आजकाल तर शाळेतल्या मुलांनाही #व्हॅलेंटाइन_डे माहिती असतो. व्हॅलेंटाइन डे म्हणजे काय? हे मला बारावीत असताना पहिल्यांदा कळल आणि #व्हॅलेन्टाइन_वीक हा प्रकार याच वर्षात माझ्या जनरल नॉलेजमध्ये दाखल झाला.
बारावीत असताना माझ्या एका मैत्रीणीला एका मुलाने व्हॅलेन्टाइन डे च्या दिवशी प्रपोज केलं.
बिचारा घाबरत घाबरत तिला म्हणाला, "Will you be my Valentine?"
तिला व्हॅलेंटाइन म्हणजे काय हेच माहिती नव्हतं त्यामुळे तिला काहीच कळल नाही आणि ती काही न बोलता निघून आली. मी विचारल तर म्हणाली, "तो काय बोलला तेच कळलं नाही ग..... "
नंतर त्याच्या मित्राकडून सगळा प्रकार कळल्यावर मात्र आम्ही खूप हसलो होतो.
FY ला असताना एका मैत्रीणीबरोबर तिच्या बॉयफ्रेंडसाठी गिफ्ट घ्यायला म्हणून "आर्चिस" गॅलरीमध्ये गेले होते. तिथली सुंदर सुंदर ग्रिटिंग कार्ड्स आणि 'हार्ट शेपची' शो पिसेस बघून एकदम भारी वाटत होतं. पण त्याच्यावरचे प्राईस टॅग बघितले आणि वाटलं, "बरं झाल आपल्याला बॉयफ्रेंड नाहीये, नाहीतर सगळा पॉकेटमनी गिफ्ट खरेदी करण्यातच संपला असता.
FY SY चा व्हॅलेन्टाइन पॉकेटमनीच्या विचारात संपला. TY ला असताना मात्र नटून सजून कॉलेजला आलेल्या एका जाड्या भरड्या मुलीला एक मुलगा रोझ बुके, ग्रिटिंग आणि "स्टाईल" मूव्हीमध्ये दाखवलेल "धडकता हुवा हार्ट" देत असताना बघितल; तेव्हा मात्र काळजाचा ठोका चुकला का काय म्हणतात तसं झालं. नकळत मी मैत्रीणीला म्हणाले, "या मोटीला सुद्धा व्हॅलेंटाइन गिफ्ट देणारे आहेत? आणि आपण..." त्यावेळेस माझं हे बोलणं ऐकून मैत्रीणीचा त्रासलेला दु:खद चेहरा अजूनही आठवतोय. आयुष्यात पहिल्यांदा तेव्हा बॉयफ्रेंड नसल्याच्या कमीची जाणीव झाली होती. पण तेवढ्यापुरतच! त्यानंतर कॅंटिनला वडापाव खाताना वॉलेटमधले पैसे बघून; बॉयफ्रेंड नसल्याच दु:ख हलकं झालं.
पुढे पोस्ट ग्रॅज्युएशनला LL.B चा रुक्ष अभ्यास करताना एवढा छान ग्रूप जमला की "व्हॅलेन्टाइन, बॉयफ्रेंड" या गोष्टींच अप्रूप कमी झालं.
लग्न ठरल्यानंतर "अहों" ना व्हॅलेंटाइन वगैरेच काही फारसं कौतुक नव्हतं. लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेन्टाइनच्या वेळी तर मी रत्नागिरीला आणि अहो पुण्याला. त्यामुळे सेलिब्रेशनचा प्रश्नच नव्हता.
आमची कन्यका अडीच वर्षांची असेल तेव्हा अचानक काय झालं काय माहिती व्हॅलेन्टाइनच्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर कन्यका आसपास नाही बघून "अहो" रेड रोझ आणि डेरी मिल्क माझ्यासमोर धरत मला चक्क, "Happy Valentine Day" असं म्हणाले. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मला क्षणभर काहीच सुचलच नाही. तेवढ्यात आमची कन्यका कुठूनतरी धावत आली आणि अहोंच्या हातातली 'डेरी मिल्क आणि रेड रोझ' जवळपास हिसकावून घेत "Thank you बाबा" म्हणून निघूनही गेली. त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला होता आणि मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं. माझं आयुष्यातल पहिलं वहिलं #व्हॅलेन्टाइन_गिफ्ट माझ्यासमोर माझ्या कन्येनेच हिसकावून घेतलं होतं. त्यानंतरच्या व्हॅलेन्टाइनला मात्र अहोंनी माझं लिपस्टिक हरवलं होतं म्हणून मेबेलीनच लिपस्टिक आणलं. ( सुरुवातीला हा ब्रॅंड लक्षात ठेवला हेच माझ्यासाठी धक्कादायक होतं. नंतर कळलं मॉलमधल्या मुलीने सजेस्ट केल होतं ते.) तेच माझं पहिलं वहीलं व्हॅलेन्टाइन गिफ्ट. Expiry date उलटून गेली असली तरी आजही मी ते जपून ठेवलय. माझ्या पहिल्यावहिल्या व्हॅलेन्टाइनची आठवण! असे प्रेमाचे हलकेफुलके क्षणच आयुष्यात गोड आठवणी बनून रहातात.
व्हॅलेन्टाइन डे चे विरोधक, "प्रेम व्यक्त करण्यासाठी स्पेसिफिक दिवसच कशाला हवा?" असा प्रश्न सर्रासपणे विचारतात. खरच नसते गरज अशा स्पेसिफिक दिवसाची. गरज असते ती प्रेमाच्या व्यक्त होण्याची. पण एखादा दिवस फक्त प्रेम व्यक्त करण्यासाठी म्हणून असेल तर बिघडलं कुठे? नवीन नवीन असताना सगळेच प्रेम व्यक्त करतात पण मुरलेल्या नात्यालाही या प्रेमाच्या व्यक्त होण्याची गरज असते. अशा "स्पेसिफिक डे" च्या रुपाने एक संधी मिळते प्रेम व्यक्त करायला. महत्व दिवसाला नाही. महत्व आहे ते व्यक्त होण्याला. फक्त महागडी गिफ्ट्स, हॉलिडे पॅकेजेस म्हणजे प्रेम नव्हे हे १००% मान्य. पण कधीकधी यामुळेच नात्यांमध्ये नव्याने रंग भरले जातात हे सुद्धा तितकंच खरं आहे.
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment