव्हा मी मोदक करते तेव्हा प्रत्येकवेळी त्यांची आठवण  आवर्जून येते.

©मानसी जोशी

Tuesday, 10 April 2018

उन्हाळी सुट्टी आणि मी

संपली एकदाची परीक्षा!
आता सुट्टी!
माझ्यासाठी एक परीक्षा संपली दुसरी सुरु झाली. आता पसारे, मस्ती, धुडगूस, सगळं चालू.
सुदैवाने आमच्या सोसायटीमध्ये लेकीच्या वयाची  भरपूर मुलं आहेत त्यामुळे "सुट्टीत काय?" हा प्रश्न मला अजिबात पडत नाही. वेगवेगळे खेळ, भांडणं,छोट्या पार्टीज आता सुरु होतील.

   उन्हाळी सुट्टी लागली की हमखास nostalgic व्हायला होतं. आजकाल मुलांना खेळायला वेगवेगळे गेम्स उपलब्ध आहेत. आमच्या वेळी कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, नवा व्यापार एवढेच गेम आम्हाला माहिती होते. त्यात पत्ते सगळ्यांच्या आवडीचे. खेळायला मेंबर्स जास्त असल्यामुळे बाकीच्या इतर खेळांपेक्षा पत्ते जास्त खेळले जात. मेंढीकोट, लॅडिज, झब्बू, बदाम सात किती प्रकार खेळायचो आम्ही.  दिवसा पत्ते, संध्याकाळी क्रिकेट किंवा समुद्र. समुद्रावर जायच म्हणजे भेळ खाल्लाशिवाय परत यायच नाही असा जणू नियमच होता. पुन्हा रात्री पत्ते.. खेळताना भांडणं ,पत्ते फेकणं, रडारड हे सगळ अनेकदा घडायच. मग घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती या भांडणांमुळे वैतागून खेळ बंद करायची. मग कॅरम किंवा बाकीचे डाव मांडले जायचे.

    आमच मुळ घर देवगडला त्यामुळे आईच्या शाळेला सुट्टी लागली की आम्ही तिकडे जायचो. तिकडे  गेल्यावर  नुसती धमाल असायची. सकाळी निरशा दुधाचा चहा घेऊन आजीबरोबर रतांबे(कोकम) किंवा काजू गोळा करायला जायच. दुपारी बारा वाजता नैवेद्य झाला की हसत खेळत जेवणं व्हायची. जेवणात जवळपास रोजच आमरस असायचा. "पानात वाढलेल काही टाकायच नाही" हा नियम ठरलेला. या नियमामुळे मात्र मी एकदा रडत  रडत वांग्याची भाजी पाण्याबरोबर अक्षरशः गिळली होती. जेवणानंतर मग  झोपाळ्यावर  बसून गप्पा रंगायच्या. आठवड्यातून दोन दिवस आंबे घेऊन जाणारा ट्रक यायचा; मग दुपारी आंबा कॅनिंगच्या ठिकाणी कोणालातरी जबरदस्तीने(?) पाठवल जायच. बहुतेक वेळा यात मिच सापडायचे.
       घरी सतत कोणी ना कोणी येत असायच. मला वाटत, मी पुण्यात जेवढा चहा एका महिन्यात करते तेवढा चहा देवगडच्या घरी एका आठवड्याला करत असतील.  एखाद्या वेळी गावातल एखाद नमुना कॅरॅक्टर घरी येई  आणि आमची भरपूर करमणूक होत असे.

     संध्याकाळी  क्रिकेटपासून अगदी खांब-खांब पर्यंत अनेक खेळ खेळायचो . भांडण झाली की खेळ थांबायचा. मग थोड्या वेळाने अंताक्षरी रंगायची.  कधीकधी बाहेर फिरायला जायच आणि येताना  करवंद, जांभळ गोळा करुन घरी यायच. त्यातली निम्मी-अधिक  करवंद वाटेतच खावून संपलेली असायची.     

