Showing posts with label पत्र. Show all posts
Showing posts with label पत्र. Show all posts

Sunday, 18 June 2017

प्रिय बाबांस....

प्रिय बाबांस,
  आज खरं तर लिहू का नाही हा विचारच करत होते मी. पण नंतर विचार केला आज नाही लिहिलं तर कधी लिहिणार? आज फादर्स डे! खरं तर हे डेज वगैरे असल्या गोष्टी तुम्हाला माहितही नसतील. पण तरीही आजपर्यंत ज्या गोष्टी कधी बोलून दाखवता आल्या नाहीत त्या थोडक्यात लिहायचा प्रयत्न करते. खूप काही लिहावसं वाटतय पण मनातल्या भावना शब्दात मांडणं तसं कठीण आहे. तरीही मी प्रयत्न करते.
       लहानपणीचं फार काही नाही आठवत पण तुम्ही, आईने आणि इतरांनी सांगीतलेले माझ्या बालपणीचे काही किस्से मात्र चांगलेच लक्षात आहेत. त्यावेळी तुमच्याकडे 'स्पार्क' का 'लूना' कुठलीतरी गाडी होती. तुम्ही ऑफिसमधून आल्यावर आधी मला गाडीवर बसवून दोन राउंड अंगणात मारायचे आणि मग घरात यायचं, हा तुमचा ठरलेला दिनक्रम. अर्थात मला आठवत नाही काही यातलं पण एक गोष्ट मात्र जाणवतेय हे सारं तुम्ही आनंदाने करायचात ते सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन; १०/१२ किलोमीटरचा प्रवास, तो ही डांबरी किंवा सिमेंट कॉन्क्रिट रस्त्यावरचा नव्हे तर साध्या लाल मातीचा धुरळ्याच्या रस्त्यावरचा प्रवास करुन आल्यावर.  पण कॉलेजला गेल्यावर जेव्हा मला स्वतःची गाडी घेउन दिलीत तेव्हा मात्र कुठलही काम सांगताना तुम्ही 'जमेल का' असं आवर्जून विचारत होतात. अर्थात आजही त्यात काहीच बदल झालेला नाही. आईची शाळेतली शिक्षिकेची नोकरी. त्यावेळी तिची शाळा दोन शिफ्टमध्ये चालायची. आईची सकाळ शिफ्ट होती. त्यामुळे तिला  पहाटे चार वाजताच उठावं लागे. आई उठली की मी पण लगेच उठून बसायचे. मग सहाजिकच आई वैतागायची पण तेव्हा आईला त्रास नको आणि ती माझ्यावर वैतागायला नको म्हणून तुम्हीसुद्धा पहाटे उठून मला सांभाळत होतात. या सगळ्या झाल्या ऐकिवातल्या गोष्टी. पण एक प्रसंग मात्र मला चांगलाच आठवतोय. मी तेव्हा सहावीत होते. तुमची ट्रान्स्फर तेव्हा मुंबईला होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा अनुभव अगदी ताजाच होता. त्यावेळी तुम्ही मुंबईला परत जायला निघाल्यावर मात्र मी तुम्हाला घट्ट मिठी मारुन रडत नको जाऊ म्हणून विनवत होते.कारण एकच; बॉम्बस्फोटची भीती! मला कसंबसं समजावून  जडावलेल्या पावलांनी तुम्ही मुंबईला गेलात.
