Thursday, 29 November 2018

कथा जंगलराज

एका जंगलात अनेक प्रकारचे प्राणी रहात होते. वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, तरस, ससा, इतकंच काय तर आजूबाजूच्या जंगलातून आलेले मायग्रेटेड’ पक्षीही रहात होते. जंगलात लोकशाही होती त्यामुळे जंगलात ‘सर्वाना समान अधिकाराचा’ कायदा होता. हा कायदा म्हणजे जंगलातील सर्वात मोठा विनोद होता. कारण वाघ आणि सिंह सोडले तर इतर प्राणी (जंगलातील शासनाच्या मते) तुलनेने कमी ताकदीचे असल्यामुळे त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या सोई सुविधा होत्या. सुरुवातीला कमी ताकद असणाऱ्या प्राण्यांची संख्या मर्यादित होती. पण नंतर मात्र या मोफत मिळणाऱ्या सुविधांच्या मोहाला भुलून अनेक प्राण्यांनी स्वतःला कमी ताकदवान असल्याचं सिद्ध करत  ‘कमी ताकदवान’ प्राण्यांच्या गटात स्थान मिळवले. हे सगळं हास्यास्पद असलं तरीही ते खरं होतं. इतर जंगलांमधील सर्व प्राणी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून गुण्या गोविंदाने समानतेच्या अधिकाराने जगत होते. त्यामुळे ती जंगले ‘प्रगत’ जंगलांच्या यादीत अव्वल क्रमांकावर होती. पण या जंगलातले मात्र सगळे नियमच वेगळे होते.
     एक दिवस काय झालं, वाघाला वाटलं बाकीच्या प्राण्यांना एवढ्या सुविधा आहेत मग मला का नाहीत? वाघ ताकदवान होता. खरं तर त्याला अशा मोफतच्या सोईसुविधांची गरजच नव्हती. पण तरीही त्याने या सुविधा मिळविण्याचा चंगच बांधला. यामागे दोन कारणे होती. पहिली म्हणजे बाकीच्या प्राण्यांना विनाकारण मिळणाऱ्या सोई सुविधांची किंमत त्याला त्याच्या कमाईतून चुकवावी लागत होती आणि दुसरं म्हणजे इतरांना मिळणाऱ्या या मोफत  सुविधांमुळे मनात निर्माण झालेली असूया.
   जंगलाच्या शासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण वाघ पडला ताकदवान प्राणी. त्याला कमी ताकद असलेल्या प्राण्यांच्या गटात कसं टाकणार? इकडे कमी ताकद असलेले काही प्राणी विनासायास सगळं मिळत असल्यामुळे ताकदवान होऊ लागले होते. वाघाला ते सहन होत नव्हतं. त्यामुळे वाघही जिद्दीला पेटला. काहीही झालं तरी त्याला या सुविधा हव्याच होत्या. खरंतर अशा परिस्थितीत आपल्या समूहाच्या ताकदीचा वापर करून वाघाने ‘इतर प्राणी ताकदवान झाले आहेत’, हे सिद्ध करून प्राण्यांच्या गरजेनुसार सोई-सुविधा पुरविण्याची मागणी करायला हवी होती. परंतु वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची इच्छा एवढी तीव्र होती की मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आणि मग त्याने साम, दाम, दंड, भेद असे सारे मार्ग अवलंबत आपल्याला हवं ते मिळवलं.
   इकडे सिंह मात्र शांत होता. त्याचा नेहमीच स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता. कुठल्याही सोई सुविधा न मिळवता आपली प्रगती करत होता. वाघासकट जंगलातले बरेचसे प्राणी सिंहाचा दुस्वास करत असत. सतत सिंहाला बदनाम करायचा प्रयत्न करत असत. पण सिंह त्यांना कमी ताकदवान आणि मंद बुद्धीचे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे. क्वचित कधी स्वाभिमानाला आव्हान मिळाल्यावर नीतिमत्तेच्या मार्गाने या साऱ्याला उत्तरही देत असे.
  आता जंगलातले सगळेच प्राणी ‘कमी ताकदवान’ झाले होते. त्या जंगलात एकमेव ‘ताकदवान’ प्राणी होता तो म्हणजे सिंह! या सिंहाला मोफतच्या सोई सुविधांची कधीच अपेक्षा नव्हती पण जंगलात चाललेल्या ‘जंगल राजचे’ परिणाम बघता सिंहांची इतर सर्व प्राण्यांच्या सोई सुविधांचा खर्च उचलायची तयारी नव्हती. पण कर्तुत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सिंहाला मोफतच्या सुविधांची भीक मंजूर नव्हती.या साऱ्यामध्ये  सिंहाची फक्त एकच अपेक्षा होती; ती म्हणजे ‘कमी ताकदवान’ प्राण्यांनी ‘ताकदवान’ प्राण्यांच्या गटात (म्हणजे फक्त एकट्या सिंहाच्या गटात) येऊ नये. आता मला सांगा यामध्ये सिंहाच काय चुकलं?

तळटीप: सदर गोष्ट ही निव्वळ मनोरंजनासाठी लिहिलेली असून याचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

©मानसी जोशी

Tuesday, 20 November 2018

माहेर

“आत्या तू जाऊ नकोस ना….” भाचीने केलेलं गोड शब्दातलं आर्जव….
"बॅग भर आधी. नाहीतर पुण्यात गेल्यावर हे राहिलं, ते राहिलं करत बसशील.” बाबांचे दरवेळचे डायलॉग...
जाताना दोन आणि येताना चार होणाऱ्या बॅगा...
जड होत जाणारी प्रत्येक बॅग आणि भरुन आलेल्या दहा दिवसातल्या आठवणी ….
चार तास हिंडून मनसोक्त शॉपिंग म्हणजे खरेदी केलेली फक्त एक साडी...
जुन्या ड्रेसच्या दुकानात कुठलाच ड्रेस पसंत पडत नसताना नेमकं निघायच्या वेळी झालेली जुन्या ओळखीच्या सेल्समनची इन्ट्री... “ताई तू कधी आलीस म्हणत जीवाचा आटापिटा करून बरोबर आपल्याला हवा तसा आणि हव्या त्या किमतीचा शोधून दिलेला ड्रेस…
“तू पुण्यात राहतेस तरी रत्नागिरीला येऊन एवढं कसलं शॉपिंग करतेस ग”, मावशीचा दरवेळेचा प्रश्न….
रस्त्यात भेटलेली कॉलेजमधल्या मैत्रिणीची आई आणि तिने, “अजूनही तशीच आहेस” म्हटल्यावर उगीचच मूठभर मांस अंगावर चढेल असं वाटून झालेला भीतिमिश्रित आनंद....
आणि “अजूनही गाडी फास्ट चालवतेस का?” असं विचारून लमारलेली कोपरखळी.
उगाचच वाट वाकडी करून कॉलेजच्या रस्त्याला फिरवलेली गाडी आणि त्यामुळे कॉलेजच्या दिवसातल्या जाग्या झालेल्या खरंतर जाग्या केलेल्या आठवणी….
भाऊबीजेला झालेली भावंडांची भेट….
नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा भेटलेल्या मामेबहिणीची पोटभरून केलेली चेष्टा….
"पेट्रोल - डिझेल सगळं वाढतंय आता भाऊबीजही वाढवा", असं म्हणत समस्त भावांकडून उकळलेली जास्तीची भाऊबीज...
जुन्या मित्र-मैत्रिणींची झालेली भेट आणि राहून गेलेली समुद्रावरची फेरी….
नाईलाजाने बघाव्या लागणाऱ्या डेलीसोप….
आणि झोपाळ्यावर बसून प्यायलेला चहा…

“आत्ये तू लॅपटॉप ठेव आणि माझ्याशी खेळ ना थोडावेळ…” “पिल्लू काम आहे ग मला नाही झालं तर सर ओरडतील मला...
“ओरडूदेत, मला पण माझी आई ओरडते…”  
भाचीच्या अशा अनेक गंमती- जमती….

खूप दिवसांनी खूप दिवसांसाठी माहेरी आल्यावर चार दिवसांतच आलेली आपल्या घराची आठवण तरीही निघताना देवासमोर हात जोडून प्रार्थना करताना भरुन आलेले डोळे…
“पुढच्या महिन्यात लग्नात सगळी भेटातीलच पुन्हा”, असं स्वतःलाच समजवताना, “सगळी भेटतील पण घर नाही भेटणार”, या विचाराने दाटून आलेला हुंदका…
जडवलेल्या पावलांनी आणि भरलेल्या डोळ्यांनी सगळ्यांचा घेतलेला निरोप….
©मानसी जोशी
Maher_memories















Tuesday, 30 October 2018

पेरेटिंग डायरी - Exam Fever

मुलांचा अभ्यास घेणे आणि घ्यायला लावणे या दोन्ही गोष्टींसाठी  विशेष कौशल्याची गरज असते. त्यात अभ्यासाची वेळ संध्याकाळची असेल तर बघायलाच नको.
खेळायला बोलावणारे मित्र मैत्रिणी हाका मारत असतात. त्यात काही प्रश्न एवढे हट्टी असतात की कितीही समजावले तरी कळत नसतात.
खेळ का अभ्यास या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या मुलांसाठी दुष्काळात तेरावा महिना तेव्हा येतो जेव्हा आई अभ्यासाचं कॉन्ट्रॅक्ट बाबांना देते .
‘अभ्यास’ या विषयाशी बाप लेक नाईलाजाने लढत असतात आणि लढाई जिंकण्याचा तो क्षण येतो ….
“अगं, हिच्या वहिवर ‘Incomplete’ चा रिमार्क आहे.”
“बाबा मी वही विसरले होते तेव्हा रफ नोटबुकमध्ये लिहिलंय मी.”
“मग या वहीत का नाही लिहिलंस?”
“विसरले ओ मी आणि आईला माहिती आहे. यासाठी मी आधीच आईकडून ओरडून घेतलंय. आता तुम्ही नका ना परत ओरडू”
“थांब आता पूर्ण वही बघूदे मला.”
“हे काय हिस्ट्री आणि सिव्हिक्स एकाच वहीत का?”
“बाबा टीचारनीच सांगितलं होतं.”
हे संवाद चाललेले असताना सगळं लक्षपूर्वक ऐकणारी पण लॅपटॉपवरून नजरही न हटवणारी आई मनातल्या मनात हसत असते.
    आता आपल्याला खेळायला जायला मिळणं कठीण आहे हे लक्षात येऊनही शेवटचा प्रयत्न करावा म्हणून लेक म्हणते, “बाबा बाकीचं जाऊद्या ना उद्या पेपर आहे माझे फक्त दोन प्रश्न राहिलेत तेवढे करून घ्या ना प्लीज.”
“बाकीचं जाऊदे काय ? ही पानं का सोडलेली अशी मध्ये.”
“चुकून सुटली ती”
“काय अक्षर हे? अभ्यास झाला की शुद्धलेखन काढायला बसायचं. आता आपलं खेळायला जाणं कठीण आहे हे लक्षात आलेली कन्या शेवटी ‘ब्रम्हास्त्र’ काढते आणि रडत रडत संवाद तसाच  सुरू राहतो.
अखेर या गोंधळात महत्वाचा मुद्दा असणारे दोन प्रश्न बाजूलाच राहातायत हे लक्षात आल्यावर वैतागलेली आई म्हणते , “बाकी सगळं नंतर बघता येईल. तू फक्त तिचे दोन प्रश्न करून घे. उद्या पेपर आहे त्यामुळे आत्ता ते महत्वाचे आहे. ”
“बाकीचं राहूदे काय? तू असं करतेस नेहमी मी तिला बोललो की तिची बाजू घेतेस. मला माझ्या पद्धतीने अभ्यास घेऊ देत नाहीस म्हणून मी घेत नाही तिचा अभ्यास.”
“माझं चुकलं म्हणून मी तुला तिचा अभ्यास घ्यायला सांगितला. मी घेते तिचे प्रश्न करून.”
तिच्या या उत्तरावर मनातून खुश झालेला पण चेहऱ्यावर चिडल्याचे भाव आणणारा #हेड_ऑफ_द फॅमिली, “ठीक आहे, तूच घे तिचा अभ्यास” असं म्हणत मान हलवतो.
बाजूला बसलेली लेक मनातून खुश होऊनही चेहऱ्यावर रडण्याचे भाव आणून सहानुभूतीच्या आशेने आईकडे बघते.
आणि या दोघांचीही नौटंकी माहिती असणारी पण तसं न दर्शवणारी #नेक_ऑफ_द फॅमिली पुन्हा टीचरच्या रोलमध्ये शिरते.

©मानसी जोशी

Thursday, 13 September 2018

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक हा निव्वळ एक पदार्थ नाही. इतर पदार्थांप्रमाणे उकडीच्या मोदकांची रेसिपी वाचली किंवा you tube वर रेसिपी बघितली आणि केले असं इतक साधं सरळ गणित नाही. अगदी तांदूळ धुवून, वाळवून, त्याच पीठ करण्यापासून सुरु होणारी ही प्रक्रिया थेट मोदक नैवेद्याच्या ताटात ठेवल्यानंतरच पूर्ण होते.
   मला आठवतय, आमच्याकडे धुतल्या तांदूळाच पीठ तस वर्षभर कायमच असतं. पण तरीही गणपती जवळ आले की खास उकडीच्या मोदकांसाठी म्हणून तांदूळ धुवून वाळवले जायचे. यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे हे तांदूळ सावलीत वाळवावे लागतात. त्यावर उन्हाचा कवडसाही पडता कामा नाही.
   लग्न ठरलं त्यावर्षी आजी म्हणाली, “आज मोदकाची उकड करताना माझ्याजवळ थांब. तुला उकड करायला शिकवते. पुढच्या वर्षी सासूने सांगितल ‘उकड कर’ तर तुला आली पाहिजे".
  मोदकाची उकड करणं हे काम मला तसं कटकटीचच वाटलं होत तेव्हा. दरवर्षी साच्यात पीठ घालून मोदक  करायची सवय असणाऱ्या मला त्यावर्षी आजीने साच्याशिवाय मोदक करायला लावले. एकंदरीतच वैताग आला होता. माझे ओबडधोबड मोदक बघून मलाच ते खावेसे वाटत नव्हते, तर बाकीचे काय कप्पळ खाणार? सगळ्यांनी चेष्टा केली. मी सुद्धा, ‘ये अपने बस की बात नहीं’ असं म्हणून विषय सोडून दिला. तसही मोदकापेक्षा जास्त माझं निवग्र्यांवर प्रेम आहे. त्यामुळे साच्यातले चार/पाच मोदक करुन, निवेग्रीसाठी मदत करायला आणि ती करताना ते कच्च पीठ खायला मला प्रचंड आवडायच.
   लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी गणपतीत माहेरच्या  गणपतीची खूप आठवण येत होती. पूजा झाली आणि मी सासूबाईंबरोबर मोदक करायला बसले. त्यांनी काहीशा नाराजीनेच विचारले, ‘तुला येतात ना मोदक करायला?’    
“हो येतात. पण सुबक नाही.” मी  
"बरं. बघुया. नाहीतर नैवेद्याचे मोदक मी करते. तू निवेग्र्या कर नंतर."
मला तर संकट टळल्यासारखं वाटलं क्षणभर. पण तेवढ्यात सासरे म्हणाले, “करु दे की तिला. असे लगेचच कसे जमतील? मानसी तू कर मोदक. कसेही झाले तरी चालतील. कोणी नाही खाल्ले तरी मी खाईन"
   सासऱ्यांच बोलणं ऐकून बरं वाटल आणि अचानक कॉन्फिडन्स आला. मी मोदक वळायला घेतले. जसे जमतील तसे करत होते. मध्येच मोदक फूटत होते. त्यावर पॅचवर्क लावायचा आणि ताटलीत ठेवायच काम चालू होतं. सासूबाई तशा नाराजच होत्या.
   तेवढ्यात सासरे आत आले आणि म्हणाले, “जमतायत की तुला. फक्त एक काम कर, ‘जरा हलक्या हाताने पारी कर आणि मोदकाच्या पाकळ्या जवळजवळ कर. मग बघ मोदक सुबक दिसेल"
     मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. मोदक सुबक तर झालाच. शिवाय ‘पॅचवर्क’ पण करावा लागला नाही.
  मला इतका चांगला मोदक करता आला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. उकड मळतानाही आधी वाटीने मळून घ्यायची आयडीया त्यांनी दिली आणि ‘महाबोअर’ वाटणारं उकडीचं कामही सोपं झालं.
   यावरुन एक गोष्ट कळली, "नेमकं आपल काय चुकतय, हे जर का लक्षात आलं ना तर कुठलीही गोष्ट कठीण नसते.
   आज मी मोदकावर मोदकही (डबल डेकर मोदक ) अगदी सहज करते. पण निव्वळ माझ्या सासऱ्यांमुळे मला मोदक करता आले.
  आज माझे सासरे हयात नाहीत. पण जेव्हा जेव्हा मी मोदक करते तेव्हा प्रत्येकवेळी त्यांची आठवण  आवर्जून येते.

