रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का?...
गाण्यातल्या या ओळीने तिला अंतर्मुख केल. कितीतरी वेळ ती या एका ओळीचाच विचार करत होती.
संध्याकाळी मीताबरोबर म्हणजेच तिच्या जीवलग मैत्रीणीबरोबर समुद्रकिनारी फिरायला गेली तेव्हाही समुद्राच्या लाटांकडे एकटक बघत शांत बसून होती. लाटांसोबत हेलकावे खाणारी सूर्याची सोनेरी किरणे आणि समुद्रावरचा गार वारा हे सार अनुभवत शांत बसून राहणं तिला प्रचंड आवडायचा. आजही ती तेच करत होती पण तिच मात्र लाटांकडे अजिबात लक्ष नव्हत. तिला सतत गाण्यातली "ती" एकच ओळ आठवत होती.
"काय ग लक्ष कुठे आहे तुझ?" मीता.
"ब्रेक अप झाल्यावर कस वाटत असेल ग?" तिने लाटांवरची नजरही न हटवता विचारल.
"काय? वेडी आहेस का तू? काहीही काय विचारतेस? आणि माझ कुठे ब्रेकअप झाल आहे, मला माहिती असायला”, मीता.
"आज पहिल्यांदाच गाणं ऐकताना गाण्याच्या म्युझिकपेक्षा, रिदमपेक्षा त्यातले शब्द जास्त भावले मला. का कुणास ठावूक पण एक अनिवार ओढ जाणवली गाण्याच्या त्या शब्दांमध्ये.
मावशी नेहमी म्हणते, "कसली ती आजकालची गाणी धागडधिंगा नुसता. गाणं कस असावं; अगदी हृदयाला स्पर्श करणारं.. गाणं संपल तरी त्याचे शब्द मनात घोळत राहिले पाहिजेत”. आज मावशीच्या बोलण्याचा अर्थ पहिल्यांदा जाणवला मला. आजपर्यंत सतत रॉक म्युझिक ऐकणारी मी आज एका शांत, मराठी गाण्यात खास करुन गाण्याच्या त्या एका ओळीत हरवून गेले ग”, ती.
"तू काय बोलतेयस मला काहीच कळत नाही आहे. पण तुझ अस हे हरवून जाण मला नवीन नाही. एखादा विषय डोक्यात घेतलास की सहजी सोडत नाहीस तू" , मीता.
"मला एकच कळतय जेव्हा ब्रेक अप होतो ना तेव्हा ते दु:ख आयुष्यभराच असत. अस म्हणतात की काळ सगळ्या जखमा भरुन काढतो. पण हे दु:ख मात्र कितीही काळ सरला तरी भरुन येत नाही. अंतर्मनात तसच राहतं आणि कधीकधी आठवणींच्या रुपाने पुन्हा भूतकाळ डोळ्यासमोर येतो. आजपर्यंत अनेकजणांच्या ब्रेक अप बद्दल ऐकल होत पण कधी या गोष्टीचा सिरिअसली विचार केला नाही ग", ती.
"मॅडम आपण सिंगल आहोत अजून. अरे यार कोई मिलने तो दो .. .. प्यार को हो जाने दो ....पहेलेसेही ब्रेक अप की बाते ...... सोडना यार चल मस्त भेळ खाऊया आणि निघूया”. मीता
यानंतर मात्र ती प्रत्येक गाण्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकू लागली. तिला जाणवल, एखादा गायक जेव्हा गाण्यातले शब्द, त्यातल्या भावना समजून घेऊन गाणं गातो तेव्हा त्याच गाणं थेट हृदयाला स्पर्श करत."
ती अशीच होती म्हटल तर सोशल सगळ्यांमध्ये मिसळणारी तर कधी तासनतास स्वतःमध्येच हरवून जाणारी. तिला समजून घेण एवढ सोप नव्हतं. पण तरीही ती खूप गोड होती. कोणाला मदतीची गरज असली की लगेच तत्पर असायची. ग्रूपमधल्या प्रत्येकाची सिक्रेट्स तिला माहिती होती. पण तिची काही सिक्रेट्स मात्र फक्त तिलाच माहिती होती. तशी ती अबोल नव्हतीच कधी पण ओळखी करुन घेण, ओळखी वाढवण या गोष्टी कधी जमल्याच नाहीत तिला. पण तिच्या "मिस्टर मॅच"ची मात्र ती आतुरतेने वाट बघत होती. प्रत्येकाच्या मनात असते तशी तिच्याही मनात त्याची अशी एक इमेज होती.
अशातच तिच्या आयुष्यात 'तो' आला. त्याला 'ती' खूपच आवडली. तो एकदम आयडिअल कॅटेगरीतला; साधा, सरळ, हॅंडसम, वेल सेटल्ड, वेल एज्युकेटेड मुलगा. थोडक्यात "कंप्लीट मॅरेज मटेरिअल!"
