Monday, 31 July 2017

सुप्रभात

सुप्रभात
आजची सुप्रभात जरा खास आहे. आज एक तारीख! इंग्रजी कॅलेंडरनुसार आज ऑगस्ट महिना सुरु झाला. २०१७ सालातले  सात महिने संपले. ऑगस्ट या शब्दाचं   'डिक्शनरी मिनिंग' आहे 'respected and impressive'. तर असा हा सुंदर अर्थ असणाऱ्या ऑगस्ट महिन्याचा  आज पहिला दिवस. श्रावणातले बरेचसे सण बहुतांश वेळा ऑगस्टमध्येच येतात. पावसाचा जोर ओसरलेला असतो. अधूनमधून सूर्यनारायणही दर्शन देउ लागलेले असतात. सृष्टीने जणू हिरवी शाल पांघरलेली असते. रक्षाबंधन, नारळी पोर्णिमा, गोकुळाष्टमी अशा सणांचा महिना म्हणजे ऑगस्ट असं एक  समीकरण लहानपणी माझ्या मनात पक्क झालं होतं. जूनमध्ये शाळा सुरु झाल्यानंतर जवळपास दोन महिने, रविवार सोडून क्वचितच एखादी सुट्टी मिळत असे. पण ऑगस्ट महिन्यात मात्र भरपूर सुट्ट्या मिळायच्या म्हणून  लहानपणी मला हा महिना  खूप आवडायचा.
    आजकालच्या मुलांना  ऑगस्ट म्हटलं की फ्रेंडशिप डे आठवतो. पण मी शाळेत/ कॉलेजला असताना 'फ्रेंडशिप डे' हा प्रकारच मला माहिती नव्हता. त्यावेळी आकर्षण असायचं ते वेगवेगळ्या सणांच. तेव्हा सणही आजच्यासारखे साजरे होत नसत. रक्षाबंधनाच्या  दिवशी भाऊ बहिणींना  कॅडबरी वगैरे काही देत नसत. त्यामुळे रक्षाबंधनचं विशेष असं आकर्षण नव्हतं. पण नारळी पोर्णिमेचं मात्र खास  आकर्षण वाटायचं. कारण पाऊस सुरु झाल्यानंतर आमचं समुद्रावर जाणं बंद झालेलं असे. पण नारळी पोर्णिमेच्या दिवशी मात्र पाऊस असला तरी समुद्रावर जायची परवानगी मिळायची. खवळलेला समुद्र, फेसाळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांवर तरंगणारे नारळ हे सारं बघण्याची  मजा काही वेगळीच असायची.
     आमच्या गावात एक कृष्णाचं देऊळ होतं. दरवर्षी तिथे गोकुळाष्टमीचा उत्सव असायचा. दिवसभर तिथे वेगवेगळे कार्यक्रम असायचे. दुपारनंतर देवळाबाहेरच्या अंगणात वेगवेगळे खेळ खेळले जायचे आणि नंतर प्रसाद म्हणून डीशभरुन दही पोहे वाटले जायचे. एरवी दही पोहे कधी विशेष आवडायचे नाहीत पण उत्सवाच्या दिवशी  प्रसादाचे  दही पोहे मात्र दोन वेळा घेऊन खात असे. आजही त्या दही पोह्यांची चव जि‍भेवर रेंगाळतेय.  १५ ऑगस्टची स्वातंत्र्यदिनाची सुट्टी  आणि १७ तारखेची पारशी नववर्ष दिनाची सुट्टी या दोन्ही सुट्ट्या जवळपास जोडून येतात. शाळेत असताना मात्र  १५ ऑगस्टला सुट्टी असूनही झेंडा वंदनासाठी  शाळेत जावं लागत असे. १५ ऑगस्ट म्हटलं की आठवते ती या स्वातंत्र्यदिनाच्या  कार्यक्रमांसाठी  शाळेत पंधरा दिवस  आधी सुरु होणारी कवायतींची आणि लेझीमची प्रॅक्टिस. ग्राऊंडवर बऱ्याच ठिकाणी चिखल साठलेला असायचा पण तरीही त्याची पर्वा न करता आमची प्रॅक्टिस चालू असायची.  एक वेगळाच उत्साह संचारलेला असायचा तेव्हा. त्यावेळी ग्राउंडवर प्रॅक्टिस करताना चिखलाची घाण वाटत नसे. तेव्हा हायजीन वगैरे संकल्पनांपासून कोसो दूर होते मी. म्हणूनच असेल कदाचित तेव्हा हे सगळं खूप छान एंजॉय करता आलं. आता मात्र सगळेच संदर्भ बदलले आहेत.
     दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ऑगस्टमध्ये सण आणि सुट्ट्या भरपूर आहेत आणि विशेष  म्हणजे  एरवी सप्टेंबरमध्ये येणाऱ्या गणरायांचं आगमनही याच महिन्यात होत आहे. त्यामुळे आधीच मंगलमय झालेल्या  या  महिन्याची प्रत्येक सकाळ मंगलमय होवो, ही सदिच्छा!
©मानसी जोशी
०१/०८/२०१७
 

Sunday, 30 July 2017

आजोबा - बालपणीची एक आठवण

"प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भूपाळी म्हणती"

    लहान असताना माझी सकाळ बऱ्याचदा या अशा सुरेल  गाण्यांनी व्हायची. रेडिओवर एकापेक्षा एक सरस गाणी चालू  असायची. बाबा  अंगणात पेपर वाचत बसलेले असायचे. आई किचनमध्ये पोळ्या करत असायची. आई पोळ्या करायला लागली कि लगेच आमच्याकडच्या मनीमाऊला कसं कळायचं कुणास ठावूक? पण ती  कुठेही असली तरी पळत घरात यायची आणि   'म्याव म्याव' करत आईच्या पायाजवळ घुटमळायची.  आईने गरमगरम पोळी तिला तुकडे करुन घातली कि ती खाऊन मिटक्या मारत बाहेर जायची. तेव्हा आम्ही रत्नागिरीजवळच्या कोतवडे या गावात रहात होतो.आई तिथल्याच शाळेत शिक्षिका होती त्यामुळे बालपणाचा बराचसा काळ या गावात घालवला आहे. आमच्या घराजवळच रहाणारे एक आजोबा रोज न चुकता आमच्याकडे चहा प्यायला यायचे. पु. ल. देशपांडेंच्या अंतू बर्वा या व्यक्तिरेखेशी बरचसं साधर्म्य असलेले हे आजोबा तिथले खोत म्हणून प्रसिद्ध होते. निटसं आठवत नाही पण या आजोबांना बहुदा मुलबाळ कोणीही नव्हत. एक पुतण्या होता पण तो ही मुंबईला  रहायचा. एका मोठ्या घरात ते एकटेच रहायचे.घर कसलं मोठा वाडाच होता तो. त्यांच्या घराजवळ दोन विहिरी होत्या. त्यातल्या एका विहिरीवर वाडीतली लोकं पाणी भरण्यासाठी जात असत. दिवसभर या विहिरीवर पाणी भरायला येणाऱ्या माणसांशी गप्पा मारण्यातच आजोबांचा वेळ जायचा. गावात त्यांना बऱ्यापैकी मान होता. या आजोबांना चहासोबत  पेपर लागायचा. त्यामुळे आजोबा यायच्या आधी बाबा घाईघाईने पेपर वाचून घ्यायचे. कारण आजोबा एकदा पेपर  वाचायला बसले की मग ते  जवळपास अर्धा पाऊण तास पेपर वाचत बसायचे. वाचता वाचता प्रत्येक बातमीवर मार्मिक टिपणी असायची. पेपर वाचून झाला कि मग एखादी गरमागरम पोळी खाऊन ते आपल्या घरी जायचे. क्वचित कधी पेपरवाल्याला उशीर झाला आणि आजोबा आलेले असले की मग ते त्या पेपरवाल्याची 'अंतूबर्वा' स्टाइलमध्ये उलटतपासणी घेत असत. अर्थात त्यांना ना पेपरवाल्याने  कधी  उलट उत्तर दिलं ना बाबांनी . हे आजोबा रोज घरी यायचे पण  याबद्दल कधी आई बाबांनी तक्रार केल्याचं आठवत नाही. उलट एखाद्या दिवशी आजोबा आले नाहीत किंवा त्यांना यायला  उशीर झाला तर आईला काळजी वाटायची. बाबाही मग म्हणायचे 'थोडा वेळ वाट बघूया नाहीतर जाऊन येतो त्यांच्या घरी'. आमच्या घरातलेच होवून गेले होते ते एक. कधी ते आजारी असले कि मग आई त्यांच्यासाठी जेवणाचा डबा द्यायची. कधीतरी त्यांना गरम मसाल्याची आमटी खायची लहर यायची.  संध्याकाळी आई शाळेतून येताना दिसली की लगेच पुढे होवून तिला सांगायचे, 'सूनबाई, चुलीत कांदे टाकलेत हो भाजायला....’ त्यांच्या या वाक्यावरुन आई समजून जायची 'आज गरम मसाल्याची आमटी करायचा बेत आहे'.
      काही कारणांनी नंतर आम्ही घर बदललं. आम्ही जाताना आजोबांचे डोळे पाणावले होते. आजोबांचं  सकाळी येणं बंद झालं असलं  तरीही ऋणानुबंध संपले नाहीत. आईने कधी भजी , थालीपीठ असले काही खास  पदार्थ केले की आठवणीने त्यांना डबा पाठवून द्यायची. अधूनमधून ते ही आमच्याकडे येत असत.येताना आठवणीने आमच्यासाठी चणे शेंगदाणे किंवा लिमलेटच्या गोळ्या आणायचे.हळूहळू वयोमानानुसार त्यांचं बाहेर फिरणं कमी झालं. नंतर आम्हीही रत्नागिरीला शिफ्ट झाल्यामुळे फारसा संपर्कही उरला नाही. हे आजोबा ना आमच्या नात्याचे ना गोत्याचे पण तरीही त्यांच एक वेगळच नातं जुळलं होतं आमच्या घराशी . काही माणसांशी कुठलंही नातं नसतं पण त्यांच्याशी कुणास ठावूक कसे पण छान ऋणानुबंध जुळतात. जगाच्या पाठीवर  कुठेही गेलं तरी या माणसांच्या आठवणी नेहमी आपल्या स्मरणात रहातात.

©मानसी जोशी
३१/०७/२०१७

फोटो: गुगलवरून साभार

Wednesday, 26 July 2017

आयुष्य हे....

एखाद्या शांत निवांत संध्याकाळी नुकताच  पाऊस पडून गेलेला असताना, छान उन यावं आणि आकाशात उमटलेल्या विविध छटा बघत निवांतपणे वाफाळणाऱ्या कॉफीचा आस्वाद घेत आपल्या आवडीची गाणी ऐकत बसावं .... सगळं अगदी जुळून येतं पण तेवढ्यात कर्णकर्कश आवाजात बेल वाजते. 'आज कोणी नाही खेळायला' किंवा माझं xxxx शी भांडण झालं मी नाही जाणार आता खेळायला...' असं म्हणत आपल्या लेकराचं घरी आगमन होतं. मग मूड गेलेल्या आपल्या लेकराला समजावेपर्यंत आपला मूड बदललेला असतो.
       एखाद्या निवांत दुपारी खूप वर्षांपासून बघायचा राहिलेला एखादा चित्रपट  टीव्हीवर लागतो. आपण अगदी आनंदाने तो  बघत असतो. पण चित्रपट इंटरेस्टींग वळणावर येतो  आणि नेमके लाईट जातात.
     एखाद्या सुट्टीच्या दिवशी वाटतं आरामात उशीरा उठावं. घडाळ्याच्या काट्यावर नाही तर आपल्या मर्जीवर आजच्या दिवसभराचं शेड्युल ठरवावं पण त्या दिवशी नेमका  कामवाली बाई लवकर येणार असल्याचा फोन करते आणि मग आपल्या मर्जीप्रमाणे नाही तर तिच्या वेळेनुसार सगळी कामं ॲडजस्ट करावी लागतात.
     कधीतरी एखाद्या जुन्या मैत्रीणीचा फोन येतो. खूप काही बोलायचं असतं पण  मुलांना क्लासला सोडायला जायचं असल्यामुळे नाईलाजाने फोन लवकर ठेवावा लागतो.
     एखाद्या दिवशी वाटतं फार काही स्वयंपाक करुच नये. नुसती मुगातांदूळाची खिचडी करावी. पण नेमका त्याच दिवशी कोणीतरी पाहुणे येणार असल्याचा फोन येतो आणि मग सगळा साग्रसंगीत स्वयंपाक करावा लागतो.
    एखाद्या दिवशी  मात्र दिवसभराच्या दगदगीनंतर संध्याकाळच्या कामाची उजळणी करत आपण घरी येतो तेव्हा अचानक नवरा सांगतो, 'आज बाहेर जाऊया जेवायला. तू तुझं आवर पटकन. आज मी लवकर आलो तर  घरातली कामं आवरुन ठेवली सगळी." तेवढ्यात  मुलं पटकन पुढे येतात आणि सांगतात, 'आई, आज सगळा होमवर्क कंप्लीट आहे.'
   एखाद्या सुट्टीच्या दिवशी  सकाळी आपल्याला जरा उशीराच  जाग येते. 'अरे बापरे ! उशीर झाला असं म्हणून चटकन उठून किचनमध्ये जावं तर नवरा चक्क चहा करत असतो आणि लेकीला मदतीला घेऊन ब्रेकफास्टची तयारी चालू असते.    
      एखाद्या वैतागलेल्या दुपारी नवरा अचानक घरी येतो आणि येताना एखाद्या रोमॅन्टिक फिल्मची तिकीटं घेऊन येतो आणि मग अनपेक्षीतपणे रेंगाळलेली दुपारही अगदी रोमॅन्टिक होवून जाते.
      कसं  असतं ना आपलं आयुष्य?  आपण ठरवतो एक आणि घडतं भलतच. अपेक्षा नसतानाही खूप काही मिळून जातं तर कधी अनपेक्षित घटनांनाही तोंड द्यावं लागतं. हे सगळं अगदी सहज घडत असतं.  हिच तर खरी मजा असते जगण्यातली.

©मानसी जोशी

   

Monday, 24 July 2017

कथा - तिच काय चुकलं

तिच काय चुकलं?

त्या दिवशी तो जरा रागारागातच घरी आला. हातातली बॅग भिरकावून दिली आणि तिला  जोरजोरात हाका मारु लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून त्याचे आई बाबा हॉलमध्ये आले. नक्की  काय झालं ते कोणालाच कळेना. एरवी शांत असणारा तो आज एवढा का चिडला असेल? "ती आली नाही अजून ऑफिसमधून." त्याच्या आईने शांतपणे  सांगितले.
   तेवढ्यात ती आली. तिला बघून त्याचे आई वडील एकदम शांत झाले. घरातलं एकंदरीत वातावरण बघून काहीतरी बिनसलं आहे याची जाणीव तिला झाली.तिला बघून तो काही बोलणार इतक्यात तिने विचारलं, "मला बघून सगळे एकदम शांत का झालात ? काय झालं ?
  "काय झालं ? सगळं करुन सवरुन असं निर्लज्जपणे विचारताना लाज नाही वाटत तुला ? का फसवणूक केलीस माझी? काय कमी होती माझ्या प्रेमात म्हणून असा विश्वासघात केलास माझा ?" तो रागारागाने म्हणाला.
   "जे काही बोलायचं  आहे ते स्पष्टपणे बोलशील प्लीज ?" ती शांत शब्दात म्हणाली.
     "आज दुपारी तुझ्या ऑफिसच्या समोरच्या ऑफिसमध्ये एका मिटिंगसाठी आलो होतो. तिथून निघेपर्यंत दिड वाजून गेला.  विचार केला तुझाही लंच ब्रेक झाला असेल शक्य असेल तर  दोघं एकत्रच जाऊ लंचला.खरं तर मी तुला फोनच करणार होतो पण नंतर विचार केला तुला  सरप्राईज  द्यावं. पण खरं सरप्राईज तर मला मिळालं. तुझ्या ऑफिसमध्ये आलो तेव्हा ..... तू ....मी  स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तुला तुझ्या त्या बॉसच्या मिठीत......" बोलता बोलता त्याचा  स्वर कापरा झाला. त्याच्या मनात प्रचंड राग आणि  दु:ख या दोन्ही भावना एकाचवेळी दाटून आल्या होत्या.
  त्याचं बोलणं ऐकून ती दुखावली पण तितक्याच खंबीरपणे त्याला म्हणाली, " तू इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विचार करशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. कुठलाही विचार न करता थेट निष्कर्षापर्यंत पोचलास तू ? प्रत्येक वेळी जे डोळ्यांना दिसतं तेच खरं नसतं. तुला माहिती आहे आज ऑफिसमध्ये काय झालं ते? आज ऑफिसमध्ये प्रमोशन लिस्ट डिक्लेअर केली गेली. सरांनी त्यांच्या सख्ख्या भावाला  त्याच्या पोस्टवरुन हटवून  त्या जागी मला प्रमोशन दिलं. या गोष्टीचा त्याला प्रचंड राग आला. त्याने लंच ब्रेकच्या आसपास  हॅन्डओव्हरच्या प्रोसेसबद्दल डिस्कस करण्यासाठी मला त्याच्या केबिनमध्ये  बोलावलं . एकएक मुद्दे वाढवून मुद्दाम उशीर केला. सगळा स्टाफ लंचसाठी कॅन्टिनमध्ये गेल्याची खात्री झाल्यावर त्याने माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याचवेळी सर  केबिनमध्ये आले आणि त्यांच्यामुळे माझी सुटका झाली. झालेल्या प्रकाराने मी खूप घाबरले होते. सरांनी मला आधार दिला. घडलं काहीच नव्हतं खरं तर  पण जर काही घडलं असतं तर या विचाराने धास्तावलेल्या मला जवळ घेऊन त्यांनी मला समजावलं. माझं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला. यात कुठलीही वासना नव्हती रे, होती ती फक्त आपुलकी. त्या क्षणी सरांनी मला मित्रत्वाच्या नात्याने  आधार दिला. आणि हो मित्रत्वाच्या नात्यानेच! उगाच मानलेला भाऊ वगैरे लेबल लावायला नाही आवडत मला. त्यावेळी मला सगळ्यात जास्त गरज तुझी होती. तू तिथे आलाही होतास पण मला आधार नाही देउ शकलास. का ? कारण मला आणि सरांना एकत्र बघून तुझा पुरुषी इगो दुखावला गेला आणि तू गैरसमज करुन घेउन तिथून निघून गेलास.
        मला एक सांग हेच जर तू मला एखाद्या मैत्रीणीबरोबर बघितलं असतस तर खटकलं असतं तुला ? खात्रीने सांगते ; नसतं खटकलं. कधी बदलणार ही मानसिकता? एक स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या जवळ आहेत;  मिठीत आहेत म्हणजे त्यांच्यात फक्त रोमान्स चालू आहे? बाकी कुठला अर्थ असूच शकत नाही का ? स्पर्श हा भावनांशी  निगडीत असतो; शरीराशी नाही. म्हणूनच प्रत्येक स्पर्शाचा अर्थ आपल्याला कळतो, जाणवतो. शारीरिक स्पर्श हा भावना पोचविण्याचे एक माध्यम असतं फक्त.  आपुलकीच्या मायेच्या स्पर्शाने दु:ख हलकं होतं. हळूवार हव्याहव्याशा वाटणाच्या स्पर्शाने मन मोहरुन जातं. वासनेने बरबटलेल्या स्पर्शाचा किळस वाटतो. सहज झालेला स्पर्श आणि सहेतूक केलेला स्पर्श अगदी लहान मुलांनाही कळतो. पण बघणाऱ्याचा दृष्टीकोन कोण ठरवणार? मला नाही वाटत माझ्याकडून काही चूक झाली आहे. चूक तर तुझी झाली आहे; मला समजून घेण्यात. अगदी सहज माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून मोकळा झालास. एक क्षणही माझ्या मनाचा विचार करावा असं  वाटलं नाही तुला?आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे सगळं तुला सांगतेय ते तुला खरं काय आहे ते कळावं म्हणून; माझी बाजू पटवून देण्यासाठी  नाही. कारण जे खरं आहे ते फक्त सांगावं लागतं, ते पटवून द्यायची गरज नसते. तुला किंवा कोणालाही जर का असं वाटत असेल की, मी माफी मागावी तर तसं होणार नाही. काहीही झालं तरी माझी चूक नसताना मी माफी मागणार नाही. माफी तुला मागावी लागेल आज. कारण तुझा इगो हर्ट झाला असेल कदाचित पण माझा स्वाभिमान दुखावला गेला आहे. ऑफिसमध्ये जे घडलं  सगळं विसरुन, घरी येवून नव्या उत्साहाने प्रमोशन सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं मी. पण इथे मात्र काही वेगळच वाढून ठेवलं होतं माझ्यासाठी. आता मी तुला विचारते, 'काय कमी होती माझ्या प्रेमात म्हणून असा अविश्वास दाखवलास  माझ्यावर ?"
    मनातलं सगळं बोलून ती शांत झाली. त्यानंतर कोणीच काही बोलत नव्हतं.  ती जे बोलत होती त्यातला प्रत्येक शब्द बरोबर होता. पण तिचं बोलणं 'तो' किंवा त्याच्या घरातले  समजून घेतील का ?

©मानसी जोशी









   

