उकडीचे मोदक हा निव्वळ एक पदार्थ नाही. इतर पदार्थांप्रमाणे उकडीच्या मोदकांची रेसिपी वाचली किंवा you tube वर रेसिपी बघितली आणि केले असं इतक साधं सरळ गणित नाही. अगदी तांदूळ धुवून, वाळवून, त्याच पीठ करण्यापासून सुरु होणारी ही प्रक्रिया थेट मोदक नैवेद्याच्या ताटात ठेवल्यानंतरच पूर्ण होते.
मला आठवतय, आमच्याकडे धुतल्या तांदूळाच पीठ तस वर्षभर कायमच असतं. पण तरीही गणपती जवळ आले की खास उकडीच्या मोदकांसाठी म्हणून तांदूळ धुवून वाळवले जायचे. यामध्ये सर्वात महत्वाच म्हणजे हे तांदूळ सावलीत वाळवावे लागतात. त्यावर उन्हाचा कवडसाही पडता कामा नाही.
लग्न ठरलं त्यावर्षी आजी म्हणाली, “आज मोदकाची उकड करताना माझ्याजवळ थांब. तुला उकड करायला शिकवते. पुढच्या वर्षी सासूने सांगितल ‘उकड कर’ तर तुला आली पाहिजे".
मोदकाची उकड करणं हे काम मला तसं कटकटीचच वाटलं होत तेव्हा. दरवर्षी साच्यात पीठ घालून मोदक करायची सवय असणाऱ्या मला त्यावर्षी आजीने साच्याशिवाय मोदक करायला लावले. एकंदरीतच वैताग आला होता. माझे ओबडधोबड मोदक बघून मलाच ते खावेसे वाटत नव्हते, तर बाकीचे काय कप्पळ खाणार? सगळ्यांनी चेष्टा केली. मी सुद्धा, ‘ये अपने बस की बात नहीं’ असं म्हणून विषय सोडून दिला. तसही मोदकापेक्षा जास्त माझं निवग्र्यांवर प्रेम आहे. त्यामुळे साच्यातले चार/पाच मोदक करुन, निवेग्रीसाठी मदत करायला आणि ती करताना ते कच्च पीठ खायला मला प्रचंड आवडायच.
लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षी गणपतीत माहेरच्या गणपतीची खूप आठवण येत होती. पूजा झाली आणि मी सासूबाईंबरोबर मोदक करायला बसले. त्यांनी काहीशा नाराजीनेच विचारले, ‘तुला येतात ना मोदक करायला?’
“हो येतात. पण सुबक नाही.” मी
"बरं. बघुया. नाहीतर नैवेद्याचे मोदक मी करते. तू निवेग्र्या कर नंतर."
मला तर संकट टळल्यासारखं वाटलं क्षणभर. पण तेवढ्यात सासरे म्हणाले, “करु दे की तिला. असे लगेचच कसे जमतील? मानसी तू कर मोदक. कसेही झाले तरी चालतील. कोणी नाही खाल्ले तरी मी खाईन"
सासऱ्यांच बोलणं ऐकून बरं वाटल आणि अचानक कॉन्फिडन्स आला. मी मोदक वळायला घेतले. जसे जमतील तसे करत होते. मध्येच मोदक फूटत होते. त्यावर पॅचवर्क लावायचा आणि ताटलीत ठेवायच काम चालू होतं. सासूबाई तशा नाराजच होत्या.
तेवढ्यात सासरे आत आले आणि म्हणाले, “जमतायत की तुला. फक्त एक काम कर, ‘जरा हलक्या हाताने पारी कर आणि मोदकाच्या पाकळ्या जवळजवळ कर. मग बघ मोदक सुबक दिसेल"
मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं. मोदक सुबक तर झालाच. शिवाय ‘पॅचवर्क’ पण करावा लागला नाही.
मला इतका चांगला मोदक करता आला यावर माझा विश्वासच बसत नव्हता. उकड मळतानाही आधी वाटीने मळून घ्यायची आयडीया त्यांनी दिली आणि ‘महाबोअर’ वाटणारं उकडीचं कामही सोपं झालं.
यावरुन एक गोष्ट कळली, "नेमकं आपल काय चुकतय, हे जर का लक्षात आलं ना तर कुठलीही गोष्ट कठीण नसते.
आज मी मोदकावर मोदकही (डबल डेकर मोदक ) अगदी सहज करते. पण निव्वळ माझ्या सासऱ्यांमुळे मला मोदक करता आले.
आज माझे सासरे हयात नाहीत. पण जेव्हा जेव्हा मी मोदक करते तेव्हा प्रत्येकवेळी त्यांची आठवण आवर्जून येते.
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment