Friday, 30 December 2016

Happy New Year2017

आज २०१६ चा शेवटचा दिवस. आजची संध्याकाळ या वर्षाची आणि या महिन्याचीही शेवटची संध्याकाळ. अनेकजण आज संध्याकाळपासून थर्टी फर्स्टच्या  सेलिब्रेशनच्या तयारीमध्ये बिझी असतील. हॉटेल्स तुडूंब भरलेली असतील. वेगवेगळ्या इव्हेंट्सच तिकिट बुकिंग फुल झाल असेल. कुठेतरी एखाद नवपरिणित जोडप अथवा प्रेमी युगुल समुद्रात बूडणाऱ्या किंवा डोंगरामागे जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने भविष्याची स्वप्न रंगवत असतील. तर काहीजण हे आपल नविन वर्ष नाही; अस म्हणून शांतपणे घरात बसून राहतील किंवा आजच सेलिब्रेशन म्हणजे हिंदू संस्कृतीचा कसा अपमान आहे वगैरे गोष्टींवर चर्चा करत बसतील. काही जण ऑफिसची कामं, डेड लाईन यामध्ये बिझी असल्यामुळे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करता येणार नाही याच दु:ख आळवत बसतील. या साऱ्यामध्ये मात्र हॉस्पिटलमध्ये सिरिअस असणाऱ्या पेशंट्सच्या नातेवाईकांची त्यांच्या जिवलगांची मनस्थिती कशी असेल याचा विचार क्वचितच कोणीतरी करत असेल. तेव्हा आजच्या या दिवसाच सेलिब्रेशन करताना निदान हॉस्पिटलजवळ सेलिब्रेशन करण, फटाक्यांच्या माळा लावणं हे सार टाळाव. सेलिब्रेशन जरुर करा पण ते करताना कुठल्याही वृद्ध माणसांना, आजारी माणसांना आणि लहान बाळांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या एवढीच कळकळीची विनंती.
         माझ्या घरातल कॅलेंडर मी उद्या बदलणार त्यामुळे माझ्यासाठी तरी उद्यापासून नविन वर्ष चालू होणार. माझ्या आयुष्यात नविन स्वप्न घेवून, नविन आशा घेवून आलेल हे २०१६ जाताना खूप काही देवून जातय. काही स्वप्न पूर्ण झाली, काही हवेत विरुन गेली, काही अनपेक्षित सुखद धक्के मिळाले तर काही वेळा अपेक्षाभंग झाला. कधी काही माणसांमूळे माणुसकीवरचा विश्वास ठाम झाला तर कधी परमेश्वराच्या अस्तित्वावरही शंका निर्माण झाली. कधी चुकले पण खूप काही शिकले तर कधी स्वतःलाच  नव्याने ओळखले. याच वर्षी मी फेसबूकवर व्यक्त व्हायला शिकले. यापूर्वी कधीतरीच फेसबूक ओपन करणारी मी आता दिवसातून किमान एकदा तरी फेसबूकवर ॲक्टिव्ह असतेच. माझ्या लेखनाच इतक कौतुक होइल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती पण फेसबूकवरच्या काही ग्रूपवर माझ्या लेखनाच झालेल कौतुक बघून 'आज मै उपर' अस फिलिंग आल. अनेक नविन ओळखी झाल्या, काही जुन्या ओळखी पुन्हा नव्याने समोर आल्या तर काही कधीही न भेटलेल्या पण फेसबूकवर नेहमीच भेटणाऱ्या व्यक्ती मात्र अनोळखी असूनही ओळखीच्या वाटू लागल्या.  पुन्हा नवी स्वप्न, नवीन आशा घेवून येणार हे नविन वर्ष  माझ्या आयुष्यातल एक सुंदर पान ठराव एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना!  सगळ्यात महत्वाच नविन वर्षांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात आलेली  दु:ख, संकटे दूर होवून, येणाऱ्या नविन वर्षांत जवळ असणारी अनुभवाची शिदोरी आणि जिवलगांच्या शुभेच्छा यांच्या आधारे तुमच आयुष्य सुखी संपन्न होवूदे हिच सदिच्छा!! Wish you Happy New Year 2017

Friday, 16 December 2016

कथा - कॅन्डललाईट डिनर

 कॅन्डललाईट डिनर

'ती' तशी हळवी. रोमॅन्टिक कथा कादंबऱ्यामध्ये रमणारी. 'तो' साधा सरळ. रोमॅन्टिक होणं फारस न जमणारा.
     एका संध्याकाळी तो ऑफिसमधून जरा लवकर घरी आला आणि तिला म्हणाला, "चल आज आपण कॅन्डललाईट डिनरला जाऊया".
     क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही. अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलेली आणि मूव्हीज मध्ये बघितलेली कॅन्डललाईट डिनर डेट तिच्यासाठी स्वप्नवतच होती. त्यात तिचा काहिसा अनरोमॅंटिक नवरा हे सांगतोय म्हटल्यावर तर ती एकदम हरखूनच गेली
       तिने  त्याच्या आवडीचा वेस्टर्न ड्रेस घातला. हलकासा मेकअप केला. त्याला आवडतात म्हणून केस मोकळेच सोडले.
      तिने वाढदिवसाला गिफ्ट केलेला शर्ट घालून 'तो' ही तयार झाला.
    गाडीत त्याने खास तिच्या आवडीच म्युझिक लावले.  आपण स्वप्नात तर नाही ना... असं वाटून तिने हळूच स्वतःला चिमटा काढून बघितला.
     गाडी रेस्टॉरंटच्या गेटमधून आत गेली. गेटवरच्या वॉचमनने पार्किंगची जागा दाखवली. त्याने गाडी पार्क केली. तेवढ्यात दुसरा वॉचमन पुढे आला आणि त्याने अदबिने गाडीचं दार उघडून त्या दोघांना वेलकम केलं. ती हरखून गेली. आपले हाय हिल्स सॅंडल्स सांभाळत त्याच्याबरोबर सावकाश चालू लागली.
       आत गेल्यावर त्यांना अटेंडंटने पुन्हा एकदा वेलकम केले. त्याने मंद हसून अटेंडटला सांगितले 'पूलसाईड टेबल!'
    दोघं आतमध्ये गेली. मंद संगित, रुमफ्रेशनरचा सुगंध 'ती' मोहरुन गेली.
       एक छानसं कॉर्नरच टेबल बघून दोघं तिथे बसले. टेबलावर दोन सुंदरसे कॅन्डललाईट  स्टॅंड होते. हॉटेलच्या वेटरने त्यामध्ये दोन सुगंधित कॅन्डल्स लावल्या. ती टेबलावरचे मेनूकार्ड हातात घेऊन बघू लागली.  समोर ड्रिंक्स आणि नॉनव्हेज डिशची नावे बघून तिचा मूड गेला. ती त्याला म्हणाली, "अरे हे हॉटेल तर व्हेज ॲन्ड नॉनव्हेज आहे".
     'तो' म्हणाला, "कॅन्डललाईट डिनरला प्युअर व्हेज हॉटेल शोधावंच लागेल हा!"
      त्याचा मूड जायला नको म्हणून 'ती' उगाचच हसली. पुन्हा मेनूकार्ड बघायला लागली. सवयीप्रमाणे तिने आधी उजव्या बाजूला नजर टाकली. रेट्स बघून तर तिला आश्चर्यच वाटलं. सगळ्या डिशेसचे रेट जवळपास दुप्पट होते. ती नकळत बोलून गेली, "फार महाग आहे ना हे हॉटेल!"
उत्तरादाखल तो फक्त हसला.
     एव्हाना तिचा मुड पूर्णपणे गेलेला होता. तिने विचारलं, "फारच काळोख वाटतोय ना?"
     "अजून दोन कॅन्डल स्टँड आणायला सांगू का?" त्याने विचारलं.
  ती नजरेनेच नको म्हणाली.
 ऑर्डर घेण्यासाठी वेटर आला.
 तिने विचारलं, "तुमच्या इथे व्हेज नॉनव्हेज किचन वेगळी आहेत का?"
 वेटरने 'सॉरी' म्हणून नकारार्थी मान हलवली.
"मग एकाच किचनमध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत का?" तिने पुढचा प्रश्न विचारला.
वेटर पुन्हा सॉरी म्हणाला .
तिचा चेहरा उतरला.
तिचा उतरलेला चेहरा बघून त्याने वेटरला 'नंतर देतो ऑर्डर' अस खूणेनेच सांगितल.
वेटर निघून गेल्यावर त्याने तिला विचारल, "तू कंफर्टेबल नाहियेस का इथे?" नसशील तर आपण दुसरीकडे जाऊया.”
त्याचा मूड जायला नको म्हणून ती म्हणाली , "नाही, इट्स ओके".
    तेवढ्यात एक वेटर नॉनव्हेज सिझलर आणून बाजूच्या टेबलवर सर्व करू लागला. त्या वासाने तिला मळमळायला लागल. तरिही ती गप्प राहिली; त्याच्यासाठी!
    त्याने मात्र तिच्या नजरेतली उदासी चटकन ओळखली. तो उठून तिला म्हणाला, "चल आपण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया".
    ती काही न बोलता तिथून उठली. दोघ तिथून बाहेर पडली.
गाडीत बसल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.
   'ती' त्याला म्हणाली, "सॉरी पण तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. मला माहितेय तू एवढ छान प्लॅनिंग केलस आणि माझ्यामूळे.....   
  "तूझ्यामूळे काहीही झालं नाही", तिचं बोलणं मध्येच तोडत त्याने शांतपणे तिला समजावलं. तिच्या पाणावलेल्या डोळ्यातून दोन आसवं तिच्या गालावर ओघळली.
तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, "तुझ्यासाठीच केला होता सगळा प्लॅन पण जर तूच कंफर्टेबल नसशील तर काय उपयोग? माझ्यासाठी तूझ खूश होणं महत्वाचं बाकी काही नाही".
    त्यावेळी पहिल्यांदा तिला जाणवलं; 'तो' खरच खूप रोमॅन्टिक आहे. त्या कॅन्डललाईट डिनरपेक्षा हा गाडीतला दोन मिनीटांचा संवाद तिला जास्त रोमॅन्टिक वाटला.
    'ती' काही न बोलताही त्याने तिच्या भावना समजून घेणं हाच तर खरा रोमान्स आहे. हे आता तिला मनोमन पटलेलं होतं.
    'ती' ही कॅन्डललाईट डिनर डेट कधीच विसरू शकणार नाही. कारण फसलेली असली तरी, त्यामुळेच तर ती पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडली होती.

©मानसी जोशी


 





Wednesday, 14 December 2016

कथा - ती रात्र

ती रात्र...
संध्याकाळ टळून हळूहळू रात्र सुरु झाली होती. रेवा खिडकीत बसून बाहेर पडणारा मुसळधार पाऊस अस्वस्थ होऊन बघत होती. भर दिवसा तिन्हीसांजा झाल्यासारखा होणारा काळोख, मुसळधार पडणारा वादळी पाऊस, अशी उदास संध्याकाळ हे सारं ती आयुष्यात प्रथमच यावर्षी अनूभवत  होती. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, समोर मोकळा निर्मनुष्य रस्ता डाव्या बाजूचा मोकळा प्लॉट सोडून सुरु होणारं जंगल आणि एका मोठ्या बंगल्यात फक्त ती आणि तिची अडीच वर्षांची मुलगी आभा. वाढत जाणाऱ्या अंधाराबरोबर रेवाच्या मनातली भीतीही वाढत होती. धड महिनाही झाला नव्हता तिला कोकणातल्या या गावात; या बंगल्यात रहायला येऊन. ती व तिचा नवरा अभिजीत लहानग्या आभाला घेऊन प्रथमच कोकणात रहायला आले होते. अभिजीतच्या कंपनीचा कोकणात एक मोठा प्रोजेक्ट चालू होता. त्याच्या कामासाठी कंपनीने सहा महिन्यासाठी अभिजीतला कोकणातल्या ब्रॅंचमध्ये  पाठवलं होतं. कंपनीच्या ब्रॅंच ऑफिसजवळच असणाऱ्या बंगलो सोसायटीमधल्याच एका बंगल्यात कंपनीने त्यांची रहायची व्यवस्था केली होती.
      कोकणातला हा परिसर तसा शांतच. कोकणातल्या निसर्गसौदर्याने सुरुवातीला वेडावलेली रेवा आता मात्र कोकणातल्या पावसाच्या रौद्र रुपाने चांगलीच घाबरली होती. तिचा नवरा अभिजीत मिटिंगसाठी बाजूच्या शहरात गेला होता. शहर तस फार लांब नव्हतं. अवघ १४० किलोमीटरचं अंतर. कारने फक्त अडीच/तीन तास. पण खराब रस्ता आणि मुसळधार पावसामूळे हा वेळ कधीकधी दुप्पट होत असे. संध्याकाळपर्यंत परत येणाऱ्या अभिजीतला कामामुळे तिथून निघायलाच संध्याकाळ होवून गेली होती. एकीकडे अभिजीतची काळजी असूनही रेवा या भयाण वातावरणामुळे त्याला 'आज निघू नकोस' असंही म्हणू शकत नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले आणि रेवा विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. मेकॅनो खेळण्यात रमलेल्या तिच्या मुलीला कौतुकाने जवळ घेऊन म्हणाली, "पिल्लू बास आता खेळ, छान छान वरण भात जेवायचा ना?"
  "नाही, बाबा आल्यावरच त्यांच्या मांडीत बसून", आभाने हट्ट केला.
    "पिल्लू बाबांना उशीर होणार आहे ग. आज माझ्या मांडीत बसून जेव ना ग. मी छान गोष्ट सांगते ससोबाची चालेल?"
   "रोज रोज काय ग उशीर? एवढे दिवस झाले मला बाबा भेटून" आभा हात पसरुन म्हणाली.
     "हो ग राणी आज आला ना की मी चांगल ओरडेन हा त्याला" , रेवा हसून म्हणाली.
"आणि त्याला उद्या मी उठेपर्यंत घरातच कोंडून ठेव हा! जाऊच नको देऊस ऑफिसला?" आभा लटक्या रागाने म्हणाली.
   रेवाने हसून मान हलवली आणि आभाला भरवायला सुरवात केली. एवढ्यात जोरात वीज कडाडली. ढगांचा गडगडाट झाला आणि लाइट गेले. त्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने आणि अंधारामूळे आभा घाबरुन रेवाला बिलगली आणि रडायला लागली.  रेवाने क्षणात मोबाईलची टॉर्च लावली आणि आभाला शांत केले. आभाला कडेवर घेवून ती उठली आणि तिने देवासमोर लावलेल्या निरांजनात तेल घातले. त्या सात्विक प्रकाशात रेवाच्या मनातली भीती जरा कमी झाली. आभाला जवळ घेउनच रेवाने कसेबसे चार घास तोंडात टाकले आणि किचनमधले आवरायचं तसच ठेवून ती आभाला घेउन बेडरूममध्ये झोपायला गेली. थोडंसं थोपटल्यावर आधीच घाबरलेली आभा तिच्या कुशीत शांत झोपली. रेवा मात्र जागीच होती. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनच वाढला होता. रेवाला आता अभिजीतची अधिकच काळजी वाटू लागली होती. मगाचच्या विजेच्या कडकडाटानंतर रस्त्यावरचे दिवेही गेले होते. नाही म्हणायला बाजूच्या बंगल्यात इनव्हर्टर  असल्यामुळे त्यांच्या किचनमध्ये लाइट चालू होता. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण त्या बंगल्यात रहाणारे आजी आजोबा काहीसे विचित्रच वाटत होते. सुरुवातीस जरा बरे वागले होते. पण मागच्या आठवड्यापासून त्यांचं वागणं एकदमच बदललं. रोज सकाळी अभिजीत ऑफिसला जाताना त्याला बाय करायला जाते तेव्हा तर किती विचित्र नजरेने बघतात त्या आजी. अर्थात अभी पण कधीकधी जास्तच रंगात येतो म्हणा. ते खटकलं असेल त्यांना बहुदा. शेवटी गावातली माणसं आहेत ती. तो सोसायटीचा नाईट वॉचमन तर किती विचित्र नजरेने बघत असतो. विचार करता करता रेवाचा डोळा लागला. थोड्या वेळाने दार ठोठावण्याच्या आवाजाने रेवा दचकून जागी झाली. त्या आवाजाने ती खूप घाबरली. तिने मोबाईल हातात घेऊन वेळ बघितली तर रात्रीचे साडेबारा वाजले होते.
   "आत्ता या वेळेला कोण असेल? तिच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. अभी तर नसेल? या विचाराने क्षणभर तिला दिलासा दिला पण अभि रात्री उशिरा आला की नेहमी त्याच्याजवळच्या किल्लीनेच दार उघडतो आणि जर किल्ली नसेल तर कॉल करतो. रेवा प्रचंड घाबरली. पाऊसाचा जोर जरी ओसरला असला, तरी सगळीकडे पसरलेला अंधार, विचित्र आवाजात रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, पार्किंग शेडच्या पत्र्यावर मधूनच पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज या साऱ्यामूळे वातावरण अधिकच भयावह बनले होते. रेवाला आता असहाय्य वाटू लागलं होतं. ती कुठलीही हालचाल न करता आभाला कुशीत घेऊन बेडवर तशीच पडून  राहिली. पुन्हा दार वाजले. रेवा खूपच घाबरली, "कोण असेल एवढ्या रात्री? तो वॉचमन तर नसेल? दोन दिवसांपूर्वी मेडिकल चेकअपसाठी अभिच्या ऑफिसमधून काही ऑफिसर्स आले होते तेव्हा कसा फिरत होता तो बंगल्याच्या आसपास. आणि ती माणसे गेली तेव्हा काय बोलत होता त्यांच्याशी कुणास ठावूक? एवढ्यात पुन्हा दार वाजले. हिम्मत करुन रेवाने दाराजवळ जायचे ठरवले. पावलांचा आवाजही न करता रेवा हळूहळू हॉलमध्ये जायला निघाली. मनातून  ती खूप घाबरली होती. हळुवार पावलांनी ती हॉलमध्ये आली. घाबरत घाबरत ती दाराजवळ गेली.  