"विसर्जनाचा पाट विहिरीतल्या पाण्यावर तरंगू लागला आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. अवघ्या दीड दिवसांसाठीच येतो घरात, पण जाताना मात्र रडवून जातो. आता घरात जाऊन सामानाची बांधाबांध करायची आणि निघायचं. मनातल्या मनात ऋषीने उसासा टाकला.
"ऋषी, अगदी आजच निघायला हवं का?" आईने काकुळतीला येऊन विचारलं.
"हो आई. आजची रजाच कशीबशी मिळवली. सध्या ऑफिसमधलं वातावरण ठीक नाही. अचानक कोणालाही काढून टाकतात. अशा परिस्थितीत मी रिस्क नाही घेऊ शकत." ऋषी.
तू येतानाच ठरवून आलायस सगळं, तर काय बोलणार मी? यावर्षी निदान गौरीपर्यंततरी थांबशील असं वाटलं होतं. सणावाराला नको वाटतं एकट्यानेच राहणं. एकट्यानेच करायचं आणि एकट्यानेच खायचं. असो." आई.
"तू स्वतःच्या मर्जीने करतेयस हे सगळं आई. बाबा गेल्यानंतर मी तुला सांगितलं होतं आता आमच्या फ्लॅटवर आणूया गणपती. पण तुला काहीच मान्य नाही." ऋषी.
"वृंदाला काय हरकत आहे ८ दिवस यायला? कुळाचार तिनेच करायला हवेत आता." आई.
"ती कुठे नाही म्हणतेय आई. ती तर सगळं करायला आनंदाने तयार आहे. पण तिची बँकेतली नोकरी आठ दिवस रजा कुठून मिळणार?" ऋषी.
"का? तुम्ही फिरायला जाता तेव्हा मिळतेच की तिला रजा. घरच्या सणावारालाच बरी मिळत नाही. मंदासुद्धा नोकरी करत होती, तरी भावजी आणि मंदा, रोहन अगदी वर्षाचा असतानपासून येतच होते की प्रत्येक सणाला. तेव्हा अगदी प्रत्येक सण म्हणजे सोहळा असायचा. तू, रोहन आणि पूर्वा किती धमाल करायचात." आई.
"मंदा काकूची शाळेतली शिक्षिकेची नोकरी होती. तिला भरपूर सुट्ट्या मिळायच्या. वृंदाची परदेशी बँकेतली नोकरी. त्यात तिची मॅनेजरची पोस्ट. रजा अशी सहजासहजी नाही मिळू शकत. आणि आम्ही फिरायला जातो तेव्हा सुट्ट्या, मुलांच्या परीक्षा, क्लास सगळं मॅनेज करून प्लॅनिंग करतो आणि मगच जातो. सणवार काय हे सगळं मॅनेज करून येतात का?"ऋषी.
"अगदी बायकोचाच झालास रे. तिच्याबद्दल जरा म्हणून बोललेलं खपत नाही. अगदी लगेच बाजू सावरून घेतोस तिची. कधीतरी आईचाही विचार केलास तर बरं वाटलं मला." आई.
"तुझा विचार करतो म्हणूनच तर एवढी ओढाताण करून दीड दिवसांसाठी तरी येतो ना? आजपर्यंत नेहमी वृंदालाच बोलत आलो. तुला कधी काही बोललो नाही. पण आज अगदी राहवत नाहीये म्हणून बोलतो, प्रत्येकवेळी तू तुझा हेका चालवत आलीस. परिस्थितीशी जुळवून घेणं जमतंच नाही तुला कधी. तेव्हाही तुझं काकूशी कुठे पटायचं? मंदा काकूच जुळवून घाययची तुझ्याशी. वृंदा आधी येतंच होती की सणावाराला. पण तुला मात्र घरातली तुझी सत्ता सोडायची नव्हती. त्यामुळे सगळं तुझ्या मर्जीप्रमाणेच व्हावं हा तुझा अट्टाहास. तिने केलेलं तुला कधी पटायचं नाही. सतत तिच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायचीस. काकूच्या बाबतीतही असंच कारायचीस. पण वृंदा म्हणजे काकू नाही. ती आजच्या काळातली आहे. ती कसं जुळवून घेईल प्रत्येकवेळी? मान्य आहे ती तुझ्यातकी सुगरण नसेल, अग पण मुळात ही तुलना करणंच चुकीचं नाही का? तुझ्याहून निम्म्या वयाची मुलगी सगळंच उत्तम कसं करू शकेल? पूर्वा ताईला तरी कुठे येत होतं सगळं?" ऋषी.
"पूर्वा सगळे कुळाचार करते हो घरातले. सासूचा काहीही उपयोग नाही तिला. उलट तिचं सगळं करून पूर्वा सगळं करते घरातलं. तरी कधी तक्रार नाही करत ती." आई.
