Wednesday, 30 January 2019

वाघा बॉर्डर - एक अविस्मरणीय अनुभव

भारत माता की जय !!!
हिंदुस्थान जिंदाबाद !!
वंदे मातरम!!!
मावळत्या सूर्याच्या साक्षीने आसमंतात हे नारे घुमत होते. तिथे जमलेला प्रत्येकजण मोठ्या मोठ्या आवाजात या घोषणा देत होता. समोर दिसणारी पाकिस्तानची बॉर्डर बघून देशप्रेमाचं आलेलं भरतं अजूनच वाढत होतं. आयुष्यात अनुभवलेल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक असलेला हा क्षण. स्थळ अर्थातच #वाघा_बॉर्डर!!
    अमृतसरवरून दीडशे रुपयात वाघा बॉर्डरला नेऊन आणणाऱ्या गाड्या मिळतात. तिथे पोचल्यावर आतमध्ये काहीही नेऊ देत नाहीत (अगदी लेडीज पर्सही नाही). खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या न्यायला मात्र परवानगी आहे.  सुरक्षा व्यवस्था अर्थातच कडक असते.
    आतमध्ये सर्वाना कार्यक्रम व्यवस्थित बघता यावा म्हणून दोन बाजूला दोन मोठे प्रोजेक्टर लावलेले आहेत. ठीक साडेचार वाजता कार्यक्रम चालू होतो. प्रचंड गर्दीमुळे तुडूंब भरलेलं स्टेडीयम, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ यासारख्या घोषणा खड्या आवाजात देणारे मिलिटरी ऑफिसर, त्या घोषणा फॉलो करणारे भारतीय, ताठ मानेने आणि निधड्या छातीने पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत जाऊन समोर दिसणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या नजरेला नजर देऊन खुन्नस देणारे आपले भारतीय सैनिक (आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये महिला सैनिकही होत्या), हे सारे दृश्य बघून देशप्रेमाची एक वेगळीच उर्मी मनात दाटून आली.
  कार्यक्रम संपताना पश्चिमेकडे झुकणाऱ्या सूर्याच्या तेजस्वी लाल गोळ्यासमोर तितक्याच तेजाने फडकणारा आपला तिरंगा पाहून ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा….’ चे सूर आपोआपच मनात गुंजू लागले.
 “बाकी काहीही बघायचं राहिलं तरी चालेल, आपण इतर कुठेही गेलो नाही तरी मला चालेल, पण मला वाघा बॉर्डरला जायचंच आहे…...”  माझं हे वाक्य सर्वतोपरी सार्थ करणारा ‘वाघा बॉर्डरचा कार्यक्रम’ आयुष्यतल्या संस्मरणीय कार्यक्रमांपैकी एक आहे.
कार्यक्रम संपल्यावर अनेक फोटोज क्लिक केले.बाहेर आल्यावरही फोटोसेशन चालूच होतं. त्याचदरम्यान घोषणा देणारे ‘मिलिटरी ऑफिसर’ बाहेर आले. त्यांना भेटायची खूप इच्छा होती पण क्षणार्धात त्यांच्याभोवती एवढी गर्दी जमली की त्यांना भेटायला गेलो असतो तर निघायला उशिर झाला असता.
“सोड ना त्यांना का भेटायचं आहे तुला? काय करणार त्यांना भेटून?” या प्रश्नावरही मी न चिडता शांतपणे उत्तर दिलं,
“इथे शाहरुख अमीर असते तर मी नसतं म्हटलं भेटायला जाऊया but  ‘They are #Real_Heroes of our country. I respect them. आज त्यांच्यामुळेच आपण असं मोकळेपणे फिरू शकतो. सुखाने झोपू शकतो.”
   या कार्यक्रमा-दरम्यान अनुभवलेली आणि मनाला न पटलेली एक गोष्ट मुद्दाम इथे लिहिते. स्टेडीयमवर जागोजागी मोठे मोठे डस्ट-बीन ठेवलेले असूनही सर्वत्र फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, चिप्सचे रॅपर आणि इतर कचरा बघून संताप आला. लोकांना एवढी साधी गोष्ट कळू नये? एक दोन ठिकाणी तर डस्ट-बीनही कलंडलेले दिसले. पण नेहमीप्रमाणे, “या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही”, असा विचार करून स्वतःची समजूत घातली.
  बाहेर दूरवर पसरलेलं हिरवंगार शेत पण त्यांना दोन देशांमध्ये विभागाणारं तारेचे कुंपण, दोन्ही देशांमधील कुंपणाची जाणीवही नसलेले आणि आकाशात मुक्तपणे पक्षी, वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीत असणारं परंतु सावली मात्र हिंदुस्थानात देणारं एक झाड, दोन्ही देशांत एकाचवेळी अस्ताला जाणारा सूर्य आणि वाहणारा गार वारा… नितांतसुंदर अनुभव होता हा. हे सारं बघून कोणाच्याही मनात एकच गाणं घोळत राहीलं ---
“पंछी, नदियाँ, पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके..”





