Monday, 21 November 2016

डॅडीज गर्ल

डॅडीज गर्ल!! आजकालच्या समस्त पुरुषवर्गाच्या अनेकवेळा ओठावर येणारा पण कदाचित तिथेच थांबणारा शब्द. बायका मम्माज  बॉय, बायकोचा बैल वगैरे विशेषणं अगदी सहज वापरतात पण त्यामानाने डॅडीज गर्ल हा शब्द फारच कमी वापरला जातो. मला मात्र  ममाज बॉय जेवढ पटायचं तेवढ डॅडीज गर्ल पटत नव्हत पण हा डॅडीज गर्ल चा प्रत्यय मात्र मला प्रत्यक्षात माझ्याच घरात आला. माझी ९ वर्षांची मुलगी चिन्मयी आम्ही तिला चिनू म्हणतो. या लहान मुलांच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. त्या दिवशी स्वतःचाच लहानपणीचा फोटो घेऊन आली आणि मला विचारू लागली,"आई सांग तुला कुठली चिनू आवडते मी का हि फोटोतली ?" मी काम करता करताच  काहीस वैतागुनच म्हणाले, "चिनू काय वेडेपणा आहे. त्रास देऊ नकोस ग". पण हि पठ्ठी काही ऐकायलाच तयार नाही. 'सांगा ना आई'  चा हेका चालूच. मग मी हि म्हणाले "दोघीही". "नाही एकच सांगायचं .....चिनू. "नाही एक नाही सांगता येणार हा. तू सांगू शकतेस का जास्त कोण आवडत, आई कि बाबा?" मी माझा हुकुमाचा एक्का काढला. यावर मात्र ती जरा हिरमुसली आणि निघून गेली. मी सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात परत येऊन म्हणते कशी, " अग तुम्ही दोघ  वेगवेगळी आहात म्हणून मला नाही सांगता येत, इथे दोन्ही मीच आहे ना . इतर वेळेला अभिमान वाटावी अशी यांची हुशारी अशावेळी मात्र आपल्याला त्रासदायक ठरते.माझ्या  हुकुमाच्या एक्क्याचा तिने अगदीच जोकर करून टाकला.  तेवढ्यात तिच्या  मैत्रीणी तिला खेळायला बोलवायला आल्या. इतर वेळीस खासकरून परीक्षेच्या वेळीस मला व्हीलानसाराख्या वाटणाऱ्या या मैत्रिणी त्या दिवशी मात्र मला देवादुतासारख्या वाटल्या. सुटले, विसरेल आता असा विचार करून मी निर्धास्त झाले. दुसऱ्या दिवशी रविवार होता.दुपारी  जेवण झाल्यावर आमचे अहो हक्काची सुट्टी  एंजॉय करणे म्हणजे शक्य तेवढ झोपणे या नियमानुसार बेडरूम मध्ये गेले. चीनुही पाठोपाठ फोटो घेऊन. आता मात्र मला हसू आवरेना माझ्या अपेक्षेनुसार एक तर ती ओरडून घेणार होती किंवा बाबा ignore करतात म्हणून वैतागणार होती. पण हिला अहो काय सांगतायत याची मात्र मला प्रचंड उत्सुकता होती. चला बघुया काय होतंय म्हणून मीही मागोमाग आत गेले.  दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मी शांतपणे whats ap वरचे messages चेक करत होते. अखेर तो क्षण आला..... मी लक्ष नसल्याचे दाखवत मोबाईल मध्येच डोकं खुपसून बसले.... " सांगा ना बाबा कोण जास्त आवडत तुम्हाला? मी कि हि फोटोतली चीनु? चिनूने विचारलं. क्षणभर विचार करून अहो तिच्याकडे बोट करून म्हणाले "जेव्हा हि चिनू घरात नसते तेव्हा या फोटोतली चिनू आवडते आणि जेव्हा हि चिनू घरात असते तेव्हा हीच आवडते." चिनू खुश झाली. माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहून बाबांच्या कुशीत शिरली..  मी मात्र विचार करत राहिले  किती सहज समजावलं याने हिला. हे मला का नाही सुचल. असो. कधीतरी whats ap वर आलेला मेसेज आठवला, "
 एक लडकी चाहे कितनी भी कोशिश करे
फिरभी वो अपने पती के लिये रानी कभी नही बन सकती,
लेकीन हजार गलातीयोन्के बावजुद भी
अपने पापा के लिये राजकुमारी जरूर होती है. .....

