नि:शब्द
सलोनासा सजन है ओंर मै हू......रेडीओवर लागलेल्या या गाण्यामुळे सायली कॉफीचा घोट घेता घेता तशीच थांबली. खर तर आज खूप दिवसांनी तिला अशी निवांत संध्याकाळ मिळत होती. मुसळधार पाऊस, गार झोबणारा वारा, वाफाळलेली कॉफी...आणि टेरेसमध्ये रेडीओवरची गाणी ऐकत बसणे ...... खूप आवडायचं तिला. आज कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी हे सगळ जुळून आल होत. घरी कोणीच नव्हते आणि ६.३० वाजल्याशिवाय कोणी येणारही नव्हते. पण या गाण्यातल्या सुरांबरोबर ती भूतकाळातल्या सुरात कधी हरवली ते तिच तिलाच कळल नाही
फर्स्ट इअरला असताना सिंगिंग कॉम्पीटीशनमध्ये तिने हेच गाणं म्हटलं होत. तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या सेकंड इअरच्या सागरने तिला स्वतः भेटून सांगितल होत, "तुझ गाण खूप छान झाल."
किती खुश झाली होती तेव्हा सायली...."बस आता फर्स्ट प्राईज नाही मिळाल तरी चालेल", असा विचार तिच्या मनात आला.
प्राईजडिस्ट्रिब्युशनच्या वेळी जेव्हा सिंगिंग कॉम्पिटिशनच फर्स्ट प्राईज मिळाल, तेव्हा तर सागरने हात मिळवून अभिनंदन केल होत तिचं, तेव्हा तर हवेतच होती ती . हात धुवूच नये अस वाटत होत.....
कॉफीचा घोट घेता घेता या वेडेपणाच तिला हसू आल.
त्यानंतर तर ती जणू फक्त सागर साठीच कॉलेजमध्ये जात होती. तो दिसला नाही तर मन बेचैन व्हायचं. तो दिसला कि त्याला नजरेत साठवून ठेवावस वाटायचं..
दिवसामागून दिवस जात होते. FY ची परीक्षा संपली. आता तर दोन महिने सुट्टी म्हणजे दोन महिने सागर दिसणार नाही . ती उदास झाली. सागर होस्टेलमध्ये रहायचा म्हणजे सुट्टीत तो गावी जाणार हे निश्चितच होतं. ती उदासपणे बसून होती तेवढ्यात तिची मैत्रीण नेहा आली आणि म्हणाली, "गुड न्यूज आहे सायली! सागर १५ दिवसातच परत येईल. अग तो TY ला गेला ना आता त्यांचे व्हेकेशन्स क्लासेस सुरु होतायत २ मे पासून."
सायली मनातून खुश झाली. तिचा आणि त्याचा क्लास एकाच ठिकाणी होता. तिची व्हेकेशन बॅच नसली तरी क्लास तिच्या घराजवळच होता.
सुट्टी संपून कॉलेज सुरु झाल. दिवस मजेत जात होते. आता तर सागरची क्लासरूम तिच्या क्लासरूमच्या बरोबर समोरच होती. सतत जाता येता सागर दिसायचा. त्या दिवशी सायली कॅन्टीन मध्ये तिच्या मैत्रिणीची; नेहाची वाट बघत बसली होती. मुसळधार पाऊस पडत होता. लेक्चरला बसायचा तिचा अजिबात मूड नव्हता. कॅन्टीन मध्ये २/३ जुनिअर मुले सोडली तर बाकी कोणीच नव्हत. तेवढ्यात सागर तिथे आला. तिच्याकडे बघून नेहमीप्रमाणे गोड हसला. "लेक्चर नाही का आज ?" त्याने विचारले .
"नाही आज मूड नाही. बोअर होता सावंत सरांच्या पिरिअडला." ती म्हणाली.
"तुझ्याशी बोलायचय थोड - सागर म्हणाला.
क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती गप्पच बसली छातीतली धडधड अजूनच वाढली होती.
"वेळ कधी आहे तुला?" सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि कसाबसं स्वतःला सावरत म्हणाली ....बोल.
"नाही इथे नको... .सागर.
मग कुठे ?कधी? .... सायली.
सागरचा क्लास संपल्यावर सायलीचा क्लास असे. त्यामुळे तो म्हणाला... माझा क्लास सुरु झाल्यावर बरोबर १५ मिनिटांनी , क्लासच्या समोरच्या गल्लीतल्या गणपतीच्या देवळाजवळ भेटशील?" पण तुझा क्लास ... सायली
"मी क्लास बुडवणार आहे आज" तिचं बोलण मध्येच तोडत सागर म्हणाला .
तिने होकारार्थी मान डोलावली.
ठीक आहे भेटू मग संध्याकाळी .... अस म्हणून सागर निघून गेला. तिचा विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना? तिने स्वतःलाच चिमटा काढून पहिला.
घरी गेल्यावर सायली फ्रेश होऊन जेवायच्या आधी कितीतरी वेळ आराशासामोरच उभी होती. तिला सतत सकाळचाच प्रसंग आठवत होता . लाजत, हसत, स्वप्न रंगवत ती संध्याकाळची वाट बघत होती. जेवायचाही भान नव्हत तिला. कुठला ड्रेस घालू ? सागरला कुठला रंग आवडत असेल? कितीतरी प्रश्न ....पण सगळे सागर भोवती फिरणारे. पिंक कलरचा ड्रेस, नाजुकसे मोत्याचे कानातले, पिंक कलरची हलकीशी लिपस्टिक आणि मोकळे सोडलेले केस .. सायली खूपच सुंदर दिसत होती. देवळाजवळ स्कूटर पार्क करून ती देवळात गेली सागर अगोदरच आला होता. त्याला बघताच तिच्या छातीत धडधडायला लागल. तिने देवाला नमस्कार केला. "एक दिवस मी आणि सागर जोडीने येऊ इथे", मनात विचार आला आणि ती लाजली. "सायली बाहेरच्या कट्ट्याजवळ ये."
सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि प्रदक्षिणा घालून बाहेर कट्ट्याजवळ गेली. सागर वाटच बघत होता.
"बसना ...." सागर म्हणाला.
"नाही नको, तू बोल काय बोलायचय", सायली.
सागरने बोलायला सुरुवात केली... "सायली, मी माझ्या आयुष्याचा खूप वेगळा विचार केलाय. मी जे करायच ठरवलंय ते मी कोणालाच सांगितल नाहीये आणि सांगाणारही नाहीये. मी खूप प्रॅक्टिकल आहे. भावनांनी विचार करणं म्हणजे मला मूर्खपणा वाटतो. माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुठली मुलगी नव्हती आणि नसेल. मुळात प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी मला फाल्तू वाटतात. या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये. ................सायलीचे डोळे पाण्याने डबडबले होते. सागरचे लक्षच नव्हते तो बोलतच होता पण सायलीला काहीच ऐकू जात नव्हत. तिचा स्वप्नांचा मनोरा क्षणा क्षणाला कोसळत होता. त्याच्या प्रत्येक शब्दाचा तिच्या मनावर आघात होत होता.
सायलीने डोळ्यातल पाणी डोळ्यातच थांबवल. कितीतरी वेळ बडबड करून तो थांबला. त्याने तिच्याकडे बघितलं.ती शांतपणे उभी होती. त्याचं बोलणं थांबल्याची खात्री झाल्यावर ती म्हणली ...."पण हे सगळ तू मला का सांगतोयस?"
तिच्या या प्रश्नावर तो चकित झाला, काय बोलावे त्याला काहीच सुचेना.आता तो नि:शब्द झाला होता. थोडावेळ कोणीच काही बोलत नव्हतं. मग स्वतःला सावरत तो कसबस म्हणाला, "मला वाटल तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस. आय मिन तू माझ्यावर प्रेम करतेस."
पुन्हा शांताता. तो अस डायरेक्ट बोलेल असं सायलीला वाटलं नव्हतं. ती जरा गोंधळली. थोडा विचार करून आणि मनाची तयारी करून ती म्हणाली ...."हो, आवडतोस तू मला, खूप आधीपासून, तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हापासून ..पण मी तुझ्यावर प्रेम करते का नाही ते नाही सांगता येणार. एवढच वाटतं, सतत तू जवळ असावास सुखात, दुःखात, बरसणाऱ्या पावसात, रणरणत्या उन्हात, कडाक्याच्या थंडीत सतत तुझा हात हातात असावा ,हे प्रेम असेल तर हो करते मी तुझ्यावर प्रेम."
आता मात्र दोघही नि:शब्द. बराच वेळ तसाच शांततेत निघून गेला. कोणीच काही बोलले नाही. "मी निघते", शांततेच भंग करीत सायली म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ती निघून गेली.
घरी आल्यावर सायलीने स्वतःला बेडवर झोकून दिले, इतकावेळ थांबवलेला अश्रूंचा महापूर ओसंडून वाहू लागला. ती दुखावली गेली होती. घरी कोणीच नव्हते. तिचे आई बाबा दोघही नोकरी करायचे त्यामुळे दिवसभर सायली घरात एकटीच असे. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. दुःख, संताप, अपेक्षाभंग या साऱ्या भावना अश्रूवाटे वाहून जात होत्या. एवढ्यात डोअरबेल वाजली...त्या सवयीच्या आवाजानेही सायली दचकली. तिने घड्याळात बघितले तर ६.४५ होत आले होते. "बापरे ६.४५ वाजले म्हणजे आई आली असेल", ती स्वतःशीच म्हणाली. डोळे पुसून तिने दार उघडले. एवढ्यात फोन वाजला. सायलीने फोन घेतला..
"हॅलो...सायली ....क्लासला का आली नाहीस?, काय म्हणाला सागर? फोन नेहाचा होता.
"नेहा , तू आत्ता माझ्या घरी येऊ शकतेस?" ...सायली.
"ओके येते", कुठलाही प्रश्न न विचारता नेहा म्हणाली.
नेहा घरी आल्यावर त्या दोघी टेरेसवर गेल्या. सायलीने घडलेली सगळी घटना नेहाला सांगितली. त्या दोघी कितीतरी वेळ टेरेसवर होत्या. सायलीच दुःख नेहाला बघवत नव्हत.
रडणाऱ्या सायलीला ती मायेने थोपटत म्हणाली, "सायली होईल सगळ नीट, रडू नकोस ना प्लीज."
"नाही नेहा , आजपासून सागर हा विषय माझ्यासाठी संपला", सायली म्हणाली.
"हे बघ सायली उगाच रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस", नेहा .
"नाही नेहा माझा निर्णय झालाय", सायली.
नेहा आणि सायली बालपणापासूनच्या मैत्रिणी. सुरवातीला एकाच शाळेत- एकाच वर्गात आणि आता एकाच कॉलेजमध्ये पण दोघीही विरुद्ध स्वभावाच्या सायली हुशार, आत्मविश्वासी , ठाम पण थोडी तापट , कोणालाही फाटकन बोलणारी, तर नेहा शांत, संयमी, कोणालाही न दुखावणारी.
"सायली... ८ वाजून गेले किती वेळ टेरेसवर थांबणार आहात?" आईच्या हाकेने दोघीहि टेरेसवरून खाली आल्या आणि नेहा तिच्या घरी निघून गेली.
दिवस भराभर जात होते. सायलीचं आयुष्य पूर्वीसारखच चालू होतं पण आता त्यात एक पोकळी निर्माण झाली होती ....सागर नावाची. सायलीने स्वतःला अभ्यास आणि गाणं यात गुंतवून घेतले. क्लासच्या वेळी अनेकदा तिची सागरशी नजरानजर व्हायची पण ती नजर फिरवून दुसरीकडे बघायची. नेहा हे सार बघत होती पण काहीच बोलत नव्हती. तिला सागरच्या डोळ्यात सायालीसाठी प्रेम दिसत होतं. पण तिला माहित होत, सायलीची समजूत घालणे शक्य नाही. बघता बघता वर्ष संपल. फायनल एक्झॅम्स संपून व्हेकेशन्स सुरु झाले. दरवर्षीप्रमाणे TY ची व्हेकेशन्स बॅच २ मे पासून सुरु झाली. सायलीला SYला डिस्टिंगशन मिळाली होती. सहाजीकच ती आता स्कॉलर बॅच स्टुडंट होती. आता तर तिला वेळच नसायचा क्लासेस, कॉलेज, गाण्याचा रियाज यातच तिचा सगळा वेळ जायचा. अशातच TY चा रिझल्ट लागला. सागरला सेकंड क्लास मिळाला. सागरने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली.