     दिवेलागणीच्या वेळी झोपाळ्यावर बसून शुभंकरोती, रामरक्षा, (लहान असताना तर पाढेही ) हा एक मोठा कार्यक्रम असे.  आठ साडेआठच्या दरम्यान रात्रीच जेवण झाल्यावर पुन्हा अंगणात बसून गप्पा रंगत. मी आणि माझी आत्ये बहीण तर अंथरुणावर पडल्यावरही खूप वेळ गप्पा मारत बसयचो. अर्थात यावरुन कित्येकदा बोलणी खाल्ली आहेत. अशा  लिहिण्यासारख्या खूप आठवणी  आहेत.
 
   आता प्रत्येकजण आपाआपल्या व्यापात अडकल आहे . लहानपणी भांडणं सोडवताना मावशी म्हणायची, "आत्ता एवढ भांडताय, पुढे लग्न झाल्यावर एकमेकांना भेटायची दूरच पण बघायची इच्छा झाली तरी ते ही शक्य होणार नाही." खरच आज असच घडतय. सगळ्यांनी एकत्र जमण्यासाठी ठरवून प्लॅनिंग कराव लागतय. अस वाटत जसजस आपण मोठं होत जातो तसतस #सहज सोप  अस काही घडतच नाही आयुष्यात.

©मानसी जोशी

Tuesday, 13 February 2018

व्हॅलेंटाइनच्या आठवणी


आजकाल तर शाळेतल्या मुलांनाही #व्हॅलेंटाइन_डे माहिती असतो. व्हॅलेंटाइन डे म्हणजे काय? हे मला बारावीत असताना पहिल्यांदा कळल आणि #व्हॅलेन्टाइन_वीक हा प्रकार याच वर्षात माझ्या जनरल नॉलेजमध्ये दाखल झाला.
   
     बारावीत असताना माझ्या एका मैत्रीणीला एका मुलाने व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशी  प्रपोज केलं.
    बिचारा घाबरत घाबरत तिला म्हणाला, "Will you be my Valentine?"
    तिला व्हॅलेंटाइन म्हणजे काय हेच माहिती नव्हतं त्यामुळे तिला काहीच कळल नाही आणि ती काही न बोलता निघून आली. मी विचारल तर म्हणाली, "तो काय बोलला तेच कळलं नाही ग..... "
    नंतर त्याच्या मित्राकडून सगळा प्रकार कळल्यावर मात्र आम्ही खूप हसलो होतो.

       FY ला असताना एका मैत्रीणीबरोबर तिच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला म्हणून "आर्चिस" गॅलरीमध्ये गेले होते. तिथली सुंदर सुंदर ग्रिटिंग कार्ड्स आणि 'हार्ट शेपची' शो पिसेस बघून एकदम भारी वाटत होतं. पण त्याच्यावरचे प्राईस टॅग  बघितले आणि वाटलं, "बरं झाल आपल्याला बॉयफ्रेंड नाहीये, नाहीतर सगळा पॉकेटमनी गिफ्ट खरेदी करण्यातच संपला असता.
       FY SY चा व्हॅलेन्टाइन पॉकेटमनीच्या विचारात संपला. TY ला असताना मात्र नटून सजून कॉलेजला आलेल्या एका जाड्या भरड्या मुलीला एक मुलगा रोझ बुके, ग्रिटिंग आणि "स्टाईल" मूव्हीमध्ये दाखवलेल "धडकता हुवा हार्ट" देत असताना बघितल; तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकला का काय म्हणतात तसं झालं. नकळत मी मैत्रीणीला म्हणाले, "या मोटीला सुद्धा व्हॅलेंटाइन गिफ्ट देणारे आहेत? आणि आपण..." त्यावेळेस माझं हे बोलणं ऐकून मैत्रीणीचा त्रासलेला दु:खद चेहरा अजूनही आठवतोय. आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा बॉयफ्रेंड नसल्याच्या कमीची जाणीव झाली होती. पण तेवढ्यापुरतच! त्यानंतर कॅंटिनला वडापाव खाताना वॉलेटमधले पैसे बघून; बॉयफ्रेंड नसल्याच दु:ख हलकं झालं.
 
    पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला LL.B चा रुक्ष अभ्यास करताना एवढा छान ग्रूप जमला की "व्हॅलेन्टाइन, बॉयफ्रेंड" या गोष्टींच अप्रूप कमी झालं.

    लग्न ठरल्यानंतर "अहों" ना व्हॅलेंटाइन वगैरेच काही फारसं कौतुक नव्हतं. लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेन्टाइनच्या वेळी तर मी रत्नागिरीला आणि अहो पुण्याला. त्यामुळे सेलिब्रेशनचा प्रश्नच नव्हता.
      आमची कन्यका अडीच वर्षांची असेल तेव्हा अचानक काय झालं काय माहिती व्हॅलेन्टाइनच्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर  कन्यका आसपास नाही बघून "अहो"   रेड रोझ आणि डेरी मिल्क माझ्यासमोर धरत मला चक्क, "Happy Valentine Day" असं म्हणाले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मला क्षणभर काहीच सुचलच नाही. तेवढ्यात आमची कन्यका कुठूनतरी धावत आली आणि  अहोंच्या  हातातली 'डेरी मिल्क आणि रेड रोझ'  जवळपास हिसकावून घेत "Thank you बाबा" म्हणून निघूनही गेली. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. माझं आयुष्यातल पहिलं वहिलं #व्हॅलेन्टाइन_गिफ्ट माझ्यासमोर माझ्या कन्येनेच हिसकावून घेतलं होतं. त्यानंतरच्या व्हॅलेन्टाइनला मात्र  अहोंनी माझं लिपस्टिक हरवलं होतं म्हणून मेबेलीनच  लिपस्टिक आणलं. ( सुरुवातीला हा ब्रॅंड लक्षात ठेवला हेच माझ्यासाठी धक्कादायक होतं. नंतर कळलं मॉलमधल्या मुलीने सजेस्ट केल होतं ते.) तेच माझं पहिलं वहीलं व्हॅलेन्टाइन गिफ्ट. Expiry date उलटून गेली असली तरी आजही मी ते जपून ठेवलय. माझ्या पहिल्यावहिल्या व्हॅलेन्टाइनची आठवण! असे प्रेमाचे हलकेफुलके क्षणच आयुष्यात गोड आठवणी बनून रहातात.

      व्हॅलेन्टाइन डे चे विरोधक, "प्रेम व्यक्त करण्यासाठी स्पेसिफिक दिवसच कशाला हवा?" असा प्रश्न सर्रासपणे विचारतात. खरच नसते गरज अशा स्पेसिफिक दिवसाची. गरज असते ती प्रेमाच्या व्यक्त होण्याची. पण एखादा दिवस फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून असेल तर बिघडलं कुठे? नवीन नवीन असताना सगळेच प्रेम व्यक्त करतात पण मुरलेल्या नात्यालाही या प्रेमाच्या व्यक्त होण्याची गरज असते. अशा "स्पेसिफिक डे" च्या रुपाने एक संधी मिळते प्रेम व्यक्त करायला. महत्व दिवसाला नाही. महत्व आहे ते व्यक्त होण्याला. फक्त महागडी गिफ्ट्स, हॉलिडे पॅकेजेस म्हणजे प्रेम नव्हे हे १००% मान्य. पण कधीकधी यामुळेच नात्यांमध्ये नव्याने रंग भरले जातात हे सुद्धा तितकंच खरं आहे.