©मानसी जोशी 

माहेरुन निघताना

#माहेरुननिघताना
मंगळवारी रात्री माझ्या माहेरहून म्हणजेच रत्नागिरीहून पुण्याला परत यायला निघाले. लग्नाला १२ वर्षे होवून गेली तरी आजही माहेरहून निघताना मन हळव होतं. बसमध्ये बसल्यावर हात हलवून बाबांना निरोप दिला. त्या स्लिपर कोच नामक सुपरफास्ट बैलगाडीत बसल्यावर जणू जगाशी संपर्कच तुटतो. गाडी पुढे जात होती आणि डोळ्यासमोर गेल्या आठ दिवसातील सगळ्या घटना तरळत होत्या. यावेळी सगळ्यात जास्त धमाल आली ती माझ्या सव्वा वर्षांच्या भाचीमूळे - नीरजामूळे. तिच्या बाललीला बघून मन सुखावून गेले. डोळ्यासमोर सतत तिचा चेहरा येत होता. तिने आsssत्या अशी मारलेली गोड हाक सतत कानात घूमत होती. निघायच्या दिवशी मी तिला सांगत होते, " मनू आज जाणार आहे हा मी ............"  तिला काही कळत होत का ते माहिती नाही पण शांतपणे सगळ ऐकत होती. ते आठवून हसायला आलं. मनात आल, 'पुढच्या वेळी मी हिला बघेन तेव्हा किती बदललेली असेल ही.' या आठ दिवसांमध्ये काय काय करायच ठरवल होतं ते आठवल पण बरचस राहून गेल होत.
बरेचसे नातेवाईक रत्नागिरीमध्येच रहात असल्यामुळे "यावेळी नक्की येते तुमच्याकडे" अस सांगून ज्यांच्याकडे जायला जमल नाही असे नातेवाईक; "काय ग कधी येणार आहेस अस मेसेज करून विचारणारे पण या वेळेसही ज्यांना भेटायला जमल नाही असे मित्र मैत्रिणी सारे डोळ्यासमोर आले. आपल्या नोकरीमुळे जास्त वेळ देता येत नसल्याच शल्य बोलून दाखवणारे भाऊ भावजय आठवले. प्रत्येक खेपेला आपल्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून भेटणारे मित्र मैत्रीणी आणि त्यांची भेट आठवली. "काय ग पुणं मानवल हा तुला  किंवा "सॉलिड आहेस हा तू अगदी आहेस तशीच आहेस, पूर्वीइतकीच बारिक असतीस तर कॉलेजची स्टुडंटच वाटली असतीस. अशा शब्दात तारीफ(?) करणारे मित्र मैत्रिणी, त्यांची काही तासांची पण काही मिनिटांतच संपली अशी वाटणारी भेट; निघताना "परत कधी भेटू काय माहिती" अस म्हणून नाराजीने एकमेकांचा घेतलेला निरोप; हे सार आठवून डोळ्यात पाणी तरळल. मनात आल; एक काळ असा होता जेव्हा सगळे रोज भेटत होते. तेव्हा मोबाईल नव्हता; फेसबूक, whats ap, काहीच नव्हत. फक्त लॅंडलाइन फोन होता. कॉलेजमध्ये भेटूनही पुन्हा तासनतास फोनवर गप्पा मारल्या आणि त्यावरुन घरच्यांची किती बोलणी खाल्ली होती. आज जवळ मोबाईल आहे त्याच बिल भरायला हातात पैसा आहे पण कोणाशी कित्येक दिवसात साध दोन मिनिटेही बोलणं होत नाही. फोनवर तासनतास बोलायचे म्हणून ओरडणारे आई बाबा आजही सारखा मोबाईल हातात असला की ओरडतात फरक फक्त एवढाच; तेव्हा त्यांच्या ओरडण्यामुळे चिडचिड व्हायची आणि आज खूप बरं वाटत. निदान काही क्षण तरी आपल्याच घरी असल्यासारख वाटत. लग्नानंतर आपल्याच एके काळच्या हक्काच्या घरी आपण चार दिवस पाहुणी म्हणून जातो; जिथला कोपरान् कोपरा आपल्या परिचयाचा असतो अचानक  तिथली दारे खिडक्याही काहीशी अनोळखी भासतात.  आज इतक्या वर्षानंतरही मनात येतं, "का मुलीना आपल घर सोडून जावं लागत? का आपल्याच घराला आपण परके होवून जातो?" प्रत्येकवेळी माहेरी गेल्यावर वार्धक्याकडे झुकणारे, तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरु झालेले आई बाबा बघितले की अचानक आपल्या वयाच्या  मोठेपणाची जाणीव होते. वाटत लहान होवून आईच्या कुशीत शिराव, बाबांकडे हट्ट करावा पण ......आपण मोठे झालो ना आता.  तस फोनवर रोजच बोलण होतं कधीकधी अगदी दोन तीन वेळा पण प्रत्यक्ष भेटीच समाधान त्यात नसतं. जायच्या दिवशी बॅग भरायची गडबड. बाबांचे नेहमीच बोलणं,"नारळ नेणार आहेस का? आमसूल देवू का? कढिपत्ता काढून ठेव आत्ताच नाहीतर विसरशील, एक ना अनेक. किचनमध्ये आई खाऊची, पीठांची एकएक पुडी गुपचूप बांधत असते.  क्षणाक्षणाला मन उदास होत असत. घरातून निघताना माहेरच्या देवासमोर हात जोडले; पुण्यातून निघताना नेहमी ठरवते, ज्या देवाने लहानपणापासून जे जे  मागितले ते सर्व दिलं  त्याच्यासमोर आपल्या काही मागण्या मागाव्यात; त्याला आपले प्रॉब्लेम्स  सांगून ते दुर करायला सांगावेत पण नेहमी निघताना फक्त एकच मागणं मागते, " या घरातल्या सगळ्यांना नेहमी सुखात ठेव."डोळ्याच्या कडा ओलावतात सगळ्यांच्या नकळत त्या पुसून हसत हसत बॅग घेवून दारापर्यंत जाते. आपले अश्रू डोळ्यातच थांबवणारी आई आणि हळवे झालेले बाबा बघून क्षणभर पाय तिथेच थांबतात. पण शेवटी निघावच लागत कारण गाडीची वेळ झालेली असते. निघताना सगळ्यांना आणि घरालाही मी पुन्हा एकदा डोळे भरून बघते आणि जड झालेली पावलेही भराभर टाकत पुढे जाते. पळणाऱ्या गाडीबरोबर माझ शहरही मागे मागे जात असत.
विचारांच्या तंद्रीत असतानाच बाजूला झोपलेली लेक हात गळ्यात टाकून म्हणाली, "आई उद्या सकाळी बाबा येतील ना आपल्याला न्यायला. माझे सगळे फ्रेन्ड्स पण भेटतील उद्या." मी हसून हो म्हणाले. मनात आलं, मी माझ्या हक्कच्या घरीच तर चाललेय. जिथला प्रत्येक कोपरा मी सजवलाय. माझं घर माझी वाट बघतय. माझं हक्काच घर माझ्या मुलीच उद्याच माहेर!
©मानसी जोशी

Sunday, 6 November 2016

कथा - स्वरप्रीती -एक विलक्षण प्रेमकहाणी

स्वरप्रीती - एक विलक्षण प्रेमकहाणी

 “Ajay we are going to visit Ganesh Temple please join us”.  अनिल अजयला हाक मारून म्हणाला.
    अजय हसून म्हणाला, “No No तुम्ही जा मला थोडा वेळ इथेच थांबायचं आहे and please  speak  in Marathi .  I can  understand Marathi  ......
    "ok boss! sorry next time sure ...." त्याच बोलणं मध्येच तोडत अनिल म्हणाला. यावर दोघेही खळखळून हसले..
    "बर ऐक समुद्रामध्ये  जास्त आतमध्ये जाऊ नकोस आणि हो त्या पडक्या वाड्याजवळ बिलकुल जाऊ नकोस ती जागा ठीक नाहीये." अनिल जाता जाता अजयला समजावत म्हणाला.
     अजयने उत्तरादेखल फक्त मान हलवली आणि दूरवर अथांग पसरलेल्या  समुद्राकडे शांतपणे एकटक बघू लागला.

   अजय हा US मधून आलेला अनिलचा मित्र. उच्चशिक्षणासाठी US ला गेलेल्या कोकणातल्या अनिलची ओळख अजयशी होते. अजय हा भारतीय वंशाचा अमेरिकन मुलगा. त्याची आई मराठी आणि शास्त्रीय संगीत शिकलेली पण NRI  असणाऱ्या आणि पैसा हेच सर्वस्व असणाऱ्या माणसाशी नाईलाजाने लग्न केल्यामुळे तिची कला तिच्यापुरातीच मर्यादित राहिलेली. घरातल वातावरण कधीच खेळीमेळीच नाही. अजयला मात्र त्याच्या आईने लहानपणापासूनच मराठी आणि थोडफार शास्त्रीय संगीत शिकवलं होत. सहाजिकच मराठी भाषा आणि एकूणच मराठी संस्कृती याबद्दल त्याल प्रेम आणि आकर्षण दोन्ही होते. अनिल हा महाराष्ट्रातील आहे हे कळल्यावर अजयने त्याच्याशी मैत्रीचा हात स्वतःहून पुढे केला. नवख्या देशात अनिललाही त्याचा आधार वाटला. बघता बघता मास्टर्स पूर्ण झाल. समजायला लागल्यापासून भारतात कधीही न गेलेल्या अजयला भारत विशेषकरून महाराष्ट्र बघायची खूप इच्छा होती. त्यामुळे परीक्षेनंतर इतर कुठेही न जाता तो आणि त्याचे मित्र अनिलबरोबर त्याच्या गावी आले होते.
   कोकणात आल्यापासून अजयला हे सार आपल्या ओळखीच आहे अस वाटत होत. विशेषकरून हा समुद्र. या समुद्रावर आल्यापासून त्याला सतत वाटत होत हा अथांग सागर जणू वर्षानुवर्ष त्याची वाट बघतोय. त्या अथांग सागराकडे  तो भान हरपून पहात होता. त्याच्या मनात विचार आला. काय नातं असेल या सागराच माझ्याशी? हा काय त्याच्या आयुष्यातला त्याने पाहिलेला पहिला समुद्र नव्हता पण तरीही जी ओढ त्याला या समुद्राबद्दल वाटत होती ती या आधी कधीच वाटली नव्हती. एक अनामिक हुरहूर लागली होती त्याच्या मनाला.