Wednesday, 19 July 2017

कथा - पाऊस असा रुणझुणता

पाऊस असा रुणझुणता

ऑफिस सुटायच्या वेळी नेमक्या आलेल्या मुसळधार पावसामुळे तो खूपच वैतागला. थोडा वेळ थांबून पाऊस थांबण्याची वाट बघावी असा विचार करुन तो ऑफिसमध्येच फाईल चाळत बसला. आदल्या दिवशी रविवार असल्यामुळे त्याने त्याची फोर व्हिलर सर्विसिंगला दिली होती पण सुट्टीमूळे आधीच भरपूर गाड्या सर्विसिंगला असल्यामुळे त्याला त्याची गाडी आज संध्याकाळपर्यंत मिळणार होती.  सहाजिकच ऑफिसमधून घरी जाता जाता सर्विसिंग सेंटरला जाऊन गाडी घेऊन जाऊ असा विचार करुन सकाळी तो बसनेच ऑफिसला आला होता. दिवसभर चांगलं कडकडीत उन होतं पण  अचानक संध्याकाळी ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. जवळपास अर्धा तास होत आला. पाऊस थांबणं दूरच उलट अजून वाढतच चालला होता. वैतागून त्याने फाईल बंद केली आणि घरी जायला निघाला.मनातल्या मनात सर्विसिंग सेंटरला शिव्यांची लाखोली वाहात तो ऑफिसच्या बाहेर आला. रस्त्यावर सगळीकडे पाणी साचलं होतं. आधीच गर्दी असणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे ट्रॅफिक जॅम झालं होतं. बसस्टॉप तसा ऑफिसच्या समोरच होता. पण सिग्नल बंद असल्यामुळे या ट्रॅफिकमधून रस्ता क्रॉस करणं तसं अवघडच होतं. बसने जाण्यापेक्षा कॅब बूक करावी असा विचार करुन त्याने कॅब बुक करण्यासाठी मोबाईलवरचं ॲप ओपन केलं पण दुर्दैवाने कुठलीही कॅब अवॅलेबल नव्हती.
    कसाबसा रस्ता ओलांडून तो बसस्टॉपवर तर पोचला. पण तो तिथे पोचेपर्यंत बस त्याच्या समोरुन निघून गेली होती. आता पुढची बस येइपर्यंत तासभर इथेच थांबावं लागणार या विचाराने तो अजूनच वैतागला. बस स्टॉपवर असं थांबून रहाणं त्याला अजिबात आवडत नसे कारण इतर कुठल्याही कारणांपेक्षा त्याला 'ती'च्या आठवणीत हरवून जाण्याची भीती जास्त वाटत असे.
     'ती' त्याला पहिल्यांदा भेटली तेव्हा असाच मुसळधार पाऊस पडत होता.. ट्रॅफिकमूळे कुठलीच बस वेळेवर येत नव्हती. रिक्षावाले दुप्पट भाडं सांगून प्रवाशांची अडवणूक करत होते. तो बसस्टॉपवर आला तेव्हा 'ती' आधीच तिथे होती. अर्धवट भिजलेल्या अवस्थेत तिला न्याहाळणाऱ्या नजरा टाळत आणि अजून भिजायला होवू नये म्हणून अंग चोरुन उभी होती. त्याचं तर तिच्याकडे लक्षही गेलं नव्हतं. पण तिचं मात्र त्याच्याकडे लक्ष होतं. कधी रिक्षावाल्यांशी हुज्जत घालणारा कधी पालिकेला तर कधी  शहरातल्या पब्लिक ट्रान्स्पोर्टला नावं ठेवणारा 'तो' तिला मनापासून आवडून गेला होता. 'तो' आल्यापासून का कुणास ठावूक पण या गर्दितही तिला सुरक्षित वाटू लागलं होतं. जवळपास अर्ध्या तासाचा वेळ मध्ये गेल्यावर 'ती'  स्वतः त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणाली, "तुम्हाला पण  गव्हर्नमेंट कॉलेज रोडला जायचं आहे तर आपण रिक्षा शेअर करुया का?" तो क्षणभर गोंधळला.एक सुंदर मुलगी स्वतःहून त्याच्याशी बोलत होती आणि त्यात ती चक्क रिक्षा शेअर करुया का विचारत होती. पण जरा विचार करुन त्याने होकार दिला. एक क्षण हे सगळं आठवून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं पण नंतर मात्र तो उदास झाला. त्याच्या मनात आलं, 'का निघून गेली असेल ती अशी अचानक माझ्या आयुष्यातून आणि ते ही मला न कळू देता अगदी माझ्या नकळत. .....त्याच्या मनात तिच्या आठवणींची गर्दी जमा झाली आणि भर गर्दीतही त्याला एकाकी वाटू लागलं.
   त्या दोघांचही ऑफिस एकाच रोडवर असल्यामुळे जाता येता  रोज  भेट होत असे. कधी त्याला उशीर झाला तर ती त्याच्यासाठी थांबून रहायची. असच एक वर्ष सरतं. एक दिवस 'तो' बसस्टॉपवर येतो ते त्याची नवीन बाईक घेवूनच. ती खूप खूष होते, त्यानंतरही  ती रोज बसस्टॉपवर थांबत असे पण बसची नाही तर त्याची वाट बघत.
      ती मनापासून त्याच्यावर प्रेम करु लागली होती. नंतर नंतर दोघंजणं  सुट्टीच्या दिवशीही एकमेकांना भेटत असत. कधी मुसळधार पावसात बाईकवरुन फिरायला जाणं, तर कधी कुठल्या ग्रूपबरोबरचा ट्रेक असो दोघं नेहमी एकमेकांबरोबर असत. असेच अजून सहा महिने सरतात. एकदिवस धीर करुन ती त्याला त्याचे फ्युचर प्लॅन्स विचारते. तेव्हा तो फक्त आणि फक्त त्याच्या करिअरबद्दल त्याच्या स्वप्नांबद्दल बोलत रहातो. यामध्ये ती कुठेच नसते.ती शांत रहाते. त्यानंतर मात्र काहीच दिवसांत ती तिचा जॉब चेंज केल्याचं आणि त्याचबरोबर घरही चेंज केल्याचं त्याला सांगते.त्याला आश्चर्य वाटतं. पण तो गप्प रहातो. रोज भेट होत नसली तरी फोन आणि मेसेजेस मात्र जवळपास रोज होत असत. पण नंतर नंतर तो त्याच्या बिझी शेड्युलमध्ये व्यस्त झाला आणि  हळूहळू ते ही कमी झालं. एक दिवस भरपूर दिवसांत काही कॉंटॅक्ट नाही म्हणून तो तिला कॉल करतो पण तिने तिचा नंबर बदलेला असतो.तिच्या ऑफिसचा नंबर शोधून तो तिथे फोन करतो, तेव्हा त्याला कळतं तिने  नोकरी सोडली आणि ती बॅंगलोरला निघून गेली. तिच्या भेटीचे सारे मार्ग जणू बंद झालेले असतात.
    अशीच तीन वर्ष सरतात. या तीन वर्षात त्याची अनेक स्वप्न त्याने पूर्ण केलेली असतात. पण तरीही आयुष्यात काहीतरी कमी आहे याची जाणीव त्याला सतत होत असते.
     तो तिच्या आठवणीत हरवून गेलेला असतो.मुसळधार पडणारा पाऊस रोडवरची गर्दी, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या या सगळ्यापासून जणू तो अलिप्त असतो.
 "एम जी रोडला जाणारी बस आहे का हो आता?" त्याच्या कानावर पडलेल्या या आवाजाने तो दचकतो आणि आवाजाच्या दिशेला बघतो. चौकशी कक्षासमोर  चक्क 'ती' उभी असते.त्याला क्षणभर कळतच नाही की समोर खरच 'ती' उभी आहे का आपण स्वप्न पहातोय? पण स्वतःला सावरत तो तिच्याजवळ जाऊन तिला विचारतो, "मी पण एम.जी.रोडलाच जाणार आहे तुमची हरकत नसेल तर आपण रिक्षा शेअर करुया का?" ती दचकून त्याच्याकडे बघते.त्यानंतर कितीतरी वेळ कोणी काहीच बोलत नाही. दोघ एकमेकांकडे फक्त बघत रहातात.
   "कॉफी घेऊया? तो तिच्या चेहऱ्यावरुन नजरही न हटवता तिला विचारतो. ती मानेनेच होकार देते. दोघं जवळच्या कॉफीशॉपमध्ये जातात. काय बोलायचं कोणालाच काही कळत नसतं. अचानक  अनपेक्षितपणे दोघांची पुन्हा भेट झालेली असते. अर्थात या भेटीचा आनंद दोघांनाही असतो पण त्याचवेळी मनात कुठेतरी एक अनामिक भीती दाटलेली असते. वेटर वाफाळणाऱ्या कॉफीचे दोन मग टेबलावर आणून ठेवतो.
 "मला न सांगता अशी अचानक कूठे निघून गेली होतीस?", तो हिम्मत करुन विचारतो.
 "बॅंगलोरला. पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी." ती
"मला एकदाही  सांगावस  वाटलं नाही तुला?" तो
"काही गोष्टी न सांगताच कळल्या असत्या तर कदाचित गेलेही नसते", ती
यावर मात्र तो काहीच बोलत नाही. पुन्हा काही वेळ शांततेत जातो. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायचं असतं पण शब्दच सापडत नसतात.
"एम.जी.रोडला कुठे राहतेस?" तो त्याच्या परीने संवाद साधण्याचा प्रयत्न करत विचारतो.
ती: सहवास कॉलनी
तो: बॅंगलोरहून कधी परत आलीस?
ती: झाले सहा महिने
तो: परत आल्यावरही मला भेटावसं नाही वाटलं तुला?
ती: (विषय बदलत)तू इकडे कसा?
तो: मी पण जॉब चेंज केला. बसस्टॉपसमोरच्या टॉवरमध्येच ऑफिस आहे माझं. गाडीही घेतली,पण ती  सर्विसिंगला दिलेली आहे म्हणून आज बसने जायची वेळ आली.
ती: म्हणजे तुझी सगळी स्वप्न पूर्ण झाली तर..
तो: सगळी नाही पण थोडीफार.तू काय करतेस सद्ध्या ?
ती: माझ पण ऑफिस इथेच पलिकडच्या गल्लीत आहे. रोज ऑफिसची गाडी असते जाताना येताना पण आज मला निघायला उशीर झाला त्यामुळे गाडी निघून गेली.तू एम.जी.रोडला कधी शिफ्ट झालास?
तो: मागच्याच वर्षी फ्लॅट घेतला. तुझी फॅमिली पण इथेच शिफ्ट झाली का ?
ती: नाही.
तो: मग इथे कोण कोण असतं?
ती: (हसून ) मी एकटीच रहाते. अजून लग्न नाही केलय मी. खूप स्वप्न पूर्ण करायची आहेत. करिअरमध्ये यशस्वी व्हायचं आहे.स्वतःच घर घ्यायचं आहे. गाडी घ्यायची आहे.......
    ती बोलत असते. एकेकाळच्या त्याच्या स्वप्नांबद्दल! त्याने तिला सांगितलेले सगळे फ्युचर प्लॅन्स आज ती जसेच्या तसे सांगत असते. आता त्याला उशीर करायचा नसतो. तो तिचं बोलणं मध्येच थांबवत तिला विचारतो, "तुझी सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला साथ द्यायची तयारी आहे माझी; तुला आवडेल माझी साथ?"
   त्याच्या या प्रश्नाने मात्र तिचे डोळे भरुन येतात. "किती वेळ लावलास हे विचारायला?"ती त्याला विचारते.
 " नाही कळलं ग मला तेव्हा. पण तू निघून गेल्यावर मात्र जाणवलं. खूप प्रेम करतो  मी तुझ्यावर. गेली तीन वर्ष कशी काढली ते माझं मला माहिती. एकही दिवस तुझ्या आठवणींशिवाय गेला नाही.पण आता मला तुला गमवायचं नाहीये.
   तो बोलत असताना बाहेर मुसळधार पडणारा पाऊस तिच्या डोळ्यातूनही बरसत असतो. पावसामुळे  सुरु झालेली प्रेमकहाणी  पावसामुळेच  पूर्ण होते.

