Showing posts with label गुंजन. Show all posts
Showing posts with label गुंजन. Show all posts

Sunday, 2 September 2018

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे

"मनाची मनाला लागतसे आस
प्रीतीच्या फुलांना चांदण्यांचा वास"
  काही वर्षांपूर्वी झी मराठीवर गुंतता हृदय हे नावाची मालिका आली होती. झी मराठीच्या काही उत्कृष्ट मालिकांपैकीच ही  एक मालिका. अवघ्या १६० भागांची ही मालिका  विवाहबाह्य संबंधावर आधारीत  एक रहस्यकथा होती. मला वाटत रात्री १०.३० वाजता लागणारी झी मराठीवरची ही पहिलीच मालिका असावी.
    मृणाल कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी अवंतिकानंतर तब्बल आठ वर्षांनी एकत्र आले होते. यांच्या जोडीला मोहन आगाशे पल्लवी सुभाष सारखे तगडे कलाकार होते.
     मृणाल कुलकर्णी(नयना) आणि संदीप कुलकर्णी(विक्रम)  यांच्या सुखाच्या संसारात एक रहस्य वादळ बनून येतं.  अचानक घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे दोघही पुरती हादरुन जातात. या दोघांबरोबरच अजून एका व्यक्तीला या साऱ्याची झळ पोचत असते ती म्हणजे विक्रमची प्रेयसी अनंन्या(पल्लवी सुभाष). अनंन्या विक्रमच्या ऑफिसमध्ये काम करत असते. तिचा नवरा  नेव्हीमध्ये नोकरीला असल्यामुळे ती तिच्या रिटायर्ड आर्मी ऑफिसर असलेल्या आंधळ्या सासऱ्यांसोबत (मोहन आगाशे) राहत असते. या सगळ्या गूढ घटनेमागे नक्की कोण आहे? हे सगळ का घडतय?त्याचा उद्देश काय? याचा  प्रेक्षक आपाआपल्या परीने तर्कवितर्क लावत बसतात. कधी संशयाची सुई विक्रमचा बिझनेस पार्टनर मयंक (सागर तळाशीकर) कधी त्याच्या घरात काम करणारी मोलकरीण, कधी नयनाचे बाबा तर कधी  अनंन्या सासऱ्यांभोवती फिरत रहाते. आणि अगदी सुरुवातीच्या भागापासून उत्कंठा वाढवणारी ही मालिका जसजशी  पुढे सरकत जाते तसतसं  विक्रम, नयना आणि अनंन्या  सोडून प्रत्येकजणच संशयीत वाटू लागतो. रहस्याचा उलगडा जितका धक्कादायक तितकाच  सिरिअलचा शेवट वास्तववादी  आहे.
     यामध्ये विक्रम आणि अनंन्याचे विवाहबाह्य संबंध दिग्दर्शकाने  खूप वेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. सिरिअल बघताना कुठेही या दोघांचा राग येत नाही. दोघांनाही आपापले संसार टिकवायचे आहेत. इतकच नाही तर दोघही एकमेकांच्या संसारात काही प्रॉब्लेम येऊ नये याची सर्वोतपरी काळजी घेत असतात. पण मनाने मात्र दोघही एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. कुठेही उथळपणा नाही आहे ते फक्त  एक हळवं नातं.  इथे  विवाहाबाह्य संबंधाचा एक वेगळा काहीसा पॉझिटिव्ह असा हळवा कप्पा  दाखवण्याचा आला आहे. पण हे करताना दिग्दर्शकाकडून( सतीश राजवाडे)  अशा संबंधांच  समर्थन केल जातय अस मात्र एकदाही जाणवत नाही.  एकमेकांमध्ये गुंतलेले विक्रम आणि अनंन्या,त्यांचे प्रामाणिक जोडीदार, त्यांची भावनिक गुंतागुंत आणि सरतेशेवटी एकमेकांपासून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय हे सारे प्रसंग पाहताना वास्तववादी वाटतात.  कुठेही नाटकीपणा जाणवत नाही.
    मालिकेचे शीर्षक आणि शीर्षकगीत  दोन्हीही अगदी विषयाला समर्पक. रात्र अंधारली, गूढ रानातूनी .... अशा शब्दांनी सुरू झालेले  शीर्षकगीत धृवपदानंतर मात्र अचानक  हळव्या प्रेमाकडे वळते. अवघ्या दीड मिनिटांच्या गाण्यामध्ये मालिकेच्या कथेचा पूर्ण आशय दडलेला आहे. हे गाणं गाणाऱ्या देवकी पंडित या परीक्षक म्हणून मला कधीही आवडल्या नाहीत. पण त्यांची गाणी मात्र नेहमीच मनाला स्पर्श करतात.
     वादळवाट, पिंपळपान, प्रपंच, उंच माझा झोका, असंभव, एका लग्नाची गोष्ट अशा एकापेक्षा एक सरस मालिका देणाऱ्या झी मराठीवरच्या आजच्या मालिका पाहून मात्र, "कोण होतास तू, काय झालास तू" , अस म्हणायची वेळ आली आहे.

