ब्रेकिंग न्यूज…
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार गेल्यावर्षी दुष्काळग्रस्त असलेल्या पाणीपूर गावात आज चक्क 25 mm पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गावकरी सुखावले असून जाणून घेऊया गावकऱ्यांची मतं आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून…
हॅलो...हॅलो… निखिल तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो… हा बोला निखिल….
माफ करा तांत्रिक अडचणींमुळे निखिलशी संपर्क होऊ शकत नाही… तोपर्यंत आपल्या स्टुडियोत या क्षणाला उपस्थित असणाऱ्या काही महत्वाच्या माणसांशी वार्तालाप करून त्यांची मते जाणून घेऊयात…
आपल्या सोबत उपस्थित आहेत विरोधी पक्ष नेते अण्णाभाऊ, आमदार तात्यासाहेब, ज्योतिष विभूषित संत महाराज आणि वेधशाळेतील रिटायर्ड ऑफिसर आणि पर्यावरण अभ्यासक श्रीयुत अंदाजे….
तर आमदारसाहेब पहिला प्रश्न तुम्हाला … गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त असणाऱ्या गावात आज 25 mm पाऊस पडला याबद्दल काय वाटतं तुम्हाला ?
तात्यासाहेब: हे बघा आमचं सरकार नुकतच सत्तेत आलं आहे आणि सत्तेत आल्यापासून या सगळया सुधारणा घडवून आणायला सुरवात केली आहे.
अण्णासाहेब: आव काय बोलताय तुम्ही तात्यासाहेब? आमी सत्तेत असताना काय त्या गावात जाणारे ढग अडवून ठेवत होतो व्हय?
तात्यासाहेब: तुमच्या पाऊस आणि धरणं यांच्या धोरणाबद्दल न बोललेलेच बरे..
अण्णासाहेब: आता धरणांचा मुद्दा कुटं आला हितं? आणि पाणीपूर मध्ये काय यांचा पक्ष सत्तेत आल्यामुळं पाऊस पडला व्हय...
एक मिनिट अण्णासाहेब तुम्हालाही बोलण्याची संधी देण्यात येईल. तोपर्यंत दुसरा प्रश्न संत महाराज तुमच्यासाठी …
काय वाटतं तुम्हाला आजच्या पावसाबद्दल?
संत महाराज: (पोथी समोर घेऊन चष्मा लावून) हे बघा पाणीपूरच्या पत्रिकेनुसार त्यांची साडेसाती आता संपलेली आहे त्यामुळे आता यावर्षी तिथे चांगला पाऊस पडेल.
तात्यासाहेब: आमचा पक्ष सत्तेत आल्यापासून पाणीपूर काय अख्ख्या देशाचीच साडेसाती संपली आहे.
अण्णासाहेब: हे बघा उगाच कुटल्या बी गोष्टी चा संबंध तुमच्या सत्तेशी जोडू नका.
..एक मिनिट अण्णासाहेब मी लवकरच तुमच्या प्रश्नापाशी येतेय पण त्याआधी मी पर्यावरण अभ्यासक श्रीयुत अंदाजे यांना आजच्या पावसाबद्दल त्यांचं मत विचारते
अंदाजे: अहो नैऋत्येस वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हा पाऊस पडलेला आहे. बाकी ग्रह तारे वगैरे सगळं झूठ असतं हो.
संत महाराज: हे बघा उभं आयुष्य वेधशाळेत नोकरी करूनही एकदाही अंदाज बरोबर आला नाही तुमचा. मी सांगितलेली 70% भविष्य बरोबर असतात.
अंदाजे: म्हणजे 70% अंधारात मारलेले बाण लागले असं म्हणा ना.
तात्यासाहेब: आम्ही सत्तेत आल्यावर वेधशाळेसाठी आधुनिक उपकरणे खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे अचूक अंदाज वर्तविण्यात हवामान खाते यशस्वी होईल.
अण्णासाहेब: हे बघा आम्ही सत्तेत असताना बी आधुनिक उपकरणे हवामान खात्याला पुरवली होती. विचरा की या अंदाजे सायबासनी.
…. अण्णासाहेब मी तुमच्या प्रश्नाकडे वळतेय पण त्याआधी….
अण्णासाहेब: मगाच पासन बघतूया मी बोलायला लागलो की “मी तुमच्या प्रश्नाकडे वळतेय”, असं म्हनून थांबवताय मला.. बोलूच द्यायचं नव्हतं तर कशापायी बोलावलं मला.
… माफ करा अण्णासाहेब आत्ता पाणीपूर गावात असणाऱ्या आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होतोय….
हॅलो …. हा निखिल बोला….
निखिल: पाणीपूर मध्ये सर्व लोक खूप खुश आहेत. जवळपास दीड वर्षांनी पाऊस पडल्यामुळे इथली जनता सुखावली आहे. मुले आनंदाने पावसात भिजतायत। आणि ….
माफ करा … पुन्हा निखिलशी संपर्क तुटलाय.. आता स्टुडियोत मान्यवरांना प्रश्न विचारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या फोन कॉल्सकडे वळूया..
पहिला फोन आहे पुण्याहून ××××× यांचा
हॅलो… हा बोला…..तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे.
पलीकडून: हे बघा मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. साधा 25 mm पाऊस पडला त्याची ब्रेकिंग न्यूज कसली आणि
चॅट शो कसले करता ? तुमच्याकडे दाखवायला दुसरं काही नसेल तर…..
हॅलो हॅलो श्री ××××× यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आता पुढच्या फोन कॉलकडे वळण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक! कुठेही जाऊ नका पाहत रहा……
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment