मुलांचा अभ्यास घेणे आणि घ्यायला लावणे या दोन्ही गोष्टींसाठी विशेष कौशल्याची गरज असते. त्यात अभ्यासाची वेळ संध्याकाळची असेल तर बघायलाच नको.
खेळायला बोलावणारे मित्र मैत्रिणी हाका मारत असतात. त्यात काही प्रश्न एवढे हट्टी असतात की कितीही समजावले तरी कळत नसतात.
खेळ का अभ्यास या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या मुलांसाठी दुष्काळात तेरावा महिना तेव्हा येतो जेव्हा आई अभ्यासाचं कॉन्ट्रॅक्ट बाबांना देते .
‘अभ्यास’ या विषयाशी बाप लेक नाईलाजाने लढत असतात आणि लढाई जिंकण्याचा तो क्षण येतो ….
“अगं, हिच्या वहिवर ‘Incomplete’ चा रिमार्क आहे.”
“बाबा मी वही विसरले होते तेव्हा रफ नोटबुकमध्ये लिहिलंय मी.”
“मग या वहीत का नाही लिहिलंस?”
“विसरले ओ मी आणि आईला माहिती आहे. यासाठी मी आधीच आईकडून ओरडून घेतलंय. आता तुम्ही नका ना परत ओरडू”
“थांब आता पूर्ण वही बघूदे मला.”
“हे काय हिस्ट्री आणि सिव्हिक्स एकाच वहीत का?”
“बाबा टीचारनीच सांगितलं होतं.”
हे संवाद चाललेले असताना सगळं लक्षपूर्वक ऐकणारी पण लॅपटॉपवरून नजरही न हटवणारी आई मनातल्या मनात हसत असते.
आता आपल्याला खेळायला जायला मिळणं कठीण आहे हे लक्षात येऊनही शेवटचा प्रयत्न करावा म्हणून लेक म्हणते, “बाबा बाकीचं जाऊद्या ना उद्या पेपर आहे माझे फक्त दोन प्रश्न राहिलेत तेवढे करून घ्या ना प्लीज.”
“बाकीचं जाऊदे काय ? ही पानं का सोडलेली अशी मध्ये.”
“चुकून सुटली ती”
“काय अक्षर हे? अभ्यास झाला की शुद्धलेखन काढायला बसायचं. आता आपलं खेळायला जाणं कठीण आहे हे लक्षात आलेली कन्या शेवटी ‘ब्रम्हास्त्र’ काढते आणि रडत रडत संवाद तसाच सुरू राहतो.
अखेर या गोंधळात महत्वाचा मुद्दा असणारे दोन प्रश्न बाजूलाच राहातायत हे लक्षात आल्यावर वैतागलेली आई म्हणते , “बाकी सगळं नंतर बघता येईल. तू फक्त तिचे दोन प्रश्न करून घे. उद्या पेपर आहे त्यामुळे आत्ता ते महत्वाचे आहे. ”
“बाकीचं राहूदे काय? तू असं करतेस नेहमी मी तिला बोललो की तिची बाजू घेतेस. मला माझ्या पद्धतीने अभ्यास घेऊ देत नाहीस म्हणून मी घेत नाही तिचा अभ्यास.”
“माझं चुकलं म्हणून मी तुला तिचा अभ्यास घ्यायला सांगितला. मी घेते तिचे प्रश्न करून.”
तिच्या या उत्तरावर मनातून खुश झालेला पण चेहऱ्यावर चिडल्याचे भाव आणणारा #हेड_ऑफ_द फॅमिली, “ठीक आहे, तूच घे तिचा अभ्यास” असं म्हणत मान हलवतो.
बाजूला बसलेली लेक मनातून खुश होऊनही चेहऱ्यावर रडण्याचे भाव आणून सहानुभूतीच्या आशेने आईकडे बघते.
आणि या दोघांचीही नौटंकी माहिती असणारी पण तसं न दर्शवणारी #नेक_ऑफ_द फॅमिली पुन्हा टीचरच्या रोलमध्ये शिरते.
©मानसी जोशी