©मानसी जोशी







Sunday, 17 September 2017

आठवणींचे पान उलगडताना

काल ATM बाहेर रांगेत उभी होते. बाजूला कॉलेजला एक ग्रूप गप्पा मारत उभा होता. त्यातला एक मुलगा आपल्या मोबाईलमधले फोटो बाकीच्यांना दाखवत होता. सहज त्यांच्यातला संवाद कानावर पडला.
"हा बघ "तिचा" लेटेस्ट DP. कसली सुंदर दिसते ना. पिंक कलर सूट करतो तिला"
 "अरे तू तर तिच्या फोटोंचा फोल्डरच केलायस. घरी कोणी बघितलं तर फुकट मरशील" ग्रूपमधला एकजण त्याला म्हणाला.
   "अरे काय येडा आहे का मी गॅलरीला पासवर्ड ठेवलाय. एकदा कॅम्पस मधून सिलेक्शन होवूदे मग प्रपोज करणार तिला." तो मुलगा हसत म्हणाला.
      त्या ग्रूपमधला हा संवाद ऐकून मला हसायला आलं आणि कॉलेजमधला एक किस्सा आठवला.
     तेव्हा कॉलेजचे डेज चालू होते. त्या दिवशी 'सारी डे' होता. त्यामुळे मी कॉलेजला कॅमेरा नेला होता. आमच्या वर्गातला एक मुलगा माझ्याजवळ येउन मला म्हणाला, "ए   'ती' मैत्रीण आहे ना तुझी. मला प्लीज तिचा एक फोटो काढून दे ना.
     यावर मी म्हणाले, "अरे मैत्रीण वगैरे नाही पण ओळखतो आम्ही एकमेकींना.पण असा फोटो काढायचा म्हणजे...
    "Please फक्त एवढं एक काम कर ना. Don't worry मी misuse नाही करणार. मी खरच खूप सिरिअस आहे तिच्या बाबतीत." माझा मित्र म्हणाला.
   "अरे एवढं आहे तर मग विचारत का नाहीस तिला? मी
   "अगं कुठल्या बेसवर विचारणार? मी स्वतः एक पैसा पण कमवत नाही. आणि पुढचं पुढे बघू."
    नंतर मी त्याला तिचा फोटो काढून दिला. तेव्हा कॅमेरा रोल डेव्हलप करायला लागत असत. तिच्या फोटोसाठी रोल डेव्हलप करुन आणायचं माझं कामही त्याने केलं.
   मनात आलं आज सोशल मिडीआमूळे सगळं किती सहज सोपं झालय. एक फोन नंबर असला किवा फेसबूक , इन्स्टाग्रामवर जॉइन असलं की झालं. असं फोटो मिळविण्यासाठी कोणाला विनवण्या करायला लागत नाहीत. पण असं असल तरी त्यावेळची मजा काही वेगळीच होती.
©मानसी जोशी

Sunday, 30 July 2017

आजोबा - बालपणीची एक आठवण

"प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भूपाळी म्हणती"

