ती रात्र...
संध्याकाळ टळून हळूहळू रात्र सुरु झाली होती. रेवा खिडकीत बसून बाहेर पडणारा मुसळधार पाऊस अस्वस्थ होऊन बघत होती. भर दिवसा तिन्हीसांजा झाल्यासारखा होणारा काळोख, मुसळधार पडणारा वादळी पाऊस, अशी उदास संध्याकाळ हे सारं ती आयुष्यात प्रथमच यावर्षी अनूभवत होती. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, समोर मोकळा निर्मनुष्य रस्ता डाव्या बाजूचा मोकळा प्लॉट सोडून सुरु होणारं जंगल आणि एका मोठ्या बंगल्यात फक्त ती आणि तिची अडीच वर्षांची मुलगी आभा. वाढत जाणाऱ्या अंधाराबरोबर रेवाच्या मनातली भीतीही वाढत होती. धड महिनाही झाला नव्हता तिला कोकणातल्या या गावात; या बंगल्यात रहायला येऊन. ती व तिचा नवरा अभिजीत लहानग्या आभाला घेऊन प्रथमच कोकणात रहायला आले होते. अभिजीतच्या कंपनीचा कोकणात एक मोठा प्रोजेक्ट चालू होता. त्याच्या कामासाठी कंपनीने सहा महिन्यासाठी अभिजीतला कोकणातल्या ब्रॅंचमध्ये पाठवलं होतं. कंपनीच्या ब्रॅंच ऑफिसजवळच असणाऱ्या बंगलो सोसायटीमधल्याच एका बंगल्यात कंपनीने त्यांची रहायची व्यवस्था केली होती.
कोकणातला हा परिसर तसा शांतच. कोकणातल्या निसर्गसौदर्याने सुरुवातीला वेडावलेली रेवा आता मात्र कोकणातल्या पावसाच्या रौद्र रुपाने चांगलीच घाबरली होती. तिचा नवरा अभिजीत मिटिंगसाठी बाजूच्या शहरात गेला होता. शहर तस फार लांब नव्हतं. अवघ १४० किलोमीटरचं अंतर. कारने फक्त अडीच/तीन तास. पण खराब रस्ता आणि मुसळधार पावसामूळे हा वेळ कधीकधी दुप्पट होत असे. संध्याकाळपर्यंत परत येणाऱ्या अभिजीतला कामामुळे तिथून निघायलाच संध्याकाळ होवून गेली होती. एकीकडे अभिजीतची काळजी असूनही रेवा या भयाण वातावरणामुळे त्याला 'आज निघू नकोस' असंही म्हणू शकत नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले आणि रेवा विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. मेकॅनो खेळण्यात रमलेल्या तिच्या मुलीला कौतुकाने जवळ घेऊन म्हणाली, "पिल्लू बास आता खेळ, छान छान वरण भात जेवायचा ना?"
"नाही, बाबा आल्यावरच त्यांच्या मांडीत बसून", आभाने हट्ट केला.
"पिल्लू बाबांना उशीर होणार आहे ग. आज माझ्या मांडीत बसून जेव ना ग. मी छान गोष्ट सांगते ससोबाची चालेल?"
"रोज रोज काय ग उशीर? एवढे दिवस झाले मला बाबा भेटून" आभा हात पसरुन म्हणाली.
"हो ग राणी आज आला ना की मी चांगल ओरडेन हा त्याला" , रेवा हसून म्हणाली.
"आणि त्याला उद्या मी उठेपर्यंत घरातच कोंडून ठेव हा! जाऊच नको देऊस ऑफिसला?" आभा लटक्या रागाने म्हणाली.