"सासूची मदत नाही, तशी तक्रारही नाही पूर्वा ताईबद्दल. आज तिची सासू आजारी आहे म्हणून सगळं एकट्या ताईवर पडतंय. पण ताईचं लग्न झालं तेव्हा काय येत होतं ग ताईला? सगळं तिच्या सासुनेच तिला शिकवलं ना? सोहम आणि सईसुद्धा दरवर्षी म्हणतात आपण आपल्या घरी, इथेच गणपती आणूया. त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घरचे गणपती बघून त्यांनाही वाटतं आपल्याकडे पण गणपती आणावा. शेवटी मुलांनाच जास्त हौस असते." ऋषी.
"तुझ्या मुलांची हौस इथे येऊनही पूर्ण होऊ शकते की. पण तुझ्या बायकोला ते मान्य नाही. तसंही तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तू काय माझ्यावरच दोषारोप करणार. ही आपली मूळ वास्तू आहे. सगळे कुळाचार इथेच झाले पाहिजेत. अरे गाडगीळांचा रवी दरवर्षी येतो गणपतीला चांगली आठ दिवस रजा घेतो. वर्षानुवर्षे घर बंद आहे त्यांचं. तरीही सगळं कुटुंब येऊन झाडलोट करून गणपती बसवतं दरवर्षी. त्याची बायकोही नोकरी करते. मुलांच्या शाळा असतात. पण इथे यायचा नेम काही चुकत नाही त्याचा. " आई.
"आई अग प्रत्येकाची परिस्थिती, विचारसरणी वेगळी असते. मंदा काकू नाही का रोहनकडे अमेरिकेला जाऊन राहिली. तू का नाही आलीस आमच्याकडे राहायला? सोहम सईच्यावेळीही पहिलं बाळंतपण माहेरी करतात सांगून सगळी जबाबदारी झटकलीस. मी असं म्हणतंच नाहीये सगळं तुझंच चुकतंय. पण आत्ता परिस्थितीच अशी आहे की जे आहे तसं चालू ठेवणं किंवा कोणीतरी परिस्थितीशी जुळवून घेणं. यापैकी एक काहीतरी करावं लागणार आहे. नेहमी म्हणतेस, 'तुला सुनेच्या घरी राहायचं नाही', अग पण ते घर तुझ्या मुलाचं पण आहेच की. पण तुझं आपलं एकच, 'माझं घर माझी सत्ता'. तिकडे सत्ता गाजवायला वृंदा घरी तरी असते का? तरीही इतकी वर्षे ते घर ती तिच्या पद्धतीने सांभाळतेय. सकाळी ८ वाजता जाते ती रात्री उशिरा परत येते. तू आलीस तर तिला आवडेलच. आम्ही चार जणांनी ऍडजस्ट करून इथे यायचं का तू एकटीने? प्रत्येक पिढीला 'जनरेशन गॅप' सहन करावीच लागते. बाकी सगळं जाऊदे, तुझ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन सणवार साजरे करणं महत्वाचं आहे का, या घरात एकट्याने सणवार करणं, हे तुझं तूच ठरव. मूळ घर आहे मान्य. मलाही वाटतं, पण काळानुसार बदलणं आवश्यक आहे. अगदी आपल्या शास्त्रांनाही हे मान्य आहे. म्हणूनच त्यांनी यासाठीही पर्याय सुचवले आहेत. पण, तू तुझा हट्ट सोडणार नाहीस. त्यामुळे आता जास्त चर्चा न केलेलीच बरी. दोन दिवस यायचं आणि निघताना मनात कटुता घेऊन जायचं असं नको व्हायला." ऋषी.
संध्याकाळी सदाच्या रिक्षेचा आवाज आल्यावर ऋषी देवाला नमस्कार करायला देवघरात गेला. देवघरातून बाहेर येऊन आजी आजोबा आणि बाबांच्या फोटोला नमस्कार करून आईजवळ आला. सदा एव्हाना ओटीवर येऊन बसला होता.
"काळजी घे आई. जमल्यास मी काय म्हणतोय त्याचा विचार कर", असं म्हणून ऋषी नमस्कारासाठी वाकला.
तेवढ्या वेळात डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसून घेत आईने ऋषीला आशीर्वाद दिला.
"काळजी करू नकोस ऋषी, आम्ही आहोत सगळे. दोन तीन दिवसांतून माझी एक खेप असतेच इथे. चल निघुया आता गाडीची वेळ झालेय", असं म्हणत सदाने त्याची बॅग उचलली.
रिक्षेत बसल्यावर पुन्हा एकदा त्याने घराकडे नजर टाकली आणि मनात म्हणाला, "गणपती बाप्पा निदान पुढच्या वर्षी तरी माझ्या घरी या. पुन्हा एकदा गोकुळात आल्यासारखं वाटेल. अगदी पूर्वीसारखं!"
© मानसी जोशी