©मानसी जोशी

Thursday, 6 September 2018

LBGT

#LGBT
 काल  सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ मधील LGBT बद्दलची तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली. या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले तर काहींनी यावर टिका केली. याविषयी कोणाची काय मते आहेत, ती चूक आहेत का बरोबर याबद्दल मला काहीच बोलायच नाही. तो या पोस्टचा मुद्दाही नाही. फक्त काही पोस्ट्स व कमेंट्स वाचून जाणवलं अनेकांना IPC च कलम 377 काय आहे हेच माहिती नाही. निव्वळ अर्धवट माहिती  आणि पूर्वग्रहदूषित विचांरांमुळे सर्वोच्च न्यायालयावर ताशेरे ओढायच काम चालू आहे. मुळात IPC हा 150 वर्षांहूनही जुना  ब्रिटिशकालीन  ॲक्ट आहे. भारताच संविधान(constitution) त्यानंतर अस्तित्वात आलं.  त्यामुळे संविधानातील तरतूदींच्या विरोधात जाणार कुठलही कलम अथवा त्यामधील तरतूद रद्द करणे हे आवश्यक होतं.कारण संविधान  हे सर्वात महत्वाच आहे. देशातील सर्व कायदे संविधानातील तरतुदींचा विचार करुनच तयार करणे आवश्यक आहे.

Section 377 of IPC, 1862

"Unnatural offences: Whoever voluntarily has carnal intercourse against the order of nature with any man, woman or animal shall be punished with imprisonment for life, or with imprisonment of either description for a term which may extend to ten years, and shall also be liable to fine."
    This involves sexual acts between consenting adults (both homosexual and heterosexual adults), even within the privacy of their rooms.

यामधील voluntarily  carnal आणि against the order of nature हे शब्द महत्वाचे आहेत कारण हे शब्द वापर  संदिग्ध आहेत.  अनेकांनी LGBT हे अनैसर्गिक मानलं आहे. पण मुळात जी भावना नैसर्गिक आहे ती   अनैसर्गिक कशी असू शकेल?  मला नाही वाटत कोणी स्वतःहून मुद्दाम असं बनत असेल. काहींनी या मुद्द्यावर टिका करताना या लोकांची तुलना रेपिस्ट लोकांशी केली. अशा लोकांनी यातील voluntarily या शब्दाचा नक्की विचार करावा. कारण voluntarily म्हणजेच ऐच्छिक म्हणजेच इथे दोघांचीही संमती हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बलात्कारामध्ये संमती नसते, बळजबरी असते.
     भारताच्या संविधानानुसार Right to Privacy  हा  Fundamental Right आहे. त्यामुळे IPC चा कलम 377 हा Right to privacy च्या विरोधात आहे. या मुद्द्यावर विचार करुन सुप्रिम कोर्टाने कलम 377 LGBT संबंधित तरतूद कालबाह्य ठरवून रद्द केली.
     ही माणसं त्यांच आयुष्य जगत असतात. त्यांना निसर्गानेच अस घडवल आहे,  यामध्ये त्यांचा काय दोष? तसही जो मुद्दा निव्वळ त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे त्यावर इतरांनी चर्चा करण्याच कारणच काय? जोपर्यंत या व्यक्ती कोणाला त्रास देत नाहीत तोपर्यंत या व्यक्तींवर टिका करण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा व्यक्तीही एक माणूसच आहेत. त्यांच्याबाबतीत दुजाभाव कशासाठी?
थोडसं विषयांतर होतय असं वाटेल कदाचित पण कालच एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये एक स्त्री तिच्या घरात काम करणाऱ्या लहान मुलीला  बेमालूमपणे मारत होती. अशी उदाहरणं द्यायची तर शेकड्यांनी देता येतील. मुद्दा हा आहे की काही कालवधींनंतर अशा व्यक्तींनाही समाजात माणूस म्हणून स्थान मिळतं. पण LGBT व्यक्ती कोणाच्या अध्यात मध्यात नसूनही   समाज त्यांना सहजी स्विकारत नाही. का? ती सुद्धा माणसच आहेत.  त्यांना समाजात समानतेची वागणूक मिळणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.
   या पोस्टमधून काय चूक काय बरोबर, संस्कृती वगैरे कुठल्याही मुद्द्यावर मला काहीच बोलायच नाही. मला फक्त एवढच म्हणायचय 'जगा आणि जगू द्या' हे तत्व जर प्रत्येकाने स्विकारल तर बरेचसे सामाजिक प्रश्न सुटतील.
©मानसी जोशी

 

Sunday, 2 September 2018

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे

"मनाची मनाला लागतसे आस
प्रीतीच्या फुलांना चांदण्यांचा वास"
  काही वर्षांपूर्वी झी मराठीवर गुंतता हृदय हे नावाची मालिका आली होती. झी मराठीच्या काही उत्कृष्ट मालिकांपैकीच ही  एक मालिका. अवघ्या १६० भागांची ही मालिका  विवाहबाह्य संबंधावर आधारीत  एक रहस्यकथा होती. मला वाटत रात्री १०.३० वाजता लागणारी झी मराठीवरची ही पहिलीच मालिका असावी.
    मृणाल कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी अवंतिकानंतर तब्बल आठ वर्षांनी एकत्र आले होते. यांच्या जोडीला मोहन आगाशे पल्लवी सुभाष सारखे तगडे कलाकार होते.
     मृणाल कुलकर्णी(नयना) आणि संदीप कुलकर्णी(विक्रम)  यांच्या सुखाच्या संसारात एक रहस्य वादळ बनून येतं.  अचानक घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे दोघही पुरती हादरुन जातात. या दोघांबरोबरच अजून एका व्यक्तीला या साऱ्याची झळ पोचत असते ती म्हणजे विक्रमची प्रेयसी अनंन्या(पल्लवी सुभाष). अनंन्या विक्रमच्या ऑफिसमध्ये काम करत असते. तिचा नवरा  नेव्हीमध्ये नोकरीला असल्यामुळे ती तिच्या रिटायर्ड आर्मी ऑफिसर असलेल्या आंधळ्या सासऱ्यांसोबत (मोहन आगाशे) राहत असते. या सगळ्या गूढ घटनेमागे नक्की कोण आहे? हे सगळ का घडतय?त्याचा उद्देश काय? याचा  प्रेक्षक आपाआपल्या परीने तर्कवितर्क लावत बसतात. कधी संशयाची सुई विक्रमचा बिझनेस पार्टनर मयंक (सागर तळाशीकर) कधी त्याच्या घरात काम करणारी मोलकरीण, कधी नयनाचे बाबा तर कधी  अनंन्या सासऱ्यांभोवती फिरत रहाते. आणि अगदी सुरुवातीच्या भागापासून उत्कंठा वाढवणारी ही मालिका जसजशी  पुढे सरकत जाते तसतसं  विक्रम, नयना आणि अनंन्या  सोडून प्रत्येकजणच संशयीत वाटू लागतो. रहस्याचा उलगडा जितका धक्कादायक तितकाच  सिरिअलचा शेवट वास्तववादी  आहे.
     यामध्ये विक्रम आणि अनंन्याचे विवाहबाह्य संबंध दिग्दर्शकाने  खूप वेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. सिरिअल बघताना कुठेही या दोघांचा राग येत नाही. दोघांनाही आपापले संसार टिकवायचे आहेत. इतकच नाही तर दोघही एकमेकांच्या संसारात काही प्रॉब्लेम येऊ नये याची सर्वोतपरी काळजी घेत असतात. पण मनाने मात्र दोघही एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. कुठेही उथळपणा नाही आहे ते फक्त  एक हळवं नातं.  इथे  विवाहाबाह्य संबंधाचा एक वेगळा काहीसा पॉझिटिव्ह असा हळवा कप्पा  दाखवण्याचा आला आहे. पण हे करताना दिग्दर्शकाकडून( सतीश राजवाडे)  अशा संबंधांच  समर्थन केल जातय अस मात्र एकदाही जाणवत नाही.  एकमेकांमध्ये गुंतलेले विक्रम आणि अनंन्या,त्यांचे प्रामाणिक जोडीदार, त्यांची भावनिक गुंतागुंत आणि सरतेशेवटी एकमेकांपासून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय हे सारे प्रसंग पाहताना वास्तववादी वाटतात.  कुठेही नाटकीपणा जाणवत नाही.
    मालिकेचे शीर्षक आणि शीर्षकगीत  दोन्हीही अगदी विषयाला समर्पक. रात्र अंधारली, गूढ रानातूनी .... अशा शब्दांनी सुरू झालेले  शीर्षकगीत धृवपदानंतर मात्र अचानक  हळव्या प्रेमाकडे वळते. अवघ्या दीड मिनिटांच्या गाण्यामध्ये मालिकेच्या कथेचा पूर्ण आशय दडलेला आहे. हे गाणं गाणाऱ्या देवकी पंडित या परीक्षक म्हणून मला कधीही आवडल्या नाहीत. पण त्यांची गाणी मात्र नेहमीच मनाला स्पर्श करतात.
     वादळवाट, पिंपळपान, प्रपंच, उंच माझा झोका, असंभव, एका लग्नाची गोष्ट अशा एकापेक्षा एक सरस मालिका देणाऱ्या झी मराठीवरच्या आजच्या मालिका पाहून मात्र, "कोण होतास तू, काय झालास तू" , अस म्हणायची वेळ आली आहे.

©मानसी जोशी

Sunday, 26 August 2018

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण

टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच तिला पटत नव्हत. तिला आठवली शाळेतली सत्यनारायणाची पूजा!
     तस तिची शाळा काही फार नावाजलेली नव्हती.  एका छोट्याशा पण  सगळ्या सुविधा असणाऱ्या शहरातली तिची एक साधीशी शाळा. शाळेत दरवर्षी श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा  असायची. अजूनही असते. पण आता .....?
     तिला आठवल... शाळेत असताना सत्यनारायणाच्या पूजेला मनापासून रांगोळी  काढणारा इम्रान चक्क  दहावीत असताना सत्यनारायणाला नवस बोलला होता, "देवा यावर्षी फक्त मॅथ्स सांभाळ, पुढच्या वर्षी शाळेत नसलो तरी पूजेच्या दिवशी येवून मोठी रांगोळी काढेन”. हे कळल्यावर शिक्षकांसकट सगळे खूप हसले होते.
     इम्रान तिच्याच कॉलनीमध्ये रहायचा. अगदी तिच्या घरासमोर. इम्रानची धाकटी बहीण शमा तर तिची खास मैत्रीण. कॉलनीतल्या गणपतीची  आरास कधी  शमाच्या मदतीशिवाय आणि इम्रानच्या रांगोळीशिवाय पूर्ण झाली नाही. उकडीचे मोदक म्हणजे शमा आणि इम्रानचा जीव की प्राण. तिच्या घरी मोदक करताना शमाच्या कुटुंबासकट संगळ्यांसाठी मोदक केले जायचे. ईदिचा शिरकुर्मा तर  कॉलनीतल्या सर्वच घरात अगदी डबाभरुन दिला जायचा.   एकावर्षी गणपतीत गौरीच्या दिवशी नऊवारी साडी नेसलेली, नथ घातलेली शमा बघून तर आपटे काकूंच्या बहिणीने आपल्या मुलासाठी पसंत केल होत तिला. शमा मुसलमान आहे हे कळल्यावर मात्र त्यांचा हिरमोड झाला होता.
     शाळेतली पूजा आठवली आणि तिला  पूजेची सगळी जबाबदारी जणू स्वतःचीच आहे अस समजून,  दिवसभर शाळा करुन डेकोरेशनसाठी  रात्रभर जागणारे कांबळे सर आठवले. कांबळे सर चित्रकला शिकवायचे. सरस्वती पूजनाच्या दिवशी दरवर्षी सरस्वतीच सुंदर चित्र काढणाऱ्या कांबळे सरांना सेंड ऑफ च्या दिवशी जेव्हा शाळेतल्या एका मुलाने स्वतः काढलेल  सरस्वतीच चित्र फ्रेम करुन गिफ्ट दिल, तेव्हा सर डोळ्यात पाणी आणून म्हणाले होते, "माझ्या आयुष्यात आजवर मिळालेल्या गिफ्ट्सपैकी सर्वात जास्त आवडलेल गिफ्ट आहे हे.”
     पूजेच्या दिवशी भटजी म्हणून दरवर्षी रोहन भटचे  बाबा यायचे. प्रसादाची सर्व जबाबदारीही त्याच्याच  घरी असायची.  जास्मिनला तर कामाचा प्रचंड आळस पण प्रसाद वाटपासाठी मात्र आवर्जून मदत करायची. याच कारण म्हणजे तिला प्रसादाचा शीरा मनापासून आवडायचा. हे कळल्यावर रोहनची आई  डबाभर शीरा फक्त जास्मिनसाठी पाठवायची.
    सगळ्या गोष्टी अगदी काल परवा घडल्यासारख्या आठवत होत्या. तेव्हा कोणाचा धर्म भ्रष्ट होत नव्हत्या की सामाजिक असमतोल होत नव्हता. कोणाच्या भावना दुखवत नव्हत्या की सणांच्या ब्रेकिंग न्यूज होत नव्हत्या. विचारात गढलेली असताना अचानक तिचा फोन वाजला. फोन  ईम्रानचा होता.
"आज एवढ्या रात्री फोन केलास?" ती.
"ओ मॅडम रात्र तुमच्या अमेरिकेत. इथे आमच्या भारतात सकाळ आहे म्हटल." इम्रान.
आमच्या भारतात!!!! इम्रानच्या तोंडून हे शब्द ऐकून तिला भरुन आल.
"बरं ते जाऊदे. बिझी असलीस तरी महत्वाच बोलायला फोन केलाय त्यामुळे तुला बोलावच लागेल." इम्रान.
"नाही बिझी नाही बोल" ती.
आपल्या शाळेच यंदा ७५ व वर्ष आहे त्यामुळे पूजेच्या दिवशीच शाळेच्या सर्व  माजी विद्यार्थ्यांच गेट टूगेदर करायच ठरवल आहे. मला माहिती आहे एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुला यायला जमणार नाही. हा फोन तुला आमंत्रण द्यायला नाही तर देणगी दे म्हणून सांगायला केला आहे. शाळेची इमारत जूनी झालेय तिची डागडूजी, काही नवीन वर्ग बांधायचे आहेत,  कम्प्युटर लॅबसाठी नवीन कम्प्युटर घ्यायचे आहेत. अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी सर्व माजी विद्यार्थी ऐच्छिक मदत करत आहेत. अस नाही की देणगी पैशाच्या स्वरुपातच हवी तू तुला जे योग्य वाटतय ते तू देवू शकतेस. जे काही ठरवशील त्यासाठी मी किंवा रोहन भट कोणालाही कॉन्टॅक्ट कर"  ईम्रान.
    ती काही वेळ तशीच शांत राहिली. पलीकडून इम्रानच 'हॅलो' ऐकून ती क्षणभर दचकली पण स्वतःला सावरत म्हणाली, "देणगी देइनच रे  पण सत्यनारायणाची पूजा..... म्हणजे मी आत्ताच न्यूज बघितल्या त्यात तर .... "ती
    "हे बघ जे काही कायदे असतील ते असतील. मला एवढच कळत कायदे माणसासाठी  असतात माणूस कायद्यांसाठी नाही. आणि ही आपली शाळा आहे, राजकारणाचा फड नाही. ज्या शाळेने मला घडवल ती शाळा माझ्यासाठी अल्लापेक्षा कमी नाही. तुला आठवतय मुंबईत दंगल झाली होती तेव्हा परांजपे सरांनी काय सांगितल होत ? 'कुठलाही धर्म वाईट नसतो , कुठलाही माणूसही वाईट नसतो. वाईट असते ती माणसाची चुकीची विचारसरणी आणि ही विचारसरणी घडवणारी परिस्थिती. या परिस्थितीवर मात करा. कुठल्याही कठीण प्रसंगात  आपली विवेकबुद्धी जागी ठेवा. समोरच्याचा आदर करा आणि माणूस म्हणून जगा. ' बस मी हेच लक्षात ठेवलय. शाळेत गेली  ७४ वर्ष पूजा होतेय तशी यंदाही होणार. आणि यंदा तर  साधी नाही  महापूजा होणार." इम्रान.
    "इम्रान तू ना फिलॉसॉफीचा प्रॉफेसर शोभतोस. आणि हो महत्वाच तू आमंत्रण दिल नाहीस तरी यंदाच्या महापूजेला मी येणार आहे." ती हसून म्हणाली.
    मनातल सगळ मळभ दूर झाल होतं. सातासमुद्रापार असूनही मनाने मात्र ती शाळेच्या आवारात पोचली होती.
©मानसी जोशी