"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

         अजयच्या कानावर आलेल्या गाण्याच्या मंजुळ सुरांनी अजय विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. त्याने इकडे तिकडे बघितलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. गाणं मात्र ऐकू येत होत.

आइयेsssss मेहेराबां ......

गाण्याच्या सुरांनी व्याकुळ होवून तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. चालता चालता तो पडक्या वाड्याजवळ गेला. तिथे एक सुंदर तरुणी दिसली. अजय त्याच्याही नकळत तिच्याकडे खेचला जात होता. तिच गायन चालूच होत. तो मुग्धपणे ते ऐकत होता.. गाता गाता तिच अजयकडे लक्ष गेल आणि ती एकदम शांत झाली. “का थांबलात  गा ना! खूप छान म्हणताय तुम्ही गाणं”, अजय नकळतपणे बोलून गेला. ती तरुणी काहीही न बोलता जायला निघाली. तिला थांबवत अजय म्हणाला, “तुझ नाव काय ते तरी सांगून जा.” ती न थांबताच म्हणाली.......मुग्धा.अजयही तिच्यामागून चालत तिला म्हणाला, प्लीज  थांब ना तुझ्याशी बोलायचं आहे. “आज नको उद्या संध्याकाळी भेटू आपण, मला आता निघायला हव खूप उशीर झालाय. तुम्हीही घरी जा”’ एवढ बोलून ती धावतच पडक्या वाड्याच्या दिशेने निघून गेली.           "अजय..........अजय ........... "अनिलची हाक ऐकू आली आणि अजय भानावर आला.
    “आलो”, असा प्रतिसाद देवून तो पळतच गेला.
   अनिल म्हणाला, "अजय त्या बाजूला कशाला गेलास? मी सांगितलं होत ना जाऊ नकोस तिकडे? I know you  don’t believe in such things but still....... अरे तू कोकणात आला आहेस इथे तुला खूप haunted  places बद्दल ऐकायला येईल. Please you are my guest;  my responsibility. ...... "
    अनिल वैतागून बोलत होता. अजयच मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हत त्याला सतत मुग्धाच आठवत होती. तिचे भावूक डोळे, मुग्ध पण आर्त करणारे सूर, पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला होता. “अजय काय सांगतोय मी?” अनिलने वैतागून विचारले.
      "सॉरी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन." अजय कसबस म्हणाला. एक क्षण त्याला वाटलं कि अनिलला सांगाव त्या मुलीबद्दल पण नकोच उगाच तो काहीतरी भलतच सांगेल, असा विचार करून तो गप्प राहिला.
    घरी गेल्यावर अजय एकदम गप्प गप्प होता. कोणाशी बोलायची त्याची इच्छाच नव्हती. त्याला फक्त मुग्धा आठवत होती. बाकी सगळेही फिरून दमले असल्यामुळे तसे गप्पच होते. त्यामुळे तसा कोणालाच संशय आला नाही. पटापट जेवण उरकून सगळे झोपायला गेले आणि अंथरुणावर पडल्या पडल्या सगळ्यांना गाढ झोप लागली. अजय मात्र जागा होता. मुग्धाच्या आठवणीत तळमळत होता. दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गावातली काही मोजकी ठिकाण पाहून संध्याकाळी सगळे घरी आले. सगळे खुप दमले होते. अजय मात्र खूप उत्साही होता कारण त्याला मुग्धा भेटणार होती. फ्रेश होवून तो समुद्रावर जायला तयार झाला. पण त्याच्याबरोबर जायची कोणाचीच इच्छा नव्हती. अजय एकटाच जायला निघाला ते पाहून  अनिलच्या बाबांनी त्यांच्याकडच्या गड्याला विसूला त्याच्याबरोबर पाठवलं.  अजय मनातून वैतागला पण त्याचा नाईलाज होता. समुद्रावर पोचल्यावर अजयने विसूला  घरी जायला सांगितले. त्यालाही घरी जायची घाई असल्याने तो निघून गेला. तो गेल्याची खात्री झाल्यावर अजय पळतच त्या पडक्या वाड्याच्या दिशेने निघाला. त्याला आसपास मुग्धा कुठेच दिसत नव्हती . त्याने तिला हाक मारली पण तिचा काहीच पतिसाद आला नाही. इतक्यात त्याला आठवलं काल ती पडक्या वाड्याच्या दिशेने धावत आतमध्ये गेली होती. तो हि धावत तिकडे गेला. वाड्याच्या गंजलेल्या  गेटमधून आत गेल्यावर तो क्षणभर थांबला. त्याला अनिलचे शब्द आठवले. नाही काही झाल तरी अनिलाशी बोलल्याशिवाय इथे जाण योग्य नाही, त्याच्या मनाने त्याला कौल दिला आणि तो परत जाण्यासाठी निघाला. गेटमधून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा गाण्याचे तेच सूर ऐकू आले.