©मानसी जोशी

Sunday, 28 January 2018

सारेगम

१ मे १९९५..... या दिवशी झी टिव्हीवर एक आगळावेगळा शो चालू झाला होता #सारेगम नावाचा. एका संगीतपर्वाचा नितांतसुंदर प्रवास सुरु झाला तो "सारे सुरोंका हैं यही मिलन.. "  या साधना सरगम आणि सोनू निगमच्या आवाजातल्या टायटल सॉंगने. त्यानंतर "बजे सरगम... " या सोनू निगम आणि स्पर्धकांच्या सुरेल गाण्याने प्रेक्षकांना मत्रमुग्ध केलं.या गाण्यानंतर कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुरु झाला. सोनू निगमच शांत संयत सूत्रसंचालन, 'कुमार सानू' सारखे परिक्षक आणि मुख्य म्हणजे अगदी सर्वसामान्य कपड्यातले, कुठलाही ड्रामा न करता मनापासून सुरेल गाणी गाणारे चार स्पर्धक; दोन स्त्री स्पर्धक आणि दोन पुरुष स्पर्धक (यामध्ये एक स्वप्निल बांदोडकर होता).

      स्पर्धेच स्वरुपही अगदी साधं; एकूण आठ प्राथमिक फेऱ्या; प्रत्येक फेरीमध्ये चार स्पर्धक आणि चार राउंडस. त्यानंतर चार सेमी फायनल आणि मग फायनल. प्राथमिक फेरीलाच 'कॉड राउंड' आणि 'जजेस चॉइस राउंड' यासारखे दोन कठीण राउंड्सही होते. ज्यामध्ये खरोखरच स्पर्धकांचा कस लागत होता. कुठेही आरडाओरडा नाही,  स्पर्धकांचा ड्रामा नाही,  परिक्षकांच अपमानास्पद बोलणं नाही, सूत्रसंचालकाचा किंवा परिक्षकांचा फ्लर्ट नाही;  होती ती फक्त सुंदर आणि श्रवणीय गाणी. स्पर्धेच्या शेवटी कुमार सानू सरांनी प्रत्येक स्पर्धकाचे मार्क्स कोणालाही न दुखावता सांगितले. यावर स्पर्धकांच्या रिॲक्शनही अगदी सयंत आणि शांत होत्या.