Sunday, 19 August 2018

पेरेंटिंग डायरी

"चल आवर पटापट, उशीर होतोय...
किती पसारे करतेस ग घरात....
अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी आवडतात ....
मुलांना जवळपास रोजच या ना त्या कारणाने आपण ओरडत असतो. पण काही वेळा मुल इतक चांगली वागतात की आपण सहज बोलून जातो, "I am proud of you".
    आईचे कानातले, गळ्यातले अशा वस्तू वापरणाऱ्या मुली जेव्हा, "आई तुझा टॉप मला होतो मला देशील वापरायला ?" अस म्हणतात तेव्हा मात्र आपली लेक आता मोठी होतेय अशी जाणीव होते. अशावेळी मन मात्र म्हणत असत, "नको ग मोठी होवूस इतक्या लवकर. ही दुनिया इतकी साधी नाहीये. तुझी छोटीशी दुनियाच खूप छान आहे". अशावेळी काही प्रसंग मात्र या दुनियेत जगायला आपली मुल सक्षम बनत आहेत याची जाणीव करुन देतात.
    लेकीच्या शाळेत परवा युनिट टेस्टचे पेपर्स मिळाले. सायन्सच्या पेपरमध्ये नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्या कन्येला यावेळी 20 पैकी 18 मार्क्स मिळाले होते. यावर लेकीने सांगितले आई आज टिचरनी माझ खूप कौतुक केल.
"का Highest आहेस का तू ?" मी
"नाही ग.  मी डायग्रामला लेबलिंग केल नव्हत तरी टिचरनी मला डायग्रामचे सगळे मार्क्स दिले होते आणि बाकिच्यांचे मार्क्स कट केले होते. मी टिचरना सांगितल्यावर त्यांनी माझे दोन मार्क्स कट केले आणि म्हणाल्या 'clap for Chinmayee for her honesty”
     लेकीच हे बोलण ऐकून तिचा खूप  अभिमान वाटला. आजपर्यंत आपण केलेल्या संस्कारांच चीज झाल्यासारख वाटल. खूशीतच तिला  कॅडबरी सिल्क मंजूर करुन टाकली.
    फ्रेंडशिप डे च्या दिवशी आणलेल्या फ्रेंडशिप बॅंडच्या रोलचे बारीक बारीक तुकडे करत होती. मी ओरडून विचारल, "बॅंडच बंडल आण म्हणून  हट्ट केलास आता आणून दिला तर त्याची अशी वाट लावायची का?"
"आई वाट नाही लावत ग हे बॅंड मी कुंडीतल्या झाडांना बांधणार आहे. झाडे आपली मित्र असतात ना म्हणून.” हा विचार माझ्या मनातही आला नाही.
    "आई शनिवार वाड्यात भूत असत का? "
असे प्रश्न आले की जरा विचारपूर्वकच उत्तरे द्यायला लागतात.
"तू बघितल आहेस का भूत?" मी
"नाही."
"मग जी गोष्ट बघितली नाही ती आहे अस कस म्हणायच ?"
"आई, मग देव तरी कुठे बघितलाय आपण ? तरी आपण तो आहे अस मानतोच ना ?"
हे वाक्य ऐकून कितीतरी वेळ चर्चा झाली.  शेवटी या जगात जशा चांगल्या  शक्ती  असतात तशा वाईटही असतात आणि वाईट शक्तींना भूत अस म्हणतात. हे वाक्य बोलून मी वादातून सपशेल माघार घेतली.
    कालपरवा पर्यंत भातुकली घेऊन खेळणारी , ओढणीची साडी नेसून बाहुलीशी खेळणारी आपली मुलगी कधी एवढा विचार करायला लागली हे कळलच नाही. मन मात्र अजूनही  लहानपणी आईच्या कूशीत झोपणाऱ्या, मऊ भाताचे चार घास जेवताना  घरभर फिरणाऱ्या, खेळून आल्यावर इवलेसे हात गळ्यात टाकून गोड गोड पापा घेणाऱ्या चिन्मयीमध्येच अडकलय.
©मानसी जोशी

Thursday, 12 July 2018

नॅटवेस्ट सिरिज आणि मी

13 जुलै  2002 .. या दिवशी भारताच्या क्रिकेटच्या इतिहासातल एक सुवर्ण पान लिहिलं गेल. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारतीय क्रिकेट टिमने इंग्लंडला हरवून नॅटवेस्ट सिरिज जिंकली. अजूनही आठवतोय तो दिवस. लॉर्ड्सवर  फायनल ती ही इंग्लंडविरोधात; इंग्लंडच्या टिममध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. लॉर्ड्स म्हणजे त्यांच होम पीच त्यात नाणेफेक जिंकून नसिर हुसेनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
     सुरुवातीपासूनच सावध खेळणाऱ्या इंग्लंडच्या टिमची पहिली विकेट गेली ती सातव्या ओव्हरनंतर. अवघे 14 रन्स काढून नाईट(Knight) बाद झाला. पण त्यानंतर मात्र कॅप्टन नसिर हुसेन आणि ट्रेस्कोथिक या दोघांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२५ धावांच तगडं आव्हान भारतासमोर ठेवल.
      आमच्याकडे बाबांनी नेहमीप्रमाणे  टिम इंडियाला नावं ठेवायला सुरुवात केली. "भारत हरणार आता मॅच बघण्यात वेळ फुकट घालवू नका.... वगैरे वाक्यांचा भडिमार सुरु झाला. ब्रेकनंतर आपली इनिंग  सुरु झाली. सुरुवातीपासूनच थोड चाचपडत पण सावधपणे खेळणाऱ्या सेहवाग – गांगुलीच्या चेहऱ्यावर प्रचंड टेंशन दिसत होत. पंधराव्या ओव्हरमध्ये अवघ्या 60 धावा काढून गांगुली बाद झाला. त्यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरला सेहवाग बाद झाला. खूप अपेक्षा ठेवून मॅच बघणाऱ्या आम्हाला बाबा मुद्दाम चिडवू लागले. "हरणार आहोत आपण चॅनेल बदला" इथपासून ते अगदी पार फिक्सिंगपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत होत्या. मी शांत होते. पण लगेचच 19 व्या ओव्हरला दिनेश मोंगियाची विकेट गेली आणि भारताला पुढचा धक्का बसला. बाबांनी पुन्हा टिमला नावं ठेवायला सुरुवात केली. विकेट गेलेल्या परवडल्या पण हि बडबड नको अशी आमची अवस्था झाली.  अचानक मला काय झाल काय माहिती मी पटकन बोलून गेले, "काहीही झालं तरी आजची मॅच आपणच जिंकणार”
माझ्या या वाक्यावर बाबा हसायला लागले.  मला अजूनच राग आला आणि मी म्हटल, "हो जिंकणार आपण लावताय पैज ?"
बाबा हसून म्हणाले, "चल लावली पैज भारत जिंकला तर दिले तुला शंभर रुपये. (आमच्याकडे बाबांबरोबरची पैज नेहमी एकतर्फीच असते.)
 भारत जिंकला तर शंभर रुपयांचा फायदा होणार होताच शिवाय "इज्जत का सवाल था".
   मोंगिया पाठोपाठ भारताचा 'द वॉल' द्रविड आणि सर्वेसर्वा सचिन तेंडूलकर बाद झाला. आता भारत मॅच हरणार यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा होता.
    मॅच संथ गतीने चालू होती. घनदाट अंधारात आशेचा किरण बनून आले ते  युवराज आणि कैफ. या दोघांनी मात्र संयमित खेळी करत विजयश्री अक्षरशः खेचून आणली. हे दोघे पीचवर असताना मैदानात अक्षरशः सन्नाटा होता. घरातल वातावरणाही निवळल होत. मधूनच बाबा हॉलमध्ये येउन मुद्दाम, "हे काय? इतकाच स्कोअर? कठीण आहे... अस म्हणून माझी चेष्टा करत होते. पण मी शांत बसले होते.
    बेचाळीसाव्या ओव्हरमध्ये युवराजची विकेट गेली आणि पुन्हा इंग्लंडच पारडं जड झाल. पण त्यानंतर मात्र कैफने बॉलर्सच्या जोडीने अवघड वाटणारा 326 धावांचा पल्ला मोठ्या आत्मविश्वासाने गाठला. शेवटच्या क्षणापर्यंत जीवात जीव नव्हता.  स्कोअर बोर्डवर 326 चा आकडा झळकला आणि पॅव्हेलियनमध्ये एकच जल्लोष झाला. भारताचा कर्णधार सौरभ गांगुलीने आपला शर्ट काढून हवेत फिरवला. बास ! दिल फिदा हो गया उसका ये ॲटीट्यूड देखकर.
       या सिरिजपूर्वी ॲंड्र्यू फ्लिंटॉपने वानखेडे स्टेडियमवर मॅच जिंकल्यावर अशाच प्रकारे  शर्ट काढून हवेत फिरवला होता. त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी त्यांच्याच देशात मिळाली आणि गांगुलीने या संधीच सोनं केल. इसे कहते हैं हिम्मत.... त्यावेळचा त्याचा ॲटीट्यूड, त्याचा कॉन्फिडन्स, त्याची एक्स्प्रेशन्स .... दिल जीत लीया  बंदेने....
        आजही आठवतोय तो क्षण. शेवटच्या क्षणापर्यंत मी श्वास रोखून बसले होते. India won by 2 Wickets …. हे वाक्य ऐकल आणि सुटकेचा निश्वास टाकला. या मॅचबरोबर आपण नॅटवेस्ट सिरिजही जिंकली (आणि मी शंभर रुपये). मोहम्मद कैफ मॅन ऑफ द मॅच ठरला. खरतर हा सांघिक विजय होता. पण तरीही या विजयाचा खरा हिरो ठरला तो सौरव गांगुली. #रिव्हेंज हा पॉझिटिव्ह असू शकतो हे तेव्हा पहिल्यांदा जाणवल.
©मानसी जोशी






Tuesday, 3 July 2018

दुनियादारी

दुनियादारी
लेखक: सुहास शिरवळकर

आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबद्दल लिहयचं ठरवलं तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर दोन नावं आली. एक म्हणजे मृत्युंजय आणि दुसरं म्हणजे दुनियादारी. मृत्यूंजय वाचनाताही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं, तिथे त्या पुस्तकावर लिहिणं म्हणजे माझ्यासाठी कर्मकठीण. दुनियादारी मात्र सहज, सोपी, मनात घर करुन राहिलेली कादंबरी आहे. फर्स्ट इअरला असताना वाचलेली ही कादंबरी मनाला एवढी भावली होती की काही दिवसांनी पुन्हा लायब्ररीतून ती कादंबरी आणून वाचली होती. प्रत्येकाला आपल्या ‘गोल्डन डेज’ म्हणजेच कॉलेज जीवनात घेऊन जाणारी ही कादंबरी जेवढं हसवते तेवढंच मनाला हळवं करुन स्पर्श करते. स्वप्नापासून सत्यापर्यंत नेणारी ही कादंबरी कुठेही आपला ट्रॅक सोडत नाही आणि आपण स्वप्नातून वास्तवात कधी येतो ते आपलं आपल्यालाही समजत नाही. या कादंबरीबद्दल लिहिणं म्हणजे माझ्यासाठी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. तरीही मी प्रयत्न करते.

दुनियादारी! ही कहाणी आहे श्रेयसची. श्रेयस तळवलकर या प्रमुख पात्राभोवती फिरणाऱ्या या कादंबरीत पुढे अनेक व्यक्तिरेखा येतात. ही कादंबरी वाचणारा जवळपास प्रत्येकाजण यातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखेशी स्वतःला रिलेट करत रहातो.