"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

........एका अनामिक ओढीने तो वाड्याकडे खेचला गेला.
अंधार पडून गेला तरी अजयचा पत्ता नाही म्हटल्यावर अनिल थोडा घाबरला. पण गडी बरोबर असल्यामुळे तशी भीती नाही असा विचार करून तो गप्प राहिला. त्याने अजयचा मोबाईल ट्राय  केला पण तो स्विच्ड ऑफ  लागत होता. अखेर साडेआठ वाजून गेल्यावर अनिल  आणि त्याचे मित्र अजयला शोधायला समुद्रावर जायला निघाले. अनिलच्या बाबांनी त्यांच्या घराजवळच्या गड्याला सखारामला  त्यांच्या सोबतीला पाठवलं. अनिल मनातून खूप घाबरला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी अजय बरोबर पाठवलेला गडी विसू भेटला. तो पहिल्या धारेची मारून चांगलाच तर्र झाला होता. त्याला अजयबद्दल विचारल्यावर कसबस हेलकावे खात त्याने खर काय ते सांगितलं. अनिल विसुवर चांगलाच वैतागला. पण त्याच्यावर चिडण्यात काहीच अर्थ नव्हता. अजय आज एकटाच समुद्रावर गेला या विचाराने अनिलच्या काळजात धस्स झाल. सगळे पळतच समुद्राकडे निघाले. समुद्रावर आल्यावर सगळ्यांनी अजयला खूप हाका मारल्या पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. अखेर सगळे धावत पडक्या वाड्याच्या दिशेने निघाले. अजय कुठेच दिसेना . ना हाकेला ओ देईना अनिलने हिम्मत करून वाड्यामध्ये जायचे ठरवले. सखारामने त्याला अडवायचा प्रयत्न केला पण अनिल काहीच ऐकायला तयार नव्हता. अनिल आणि अजयचे मित्रही त्याच्याबरोबर वाड्यात गेले.
          वाड्याच गेट उघडून आत गेल्यावर दोन चार वटवाघुळे पंख फडफडवीत त्यांच्या डोक्यावरून गेली. मनातून सगळेच घाबरले होते. कधी रामरक्षा म्हणत तर कधी अजयला हाक मारत त्यांनी वाड्यात प्रवेश केला. पडका जरी असला तरी वाडा अतिशय सुंदर असावा. पौर्णिमेच्या चंद्राच शुभ्र प्रकाश सर्वत्र पसरला होता. त्यामुळे मनातली भीती थोडी कमी झाली होती. तेवढ्यात एक उंदीर अनिलच्या पायाजवळून गेला आणि भीतीने अनिल जोरात  ओरडला. तो उंदीर होता हे कळल्यावर सगळ्यांनाच हसू आले. सगळे अजयला हाका मारत अख्खा वाडा फिरून आले तरी अजय कुठेच दिसत नव्हता. अखेर निराश होवून सगळे वाड्याबाहेर जायला निघाले. तेवढ्यात अनिल कशालातरी अडखळला. बॅटरीच्या उजेडात त्याला अजयचा मोबाईल दिसला. तो पाहून सगळ्यांची खात्री झाली कि अजय इथेच आला होता. मोबाईल डिसचार्ज होवून स्विच्ड ऑफ झाला होता. आता जास्त वेळ वाड्यात थांबण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून सगळे वाड्याच्या बाहेर आले. वाड्याबाहेर सगळा गाव जमा झाला होता. अनिलला आणि त्याच्या मित्रांना पाहून अनिलच्या बाबांचा जीव भांड्यात पडला. अनिल आणि त्याचे मित्र त्याच्या बाबांसोबत पोलीस स्टेशनला गेले. तिथे रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी जुजबी चौकशी करून अजयचा मोबाईल ताब्यात घेतला. आणि सगळे आपआपल्या घरी निघून गेले. अनिलला खूप अपराधी वाटत होत. आपण अजय बरोबर गेलो असतो तर बर झाला असत अस प्रत्येकालाच वाटत होत. दिवसभराचा थकवा आणि अजयच्या गायब होण्याच टेन्शन यामुळे बसल्या जागीच सगळ्यांचा डोळा लागला. पहाटे चारच्या सुमारास अनिलच्या  मोबाईलच्या  मेसेज टोनच्या आवाजाने सगळे दचकून उठले. अनिलने झटकन  'व्हॉट्स ॲप' ओपन केले. त्यावर अजयने पाठवलेली एक 'ऑडिओ'  पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद तरळला. अनिलने क्लिप डाऊनलोड केली. सगळे शांतपणे क्लिप ऐकू लागले. अजय बोलत होता.

      “अनिल मला माफ कर मी तुझ्यापासून मुग्धाच सत्य लपवल. पण मी सत्य लपवल्यामुळे मला माझ्याबद्दलच एक मोठ सत्य कळल; माझ्या गतजन्मातल सत्य. या पडक्या वाड्यात आल्यावर मला माझा गतजन्म अगदी जशान  तसा आठवला. कोणी विश्वास ठेवा अगर ठेऊ नका पण मी जे सांगतोय तेच सत्य आहे.

   "मी निशिकांत – या वाड्याच्या मालकांचा म्हणजेच गायक पंडितशास्त्री जोशींचा मुलगा. आपल्या पत्नीशी म्हणजेच सिनेतारका कामिनिशी असलेले वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यावर आपल उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त संगीत साधना करण्यात घालवायाच अस ठरवून पंडितशास्त्री आपल्या कोकणातल्या मूळ गावी परत आले. समुद्राजवळची जागा विकत घेवून त्यांनी हा वाडा बांधला. त्यांच्याकडे संगीत शिकण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळाले. त्यांचे नियमच तसे जाचक होते. अस्सल जवाहिऱ्यासारखे ते आपला शिष्य पारखून घेत असत. मी माझ्या आईजवळच असायचो. पॉप म्युझिकच शिक्षण घेतलेला मी तसा शास्त्रीय शिक्षणासाठी कधीच उत्सुक नव्हतो. माझ्या आई आणि वडिलांमध्ये कितीही मतभेद असले तरी मला मात्र कुणाजवळही रहायची मुभा होती. त्यांच्या वादात मी कधीच भरडलो गेलो नाही. मला कोकणातल्या या गावाच आकर्षण नव्हत पण बाबांच्या ओढीने मी अधूनमधून येत असे. माझ आणि बाबांचं खूप जमायचं. त्यावर्षी मात्र मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर कोकणातल्या या वाड्यात भरपूर दिवस रहाण्यासाठी आलो होतो. बोलता बोलता एक दिवस मी बाबांना पॉप म्युझिक ऐकवलं यावर हसून ते म्हणाले, “तू फक्त गाण म्हटलस, श्रोते तुझ गाण ऐकतील, त्यावर थिरकतील पण तुझ्या सुरांनी मंत्रमुग्ध होणार नाहीत.” यावर मी चिडून म्हणालो होतो, सगळेच श्रोते काही शास्त्रीय सुरांनी मंत्रमुग्ध होत नाहीत. मी जर मुग्ध झालो तर मी मान्य करेन.” यावर ते हसून म्हणाले, “बाळा मी तुझ्या सुरांबद्दल बोलतोय तुझ्या गाण्याच्या प्रकाराबद्दल नाही.  गाणं मग ते कुठलही असो त्याला शास्त्रीय सुरांचा रियाज असेल तरच त्याचे सूर मंत्रमुग्ध करतात. मला मनातून राग आला होता पण मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी संध्याकाळी बाबा पाय मोकळे करण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडले. मी घरात एकटाच होतो. खिडकीत उभा राहून एकटक या समुद्राकडे पहात होतो तेवढ्यात माझ्या कानावर गाण्याचे काही सूर पडले.
 