      पहिलाच भाग असल्यामुळे या भागात काही त्रूटीही होत्या.  सूत्रसंचालनाच्या दृष्टीकोनातून एपिसोड म्हणाव तसा खुलला नाही. अगदी एका सरळ रेषेत झालेला कार्यक्रम वाटला. पण गायकांची गाणी मात्र मनाला स्पर्श करुन गेली. कालांतराने हळूहळू हि कमीही भरुन निघाली. सोनू निगमच्या शांत संयत सूत्रसंचालनाला हलक्याफुलक्या विनोदांची, अनुभवाची जोड मिळत गेली आणि कार्यक्रम अधिक रंगतदार होत गेला. कुमार सानू,  अनू मलिक आणि उदित नारायण यासारखे परिक्षक या सारेगपच्या पहिल्याच सिझनला लाभले होते. १९९५ पासून २००० पर्यंत सोनू निगमने सारेगमच सूत्रसंचालन केलं. यामधून संजीवनी, बेला शेंडे, श्रेया घोषल यासारख्या अनेक चांगल्या गायिका पुढे आल्या. १९९८ मध्ये तर या कार्यक्रमाची #मेगा_फायनल झाली होती. यामध्ये १९९८ पर्यंतच्या सगळ्या विनर्सना सामाविष्ट करण्यात आलं.  'एकसे बढकर एक' असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अगदी चुरशीची स्पर्धा रंगली. स्पर्धेसाठी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती परिक्षक म्हणून लाभल्या. अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या मेगा फायनलची विजेती होती ती महाराष्ट्रातील #संजीवनी ही गायिका.

     पुढे २००० सालानंतर 'अमान व अयान खान' या भावांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.   

   त्यानंतर २००३ सालामध्ये या शो च नाव बदलून #सारेगमप असं करण्यात आलं.  पुढे २००६ सालापर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'शान'  या गायकाने केले. वेळोवेळी कार्यक्रमाच्या  नियमांमध्ये, राउंड्समध्ये, परिक्षकांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. तरीही कार्यक्रम आपला दर्जा राखून होता. याच कार्यक्रमातून हृषीकेश रानडे, राहुल सक्सेना अर्पिता मुखर्जी यासारखे अनेक गायक/ गायिका पुढे आले. सन २००६ मध्ये तर "सारेगमप लिटल चॅंप्स" हा लहान मुलांसाठीचा सिझनही यशस्वी झाला.  पुढे २००७ मध्ये "आदित्य नारायण"  याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.   त्यानंतर मात्र कार्यक्रमाचा दर्जा हळूहळू खालावत गेला.  तोपर्यंत अनेक वाहिन्यांवर साधारणतः याच धर्तीवर आधारीत अनेक कार्यक्रम सुरु झाले होते.

   हिंदीनंतर झी टिव्हीने अनेक प्रादेशिक वाहिन्यांवरही 'सारेगमप' हा रिॲलिटी शो सुरु केला. झी मराठी वर चालू झालेल्या #सारेगमप ला पल्लवी जोशीच सुंदर सूत्रसंचालन आणि अवधूत गुप्ते आणि देवकी पंडित सारखे परिक्षक लाभले. हा शो हिट झाला आणि २००९ मध्ये आलेल्या लिटल चॅम्प्सने तर  'सारेगमप' चा मेकओव्हर केला आणि कार्यक्रमाच्या यशाला 'चार चॉंद' लावले. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत या पाच फायनलिस्ट्सना तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शो संपल्यानंतर या पाचही फायनलिस्ट्सच्या  गाण्यांचा #पंचरत्न नावाचा अल्बमही झी मराठीने बाजारात आणला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. लिटिल चॅम्प्सच्या हा सिझन इतका हिट झाला होता की त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळेत मुंबईतल्या रस्त्यांवरही शुकशुकाट असायचा.  रामायणानंतर एवढा हिट झालेला (निदान महाराष्ट्रात तरी) हा एकमेव कार्यक्रम होता.