सागर आणि सायली आता फारसं समोरासमोर येत नव्हते. त्यांच्या क्लासच्या, कॉलेजच्या सगळ्याच वेळा आता बदलल्या होत्या. लास्ट इअर असल्याने सायली खूप मेहनत घेत होती. खर तर सुरुवातीपासूनच सायली खूप करिअर ओरिएंटेड आणि महत्वाकांक्षी होती, अर्थात तिच्या घरातही तसच वातावरण होत. तिची आई बॅंक मॅनेजर तर वडील क्लास वन ऑफिसर होते. सायलीला नेहमीच मेट्रो सिटीजच खुप आकर्षण होतं. त्यामुळेच तिने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला जायचं ठरवलं होत. मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, गाडी, हाय लाईफस्टाईल, स्टेटस ,..या सगळ्याच गोष्टींच तिला प्रचंड आकर्षण होतं.
बघताबघता वर्ष संपल आणि फायनल एक्झॅम पार पडली. फायनल रिझल्ट अपेक्षेप्रमाणे लागला, सायली फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन मिळवून पास झाली होती आणि नेहालाही फर्स्ट क्लास मिळाला होता. रिझल्टनंतर नेहाने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. सायली अर्थातच पुण्याला जाणार होती. पुण्याला जाण्यापूर्वी सायली आणि नेहा एकमेकींना भेटल्या. त्याचवेळी नेहाने सायलीजवळ पुन्हा एकदा सागरचा विषय काढला. त्यावर सायली चिडून म्हणाली....."नाही नेहा, मला त्याच्यासारख्या भावनाशुन्य माणसाबद्दल काहीही सांगू नकोस, प्रेमाचा अर्थ तरी कळला असेल का कधी त्याला? काय तर म्हणे या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. अग प्रॅक्टिकल असणं म्हणजे काय भावनाशून्य असणं का?" सायली संतापून बोलत होती, मनात इतके दिवस धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होत होता.
"सायली, अस एकाच भेटीत त्याच्याबद्दलच मत बदललं तुझं? अग असं तडकाफडकी कोणाबद्दल मत बनवू नये ग. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का? नेहा.
"मला तो करायचाही नाहीये. काय गरज होती त्याला मला असा भेटायला बोलावून हे सगळ सांगायची? मी काही बोलले होते का त्याच्याशी? .....सायली.
"तू खरच विसरू शकतेस त्याला?"...नेहाने शांतपणे विचारलं.
नेहाच्या या प्रश्नाचं सायलीकडे काहीच उत्तर नव्हत. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, ते तसच थांबवत सायली म्हणाली, "मला आता या सगळ्याचा विचार करायचाच नाहीये आणि प्लीज हा विषय नको. मी आज खूप खुश आहे .माझं इतक्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झालय. मला जिथे हवी होती त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेय. पण तिथे तू माझ्याबरोबर नसशील याचच वाईट वाटतंय."
"मी ही तुला खूप मीस करेन सायली", नेहा रडवेली होवून म्हणाली. सायालीलाही खूप वाईट वाटलं. दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.
MBA च कॉलेज सुरु झाल होतं. नवीन कॉलेज, नवीन शहर सायालीसाठी सगळच नवीन होत. या सगळ्या नव्या वातावरणात ती नेहाला खूप miss करत होती. सहाजिकच होतं, आतापर्यंतच त्यांच सगळ शिक्षण एकत्रच झाल होतं. हळूहळू सायली या नव्या वातावरणात रुळू लागली होती. नवे मित्र मैत्रिणी जोडताना हळूहळू ती सागरपासून दुरावत चालली होती. बघता बघता दोन वर्ष सरली. नेहाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल आणि तिचं लग्नही ठरलं. सायलीचं मात्र अजून एक वर्ष बाकी होतं. नेहाच्या लग्नाच्या बातमीने सायली खूप खुश झाली होती आणि थोडी उदास पण. कारण आता सुट्टीत ती घरी जाईल तेव्हा तिला नेहा भेटणार नाही. नेहाच्या लग्नाच्या धमाल आठवणी घेऊन सायली पुन्हा पुण्याला आली. आता MBA च लास्ट इअर होतं. त्यात कॅम्पसच टेंशन. सायली खूप मेहनत घेत होती. लास्ट इअरच पाहिलं सेमिस्टर संपत आल होतं. अशातच एक दिवस आईचा फोन आला. "सायली अग स्थळ आलय तुला पुण्याचं....मुलगा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करतो. MBA झालाय. पुण्याला बंगला आहे त्यांचा आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." .... आई "आई अग आत्ता कुठे लग्न? अजून माझ MBA कंप्लीट व्हायचंय. कॅम्पससाठी खूप मेहनत घेतेय मी. मला चांगला जॉब मिळवायचा आहे....." सायली वैतागून बोलत होती.
"अगं नुसत बघायला काय जातंय? आणि मी कुठे आताच मुहूर्त काढायला निघालेय , आत्ता नुसता बघण्याचा कार्यक्रम करुया, तुम्ही एकमेकांना पसंत केलत तरच लग्न ठरेल...असं म्हणून आईने फोन ठेवला.
सायली मनातून वैतागली होती. पण नन्तर तिने विचार केला की जाऊदे , आई बाबांची इच्छा आहे तर बघायचा कार्यक्रम करुया तसही मी नाहीच म्हणणार आहे. क्षणभर मनात सागरचा विचार आला. पण तिने तो लगेचच झटकला.
सायली तयार झाली. खूप सुंदर दिसत होती ती आज. तिचा 'तो' बघायचा कार्यक्रम होता. ती आई बाबांबरोबर जायला निघाली. गाडीत बसल्यावर तिच्या लक्षात आलं आपण ज्याच्यासाठी जातोय त्या मुलाचं नावसुद्धा आपल्याला माहिती नाहीये. "आई, नाव काय ग त्या मुलाचं?" सायलीने विचारलं. "लवकर विचारलास", आई हसत म्हणाली. सायलीलाही हसू आल. एवढ्यात एका बंगल्यासमोर गाडी थांबली. तो बंगला बघून सायली तर हरखून गेली. गाडीचा आवाज ऐकून त्या बंगल्यातून कोणीतरी गेटजवळ येऊन अगदी अदबीने त्यांना बंगाल्यामद्धे घेऊन गेले. तिच्या आई बाबांच्या आणि त्या मुलांच्या आई बाबांच्या गप्पा चालू झाल्या. सायलीला खरतर खूप ऑकवर्ड वाटत होत.
आतल्या खोलीतून एक हॅन्डसम मुलगा बाहेर आला. त्याला कुठेतरी पाहील्यासारखा वाटलं सायलीला. "हा माझा मुलगा निखिल" ..त्याच्या बाबांनी ओळख करून दिली.