©मानसी जोशी

Wednesday, 2 January 2019

ब्रेकिंग न्यूज आणि चॅट शो

ब्रेकिंग न्यूज…
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार गेल्यावर्षी दुष्काळग्रस्त असलेल्या पाणीपूर गावात आज चक्क 25 mm पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गावकरी सुखावले असून जाणून घेऊया गावकऱ्यांची मतं आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून…
हॅलो...हॅलो… निखिल तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो… हा बोला निखिल….
माफ करा तांत्रिक अडचणींमुळे निखिलशी संपर्क होऊ शकत नाही… तोपर्यंत आपल्या स्टुडियोत या क्षणाला उपस्थित असणाऱ्या काही महत्वाच्या माणसांशी वार्तालाप करून त्यांची मते जाणून घेऊयात…
आपल्या सोबत उपस्थित आहेत विरोधी पक्ष नेते अण्णाभाऊ, आमदार तात्यासाहेब, ज्योतिष विभूषित संत महाराज आणि वेधशाळेतील रिटायर्ड ऑफिसर आणि  पर्यावरण अभ्यासक श्रीयुत अंदाजे….
तर आमदारसाहेब पहिला प्रश्न तुम्हाला … गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त असणाऱ्या गावात आज 25 mm पाऊस पडला याबद्दल काय वाटतं तुम्हाला ?
तात्यासाहेब: हे बघा आमचं सरकार नुकतच सत्तेत आलं आहे आणि सत्तेत आल्यापासून या सगळया सुधारणा घडवून आणायला सुरवात केली आहे.
अण्णासाहेब: आव काय बोलताय तुम्ही तात्यासाहेब? आमी सत्तेत असताना काय त्या गावात जाणारे ढग अडवून ठेवत होतो व्हय?
तात्यासाहेब: तुमच्या पाऊस आणि धरणं यांच्या धोरणाबद्दल न बोललेलेच बरे..
अण्णासाहेब: आता धरणांचा मुद्दा कुटं आला हितं? आणि पाणीपूर मध्ये काय यांचा पक्ष सत्तेत आल्यामुळं पाऊस पडला व्हय...
एक मिनिट अण्णासाहेब तुम्हालाही बोलण्याची संधी देण्यात येईल. तोपर्यंत दुसरा प्रश्न संत महाराज तुमच्यासाठी …
काय वाटतं तुम्हाला आजच्या पावसाबद्दल?
संत महाराज: (पोथी समोर घेऊन चष्मा लावून) हे बघा पाणीपूरच्या पत्रिकेनुसार त्यांची साडेसाती आता संपलेली आहे त्यामुळे आता यावर्षी तिथे चांगला पाऊस पडेल.
तात्यासाहेब: आमचा पक्ष सत्तेत आल्यापासून पाणीपूर काय अख्ख्या देशाचीच साडेसाती संपली आहे.
अण्णासाहेब: हे बघा उगाच कुटल्या बी गोष्टी चा संबंध तुमच्या सत्तेशी जोडू नका.
..एक मिनिट अण्णासाहेब मी लवकरच तुमच्या प्रश्नापाशी येतेय पण त्याआधी मी पर्यावरण अभ्यासक श्रीयुत अंदाजे यांना आजच्या पावसाबद्दल  त्यांचं मत विचारते
अंदाजे: अहो नैऋत्येस वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हा पाऊस पडलेला आहे. बाकी ग्रह तारे वगैरे सगळं झूठ असतं हो.
संत महाराज: हे बघा उभं आयुष्य वेधशाळेत नोकरी करूनही एकदाही अंदाज बरोबर आला नाही तुमचा. मी सांगितलेली 70% भविष्य बरोबर असतात.
अंदाजे: म्हणजे 70% अंधारात मारलेले बाण लागले असं म्हणा ना.
तात्यासाहेब: आम्ही सत्तेत आल्यावर वेधशाळेसाठी आधुनिक उपकरणे खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे अचूक अंदाज वर्तविण्यात हवामान खाते यशस्वी होईल.
अण्णासाहेब: हे बघा आम्ही सत्तेत असताना बी आधुनिक उपकरणे हवामान खात्याला पुरवली होती. विचरा की या अंदाजे सायबासनी.
…. अण्णासाहेब मी तुमच्या प्रश्नाकडे वळतेय पण त्याआधी….
अण्णासाहेब: मगाच पासन बघतूया मी बोलायला लागलो की “मी तुमच्या प्रश्नाकडे वळतेय”, असं म्हनून थांबवताय मला.. बोलूच द्यायचं नव्हतं तर कशापायी बोलावलं मला.
… माफ करा अण्णासाहेब आत्ता पाणीपूर गावात असणाऱ्या आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होतोय….
हॅलो …. हा निखिल बोला….
निखिल: पाणीपूर मध्ये सर्व लोक खूप खुश आहेत. जवळपास दीड वर्षांनी पाऊस पडल्यामुळे इथली जनता सुखावली आहे. मुले आनंदाने पावसात भिजतायत। आणि ….
माफ करा … पुन्हा निखिलशी संपर्क तुटलाय.. आता स्टुडियोत मान्यवरांना प्रश्न विचारण्यासाठी  येणाऱ्या नागरिकांच्या फोन कॉल्सकडे वळूया..
पहिला फोन आहे पुण्याहून ××××× यांचा
हॅलो… हा बोला…..तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे.
पलीकडून: हे बघा मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. साधा 25 mm पाऊस पडला त्याची ब्रेकिंग न्यूज कसली आणि
चॅट शो कसले करता ? तुमच्याकडे दाखवायला दुसरं काही नसेल तर…..
हॅलो हॅलो श्री  ××××× यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आता पुढच्या फोन कॉलकडे वळण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक! कुठेही जाऊ नका पाहत रहा……

©मानसी जोशी








Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...