    आता मात्र सगळच चित्र बदललं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्यांना गाण्याच ज्ञान असतच असं नाही. गाण्यांपेक्षा/गायकांपेक्षा जास्त चर्चा "बाकीच्या" मंडळींवरच होते.  गाण्यापेक्षा फॅशन, ड्रामा अधिक खुलतो. काही कार्यक्रमांमध्ये तर परिक्षकही असे होते की ज्यांचा गाण्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता. असे कार्यक्रम कधी आले आणि कधी गेले हे कळलच नाही. असो. पण  हे शो बघितले की जुन्या "सारेगम" चे दिवस आठवतात. खरतर सारेगम चालू झाल तेव्हा मी खूप लहान होते. त्यामुळे सुरवातीच्या २/३ वर्षातले काही एपिसोड्स मी ही बघितले नव्हते. पण १९९८ ची मेगा फायनल मात्र चांगली आठवतेय. परवा कुतूहल म्हणून सहज "यु ट्यूबवर" झी टिव्हीच्या सारेगमच्या प्रोग्रॅमचा पहिला एपिसोड सर्च केला. व्हिडिओ क्वालिटी एवढी खास नाहीये. पण तरीही मी पूर्ण एपिसोड बघितला. खरतर हा ओरिजीनल एपिसोडही मी पूर्वी बघितला होता.

      अनेक वाहिन्यांवर सद्ध्या सुरु असलेले गाण्याचे #रिॲलिटी_शोज बघितले की वाटतं नक्की गाण्याचा कार्यक्रम आहे की फॅशन शो आहे की ड्रामा शो आहे?  प्रेक्षकांच्या माथी काहीही मारलं तरी खपतं, या भ्रमातून लवकरच या वाहिन्या बाहेर येतील आणि पुन्हा एकदा गाण्याचा एखादा दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळेल अशी आशा करणसुद्धा आता व्यर्थ वाटायला लागलय.

झी सारेगम च्या पहिल्या भागाची लिंक
https://youtu.be/3r2EbsQildA

फोटो: गूगलवरुन साभार

©मानसी जोशी



Tuesday, 5 December 2017

लव्ह आज कल

सोनी चॅनेलवर सद्ध्या एक नवीन सिरिअल चालू झाली आहे.. "ये उन दिनों की बात हैं." या सिरिअलमध्ये ९० च्या दशकातील 'लव्ह स्टोरी' दाखवली जातेय. मी ही सिरिअल बघत नाही. आजवर त्याचा एकही एपिसोड मी बघितला नाहीये. पण त्याचे प्रोमोज मात्र इंटरेस्टींग आहेत. गेल्या आठवड्यातल्या प्रोमोमध्ये एक वाक्य ऐकलं ....."ये उन दिनोंकी बात हैं जब ब्रेक अप नही सचमें दिल तुटा करता था." एकदम क्लिक झाल हे वाक्य आणि मनोमन पटलही.

   त्या काळात gadgets ची तोंड ओळखही झाली नव्हती. त्यावेळी कॉलनीतल्या एखाद्या घरात असणारा टेलिव्हिजन (त्यातही तो बरेचदा 'ब्लॅक ॲन्ड व्हाईट') म्हणजे फक्त दूरदर्शन! सतत ॲडजस्ट करावा लागणारा ॲन्टेना आणि "रुकावट के लिए खेद हैं .... हे वाक्य. मोबाईल तर नव्हतेच पण लॅन्डलाईनही क्वचितच कोणाकडे असायचा. रेडिओ मात्र जवळपास प्रत्येक घरी सकाळीच चालू व्हायचा. सुट्टीचा दिवस किंवा मोकळा वेळ कॅरम, पत्ते, बुद्धिबळ किंवा मैदानी खेळ खेळण्यात संपायचा.

 ही परिस्थिती  20s पर्यंत बरीच बदलली. 'ब्लॅक ॲन्ड व्हाइट'चा जमाना जवळपास संपला. घरोघरी कलर टिव्ही आणि त्यासोबत केबल नेटवर्कही आले. झी, सोनी, स्टार प्लस, प्रादेशिक यासारखी वेगवेगळी चॅनेल्स सुरु झाली. पण तरीही काही गोष्टी मात्र हळूहळू बदलत होत्या.