    जसजसं वय वाढत गेलं तसतशी माझी स्वतःची मतं बनत गेली. तुमची आणि माझी मतं फारशी कधीच जुळली नाहीत. तुमचा दिलदार आणि साधा भोळा स्वभाव, चटकन कोणालाही मदत करण्याशी वृत्ती, या उलट मी मात्र माणूस पारखून वागणारी. यावरुन अनेकदा आपले वाद व्हायचे/ होतात. लॉ कॉलेजला असताना कॉलेज डेजच्या वेळी रात्री घरी यायला उशीर झाला म्हणून झालेली तुमची चिडचिड आजही आठवतेय.तसं लॉ कॉलेजचं टायमिंगही संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ. म्हणूनच कदाचित जेव्हा मोबाईल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा स्वतःसाठी मोबाईल न घेता तुम्ही आधी माझ्यासाठी मोबाईल घेतलात.
    लग्नाच्या दिवशी पाठवणीच्या वेळी ओक्साबोक्शी रडणाऱ्या मला बघून कधीही न रडणारे तुम्हीही खूप हळवे झाला होतात.  तुमचेही डोळे पाणावले होते. त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माहेरी आले तेव्हा सगळ्यांनी रडूबाई म्हणून खूप चिडवलं पण नेहमी रडत कसली बसतेस म्हणणारे तुम्ही मात्र अगदी गप्प बसला होतात.
     लग्नानंतर तुम्ही लहानपणापासून सांगितलेल्या पण तेव्हा  फारशा सिरिअसली न  घेतलेल्या गोष्टी हळूहळू पटत गेल्या. त्यांचं महत्व लक्षात आलं.  आयुष्यात कधीही कुठलाही प्रॉब्लेम येउदे  'बाबा' आहेत हा विश्वास होता/आहे.
     प्रत्येक बाबांची मुलगी लाडकी असते आणि आईचा मुलगा हे तर निर्विवाद सत्य आहे. आईचा मयुरेश जास्त लाडका आहे हे ती कधीच मान्य करत नाही पण तुम्ही मात्र मी जास्त लाडकी आहे हे प्रामाणिकपणे मान्य करता. गेल्यावर्षी तुम्ही ॲडमिट असताना मला पुण्याहून भर पावसात रत्नागिरीला यावं लागलं याचं तुम्हाला वाईट वाटत होतं पण त्याचवेळी मी भेटल्याचा आनंदही झाला होता आणि म्हणूनच कि काय तुम्ही फ्रेश दिसू लागलात. तेव्हा तुमच्यातला हा बदल बघून हॉस्पिटलमधली नर्सही हसून म्हणाली, 'काका लेक आल्यावर अर्धा आजार पळाला तुमचा....'
    तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहात असं मी कधीही म्हणणार नाही. पण तुम्ही माझा आधार आहात बाबा! आणि जगण्यासाठी आधाराचीच गरज असते.अजून काय लिहू ? लिहिण्यासारखं खूप काही आहे पण प्रत्येक गोष्ट शब्दात नाही मांडता येत. खरं सांगायचं तर एका मुलीवर जेवढं प्रेम तिचे वडील करतात तेवढं जगात कोणीच करु शकत नाही. अगदी आईसुद्धा नाही! म्हणूनच असेल कदाचित पण मुली 'डॅडाज गर्ल' असतात.
©मानसी जोशी