"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

मी मत्रमुग्ध होवून ते गाणं ऐकू लागलो आणि माझ्याही नकळत त्या आवाजाच्या दिशेने खेचला गेलो. चालत चालत मी अंगणात आलो ती गातच होती.....
"आईयेsssss  मेहेरबा ....." आणि अचानक तीच माझ्याकडे लक्ष गेल ती क्षणात गायची थांबली.
     मी म्हणालो, “का थांबलात? गा ना! खूप छान म्हणताय तुम्ही गाणं” यावर काहीही न बोलता जायला निघाली.
    तिला थांबवत मी विचारल, “तुझ नाव काय ते तरी सांगून जा.” ती न थांबताच म्हणाली.......मुग्धा.
     ती पाहताच बाला........अशी माझी अवस्था झाली होती. तिच्या सौंदर्याने आणि सुरांनी मला घायाळ केला होत.  बाबा घरी आल्यावर मी त्यांना मुग्धाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले ती आपल्याकडे कामाला येणाऱ्या  सदू काकांची नात. तिचे आई वडील लहानपणीच वारले. त्यामुळे ती  लहान असल्यापासूनच कामाला येताना ते मुग्धाला बरोबर घेऊन येत आता ती मोठी झालेय तर बागेच सगळ काम तीच बघते. यावर बाबांना मी हसून म्हणालो, “बाबा मी हरलो! नकळतपणे तुमच्या स्वरांचे संस्कार झालेल्या मुग्धाच्या गाण्याने आज मी खरोखरच मुग्ध झालो आणि बाबांना सगळी हकीगत सांगितली. त्यांनाही खूप आश्चर्य वाटल. दुसऱ्या दिवशी मुग्धाच गाण ऐकून अस्सल हिऱ्याची पारख करण्यात आयुष्य गेलेल्या त्यांच्यासारख्या गायकाला घरात रोज येणाऱ्या कोहिनूर हिऱ्याची पारख करता आली नाही याच प्रचंड दुख झाल. सदुकाकांच्या परवानगीने मुग्धाची शिकवणी सुरु झाली. तिच्याबरोबर माझीही. तीच मन हेलावून टाकणार गाण लाघवी स्वभाव  आणि मंत्रमुग्ध करणारा चेहरा यामुळे मी कधी तिच्या प्रेमात पडलो तेच मला कळल नाही. संगीताच्या सुराबरोबर सुरु झालेली आमची प्रेमकहाणी हळूहळू बहरू लागली होती. असेच दोन महिने सरले आणि एक दिवस माझ्या आईचा म्हणजेच सिनेस्टार कामिनीचा निरोप घेवून मुंबईवरून एक माणूस आला होता. मला एक चांगला ब्रेक मिळणार होता. मी मुंबईला जायचे ठरवले माझ्या आग्रहावरून बाबाही माझ्याबरोबर मुंबईला यायला तयार झाले.  त्यादिवशी संध्याकाळी मुग्धा खुप उदास झाली होती मी जाणार होतो.........खूप दिवसांसाठी. तिला समजावता समजावता मीसुद्धा खूपच भावूक झालो आणि प्रेमाच्या त्या आवेशात आम्ही कधी एकरूप झालो ते आम्हालाच कळल नाही. जेव्हा शुद्द आली तेव्हा लक्षात आल कि जे घडू नये ते घडल होत. मुग्धासारख्या संस्कारी मुलीने हि गोष्ट फारच मनाला लावून घेतली. पण मी तिला समजावले आणि लवकरच परत येऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तिने रडतच मला विचारले, “तू नाही आलास तर?”
     त्यावर  मी हसून म्हणालो, "तू तेच मंत्रमुग्ध करणार गाण म्हण, मी कुठेही गेलो तरी तिथून परत येईन. तिचा निरोप घेऊन मी निघालो पण वाटेतच आमचा अपघात झाला आणि त्या अपघातात आम्ही दोघेही मारले गेलो. मुग्धाला हा धक्का सहन झाला नाही. तिने या विशाल समुद्रात आपल्या शरीराला झोकून दिल. पण मी तिच्याकडे परत येणार हा विश्वास तिला होता म्हणूनच  इतकी वर्ष “त्या” गाण्याचे सूर आळवत ती माझी वाट बघत माझ्यासाठी थांबून राहिली आणि अखेर तिच्या गाण्याच्या सुरांनी पुन्हा व्याकुळ होवून मी तिच्याजवळ परत गेलो. आता आम्ही एकत्र निघालोय खूप दूरच्या प्रवासासाठी आणि एकमेकांपासून कधीही विलग न होण्यासाठी. ............... "अजयच बोलण थांबल आणि गाण्याचे सूर वाजू लागले..........

"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

समाप्त
©मानसी जोशी
   

Thursday, 3 November 2016

कथा - तो आणि ती

 #तो आणि ती
तो आणि ती. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात येणार कोणीतरी खास. प्रत्येकाची पद्धत वेगळी, प्रत्येकाची कहाणी वेगळी; पण भावना मात्र एकच, प्रेम!! हि कहाणी आहे अशाच एका त्याची आणि तिची म्हणजेच राजीव आणि नेत्राची.
      ऑफिसच्या कामासाठी US ला गेलेल्या राजीवला तिथे नेत्रा भेटते. सुरुवातीला दोघही एकमेकांना ओळखत नाहीत. पण तिच्या गालावरची ती गोड खळी बघून झटक्यात त्याला तिची ओळख पटते. आणि तो स्वतः तिच्यासमोर जावून तिला विचारतो, "Excuse me!! Are you Netra Sabanis? आपल माहेरच नाव ऐकून नेत्रा क्षणभर गोंधळते पण क्षणात स्वतःला सावरुन म्हणते, "Yes right.....
ते ऐकून राजीव उत्साहाने विचारतो, "अग नेत्रा मला नाही ओळखलस मी राजीव.........राजीव किल्लेदार"
"राजू तू इथे कसा? किती वर्षानी भेटतोय आपण?" नेत्रा.   
  दोघांमध्ये संवाद चालू होतो. काही मोजक्या गप्पा आणि कॉफी होते. एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन टाटा बायबाय करुन दोघेही घरी जातात पण जाताना मात्र प्रत्येक पावलागणीक  अंतर्मनात दडलेल्या भूतकाळातील आठवणी जाग्या होत जातात.