    त्यावेळेस मुलगे आणि मुली हळूहळू एकत्र एकाच ग्रूपमध्ये येऊ लागले. तरीही बरेचदा मुलांचे आणि मुलींचे ग्रूप्स वेगवेगळे असायचे.

 प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यावेळेसही .... "प्यार किया नहीं जाता बस हो जाता हैं "....  हाच फॉर्म्युला लागू  होत होता. मग ते बघताक्षणी .. 'ती पहाताच बाला' वालं असो किंवा खूप दिवस एकत्र/ एकाच ग्रूपमध्ये  राहून मनात नकळत निर्माण झालेलं प्रेम असो. तिथे #क्रश वगैरे प्रकार अस्तित्वातच नव्हता.

       प्रेम ही एक भावना असायची आणि ती हळूवार जपली जायची. समोर बघताक्षणी मनातली धडधड, चोरुन बघणं हे सारं अगदी सहज घडत होतं. त्यावेळचे प्रेमी आजच्यासारखे एकमेकांच्या गळ्यात पडलेले नसायचे. नजरेतून किंवा ओझरत्या स्पर्षातूनही खूप साऱ्या भावना व्यक्त व्हायच्या.

#डेडीकेटेड_सॉंग्ज हा त्यावेळेचा सगळ्यात इंटरेस्टींग प्रकार. आपल्या आवडीची खास तिच्यासाठीची गाणी निवडून त्याची #ऑडिओ_कॅसेट बनवून तिला दिली जायची.

Mobile,  whats ap chat , messenger chat, IMO chat हे प्रकार अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे मनातल्या भावना कागदावर उतरवल्या जायच्या. मग वही किंवा पुस्तकातून त्याची देवाणघेवाण होत होती.

#ग्रिटिंग_कार्ड हे भावना पोचवण्याच सगळ्यात प्रभावी माध्यम होतं. #आर्चिस _गॅलरी आणि कंप्युटरचा क्लास हा एक डेडली कॉम्बो होता.

कॉलेजच्या जुन्या आयकार्डवरचा किंवा संपलेल्या परीक्षेच्या हॉल तिकिटावरचा  पासपोर्ट फोटो अलगद काढून हळूच तो त्याला किंवा तिला दिला जायचा.

फोन करतानाही #कोड_लॅंग्वेज वापरली जात होती. दोन रिंग देउन फोन कट करायचा म्हणजे  'त्याचा' किंवा 'तिचा' फोन आहे हे बरोबर समजायचं आणि मग घरातल्या सगळ्यांच्या नकळत लगेच फोनजवळ जाऊन बसायचं. हे सगळं खूप थ्रिलिंग होतं. (हा माझा वैयक्तिक अनुभव नाही जनरल ऑब्झर्वेशन आहे. कृपया गैरसमज नसावा.)

#डेट वगैरे प्रकार हळूहळू अस्तित्वात येत होते. तरीही चोरुन भेटण्यातलं थ्रिल अजूनही कायम होतं . बरेचदा 'तिच्याबरोबर' तिची मैत्रीण असायची त्यामुळे 'प्रायव्हसी' जवळपास मिळतच नव्हती.

 त्यावेळेस प्रेम हे एका वेळेस एकाच व्यक्तीवर केल जात होतं. त्यामुळे जेव्हा नातं तुटायच (त्यावेळी नातं तुटायच #ब्रेक_अप होत नव्हता) तेव्हा खूप दु:ख व्हायचं. "आज पूजा तो कल कोई दुजा" अशी परिस्थिती त्यावेळेस क्वचितच आढळायची.
आजकाल तर व्हर्च्युअल प्रेम वेगळं, कॉलेजमधलं प्रेम वेगळं, क्लासमधल प्रेम वेगळं, आणि या सर्वांवर कडी म्हणजे लग्नासाठीच प्रेम वेगळं हे असे प्रकार बघायला मिळतात.
काय चूक काय बरोबर या वादात मी पडणार नाही तो माझ्या पोस्टचा भागही नाही. कालानुरूप सगळ्याच गोष्टी बदलत असतात. आणि ते आवश्यकही असतं. काही बदल पॉझिटिव्ह असतात काही निगेटिव्ह. जे काही असेल त्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो. या पिढीचे विचार कसेही असले तरी मला त्यांच्या काही गोष्टी मनापासून पटतात.  त्यातली सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ब्रेकअप नंतरही यांच्यातली मैत्री कायम रहाते. पूर्वी असं होत नव्हतं. एकदा का नातं संपल की दोघांचे मार्ग वेगळे व्हायचे. ही पिढी समोरच्याला आपलं आवडणं अगदी सहज स्विकारते त्याच सहजतेने त्याला आपलं नावडणही स्विकारते.

आजची पिढी अगदी प्रॅक्टिकल विचार करुन आयुष्य जगते. फक्त स्वतःपुरता विचार करतात. 'प्रेम म्हणजे त्याग' असल्या विचारांमध्ये जास्त अडकत नाही. भावनांना फारसा वाव देत नाही,  असे अनेक आरोप या पिढीवर होतात. पण या पिढीच सगळं 100% चूक आहे असं मी कधीही म्हणणार नाही. उगाच स्वतःला भावनांमध्ये गुरफटून घेऊन दु:खी उसासे टाकत आयुष्य जगण्यापेक्षा त्यामध्ये न अडकणं केव्हाही चांगल. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.

©मानसी जोशी
https://youtu.be/1S7nFVUsmJ4

https://youtu.be/B1wznN0Zmhw


Tuesday, 3 October 2017

सनसेट पॉईंट

हिमाचल प्रदेशातल्या एका नदीवरच्या उंच पुलावर उभं राहून 'ती' त्याची वाट बघते असते. अंगावर शाल, मेंदीने भरलेले दोन्ही हात, डोळ्यात प्रचंड विश्वास आणि ओढ. सूर्य हळूहळू डोंगराआड जात असतो. एक क्षण तिच्या मनात विचार येतो,'आता झोकून द्यावं या पुलावरुन स्वतःला!' पण अचानक तिची नजर समोरच्या डोंगरावर जाते आणि ती तशीच शांत उभी रहाते.

तिला तिची आणि त्याची पहिली भेट आठवते.

  तिने त्याच्याकडे मागीतलेली लिफ्ट, पंक्चर झालेला गाडीचा टायर, गाडी स्टार्ट करताना तिच्या तोंडावर उडालेला चिखल आणि मग त्यानंतरचा दोघांनी एकत्र घालवलेला वेळ. याचवेळी त्यांना जाणवलेलं एकमेकांबद्दलच प्रेम आणि नंतरची निरोपाच्या वेळची तगमग. असे एकएक प्रसंग तिला आठवत असतात.

   तिचं लग्न ठरलेलं असतं. तिच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू असतो. तिचे डोळे त्याच्या आठवणींनी भरुन आलेले असतात.

  त्यानंतर कपातून त्याने पाठवलेली अंगठी. हिने बहिणीच्या हातावर मेहेंदीने लिहून दिलेला "sunset point" असा निरोप आणि मग घरातून तिचं पळून येणं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं.

सुर्यास्ताची वेळ अगदीच जवळ येउन ठेपते. त्याच्या येण्याची कुठलीच शक्यता तिला दिसत नाही. आता अंगावरची शाल बाजूला काढून ती पाण्यात उडी मारणार इतक्यात तिला त्याच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. तिचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर हसू येतं आणि मग गुलजार सरांच्या आवाजातली एक अप्रतिम ओळ ऐकू येते-

#वो_देर_से_पहूँचा_था_लेकीन_वक्तपे_पहूँचा...