रेवाने हसून मान हलवली आणि आभाला भरवायला सुरवात केली. एवढ्यात जोरात वीज कडाडली. ढगांचा गडगडाट झाला आणि लाइट गेले. त्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने आणि अंधारामूळे आभा घाबरुन रेवाला बिलगली आणि रडायला लागली. रेवाने क्षणात मोबाईलची टॉर्च लावली आणि आभाला शांत केले. आभाला कडेवर घेवून ती उठली आणि तिने देवासमोर लावलेल्या निरांजनात तेल घातले. त्या सात्विक प्रकाशात रेवाच्या मनातली भीती जरा कमी झाली. आभाला जवळ घेउनच रेवाने कसेबसे चार घास तोंडात टाकले आणि किचनमधले आवरायचं तसच ठेवून ती आभाला घेउन बेडरूममध्ये झोपायला गेली. थोडंसं थोपटल्यावर आधीच घाबरलेली आभा तिच्या कुशीत शांत झोपली. रेवा मात्र जागीच होती. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनच वाढला होता. रेवाला आता अभिजीतची अधिकच काळजी वाटू लागली होती. मगाचच्या विजेच्या कडकडाटानंतर रस्त्यावरचे दिवेही गेले होते. नाही म्हणायला बाजूच्या बंगल्यात इनव्हर्टर असल्यामुळे त्यांच्या किचनमध्ये लाइट चालू होता. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण त्या बंगल्यात रहाणारे आजी आजोबा काहीसे विचित्रच वाटत होते. सुरुवातीस जरा बरे वागले होते. पण मागच्या आठवड्यापासून त्यांचं वागणं एकदमच बदललं. रोज सकाळी अभिजीत ऑफिसला जाताना त्याला बाय करायला जाते तेव्हा तर किती विचित्र नजरेने बघतात त्या आजी. अर्थात अभी पण कधीकधी जास्तच रंगात येतो म्हणा. ते खटकलं असेल त्यांना बहुदा. शेवटी गावातली माणसं आहेत ती. तो सोसायटीचा नाईट वॉचमन तर किती विचित्र नजरेने बघत असतो. विचार करता करता रेवाचा डोळा लागला. थोड्या वेळाने दार ठोठावण्याच्या आवाजाने रेवा दचकून जागी झाली. त्या आवाजाने ती खूप घाबरली. तिने मोबाईल हातात घेऊन वेळ बघितली तर रात्रीचे साडेबारा वाजले होते.
"आत्ता या वेळेला कोण असेल? तिच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. अभी तर नसेल? या विचाराने क्षणभर तिला दिलासा दिला पण अभि रात्री उशिरा आला की नेहमी त्याच्याजवळच्या किल्लीनेच दार उघडतो आणि जर किल्ली नसेल तर कॉल करतो. रेवा प्रचंड घाबरली. पाऊसाचा जोर जरी ओसरला असला, तरी सगळीकडे पसरलेला अंधार, विचित्र आवाजात रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, पार्किंग शेडच्या पत्र्यावर मधूनच पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज या साऱ्यामूळे वातावरण अधिकच भयावह बनले होते. रेवाला आता असहाय्य वाटू लागलं होतं. ती कुठलीही हालचाल न करता आभाला कुशीत घेऊन बेडवर तशीच पडून राहिली. पुन्हा दार वाजले. रेवा खूपच घाबरली, "कोण असेल एवढ्या रात्री? तो वॉचमन तर नसेल? दोन दिवसांपूर्वी मेडिकल चेकअपसाठी अभिच्या ऑफिसमधून काही ऑफिसर्स आले होते तेव्हा कसा फिरत होता तो बंगल्याच्या आसपास. आणि ती माणसे गेली तेव्हा काय बोलत होता त्यांच्याशी कुणास ठावूक? एवढ्यात पुन्हा दार वाजले. हिम्मत करुन रेवाने दाराजवळ जायचे ठरवले. पावलांचा आवाजही न करता रेवा हळूहळू हॉलमध्ये जायला निघाली. मनातून ती खूप घाबरली होती. हळुवार पावलांनी ती हॉलमध्ये आली. घाबरत घाबरत ती दाराजवळ गेली. दाराच्या फटीतून तिने बाहेर बघायचा प्रयत्न केला पण बाहेर असणाऱ्या मिट्ट काळोखामूळे तिला काहीच दिसले नाही. ती खूप घाबरली होती तिने पुन्हा हिम्मत करुन कि-होल मधून बाहेर बघितले, एवढ्यात वीज चमकली. ढगांचा गडगडाट झाला. त्या प्रकाशात तिला गेटबाहेर उभा असलेला वॉचमन दिसला. रेवाने घाबरून दाराकडे पाठ फिरवली. तिचं उरलसुरल अवसान गळून पडलं होतं. भीतीने ती मटकन खाली बसली. तिला आता रडू यायला लागल होतं. आपल्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तीने आपले दोन्ही हात तोंडावर घट्ट धरून ठेवले.