'त्या'च्या नजरेतून ती-
     आजची अनपेक्षितपणे  झालेली नेत्राची भेट दुनिया गोल आहे हेच सिद्ध करते. आजही आपल्या भेटीचा पहिला दिवस आठवतोय नेत्रा ....... गुलाबी रंगाचा साधासा फ्रॉक घातलेली तू  आमच्या  सोसायटीमध्ये रहायला आलीस अगदी आमच्या फ्लॅटसमोर...... तुझ्या  गालावर पडणारी खळी बघून सुरुवातीपासूनच आवडायला लागलीस. त्यावेळेस तू तिसरीत आणि मी  पाचवीत. प्रेम या भावनेपासून दोघही  कोसो दूर. पण तरीही खूप आवडायचीस तू मला. खेळताना कोणी तूला रडवल, चिडवल की मी नेहमी तुझीच बाजू घेतली. तू  रडलेली मला अजिबात आवडत नसे. माझी  सगळी  'सिक्रेट्स' मी फक्त तुझ्याशी  शेअर करत असे. आपल्या दोघांच्या शाळा वेगवेगळ्या  होत्या पण शाळेची वेळ आणि वाट मात्र एकच असायची. तुझ्या  शाळेच्या आधीच्या गल्लीत माझी शाळा. त्यामूळे शाळा सुटली की मी  धावत जावून गल्लीच्या तोंडाशी  येवून तुझी  वाट बघत थांबात असे. दिवस मजेत चालले होते. तुझ्या  वाढदिवसाला मी तुला माझ्याजवळच एक मोरपीस भेट दिल होत. आणि तू  वाढदिवसाला भेट दिलेल पिंपळपान आजही मी माझ्या डायरीमध्ये जपून ठेवल आहे. अशातच एक दिवस अचानक कळल की तूझ्या बाबांची बदली झालेय दुसऱ्या शहरात.आजही आठवतोय तो दिवस तू जाणार या कल्पनेने उदास झालेल्या मला समजावत तू म्हणाली होतीस, "मी काही लगेच नाही जाणार. माझी वार्षिक परिक्षा झाल्यावर मग जाणार मी आणि आई".
  ते ऐकून क्षणात माझा चेहरा खूलला होता माझा .पण लगेच डोळ्यात पाणी आणून मी तुला विचारल होत, "तुला आठवण येइल का ग माझी? तू विसरणार नाहीस ना मला?"
   तू गोड हसून म्हणाली होतीस, "नाही रे तुला कशी विसरेन?" ए पण तू रडू नकोस हा. तू रडलास की मला खूप वाईट वाटत आणि मग मलाही रडू येत. मग मात्र आपण दोघही हसलो होतो. आजही आठवतोय तू गेलीस तो दिवस मी स्तब्ध आणि तू  प्रवाही. तू निघून गेलीस . सुरुवातीला दर महिन्याला  येणारी तूझी पत्र, प्रत्येक सणाला येणारी ग्रीटिंग्ज हळूहळू कमी होवून कधी बंद झाली ते काही कळल  नाही. मी ही मग  इतर मित्रमैत्रीणिंच्यात मिसळून गेलो. पण आजही मनातला एक कप्पा मात्र फक्त आणि फक्त  तूझ्यासाठीच आहे.

      अशीच काही वर्षे सरली. त्याने बारावी होवून दुसऱ्या शहरात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आणि एक दिवस ती त्याला कॉलेजमध्ये दिसली. "हो तिच आहे ती...  त्याच्या मनाने कौल दिला. गालावरची खळी बघून खात्री पटली आणि तो खूश होवून तिच्याशी बोलायला गेला. तिनेही त्याला पटकन ओळखले. ती आता पूर्वीपेक्षाही खूप सुंदर दिसत होती आणि तो रुबाबदार.
"तू इथे कशी? तो.
   "उद्या इथे Inter college Dance  competition आहे त्यात मी सुद्धा भाग भाग घेतला आहे. तू येशील का माझा डान्स बघायला?" ती उत्साहाने सांगत होती आणि तो तिच हे मोहक रुप आपल्या नजरेत साठवून ठेवत होता.
     तिचा डान्स बघायला जायला त्याला काही जमल नाही. नंतर अधूनमधून ती भेटत राहिली. तिच कुटूंब मूळचे याच शहरातील असल्यामूळे ते याच शहरात स्थायिक झाल होत. एक दोन वेळा तो तिच्या घरी पण जाऊन आला होता. तेव्हा तिने त्याला त्याने दिलेल मोरपीस दाखवल होत. ती भरतनाट्यमच्या परीक्षा देत होती. नृत्य विषय घेवूनच  B.A. करायच तिने ठरवल होत. अधूनमधून ती तिच्या कार्यक्रमांना, स्पर्धा बघायला बोलवायची पण त्याला काही जमल नाही. दिवस भरभर जात होते. त्याची आणि तिची होणारी प्रत्येक भेट त्याला नव्याने तिच्या प्रेमात पाडत होती.
     त्या दिवशी ती खूप आनंदात होती तो इंजिनिअर झाला होता आणि त्याला नोकरीही मिळाली होती; तिच्याच शहरात. आता भेटिंच प्रमाण थोड कमी झाल होत. पण ओढ मात्र कायम होती. हळूहळू तो ऑफिसच्या कामात बिझी होत होता. त्यादिवशी तिचा फोन आला, "काहीही कर पण उद्या माझ्या कार्यक्रमाला ये. उद्या खूप मोठा सांस्कृतीक कार्यक्रम आहे. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत. प्लीज तू ये. केवळ कार्यक्रमासाठी म्हणून नाही तर खूप महत्वाच बोलायच आहे तुझ्याशी अस समज की माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय घ्यायचाय."
   त्याने 'ओके' म्हणून तिला येण्याच वचन दिल. पण त्यादिवशी ऑफिसमध्ये हेड ऑफिसचे साहेब आल्यामुळे बॉसने अर्जंट मीटिंग बोलावली आणि नेमकी ती बराचवेळ चालली होती. तो घरी पोचला तेव्हा रात्रीचे १० वाजत आले होते. त्याला फार वाईट वाटल. पण एवढ्या रात्री तिला फोन करण त्याला योग्य वाटल नाही.उद्या बोलू असा विचार करुन तो झोपी गेला. सकाळी जाग आली तेव्हा साडेआठ होवून गेलेले. भराभर आवरून तो ऑफिसला पोचला. तो स्वतःवरच वैतागला. नेमकी काल मिटिंग लागली. तिला काय वाटल असेल माझ्याबद्दल? काय बोलायच असेल तिला? काहीही झाल तरी संध्याकाळी फोन करायचाच ... अखेर मनातले विचार थांबवून त्याने ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. संध्याकाळी तो घरी आल्यावर  थोड्या वेळातच घरचा फोन खणखणला ..... फोन तिचा होता.
    तो तिला 'सॉरी' म्हणतो आणि अजून काही बोलण्यार एवढ्यात ती सांगते "माझ लग्न ठरल!!! "
    हे ऐकून तो स्तब्ध होतो. पण क्षणात स्वतःला सावरुन तिच अभिनंदन करतो. जुजबी बोलून झाल्यावर  फोन ठेवून खूप रडतो. तिच्या लग्नालाही तो जातो पण त्या रात्री स्वतःला हतबल समजून खूप रडतो. सतत त्याच्या मनात येत रहात मी का बोललो नाही तिच्याशी. पण त्याने काय फायदा झाला असता? एक ना अनेक प्रश्न. कदाचित त्याची कधीच उत्तरे मिळणार नाहीत. कधी स्वतःला दोष देत तर कधी नशिबाला अनेक रात्री हे प्रश्न त्याला छळत रहातात. हळूहळू तो त्याच्या दिनचर्येमध्ये व्यस्त होतो. कधीतरी येते तीची आठवण! मनात एक कळ उठते आणि मग काही क्षणांसाठी तो हळवा होतो. दिवस असेच सरत असतात. एक दिवस त्याच्याही आयुष्यात भयंकर उकाड्यानंतर गार वाऱ्याची झुळूक यावी तशी वसुधा आली. लग्नासाठी आलेल्या या पहिल्याच स्थळाला तो होकार देतो. वसुधा त्याला आवडते म्हणण्यापेक्षा ती त्याच्या अपेक्षांमध्ये फिट बसलेली असते. त्याची निवड सार्थ ठरवत वसुधा त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देते. गोड स्वभावाची लाघवी वसुधा त्याला आवडायला लागते. हळूहळू वसुधाच्या प्रेमात तो तिला विसरायला लागतो पण हृदयाच्या एका कोपऱ्यात तीची जागा अजूनही तशीच असते. स्वतःच्याही  नकळत त्याने ती जपलेली असते कदाचित आयुष्यभरासाठी!