 #Sunset_point या अल्बममधील कच्चे रंग या गाण्यामध्ये एक रोमॅन्टिक स्टोरी दाखविण्यात आली आहे. अतिशय सुंदर ग्रीनरी, चांगले कलाकार, गुलजार यांचे शब्द, भूपिंदरसिंग आणि चित्राचा आवाज; या सगळ्यामूळे हे गाणं नुसतच श्रवणीय नाही तर प्रेक्षणीयही झालं आहे.   

    मला  #sunset_point लक्षात राहिला तो खास करुन या शेवटच्या ओळींमुळे! "देरसे पहुचा था मगर वक्त पे ...." दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात वापरून किती सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आहे. यासाठी गुलजार सरांना हजारो Hats offfff!!!!!!

     आम्ही कॉलेजला असताना हा अल्बम खूप फेमस झाला होता. त्यावेळी गाण्याचे अनेक चांगले अल्बम्स आलेले होते. त्यावेळचे अल्बम्स ऐकले की nostalgic व्हायला होतं.

    आजकालची गाणी ऐकवत नाहीत. कानठळ्या बसवणारं म्युझिक आणि अर्थहीन शब्द; असली गाणी ऐकून कानावर हात ठेवावासा वाटतो. (अर्थात प्रत्येक पिढीला हे असच वाटत असतं.)  काही गाणी अपवाद असतात पण त्यांच प्रमाण फारच थोडं. आजकालचे अल्बम्स येतात कधी आणि जातात कधी तेच कळत नाही. कधीतरी मिरवणूकीत, दांडियामध्ये ही गाणी ऐकायला येतात. पण तेवढ्यापुरतीच. ती काही संस्मरणीय वगैरे होत नाहीत.

©मानसी जोशी






Saturday, 5 August 2017

राग आसावरी

राग आसावरी

   आभाळ मायेचे ओथंबून येइल, सुगंधवारे आर्त होतील
    माझा पत्ता विचारत तुझी सर्व दाने आपसूक येतील
    कोण जाणे भविष्यात असेलसुद्धा स्वप्नांची पूर्तता
    या क्षणी मात्र कोमल धैवतांची असीम आर्तता
    भक्ती असो, प्रीती असो, बाण लागतोच जिव्हारी
    जीवाला जडते अनिवार ओढ
     तिचच नाव आसावरी....

      कॉलेजला असताना मला डायरी लिहायची  सवय होती. डायरीमध्ये मी माझ्या मनातलं किंवा कुठेतरी वाचलेलं आणि मनाला भावलेलं असं काहीही लिहित असे. मध्यंतरी माहेरी गेले तेव्हा येताना ती डायरी घेउन आले होते. पण वाचायला वेळच मिळाला नव्हता. काल सहज त्या डायरीची पाने चाळली. त्यातच एका पानावर  'आसावरी' रागाबद्दल लिहिलेल्या या ओळी सापडल्या. दुर्दैवाने लेखकाचं नाव नव्हतं. पण हे ज्यांनी कोणी लिहिलं आहे ते अतिशय अप्रतिम लिहिलं आहे. सहज कुतुहल म्हणून मी गूगलवर 'आसावरी' रागाची माहिती सर्च केली. एका वेबसाईटवर  पंडित भीमसेन जोशींनी या रागाबद्दल सांगितलेली सविस्तर माहिती मिळाली.
    राग आसावरीला 'आसावरी' हे नाव 'सौवरी' हया जवळपास १५०० वर्षांपूर्वीच्या एका प्रदेशाच्या नावावरुन पडले असावे असे म्हणतात.हा प्रदेश दक्षिण सिंध व कच्छची भूमी हयांच्या सान्निध्यात अस्तित्वात होता. या  प्रदेशाची संस्कृती प्राचीन भारतीय संस्कृतीला खूपच जवळची होती.
    आसावरी हे मूळ रागाचे नाव आहे, परंतु पं. विष्णू नारायण भातखंडे हयांनी 'आसावरी' हे थाटवाचक नाव म्हणून पुढे आणले ".
    थाट आसावरीपासून निर्माण झालेल्या राग आसावरी, राग जौनपूरी, राग दरबारी कानडा, राग अडाणा, व राग गंधारी ह्यावर आधारीत एक कथा-सूत्र आहे. सुरांतून जाणवणारी कल्पनाचित्रे अशी-