©मानसी जोशी  







Monday, 17 July 2017

शिक्षणाचे माध्यम- मराठी का इंग्रजी?

आजकाल सोशल मिडीआवर इंग्लिश मिडिअमची किंवा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची खिल्ली उडवणाऱ्या बऱ्याच पोस्ट दिसत आहेत. खास करुन मराठी माध्यमातून शिक्षण घेणंच कसं योग्य आहे हे सांगणाऱ्या अनेक पोस्ट्स  जेव्हा ग्रूपवर पोस्ट केल्या जातात तेव्हा हमखास इग्लिश मिडिअमचा दर्जा किती वाईट आहे हा मुद्दा नेहमी मांडला जातो. मुळात एखादी गोष्ट चांगली आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या गोष्टींची दुसऱ्या गोष्टींशी तुलना करण्याची गरजच काय?  कुठलही माध्यम का असेना शिक्षणासारखं पवित्र कार्य तिथे केलं जातं.(डोनेशन / फी हे वेगळे मुद्दे आहेत तेव्हा ते मांडून कृपया विषयांतर करु नये.)
    मुळात मुलांना कुठल्या माध्यमातून शिकवायचे हा पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचे जे काही बरे वाईट परिणाम असतील त्याची जबाबदारीही पालकांचीच असते . मुलांसाठी शाळा निवडताना पालकांच्या नोकरीचं स्वरुप हा महत्वाचा मुद्दा आहे.जर पालकांना नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात अथवा  देशात जावं लागणार असेल तर मुलांना इंग्लिश मिडिअमच्या शाळेत घालणं आवश्यक असतं.मुलांनी आई वडिल दोघांजवळ रहाणं हे कुठल्या माध्यमातून मुलं शिकत आहेत यापेक्षा नक्कीच महत्वाचं आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
        दुसरी गोष्ट म्हणजे घर आणि शाळा यामधील अंतर, त्या शाळेत मुलांवर होणारे संस्कार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा हे मुद्देही माध्यम निवडीइतकेच महत्वाचे आहेत.
     मी मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या विरोधात नाही, असूही शकत नाही कारण माझं दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे. पण म्हणून मराठी माध्यमातून/ मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे या अट्टाहासाचं समर्थनही मी करत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचं महत्व सांगताना बरेचदा इंग्लिश मिडिअम कसं वाईट आहे हे सांगितल जातं हे मला खटकतं. याबरोबरच मराठी माध्यमातून शिकलेल्या  वेगवेगळ्या उच्चशिक्षित, कर्तबगार व्यक्तिंचे दाखले दिले जातात. जरूर द्या अशी उदाहरणे  पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा; ती व्यक्ती स्वतःच्या कर्तुत्वावर यशस्वी झाली आहे. त्या यशात माध्यम ही एकमेव गोष्ट खरच महत्वाची होती का? हा विचार जरुर करावा.

©मानसी जोशी

Friday, 14 July 2017

हॉन्टेड स्टोरी

#हॉन्टेड स्टोरी 
(ही कथा सत्यघटनेवर आधारीत आहे)

गोष्ट तशी फार जूनी नाहीये. तो २००२ सालातला ऑक्टोबर महिना होता. नक्की तारिख आठवत नाहिये पण त्या दिवशी रत्नागिरीत सध्याकाळी  वादळ झाल होत. मुसळधार पाऊस बरसत होता.आमच लॉ कॉलेज  संध्याकाळी असायच. ५ वाजता घरुन निघाले तेव्हा वाटलही नव्हत वादळ होइल. पावसाची शक्यता मात्र होती. अर्ध्या वाटेत गेले आणि अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला रस्त्यावरची धुळ उडून डोळ्यात जात होती. वाऱ्याचा वेग अजूनच वाढला. माझी स्पिरिट गाडी एका साइडला जावू लागली. वाऱ्याबरोबर मुसळधार पाऊसही सुरु झाला. एव्हाना मी कॉलेजला पोचू शकत नाही हे माझ्या लक्षात आल होत. मी गाडी साइडला घेतली आणि तिथल्याच एका दुकानात जावून थांबले. पावसामुळे संध्याकाळीच  काळोख झाला होता. त्यात भर म्हणून नियमानुसार  लाइट गेलेच होते. माझ्यासारखे अनेकजण  वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. संध्याकाळचे ७ वाजत आले होते. वादळाचा जोरही  हळूहळू ओसरत होता. मी ही घरी आले.  घरी आले तेव्हा साडेसात होवून गेले होते. आई म्हणाली, "चला सुखरूप आलीस एक काळजी मिटली. नुसता जिवाला घोर लागला होता त्यात  आजोबांना (आईचे वडील)  Admit केलय. मी हॉस्पिटलमध्ये जातेय झोपायला, पहाटे लवकर येइन", अस म्हणून  आई हॉस्पिटलमध्ये गेली. लाइट आलेलेच नव्हते त्यामूळे TV बघता येत नव्हता की पुस्तक वाचता येत नव्हत. घरी मी आणि माझा धाकटा भाऊ मयुरेश दोघेच होतो. बाबा तेव्हा मुंबईला होते. आम्ही जेवून घेतल. तेवढ्यात आमच्या सोसायटीत रहाणारा आणि नुकतच लग्न झालेला सगळ्यांचा सुनील मामा आणि मामी गप्पा मारायला आमच्याकडे येवून बसले. मग एक एक करित सोसायटीमध्ये रहाणारे काही समवयस्क मित्र मैत्रिणी  गप्पामध्ये सामिल झाले. गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. 
        रात्रिचे १० वाजुन गेले होते. लाईट अजूनही आले नव्हते. बाजूला रहाणाऱ्या सावंत  काकांनी, "झोपताना सेफ्टी डोअरला आठवणीने कुलूप लाव", अस सांगून त्यांचे दार  लावून घेतले. आमच्या बिल्डिंगमध्ये L पॅटर्ननुसार फ्लॅट्स होते म्हणजे आमचा फ्लॅट नॉर्थ फेसिंग तर बाजूचा सावंत काकांचा फ्लॅट  ईस्ट फेसिंग. आणि दोन्ही फ्लॅट्सना मिळून एक कॉमन पॅसेज.  आमच्या घराच्या  दरवाज्यापासून पासून जवळपास३  फुट लांब अंतरावर  ग्रिलचे (लिफ्ट च्या दाराप्रमाणे) कॉमन सेफ्टी डोअर होते. त्याला रात्री झोपताना आम्ही कुलूप लावत असू. कुलुपाच्या एकूण ४ किल्ल्या होत्या; दोन सावंत काकांकडे तर दोन आमच्याकडे. हळूहळू ११ वाजत आले. एकएक करीत सगळे आपआपल्या घरी निघून गेले. आम्हीही दार लावून हॉलमध्येच झोपलो. झोप तर येत नव्हती बाहेर कुत्रे भयंकर आवाजात रडत होते. पत्र्यावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा मधूनच येणारा आवाज, मधूनच बेडकाच्या ओरडण्याचा आवाज. कुत्र्याच ओरडण अशुभ असत ऐकल होत त्यात आजोबा हॉस्पिटलमध्ये मला सगळच विचित्र वाटत होत. भाऊ कधीच झोपला होता. मी मात्र कितीतरी वेळ कूस बदलत जागी होते. रामरक्षा, मारुती स्तोत्र,गणपती स्तोत्र म्हणता म्हणता कधी झोप लागली ते मला कळल  नाही. जाग आली ति दारावर टकटक केल्याच्या आवाजाने. मी दचकले घड्याळात बघितले ते २ वाजले होते. एवढ्या रात्री कोण आल असेल ? आजोबा ठिक तर असतील ना? अशा अनेक प्रश्नांची मनात गर्दी सुरु झाली पण दार उघडायची हिम्मत काही होत नव्हती. छे कोणी नसेल उगाचच भास झाला असेल, असा विचार करुन मी पुन्हा  झोपायचा प्रयत्न केला तेवढ्यात पुन्हा टकटक!! आता मात्र मी घाबरले मी भावाला हाक मारली. तो झोपेतच माझ्यावर वैतागून म्हणाला, कोणी नाही ग तुला भास झाला असेल  तु  झोप." नाही रे मी दुसऱ्यांदा ऐकलाय हा आवाज" मी म्हणाले. "बर बघू परत आला तर  अस म्हणून भाऊ  डोक्यावर  पांघरूण घेउन झोपला. थोड्या वेळाने पुन्हा टकटक झाली. मी खुप घाबरले पण तेवढ्यात बाजूचे सावंत  काका उठून त्यांच दार उघडत असल्याचा आवाज मला आला. मी ही मग हिम्मत करुन उठले. इमर्जन्सी लाइट लावून पटकन दार उघडल तर बाहेर कोणीच नव्हत.  सावंत काका मला म्हणाले, "कोण वाजवत होत दार कुणास ठावूक? तु पण ऐकलास ना आवाज?" मी होकारार्थी मान हलवली. "असेल कोणीतरी तु झोप आता" काका म्हणाले.मी हो म्हणून दार लावून घेतल. मनातून खर तर खूप घाबरले होते.झोपायचा प्रयत्न केला पण झोप काही लागत नव्हती. पुन्हा रामरक्षा, मारुती स्तोत्र, गणपती स्तोत्र एकामागून एक स्तोत्रे म्हणताना कधी झोप लागली ते काही कळक नाही.
        दुसऱ्या दिवशी  सकाळी जाग आली तेव्हा  आई घरी आली होती. तिला  रात्रीचा  प्रकार सांगितला. आईशी बोलताना रात्री लक्षात न आलेली एक   गोष्ट अचानक माझ्या लक्षात आली  आणि मी आईला म्हणाले, आई सेफ्टी डोअर लॉक असताना कोणी दारावर टकटक कस काय करु शकत? दरवाजापासून जवळपास ३ फुट अंतारावरून सेफ्टी डोअरमधून  हात घालून कोणी दारावर टकटक कस काय करु शकेल? माझ्या या बोलण्यावर सावंत काका म्हणाले, "अग रात्री झोपताना सेफ्टी डोअरला कुलूप घालायला विसरली असशील." यावर मात्र आई म्हणाली, "नाही तिने कुलूप व्यवस्थित घातल होत मी पहाटे आले तेव्हा कुलूप उघडूनच आत आले." तेवढ्यात आमच्याकडे कोणीतरी आले आणि तो विषय अर्धवटच राहिला. पण माझ्या डोक्यातून हा विषय काही गेला नाही. मी सोसायटीतल्या माझ्या मित्र मैत्रीणींना ही हकीगत सांगितली आणि मग आम्ही नक्की काय प्रकार आहे हे शोधायचं ठरवलं.
     मुळात या असल्या गोष्टींवर कोणाचाच  फारसा विश्वास नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही या प्रकरणाचा छडा लावायचा हरप्रकारे प्रयत्न केला.  पण कितीही प्रयत्न केला तरी ग्रिलमधून हात घालून टकटक करणं शक्यच झालं नाही आणि ग्रिलमधून काठी घालून दारावर टकटक करुन बघितलेला आवाज मध्यरात्री आलेल्या आवाजाशी मॅच झाला नाही; कसा होणार? शेवटी बोटांनी केलेली टकटक आणि काठीने केलेली टकटक यात फरक तर जाणवणारच ना ? शेवटी मोठ्यांची बोलणी खाऊन प्रयत्न बंद केले. "दारावर टकटक केली कोणी आणि कशी ?" हा  प्रश्न आजही माझ्या मनात घोळतोय. आयुष्यात अनेक निरुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांपैकीच हा ही एक प्रश्न!