    लहान असताना माझी सकाळ बऱ्याचदा या अशा सुरेल  गाण्यांनी व्हायची. रेडिओवर एकापेक्षा एक सरस गाणी चालू  असायची. बाबा  अंगणात पेपर वाचत बसलेले असायचे. आई किचनमध्ये पोळ्या करत असायची. आई पोळ्या करायला लागली कि लगेच आमच्याकडच्या मनीमाऊला कसं कळायचं कुणास ठावूक? पण ती  कुठेही असली तरी पळत घरात यायची आणि   'म्याव म्याव' करत आईच्या पायाजवळ घुटमळायची.  आईने गरमगरम पोळी तिला तुकडे करुन घातली कि ती खाऊन मिटक्या मारत बाहेर जायची. तेव्हा आम्ही रत्नागिरीजवळच्या कोतवडे या गावात रहात होतो.आई तिथल्याच शाळेत शिक्षिका होती त्यामुळे बालपणाचा बराचसा काळ या गावात घालवला आहे. आमच्या घराजवळच रहाणारे एक आजोबा रोज न चुकता आमच्याकडे चहा प्यायला यायचे. पु. ल. देशपांडेंच्या अंतू बर्वा या व्यक्तिरेखेशी बरचसं साधर्म्य असलेले हे आजोबा तिथले खोत म्हणून प्रसिद्ध होते. निटसं आठवत नाही पण या आजोबांना बहुदा मुलबाळ कोणीही नव्हत. एक पुतण्या होता पण तो ही मुंबईला  रहायचा. एका मोठ्या घरात ते एकटेच रहायचे.घर कसलं मोठा वाडाच होता तो. त्यांच्या घराजवळ दोन विहिरी होत्या. त्यातल्या एका विहिरीवर वाडीतली लोकं पाणी भरण्यासाठी जात असत. दिवसभर या विहिरीवर पाणी भरायला येणाऱ्या माणसांशी गप्पा मारण्यातच आजोबांचा वेळ जायचा. गावात त्यांना बऱ्यापैकी मान होता. या आजोबांना चहासोबत  पेपर लागायचा. त्यामुळे आजोबा यायच्या आधी बाबा घाईघाईने पेपर वाचून घ्यायचे. कारण आजोबा एकदा पेपर  वाचायला बसले की मग ते  जवळपास अर्धा पाऊण तास पेपर वाचत बसायचे. वाचता वाचता प्रत्येक बातमीवर मार्मिक टिपणी असायची. पेपर वाचून झाला कि मग एखादी गरमागरम पोळी खाऊन ते आपल्या घरी जायचे. क्वचित कधी पेपरवाल्याला उशीर झाला आणि आजोबा आलेले असले की मग ते त्या पेपरवाल्याची 'अंतूबर्वा' स्टाइलमध्ये उलटतपासणी घेत असत. अर्थात त्यांना ना पेपरवाल्याने  कधी  उलट उत्तर दिलं ना बाबांनी . हे आजोबा रोज घरी यायचे पण  याबद्दल कधी आई बाबांनी तक्रार केल्याचं आठवत नाही. उलट एखाद्या दिवशी आजोबा आले नाहीत किंवा त्यांना यायला  उशीर झाला तर आईला काळजी वाटायची. बाबाही मग म्हणायचे 'थोडा वेळ वाट बघूया नाहीतर जाऊन येतो त्यांच्या घरी'. आमच्या घरातलेच होवून गेले होते ते एक. कधी ते आजारी असले कि मग आई त्यांच्यासाठी जेवणाचा डबा द्यायची. कधीतरी त्यांना गरम मसाल्याची आमटी खायची लहर यायची.  संध्याकाळी आई शाळेतून येताना दिसली की लगेच पुढे होवून तिला सांगायचे, 'सूनबाई, चुलीत कांदे टाकलेत हो भाजायला....’ त्यांच्या या वाक्यावरुन आई समजून जायची 'आज गरम मसाल्याची आमटी करायचा बेत आहे'.
      काही कारणांनी नंतर आम्ही घर बदललं. आम्ही जाताना आजोबांचे डोळे पाणावले होते. आजोबांचं  सकाळी येणं बंद झालं असलं  तरीही ऋणानुबंध संपले नाहीत. आईने कधी भजी , थालीपीठ असले काही खास  पदार्थ केले की आठवणीने त्यांना डबा पाठवून द्यायची. अधूनमधून ते ही आमच्याकडे येत असत.येताना आठवणीने आमच्यासाठी चणे शेंगदाणे किंवा लिमलेटच्या गोळ्या आणायचे.हळूहळू वयोमानानुसार त्यांचं बाहेर फिरणं कमी झालं. नंतर आम्हीही रत्नागिरीला शिफ्ट झाल्यामुळे फारसा संपर्कही उरला नाही. हे आजोबा ना आमच्या नात्याचे ना गोत्याचे पण तरीही त्यांच एक वेगळच नातं जुळलं होतं आमच्या घराशी . काही माणसांशी कुठलंही नातं नसतं पण त्यांच्याशी कुणास ठावूक कसे पण छान ऋणानुबंध जुळतात. जगाच्या पाठीवर  कुठेही गेलं तरी या माणसांच्या आठवणी नेहमी आपल्या स्मरणात रहातात.

©मानसी जोशी
३१/०७/२०१७

फोटो: गुगलवरून साभार

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...