थोडी बोलणी झाल्यावर निखिल तिला बंगला दाखवण्यासाठी म्हणून घेऊन गेला आणि दोघाना जरा एकांत मिळाला.सगळा बंगला फिरून दोघही गार्डनमध्ये गेले. गार्डन छोटं होतं पण खूप सुंदर होत. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात तर ते अधिकच आकर्षक दिसत होत ....अगदी सायालीसारख.
"तुमचं घर आणि गार्डन दोन्ही खूप छान आहे." सायली म्हणाली. "Thank God तुम्हाला बोलता येतं", निखिल गोड हसत म्हणाला. सायालीही मंद हसली कारण आल्यापासून खरच ती काहीच बोलली नव्हती. काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत.काहीतरी बोलायचं म्हणून सायली म्हणाली," तुमच्याबद्दल काहीतरी सांगाना." "काय?"..निखिल."
"काहीही तुमची लाईफस्टाईल, तुमचा जॉब, तुमचे मित्र मैत्रिणी, कॉलेजमधल्या गोष्टी, आयुष्यातलं कोणी खास न विसरता येण्यासारखं", सायली.
तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेत निखिल म्हणाला, "कोणीतरी खास असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. हा एक मुलगी आवडायची कॉलेजला असताना पण ती आधीच एंगेज्ड होती. नंतर MBAला असतानाहि एक मुलगी आवडली होती. आवडली कुठली मी तर प्रेमातच पडलो होतो तिच्या".
"मग तिचं काय झालं? का ती पण एंगेज्ड होती", त्याच बोलणं मद्ध्येच तोडत थोडस वैतागूनच सायलीने विचारलं.
"नाही नाही , ती एंगेज्ड नव्हती, म्हणूनच तर आजचा बघण्याचा कार्यक्रम होतोय"' निखिल हसत म्हणाला.
क्षणभर सायलीला काहीच कळल नाही. तिने गोंधळून निखीलकडे बघत विचारलं.." म्हणजे? मी समजले नाही?"
"अग तूच होतीस ती मुलगी! आपण एकाच कॉलेजमद्ध्ये होतो तेव्हा, आठवतंय का? पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, लायब्ररीच्या बाहेर चिखलात पडलेल्या तुझ्या नोट्स, त्यावरून तुझ माझं झालेल भांडण..." निखिल "येस! म्हणजे कॉलेज किंग निखिल साने ?...TY MBA Finance, कॉलेज टॉपर, करेक्ट?" सायलीने विचारलं.
"करेक्ट! मेमरी चांगली आहे हा तुझी." निखिल हसत म्हणाला.
"तरीच मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होत...सायली.
बोलता बोलता ती दोघं एकेरीवर कधी आली ते त्यांनाच कळल नाही.
"खर तर मला तेव्हा खूप राग आला होता तुझा मी मेहनतीने काढलेल्या सगळ्या नोट्स तुझा धक्का लागल्यामुळे चिखलात पडून खराब झाल्या होत्या". सायली हसत म्हणाली.
"मलाही! मी सॉरी म्हणून पण तुझी बडबड चालूच होती. पण मग नंतर कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनला तुझ गाणं ऐकल आणि तुझ्या आवाजाबरोबर तू पण आवडायला लागलीस. 'बेदर्दी बालमा तुझको ,मेरा मन याद करता है.......काय गाणं म्हटलयस तेव्हा? त्यानंतर तुझं आवडण प्रेमात कधी बदललं तेच कळल नाही. तेव्हाच ठरवलं तुझ्याशीच लग्न करायचं. नशिबाने तू एंगेज्ड नव्हतीस." निखिल हसत म्हणाला.
" हे तुला कस कळलं?" सायलीने आश्चर्याने विचारले. "
"मुलांना मुलींबद्दल सगळ्या बातम्या काढता येतात मॅडम", त्याशिवाय का तुझ्या घरी डायरेक्ट मागणी घातली?" निखिल हसत म्हणाला.
"पण मग तेव्हा का नाही विचारलंस?........ सायली.
"तेव्हा मी लास्ट इअरला होतो शिवाय कॅम्पसचं पण टेंशन होतं आणि मुख्य म्हणजे मी काहीच कमवत नव्हतो आणि सेटल झाल्याशिवाय कुठल्या मुलीला प्रपोज करण मला पटणार नव्हतं. पण तेव्हाच ठरवलं होतं; सेटल झाल्यावर डायरेक्ट लग्नाचीच मागणी घालायची. सेटल झाल्यावर मी माझ्या घरी आई बाबांना सगळं सांगितलं आणि त्यांनी तुझ्या आई बाबांना."निखिल म्हणाला.
"काय? आई बाबांना हे सगळ आधीपासूनच माहिती होतं? पण मला काहीच बोलले नाहीत, सायली आश्चर्याने म्हणाली.
"कारण मी तस सांगितल होतं, हे सगळ मला स्वतःहून तुला सांगायचं होत"...निखिल.
"अच्छा असं आहे तर" ....सायली गमतीने म्हणाली.
"तर मग तुझा होकार समजू का? निखिलने गुलाबाचं फुल तिच्यासमोर धरत विचारलं.
सायलीला खर तर निखिल आवडला होता. पण तरीही असा डायरेक्ट लग्नाचा निर्णय घ्यायला तिचं मन तयार होत नव्हतं. "मला विचार करायला थोडा वेळ हवाय", सायली निखिलला म्हणाली.
"ok take your own time", निखिल शांतपणे म्हणाला.
काही वेळ तसाच शांततेत गेल्यावर सायलीने निखिलला विचारलं, "तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यावसं नाही वाटलं?
"नाही! अग मला तुझ्याबद्दल अगोदरपासूनच माहिती आहे. मी सांगितल ना तुला मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसतं",निखिल.
"पण माझ्या भूतकाळाबद्दल.... "सायली.
"भूतकाळाबद्दल? म्हणजे त्या बेदर्दी बालमाबद्दल?" मिश्किलपणे हसत निखिलने विचारलं.
"तुला कस माहित? आश्चर्यचकित होत सायलीने निखिलला विचारलं.
"मला काहीच माहित नाही, पण तुझ्या गाण्यातून तुझ्या भावना कळत होत्या. तू गाणं नुसतं गात नव्हतीस तर ते जगत होतीस. त्यावरूनच मी अंदाज केला. तसंही तुझ्या भूतकाळापेक्षा मला वर्तमान आणि तू हो म्हणालीस तर आपल भविष्य जास्त महत्वाचं आहे. आणि तुझ्या त्या बेदर्दी बालमाला मी थॅंक्सच म्हटलं पाहिजे. तो बेदर्दी नसता तर तू तेव्हा एंगेज्ड असतीस." निखिल हसत म्हणाला.