    पुण्याच्या SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेला मुंबईचा साधा, सरळ, निरागस, हुशार मुलगा श्रेयस सुरुवातीला सिनिअर्सकडून होणारं रॅगिंग सहन करतो. पण पुढे जाऊन श्रेयस या रॅंगिंग ग्रूपचाच एक भाग होतो.  या ग्रूपचा लिडर दिग्या उर्फ डीएसपी आणि श्रेयस एकमेकांचे खास मित्र बनतात. मित्रासाठी जीव टाकणारा दिग्या कादंबरी वाचून झाल्यावरही डोक्यातून जात नाही. या कादंबरीमध्ये अजून एक महत्वाची व्यक्तीरेखा आहे ती म्हणजे साईनाथ. दिग्या आणि साईनाथ हे एकेकाळचे खास मित्र अचानक एकमेकांचे जानी दुश्मन बनतात. या दोघांची दुश्मनी  संपूर्ण कॉलेजला माहिती असते पण त्याच कारण मात्र  कोणालाच माहितीनसतं.
       दिग्या आणि गॅंगबरोबर झालेली श्रेयसची दोस्ती त्याच्या आयुष्याला, व्यक्तिमत्वाला एक वेगळं वळण देते. श्रीमंत घरातला श्रेयस, आई-वडिलांच्या बिघडलेल्या संबंधामुळे घरापासून दूर रहायचं ठरवून मुंबईहून पुण्याला येतो. निरागस एकाकी श्रेयसला दिग्याच्या रुपाने एक जवळचा मित्र मिळतो. दिग्या आणि साईनाथ या दोघांना धरुन ठेवणारा पण प्रत्यक्षात कोणाचाच नसणारा अश्क्या, दिग्याची प्रेयसी सुरेखा, साईनाथची बहीण अशी अनेक पात्रे या कादंबरीत येतात.

      श्रेयसच्या आयुष्यात प्रेमाची हळूवार जाणीव घेऊन आलेल्या मीनू आणि शिरीन वाचताना मात्र हरवून जायला होतं. वयाने मोठी असणारी आकर्षक शिरीन आणि अल्लड मीनू यापैकी आपल प्रेम नक्की कोणावर आहे याचं उत्तर शोधणाऱ्या श्रेयसच्या विवाहाच वळण हे धक्कादायक नसल तरी काहीसं अनपेक्षित आहे.

     श्रेयसच्या आयुष्यात आलेली अजून एक महत्वाची व्यक्तीरेखा म्हणजे MK; प्रचंड हुशार माणूस पण एक  असफल प्रेमी. प्रेयसीच्या आठवणीत सतत दारुमध्ये बुडालेल्या  MK ची व्यक्तीरेखा कथेमध्ये अधूनमधून डोकावत रहाते. MK चा मृत्यू झाल्यावरही ही व्यक्तिरेखा काही डोक्यातून जात नाही. याच कारण म्हणजे काहीस अपेक्षित असणारं पण मनाला स्पर्शून जाणारं आणि कथेच्या शेवटी समजणारं MK बद्दलच एक सत्य!

     असं म्हणतात की कथेचा/कादंबरीचा  शेवट नेहमी मनाला स्पर्श करणारा हवा तर कथा/कादंबरी  संस्मरणीय होते. पण दुनियादारीबद्दल बोलायचं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कादंबरी संस्मरणीय आहे. ही कादंबरी वाचताना यातील प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करते. प्रत्येक व्यक्तिरेखा जीवंत व्यक्तिरेखा वाटावी इतक्या सुंदर पद्धतीने ती उभी केलेली आहे. यातल्या प्रत्येक व्यक्तीरेेखेबद्दल लिहायल गेल तर ही पोस्ट "क्रमशः" लिहावी लागेल.
   
     दुनियादारी चित्रपट हा फक्त या कादंबरीवर बेतलेला आहे. मूळ कथानकामध्ये आणि काही व्यक्तिरेखांमध्ये केलेल्या बदलांमुळे प्रत्यक्षात हा चित्रपट कादंबरीच्या आसपासही फिरकू शकला नाही. दुनियादारी वाचयचं असेल तर चित्रपट डोक्यातून बाजूला ठेवूनच वाचायला हवं. सुदैवाने मी हे पुस्तक चित्रपट यायच्या खूप आधी वाचलेलं असल्यामुळे मला अस्सल दर्जेदार पुस्तकाचा आस्वाद घेता आला.
     काही कलाकृती या इतक्या दर्जेदार असतात की त्या ‘न भूतो न भविष्यती’ या प्रकारातल्या असतात. दुनियादारी ही त्यातलीच एक कलाकृती आहे.

©मानसी जोशी

Thursday, 21 June 2018

शब्द एक अर्थ अनेक

लहानपणापासूनच एक गोष्ट आपण वारंवार करत असतो ती म्हणजे #पडणे. अगदी लहान बाळ असताना "पालथ" पडण्यापासून सुरुवात होते. मग पडत धडपडत मुल चालायला शिकत.
थोड मोठ झाल्यावर खेळताना पडत तर कधी सायकल शिकताना पडत. लहान वयात दात पडतात.
सायकल नंतर जबरदस्त क्रेझ असते ती टू व्हिलर शिकण्याची. सायकल चालवण्याचा अनुभव असल्यामुळे गाडी शिकताना पडण्याचे प्रकार तसे कमी होतात. पण गाडी शिकल्यानंतर पडण्याची वेळ येऊ शकते; खास करुन चालवणाऱ्या मुलासमोर एखादी सुंदर मुलगी आली तर!
पुढे तरुण वयात प्रेमात पडतात.
इथे इंग्लिश भाषाही आपली बरोबरी करते. इंग्लिशमध्येही प्रेमात पडल्यावर fall in love म्हणतात. हिंदीत मात्र "प्यार हो जाता जाता है" पण प्रेमातल्या दु:खाबद्दल बोलताना मात्र "जख्म, दर्द असे शब्द वापरतात.
मग शिक्षण पूर्ण करता करता करिअरच्या विचारात पडतात
लग्न झाल्यावर संसारात पडतात...
पुन्हा मुल झाली की काळजीत पडतात..
कधी झोप आलेली नसते  पण दमायला झालेल असत त्यामुळे आपण थोड पडतो.  इंग्लिशमध्ये झोपेसंदर्भात बोलताना fall a sleep हा शब्दप्रयोग वापरला जातो.
 बाकी बोलीभाषेत किंवा शुद्धभाषेतही पडणे हा शब्द अनेक अर्थाने  वापरला जातो. जस की
काही लोकं गळ्यात पडतात...
काही डोक्यावर पडतात ....
काही तोंडावर पडतात....
आपल्याला स्वप्न पडतात...
आपल्याला प्रश्न पडतात...
उन पडत, पाऊस पडतो, गारा पडतात,  थंडी पडते.
नाटकात पडदा पडतो; कधीकधी नाटकही पडत. चित्रपट पडतो, कलाकार पडतो...
काही ठिकाणी तर नंबरही पडतात.
आणि लास्ट बट नॉट लिस्ट निवडणूकीमध्ये उमेद्वारही पडतात.
©मानसी जोशी








Tuesday, 19 June 2018

कथा - मिस्टर मॅच

रिते सूर आता इथे या उराशी
जरा सोबतीला मनाच्या तळाशी
राहशील का?...
   गाण्यातल्या या ओळीने तिला अंतर्मुख केल. कितीतरी वेळ ती या एका ओळीचाच विचार करत होती.
   संध्याकाळी मीताबरोबर म्हणजेच तिच्या जीवलग मैत्रीणीबरोबर समुद्रकिनारी फिरायला गेली तेव्हाही समुद्राच्या लाटांकडे एकटक बघत शांत बसून होती. लाटांसोबत हेलकावे खाणारी सूर्याची सोनेरी किरणे आणि समुद्रावरचा गार वारा हे सार अनुभवत शांत बसून राहणं तिला प्रचंड आवडायचा. आजही ती तेच करत होती पण तिच मात्र लाटांकडे अजिबात लक्ष नव्हत. तिला  सतत गाण्यातली "ती" एकच ओळ आठवत होती. 
"काय ग लक्ष कुठे आहे तुझ?"  मीता.
"ब्रेक अप झाल्यावर कस वाटत असेल ग?" तिने लाटांवरची नजरही न हटवता  विचारल.
"काय? वेडी आहेस का तू? काहीही काय विचारतेस? आणि माझ कुठे ब्रेकअप झाल आहे, मला माहिती असायला”, मीता.
"आज पहिल्यांदाच गाणं  ऐकताना  गाण्याच्या म्युझिकपेक्षा,  रिदमपेक्षा त्यातले शब्द जास्त भावले मला. का कुणास ठावूक पण एक अनिवार ओढ जाणवली गाण्याच्या त्या शब्दांमध्ये.
      मावशी नेहमी म्हणते, "कसली ती आजकालची गाणी धागडधिंगा नुसता. गाणं कस असावं; अगदी हृदयाला स्पर्श करणारं.. गाणं संपल तरी त्याचे शब्द मनात घोळत राहिले पाहिजेत”.  आज मावशीच्या बोलण्याचा अर्थ पहिल्यांदा जाणवला मला. आजपर्यंत सतत रॉक म्युझिक ऐकणारी मी आज एका शांत, मराठी गाण्यात खास करुन गाण्याच्या त्या एका ओळीत हरवून गेले ग”, ती.
   "तू काय बोलतेयस मला काहीच कळत नाही आहे. पण तुझ अस हे हरवून जाण मला नवीन नाही. एखादा विषय डोक्यात घेतलास की सहजी सोडत नाहीस तू" , मीता.
   "मला एकच कळतय जेव्हा ब्रेक अप होतो ना तेव्हा ते दु:ख आयुष्यभराच असत. अस म्हणतात की काळ सगळ्या जखमा भरुन काढतो. पण हे दु:ख मात्र कितीही काळ सरला तरी भरुन येत नाही. अंतर्मनात तसच राहतं आणि कधीकधी आठवणींच्या रुपाने पुन्हा भूतकाळ डोळ्यासमोर येतो. आजपर्यंत अनेकजणांच्या ब्रेक अप बद्दल ऐकल होत  पण कधी या गोष्टीचा सिरिअसली विचार केला नाही ग", ती.
  "मॅडम आपण सिंगल आहोत अजून. अरे यार कोई मिलने तो दो .. .. प्यार  को हो  जाने दो ....पहेलेसेही ब्रेक अप की बाते ...... सोडना यार चल मस्त भेळ खाऊया आणि निघूया”. मीता
    यानंतर मात्र ती प्रत्येक गाण्याचे शब्द लक्षपूर्वक ऐकू लागली. तिला जाणवल,  एखादा गायक जेव्हा गाण्यातले शब्द, त्यातल्या भावना समजून घेऊन गाणं गातो तेव्हा त्याच गाणं थेट हृदयाला स्पर्श करत."
    ती अशीच होती म्हटल तर सोशल सगळ्यांमध्ये मिसळणारी तर कधी तासनतास स्वतःमध्येच हरवून जाणारी. तिला समजून घेण एवढ सोप नव्हतं. पण तरीही ती खूप गोड होती. कोणाला मदतीची गरज असली की लगेच तत्पर असायची. ग्रूपमधल्या प्रत्येकाची सिक्रेट्स तिला माहिती होती. पण तिची काही सिक्रेट्स मात्र फक्त तिलाच माहिती होती. तशी ती अबोल नव्हतीच कधी पण ओळखी करुन घेण, ओळखी वाढवण या गोष्टी कधी जमल्याच नाहीत तिला. पण तिच्या "मिस्टर मॅच"ची मात्र ती आतुरतेने वाट बघत होती. प्रत्येकाच्या मनात असते तशी तिच्याही मनात त्याची अशी एक इमेज होती.
   अशातच तिच्या आयुष्यात 'तो' आला. त्याला 'ती' खूपच आवडली. तो एकदम आयडिअल कॅटेगरीतला; साधा, सरळ, हॅंडसम, वेल सेटल्ड, वेल एज्युकेटेड मुलगा. थोडक्यात "कंप्लीट मॅरेज मटेरिअल!" 
   एका कॉमन मित्राच्या घरी त्या दोघांची ओळख झाली. 'ती पहाताच बाला... ' अशी त्याची अवस्था झाली. हळूहळू ओळख वाढत गेली आणि तो तिच्यात गुंतत गेला. अखेर हिम्मत करुन त्याने तिला प्रपोज केल. तिच्यासाठी हा सुखद धक्का होता. पण तिच्या मनात त्याच्यासाठी कुठल्याच भावना नव्हत्या. ती तर त्याला जवळचा मित्रही मानत नव्हती. प्रेम वगैरे तर खूप दूरची गोष्ट होती. पण अशावेळी मित्र मैत्रीणी मात्र कार्यतत्पर असल्याप्रमाणे मध्यस्ती करतात. त्यात कॉमन फ्रेंड असतील तर त्यांची कार्यतत्परता तर आवर्जून दिसून येते. इथेही तसच झाल.
"किती चांगला मुलगा आहे. शोधून सुद्धा तुला असा मुलगा मिळणार नाही”
"काय पाहिजे अजून तुला? हॅन्डसम आहे, रिच आहे, वेल एज्युकेटेड आहे आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर मनापासून प्रेम करतो."
"अरे यार!!! अशा मुलाने मला प्रपोज केल असत तर मी एका क्षणाचाही विचार केला नसता.
     अशा एक ना अनेक वाक्यांचा भडीमार तिच्यावर होत होता. अशातच एका निवांत संध्याकाळी त्याचा कॉल आला. रिसीव्ह करु की नको विचार करता करता कस कुणास ठावूक पण तिने त्याचा कॉल घेतला.
    त्याला प्रमोशन मिळाल होत आणि हा आनंद त्याला तिच्यासोबत सेलिब्रेट करायचा होता. हो नाही करत अखेर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भेटायच ठरल.
    ती संध्याकाळ तिच आयुष्य बदलणारी ठरली. महागड रेस्टॉरंट, तिथल मंद म्युझिक आणि एकूणच रोमॅन्टिक वातावरण. तस तिने त्याला नकार दिला असला तरी तो तिला आवडत नव्हता असही नव्हत. पण ती त्याच्या प्रेमात वगैरे पडली नव्हती.
    खूप छान बोलत होता तो. त्याच्याबद्दल बरच काही सांगत होता. अर्थात बऱ्याच जणांची सिक्रेट्स शेअर करायची सवय असणाऱ्या तिच्यासाठी हे काही नवीन नव्हत. बोलता बोलता तो एकदम भावूक झाला आणि म्हणाला, "मी खरच खूप मनापासून प्रेम करतो तुझ्यावर. माझ्या आयुष्यातली मला आवडलेली तू एकमेव मुलगी आहेस. तू भेटायच्या आधी मी फक्त आणि फक्त करिअर, सक्सेस याचाच विचार केला. पण तू भेटलीस आणि माझ आयुष्यच बदलल. आयुष्य कधी कठीण, बोअरिंग कधीच नव्हत  पण तू भेटल्यावर मात्र ते खूप सुंदर असत हे नव्याने जाणवल. तुला हवा तितका वेळ घे मी तुझी वाट बघतोय”.
    तिला त्याच्यातला, त्याच्या प्रेमातला खरेपणा जाणवला. त्यानंतर मात्र ती गंभीरपणे त्याचा विचार करु लागली. मित्र मैत्रीणी तर तिला होकार दे असच समजावत होते.  पण तिच्या मनातल्या मिस्टर मॅच च्या इमेजमध्ये तो बसत नव्हता. तिला तिच अंतर्मन काही वेगळच सांगत होत.
    तिच्या मनातले विचार संपत नव्हते. आई सतत म्हणते, ' लग्न म्हटल की थोडफार ॲडजस्ट करावच लागत.'
 मीता तर नेहमी म्हणते, 'आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशी लग्न केल तर आपण जास्त सुखी होतो".
"पण मला काय वाटतय? मी प्रेम करते का त्याच्यावर?
 प्रेम म्हणजे नक्की काय असत? तो अगदी छान आहे,  पण मला हवा तसा आहे का? 
त्याच्या आठवणीत कधीही हरवून जात नाही मी. त्याची कंपनी खूप आवडते. तो सुद्धा खूप आवडतो; पण का त्याच्याबद्दल कुठलीही ओढ जाणवत नाही मला? खरच कोणी 'मिस्टर मॅच' भेटेल का मला ? का आई म्हणते तस ........."
एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते.  गोंधळलेल्या तिने अखेर त्याला होकार दिला. आणि ती वर्षभरातच त्याची सौ. झाली.
     लग्नानंतर होतात तशा थोड्याफार कुरबुरी होत असल्या तरी एकूणच संसार सुखात चालला होता. तिनेही आपण त्याच्यावर प्रेम करतो अशी मनाची समजूत घातली होती. कधीकधी मनात विचार यायचा, 'आपण खरच प्रेम करतो का याच्यावर?' पण या प्रश्नाच उत्तर शोधायचा तिने कधी प्रयत्नच केला नाही. खरतर  तिला उत्तर शोधायची भीती वाटायची.
     काही वर्ष सरली. तो त्याच्या करिअरमध्ये बिझी झाला होता. तिच्याजवळही सार काही होत. करिअर, घर, गाडी, संसार आणि दोन गुणी मुल. पण तरीही कुठेतरी काहीतरी कमी आहे हे तिला सतत जाणवत होत. ती उत्साहाचा अखंड वाहणारा झरा तर तो शांत, अथांग सागर; मनाचा थांगपत्ता न लागणारा. सतत आपल्याच कोषात जगणारा. कुठेच ताळमेळ जमत नव्हता. तरीही ती सगळ सांभाळून घेत होती.  हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. आपण त्याच्यावर प्रेम करतोय, आपण सुखात आहोत अस स्वतःलाच समजावत होती. तो तर सुस्वभावी, शांत आणि  विचारी होता. तिच्यावर मनापासून प्रेम करत होता.
       आयुष्य कधी कुठल वळण घेईल हे काही सांगता येत नाही. तिचही तसच झाल. तिच्या आयुष्यात अजून एक 'तो' आला. तो ऑफिसमध्ये नव्याने रुजू झाला होता. त्याचे आणि तिचे विचार जुळले, सूर जुळले. मनं जुळली. आधी मैत्री मग प्रेम असा प्रवास सुरु झाला. माहिती होतं तिला या नात्याला काहीच भविष्य नाही तरीही हे नातं तिला गमवायच नव्हतं. आयुष्यात पहिल्यांदा तिला प्रेमाची जाणीव झाली होती. प्रेम म्हणजे काय? ती ओढ काय असते? नक्की कुठल्या भावना असतात ? या साऱ्या प्रश्नांची उत्तर तिला मिळाली होती. ती हुरहूर, धडधड हे सार ती आयुष्यात प्रथमच अनुभवत होती. ती त्याच्यामध्ये आयुष्याचा जोडीदार नाही पण एक  जीवलग शोधत होती. त्याच्याशी ती प्रत्येक गोष्ट शेअर करायची. तिची अनेक सिक्रेट्स जी मीतालाही माहीती नव्हती ती तिने त्याला सांगितली होती. त्यालाही ती मनापासून आवडायची. खूप सुंदर नातं तयार झाल होत दोघांमध्ये पण तरीही मनातल प्रेम कधीच कोणी व्यक्त केल नाही. न बोलताच दोघांना एकमेकांच्या मनातल  सार काही कळल होत.
    तिला हे नात  शांतपणे, हळूवारपणे फुलवायच होत. एक निरपेक्ष नातं जपायच होत. कधी कधी तिच्या मनात यायच, "आपल काही चुकत तर नाही ना? आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आपल्या सज्जन नवऱ्याची फसवणूक होत नाहीये ना? "
फसवणूक?? इतकी वर्ष त्याच्यावर प्रेम आहे असा समज करुन  स्वतःला आणि पर्यायाने त्यालाही फसवत आले. आता तरी स्वतःची फसवणूक नको. मी कुठल्याही मर्यादा ओलांडत नाहीये. ओलांडणारही नाही. पण नकळत मनात निर्माण झालेल्या प्रेमाच्या भावना थांबवू पण शकत नाही. खरतर मला थांबवायच्या नाहीयेत. कारण यातलं काहीही ठरवून घडलेल नाही. जे काही आहे ते १००% नैसर्गिक आहे; आणि म्हणूनच कोणाला काहीही वाटल तरी माझ्या दृष्टीने यात काहीही चुकीच नाही.
   एखाद प्रसिद्ध गाण कितीही छान असल तरीही ते मनाची पकड घेत नाही तर कधीकधी एखाद सहज ऐकलेल एखाद साध गाणही मनाला स्पर्श करत. अगदी तसच असत नात्यांचही. एखाद्याशी जन्मजन्मांतरीसाठी नात जुळल तरीही कुठेतरी काहीतरी कमी जाणवते. तर कधी एखाद्याशी अगदी सहज सूर जुळतात अगदी जन्मजन्मांतरीची ओळख असल्यासारख! त्या नात्याला काही नाव नसत पण तरीही ते हवहवस वाटत. खरतर नात्याला कुठल नाव नकोच द्यायला; नात्याला नाव दिल की त्याच्या जोडीने येणारी अनेक नाती निभावावी लागतात आणि मग ते नात फक्त दोघांच रहात नाही.
    या नवीन नात्यामध्ये मला एक मित्र, एक जीवलग सार काही सापडलय. मिस्टर मॅच सापडलाय. काय गरज आहे मिस्टर मॅच फक्त लग्नासाठीच शोधायची? शरीरा पलीकडे जाऊन एक मन असत. या मनाला कधी, काय आवडेल ते सांगता येत नाही. कधी कुठे गुंतायच हे आपण ठरवू शकत नाही. या मनाला गरज असते समजून घेणाऱ्या एका मनाची. हे नातं मनाच मनाशी जुळलेले नातं आहे. ते चुकीच कस असू शकेल ?
    स्वतःच्या विचारांमध्येच हरवलेली असताना अचानक तिच्या कानावर गाण्याचे सूर ऐकू येतात-
"नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मितवा...."
©मानसी जोशी