एका कॉमन मित्राच्या घरी त्या दोघांची ओळख झाली. 'ती पहाताच बाला... ' अशी त्याची अवस्था झाली. हळूहळू ओळख वाढत गेली आणि तो तिच्यात गुंतत गेला. अखेर हिम्मत करुन त्याने तिला प्रपोज केल. तिच्यासाठी हा सुखद धक्का होता. पण तिच्या मनात त्याच्यासाठी कुठल्याच भावना नव्हत्या. ती तर त्याला जवळचा मित्रही मानत नव्हती. प्रेम वगैरे तर खूप दूरची गोष्ट होती. पण अशावेळी मित्र मैत्रीणी मात्र कार्यतत्पर असल्याप्रमाणे मध्यस्ती करतात. त्यात कॉमन फ्रेंड असतील तर त्यांची कार्यतत्परता तर आवर्जून दिसून येते. इथेही तसच झाल.
"किती चांगला मुलगा आहे. शोधून सुद्धा तुला असा मुलगा मिळणार नाही”
"काय पाहिजे अजून तुला? हॅन्डसम आहे, रिच आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर मनापासून प्रेम करतो."
"अरे यार!!! अशा मुलाने मला प्रपोज केल असत तर मी एका क्षणाचाही विचार केला नसता.
अशा एक ना अनेक वाक्यांचा भडीमार तिच्यावर होत होता. अशातच एका निवांत संध्याकाळी त्याचा कॉल आला. रिसीव्ह करु की नको विचार करता करता कस कुणास ठावूक पण तिने त्याचा कॉल घेतला.
त्याला प्रमोशन मिळाल होत आणि हा आनंद त्याला तिच्यासोबत सेलिब्रेट करायचा होता. हो नाही करत अखेर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायच ठरल.
ती संध्याकाळ तिच आयुष्य बदलणारी ठरली. महागड रेस्टॉरंट, तिथल मंद म्युझिक आणि एकूणच रोमॅन्टिक वातावरण. तस तिने त्याला नकार दिला असला तरी तो तिला आवडत नव्हता असही नव्हत. पण ती त्याच्या प्रेमात वगैरे पडली नव्हती.
खूप छान बोलत होता तो. त्याच्याबद्दल बरच काही सांगत होता. अर्थात बऱ्याच जणांची सिक्रेट्स शेअर करायची सवय असणाऱ्या तिच्यासाठी हे काही नवीन नव्हत. बोलता बोलता तो एकदम भावूक झाला आणि म्हणाला, "मी खरच खूप मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. माझ्या आयुष्यातली मला आवडलेली तू एकमेव मुलगी आहेस. तू भेटायच्या आधी मी फक्त आणि फक्त करिअर, सक्सेस याचाच विचार केला. पण तू भेटलीस आणि माझ आयुष्यच बदलल. आयुष्य कधी कठीण, बोअरिंग कधीच नव्हत पण तू भेटल्यावर मात्र ते खूप सुंदर असत हे नव्याने जाणवल. तुला हवा तितका वेळ घे मी तुझी वाट बघतोय”.
तिला त्याच्यातला, त्याच्या प्रेमातला खरेपणा जाणवला. त्यानंतर मात्र ती गंभीरपणे त्याचा विचार करु लागली. मित्र मैत्रीणी तर तिला होकार दे असच समजावत होते. पण तिच्या मनातल्या मिस्टर मॅच च्या इमेजमध्ये तो बसत नव्हता. तिला तिच अंतर्मन काही वेगळच सांगत होत.
तिच्या मनातले विचार संपत नव्हते. आई सतत म्हणते, ' लग्न म्हटल की थोडफार ॲडजस्ट करावच लागत.'
मीता तर नेहमी म्हणते, 'आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न केल तर आपण जास्त सुखी होतो".
"पण मला काय वाटतय? मी प्रेम करते का त्याच्यावर?
प्रेम म्हणजे नक्की काय असत? तो अगदी छान आहे, पण मला हवा तसा आहे का?
त्याच्या आठवणीत कधीही हरवून जात नाही मी. त्याची कंपनी खूप आवडते. तो सुद्धा खूप आवडतो; पण का त्याच्याबद्दल कुठलीही ओढ जाणवत नाही मला? खरच कोणी 'मिस्टर मॅच' भेटेल का मला ? का आई म्हणते तस ........."
एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. गोंधळलेल्या तिने अखेर त्याला होकार दिला. आणि ती वर्षभरातच त्याची सौ. झाली.
लग्नानंतर होतात तशा थोड्याफार कुरबुरी होत असल्या तरी एकूणच संसार सुखात चालला होता. तिनेही आपण त्याच्यावर प्रेम करतो अशी मनाची समजूत घातली होती. कधीकधी मनात विचार यायचा, 'आपण खरच प्रेम करतो का याच्यावर?' पण या प्रश्नाच उत्तर शोधायचा तिने कधी प्रयत्नच केला नाही. खरतर तिला उत्तर शोधायची भीती वाटायची.