सायलीही निखीलकडे बघून मंद हसली. आता तर तो तिला अधिकच आवडायला लागला होता. निखिल आणि त्याच्या फॅमिलीचा निरोप घेऊन सायली आई बाबांबरोबर रूमवर आली. आई बाबा दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जाणार होते. सायलीला त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही म्हणून ती मनातून थोडी नाराज झाली होती. रात्री मात्र तिला सारखा निखिल आठवत होता. तिला आठवत होतं कॉलेजमध्ये कितीतरी मुली निखिलच्या मागे होत्या, पण निखिल मात्र तेव्हापासून फक्त आपल्यावर प्रेम करतो हे ऐकून ती सुखावली होती.
सायली आणि निखिलच्या आता वारंवार भेटी होऊ लागल्या होत्या. ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. अखेर विचार करून तिने आपला निर्णय सांगितला, "मी लग्नाला तयार आहे. पण मला आधी माझं करिअर करायचं आहे. त्यामुळे MBA पूर्ण झाल्यावर किमान १ वर्ष नोकरी करूनच मी लग्न करेन."
निखिलने अर्थातच ही अट मान्य केली. दोघांच्याही घरी आधुनिक वातावरण असल्यामुळे तसा प्रोब्लेम नव्हता. पण MBA च अर्ध वर्ष आणि त्यानंतर अजून १ वर्ष हे दोघांच्याही मातोश्रीना पटत नव्हतं. अखेर आधी साखरपुडा करायचा ठरवून सगळ्याचीच मर्जी राखण्यात आली. लग्न ठरल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सायलीच्या आई बाबांनी तिला मोबाईल भेट दिला. त्या काळात मोबाईल नुकतेच सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले होते. निखीलकडे तर अगोदरपासूनच मोबाईल होता. दिवस असेच मजेत चालले होते. मोबाईलमूळे तिचं आणि निखिलचं दिवसातून अनेक वेळा बोलणं व्हायचं आणि जवळपास रोजची संध्याकाळ दोघं एकत्रच घालवत होते. सायली निखिलच्या प्रेमात हळूहळू सागरला विसरत चालली होती. हुशार, सुंदर आणि आत्मविश्वासी सायलीचं कॅम्पसमधून एका चांगल्या कंपनीत सिलेक्शन झालं. सगळ तिच्या मनाप्रमाणे घडत होतं. निखिलसारखा रिच, हॅन्डसम, वेल सेटल्ड, संस्कारी आणि मुख्य म्हणजे तिच्यावर खूप प्रेम करणारा लाईफ पार्टनर, कॅम्पसमधून मिळालेला हाय प्रोफाइल जॉब; सायली जणू हवेत तरंगत होती. माझ्यासारखी भाग्यवान मीच अस तिला आता मनोमन वाटत होतं.
यथावकाश ठरल्याप्रमाणे निखिल आणि सायलीचा साखरपुडा अगदी साधेपणाने पार पडला. साखरपुड्याला दोन्ही घरचे अगदी जवळचे नातेवाईक सोडून फारस कोणाला बोलावलं नव्हत. नेहा मात्र खास बॅंगलोरहून तिच्या साखरपुड्यासाठी आली होती. सायलीला खुश बघून नेहाही सुखावली. कितीतरी वर्षांनी ती सायलीला इतकी आनंदी आणि समाधानी बघत होती. साखरपुडा झाल्यावर मात्र त्याच दिवशी नेहा बॅंगलोरला परत गेली कारण ती ही नुकतीच बंगलोरच्या एका कॉलेजला लेक्चरर म्हणून नवीनच रुजू झाली होती. त्यामुळे तिला जास्त रजा घेणे शक्य नव्हते. निखिलच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी सायलीला नेहाशी प्रत्यक्ष भेटून बोलायच्या होत्या, पण नेहाच्या अशा लगेचच जाण्याने सहाजिकच सायली थोडी हिरमुसली.
सायलीची परीक्षा जवळ आली होती त्यामुळे सायलीला आता पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. अर्थातच तिला निखिलला जास्त वेळ देणे शक्य नव्हते. म्हणूनच त्या दोघांनी एक पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचा ठरवलं. दिवसभर भटकंती, लॉंग ड्राइव्ह आणि मग फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॅन्डललाईट डिनर, निखिलने तिच्यासाठी अशी एक खास 'रोमॅन्टिक डेट' प्लॅन केली होती. ते सगळ बघून सायली खूप खुश झाली होती. त्याच दिवशी निखिलने तिला सांगितल की कंपनी त्याला तीन महिन्यांसाठी US ला पाठवतेय. सायली तर हरखूनच गेली. तिच्या महत्वाकांक्षी स्वप्नाना आता नवे पंख लाभले होते.
पंधरा दिवसांनी निखिल US ला निघून गेला. त्याला एअरपोर्टवर सोडायला सायली गेली होती. जाता जाता सायलीपेक्षा तोच जास्त भावूक झाला होता. "बघ मलाही नेल असतस तर आज असं एकट्याला नसतं जायला लागलं." सायली मिश्किलपणे म्हणाली.
"अच्छा मॅडम, साखरपुड्याऐवजी लग्न केलं असतं तर जाडीने गेलो असतो आज "निखील हसत म्हणाला. एवढ्यात अनाऊन्समेंट झाली आणि सायलीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला. निखिल गेल्यानंतर सायलीला खूपच एकटेपणा जाणवायला लागला. "निखीलवर इतक प्रेम करते मी की त्याच्याशिवाय जगणं कठीण जातंय?' सायली स्वतःशीच म्हणाली. कुठेतरी वाचलेलं तिला आठवलं 'सहवासातल्या आनंदापेक्षा विरहातील दुःखच एखाद्याबद्दल आंतरिक ओढ निर्माण करतं'. अखेर सगळे विचार झटकून सायली परीक्षेच्या तयारीत गर्क झाली. यथावकाश परीक्षा पार पडली. प्रोजेक्ट्सच कामही पूर्ण झाल. रिझल्ट लागल्यानंतर १५ दिवसांनी ती नवीन कंपनीत रुजू होणार होती. तोपर्यंत तिच्याकडे मोकळा वेळ होता. पण या वेळेचे सगळे प्लॅन्स तिने आधीच ठरवले होते. कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिक, भटकंती, गेट टुगेदर यासाठी ती निदान १५ दिवस तरी पुण्यातच थांबणार होती. त्यानंतर ती घरी जाणार होती कारण नेहाही त्याच सुमारास माहेरी येणार होती.