'ती'च्या नजरेतून तो-
    काही गोष्टी आयुष्यात अचानकच घडतात तशीच आजची तूझी भेट. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आज इतक्या वर्षांनी तू समोर आलास. आणि जूनं सार काही आठवल. लहानपणीची आपली मैत्री, ती लुटूपुटूची भांडणं, आपल शाळेत एकत्र जाणं, शाळेतून येताना तूझ माझ्यासाठी थांबून रहाणं सार काही अगदी अलिकडेच घडल्यासारख आठवतय. तू दिलेल ते मोरपीस आजही माझ्याजवळ आहे. आम्ही दुसऱ्या शहरात गेलो पण मी मात्र तुला खूप मिस केल. जेवढी मैत्री तुझ्याशी होती तेवढी नंतर कधीच कोणाशी झाली नाही. खूप वर्षांनी जेव्हा डान्स कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी तू भेटलास तेव्हा पूर्वीचा राजू एकदम राजबिंडा दिसू लागला होता. त्यानंतर आपल्या वारंवार भेटी होत होत्या. नकळतपणे बालपणीच मनात रुजलेल्या प्रेमाची उमलत्या वयात जाणीव होवू लागली होती. मला वाटत होत तुझही माझ्यावर प्रेम आहे पण ......... माझ्यावरच तुझ प्रेम व्यक्त होणाऱ्या त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते मी. पण तो क्षण आयुष्यात कधी आलाच नाही. माझ्या नृत्याच्या प्रत्येक स्पर्धेला, प्रत्येक कार्यक्रमाला मी तुला बोलावत होते; पण तू मात्र कधीच आलाchq नाहिस.त्या दिवशी मी तुझी आतुरतेने वाट बघत होते. मी तुला सांगितलही होत कि प्लीज तू ये मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. पण तू आला नाहिस. आणि मी शशांकशी लग्नाचा निर्णय घेतला.
      शशांक;  कॉलेजमधला, हुशार, अतिशय साधा सरळ मुलगा. तिला तिन वर्षांनी सिनिअर. तिच्यावर त्याच जिवापाड प्रेम. कॉलेजमधल्या मैत्रिणी तिला  नेहमी म्हणायच्या असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. त्याला होकार दे. पण ती मैत्रिणींना कस सांगणार होती की तिच्या मनाला साद घालणारा 'तो' कोणीतरी वेगळा आहे. कॉलेजमध्ये असतानपासून तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा शशांक MBA झाला आणि छान नोकरीही मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर शशांकच्या आईने तिच्या घरी जावून तिला मागणी घातली. मुलगा चांगला असल्याने तिच्या घरी सगळेच खूष होते. पण अंतिम निर्णय त्यांनी तिच्यावरच सोपवला. 'त्याच्याकडून' काहीच प्रतीसाद न मिळाल्याने तिने विचार केला, "जर आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर प्रेम करत नसेल तर निदान जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशीच जन्माच नातं जोडाव. आणि तिने शशांकला होकार दिला.
   शशांकच्या आईला मात्र मनापासून ती पसंत नव्हती. तिला  शशांकसारखीच हुशार मुलगी सून म्हणून हवी होती. केवळ मुलाच्या सुखासाठी तिने नेत्राला स्विकारल होत. शशांकचे वडील तो लहान असतानाच गेले होते. त्यामुळे सहाजिकच त्याची आई त्याच्याबाबतीत जरा जास्तच पझेसिव्ह होती. या सगळ्याचा थोडाफार त्रास नेत्राला होत होता. पण शशांकच्या प्रेमामुळे ती सार काही सहन करीत होती.लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच कंपनीने शशांकला दोन वर्षांसाठी US ला पाठवल. सुरुवातिला  नेत्राला त्याच्याबरोबर पाठवायला तयार नसणाऱ्या तिच्या सासूने अखेर शशांकची
खाण्यापिण्याची आबाळ होवू नये म्हणून तिलाही परवानगी दिली.
    शशांकच्या सहवासात US मधले दिवस जणू स्वप्नवत होते. मुख्य म्हणजे तिला तिथे भरतनाट्यमची प्रॅक्टिसही मोकळेपणे करता येत होती.तिथे तिची रोझीशी ओळख झाली. तिला  भारताबद्ल, भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण होते.तिने तिच्या 10 वर्षांच्या मुलीला; जेनीला भरतनाट्यम शिकविण्यासाठी नेत्राला आग्रह केला. दोन वर्षे नेत्राने कसलाही मोबदला न घेता जेनीला भरतनाट्यम शिकवले. जेनीही मनापासून शिकत होती. बघता बघता दोन वर्षे सरली आणि नेत्रा भारतात परतण्यासाठी निघाली तेव्हा जेनी खूप रडली होती. नेत्रालाही खूप वाईट वाटले होते.  रोझीने तिला मोबदला घेण्याची विनंती केली तेव्हा नेत्रा सांगितल, मी इथे नसेन पण तू जेनीच भरतनाट्यमच शिक्षण अर्धवट सोडणार नाहीस. बस मला अजून काही नको.
    दोन वर्षांनंतर US मधल्या सोनेरी क्षणांच्या आठवणी घेवून शशांक आणि नेत्रा भारतात परत येतात. भारतात आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच नेत्राने गोड बातमी देते. सगळी खूश होतात. ९ महिन्यानंतर नेत्राच्या आणि शशांकच्या आयुष्यात एक गोंडस परी येते. मुलगी झाल्यावर नाराज झालेल्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये नेत्राला बघायलादेखिल जात नाहित. शशांक मात्र आनंदात असतो. शशांकच्या इच्छेनुसार मुलीच नाव जाई ठेवल जात. दिवस मजेत जात असतात.  