कितीतरी वेळ रेवा दाराला टेकून रडत होती. अचानक तिला आभाची आठवण आली. आभाच्या काळजीने तिने बेडरुमकडे धाव घेतली. आभाला बेडरुममध्ये शांत झोपलेली बघितल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. तिने पटकन जाऊन आभाला कुशीत घेतले. काही झाल तरी चालेल, पण उद्या अभी ऑफिसला जाण्यापूर्वी त्याच्याजवळ जागा बदलण्याविषयी बोलायचंच. जेव्हा नविनच इथे रहायला आलो तेव्हा घरासाठी लागणार काही सामान आणायला इथूनच जवळ असणाऱ्या शहरात गेलो होतो. तिथेच एखादा छोटा फ्लॅट मिळाला तरी चालेल. पण तिथेच जागा बघू म्हणून सांगायच अभीला. ऑफिस थोडं लांब पडलं तरी चालेल, पण निदान चार लोक तरी असतील सोबतीला. अभीला पटेल का पण? या बंगल्यात आलो तेव्हा किती खूश होता अभिजीत. एखाद्या रिसोर्टपेक्षाही सुंदर असणाऱ्या तीन बेडरुम्स, मॉड्युलर किचन, अगदी टीव्हीवर दाखवतात तसा मोठा हॉल, त्यामध्ये मोठा सोफा, बाहेर छोटसं पण सुंदर गार्डन, त्यामध्ये एक छोटासा झोपाळा. अगदी एखाद्या स्वप्नातल्या घराइतका सुंदर बंगला. पहिल्याच दिवशी अभी म्हणाला होता, "आता काय रोजच हनीमून." अभिच्या आठवणीने या प्रसंगातही तिला हसू आलं. तिच्या मनात आलं, हा इतका सुंदर बंगला आज मात्र खूपच भयंकर वाटतोय. एखाद्या शापित वास्तुसारखा!
विचार करता करता तिचा डोळा लागतो न लागतो तोच तिचा मोबाईल वाजला. त्या सवयीच्या आवाजानेही रेवा दचकली. तिने मोबाईल बघितला तर फोन अभिजीतचा होता. "हॅलो रेवा मी आलोय, दार उघड ना, अग किल्ली आहे माझ्याकडे पण अंधारात काहीच दिसत नाहीये. "
"ओके" असं म्हणून रेवाने फोन कट केला आणि धावत जाऊन दार उघडलं. समोर अभिजीतला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद तरळला तिने दारातच त्याला मीठी मारली आणि रडत रडत म्हणाली, "बर झाल अभी तू आलास मला खूप भीती वाटत होती".
"इट्स ओके रेवा, आता आलोय ना मी. प्लिज, डोन्ट क्राय डिअर." अभी तिला समजावत म्हणाला.
रेवा काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. ती अभिच्या मीठीत रडतच होती. त्याने तिला हळूवार थोपटलं. काही क्षण तसेच शांततेत गेले. रेवा शांत झाल्यावर अभिजीत हसून म्हणाला, "रेवा घरात घेशील का ग मला आता? का दारातच सगळा रोमान्स करायचा आहे?"
त्याचं मिश्किल बोलणं ऐकून त्याच्या छातीवर डोक घुसळत रेवा म्हणाली, "मोस्ट वेलकम माय स्वीट हार्ट!".
आत आल्यावर अभिजीतने रेवाला विचारले, "रेवा काय झालंय? एवढी डिस्टर्ब का आहेस?"
"अभी आपण ही जागा बदलूया. खूप एकाकी वाटतं इथे. तू नसलास की एखाद्या हॉंटेड हवेलीसारखा वाटतो हा बंगला. वारंवार लाईट्स जातात. तो नाईट वॉचमन विचित्र नजरेने माझ्याकडे आणि आपल्या घराकडे बघत असतो. बाजूच्या बंगल्यातले आजी आजोबा सुद्धा विचित्रच वाटतात मला. आपण बाजूच्या शहरामध्येच एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बघूया. रेंट आपल्याला भरायला लागल तरी चालेल, जागा छोटी असली तरी चालेल मला. पण आपण इथून जाऊया." अस म्हणून रेवा पुन्हा रडू लागली.
"इट्स ओके रेवा. आपण बोलू उद्या. तुला इथे नाही ना रहायचं मग बघू आपण दुसरी जागा. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी बोलतो सरांशी. ओके?" अभिजीतने रेवाला समजावले.
जागा बदलायला अभी लगेच तयार झाला म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. इतक्यात तिच्यासमोर खिशातला टिशू पेपर धरून अभिजीत म्हणाला, "रेवा आता जर का तुला रडू आलं ना; तर या पेपरला डोळे पुस हा. तोपर्यंत तुझ्या अश्रूंमूळे ओला झालेला हा शर्ट मी बदलून येतो."