एक महिना तर गेला आता १५ दिवस सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर मजेत जातील मग फक्त दीड महिन्याचा प्रश्न मग निखिल परत येईल. ..सायली स्वताशीच म्हणाली. तो परत आल्यावर काय काय करायचे हे प्लॅन्स ती ठरवत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला.
"हॅलो सायली" ....पलीकडून आवाज आला ...
"हो मी सायलीच बोलतेय".....सायली.
"सायली मी तुषार बोलतोय. तुषार देशमुख ....GJ कॉलेज..... आठवतंय का?"
पलीकडचा आवाज ऐकून सायली दचकलीच कारण तुषार हा सागरचा रुममेट आणि बेस्ट फ्रेंड होता.
स्वतःला सावरत सायली म्हणाली .."हो ओळखल,बोल"
"सायली तुला आत्ता आपल्या गावी येणं शक्य आहे का? शक्य असेल तर आजच निघ....तुषार.
"पण काय झालय?" सायलीने गोंधळून विचारले.
"ते फोनवर नाही सांगता येणार पण अस समज कि खूपच महत्वाच काम आहे आणि तुझ्याशिवाय ते अडलंय".....तुषार म्हणाला.
"ठिक आहे मी प्रयत्न करते ...सायली
"प्रयत्न नको सायली कन्फर्म सांग....तुषार काकुळतीला येऊन म्हणाला.
"ओके, बुकिंग मिळालं तर आजच निघते मी" ...एवढ बोलून तिने फोन ठेवला. तुषारच माझ्याशी काय काम असणार? आणि त्याला माझा मोबाईल नंबर कसा मिळाला? सायली विचार करत होती, तेवढ्यात तिला निखिलचे शब्द आठवले, 'मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसतं.' पण विचार करत बसण्यापेक्षा तिने बुकिंग ऑफिसला फोन करून आजच्या रात्रीच्या गाडीच बुकिंग कन्फर्म केलं. तिच्या आणि निखिलच्या घरीही फोन करून तसं कळवल.
घरी आल्यावर सायलीने तुषारला फोन केला. तुषार म्हणाला आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया. कुठे भेटायचं ते तू सांग, मी तुझ्या घरी येऊ कि तू माझ्या रूमवर येशील?, कि कुठे बाहेर भेटूया?तू ठरव आणि मला तस कळव पण एक मात्र लक्षात ठेव कि मला तुझ्या एकटीशीच बोलायचय. बाहेर भेटण्याचा पर्याय तिला कधीच मान्य नव्हता, त्यापेक्षा त्याच्या रूमवर जाऊन त्याला भेटणंच तिला जास्त सोयीस्कर वाटलं. तुषारच्या रूमचा पत्ता घेऊन ती त्याला भेटायला गेली.
सर्वसामान्य मुलांची असते तशीच त्याची रूम होती अस्ताव्यस्त पसरलेली. सायली येणार म्हणून त्याने रूम आवारण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न सायलीच्या नजरेतून सुटला नाही.
"ये बस ना".... खुर्ची सरकवत तुषार म्हणाला.
"काय झालय तुषार एवढ कसल महत्वाच काम आहे ?" ...सायलीने विचारले.
कुठलीही प्रस्तावना न देता तुषार म्हणाला, "सागरबद्दल बोलायचं आहे"
"काय??? मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं आणि ऐकायचं नाहीये....सायली चिडून म्हणाली.
"सागरचा ॲक्सिडेंट झालाय सायली, गेले १५ दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. बेशुद्ध आहे .त्याला ICU मध्ये ठेवलय.. डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये. त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे म्हणून मी तुला बोलावलंय ",...तुषार भावनाविवश होत म्हणाला.
तुषारचं बोलणं ऐकून सायली निरुत्तर झाली होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत. तेवढ्यात तुषारने तिच्यासमोर एक डायरी धरली आणि म्हणाला' " हि डायरी वाच सायली म्हणजे तुला आपोआपच कळेल कि तुला का बोलावलंय. "कसली आणि कोणाची डायरी आहे हि?", सायलीने विचारले. " "सागरची! खर तर मलाही या डायरीबद्दल काहीच माहिती नव्हते. तुझा साखरपुडा झाल्याच कळल्यावर एक दिवस सागर माझ्याकडे आला होता. खूप उदास दिसत होता तो. त्याचवेळी एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स माझ्या हातात ठेवून म्हणाला, 'माझा आता यावर काहीही अधिकार नाही, मी आता या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ ठेऊ शकत नाही. पण हि माझी आयुष्याची ठेव समजून तुझ्याजवळ जपून ठेव आणि शक्य असेल तर हा बॉक्स कधीही उघडून बघू नकोस.' त्या दिवशी तो मला भेटला ते शेवटच, त्यानंतर दोनच दिवसांनी त्याचा ॲक्सिडेंट झाला. समोरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्याला उडवले आणि तेव्हापासून तो ICU मध्ये ॲडमिट आहे . डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये म्हणून मग मी न राहवून तो बॉक्स उघडला,कारण मला वाटत होतं की कदाचित त्या बॉक्समध्ये सागरला वाचवण्याचा मार्ग सापडेल. तो बॉक्स उघडताना सतत मनात येत होत कि मी हे चुकीच तर करत नाहीये ना? . पण हि डायरी वाचल्यावर माझी खात्री झाली की माझा बॉक्स उघडण्याचा निर्णय चुकीचा नव्हता." तुषार न थांबता बोलत होता आणि सायली सुन्नपणे सगळ ऐकत होती. तिचे डोळे पाणावले होते. थरथरत्या हातांनी तिने डायरी उघडली.
डायरीच्या पहिल्याच पानावर मोठ्याअक्षरात लिहील होत ..to my sweet love Sayali....त्याच्यासोबतच सिंगिंग कॉम्पिटिशनच्या वेळेचा तिचा एक फोटो आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेचे दोन फोटो; एक तिचा प्राईज घेतानाचा आणि दुसरा तिच्या आणि सागरच्या हस्तांदोलनाचा. त्यानंतरच्या प्रत्येक पानावर सायलीच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लिहिलेल्या होत्या. प्रत्येक पान त्याच्या प्रेमाचा पुरावा देत होत. वाचता वाचता सायली त्या देवळातल्या भेटीच्या दिवसापर्यंत आली.