Wednesday, 19 October 2016

मैत्री

मैत्री

कॉलेजचा पहिला दिवस  आणि  तू मला भेटलास ...एका गावातून आलेली बावरलेली गोंधळलेली थोडीशी बावळट अशी  मी F.Y.BCS चा वर्ग शोधत होते....ना आत्मविश्वास ना मोकळेपणा. माझी अडचण तू ओळखलीस आणि मला माझा वर्ग  दाखवलास. शहरातल्या मॉडर्न मुलींसमोर मी खूपच बावळट वाटत होते. सुरुवातीच्या काळात माझ्याशी कोणी फारस बोलायचं नाही. तू मात्र बोलायचास. तू माझ्याशी बोलायचास म्हणून तुझे मित्र तुला हसायचे, तुझी चेष्टा करायचे, पण तू मात्र तस कधी दाखवल नाहीस.मला कळत होत पण मी हि तुला काही विचारल नाही. दिवस असेच सरत होते. आपली ओळख हळूहळू वाढत होती. तू मला कधी बदलायचा प्रयत्न  केला नाहीस पण मी मात्र हळूहळू बदलत गेले. तुझ्या सहवासात आत्मविश्वास मिळत गेला. शहरी वातावरणात हळूहळू रुळू लागले. बघता बघता ६ महिने  निघून गेले. माझे  टर्मिनल एक्झॅमचे मार्क्स बघून नोट्स मागण्यासाठी का होईना वर्गातल्या मुली माझ्याशी बोलू लागल्या. मी या शहरी वातावरणात चांगलीच रुळत  होते आणि मला माझा ग्रुपहि  मिळाला पण तू मात्र कायमच माझी प्रायोरिटी  होतास. मी हि  आता शहरातल्या मॉडर्न मुलींसारखी  स्मार्ट झाले होते. माझ्याशी बोलतोस म्हणून तुला हसणारे तुझे मित्र, "ए तिच्याशी ओळख करून दे ना" अस म्हणून तुझ्या मागे लागत होते. तू मात्र हसून वेळ मारून न्यायाचास.असच सेकंड इअरचं वर्ष सरल. आता फायनल इअर त्यामुळे आपण दोघेही बिझी झालो.  कॉलेज, क्लास, प्रॅक्टिकल्स यातच सारा वेळ  जाऊ लागला. माझ कंप्युटर सायन्स आणि तुझं केमिस्ट्री म्हणजे आपण दोन विरुद्ध टोक. आता रोज होणारी भेटही कमी होत होती. सगळ रुटिन बिझी झाल होतं. तरीही कधीतरी एखाद्या निवांत सोनेरी संध्याकाळी तुझी आठवण यायची आणि मन बेचैन व्हायचं. कधीही कुठलाही प्रॉब्लेम असुदे, मग तो कितीही मोठा किंवा  छोटा, तुझ्याशी बोललं कि सगळच सोप होवून  जायचं.तुझ्याशिवाय मी म्हणजे मला अपूर्णच वाटायचे. मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी माझ्या मनातले भाव तुझ्यासमोर व्यक्त केले. खरतर आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज कधीच नव्हती, पण तरीही मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त केल्या. त्यावर तू म्हणालास, "आपल नात खूप सुंदर आहे ग त्याला कुठल्याही नवीन नात्यात गुंफू नकोस.  आपल्यातली हि निखळ मैत्री माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती मला अशीच आयुष्यभर जपून ठेवायची आहे.  तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम नाही तुला माझी वाटणारी ओढ आहे. प्रेम आणि मैत्री यामध्ये एक नाजुकशी पुसटशी रेष असते. ती रेष तू ओळख.  निट विचार कर आणि तूच ठरव तुला काय हवय.  तरीही तुझी इच्छा असेल तर आपल्या नात्याला तू म्हणशील ते नाव द्यायची माझी तयारी आहे. आपली निखळ मैत्री कि प्रेम निवड तुलाच करायची आहे...." मला तुझं म्हणण पटल होत. अर्थात तू सांगितलेली कुठलीही गोष्ट मला पटणार नाही, अस कधीच झालं नव्हत. दाटून आलेले मेघ दूर झाले आणि सगळ कस स्वच्छ झालं. आपल्यातल नात म्हणजे निव्वळ निखळ मैत्री  हेच सत्य होतं बाकी सगळा भावनांचा खेळ होता.