Thursday, 7 June 2018

छोटी छोटी बाते

काही दिवसांपूर्वी सकाळी एक मॅडम वन वे तून रॉंग साईडने वेगाने गाडी चालवत समोरून आल्या. सकाळची वेळ त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते त्यामुळे माझ्याही गाडीचा स्पीड काही कमी नव्हता. पण सुदैवाने माझी गाडी कंट्रोल झाली आणि अपघात टळला. गाडी थांबवल्यानंतर त्या मॅडम चिडून मलाच म्हणतात, "किती स्पीडमध्ये गाडी चालवता?"
  यावर मी शांतपणे म्हटल, "तुम्ही रॉंग साईडने गाडी चालवताय मॅडम.. "
    यावर मात्र मॅडम गप्प राहिल्या आणि शांतपणे निघून गेल्या.
    घरी आल्यानंतर हे सगळ अहोंना सांगत असताना, मी रागारागाने म्हणाले, एवढ्या महागड्या गाड्या घेतात पण साधे ट्रॅफिक रुल्स फॉलो करता येत नाहीत या माणसांना.. आणि वरती मलाच म्हणते, "गाडी स्पीडमध्ये चालवता...म्हणून
     यावर बाजूला बसलेली माझी लेक मला म्हणाली, "आई, तू कधीच ट्रफिक रुल्स तोडले  नाहीस आजपर्यंत?"
      या प्रश्नाने मात्र माझ्या डोक्याचा चढलेला पारा झटकन खाली आला. खरतर मी नेहमी ट्रॅफिक रुल्स फॉलो करते. पण कधीकधी घाईगडबडीत असताना सिग्नल लाल झाला तरी बाकीच गाड्यांबरोबर मी माझीही गाडी दामटवते.
      कॉलेजला असताना मैत्रीणीशी गप्पा मारत गाडी चालवत असताना  नव्यानेच चालू झालेला सिग्नल तोडला होता. ट्रॅफिक हवालदारने थांबवल्यावर मनातून खूप भीती वाटली होती. टॅफिक हवालदारने लायसन ताब्यात घेतल. पोलिसांनी पकडण्याची पहिलीच वेळ. त्यामुळे प्रचंड घाबरले होते. तेव्हा मोबाईलही नव्हते की सहज कोणाला फोन करु शकेन. त्यावेळी प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे अस सांगून कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली होती.  बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा घरचे ओरडतील आणि गाडीची किल्ली काढून घेतील; ही भीती जास्त होती.
    एकदा एका मैत्रीणीची गाडी बंद पडली म्हणून कॉलेजला जाताना तिलाही गाडीवर घेतल. एक मैत्रीण आधीच माझ्याबरोबर होती. सकाळी कुठे असतात पोलिस असा विचार करुन  एका गाडीवर तिघीजणी बसून  कॉलेजला जात असताना नेमका ट्रॅफिक पोलिस समोर. खरतर एवढ्या सकाळी कधी ट्रफिक पोलिस नसायचे रस्त्यावर. पण म्हणतात ना, 'अपना तो बॅडलक ही खराब हैं ... ..
 पोलिस काही बोलणार इतक्यात मी म्हटल,  "ओ काका जाऊद्या ना परीक्षा चालू आहे."
   यावर ट्रॅफिक पोलीसही वैतागून म्हणाले, "जा आणि जाताना अजून दोघींना गाडीवर बसवून घेऊन जा... "
    खरतर परीक्षा वगैरे काही चालू नव्हती पण जरा साळसूदपणाचा आव आणून रडवेल्या चेहऱ्याने बोलले इतकच.
     एकदा ट्रॅफिकमधून  रॉंग साईडने ओव्हरटेक करताना अचानक सिग्नल पडला. गाडी थांबवताना एका कोऱ्या करकरीत होन्डा सिटीच्या आरशाला माझ्या गाडीचा आरसा लागला. सुदैवाने काही झाल नाही पण ड्रायव्हिंग सीटवरच्या माणसाने माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. तो काही बोलायच्या आधीच मी शांतपणे 'सॉरी' म्हणाले. सॉरी ऐकून तो ही  हसून हात करुन, "नो प्रॉब्लेम" म्हणाला. एका 'सॉरी' या शब्दामुळे त्याच्या रागाचा पारा खाली होता.

काही दिवसांपूर्वी भाजी घ्यायला गेले होते. भाज्या भरपूर महाग झाल्या होत्या.
"फ्लॉवर कसा?"
"४० रुपये पाव", भाजीवाला
"काय स्वतःसकट रेट लावलास की काय?" माझ्या बाजूच्या मॅडमनी विचारल.
     यावर मात्र भाजीवाला भडकला आणि भाजीच्या दरांपासून पेट्रोल, ट्रान्सपोर्ट, ट्रॅफिक प्रॉब्लेम्स, राजकारणी यावर तावातावाने बोलू लागला. आता हा इकॉनॉमिक्समध्ये घुसतोय की काय या भीतीने मी विचारल.
" गवार कशी ?"
"६० रुपये पाव"
"काय ?" माझ्या बाजूच्या मॅडम जवळपास किंचाळल्याच.
  " गवारीला बहुदा बायको पोरांसकट रेट लावलाय". मी
यावर मात्र भाजीवाल्यालाही हसायला आल आणि तो इकॉनॉमिक्सपर्यंत पोचता पोचता वळून पुन्हा भाजीपाशी आला.
 
 आमची कन्यका खेळता खेळता भांडण झाल म्हणून चिडून घरी निघून आली. घरी आल्यावर भांडणाचा इतिवृत्तांत कथन करुन झाल्यावरही मॅडम काही शांत बसत नव्हत्या. शेवटी वैतागून मी म्हटल,  "बास ग जाऊदे आता शांत बस."
   यावर आधीच चिडलेली लेक अजून चिडली आणि म्हणाली, "नाही मला खूप राग आलाय मी शांत बसणार नाही".
   यावर अहो पटकन म्हणाले, "बरं शांत बसू नकोस, शांत उभी रहा." 
    त्याच्या या बोलण्यावर मात्र आम्हाला दोघींनाही हसायला आल.
     आयुष्याच्या प्रवासात अशी अनेक छोटी छोटी बाते घडत असतात. जी आठवून नेहमीच चेहऱ्यावर हसू उमटत.
©मानसी जोशी
 




Saturday, 14 April 2018

एका आईचे मनोगत

बास करा एका निष्पाप मुलीच्या दु:खद कहाणीचा राजकारणासाठी, टीआरपीसाठी वापर करणे. आधी निर्भया आता असिफा आणि न जाणो अशा अजून किती असतील?
    बलात्काऱ्याला आणि पीडिताला जात, धर्म नसतो. एकाची असते ती गलिच्छ वासना आणि दुसरी असते ती त्या वासनेला  बळी पडलेली निष्पाप कळी.
     सत्ताधारी आणि विरोधी दोघेही या प्रसंगाचा आपआपल्या पक्षासाठी वापर करुन घेणार. मीडिया सतत तेच तेच दाखवून आपला टिआरपी वाढवायचा प्रयत्न करणार. उद्या न्याय मिळेलही आसिफाला, जसा निर्भयाला मिळाला; पण तिच्या आई वडिलांच काय ? त्यांना त्यांची मुलगी कधीच परत मिळणार नाही.
     असिफाच्या जागी पूजा, जसविंदर, ज्यूली  कोणीही असू शकत. कधी त्यांच्या कपड्यांवर टिका/ चर्चा तर कधी त्यांच्या धर्मावर .. पण कधीतरी विचार करा त्या जीवाचे किती हाल होत असतील. मन, शरीर, आत्मा सगळ्याचीच अवहेलना, कूचेष्टा सहन करताना काय परीस्थीती ओढावत असेल त्या निष्पाप जीवावर?
       "मन चिंती ते वैरी न चिंती" असं म्हणतात ते खरच आहे. कधीकधी मनात विचार येतो,  "या जागी आपली मुलगी असती तर?" काळजात धस्स होतं मग.... ज्या गोष्टीची कल्पनाही सहन करु शकत नाही ती गोष्ट कोणाच्यातरी लेकीच्या बाबतीत घडलेय .... नाही नाही .....कल्पनाच करु शकत नाही मी त्या आई-वडिलांच्या दु:खाची. ज्या मुलीला नऊ महिने आपल्या पोटात वाढवल आणि त्यानंतर आठ वर्ष फुलासारख जपल, तिच्यासाठी अगणित स्वप्न पाहिली ... त्या लेकीची अशी अवस्था?.... कस सहन करत असेल ती माऊली? असं म्हणतात, 'एक पुरुष आयुष्यात सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करत असेल तर ते आपल्या मुलीवर.' काय अवस्था झाली असेल त्या बापाची आपल्या मुलीच शव बघितल्यावर?
      अशा दु:खद घटनांचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करण्याची प्रवृत्ती खरच चीड आणणारी आहे. मी कुठल्याही पक्षाची समर्थक नाही. मला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही. मी एका मुलीची आई आहे आणि अशा प्रसंगानंतर एका आईच्या मनात ज्या गोष्टी येत असतील त्याच गोष्टी माझ्या मनात आल्या. जे घडल ते खूपच दूर्दैवी होत पण त्याहीपेक्षा या घटनेच  स्वार्थासाठी जे भांडवल केल जातय  ते यापेक्षाही दु:खद आहे.
  आपण चार दिवस चर्चा करु, काही जण नराधमांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून मोर्चे निघतील तिथेही पुन्हा दगडफेक, जाळपोळ यासारखे प्रकार घडतील, पण पुढे काय? मुळात ही नीच प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे यासाठी काय करता येइल याचा निदान विचार तरी करतो का आपण? खरच हा विचार करायला हवा अस नाही वाटत तुम्हाला ?