त्याचा हा मिश्किलपणा बघून रेवाला हसू आलं. रेवाने त्याच्या हातातला टिशू पेपर हातात घेतला आणि बाजूच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवून लटक्या रागाने म्हणाली, "अभी चेष्टा करतोयस ना माझी? पण खरच भीतीमूळे मला खूप एकाकी वाटत होतं. तुला समोर बघितल आणि जीवात जीव आला माझ्या."
"हो हो रडूबाई कळल मला आता. मी पटकन आवरुन येतो. तोपर्यंत शांत बस घाबरु नकोस अजिबात", अभिजीत. त्यानंतर मात्र अभिजीतच्या कुशीत रेवाला शांत झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा बाहेरच वातावरण एकदम स्वच्छ दिसत होतं. गेले आठ दिवस अविरत बरसणारा पाऊस थांबून सूर्यदर्शन झाल होत. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. रेवाला खूपच प्रसन्न वाटत होतं. बाजूला शांत झोपलेल्या अभिजीत आणि आभाकडे बघून तिला समाधान वाटले. तितक्यात डोअरबेल वाजली. रेवाने दार उघडले तर समोर तिच्या सासूबाई, तिची नणंद मेघा आणि काही माणसे उभी होती. रेवाला आश्चर्य वाटले. "आई तुम्ही आत्ता इथे कशा काय"? आणि ही सगळी माणसे कोण आहेत?नकळतपणे रेवाने विचारले. "सगळ सांगते. आम्हाला आत तर येवूदे." सासूबाई शांतपणे म्हणाल्या.
रेवा खूपच गोंधळून गेली होती. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत तिच्या सासूबाई म्हणाल्या, " रेवा मला खूप महत्वाचं बोलायच आहे."
"बोला ना आई काय झालंय? तुम्ही अशा अचानक इथे आणि मेघाला(अभिजीतची बहीण) घेवून कशा काय आलात? तिचं कॉलेज नाही का? मला खूप भीती वाटतेय बोला ना लवकर काय झालय ते. ऱेवाने घाबरून विचारले.
"रेवा अभिजीत कुठे आहे? सासूबाईंनी शांतपणे विचारलं.
"आत बेडरूममध्ये झोपलाय. थांबा मी बोलावते" अस म्हणून रेवा बेडरूमकडे जायला वळली तेवढ्यात तिच्या सासूबाई तिला थांबवत म्हणाल्या, "रेवा थांब, आम्ही दोघी पण येतो तुझ्याबरोबर." त्या
तिघी बेडरूममध्ये गेल्या तेव्हा फक्त आभा शांत झोपली होती. अभिजीत तिथे नव्हता. गोंधळलेल्या रेवाने बेडरुमभर फिरत त्याला हाका मारायला सुरवात केली. तिच्या आवाजाने आभा दचकून उठली आणि रडू लागली. पण रेवाचे तिकडे लक्षच नव्हते. ती अभिजीतला शोधत होती. रेवाच्या सासूबाईनी आभाला जवळ घेवून थोपटलं आणि ती शांत झाल्यावर तिला म्हणाल्या, "आभा आत्येबरोबर जरा फिरून येतेस? आत्येने तुझ्यासाठी खूप सारी चॉकलेट्स आणली आहेत”. समजूतदार आभा चटकन तिच्या आत्येकडे गेली. मेघा आभाला घेउन बाहेर गेली.
अख्खा बंगला फिरुन रेवा पुन्हा बेडरुममध्ये आली. अभिजीत कुठेही न दिसल्यामुळे ती डिस्टर्ब झाली होती. तिच्या सासूबाईंनी तिचा हात धरुन तिला बेडवर बसवले आणि शांतपणे म्हणाल्या, रेवा हे काय आहे सगळं? माझ्या बरोबर जी माणसे आली आहेत ना; ती म्हणजे अभीच्या ऑफिसमधले त्याचे सहकारी आहेत. त्यांनीच आम्हाला बोलावून घेतलंय. त्यांना अभिबद्दल काहितरी महत्त्वाचे बोलायचे आहे, असं काहीसं म्हणत होते फोनवर".
रेवा हताश होवून बसली होती. सासूबाईंच्या बोलण्यामुळे अजूनच गोंधळली होती. अभिजीतच्या ऑफिसमधील मि. साने आणि अजून काही सहकारी आतमध्ये आले. काही क्षण तसेच शांततेत गेले. काय बोलाव कोणालाच काही कळत नव्हत.अखेर शांततेचा भंग करत मिस्टर साने म्हणाले, " मॅडम, अभिजीत कुठे आहे? गेले काही दिवस तो ऑफिसला का येत नाहीये?
"What? How can it possible Mr. Sane?काल अभिजीत ऑफिसच्या कामासाठी बाजूच्या शहरात क्लाएंट मीटिंगसाठी गेला होता ना?तुम्हांला तर माहितीच असेल तूम्हीच तर पाठवल होत त्याला. रात्री उशीरा परत आला तो." रेवा संतापून म्हणाली.
"मग तो आत्ता कुठाय?" सानेंनी रेवाला विचारल.
रेवा आता पूर्णपणे गोंधळली होती कसंबसं स्वतःला सावरत ती म्हणाली, "मी खरं तेच सांगतेय प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. काल मी स्वतः दार उघडून त्याला घरात घेतल. लाईट गेले होते म्हणून त्याने मला कॉल केला आणि......; एक मिनिट! काहीतरी आठवल्यासारख करत रेवा क्षणभर थांबली आणि म्हणाली, "काल रात्री अभीने दार उघड म्हणून सांगायला मला कॉल केला होता. Just wait for a second..... ",असं म्हणत तिने बाजूच्या ड्रेसिंग टेबलवरचा आपला मोबाईल घेवून कॉल हिस्ट्री चेक केली आणि रिसीव्ड कॉलमध्ये असलेला अभीचा नंबर मि. सानेना दाखवला. सानेनी कॉल हिस्ट्री चेक केली आणि ते रेवाला म्हणाले, "मॅडम रिसिव्ड कॉल हिस्ट्रीमध्ये अभिजीतचा नंबर आहे. अगदी बरोबर; पण तो कॉल काल रात्री आलेला नव्हता, तर आठ दिवसांपूर्वी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी आला होता." रेवाने अविश्वासाने सानेंच्या हातून मोबाईल जवळपास ओढून घेतला आणि कॉल हिस्ट्री पुन्हा बघितली. सानेंचं म्हणण बरोबर होतं. कॉल आठ दिवसांपूर्वीचाच होता.
रेवाचा गोंधळलेला चेहरा बघून साने म्हणाले, "रेवा मॅडम, तुम्हाला अभिजीतचाच काय कोणाचाच फोन काल येणं शक्य नव्हत कारण आठ दिवसांपूर्वी या सोसायटीच्या परिसरात वीज पडल्यामुळे सगळे मोबाईल्स आणि लॅंडलाईन सध्या बंद आहेत. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, अभिजीत काल नव्हे तर आठ दिवसांपूर्वीच म्हणजेच गेल्या मंगळवारीच बाजूच्या शहरात मिटिंगसाठी गेला होता. त्यांच्याबरोबर ऑफिसचे क्लार्क मि.सावंतही होते. पण त्यांचं घर त्याच शहरामध्ये असल्याने ते परत येणार नव्हते. पण अभिजीत परत येणार होता आणि ते ही क्लाएंटने दिलेले २५ लाख रुपये घेऊन. बुधवारी सकाळी अभिजीत ऑफिसला आला नाही. त्याचा फोनही नाही म्हटल्यावर आम्हाला आश्चर्यच वाटल. पण नंतर थोड्या वेळातच कळलं की वीज पडल्यामूळे सगळे मोबाईल आणि लॅंडलाईन बंद आहेत. इतकंच नव्हे तर केबल तुटल्यामूळे त्या दिवशीपासून MSEB च्या काही लाईन्सही बंद आहेत. मंगळवारी अविरत पडणाऱ्या पावसामुळे अभिजीतला मिटिंग आटपून परतायला उशीर झाला असेल व दगदगीमूळे आज ऑफिसला यायचा कंटाळा आला असेल शिवाय फोन बंद असल्यामूळे त्याला ऑफिसमध्ये कळवताही आलं नसेल असा विचार करुन आम्ही त्याचं न येणं फारस गांभीर्याने घेतलं नाही. परंतू दुसऱ्या दिवशीही जेव्हा अभिजीत ऑफिसला आला नाही तेव्हा मात्र ऑफिसमधले शिपाई मि. मोरे तुमच्या घरी बघायला आले होते. तेव्हा तुम्ही त्यांना अभिजीत ऑफिसला गेला असं सांगितलंत. पण त्या दिवशीही अभिजीत ऑफिसला न आल्याने मला शंका आली. संध्याकाळी कामे आटपून मी स्वतः तुमच्याकडे यायला निघालो.
