Tuesday, 26 September 2017

धोनी आणि पसारे

मुलांचे पसारे ही  समस्त आयांची एक मोठी समस्या आहे. कितीही वेळा सांगितल तरी पसारे करतातच. साम, दाम, दंड, भेद कशाचाच उपयोग होत नाही. माझ्या लेकीने एके दिवशी मात्र शहाण्या मुलीसारखं वागून पसारा आवरुन ठेवला. संध्याकाळी मला म्हणाली, "आई बघ मी सगळी वह्यापुस्तकं आवरुन ठेवली." मी कामात होते कामं करता करता very good म्हणून पुन्हा कामात गर्क झाले. तर वैतागून म्हणाली तुला माझं कौतुकच नाही. मला वाटलं होतं तू माझं कौतुक करशील ......."
      "अगं म्हटलं ना very good." आणि एवढं विशेष काय केलस तू ? आपलं सामान आपण आवरुन ठेवायचच असतं. त्यात कौतुक कसलं करायचं ? कामच आहे तुझं ते. आवरुन ठेवत नाहीस हे विशेष असतं." मी वैतागून म्हणाले.
        या प्रसंगाला खूप महिने होऊन गेले. मी तर विसरुनही गेले होते सगळं. एक दिवस आम्ही घरी क्रिकेट मॅच बघत होतो. कुठली सिरिज ते आठवत नाही पण तेव्हा धोनी कॅप्टन होता. धडाधड विकेट पडत होत्या. मॅच जवळपास हातातून गेल्यातच जमा होती. अशातच धोनी खेळायला आला. सुसाट फलंदाजी करत त्याने मॅचमध्ये पुन्हा जीव आणला आणि आपण ती मॅच जिंकलो. मी सहज म्हटलं, "धोनी खरच खूप ग्रेट आहे ना. कसला खेळला आज. अगदी कॅप्टनशीपला साजेशी खेळी खेळला."
     माझं बोलणं ऐकून बाजूलाच बसलेली माझी लेक म्हणाली, "आई त्यात विशेष काय आहे ? तो कॅप्टन आहे. त्याने आज खेळायलाच हवं होतं. त्याचं कामच आहे ते. तो खेळला नसता तर विशेष होतं. तूच  म्हणतेस ना आपलं काम आपण करायचच असतं. त्यात कौतुक करण्यासारखं काहीच नसतं. "
          हे ऐकून आम्ही सगळीजणं खूप हसलो. 'मेरी बिल्ली मुझेही म्याव' असं म्हणत लेकीला जवळ घेतलं आणि त्या दिवशी मात्र मी मनापासून लेकीचं कौतुक केलं.

©मानसी जोशी

Sunday, 17 September 2017

आठवणींचे पान उलगडताना

काल ATM बाहेर रांगेत उभी होते. बाजूला कॉलेजला एक ग्रूप गप्पा मारत उभा होता. त्यातला एक मुलगा आपल्या मोबाईलमधले फोटो बाकीच्यांना दाखवत होता. सहज त्यांच्यातला संवाद कानावर पडला.
"हा बघ "तिचा" लेटेस्ट DP. कसली सुंदर दिसते ना. पिंक कलर सूट करतो तिला"
 "अरे तू तर तिच्या फोटोंचा फोल्डरच केलायस. घरी कोणी बघितलं तर फुकट मरशील" ग्रूपमधला एकजण त्याला म्हणाला.
   "अरे काय येडा आहे का मी गॅलरीला पासवर्ड ठेवलाय. एकदा कॅम्पस मधून सिलेक्शन होवूदे मग प्रपोज करणार तिला." तो मुलगा हसत म्हणाला.
      त्या ग्रूपमधला हा संवाद ऐकून मला हसायला आलं आणि कॉलेजमधला एक किस्सा आठवला.
     तेव्हा कॉलेजचे डेज चालू होते. त्या दिवशी 'सारी डे' होता. त्यामुळे मी कॉलेजला कॅमेरा नेला होता. आमच्या वर्गातला एक मुलगा माझ्याजवळ येउन मला म्हणाला, "ए   'ती' मैत्रीण आहे ना तुझी. मला प्लीज तिचा एक फोटो काढून दे ना.
     यावर मी म्हणाले, "अरे मैत्रीण वगैरे नाही पण ओळखतो आम्ही एकमेकींना.पण असा फोटो काढायचा म्हणजे...
    "Please फक्त एवढं एक काम कर ना. Don't worry मी misuse नाही करणार. मी खरच खूप सिरिअस आहे तिच्या बाबतीत." माझा मित्र म्हणाला.
   "अरे एवढं आहे तर मग विचारत का नाहीस तिला? मी
   "अगं कुठल्या बेसवर विचारणार? मी स्वतः एक पैसा पण कमवत नाही. आणि पुढचं पुढे बघू."
    नंतर मी त्याला तिचा फोटो काढून दिला. तेव्हा कॅमेरा रोल डेव्हलप करायला लागत असत. तिच्या फोटोसाठी रोल डेव्हलप करुन आणायचं माझं कामही त्याने केलं.
   मनात आलं आज सोशल मिडीआमूळे सगळं किती सहज सोपं झालय. एक फोन नंबर असला किवा फेसबूक , इन्स्टाग्रामवर जॉइन असलं की झालं. असं फोटो मिळविण्यासाठी कोणाला विनवण्या करायला लागत नाहीत. पण असं असल तरी त्यावेळची मजा काही वेगळीच होती.
©मानसी जोशी

