तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं…!!!
२००० साली अंडर १९ क्रिकेट टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपचा #प्लेअर_ऑफ_द_सिरीज होता #युवराज_सिंग.
२००७ साली T20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपनंतर २००८ साली एका भारतीय खेळाडूला आयसीसी अवॉर्डस मध्ये #टी_२०_इंटरनॅशनल_प्लेअर_ऑफ_द_इअर पुरस्काराने गौरविण्यात आले, तो प्लेअर म्हणजे युवराज सिंग.
२०११ साली भारतीय क्रिकेट जगतात वानखेडे स्टेडिअमवर माहिच्या टीमने इतिहास घडविला. भारताने वर्ल्ड कप तर जिंकलाच शिवाय #मॅन_ऑफ_द_सिरीज चा किताबही भारतीय खेळाडूला मिळाला, तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग!
त्यानंतर त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण म्हणतात ना दुर्धर इच्छाशक्ती आणि आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न जाच्याजवळ असतील तो नियतीलाही हरवू शकतो. आणि झालंही तसंच, कॅन्सरवर मात करून युवराज परत आला आणि त्याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये पुनरागमन केले.
कॅन्सरचं निदान होईपर्यंतचा काळ, ते निदान झाल्यानंतरचा आणि उपचारादरम्यानचा काळ युवराजसाठी सोपा नव्हता. त्याची खालावत जाणारी तब्बेत आणि ठासळत जाणारी मनस्थिती त्याला निराशेच्या खोल गर्तेत ढकलत होती. पण या निराशेवर मात करून त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. युवराजच्या #द_टेस्ट_ऑफ_माय_लाईफ या पुस्तकात युवराजने त्याचं बालपण, क्रिकेट करिअर, कॅन्सरची सुरुवात झाल्यापासून बरं होऊन पुन्हा मैदानात खेळायला उतरेपर्यंतचं संपूर्ण वर्णन केले आहे. कॅन्सरच्या आजारादरम्यान त्याची बदलत जाणारी मनस्थिती आणि क्रिकेटपासून सुरू होऊन क्रिकेटपर्यंतच येऊन थांबणार प्रश्न वाचून गहिवरून जायला होतं.
"Whatever happens tomorrow I just want God above to give us the 'World Cup'. He can take whatever he wants, take away my life, giving me pain…..God, just give me World Cup."
फायनल मॅचच्या आदल्या दिवशी रात्री गोळ्या द्यायला आलेल्या संघाच्या डॉक्टरांशी युवराज भावूक होऊन बोलत होता. युवराजच्या आजाराच्या लक्षणाची सुरुवात २०११ च्या वर्ल्ड कपच्या आधीच झाली होती. संघाच्या डॉक्टरांनी त्याला चेक अप करुन घ्यायचा सल्लाही दिला होता. परंतु त्याने तो गांभीर्याने घेतला नाही. मॅचदरम्यान खेळताना त्याला होणारा त्रास त्याने निव्वळ वर्ल्ड कप जिंकायच्या इच्छाशक्तीच्या जोरावर सहन केला होता.
युवराज केवळ चांगला खेळाडू नव्हे तर तो एक चांगली व्यक्तीही आहे. म्हणूनच स्वतः बरं झाल्यानंतर कॅन्सर पेशंट्सच्या मदतीसाठी #You_can नावाची संस्था सुरू केली आहे.
पण या साऱ्यानंतर २०१५ सालच्या वर्ल्ड कपमधून युवराजला वगळण्याची न्यूज आली आणि धक्का बसला. आधीच्या वर्ल्ड कपचा हिरो वर्ल्ड कप खेळणार नाही हेच मनाला पटत नव्हतं. त्याची निवड न होण्यामागची कारणे काहीही असुदेत पण प्रत्येक वेळी युवराज हवा होता हेच वाटत होतं.
या वर्ल्ड कपमध्येही युवराज नसणार हे माहिती होतं, तरीही एक वेडी आशा होती. पण …
कितीही नाकारलं तरी यापुढच्या कुठल्याच वर्ल्ड कपमध्ये युवराज खेळणार नाही हेच खरं आहे.
वर्ल्ड कप सुरू होऊन आठवडा होत आला. उद्या भारताची वर्ल्ड कपमधली पहिली मॅच आहे. पण मनात सतत एकच विचार येतोय …. #Miss_you_Yuvaraj
© मानसी जोशी
फोटो: गुगलावरून साभार

No comments:
Post a Comment