संध्याकाळची वेळ असल्याने दिवसपाळीचा वॉचमन नुकताच आपली ड्युटी संपवून निघाला होता आणि नाइट वॉचमन ड्युटीसाठी आला होता. त्यामुळे दोन्ही वॉचमन गेटजवळच भेटले. दोघांच्याही म्हणण्यानूसार त्यांना मंगळवारनंतर अभिजीत दिसलाच नव्हता. मंगळवारी सकाळी ६ वाजता अभिजीतला जाताना दोन्ही वॉचमननी बघितल होतं. कारण नाइट वॉचमनला लवकर जायचं असल्यामुळे दिवसपाळीचा वॉचमन त्यादिवशी थोडं लवकर आला होता. त्या दोन्ही वॉचमनशी बोलल्यावर माझ्या मनात भलत्याच शंका यायला लागल्या. नक्की कोण खरं बोलतंय काहीच कळत नव्हतं. एकीकडे तुम्ही मि. मोरेंना सांगितलंत, "अभिजीत रात्री परत आला व सकाळीच ऑफिसला गेला." पण अभिजीत ऑफिसला तर आलाच नव्हता. अखेर विचार करुन मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. पोलिसांनीही वेळ न दवडता तपासकार्याला सुरुवात केली. एका हवालदाराला तुमच्या घरावर पाळत ठेवायला सांगून आजूबाजूच्या बंगल्यांमध्येही चौकशी करण्याची सूचना दिली.
पोलिसांच्या तपासानुसार मंगळावरी मिटिंग आटोपल्यानंतर अभिजीत आणि मि. सावंत 'विसावा' हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. त्या हॉटेलच्या सिसिटिव्ही कॅमेराचे फुटेज पोलिसांनी चेक केले आहेत. मि. सावंताच्या सांगण्यानूसार तिथून अभिजीत मि. सावंतना त्यांच्या घरी सोडून परतीच्या प्रवासाला लागणार होता. पण तेवढ्यात मीटिंगमध्ये झालेल्या काही पॉईंटसवर पुन्हा चर्चा करण्यासाठी क्लाएंटने अभिजीतला कॉल करुन परत येण्याची विनंती केली. त्यामुळे हॉटेलमधून सावंत त्यांच्या घरी गेले व अभिजीत पुन्हा क्लाएंटच्या ऑफिसमध्ये गेला. क्लाएंटच्या ऑफिसमध्ये असलेल्या सिसिटिव्ही फूटेजनूसार संध्याकाळी बरोबर ६:१० वाजता अभिजीत तिथून क्लाएंटने दिलेले २५ लाख रुये घेवून निघाला होता. निघण्यापूर्वी त्याने तुम्हांला फोन केला होता. त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्डनुसार तो त्याने केलेला शेवटचा फोन होता. तोच कॉल जो तुम्ही मला कालचा म्हणून दाखवताय”.
रेवा आता रडकूंडीला आली होती. ती हतबल होऊन म्हणाली, "हे सारं काय चाललंय? मला नाही माहिती तुम्ही काय बोलताय? पण मला खात्री आहे अभिजीत कोणाचेही पैसे घेवून कुठेही जाणार नाही. तो आत्ता कुठे गेला ते नाही माहिती पण काल रात्री.....
"काल रात्री तो परत आलाच नाही रेवा मॅडम कारण पोलिसांच्या तपासानूसार त्याच्या मोबाईलच शेवटच लोकेशन मंगळवारी रात्री गाववाडी नावाच्या गावाजवळच्या घाटात ट्रेस झालं. त्याच्याआधारे मुसळधार पावसातही शक्य तेवढी मेहनत घेवून पोलिस अभिजीतला शोधत होते. आम्हाला संशय होता की एकतर अभिजीत पैसे घेवून पळून गेलाय किंवा पैशासाठी अभिजीतचा घातपात करण्याचा प्रयत्न झालाय. पण अखेर दोन दिवसांच्या अथक परिश्रमाने पोलिसांना रविवारी घाटातून खाली कोसळलेली अभिजीतची गाडी आणि तिथूनच थोडया पुढच्या बाजूला एक डेड बॉडी मिळाली. याचा अर्थ त्या रात्री अभिजीतच्या गाडीचा अपघात झाला होता." मि. साने.