पण नेत्राच्या सुखाला दृष्ट लागावी तस घडत. शशांक आजारी पडून त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि पुढच्या सहा महिन्यातच तो तिला  सोडून कायमचा निघून गेला . त्याच्या आजारपणात बराच पैसा खर्च झालेला होता. जवळपास सगळी सेविंग्ज संपलेली होती. शशांकच्या जवळपास सगळ्या विमा पॉलिसीज या लग्नाच्या आधी काढलेल्या असल्याने त्या पॉलिसीसाठी नॉमिनी म्हणून त्याच्या आईचे नाव होते. नाही म्हणायला जाईसाठी काढलेल्या पॉलिसीची नॉमिनी नेत्रा असल्याने ते पैसे मात्र नेत्राच्या नावावर जमा झाले. नेत्राच्या सासूबाई शशांकच्या पॉलिसीजचे मिळालेल्या पैशांपैकी एकही पैसा नेत्राला देत नाहीत. उलट तुझ्या मुलीच्या पायगुणामूळेच माझा मुलगा गेला अस सतत म्हणून तिचा छळ सुरु करत होत्या. या  छळाला कंटाळून नेत्रा मुलीसह माहेरी निघून गेली. माहेरीही पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नव्हती. तिचे बाबा रिटायर झालेले होते. त्यांच्या पेंशनवरच त्यांच घर चालत होतं.. वयोमानानुसार आलेल्या आजारपणावरची औषधे, दैनंदिन खर्च या साऱ्यामध्ये नेत्रा आणि तिच्या मूलीची भर पडते. त्यांची आर्थिक ओढाताण सुरु होते. नेत्रा हतबल होते तिच्याकडे एवढी हुशारीही नव्हती की एखादी नोकरी करून ती स्वावलंबी होवू शकेल. अखेर तिच्या मैत्रिणिंच्या सल्ल्यानुसार ती भरतनाट्यमचे क्लासेस सुरु करते. सुरुवातिला  खूप कमी प्रतीसाद मिळाला. पण तिची नृत्यनिपूणता, शिकविण्याची पद्धत, तिचा गोड स्वभाव या साऱ्यामुळे हळूहळू तिच्या क्लासची लोकप्रियता वाढत जाते. शशांक जावून ४ वर्षे होत आलेली असतात. नेत्राच्या घरचे तिला दुसर लग्न करण्यासाठी आग्रह करत असतात पण ती मात्र  ठाम नकार देते.
     एके दिवशी एका सांस्कृतीक कार्यक्रमासाठी परदेशातून काही मुले आलेली असतात. अचानक तिथे नेत्राला  रोझी आणि जेनी भेटतात. भरतनाट्यमच शिक्षण जेनीने चालूच ठेवल आहे हे कळल्यावर नेत्राला फार आनंद होतो. रोझीला नेत्रा आग्रहाने घरी घेवून जाते शशांकबद्दल आणि नंतरची सारी हकीगत कळल्यावर रोझीला खूप वाईट वाटते. ती नेत्राला US ला यायचे सुचवते आणि मदत करण्यचेही आश्वासन देते. हो नाही करत अखेर नेत्रा तयार होते आणि रोझीच्या मदतीने तिथे भरतनाट्यमचे क्लासेस सुरु करते.
        आज सहा वर्षानंतर ती यशस्वी आहे. पैसा, स्टेटस या साऱ्या गोष्टी तिच्याजवळ आहेत. पण कमी आहे ती एका जोडीदाराची.
    ती राजीवच्या आठवणीत हरवलेली असतान अचानक तिचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने क्षणभर ती दचकते पण फोनवर राजीवच नाव बघून सुखावते आणि चटकन फोन घेते. थोड्या जनरल गप्पा होतात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजीवच्या रुमवर भेटायचे ठरते. फोन ठेवल्यानंतर नेत्रा लगेचच उद्याच्या तयारीला लागते. राजीवच्या भेटीच्या नुसत्या कल्पनेनेच तिच मन हळव होतं. काहीही झाल तरी राजीव हे तिच पहिल प्रेम होतं.
   इकडे राजीवची अवस्थाही काही वेगळी नव्हती. जिच्याशी बालपणी सगळी सिक्रेट्स शेअर केली तिच्यापासून लपवलेल आयुष्यातल एक मोठ सिक्रेट या वेळी मात्र तो तिला सांगायच ठरवतो. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायच असत; एकमेकांना खूप काही सांगायच असत. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी नेत्रा राजीवच्या रुमवर पोचते. कॉफी घेता घेता एकमेकांच्या आयुष्यातील घटना शेअर होतात. नेत्राच्या आयुष्यात तिला किती दु:ख सहन कराव लागल हे कळल्यावर राजीव अस्वस्थ होतो. बोलता बोलता तो तिला  सांगतो की त्याच तिच्यावर खूप प्रेम होत. ती हतबल होवून रडू लागते आणि त्याच्यावरच तिच प्रेम व्यक्त करते. रडणाऱ्या तिला तो मिठित घेतो.
    "का अस घडल? तू का आला नाहिस त्या दिवशी? ती रडतच विचारते.
   आता बोलून काहिच उपयोग नाही हे माहिती असल्याने तो गप्प रहातो आणि तिला  मिठीत अजूनच घट्ट पकडतो. त्याच्या स्पर्शाने ती ही मोहरते. मनात एक अनामिक धडधड होत असते. तिच्या मनात येत बस आता अजून काही नको पण ही मिठी सुटू नये. त्याचे थरथरणारे ओठ तिच्या ओठांजवळ जाणार इतक्यात त्याचा फोन वाचतो. ती दचकते क्षणात तिला वास्तवाचे भान येते आणि ती त्याच्यापासून दूर होते.
   फोन त्याच्या बायकोचा होता. त्याच्या लहान मुलीला बर नसत हे कळल्यावर तो हळवा होतो. तिला तिचा बाबाच हवा असतो. लेकीशी बोलता बोलता तो रुमच्या गॅलरीमध्ये जातो. बराच वेळ बोलून तो फोन ठेवतो. पण काही क्षण तो गॅलरीतच रेंगाळतो. त्याच्या मनात येत बर झाल आत्ता फोन आला नाहीतर खूप मोठी चूक घडली असती माझ्याकडून. तस झाल असत तर माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बायकोला माझ्या वसूला मी काय तोंड दाखवल असत. आणि माझ्या मुली ?......... नाही नाही. ज्या वसूने माझ्यावर जिवापाड प्रेम केल, माझी प्रत्येक सुखदुःखात साथ दिली तिच्याशी प्रतारणा नाही करु शकत मी. मला नेत्राशी बोलायलाच हव. आजची भेट ही आमची शेवटची भेट ठरली पाहीजे. मनाचा निश्चय करून तो आतमध्ये येतो तर नेत्रा कुठेच दिसत नाही. एवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो ....... आपण यापुढे कधीही भेटणार नाही......... ज्या शशांकने माझ्यावर जिवापाड प्रेम केल त्याच्याशी तो गेल्यानंतरही मी प्रामाणिक राहिले. पण आज ...... आज जर तुझा फोन वाजला नसता तर आपल्याकडून जे घडू नये ते घडल असत...... मनाच्या एका कोपऱ्यातली  तुझी जागा आजही तशीच कायम आहे आणि राहिल पण माझ्या शशांकची जागा मी कोणालाच नाही देवू शकत .... Good by forever. तो मंद हसून मेसेज डिलिट करतो आणि तिचा नंबरही.
   मनात येत, माणसाला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात फक्त त्याची वेळ चूकलेली असते!

समाप्त.

©मानसी जोशी












Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...