©मानसी जोशी

Thursday, 12 April 2018

Law

                           Law

Law! Law is the base of judicial system of every country. There are too many definitions of law  available in various books. But simple definition of law is, “Law is nothing but common sense.”
   Law is a set of rules which must be followed  by each & every citizen of the country, for smooth functioning & running of the society.
  
  Constitution!  A constitution is a set of fundamental principles or established precedents according to which a state or other organization is governed. Constitution is the base of every law. Lawful remedies, rules & regulations and basic principles of laws are defined in the constitution. Every country has its own Constitution. Sometimes it become necessary to make changes into the law or laws of the nation. That changes should be made by following fundamental principles of the constitution. Sometimes it is required to declare National emergency on the basis of external aggression or armed rebellion;  this time top authority has empowered by extraordinary powers, by constitution. It is not easy to make changes into the constitution of the country. Constitution is most important part of the judiciary system.

     Legal language! It is one of the important aspect of every law. This language is different from spoken language. Every law is written by using legal language. Legal language is little bit complicated to understand. It may create chaos into the mind of general public. But person who studied or studying the law can easily understand the legal language and its importance. It is necessary to cover each & every meaning of the word/ sentence while writing laws to avoid double meaning of the word/sentence.
  Why  legal language is necessary ? In simple words, culprit should not get free by taking undue  advantage of another meaning of words/ sentence of the provisions/ sections of the law.

   Each country has its own judiciary system and set of rules. Basic concept of Jurisprudence is, “100 culprits may let go free but no innocent should be punished.” Almost all  countries follows this basic principle of jurisprudence while making laws of the country.

  In India there are two ways to become a law graduate. Students can start Law course after 12th (5 years course) and after graduation ( 3 years course). Admission procedure is not so easy. Students should have to clear entrance exam to seek the admission. After successful completion of law course students will become eligible to get  license from ‘Bar council’ of the state to start legal practice. The law degree also have local, international, and world-wide aspects. Becoming an international law attorney requires completing at least a Juris Doctorate (J.D.) degree program with courses in comparative or international law. Some international law professionals go on to pursue a Master of Laws (LL.M.), adding an additional 12-18 months of education.

  As a already said, Law is nothing but common sense. But tragedy is that this common sense is usually uncommon.  People should aware about the rules & regulations of the society, rights & duties towards the society. It is not wrong if I said legal education is necessary to each & every citizen of the country. We must know laws of our country.

©Manasi joshi
  
 






Tuesday, 10 April 2018

उन्हाळी सुट्टी आणि मी

संपली एकदाची परीक्षा!
आता सुट्टी!
माझ्यासाठी एक परीक्षा संपली दुसरी सुरु झाली. आता पसारे, मस्ती, धुडगूस, सगळं चालू.
सुदैवाने आमच्या सोसायटीमध्ये लेकीच्या वयाची  भरपूर मुलं आहेत त्यामुळे "सुट्टीत काय?" हा प्रश्न मला अजिबात पडत नाही. वेगवेगळे खेळ, भांडणं,छोट्या पार्टीज आता सुरु होतील.

   उन्हाळी सुट्टी लागली की हमखास nostalgic व्हायला होतं. आजकाल मुलांना खेळायला वेगवेगळे गेम्स उपलब्ध आहेत. आमच्या वेळी कॅरम, पत्ते, बुद्धिबळ, नवा व्यापार एवढेच गेम आम्हाला माहिती होते. त्यात पत्ते सगळ्यांच्या आवडीचे. खेळायला मेंबर्स जास्त असल्यामुळे बाकीच्या इतर खेळांपेक्षा पत्ते जास्त खेळले जात. मेंढीकोट, लॅडिज, झब्बू, बदाम सात किती प्रकार खेळायचो आम्ही.  दिवसा पत्ते, संध्याकाळी क्रिकेट किंवा समुद्र. समुद्रावर जायच म्हणजे भेळ खाल्लाशिवाय परत यायच नाही असा जणू नियमच होता. पुन्हा रात्री पत्ते.. खेळताना भांडणं ,पत्ते फेकणं, रडारड हे सगळ अनेकदा घडायच. मग घरातली कोणीतरी मोठी व्यक्ती या भांडणांमुळे वैतागून खेळ बंद करायची. मग कॅरम किंवा बाकीचे डाव मांडले जायचे.

    आमच मुळ घर देवगडला त्यामुळे आईच्या शाळेला सुट्टी लागली की आम्ही तिकडे जायचो. तिकडे  गेल्यावर  नुसती धमाल असायची. सकाळी निरशा दुधाचा चहा घेऊन आजीबरोबर रतांबे(कोकम) किंवा काजू गोळा करायला जायच. दुपारी बारा वाजता नैवेद्य झाला की हसत खेळत जेवणं व्हायची. जेवणात जवळपास रोजच आमरस असायचा. "पानात वाढलेल काही टाकायच नाही" हा नियम ठरलेला. या नियमामुळे मात्र मी एकदा रडत  रडत वांग्याची भाजी पाण्याबरोबर अक्षरशः गिळली होती. जेवणानंतर मग  झोपाळ्यावर  बसून गप्पा रंगायच्या. आठवड्यातून दोन दिवस आंबे घेऊन जाणारा ट्रक यायचा; मग दुपारी आंबा कॅनिंगच्या ठिकाणी कोणालातरी जबरदस्तीने(?) पाठवल जायच. बहुतेक वेळा यात मिच सापडायचे.
       घरी सतत कोणी ना कोणी येत असायच. मला वाटत, मी पुण्यात जेवढा चहा एका महिन्यात करते तेवढा चहा देवगडच्या घरी एका आठवड्याला करत असतील.  एखाद्या वेळी गावातल एखाद नमुना कॅरॅक्टर घरी येई  आणि आमची भरपूर करमणूक होत असे.

     संध्याकाळी  क्रिकेटपासून अगदी खांब-खांब पर्यंत अनेक खेळ खेळायचो . भांडण झाली की खेळ थांबायचा. मग थोड्या वेळाने अंताक्षरी रंगायची.  कधीकधी बाहेर फिरायला जायच आणि येताना  करवंद, जांभळ गोळा करुन घरी यायच. त्यातली निम्मी-अधिक  करवंद वाटेतच खावून संपलेली असायची.     

     दिवेलागणीच्या वेळी झोपाळ्यावर बसून शुभंकरोती, रामरक्षा, (लहान असताना तर पाढेही ) हा एक मोठा कार्यक्रम असे.  आठ साडेआठच्या दरम्यान रात्रीच जेवण झाल्यावर पुन्हा अंगणात बसून गप्पा रंगत. मी आणि माझी आत्ये बहीण तर अंथरुणावर पडल्यावरही खूप वेळ गप्पा मारत बसयचो. अर्थात यावरुन कित्येकदा बोलणी खाल्ली आहेत. अशा  लिहिण्यासारख्या खूप आठवणी  आहेत.
 
   आता प्रत्येकजण आपाआपल्या व्यापात अडकल आहे . लहानपणी भांडणं सोडवताना मावशी म्हणायची, "आत्ता एवढ भांडताय, पुढे लग्न झाल्यावर एकमेकांना भेटायची दूरच पण बघायची इच्छा झाली तरी ते ही शक्य होणार नाही." खरच आज असच घडतय. सगळ्यांनी एकत्र जमण्यासाठी ठरवून प्लॅनिंग कराव लागतय. अस वाटत जसजस आपण मोठं होत जातो तसतस #सहज सोप  अस काही घडतच नाही आयुष्यात.

©मानसी जोशी

Tuesday, 3 April 2018

Men will be men

काही दिवसांपूर्वी अप्पा बळवंत चौकातल्या एका दुकानात गेले होते. दुकानात प्रचंड गर्दी होती. त्यामुळे माझं पुस्तक मिळायला मला वेळ लागणार होता. मी जरा बाजूलाच थांबले. तिथे एका दुकानासमोर काही वाहने उलट सुलट पार्क केलेली होती. बाजूच्या दुकानातून एक "सुंदरा" बाहेर पडली आणि त्या अस्ताव्यस्त पार्किंगमधून स्वतःची ॲक्टिवा बाहेर काढायचा आटोकाट प्रयत्न करु लागली. समोरच चार/पाच कॉलेजकुमार उभे होते. त्यातला  एकजण तिला मदत करायला पुढे सरसावला आणि तिला तिची गाडी पार्किंगमधून बाहेर काढून दिली. सुंदरा गोड हसून "थॅंक्स" म्हणाली.
   "बास! याचसाठी केला होता सगळा अट्टाहास", असे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले.
    तो तिच्या गोड हसण्याकडे बघत कसबसं  "ओह! दॅट्स फाईन मेंशन नॉट प्लीज”.. म्हणेपर्यंत ती निघूनही गेली होती. तो मात्र ती दिसेनाशी होइपर्यंत तिच्याकडे बघत राहिला.
     थोड्या वेळाने तिथे एक मुलगा आला. या मुलीची गाडी पार्किंगमधून काढताना त्याच्या पल्सरचा बळी गेला होता. त्याची पल्सर अनेक गाड्यांचा चक्रव्यूहामध्ये अडकली होती. इथे प्रचंड उलथापालथ झाली आहे हे त्याच्या लक्षात आलं. शेवटी पाच मिनिटं अथक परिश्रम करुन त्याने त्याची पल्सर बाहेर काढली. त्या चार/पाच मुलांचा ग्रूप तिथेच मजा बघत उभा होता पण  बिचाऱ्याच्या मदतीला कोणीही आलं नाही.
 "स्त्री ही स्त्री ची शत्रू असते" हे  ऐकलं होतं पण 'पुरुष हा पुरुषाचा शत्रू असतो', हे त्या दिवशी पहिल्यांदा अनुभवलं. 😂😝

     काही महिन्यांपूर्वी एका कामानिमित्त कोथरूडला गेले होते. परत येताना कॉलेजमधला एक मित्र भेटला. जुन्या आठवणी निघाल्या. बोलता बोलता म्हणाला, "इथे उन्हात उभं राहून बोलण्यापेक्षा कॉफी घेऊया का?" 
     मलाही वेळ होता म्हणून समोरच्याच एका रेस्टॉरंटमध्ये गेलो.  मस्त कॉफी आणि सॅण्डविच घेऊन झाल्यावर वेटरने बिल आणून दिल. मी पर्समधून पैसे काढणार इतक्यात त्याने पटकन बिल दिलं आणि  म्हणाला, “अग काय तू ? हे कॉलेज कॅंटिन नव्हे TTMM  करायला." मी हसून लगेच पर्स बंद केली. स्त्री दाक्षिण्य का काय म्हणतात ते हेच असावं बहुदा.

   काही दिवसांपूर्वी लेकीने मला सांगितल, "आई काल ना बसमध्ये माझ वरुणशी भांडण झाल. मी त्याच्याशी बोलत नव्हते तर कालपासून तो मला २० वेळा सॉरी म्हणाला. खरंतर मी त्याला कालच माफ केल होतं, पण तो कितीवेळा सॉरी म्हणतो ते बघायचं होतं मला." यावर काय बोलावं तेच कळत नव्हतं मला.
    लेकीने सांगितलेला दुसरा किस्सा ऐकल्यावर मात्र आपली लेक आता मोठी होतेय याची जाणीव झाली. त्या दिवशी घरी आल्यावर म्हणाली, "आई बॉइज काय एवढे पण वाईट नसतात जेवढे मला वाटत होते. आज माझा इरेझर मिळत नव्हता तर माझ्या बेंच पार्टनरने त्याच्याजवळचा extra इरेझर  मला दिला. पुढची गम्मत म्हणजे नंतर मला माझा इरेझर मिळाला म्हणून मी त्याचा इरेजर त्याला परत दिला. नंतर  मागच्या बेंचवरच्या मुलाने त्याच्याकडे इरेझर मागीतला. पण त्याने त्याला नाही दिला  इरेजर आणि सांगितलं, 'आपल्या वस्तू आपण घेऊन यायच्या."

   मनात आलं काल परवापर्यंत मुलींशी शत्रू असल्याच्या थाटात वावरणारे,  मुलींशी भांडणारे मुलगे मुलींना कधी फेवर करु लागतात ते त्यांचं त्यांना पण कळत नसेल.

    मध्यंतरी एका टिव्ही शो मध्ये एक वाक्य ऐकलं होतं, "पुरुषप्रधान संस्कृती म्हणता म्हणता पुरुष प्रधानच बनून राहिले आणि स्त्रीया मात्र राण्या बनून राज्य करु लागल्या." हे वाक्य पटलं नाही पटलं हा मुद्दा वेगळा. पण ज्या पद्धतीने प्रधान आणि राणीचा संदर्भ जोडला ते बघता हे वाक्य मला खूप आवडलं. 

©मानसी जोशी

Tuesday, 27 March 2018

कथा - जखम

जखम

संध्याकाळी अचानक आलेल्या मुसळधार पावसात अडकलेल्या त्या तिघींनी एका पडक्या वाड्याचा आसरा घेतला. तसा बऱ्यापैकी निर्मनुष्य रस्ता, मुसळधार बरसणारा पाऊस, पावसामुळे झालेला काळोख, सोबत ढगांचा गडगडाट आणि वीजेचा कडकडाट....
     खरंतर अशा वातावरणात त्या पडक्या वाड्यात कोणीही घाबरलं असतं. पण त्या तिघी मात्र निर्विकार होत्या.
रात्रीचे साडेआठ वाजून गेले तरी पावसाचा जोर काही ओसरत नव्हता. मोबाईललाही नेटवर्क नव्हतं.  इतका वेळ शांत बसलेल्या त्या तिघी हळूहळू एकमेकींशी संवाद साधू लागल्या.