राग आसावरीचे सूर :  प्रेयसी, म्हणजे आसावरी. साजश्रृंगार करुन अगदी आतुरतेने आपल्या प्रियकराला भेटायला गेलेल्या प्रेयसीला काही कारणावरुन तिचा प्रियकर  निर्भत्सना करुन परत पाठवितो. त्यामुळे आसावरी खिन्न व उदास होऊन माघारी फिरते.

राग जौनपूरीचे सूर : निराश झालेल्या आसावरीच्या मनात आपल्या प्रियकराला भेटण्याची जागृत झालेली आस, त्यामुळे पुन्हा शृंगार करण्याची तीव्र इच्छा  आणि तो परत आपल्याला नाकारेल ही भीती ह्या भावनांचा ऊन-पावसाचा खेळ तिच्या मनात चालू राहतो.
     राग जौनपुरी हा शास्त्रीय संगीत सादर करणा-या गायकांचा आवडता राग! आकाशवाणीवरील गाण्याच्या कार्यक्रमातून सकाळच्या वेळेस हमखास हा राग तुम्हाला ऐकावयास मिळेल. परंतु असे असले तरी राग जौनपुरीत स्वरबध्द झालेली नाटयगीते किंवा चित्रगीते बघावयास मिळत नाहीत.

राग दरबारी कानडा : चंद्रोदय झाल्यावर प्रियकराच्या मनात आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते. तो प्रेयसीकडे जाऊन तिची परत चलण्यासाठी मनधरणी करतो. परंतु प्रेयसी त्याला नकार देते.
   राग 'दरबारी कानडा' हा आसावरी थाटापासून निर्माण झालेला एक सुप्रसिध्द, प्रचलीत व मनमोहक राग. 'मृगनयना रसिक मोहीनी' तसेच, 'रजनीनाथ हा, नभी उगवला' अशी नाटयगीत अथवा झनक झनक, 'ओ दुनियाके रखवाले 'तोरा मन दर्पन कहलाए' अशा अनेक गाण्यांमधून राग 'दरबारी कानडा' हा एकच राग आपल्याला निरनिराळया प्रकारचे रस व भाव व्यक्त करताना दिसतो आहे. जसे श्रृंगार-रस, भक्ती रस, विरह-भावना, इ.

राग अडाणा :प्रेयसीने आपल्या बरोबर चलावे म्हणून उदासीन झालेला प्रियकर तिच्यावर काहिशी बळजबरी करु बघतो परंतु प्रेयसी त्याला झिडकारुन तिच्या सख्यांसमवेत ओढयावर पाणी भरायला निघून जाते.
    राग 'अडाणा' हा आसावरी थाटातील तसा काहीसा अनवटच राग. क्वचित प्रसंगी एखाद्या मैफिलीतून तो गायला गेलेला  आढळेल.

राग गंधारी :प्रियकर आणि प्रेयसीमध्ये गैरसमजाचे वादळ शमून त्यांचे पुनर्मिलन होते.

        मी वाचलेल्या लेखातील माहितीपैकी  काही महत्वाची आणि मला आवश्यक वाटलेली माहिती मी इथे लिहिली आहे. सगळ्याच गोष्टी लिहायला गेले तर ही पोस्ट क्रमश: ठेवून दोन भागांमध्ये लिहावी लागेल. म्हणून मी इथेच थांबते. एका अतिशय सुरेल रागाच्या माहितीसोबत पुन्हा एकदा तुम्हां सर्वांना सुप्रभात!!!

रागाची माहिती:आंतर्जलावरुन साभार
विशेष संदर्भ: www.marathiworld.com
फोटो: गूगलवरून साभार

©मानसी जोशी
०५/०८/२०१७

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...