©मानसी जोशी 
  

Tuesday, 11 July 2017

It’s just a matter of practice

काल लेकीने सांगितले आई आम्ही शाळा सुटल्यावर स्कूलबसमध्ये छोटीशी पार्टी करणार आहोत. उद्या मला टिफिनबरोबर रव्याचा केक पण देशील प्लीज. आता असं लाडात येउन लेकीने काही विचारलं की मग नाही म्हणता येत नाही. सकाळच्या डब्याच्या गडबडीत अजून एक काम वाढलं. पण काही इलाज नव्हता. झोपताना जरा पाच मिनिटे आधीचा गजर लावून झोपले. दुसऱ्या दिवशी सगळं रुटिनप्रमाणे चालू होतं. सकाळच्या घाईच्या वेळी शक्यतो 'किती वाजले?' हा मुद्दा सोडला तर विशेष काही बोलतच नाही आम्ही मायलेकी. आज मात्र अचानक लेकीने विचारलं, "आई कसं काय मॅनेज करतेस ग तू सगळं? गॅसवर एकाच वेळी दूध तापतय, भाजी पण शिजतेय आणि पोळ्या पण करतेयस. दुसरीकडे मायक्रोवेव्हमध्ये केकपण ठेवला आहेस. आणि हे सगळं करताना कुठेही चूकत नाहीस तू. ना दूध उतू जातं, ना भाजी बिघडते आणि पोळीही करपत नाही. हे मल्टिटास्किंग कसं जमतं ग तुला? मला कधी जमेल का ग एवढं सगळं करायला?" आता गडबडीच्या वेळी हिच्याशी बोलत बसले तर उशीर झालाच समजायचा. म्हणून मी जास्त काहीही न बोलता तिला सांगितलं, "काही विशेष नाही ग, ' Its just a matter of practice” हे ऐकून मात्र ती गोड हसली आणि आवरायला गेली. मी ही सुटकेचा निश्वास टाकला. बाकी काही सांगितल असतं तर तिला कदाचित पटलं नसतं पण या एका वाक्याने तिच्या सगळ्या शंका दूर केल्या. याचं कारण म्हणजे गेल्यावर्षीच्या  इंग्लिशच्या पुस्तकात तिला, Its just a matter of practice या नावाचा चिनी लोककथेवर आधारीत एक धडा होता. 
   अगदी साधी आणि छोटी गोष्ट होती ती. एका रस्त्यावर एक प्रसिद्ध  आर्चर(धनुर्धारी) त्याच्या कलेचा शो करुन लोकांची वाहवा मिळवत असतो. तेवढ्यात तिथून जाणारा एक सामान्य तेलविक्रेता त्याला म्हणतो, "यात अभिमान वाटण्यासारखं काय आहे? Its just a matter of practice…" हे ऐकून त्या आर्चरचा इगो दुखावला जातो. तिथे जमलेली लोकंही त्या तेलविक्रेत्याबद्दल नाराजी व्यक्त करतात. तेव्हा तो तेलविक्रेता सांगतो, "यात मी वेगळं असं काहीच बोललेलो नाही. आणि मी माझं म्हणणं सिद्धही करु शकतो,  असं म्हणून आपल्या पाठीवरचा तेलाचा गॅलन खाली ठेवतो. तेलाचा एक कॅन घेतो. त्यावर मध्ये होल असणारं एक नाणं (पूर्वीचं चिनी नाणं)  कॅनमध्ये व्यवस्थित तेल ओतता येइल अशाप्रकारे ठेवतो. मग तेलाच्या गॅलनमधून खूप उंचावरून तो कॅन भरेपर्यंत कॅनमध्ये तेल ओततो. तेल ओतून झाल्यावर ते नाणं अलगदपणे उचलून तिथे जमलेल्या लोकांना व त्या आर्चरला दाखवतो. आश्चर्य म्हणजे त्या नाण्याला अजिबात तेल लागलेलं नसतं व आजूबाजूला कुठेही तेलाचा थेंबही सांडलेला नसतो. हे बघून त्या आर्चरसकट  सगळ्यांनाच त्या तेलविक्रेत्याचं कौतुक वाटतं. पण तरीही स्वतःच कौतुक करुन न घेता तो म्हणतो, "यात काही विशेष नाही, Its just a matter of practice….."
   नंतर मात्र कितीतरी वेळ माझ्या मनात ती कथा घोळत होती. मनात आलं, Its just a matter of practice………..खरच होत असेल का असं? साईटवरच  झोपड्या बांधून रहाणाऱ्या कामगारांच्या बायका ज्या पद्धतीने हातावर मोठमोठ्या भाकऱ्या पटापट थापतात त्या स्पीडने  भाकऱ्या थापणं जगप्रसिद्ध शेफलाही जमणार नाही. आशा भोसले, लता मंगेशकर, किशोर कुमार, येशुदास इ. थोर  गायकांची गाणी मनाला स्पर्श करतात त्यांची जागा घेणं दुसऱ्या कोणालाही इतक्या सहजी शक्य नाही. सचिन  तेंडुलकरसारखा बॅटमन हा शतकात  एखादाच असतो. हे सगळं खरच .... just  matter of practice असतं का? असेलही कदाचित पण काही गोष्टी मात्र just   matter of practice असूच शकत नाहीत. जसं कितीही प्रयत्न केला तरी आईच्या किंवा आजीच्या हातच्या एखाद्या पदार्थाची चव तो पदार्थ आपण किंवा दुसऱ्या कोणीही केला तरी त्याला येत नाही.मावशी किंवा आत्ये ज्या स्टाईलमध्ये आपली वेणी घालून देते तशी मात्र अगदी आईलाही जमत नाही. ताईसारखी मेंदी काढणं कोणालाच जमणार नाही. दादाच्या बाईक चालवण्याच्या स्टाईलची कॉपी कोणीच करु शकत नाही. अमुक एक सर किंवा मॅडम जशी गणितं समजावतात ना तसं नाही जमत कोणाला....... एक ना अनेक. अशा किती गोष्टी आपण आपल्या मनात पक्क्या केलेल्या असतात. या गोष्टी just matter of practice नसतात आणि असूही शकत नाहीत. कारण त्या कुठेतरी आपल्या भावनांशी जोडलेल्या असतात. 
©मानसी जोशी 

Monday, 10 July 2017

कथा - अधुरी एक कहाणी

अधुरी एक कहाणी

त्याने विचारलं असतं तर ती 'हो' म्हणाली असती. तिने विचारलं असतं तर तो ही नाही म्हणाला नसता. पण हे त्यालाही जमलं नाही आणि तिलाही..... अशीच अधूरी राहिलेली एक प्रेमकहाणी....
       तो आणि ती एकाच कॉलेजमधले पण वेगवेगळ्या ग्रूपमधले. तो तिला दोन वर्षांनी सिनिअर. एका कॉलेज प्रोग्रॅमच्या वेळी तिने त्याला बघितलं आणि बघताक्षणी तो तिला आवडला ती तशी चूझी. असं सहजासहजी तिला काही आवडणं शक्यच नसे. पण तो मात्र तिला आवडला. हळूहळू दोघांची एकमेकांशी ओळख झाली. अधूनमधून भेटही  होऊ लागली, पण फक्त दोघच भेटली असं मात्र कधीच झालं नाही. जसजसा तो तिला कळत गेला तसतसं तिला जाणवत गेलं, "त्याच्या आणि तिच्या वाटा वेगळ्या आहेत त्या जुळणं शक्य नाही."मग तिने ठरवलं, "काहीही झालं तरी आपल्याला या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडायलाच हवं. जे शक्य नाही त्याचा विचार कशाला करायचा? पुढे जाऊन दोघांनाही त्रास होण्यापेक्षा आपण आत्ताच स्वतःला सावरलेलं बरं. पुढे त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तो पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. जाण्यापूर्वी तो सहजच(?) म्हणून कॉलेजला आला होता , तिलाही भेटला होता. कितीही नाही म्हटलं तरी तिचं मन त्याच्याकडेच ओढ घेतच होतं. पण तरीही ती स्वतःला सावरलेलं असतं. त्याच्या डोळ्यातलं मूकं प्रेम तिच्या भरलेल्या डोळ्यांना दिसलच नाही. त्या वेळी दोघांनाही माहिती नव्हतं; ही  भेट त्यांची शेवटची भेट ठरणार आहे.
     पुढे जाऊन दोघही आपआपल्या आयुष्यात सेटल होतात. तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात मात्र त्याची आठवण तिने हळूवार जपलेली असते. जवळपास पंधरा वर्षांचा काळ मध्ये जातो. दोघही आता आपआपल्या संसारात व्यस्त झालेली असतात.एकमेकांच्या आठवणी धूसर झालेल्या असतात.
       एक दिवस एका फंक्शनमध्ये नेमकी तिच्या खास मैत्रीणीची आणि 'त्याची' भेट होते. तिच्या मैत्रीणीचा नवरा आणि तो एकाच ग्रूपमधले. त्या फंक्शनमध्ये कॉलेजच्या ग्रूपमधले अनेक मित्र भेटतात. सहाजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कॉलेजच्या धमाल दिवसांपासून सुरु झालेल्या आठवणी 'ती सद्ध्या काय करते' पर्यंत येउन थांबतात. 'त्याची' वेळ येते तेव्हा मात्र तो हसून वेळ मारुन नेतो.  या ग्रूपची सगळी  धमाल दुरुनच बघणारी तिची मैत्रीण मात्र त्याच्या  चेहऱ्यावरचे बदललेले भाव चटकन ओळखते आणि थोड्या वेळाने त्याला एकटं बघून त्याच्याशी बोलायला जाते. सुरुवातीला हाय हॅलो आणि जुजबी बोलणं झाल्यावर त्याला विचारते, "तू खरच प्रेम करत होतास का तिच्यावर? इतक्या वर्षांनंतरही तिच्याशी बोलावसं; तिला भेटावसं वाटतं तुला ?" तो गप्प रहातो. तिची मैत्रीण आपला मोबाईल त्याच्यासमोर धरते आणि म्हणते, "हा बघ तिचा फोटो; तिच्या whats ap चा DP…" तो नकळत मोबाईल हातात घेतो. 'तिचा' फोटो बघून त्याचे डोळे भरुन येतात. कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे बघत बसतो.
"तिचा whats ap नंबर देउ ? बोलणार आहेस तिच्याशी?" तिची मैत्रीण त्याला विचारते.
   "नाही! नको! मला तिचा whats ap नंबर देउ नकोस आणि तिलाही माझा whats ap नंबर देउ नकोस..असं म्हणून तो मोबाईल परत करतो.
    दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मैत्रीणीच्या मोबाईलवर त्याचा मेसेज येतो