या मुसळधार पावसासारखेच माझ्या डोळ्यातूनही असेच अश्रू वाहत असतात... खूप खोल जखम झाली आहे हृदयात... अशाच मुसळधार पावसात मला एकटीला सोडून निघून गेला तो  ... कोणा दुसरीसाठी! ज्याच्यासाठी घरदार सोडलं, आई वडिलांशी नातं तोडलं; तो माझ्या आयुष्याचा जोडीदार मला वाऱ्यावर सोडून निघून गेला....काय कमी होती माझ्यात? माझ्या प्रेमात ? हे प्रश्न निरुत्तरीत ठेवून,  माझ्या आत्मसन्मानाचा अपमान करुन...  माझ्या हृदयावर असंख्य जखमा करुन निघून गेला मला सोडून.... कायमसाठी! आई वडीलांनी घराची दारं कायमसाठी बंद केली होती. माझी चूक ही त्यांच्या दृष्टीने अक्षम्य अपराध होता. माझ्यामुळे त्यांची बेअब्रू झाली होती. त्यामुळे त्यांनीही माफ केलं नाही आणि मी पूर्णपणे एकटी पडले. पण ज्याच्यामुळे हे घडलं तो मात्र सुखात आहे; तिच्यासोबत! शरीरावरच्या जखमा भरुन येतात पण मनावर झालेल्या जखमेच काय?  जगावरचा आणि जगण्यावरचा विश्वासच उडाला आहे आता. पुन्हा दुसरं नातं जोडण्याची  हिम्मतच उरली नाही;  इच्छाही नाही आणि नात्यांवर  विश्वासही उरला नाही.  तरीही मी जगतेय ... का जगतेय? आयुष्य संपवायची हिम्मत नाही म्हणून जगतेय....

       ..... कोणी सांगितल तुला शरीरावरच्या जखमा भरुन येतात म्हणून. काही वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्कार केला त्या नराधमाने. ओरबडून काढलं मला. बड्या बापाचा बेटा होता. त्याला वाटलं सुटेल तो आरामात. पण मी लढले. एकटीने लढले. शिक्षा झाली त्याला, अगदी फाशीची शिक्षा झाली. त्यावेळी त्याला लाचार झालेलं बघताना आत्मसन्मान सुखावला माझा. अशीच अगतिक झाले होते मी. तेव्हा हात जोडून, 'मला सोड'  म्हणून विनंती करत होते त्याच्याकडे. पण नाही सोडलं त्याने मला. तिच अगतिकता त्याच्या डोळ्यात बघताना मनातून आनंदाच्या लाटा उसळल्या होत्या. पण त्याचा तो किळसवाणा स्पर्श आजही आठवतो मला. कितीतरी वेळा तासनतास  शॉवरखाली उभी रहाते त्या बलात्काराच्या जखमा धुवून टाकण्यासाठी. टर्किश टॉवेलने अंग घासून अंगावर ओरखडे उठतात पण तरीही  नाही भरुन येत  त्या जखमा. एखादा तर आंघोळ करताना डेटॉलची पूर्ण बाटली ओतली होती आंघोळीच्या पाण्यात. पण त्या नराधमाच्या स्पर्शामुळे अंगावर झालेल्या असंख्य  जखमा नाही भरुन येत....  आई बाबा म्हणतात,  "त्याला शिक्षा झाली पण आपलीही बदनामी झाली या प्रकरणात. आता कोण करणार तुझ्याशी लग्न?" ... पण खरं सांगू? नाही करायचं मला लग्न. त्या किळसवाण्या स्पर्शाच्या जखमा जोपर्यंत भरुन येत नाहीत, तोपर्यंत त्यावर हळूवार हलके स्पर्श विसावणार नाहीत......

       ......मला तर शरीर  आणि मन  आहे का? असाच प्रश्न पडतो अनेकदा. गेल्या कित्येक रात्री बेडरूममध्ये अंगावर नवऱ्यानेच केलेले बलात्कार झेलतेय मी . तो शरीराजवळ यायचा नेहमी पण मनाजवळ यायला त्याला कधी जमलं नाही. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता; कारण माझं शरीर हे जणू त्याची प्रॉपर्टी होतं. निर्विकारपणे सहन करत होते सगळं. पण त्यादिवशी मात्र अंगात ताप असताना नको म्हटलं म्हणून चक्क जबरदस्ती केली त्याने माझ्यावर. माझ्या  आत्मसन्मानाला अक्षरशः पायदळी तुडवलं त्याने आणि माझ्या शरीराच्या चिंधड्या उडवल्या. त्यानंतर अनेकदा हे असे मन आणि शरीर दोन्हीवर झालेले बलात्कार झेलले मी; आजही झेलतेय. दोन्हीवरच्या जखमा कधीही भरुन येणार नाहीत. निव्वळ मुलांसाठी सगळ सहन करतेय. बेडरूमबाहेर अगदी आदर्श माणूस आहे तो. मी त्याच्या विरोधात बोलले तर बाकीचे जाऊ देत माझे आई वडीलही मलाच वेड्यात काढतील. त्यामुळे कोणालाही काही सांगू शकत नाही मी. म्हणूनच  मी ठरवलं आहे आता,  आपल्याला मन आणि शरीर नाही असं समजूनच जगायचं......

त्या तिघीही बोलून शांत झाल्या. जिथे आपले परके झाले तिथे अनोळखी असूनही त्या तिघी एकमेकींशी मोकळेपणाने बोलल्या. पाऊस थांबल्यानंतर सगळा रस्ता स्वच्छ झाला. हवेतला उकाडा जाऊन निवांत गारवा आला. त्या तिघीही आपआपल्या वाटेने निघून गेल्या. तिघींचंही आयुष्य जसं आहे तसंच चालू रहाणार होतं...त्यांच्या जखमा सहन करतच त्या जगणार होत्या. पण या पावसामुळे आज कितीतरी दिवसांनी  त्यांच्या मनात साचलेला गाळ स्वच्छ झाला होता.

©मानसी जोशी











Sunday, 25 March 2018

ऊर्मिला- रामायण

रामनवमी म्हटल की  मला  दोनच गोष्टी आठवतात; पहिली म्हणजे "गदिमा" आणि "सुधीर फडके" यांनी अजरामर केलेलं गीत रामायण. पूर्वी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज आकाशवाणीवर गीत रामायण सादर केल जात असे. गीत रामायणातील  काही गाणी ऐकताना आजही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत.
      रामनवमीच्या दिवशी आवर्जून आठवते ती ऊर्मिला! लक्ष्मणाची पत्नी!. बारावीला असताना मराठीच्या पुस्तकात "उर्मिले त्रीवार वंदन तुला" नावाची कविता होती. ती कविता वाचल्यावर उर्मिलाच्या एकूणच व्यक्तिरेखेबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण झाल. त्यानंतर मी  उर्मिलाबद्दल शक्य तितक वाचण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी एके ठिकाणी रामनवमीच्या किर्तनात किर्तनकारांनी आवर्जून उर्मिलेचा उल्लेख केला होता तेव्हा मात्र खूप छान वाटल होतं.
    रामायणातील प्रत्येक पात्र हे आदर्श आहे. अगदी आदर्श पित्यापासून आदर्श पतीपर्यंत; आदर्श मित्रापासून आदर्श शत्रूपर्यंत प्रत्येक पात्र आदर्श पद्धतीने रेखाटल आहे. पण रामायणात सर्वात जास्त #अंडररेटेड कोण असेल तर ती उर्मिला; लक्ष्मणाची पत्नी आणि सीतेची बहीण असूनही हिच्या वाटेला एकाकीपण आलं. राजवैभवाचा त्याग करुन आपल्या पतीसोबत वनवासात निघून गेलेली सीता महान झाली पण ऊर्मिलेच काय? जिच्या पतीने एका क्षणासाठीही तिचा विचार न करता रामासोबत जायचा निर्णय घेतला तिची मानसिक अवस्था काय झाली असेल? रामासोबत वनवासात जाऊन लक्ष्मण  'आदर्श बंधू'  झाला पण आदर्श पती नाही होऊ शकला.
     रामायणात जिला "आदर्श पत्नी" म्हणून सन्मान मिळतो त्या सीतेइतकाच मान किंबहूना थोडा जास्तच मान उर्मिलेलाही  मिळायला हवा होता. पण तो नाही मिळाला; का? निव्वळ ती राजवैभव सोडून वनवासात गेली नाही म्हणून? १४ वर्षे तिनेही पत्नीधर्म निभावला.  आपल्या बंधूप्रेमापाई जो पती आपल्याला वाऱ्यावर सोडून गेला अशा पतीवर जीवापाड प्रेम करुन त्याच्याशी एकनिष्ठ रहाणं ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही.  खरतर उर्मिलाही लक्ष्मणाबरोबर वनवासात जायला तयार होती परंतू लक्ष्मणाने तिला राज्यातच थांबून कुटूंबाची सेवा करायला सांगितले.  उर्मिलानेही पतीच्या इच्छेचा मान ठेवला व ती अयोध्येतच राहिली असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळला. तर काही ठिकाणी ऊर्मिलाला 14 वर्षे झोपण्याचा शाप मिळाला होता आणि तो या कालावधीत तिला उपयोगी पडल्याचा उल्लेख वाचनात आला पण हे कितपत विश्वसनीय आहे ते मला माहिती नाही.
    ऊर्मिलाला, तिच्या त्यागाला नेहमीच दुर्लक्षीत केलं गेल. इतकच काय तर अजरामर गीत रामायणातही उर्मिलेचा विशेष  उल्लेख कुठे आढळला नाही  याचच वाईट वाटतय. Pervin Sanket नावाच्या लेखिकेने उर्मिलाच्या व्यक्तीरेखेने प्रेरित होवून "ऊर्मिला" नावाच एक सुंदर पुस्तक लिहिल आहे. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणी केला आहे का नाही याबद्दल काही माहिती नाही; पण #उर्मिला  या व्यक्तिरेखेवर कोणालातरी विचार करुन लिहावस वाटल हिच आनंदाची गोष्ट आहे.

©मानसी जोशी
   


Friday, 23 March 2018

परीकथा

चैत्र पाडव्याचा दिवस होता. संध्याकाळी तो आणि ती गच्चीवर बसून भविष्याची स्वप्न रंगवत बसलेले होते.
   अचानक ती त्याला म्हणाली, "नको ना जाऊस आज. बघ तू आज जाशील आणि उद्या मला ॲडमिट केलय म्हणून फोन येइल आणि उद्या लगेच तुला निघावं लागेल."
    तो  हसून म्हणाला, "अगं जावं लागेल मला मार्च महिना आहे. आत्ता रविवारला जोडून सुट्टी आली म्हणून जमलं यायला.  पुढे रजा लागतील त्यामुळे आत्ता रजा नाही घेता येणार."
    "बघ हा मी आधीच सांगितलय तुला. नाहीतर नंतर म्हणशील मी सांगितल नाही म्हणून," ती.
    "बरं मॅडम निघतो मी आता मला निघावं लागेल”, तो हसून म्हणाला.
   "थांब ना थोडावेळ आजचा दिवस फक्त माझ्या एकटीचा हक्क आहे तुझ्यावर. पुढच्यावेळी येशील तेव्हा माझ्या हक्कात कोणीतरी वाटेकरी आलेल असेल", ती.
   "वेडी आहेस तू खरच! खरं सांगू माझाही पाय निघत नाहीये ग. पण ऑप्शन नाही. जायलाच हवं मला आणि  कोणीतरी नाही हा; एक गोड परी आलेली असेल," असं म्हणून तो जायला निघाला. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला.
    दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तिला सुखरुप घरी पोचल्याचा फोन केला. घरात तिची आई आणि ती दोघीच होत्या. बाबांची ट्रान्सफर मुंबईला असल्यामुळे आणि भावाचं ट्रेनिंगही नेमकं त्याचवेळी मुंबईला आल्यामुळे, दोघही आदल्या रात्रीच मुंबईला गेले होते.
    सकाळी चहा घेऊन झाल्यावर तिने कशीबशी एक पोळी खाल्ली. घशाशी प्रचंड जळजळ होत असल्यामुळे तिला काहीही खायची इच्छाच होत नव्हती. थोड्यावेळाने तिच्या कंबरेतून बारीकशी कळ आली. पण तिने दुर्लक्ष केलं. पुन्हा 10/15 मिनिटांनी अजून एक कळ आली. तरीही ती काहीच बोलली नाही. तिसऱ्या वेळी मात्र जरा जोरात कळ आली. आता मात्र तिने आईला सांगितले.
आई म्हणाली, "उगाच रिस्क नको, दिवस भरत आले आहेत. आपण डॉक्टरांकडे जाऊया. नेमक घरात कोणी नाहीये".
     "आई काळजी करु नकोस मी रिक्षा स्टॅंडपर्यंत चालत येते. जाऊया आपण", ती शांतपणे म्हणाली.
डॉक्टरांनी तपासलं आणि लगेचच ॲडमिट करुन घेतलं.
    "आत्ता कुठे सुरुवात आहे संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी होइल. काळजी करु नका व्यवस्थित आहे सगळ", असं बोलून डॉक्टरनी आईला धीर दिला.
     मॅडम 'प्रायव्हेट' रुम आत्ता अवेलेबल नाहीये. आत्ता तुम्हाला 'सेमी प्रायव्हेट रुम' देते. संध्याकाळी मिळेल 'प्रायव्हेट रुम', नर्सच्या या वाक्याने आईला पुन्हा टेंशन आलं.
    "आई ठिक आहे नो प्रॉब्लेम. मी करेन ॲडजस्ट", ती शांतपणे म्हणाली आणि आई निर्धास्त झाली.
आईने त्याला फोन करुन तिला ॲडमिट केल्याचं सांगितल. त्याला संध्याकाळच तिचं बोलणं आठवल आणि मनापासून हसायला आलं.
    तिला ॲडमिट करुन सलाईन लावण्यात आल. तिच्या आईने कोणी तरी मोठं हव हव म्हणून स्वतःच्या काकूला हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं. सेमी प्रायव्हेट रुममध्ये दोन्ही डिलिव्हरी झालेल्या स्त्रीया होत्या.
तिला सतत त्याचं वाक्य आठवत होतं, "कोणीतरी नाही एक गोड परी येणार आहे....." समोरच्या बेडवरच बाळ रडू लागल. त्या पेशंटच्या नातेवाईकानी नर्सला बोलावल. नर्स आतमध्ये आली आणि बाळाला ड्रॉपरने दूध पाजू लागली. हा काय प्रकार आहे. कोणालाच कळत नव्हतं. नर्सने सांगितल, "त्या बाळाला जीभेच्या वरची टाळूच नाहीये..."
       हे ऐकून तिला धडकी भरली... , "देवा मुलगा किंवा मुलगी कोणीही होवूदे पण हेल्थी असूदे ..,अशी तिने देवाकडे मनोमन प्रार्थना केली.
      दुपारनंतर चारच्या सुमारास तिला लेबररुममध्ये नेण्यात आलं. जीवघेण्या कळा येत होत्या. सगळ सहन करत होती ती.  असिस्टंट डॉक्टर, नर्स सगळेजण तिला धीर देत होते. जरा वेळाने असिस्टंट डॉक्टरने तपासल आणि तिच्या लक्षात आलं , बाळाचे ठोके कमी झाले आहेत. तिने लगेच डॉक्टरना फोन लावला. डिलिव्हरी नॉर्मल होण्यासारखी वाटत होती म्हणून डॉक्टरनी सांगितल पेशंटला ऑक्सिजन लाव.   तिच्या आईला लेबर रुममध्ये आत बोलावण्यात आलं. ज्या मुलीला कधी साध सलाईन लावलेलही बघितल नव्हतं त्या मुलीला ऑक्सिजन लावलेला बघून मात्र  आई थोडीशी घाबरली.
       ऑक्सिजन लावूनही काही फायदा झाला नाही . अखेर डॉक्टरनी सिझरचा निर्णय घेतला. थोड कॉंप्लिकेशन आहे हे आईला स्पष्ट जाणवत होतं. आईने थरथरत्या हाताने फॉर्मवर सही केली.
ऑपरेशन थिएटरमध्ये लगबग चालू झाली आणि अखेरीस 4. 55 ला एक गोंडस परी जन्माला आली. मुलगी झाली हे ऐकताक्षणी ती खूदकन हसली. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं.
         रात्री निघायच म्हणून तो ऑफिसमधून जरा लवकरच निघाला. वाटेतच त्याचा मोबाईल वाजला. त्याने गाडी बाजूला लावून फोन घेतला. मुलगी झाल्याच कळताक्षणी प्रचंड  आनंद झाला. 'या क्षणाला आपण तिकडे का नाही', असं त्याला सारखं मनातून वाटत होतं.  त्याला आदल्या रात्रीच तिच बोलण  आठवून हसायला आलं. त्याला आता त्याच्या प्रिंसेस ला बघायची घाई झाली होती.
   आज तिच प्रिंसेस अकरा वर्षांची झाली. तुझ्या आयुष्यात तुला सगळी सुखं मिळूदेत; वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा चिन्मयी...