   तू नेहमीच मला समजून घेतलस. मला काय हवय हे माझ्या पण आधी आणि माझ्यापेक्षा जास्त चांगल तुला माहित असायचं. माझ लग्न ठरलं तेव्हा माझ्या भावी पतीला तू आपल नातं आधीच स्पष्ट केलस  आणि त्याच्याशी बोलल्यावर तो माझ्यासाठी खरच योग्य आहे हि पावतीही दिलीस आणि मी निर्धास्त झाले. तुझ्या लग्नाच्या वेळी बायकोकडून जणू आठवं  वचनच घेतलस की ती आपल्या मैत्रीच्या आड कधीच येणार नाही. हे सार घडत असताना प्रत्येक नातं तू जपत होतास. नाती जपणं मी तुझ्याकडूनच शिकले. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू. माझ्यावर तर जणू आभाळ कोसळलं. किती दिवस दु:खात बुडाले होते कोणास ठावूक त्यातच आधीच तब्येतीने नाजूक असणाऱ्या माझ्या सासूबाई तर पूर्ण खचल्या. सासरे आधीच गेलेले, त्यातच मुलाच अस अपघाती जाणं, त्या तर पूर्ण कोलमडून गेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी  ८ वर्षाची  मुलगी खूपच गांगरून गेली. पण त्यावेळी मात्र तू आणि तुझ्या सुस्वभावी पत्नीने आम्हाला सावरल. सुदैवाने माझी नोकरी असल्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण सासूबाई अंथरुणाला खिळल्या त्या कायमच्याच. आणि वर्षभरात त्याही मला सोडून गेल्या. माहेरी तर गरिबी आणि इथली नोकरी सोडून तिथे जाऊन कसं राहणार? अशा वेळी तू मला आधार दिलास आणि मी माझ्या घरीच रहायचं ठरवलं. संकटं सांगून येत नाहीत आणि आली की पिच्च्छां सोडत नाहीत तस झालं. रिसेशनच्या लाटेत तुझी नोकरी गेली. तू नवीन नोकरी न शोधता व्यवसाय करायचा ठरवलास.प्रश्न होता भांडवलाचा, शिवाय तुझ्या बायकोचाही याला विरोध. अशा वेळी मी माझी सगळी सेविंग्ज तुला दिली तेव्हा तू  बायकोला म्हणालास आमची मैत्री हीच माझी इनव्हेस्टमेंट आहे. आणि मला म्हणालास या इन्व्हेस्टमेंट मध्ये मी तुझं नुकसान नाही होवू देणार. तू प्रचंड मेहनत करत होतास आणि यशाची एकएक पायरी पटापट चढत होतास. तुझ कुटुंब, तुझा बिझनेस या साऱ्या जबाबदाऱ्यांबरोबरच मैत्रीच नातंही जपत होतास. पण या साऱ्यानंतर समाजामध्ये आपल्या दोघांबद्दल नको ती चर्चा होवू लागली त्याची झळ आपल्या दोघांच्याही कुटुंबाला बसत होती. तुझ घर तू सावरलस. पण माझ्या टीनएजर मुलीला समजावण्याचं अवघड कामही तू अगदी सहज केलस. ते हि तिच्यावर न चिडता आणि तिला न दुखावता.
     "तुझं आणि आईच काय नातं आहे? तू का येतोस आमच्याकडे?" या तिच्या प्रश्नावरच तुझ उत्तर ऐकून तर मी सुद्धा थक्क झाले होते.
     किती सहज सांगितलस तिला तू ,"झाडाला गुरफटलेल्या वेलीच जे नातं झाडाशी असतं तेच नातं आमच्यामध्ये आहे. कधी ती झाड झाली तर कधी मी. ना झाडाने कधी वेलीवर आपला अधिकार सांगितला ना वेलीने झाडावर.  एक निरपेक्ष नातं असत दोघांमध्ये तसच तुझ्या आईच आणि माझं निरपेक्ष मैत्रीच नातं आहे.........माझ्या मुलीला  मैत्री आणि प्रेमातल्या नाजूक रेषेची ओळख योग्य वयातच झाली निव्वळ तुझ्यामुळे!माझ्या मनात दाटलेले मेघ जसे दूर झाले होते तसेच तिच्याही झाले.
       अशा किती गोष्टी लिहू? आज मला माझ्या आयुष्याचा नवा जोडीदार मिळालाय. एका नव्या संसाराची सुरुवात करतेय मी. अर्थातच तुझ्या पुढाकारामुळेच. मला आणि माझ्या मुलीला या लग्नासाठी  तयार करण्याच शिवधनुष्य  तू अगदी सहज पेललस. आज मी हे घर, हे शहरच नाही तर हा देश सोडून चाललेय. माहितेय मला एका क्लिक वर कोणालाही बघता येतं कोणाशीही बोलता येत पण तरीही आज मनातल सार मी या चिठ्ठीत लिहितेय ...सतत तुझ्याजवळ राहण्यासाठी. जाता जाता सुचलेल्या चार ओळी लिहिते.
           नाती असतात रक्ताची, नाती असतात व्यवसायाची
          काही नाती फक्त स्वप्नांची तर काही सहज जोडलेली
          असच एक नातं जुळतं मैत्रीच
           उत्कठ भावानेच कि शब्दांच्या पलीकडलं?

*संपूर्णत: काल्पनिक
©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...