"हे काय सांगताय तुम्ही मि. साने"? रेवाला जबरदस्त धक्का बसला होता.
"खरं तेच सांगतोय मॅडम मी. मी हे तेव्हाच तुम्हाला कळवणार होतो. पण जवळपास ४ दिवस मध्ये गेल्यामुळे बॉडी पूर्ण सडली होती. त्यामूळे ती बॉडी अभिजीतचीच आहे हे सिद्ध करावं लागणार होतं. आमच्याकडे असलेल्या अभिजीतच्या मेडिकल रिपोर्टसनूसार ती डेड बॉडी अभिजीतचीच आहे हे सिद्ध झाले.
नाईट वॉचमनच्या सांगण्यानुसार, "अभिजीत सरांच्या बायकोचं म्हणजे तुमचं वागणं अतिशय संशयास्पद आहे. रात्री साधारणपणे १ ते १.३०च्या सुमारास त्या दार उघडतात. थोडावेळ तिथेच थांबतात रडतात आणि मग हसत हसत दार लावून घेतात."
तुमच्या बंगल्यावर पाळत ठेवून असणाऱ्या हवालदाराने दिलेल्या माहितीनूसार, "तूम्ही रोज अभिजीत घरी असल्याप्रमाणेच वागत असता. म्हणजे रोज सकाळी तो ऑफिसला जातो असं समजून त्याला निरोप देता. त्याच्यासाठी टिफिन बनवता. आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले, मिसेस रेवा वेडसर असल्याप्रमाणे वागतात. त्या एकट्याच बडबडत असतात. त्यामूळे तुम्हाला ही बातमी देणं आम्हाला योग्य वाटल नाही. म्हणून मग आम्ही अभिजीतच्या बायोडेटामध्ये नमूद केलेल्या नंबरवर संपर्क केला. तेव्हा आम्हाला कळले की अभिजीतच्या घरी सध्या त्याची आई व बहीण दोघीच असतात. मग आमच्या ऑफिसमधल्या दोन महिला कर्मचारी व दोन पुरूष कर्मचारी त्यांना इथे घेऊन येण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांनी अभिजीतच्या घरी परिस्थितीची सगळी कल्पना देवून त्याच्या आईला व बहिणीला हा धक्का पचविण्यासाठी मदत करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी अगदी उत्तम पार पाडली.
"हे सगळं खोटं आहे. काय सांगताय तुम्ही", रेवा रडत रडत म्हणाली.
"सावरा स्वतःला मॅडम. हे सगळं खरं आहे. आणि शक्य तितक्या लवकर हे स्वीकारा. कारण मी पुढे जे बोलणार आहे ते तुमच्यासाठी अजून धक्कादायक असेल." मि. साने.
"आता अजून काय बाकी राहीलं आहे? रेवा.
"सांगतो, या साऱ्या प्रकारात सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली ती आमच्या मेडिकल टिमने. तुमच्या एकूणच विचित्र वागणूकीबद्दल जी काही माहिती मिळाली त्यावरुन त्यांनी स्वतःहून तुमची भेट घेऊन खरी परिस्थिती जाणून घ्यायची ठरवली. त्यासाठी त्यांनी मानसोपचारतज्ञ डॉक्टर राव यांची मदत घेतली. तुमच्या घरी आलेल्या मेडिकल टिमला आभाने कित्येक दिवसात तिला तिचे बाबा न भेटल्याच सांगितले. हे सारं काय आणि कसं हे तुम्हांला डॉ. रावच समजावतील.” मि. साने बोलायचं थांबले.
रेवा सुन्न होवून सगळं ऐकत होती. डॉं राव रेवाला समजावत प्रेमाने म्हणाले, "मला कळतंय रेवा आत्ता या वेळी तुमची मानसिकता काय असेल. पण आत्ता जर तुम्ही तुमच्या कल्पनाविश्वातच जगत राहिलात तर वास्तवात येणं तुम्हाला खूप कठीण जाईल. तुमच्याशी बोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गेले काही दिवस तूम्ही रोज एक विचित्र आयुष्य जगताय. तुमची रोजची रात्र म्हणजे अभिजीत मिटींगसाठी बाहेरगावी गेला होता त्या दिवसाची म्हणजेच मंगळवारची रात्र आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे एक काल्पनिक सकाळ. त्या सकाळी अभिजीत ऑफिसला जातो.