Thursday, 14 September 2017

डोरेमॉन

डोरेमॉन! अनेकांचे आवडते कार्टून. माझ्या लेकीलाही डोरेमॉन प्रचंड आवडतं. मध्यंतरी आमच्याकडे Disney चॅनल लागायचं अचानक बंद झालं होतं. मी मनातून देवाचे आभार मानले होते. पण लेकीच्या हट्टामुळे  दिवाळीच्या सुट्टीत कस्टमर केअरला कॉल करुन ते पुन्हा चालू केले. लेक खूश झाली. सगळं व्यवस्थित सुरु होतं पण प्रॉब्लेम तेव्हा निर्माण झाला जेव्हा लेकीच्या वहीवर 'Homework not done' आणि 'Notebook incomplete' हे दोन्ही रिमार्क्स एकाच दिवशी आले.  यासाठी डोरेमॉनच जबाबदार असल्याची मला खात्री होती म्हणूनच मी रागारागात Disney चॅनेल बंद करण्यासाठी कस्टमर केअरला फोन लावला . या कस्टमर  केअर वाल्यांचा काय प्रॉब्लेम असतो कळत नाही; तुम्ही भाषा कुठलीही सिलेक्ट करा ते तुमच्याशी हिंदीमध्येच बोलायला सुरुवात करतात. मी माझ्या तोडक्या मोडक्या गावठी हिंदी भाषेत त्यांना Disney चॅनेल बंद करायची विनंती केली.
    "मॅम बहोतही अच्छा चॅनेल हैं आप क्यों बंद करना चाहती हो? इसपर बच्चोंके लिए कितने अच्छे अच्छे प्रोग्रॅम्स होते हैं प्रती महिना सिर्फ 18 रुपये कट होते हैं आपके अकाउंटमेसे........." कस्टमर केअरवाला मला समजवायचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
      "अच्छा हैं इसलिए तो बंद करना हैं| अभी एक्झॅम्स सरपर हैं , बच्चे सारा दिन टिव्ही देखते रहेंगे तो पढाई कब करेंगे ? और आप मुझे समझानेकी कोशिश ना ही करो तो  बेहतर हैं| मै आपको बोल रही हूँ चॅनेल बंद करना हैं तो बंद करना हैं | ( रागारागात फाडफाड इंग्लिश बोलतात तसं मी फाडफाड हिंदी बोलले.)
     कस्टमर केअरवल्या त्या मुलाने माझ्या बोलण्यावरून योग्य  तो अंदाज बांधून चॅनेल बंद करण्याची रिक्वेस्ट फॉरवर्ड केली आणि दहा मिनिटात चॅनेल बंद होइल अस सांगितलं. अर्थात या प्रकारानंतर लेक मनातून माझ्यावर प्रचंड चिडली होती.
     हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे, D2h वाल्यांनी Disney चॅनेल पुन्हा बेसिक पॅकमध्ये इनक्लूड केल्याचा साक्षात्कार परवाच माझ्या लेकीला झाला.त्यामुळे  मी फोन करुन चॅनेल बंद करु शकत नसल्याचा आसुरी आनंद सद्ध्या लेकीच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहतोय.
©मानसी जोशी

Wednesday, 6 September 2017

एक जगावेगळी प्रेमकहाणी

एक जगावेगळी प्रेमकहाणी

ती आज खूपच छान दिसत होती. तशी ती नेहमीच छान दिसते पण आज तो तिला पहिल्यांदा साडीमध्ये बघत होता.  लंच ब्रेक संपता संपता तिला एकटीला बघून तो तिच्या समोर आला आणि तिला म्हणाला, "आज खूप छान दिसतेयस.
 ती हसून "थॅंक्स" म्हणाली.
तो म्हणाला, "तू आवडतेस मला खूप, I really love you very much"
त्याच्या या वाक्यावर ती म्हणाली, "अरे काहीतरीच काय बोलतोयस ? इतकं पण फ्लर्ट करु नकोस माझ्याशी.
"फ्लर्ट  करत नाहीये मी, अगदी मनापासून सांगतोय. तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच आवडली होतीस तू. तुझ्या  मोहक हसण्याची भूरळ पडली होती मला. नंतर तुझ्याशी ओळख झाली, आपली मैत्री झाली आणि तू मला समजत गेलीस. तू जितकी जास्त समजत गेलीस तितकीच मला आवडत गेलीस. तू सुंदर तर आहेसच पण तेवढीच हुशार आणि समजूतदारही आहेस.जेवढी विचारी तेवढीच निरागस आहेस. थोडी इमोशनल आहेस पण तेवढीच खट्याळपण आहेस. कुठे थांबायचं हे तुला बरोबर कळतं.  Beauty with brain च एक परिपूर्ण उदाहरण आहेस तू." तो हे सगळं अगदी सहज सांगत होता तिला.
        ती मात्र गप्प होती. हे सगळं तिच्यासाठी अनपेक्षित होतं. तरीही स्वतःला सावरत ती म्हणाली, तू काय बोलतोयस हे ? मी मॅरीड आहे आणि एका आठ वर्षाच्या मुलीची आईसुद्धा आहे.
   "मग काय झालं ? मॅरीड आहेस म्हणजे कोणाला आवडू नयेस असा नियम आहे का? प्रेम फक्त लग्न या एकमेव उद्देशानेच करतात का ग ? एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिच्यावर प्रेम करणं  आणि लग्नासाठी प्रेम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ग. तुझं सौंदर्य, तुझं व्यक्तिमत्त्व  यावर अगदी निरपेक्ष प्रेम करतो मी.
"अरे पण ....", ती
"हा 'पण' खटकतो ग मला खूप. मला आवडलं असतं रे लेट नाईट मूव्हीला यायला पण..... मुलगी झोपणार नाही माझ्याशिवाय. पावसात भिजायला खूप आवडतं पण.... लोकं  काय म्हणतील? पबमध्ये आले असते मी पण ... नातेवाईक काय म्हणतील ? मला खूप आवडतात वेस्टर्न ड्रेस घालायला पण...... सासू सासऱ्याना आवडले नाहीत तर ? मला डान्सच्या क्लासला जायचं होतं मनापासून पण.... बाबांना नसतं आवडलं. असे कितीतरी 'पण' तू मनात पक्के बांधून ठेवले आहेस. अगं किती दिवस असं मन मारुन जगणार आहेस? निदान कधीतरी स्वतःसाठी जगून बघ. अगदी थोडीशी का होईना मनमानी  करायला शिक. नेहमी नको करुस पण निदान एखाद्या वेळी तरी स्वतःचा विचार कर. स्वतःवर थोडसं प्रेम कर. तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. तू जर ठरवलस ना तर नाही अडवणार तो तुला. करेल ॲडजस्ट तुझ्यासाठी. फक्त तू या कोषातून बाहेर ये. हा 'पण ...' बाजूला ठेव. बस बाकी मला काही नको. तुझ्यावर दुरुनच प्रेम करतो मी आणि तसच प्रेम करायला आवडतं मला." एवढं सगळं एका दमात बोलून 'तो' जायला निघाला.
 "एक मिनिट थांब",  ती
'तो' गोड हसून म्हणाला, "बोल ! एक  मिनिट कशाला? तू म्हणशील तितका वेळ थांबतो मी. फक्त  तू मोकळेपणाने बोल."
  "मला  पण आवडतोस तू. तुझ्या गालावर पडणारी खळी आवडते. तुझ्याशी बोलायला आवडतं.  तुझं फ्लर्ट करणं आवडतं. तू नेहमी माझी तारीफ करतोस ते  आवडतं आणि माझी चेष्टा करतोस ते सुद्धा आवडतं. तुझं बिनधास्तपणे मनातल्या गोष्टी सांगणं आवडतं आणि सगळ्यांसमोर मला सांभाळून घेणं पण आवडतं मला. पण......"ती.
   आता हा 'पण'.... नको ना प्लीज. एवढं छान मनमोकळं बोलल्यावर आता कुठलाही 'पण.....' नको. जे तुला सांगायच आहे ते मला माहिती आहे. फक्त ते आत्ता ऐकायचं नाही मला. मूळात त्याची गरजच नाही. मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे तुझ्या नवऱ्यावर. अगं माझ्याबद्दल तुला जे वाटतं ते  बोलून तू त्याच्याशी प्रतारणा नाही ग  केलीस. आपण ज्याच्याशी कमिटेड असतो तो आपल्याला आवडतोच पण म्हणून जो आवडतो त्या प्रत्येकाशी आपण कमिटेड तर नाही होत ना. काय कळतय का काही?" तो
       तिने हसून मान हलवली आणि त्याला म्हणाली, "आयुष्याच्या या वळणावर तुझ्यासारखं कोणी  भेटेल असं  मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तू मला जगण्याचा नवा दृष्टीकोन दिलास  आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवलस. तू खरच खूप छान आहेस. तुझ्यामुळेच मी मनमोकळं बोलायला शिकले आणि...
   "आणि खूप काही सांगायचं आहे तुला पण.. आता लंच ब्रेक संपत आलाय त्यामुळे आपल्याला इथून निघावं लागणार आहे." त्याच्या या वाक्यावर दोघही मनमोकळं हसली.
©मानसी जोशी
फोटो - गूगलवरून साभार



