Friday, 16 December 2016

कथा - कॅन्डललाईट डिनर

 कॅन्डललाईट डिनर

'ती' तशी हळवी. रोमॅन्टिक कथा कादंबऱ्यामध्ये रमणारी. 'तो' साधा सरळ. रोमॅन्टिक होणं फारस न जमणारा.
     एका संध्याकाळी तो ऑफिसमधून जरा लवकर घरी आला आणि तिला म्हणाला, "चल आज आपण कॅन्डललाईट डिनरला जाऊया".
     क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही. अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलेली आणि मूव्हीज मध्ये बघितलेली कॅन्डललाईट डिनर डेट तिच्यासाठी स्वप्नवतच होती. त्यात तिचा काहिसा अनरोमॅंटिक नवरा हे सांगतोय म्हटल्यावर तर ती एकदम हरखूनच गेली
       तिने  त्याच्या आवडीचा वेस्टर्न ड्रेस घातला. हलकासा मेकअप केला. त्याला आवडतात म्हणून केस मोकळेच सोडले.
      तिने वाढदिवसाला गिफ्ट केलेला शर्ट घालून 'तो' ही तयार झाला.
    गाडीत त्याने खास तिच्या आवडीच म्युझिक लावले.  आपण स्वप्नात तर नाही ना... असं वाटून तिने हळूच स्वतःला चिमटा काढून बघितला.
     गाडी रेस्टॉरंटच्या गेटमधून आत गेली. गेटवरच्या वॉचमनने पार्किंगची जागा दाखवली. त्याने गाडी पार्क केली. तेवढ्यात दुसरा वॉचमन पुढे आला आणि त्याने अदबिने गाडीचं दार उघडून त्या दोघांना वेलकम केलं. ती हरखून गेली. आपले हाय हिल्स सॅंडल्स सांभाळत त्याच्याबरोबर सावकाश चालू लागली.
       आत गेल्यावर त्यांना अटेंडंटने पुन्हा एकदा वेलकम केले. त्याने मंद हसून अटेंडटला सांगितले 'पूलसाईड टेबल!'
    दोघं आतमध्ये गेली. मंद संगित, रुमफ्रेशनरचा सुगंध 'ती' मोहरुन गेली.
       एक छानसं कॉर्नरच टेबल बघून दोघं तिथे बसले. टेबलावर दोन सुंदरसे कॅन्डललाईट  स्टॅंड होते. हॉटेलच्या वेटरने त्यामध्ये दोन सुगंधित कॅन्डल्स लावल्या. ती टेबलावरचे मेनूकार्ड हातात घेऊन बघू लागली.  समोर ड्रिंक्स आणि नॉनव्हेज डिशची नावे बघून तिचा मूड गेला. ती त्याला म्हणाली, "अरे हे हॉटेल तर व्हेज ॲन्ड नॉनव्हेज आहे".
     'तो' म्हणाला, "कॅन्डललाईट डिनरला प्युअर व्हेज हॉटेल शोधावंच लागेल हा!"
      त्याचा मूड जायला नको म्हणून 'ती' उगाचच हसली. पुन्हा मेनूकार्ड बघायला लागली. सवयीप्रमाणे तिने आधी उजव्या बाजूला नजर टाकली. रेट्स बघून तर तिला आश्चर्यच वाटलं. सगळ्या डिशेसचे रेट जवळपास दुप्पट होते. ती नकळत बोलून गेली, "फार महाग आहे ना हे हॉटेल!"
उत्तरादाखल तो फक्त हसला.
     एव्हाना तिचा मुड पूर्णपणे गेलेला होता. तिने विचारलं, "फारच काळोख वाटतोय ना?"
     "अजून दोन कॅन्डल स्टँड आणायला सांगू का?" त्याने विचारलं.
  ती नजरेनेच नको म्हणाली.
 ऑर्डर घेण्यासाठी वेटर आला.
 तिने विचारलं, "तुमच्या इथे व्हेज नॉनव्हेज किचन वेगळी आहेत का?"
 वेटरने 'सॉरी' म्हणून नकारार्थी मान हलवली.
"मग एकाच किचनमध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत का?" तिने पुढचा प्रश्न विचारला.
वेटर पुन्हा सॉरी म्हणाला .
तिचा चेहरा उतरला.
तिचा उतरलेला चेहरा बघून त्याने वेटरला 'नंतर देतो ऑर्डर' अस खूणेनेच सांगितल.
वेटर निघून गेल्यावर त्याने तिला विचारल, "तू कंफर्टेबल नाहियेस का इथे?" नसशील तर आपण दुसरीकडे जाऊया.”
त्याचा मूड जायला नको म्हणून ती म्हणाली , "नाही, इट्स ओके".
    तेवढ्यात एक वेटर नॉनव्हेज सिझलर आणून बाजूच्या टेबलवर सर्व करू लागला. त्या वासाने तिला मळमळायला लागल. तरिही ती गप्प राहिली; त्याच्यासाठी!
    त्याने मात्र तिच्या नजरेतली उदासी चटकन ओळखली. तो उठून तिला म्हणाला, "चल आपण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया".
    ती काही न बोलता तिथून उठली. दोघ तिथून बाहेर पडली.
गाडीत बसल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.
   'ती' त्याला म्हणाली, "सॉरी पण तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. मला माहितेय तू एवढ छान प्लॅनिंग केलस आणि माझ्यामूळे.....   
  "तूझ्यामूळे काहीही झालं नाही", तिचं बोलणं मध्येच तोडत त्याने शांतपणे तिला समजावलं. तिच्या पाणावलेल्या डोळ्यातून दोन आसवं तिच्या गालावर ओघळली.
तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, "तुझ्यासाठीच केला होता सगळा प्लॅन पण जर तूच कंफर्टेबल नसशील तर काय उपयोग? माझ्यासाठी तूझ खूश होणं महत्वाचं बाकी काही नाही".
    त्यावेळी पहिल्यांदा तिला जाणवलं; 'तो' खरच खूप रोमॅन्टिक आहे. त्या कॅन्डललाईट डिनरपेक्षा हा गाडीतला दोन मिनीटांचा संवाद तिला जास्त रोमॅन्टिक वाटला.
    'ती' काही न बोलताही त्याने तिच्या भावना समजून घेणं हाच तर खरा रोमान्स आहे. हे आता तिला मनोमन पटलेलं होतं.
    'ती' ही कॅन्डललाईट डिनर डेट कधीच विसरू शकणार नाही. कारण फसलेली असली तरी, त्यामुळेच तर ती पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडली होती.

©मानसी जोशी


 





No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...