त्या मंगळवारी आठच्या सुमारास लाईट गेले होते. MSEB कडून तात्पुरती व्यवस्था करुन सध्या दिवसभरात फक्त चार तासांसाठी प्रत्येक विभागात वीज पुरवठा केला जातोय. दुर्दैवाने तुमच्या विभागाला केला जाणारा वीज पुरवठा सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळामध्ये केला जातोय. सहाजिकच रोज रात्री आठ वाजताच लाईट जातात. मुसळधार पावसामुळे तुम्ही अगोदरच थोड्या घाबरल्या होतात. त्यात अभिजीतची वाटणारी काळजी, एकाकीपणा यामुळे तुम्ही खूपच निराश झाला होतात. रात्री अचानक लाईट गेले आणि तुमची भीती अधिकच वाढली. त्यानंतर दार वाजविल्याच्या आलेल्या आवाजामूळे तुमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. त्या भीतीवर मात करण्यासाठी तुमच्या मनाने अभिजीत परत आल्याची कल्पना निर्माण केली आणि त्या कल्पनेलाच वास्तव मानून तुम्ही जगू लागलात. तुमच्या दुर्दैवाने गेल्या आठ दिवसातल्या प्रत्येक रात्री जवळपास सारख्याच गोष्टी घडत गेल्या त्या म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस, रात्री आठच्या सुमारास जाणारे लाईट्स, मध्यरात्री ओसरणारा पाऊस, त्यामुळे तुमच्या मानसिकतेला, तुमच्या काल्पनिक आयुष्याला खतपाणी मिळाले. त्या रात्री तुम्हाला जो दार ठोठावण्याचा आवाज आला त्याचंही स्पष्टीकरण मी देतो. त्या रात्री नाईट वॉचमनला तुमच्या बंगल्याबाहेर काही तरी ठोकल्यासारखा आवाज आला. तुमच्या बंगल्यात चोर शिरत असल्याचा संशय आल्यामूळे तो तिथेच थांबला. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आल, की दाराजवळच्या झाडाची फांदी वाऱ्यामुळे डाव्या बाजूला झुकल्यावर ती दारावर आपटते आणि त्याचा आवाज दार ठोठवल्यासारखा येतो. त्यानंतर मात्र तो तिथून निघून गेला होता. रेवा सावरा स्वतःला. मूळात अभिजीत त्या दिवशी रात्री घरी आलेलाच नाही. कारण त्याच रात्री त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या गोष्टीचा स्वीकार करा".
रेवा स्तब्ध बसली होती. ती काहीच बोलत नव्हती. रेवाच्या सासूबाईंनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण डॉक्टर रावांनी त्यांना खूणेनेच नको असे सांगितले आणि रेवाला एकट सोडण्याची सूचना दिली. त्यांच्या सुचनेनूसार सगळीजण बेडरूमच्या बाहेर गेली. डॉक्टर राव आणि मि. सानेही बाहेर जाण्यासाठी निघाले जाता जाता डॉ रावांनी केलेल्या सुचनेनूसार मि. साने रेवाच्या सासुबाईंना म्हणाले, "सॉरी टू से पण हा बंगला अभिजीतला कंपनीने रहायला दिला होता. आता अभिजीतच या जगात नाही तर......तुम्हाला बंगला खाली करावा लागेल. Don’t worry. Take your own time. फक्त काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. अभिजीतचा मृत्यू ऑन ड्युटी झाला असल्यामूळे कंपनी नैतिक जबाबदारी स्विकारून तुम्हाला कॉंपेंसेशन देणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रांवर रेवा मॅडमची सही लागणार आहे. कदाचित त्यांना ऑफिसला यावं लागेल. Take care". अस म्हणून मि. साने आणि डॉ. राव निघून गेले.
रेवा तशीच शांत बसून होती. तिने ऐकलेल सारं तिच्यासाठी जेवढ दुःखद होतं तेवढच धक्कादायक. ती हतबल होऊन ड्रेसिंग टेबलवरच्या तिच्या आणि अभिजीतच्या फोटोकडे बघत होती. सहजच तिची नजर तिथे ठेवलेल्या टिशू पेपरवर गेली. तिचे डोळे चमकले. तिने चटकन उठून तो टिशू पेपर हातात घेतला. त्यावर लिहिले होते "हॉटेल विसावा".
समाप्त.
©मानसी जोशी