काही वर्ष सरली. तो त्याच्या करिअरमध्ये बिझी झाला होता. तिच्याजवळही सार काही होत. करिअर, घर, गाडी, संसार आणि दोन गुणी मुल. पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी आहे हे तिला सतत जाणवत होत. ती उत्साहाचा अखंड वाहणारा झरा तर तो शांत, अथांग सागर; मनाचा थांगपत्ता न लागणारा. सतत आपल्याच कोषात जगणारा. कुठेच ताळमेळ जमत नव्हता. तरीही ती सगळ सांभाळून घेत होती. हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण त्याच्यावर प्रेम करतोय, आपण सुखात आहोत अस स्वतःलाच समजावत होती. तो तर सुस्वभावी, शांत आणि विचारी होता. तिच्यावर मनापासून प्रेम करत होता.
आयुष्य कधी कुठल वळण घेईल हे काही सांगता येत नाही. तिचही तसच झाल. तिच्या आयुष्यात अजून एक 'तो' आला. तो ऑफिसमध्ये नव्याने रुजू झाला होता. त्याचे आणि तिचे विचार जुळले, सूर जुळले. मनं जुळली. आधी मैत्री मग प्रेम असा प्रवास सुरु झाला. माहिती होतं तिला या नात्याला काहीच भविष्य नाही तरीही हे नातं तिला गमवायच नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा तिला प्रेमाची जाणीव झाली होती. प्रेम म्हणजे काय? ती ओढ काय असते? नक्की कुठल्या भावना असतात ? या साऱ्या प्रश्नांची उत्तर तिला मिळाली होती. ती हुरहूर, धडधड हे सार ती आयुष्यात प्रथमच अनुभवत होती. ती त्याच्यामध्ये आयुष्याचा जोडीदार नाही पण एक जीवलग शोधत होती. त्याच्याशी ती प्रत्येक गोष्ट शेअर करायची. तिची अनेक सिक्रेट्स जी मीतालाही माहीती नव्हती ती तिने त्याला सांगितली होती. त्यालाही ती मनापासून आवडायची. खूप सुंदर नातं तयार झाल होत दोघांमध्ये पण तरीही मनातल प्रेम कधीच कोणी व्यक्त केल नाही. न बोलताच दोघांना एकमेकांच्या मनातल सार काही कळल होत.
तिला हे नात शांतपणे, हळूवारपणे फुलवायच होत. एक निरपेक्ष नातं जपायच होत. कधी कधी तिच्या मनात यायच, "आपल काही चुकत तर नाही ना? आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या सज्जन नवऱ्याची फसवणूक होत नाहीये ना? "
फसवणूक?? इतकी वर्ष त्याच्यावर प्रेम आहे असा समज करुन स्वतःला आणि पर्यायाने त्यालाही फसवत आले. आता तरी स्वतःची फसवणूक नको. मी कुठल्याही मर्यादा ओलांडत नाहीये. ओलांडणारही नाही. पण नकळत मनात निर्माण झालेल्या प्रेमाच्या भावना थांबवू पण शकत नाही. खरतर मला थांबवायच्या नाहीयेत. कारण यातलं काहीही ठरवून घडलेल नाही. जे काही आहे ते १००% नैसर्गिक आहे; आणि म्हणूनच कोणाला काहीही वाटल तरी माझ्या दृष्टीने यात काहीही चुकीच नाही.
एखाद प्रसिद्ध गाण कितीही छान असल तरीही ते मनाची पकड घेत नाही तर कधीकधी एखाद सहज ऐकलेल एखाद साध गाणही मनाला स्पर्श करत. अगदी तसच असत नात्यांचही. एखाद्याशी जन्मजन्मांतरीसाठी नात जुळल तरीही कुठेतरी काहीतरी कमी जाणवते. तर कधी एखाद्याशी अगदी सहज सूर जुळतात अगदी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारख! त्या नात्याला काही नाव नसत पण तरीही ते हवहवस वाटत. खरतर नात्याला कुठल नाव नकोच द्यायला; नात्याला नाव दिल की त्याच्या जोडीने येणारी अनेक नाती निभावावी लागतात आणि मग ते नात फक्त दोघांच रहात नाही.
या नवीन नात्यामध्ये मला एक मित्र, एक जीवलग सार काही सापडलय. मिस्टर मॅच सापडलाय. काय गरज आहे मिस्टर मॅच फक्त लग्नासाठीच शोधायची? शरीरा पलीकडे जाऊन एक मन असत. या मनाला कधी, काय आवडेल ते सांगता येत नाही. कधी कुठे गुंतायच हे आपण ठरवू शकत नाही. या मनाला गरज असते समजून घेणाऱ्या एका मनाची. हे नातं मनाच मनाशी जुळलेले नातं आहे. ते चुकीच कस असू शकेल ?
स्वतःच्या विचारांमध्येच हरवलेली असताना अचानक तिच्या कानावर गाण्याचे सूर ऐकू येतात-
"नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा...."
©मानसी जोशी