"दाटून आलेल्या मेघांनी
 बरसावं असं काही नसतं
प्रत्येकवेळी भावना व्यक्त करायला
शब्दच हवेत असही काही नसतं
अव्यक्त राहीलं तरीही
प्रेम हे प्रेमच असतं
अधूरी असली तरीही
ती एक प्रेमकहाणीच असते."

  खाली लिहिलेल असतं, "हा मेसेज तिला पाठवशील प्लीज. हा मी तिला पाठवलेला आयुष्यातला पहिला आणि शेवटचा मेसेज!"
      तिची मैत्रीण तिला हा मेसेज पाठवते. मेसेज बघून 'ती' मैत्रीणीला फोन करते. मैत्रीण सगळी हकीगत तिला सांगते. ती स्तब्ध होते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही. आजपर्यंत ती समजत असते आपण त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होतो पण आज  तिला कळतं की, 'तो’सुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करत होता.
    "तुला भेटावसं वाटतय त्याला ? फक्त एकदा भेटा दोघजणं. यात काही चूक नाही. पण भेटला नाहीत तर मात्र खूप काही निसटेल हातातून." पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते.
    एक क्षण तिच्या मनात कालवाकालव होते. पण लगेच तिला  वास्तवाचं भान येतं आणि ती नकार देउन फोन ठेवते. मन घट्ट करुन ती नकार तर देते  पण मनात जाग्या झालेल्या त्याच्या आठवणी थांबवणं मात्र तिला कठिण जातं.
   अजून दोन महिने सरतात. ती हळूहळू जुन्या आठवणी पुन्हा विसरायचा प्रयत्न करत असते. अशाच एका निवांत दुपारी तिच्या मैत्रीणीचा फोन येतो आणि पुन्हा त्याच्या आठवणी जाग्या होतात.
   "'तो' आत्ता आला आहे आमच्याकडे, बोलणार आहेस का त्याच्याशी?" तिची मैत्रीण तिला विचारते.
   हे ऐकून क्षणभर हिच्या मनात धडकी भरते."त्याने काही विचारलं का माझ्याबद्दल ? नकळत 'ती' विचारते.
   "अगं तुझ्याबद्दल कधी विचारेल? आत्ताच आला तो. मी चहा ठेवायला किचनमध्ये आले आणि इथूनच तुला कॉल केला”, तिची मैत्रीण तिला सांगते. हे ऐकून 'ती' थोडी निराश होते, पण तसं न दाखवता 'नाही' म्हणून फोन कट करते." खरं तर तिला त्याच्याशी बोलावं, त्याला भेटावं असं मनापासून वाटत असतं पण तरीही ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करते. कारण आता दोघांचीही लग्न झालेली असतात. दोघांनाही त्यांचे संसार असतात.
    जवळपास तासाभराने तिच्या मैत्रीणीचा पुन्हा फोन येतो. काहीशा धडधडत्या मनाने ती फोन रिसिव्ह करते. पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते, "सांगितल मी त्याला तुला फोन केल्याचं आणि तू जे विचारलस तेसुद्धा सांगितल."
   "मग  काय म्हणाला तो?" ती अधीर होवून विचारते.
    "तो जे म्हणाला ते मला नीटसं  कळलं नाही पण तो म्हणाला, 'मला जे म्हणायचं आहे ते तिला बरोबर कळेल. तिला सांग, तू विचारी आहेस,प्रॅक्टिकल आहेस, उगाच इमोशनल होऊ नकोस. ते तुझं नेचर नाही. तू जशी आहेस तशीच रहा"
     तिच्या मैत्रीणीचं हे बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मनातलं सगळं मळभ दूर होवून मन स्वच्छ होतं. "Thanks ! तुलाही आणि त्यालाही.."- ती.
    "तुला खरच कळलं त्याला काय म्हणायचं होतं ते? " मैत्रीण तिला आश्चर्याने विचारते.
    "हो! त्याला जे म्हणायचं होतं ते सगळं त्याने या एका वाक्यात सांगितल. त्याला म्हणायचं होतं, 'जेव्हा सगळ्या गोष्टी सहज शक्य होत्या तेव्हा विचारपूर्वक वागलीस. आता भावनांच्या आहारी जाऊ नकोस. कारण असं करुन फक्त त्रास होईल.'
   तिचं हे उत्तर ऐकून तिची  मैत्रीण आश्चर्याने तिला म्हणते, "अगं किती सहज  कळतं तुम्हाला एकमेकांच्या मनातलं! बाकी काही माहिती नाही मला पण तुम्ही दोघांनीही त्यावेळी गप्प राहून चूक केलीत असं वाटतय मला."
   "चूक का  बरोबर ते नाही सांगता येणार मला. पण एक मात्र नक्की त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त विचारपूर्वक तो वागला. मला तर माहितच नव्हतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या विचारांपासून दूर जाणं मला कठीण गेलं नाही. पण त्याला मात्र माझ्या नजरेतलं प्रेम जाणवलं होतं, तरीही त्याने स्वतःला माझ्यापासून लांब ठेवलं. जर त्यावेळी मला एक क्षण जरी जाणवलं असतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे तर कदाचित मी स्वतःला थांबवू शकले नसते आणि सगळंच  कठीण होवून बसलं असतं. आयुष्यातल्या त्या एका वळणावर आम्ही एकत्र आलोही असतो पण पुढे जाऊन त्याचा आम्हा दोघांनाही त्रास झाला असता. कारण मुळात  आमच्या वाटा वेगळ्या होत्या.काही नात्यांना नाव देता येत नाही आणि काही नाती जुळतच नाहीत तरीही त्यामध्ये एक ओढ असते आणि ही ओढ जन्मभर अशीच राहते. काही गोष्टी अर्धवटच छान वाटतात कारण त्या पूर्ण झाल्या तर त्यातला गोडवा निघून जातो. आमची कहाणीही अशीच आहे अर्धवट! आणि म्हणूनच ती खूप गोड आहे." आयुष्यात पहिल्यांदाच ती त्याच्याबद्दल इतकं मोकळेपणाने बोलत असते. तिचं हे बोलणं ऐकून तिच्या मैत्रीणीचे डोळे पाणावतात.
    आयुष्यात काही नाती निर्माणच होत नाहीत पण तरीही ती असतात. त्यां नात्यांना  नाव नसतं, भविष्यही नसतं; पण त्यामध्ये असते एक आंतरीक ओढ,  राहून गेलेली  स्वप्न आणि गोड आठवणी!
©मानसी जोशी



 


 

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...