©मानसी जोशी



Tuesday, 13 March 2018

कथा - वर्तुळ

#वर्तुळ

"कितीदा नव्याने तुला आठवावे... " हे गाणं कानावर पडल आणि मंदारची आठवण आली. गेल्यावर्षी ऑफिसच्या ॲन्युअल इव्हेंटला हे गाणं किती मस्त म्हटल होतं त्याने. अस वाटत होतं गाण्याचे सूर त्याच्या हृदयातून येत आहेत; खरोखरच कोणाला तरी आठवून गातोय हा. खरच मंदारच प्रोफेशन चुकलय. संगीत त्याच्या रक्तात भिनलय. खरतर त्याने कलाक्षेत्रात असायला हवं होतं. पण आज फायनान्स सारख्या रुक्ष सेक्टरमध्ये नोकरी करतोय. त्यादिवशी गिटारही किती छान वाजवत होता. त्याला गिटार वाजवताना बघून "तुमसेही दिन होता हैं..." या गाण्यातला शाहिद कपूर आठवला होता.

   खरतर शाहिद कपूर म्हटल की मला नेहमी स्वरुप आठवतो. स्वरुप तर शाहिद कपूरची झेरॉक्स कॉपी आहे. मायाच लग्न ठरलं तेव्हा "ऑखोंमे तेराही चेहरा...." म्हणणाऱ्या शाहिदसारखीच अवस्था झाली होती त्याची. तेव्हा रुपालीने मात्र त्याला सावरल ते नेहमीसाठीच. आज दोघ अगदी सुखाचा संसार करत आहेत. खरतर स्वरुपसाठी नेहमी रुपालीच योग्य होती.

   रुपाली!!! कुरळ्या केसांची, घाऱ्या डोळ्यांची गोड मुलगी. कॉलेजला असताना कितीतरी मुलं वेडी झाली होती तिच्यासाठी. पण तिने मात्र सुरवातीपासूनच फक्त स्वरुपवरच प्रेम केलं. काय बरं चिडवायची तिला स्नेहा? हा ॐकार स्वरुपा ....

     स्नेहा!!! रुपालीची अगदी जीवलग मैत्रीण. स्नेहा आणि रुपाली शाळेपासूनच्या खास मैत्रीणी. पुढे कॉलेजला आल्यावरही त्यांची मैत्री कायम राहिली. स्नेहाला खरतर केदार मनापासून आवडायचा पण पठ्ठीने कधीही मान्य केलं नाही ते. मी आणि केदार एकाच शाळेत असल्यामुळे सतत आडूनआडून माझ्याकडून केदारबद्दल जाणून घ्यायची.

   केदार!!.... लहानपणापासूनच बघितलेल US ला जाऊन सेटल व्हायचं स्वप्न अगदी जिद्दीने पूर्ण केल त्याने. आता रियाशी ब्रेक अप  झाल्यानंतर जणू भारताशी संबंधच संपला त्याचा.

   रिया तरी कशी आहे. मनापासून प्रेम करणाऱ्या जेंटलमन केदारशी ब्रेकअप करून सतत मुलींशी फ्लर्ट करणाऱ्या जतीनसोबत लग्न केल तिने.

  जतीन!!! माझा बॉस! एकेकाळी माझ्यावर जीव ओवाळून टाकायचा. मी रिस्पॉन्स देत नाही म्हटल्यावर अक्षरशः चरफड व्हायची त्याची. गेल्यावर्षी ऑफिसच्या ॲन्युअल गॅदरिंगच्या वेळी तर अगदी गळ्यातच पडत होता माझ्या. सुदैवाने समीर तिथे आला आणि मी सुटले.

  समीर!!!!.... कुठलाही विषय मनात आला की नेहमी तुझ्यापाशीच का येउन थांबतो? मी खरच प्रेमात पडलेय का तुझ्या? गार्गीही असच म्हणायची. पण मलाच काही कळत नाहीये.

   गार्गी!!! आजही आठवतोय तो दिवस आणि वॉशरुममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली गार्गी... त्यानंतर सुरु झालेला पोलिस तपास आजही चालू आहे. खरच तो एक अपघात होता का खून?

   आदल्या रात्री मी उशीरापर्यंत ऑफिसमध्ये थांबले होते. समीरही होता माझ्यासोबत; खरतर मी होते समीरसोबत. भरपूर वर्कलोड त्यामुळे सहाजिकच भरपूर कामं पेंडिंग होती. मी नेहमीच सकाळी लवकर जाऊन कामं पूर्ण करते. पण त्यादिवशी समीर थांबणार होता. त्याच्यासोबत वेळ घालवायला मिळणार म्हणून मी मुद्दाम थांबले होते. खरच आवडतो मला समीर. त्याच बोलणं, हसणं सगळच. सतत त्याच्यासोबत रहावस वाटत. ऑफिसमध्ये मात्र कामात कधी गुंग झाले ते माझ मलाच कळल नाही. घडाळ्यात नऊचे ठोके पडले आणि मी एकदम भानावर आले. सात वाजता समीरसोबत घेतलेली मगभर कॉफी पोटात इतकी गच्च बसली होती की भूकेची जाणीवही झाली नाही. कॉफीमुळे शरीर रिफ्रेश झाल आणि समीरच्या गप्पांमुळे मन.. पण नेमकी तेव्हा आमच्याबरोबर गार्गी होती. पण आत्ता मी आणि समीर एकत्र डिनर करु शकतो. फक्त मी आणि समीर..... या कल्पनेनेही हुरळून गेले होते मी. समीर अजूनही केबिनमध्येच होता. काय कराव काहीच कळत नव्हतं. समीरच्या केबिनमध्ये जाऊन समीरला डिस्टर्ब करण माझ्या प्रोफेशनल मनाला पटत नव्हतं. पण माझ प्रेमात पडलेल मन मला सांगत होतं जा त्याच्या केबिनमध्ये आणि आग्रहाने त्याला डिनरला घेऊन जा, "everything is fair in love & war." जवळपास अर्धा तास याच विचारात गेला आणि अखेर हिम्मत करुन मी समीरच्या केबीनमध्ये गेले. पण तिथे मी जे काही बघितल ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. 

.....तिथे गार्गी आणि समीरला "त्या अवस्थेत" एकत्र बघून मला धक्काच बसला. मी आल्या पावली माघारी फिरले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. सुदैवाने दोघांनाही कळल नव्हतं मी तिथे जाऊन आलेले. ते दोघेही एकमेकांमध्येच मश्गूल होते. डोकं सुन्न झालं होतं. मनातले विचार थांबत नव्हते...  "म्हणजे इतके दिवस गार्गी खेळत होती माझ्या भावनांशी? जर तिच आणि समीरच अफेअर होत तर का नाही सांगितल तिने मला? का लपवलं सगळं माझ्यापासून? का माझी मजा बघत राहिली? राग, संताप, दु:ख सगळ्या भावना मनात एकत्र दाटल्या होत्या. मनात सतत एकच वाक्य घोळत होतं, "everything is fair in love & war."

   नाही नाही. मी नाही मारलं गार्गीला तो एक अपघात होता. ती वॉशरुममध्ये घसरुन पडली. माझा चुकून धक्का लागला तिला. तिथे सांडलेल्या हॅन्डवॉशवरुन ती घसरली आणि भिंतीवर जाऊन आदळली. तो हॅन्डवॉशही माझ्या हातून चुकून सांडला होता. तिथे हात धुण्यासाठी हॅंडवॉश हातावर घेत होते तर हॅन्डवॉशची बॉटल  खाली पडली आणि हॅन्डवॉश सांडला. खरतर त्यावेळी हॅंडवॉश सांडला होता हे लक्षातसुद्धा आल नाही माझ्या. गार्गी ऑफिसमध्ये आहे हेसुद्धा मला माहिती नव्हतं.

......हे सगळ मी पोलिसांच्या जबानीत सांगितल आणि त्यांनीही ते खर मानलं. नशीब वेळीच लक्षात आल म्हणून ऑफिसमधला सिसिटिव्ही मी बिघडवून ठेवला आणि तो बिघडवण्यापूर्वी मी आठवणीने आधीच्या काही तासांचे फुटेज डीलिट करुन ठेवले होते. पोलिसांना माझ्यावर संशय यायला कुठलीही जागा ठेवली नाही मी. सिसिटिव्हीचे फुटेज डिलिट करुन वॉशरुममध्ये गेले आणि समीरला हाक मारली. मी ही मला धक्का बसल्याच दाखवल आणि पुन्हा समीरने मला आधार दिला. त्यानिमित्ताने निदान काही क्षण त्याच्या मिठीत घालवता आले. पोलिस जबानी घेत असतानाही समीर सावलीसारखा माझ्यासोबत होता. पण आता वेळ घालवायला नको आता समीरला तरी आपल्या प्रेमात पाडायलाच हवं.
   
खरतर गार्गीसाठी मी मंदारची निवड केली होती पण.... ती शेवटी आपल्या कर्मानेच मेली. मंदारसोबत सुखाने राहिली असती जशी आज स्वरुप आणि रुपाली रहात आहेत.

   तो मूर्ख जतीन त्याला फक्त वन नाईट स्टॅंडसाठी माझं शरीर हवं होतं. प्रेमाच नाटक करत होता माझ्याशी आता हॅऱॅशमेंटच्या केसमध्ये असा अडकला आहे की सहजी बाहेर नाही येऊ शकत. त्यामुळेच रियाचीही जिरली. आधी माझ्या आणि केदारच्या मध्ये आली. तिच्यामुळे केदार दुरावला माझ्यापासून. नाहीतर मी आज केदारसोबत अमेरिकेमध्ये छान सेटल झाले असते. रियालाही आता चांगलच कळलं असेल, आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने दुसऱ्या मुलीमध्ये इंटरेस्ट घेतला की कसं होतं ते.

   खरतर स्नेहानेही प्रयत्न केला होता माझ्या आणि केदारच्या मध्ये यायचा, पण मोठ्या हुशारीने तिला केदारपासून लांब ठेवल होतं. तिला आणि केदारला एकत्र आणणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे रुपाली. रुपालीचा स्वरुपकडचा ओढा बघितला आणि तिला स्वरूपमध्ये गुंतवण्याची युक्ती मला सुचली पण तो बावळट स्वरुप रूपालीसारखी सुंदर मुलगी सोडून त्या मायाच्या प्रेमात पडला होता. पण सुदैवाने मायाच लग्न ठरल आणि माझा रस्ता मोकळा झाला. पण शेवटी रिया आलीच माझ्या वाटेत. अर्थात त्याचाच परिणाम भोगतेय ती. खूप प्रयत्न करावे लागले मला तिला केदारपासून वेगळं करण्यासाठी. तिच आणि जतीनचं जुळणं तस कठीण नव्हतं. पोरी पटवण्यात जतीन हुशारच. फक्त माझ्यासमोर त्याची डाळ शिजली नाही. पण दु:खात बुडालेल्या रियाला त्याने अगदी सहज सावरलं आणि रिया केदारपासून दुरावली. रियाला दु:खात बुडवण्यासाठी तिच्या आई वडिलांच्या अपघाती मृत्यूची बातमी केदारपर्यंत पोचू नये याची मी पुरेपूर काळजी घेतली.

    नाही.... मी नाही मारलं तिच्या आईवडिलांना. तो मात्र खरच एक अपघात होता. मी फक्त त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करुन ठेवले होते. काय करणार दुसरं? केदारच्या घरी दोघांच लग्न ठरवायला जात होते ते. मग मी कशी सहन करणार होते ही गोष्ट. आई वडील जाऊनही केदार आला नाही. इतकच काय तर त्याने साधा फोनही केला नाही म्हणून रिया भडकली तर रियाने कळवलं नाही म्हणून केदार तिच्यावर चिडला. या भांडणाचा फायदा जतीनने उठवला आणि तो रियाच्या जवळ आला. केदारला रिया आणि जतीनविरुद्ध भडकवण्यासाठी मला तसे फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. रियाच्या बाबतीतला त्याचा पझेसिव्हनेस पुरेसा होता यासाठी. पण या ब्रेकअप प्रकरणामुळे केदारचं इंडियात येणं लांबणीवर पडल. नेमका त्याच दरम्यान माझ्या आयुष्यात समीर आला.
आता मला समीरला गमवायच नाहीये. माझ्या आयुष्यातल हे वर्तुळ समीर माझा झाल्यावरच पूर्ण होइल. या वर्तुळात अनेकजण आले आणि गेले पण हे वर्तुळ अजूनही पूर्ण झाल नाही. लवकरच समीरला माझ्यात गुंतवायला हवं नाहीतर या वर्तुळाचा व्यास वाढतच जाईल.

  मी कोणालाही मारलं नाही. हे सगळे अपघात होते. पण आता मला अजून कुठलाही अपघात बघायची इच्छा नाही. त्यामुळे हे वर्तुळ पूर्ण झालच पाहिजे....

©मानसी जोशी








Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...