 

Friday, 1 September 2017

कथा - कोल्ड कॉफी

कोल्ड कॉफी
 बाहेर मुसळधार पाऊस पडत होता.   खिडकीत उभं राहून 'ती' उदासपणे  बघत होती. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली   आणि अंगावर उडालेले  पावसाचे  थेंब  त्याच्या आठवणी घेऊन आल्या. "किती वर्ष झाली.... कुठे आहेस तू आता.. आज खूप आठवण येतेय तुझी .... " त्याच्या आठवणींनी ती एकदमच भावूक होते.
   "अनू, कॉफी प्लीज ! मस्त पाऊस पडतोय!" नवऱ्याच्या आवाजाने ती भानावर येते. खूप मुश्किलीने ती स्वतःला त्याच्या आठवणींपासून दूर करायचा प्रयत्न करते.
   "काही झालय का? अशी उदास का दिसतेयस?" नवरा विचारतो.
   "नाही ! काही नाही. सहजच. मी कॉफी करुन आणते". असं म्हणून ती किचनमध्ये निघून जाते.
      तो खिडकीजवळच्या खूर्चीत बसणार तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक त्याच्या अंगावर येते  आणि पावसाचे  काही थेंब त्याच्या अंगावर उडतात. तो खिडकी बंद करायला खिडकीजवळ जातो. बाहेर मुसळधार पडणारा पाऊस बघून त्याला 'ती' आठवते. अशाच मुसळधार पावसात चिंब भिजलेली 'ती’. पाऊस आवडत नाही असं  म्हणणारी आणि पाऊस थांबल्यानंतर बाईकवरुन फिरायला जाऊया म्हणून हट्ट करणारी 'ती'.  पावसात चिंब भिजल्यावर चहा किंवा कॉफी न पिता कोल्ड कॉफीच पिणारी  आणि त्यालाही आवर्जून कोल्ड कॉफी  प्यायला लावणारी 'ती'. तिच्या आठवणींनी त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं आणि कामाचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो.
     " विहान, कॉफी ! कुठे हरवलास ? दोनदा हाक मारली मी तुला." ती
    "या मुसळधार पावसात  एका मुलीला शोधत होतो मी. पण तिला शोधता शोधता मी स्वतःच हरवलो." तो
    "काय वेड्यासारखं बोलतोयस? गरमागरम कॉफी घे बरं वाटेल तुला", ती.
   "गरमागरम कॉफी ? एवढा मुसळधार पाऊस पडतोय, मला वाटलं कोल्ड कॉफी करशील तू." त्याच्या या वाक्याबरोबर ती चमकून त्याच्याकडे बघते. तिच्या डोळ्यात पाणी दाटतं. क्षणभर काय बोलावं तिला काहीच कळत नाही. ती चटकन जाऊन त्याला मिठी मारते. आणि रडतच म्हणते,  "तू आता पुन्हा हरवू नकोस हा.."
    "अरे, ती मुलगी सापडली की मला! आता पाऊस थांबल्यावर तिला घेऊन मस्तपैकी बाईकवरुन लॉंग ड्राइव्ह आणि मग पुन्हा पाऊस आल्यावर तिच्यासोबत चिंब भिजून कोल्ड कॉफी... कसं वाटतय प्लॅनिंग?" तो तिच्या केसातून  हात फिरवत तिला विचारतो.
     ती त्याच्याकडे बघून गोड हसते. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक येते; पावसाचे काही थेंब दोघांच्याही अंगावर उडतात आणि बाहेरचा पाऊस बघून दोघही मनमोकळी हसतात.
©मानसी जोशी
फोटो- गूगलवरून साभार

 
 
 



Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...