सागरने लिहिल होतं..... "दुरूनच तू मला कॅन्टीनच्या दाराशी उभी दिसलीस , नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होतीस. पाऊस असाच मुसळधार कोसळत रहावा आणि मी तुझ्याकडेच असच बघत रहाव असं मनोमन वाटत होतं. तू ही माझ्यात गुंतत चालली आहेस हे मला माहित होत. सगळं कळत होतं, पण नाही हे सगळ कुठेतरी थांबायला हवं. हे शक्य नाहीये. माझा मेंदू माझ्या मनाला समजावत होता. तू माझ्यात जास्त गुंतण्याआधीच तुला थांबवायला हवं. मग विचार करून आणि मनाची पूर्ण तयारी करून मी तुला भेटायला बोलावले. मी जे करायच ठरवल होत ते माझ्या मनाला पटत नव्हत पण आपल्या दोघांसाठीही तेच योग्य होतं. देवळात झालेल्या आपल्या भेटीचा क्षणन् क्षण मी माझ्या नजरेत साठवून ठेवलाय कारण कदाचित ती आपली शेवटची भेट होती. मी बोलत असताना तुझ्या डोळ्यात साठलेले अश्रू मला जाणवत होते पण तरीही मी कठोर झालो होतो. मला तस होणंच भाग होतं. तू निघते म्हणून निघून गेलीस क्षणभर तुला थांबवावस वाटल, वाटलं मनातलं सगळं तुफान तुझ्यासमोर उधळून द्याव, तुला मिठीत घेऊन तुझे डोळे पुसावेत आणि तुला सांगाव कि खूप प्रेम करतो सायली मी तुझ्यावर अगदी वेड्यासारख, पण तरीही मी शांत राहिलो. मला माहितेय घरी जाऊन तू खूप रडली असशील पण मला खात्री होती कि तू माझ्यापासून दुरावशील. आपण दोघेही वेगळ्या वाटेचे प्रवासी आहोत सायली . या वाटा एकत्र येणच शक्य नाहीये. तू हुशार, कॉन्फिडंट, करिअर ओरिएंटेड आणि महत्वाकांक्षी. तुझ्यासमोर भव्य दिव्य आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि मी मात्र साध आयुष्य जगण्यातच समाधान मानणारा. माझ्या अगदीच पुराणमतवादी नाही पण आधुनिक नसणाऱ्या कुटुंबात तुला सामावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्या कुटुंबासोबत तुझीही फरफट करण्यासारख. तू मेट्रो सिटीच्या झगमगाटात रमणारी आणि मी गावातल्या हिरवळीत. तुझं मल्टिनॅशनल कंपनीमध्ये हाय प्रोफाइल जॉब करण्याचं स्वप्न तर मी गावातल पिढ्यान पिढ्या चालत आलेलं दुकान सांभाळणार. तुला स्टेटसचंआकर्षण तर मला घरातल्या आंब्याच्या आणि नारळी-पोफळीच्या बागांच . कसं जमणार सायली आपल? माझ्या खेडेगावातल्या घरी तुझी घुसमट झाली असती. मला माहित होतं, तू खेडेगावातल्या एखाद्या परंपरा पाळणाऱ्या घरात कधीही सामावून जाऊ शकत नाहीस. म्हणूनच मी ठरवलं स्वतः थांबायचं आणि तुलाही थांबवायचं. आमच्या पिढीजात श्रीमंत घराला पैशाची काहीच कमी नाहीये पण त्यातून तुझी स्वप्न , तुझ सुख नाही विकत घेऊ शकत मी. कारण त्याच्या बदल्यात मला माझ्या कुटुंबाच्या अपेक्षाना तिलांजली द्यावी लागेल. कुटुंबातला एकुलता एक मुलगा आहे ग मी त्याना दुखावून कस चालेल? सायली खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर पण कधीच ते व्यक्त नाही करू शकत. तुझ्याबरोबरच्या क्षणांची खूप स्वप्न बघितली होती मी, पण कधीच प्रत्यक्षात नाही आणू शकत. एक मात्र नक्की सांगतो माझ्या हृदयातील एक कोपरा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असेल....आयुष्यभरासाठी. ती जागा फक्त तुझी असेल तिला कधीच कोणी धक्का लावू शकणार नाही. तू कायम सुखात रहावस एवढीच माझी इच्छा आहे. कुठेतरी वाचलेल्या कवितेतल्या काही ओळी आठवतायत सायली ....
एक सांगशील,
आपले रस्ते अवचित कुठे; असे जुळले?
आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले?
क्षणाभोवती, हि कसली अनोखी रंगत खुलते आहे?
जगणे व्हाव गाणं, अशी सुरांची रंगत जुळते आहे
पण खरं सांगू ?
या वाटांच हे अस भेटणं बर नव्हे ,
जीवघेणं उत्कट असेल पण ते खर नव्हे.
तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलणं हिताचं नाही
माझ्यापुरत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही
तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे
माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वास आहे
म्हणून म्हणतो,
अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
जीव जडवून चटका लाऊन निदान दूर होणं तरी असू नये.........................
वाचता वाचता सायलीने इतका वेळ डोळ्यात साठवलेलं पाणी तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहू लागलं. किती चुकीच समजत होती ती सागरला. खर तर तिने सागरला ओळखलच नव्हतं. त्याच प्रेम तिला कधी समजलच नव्हतं. ती नेहमी स्वतःच्या विश्वातच दंग असायची. आता मात्र तिला नेहाचे शब्द आठवत होते," कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात सायली. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का?" तिला नेहाची खूप आठवण येत होती. आत्ता या क्षणी ती आपल्याजवळ असावी अस तिला सारख वाटत होत. खरच मी प्रेम केल होत सागरवर? सायलीच्या मनात द्वंद्व चालू झालं. तिचच मन आता तिच्याविरुद्ध उभं ठाकलं होतं. स्वतःला सावरत सायली म्हणाली, "मला सागरला भेटायचंय" मला त्याच्याकडे घेऊन जाशील ?
तुषारने फक्त होकारार्थी मान हलवली. हातातली डायरी बाजूला ठेऊन सायली त्याच्याबरोबर जायला निघाली. तुषारने मात्र आठवणीने डायरी बरोबर घेतली.
सायली आणि तुषार हॉस्पिटल मध्ये गेले. सुदैवाने ती दोघं विजिटिंग अवर्समद्धेच तिथे गेली होती. ती दोघं गेली तेव्हा सागरची आई बाहेरच भेटली. तुषारने त्यांची आणि सायलीची ओळख करून दिली. तुषार आणि सायली ICU मध्ये गेली. दोघं आत जाताच सागरचे वडील बाहेर जावून थांबले. कारण ICU मध्ये फक्त दोन माणसांनाच थांबायची परवानगी होती. आत गेल्यावर मात्र सागरला पाहुन तिला रडूच आल. कितीतरी दिवसांनी ती सागरला बघत होती ते हि अशा अवस्थेमध्ये. हिम्मत करून ती सागरजवळ जाऊन बसली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, " सागर काय अवस्था करून घेतलेयस स्वतःची? का सांगितल नाहीस मला सगळं? का एकट्यानेच सगळं ठरवलस? why saagar why? असं म्हणून सायली रडू लागली. तुषार शांतपणे मागे उभा होता. त्याच्याही डोळ्यात पाणी तरळले. दु:खाचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, "तू खूप मोठ्या मनाचा आहेस सागर, किती ओळखलस तू मला, माझी सगळी स्वप्न, माझे विचार, माझ्या आवडी निवडी सगळ तुला माहिती होते आणि मी मात्र तुला समजून घ्यायचा साधा प्रयत्नही केला नाही कधी. मला माफ कर सागर. मी तुझं प्रेम कधी समजूच शकले नाही. पण तू हे सगळं मला का सांगितल नाहीस? एकदा सांगून तरी बघायचास....आणि ठिक आहे मी नव्हते ॲडजस्ट होऊ शकत तुझ्या कुटुंबात पण तू तर माझ्याबरोबर ॲडजस्ट होऊ शकला असतास ना? मेट्रोसिटीमध्ये राहून गावाकडची शेती, व्यवसाय सांभाळणारे कितीतरी लोकं आहेत. मी ही मदत केली असती तुला.
सायलीच्या या वाक्यावर मात्र तुषार चमकला. तो काही बोलणार इतक्यात नर्स आली व वेळ संपल्याच सांगून त्याना बाहेर जायची विनंती केली. बाहेर जाऊन सागरच्या आई बाबांचा निरोप घेऊन दोघही जायला निघाली. तेवढ्यात ICU जवळ कसलीतरी धावपळ चालू झालेली दिसली. काय झालं काहीच कळत नव्हत. इतक्यात तुषारला ती मगाचचीच नर्स दिसली. तिच्याजवळ चौकशी केल्यावर कळलं १५ दिवसानंतर सागरने हालचाल केलेय. अजून पूर्ण शुद्धीत नाही आलाय पण डॉक्टर प्रयत्न करत आहेत. हे ऐकून सायली आणि तुषार दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद तरळला. डॉक्टर बाहेर येईपर्यंत दोघांनी थांबायचे ठरवले. सागरचे आई बाबा ICU बाहेरच थांबले. तुषार आणि सायलीला मात्र नर्सने वेटिंगरूममध्ये थांबायची विनंती केली. वेटिंग रुममध्ये विशेष गर्दी नव्हती पण बसायला मात्र जागा नव्हती. तुषारने सायालीसमोर डायरीचे एक पान काढून ते वाचायला सांगितले. तेवढ्यात तुषारचा मोबाईल वाजला तुषार बोलण्यासाठी म्हणून बाजूला गेला. सायलीने हातातल्या डायारीकडे बघितले तुषारने काढून दिलेले पान तिने उभ्याउभ्याच वाचायला सुरवात केली. ते वाचल्यावर मात्र सायलीचे डोळे अश्रुंनी डबडबले आणि आधारासाठी म्हणून मागच्या भिंतीला टेकली. पुढच काहीच ती वाचू शकली नाही. सागरने त्यात लिहील होतं," मला माहित आहे मी माझ्या भावना कधीही तुझ्यासमोर व्यक्त करणार नाही सायली कारण मला खात्री आहे तू माझ्यासाठी माझ्या गावात रहायला कधीच तयार होणार नाहीस उलट तू मला मेट्रो सिटीमध्ये रहावूनच गावाकडचं सगळं मी कसं सांभाळू शकतो हेच पटवून द्यायचा प्रयत्न करशील. पण ते मला शक्य नाही. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. तेवढ्यात तुषार तिथे आला रडणाऱ्या सायलीकडे बघून तो पळतच तिच्याजवळ गेला. तुषारने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ती आता पूर्णपणे नि:शब्द होती.
"सायली, कॉफी!" निखिलच्या आवाजाने सायली भानावर आली.
"अरे तू कधी आलास? आज लवकर ?"सायलीने आश्चर्याने विचारलं. "जेव्हा तू सागरच्या आठवणीत होतीस, निखिल म्हणाला.
ते ऐकून सायली दचकून म्हणाली. "पण तुला....
तिचं बोलण मध्येच थांबवत निखिल म्हणाला , "मी आलो तेव्हा रेडीओवर सलोनासा सजन है...चालू होतं आणि तू कॉफी तशीच ठेवून शांतपणे बसली होतीस, त्यावरूनच ओळखल मी." सायलीला उदास झालेली बघून निखिलने तिला जवळ घेतले आणि म्हणाला, "Its ok सायली, येणाऱ्या आठवणी थांबवता येत नाहीत.
"मी खूप हर्ट केलं ना तुला?" सायलीने रडतच विचारलं.
"नाही ग राणी", तिचे अश्रू पुसत निखिल म्हणाला. तरीही ती उदासच होती. निखिलने तिचा हात हातात घेऊन तिला जवळ घेतले आणि आकाशाकडे बोट करून म्हणाला," त्या तिथे आकाशात खूप तारे असतात ढग दाटून आल्यावर ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण मात्र त्यांना दिसत असतो. सागरही त्यातलाच एक तारा बनलाय आता, तिथून कुठूनतरी तो तुला नक्की बघत असेल , त्याला अशी रडणारी, उदास सायली नाही हा आवडणार. सायलीने नेहमी सुखात रहाव हीच त्याची इच्छा होती. त्याच्या या बोलण्याने सायलीला अधिकच रडू आलं ती स्वतःला सागर आणि निखिल या दोघांचीही अपराधी समाजत होती. त्यांच्या प्रेमापुढे,त्यांच्या मनाच्या मोठेपणापुढे ती पूर्णपणे नि:शब्द होती आणि पाउस मात्र मुसळधार बरसत होता.
समाप्त.
©मानसी जोशी
(सदर कथेतील सागरच्या डायरीमधील कविता मी लिहिलेली नसून एका अपरीचित कवीची आहे. निव्वळ कथेचा भाग म्हणून मी ती माझ्या कथेत वापरली आहे.)