दाराच्या फटीतून तिने बाहेर बघायचा प्रयत्न केला पण बाहेर असणाऱ्या मिट्ट काळोखामूळे तिला काहीच दिसले नाही. ती खूप घाबरली होती तिने पुन्हा हिम्मत करुन कि-होल मधून बाहेर बघितले, एवढ्यात वीज चमकली. ढगांचा गडगडाट झाला.  त्या प्रकाशात तिला गेटबाहेर उभा असलेला वॉचमन दिसला.  रेवाने घाबरून दाराकडे पाठ फिरवली. तिचं उरलसुरल अवसान गळून पडलं होतं. भीतीने ती मटकन खाली बसली.  तिला आता रडू यायला लागल होतं. आपल्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तीने आपले दोन्ही हात तोंडावर घट्ट धरून ठेवले.
     कितीतरी वेळ रेवा दाराला टेकून रडत होती. अचानक तिला आभाची आठवण आली. आभाच्या काळजीने तिने बेडरुमकडे धाव घेतली. आभाला बेडरुममध्ये शांत झोपलेली बघितल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. तिने पटकन जाऊन आभाला कुशीत घेतले. काही झाल तरी चालेल, पण उद्या अभी ऑफिसला जाण्यापूर्वी त्याच्याजवळ जागा बदलण्याविषयी बोलायचंच. जेव्हा नविनच इथे रहायला आलो तेव्हा घरासाठी लागणार काही सामान आणायला इथूनच जवळ असणाऱ्या शहरात गेलो होतो. तिथेच एखादा छोटा फ्लॅट मिळाला तरी चालेल. पण तिथेच जागा बघू म्हणून सांगायच अभीला. ऑफिस थोडं लांब पडलं तरी चालेल, पण निदान चार लोक तरी असतील सोबतीला. अभीला पटेल का पण? या बंगल्यात आलो तेव्हा किती खूश होता अभिजीत. एखाद्या रिसोर्टपेक्षाही सुंदर असणाऱ्या तीन बेडरुम्स, मॉड्युलर किचन, अगदी टीव्हीवर दाखवतात तसा मोठा हॉल, त्यामध्ये मोठा सोफा, बाहेर छोटसं पण सुंदर गार्डन, त्यामध्ये एक छोटासा झोपाळा. अगदी एखाद्या स्वप्नातल्या घराइतका सुंदर बंगला. पहिल्याच दिवशी अभी म्हणाला होता, "आता काय रोजच हनीमून." अभिच्या आठवणीने या प्रसंगातही तिला हसू आलं. तिच्या मनात आलं, हा इतका सुंदर बंगला आज मात्र खूपच भयंकर वाटतोय. एखाद्या शापित वास्तुसारखा!
    विचार करता करता तिचा डोळा लागतो न लागतो तोच तिचा मोबाईल वाजला. त्या सवयीच्या आवाजानेही रेवा दचकली. तिने मोबाईल बघितला तर फोन अभिजीतचा होता. "हॅलो रेवा मी आलोय, दार उघड ना, अग किल्ली आहे माझ्याकडे पण अंधारात काहीच दिसत नाहीये. "
"ओके" असं म्हणून रेवाने फोन कट केला आणि धावत जाऊन दार उघडलं. समोर अभिजीतला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद तरळला तिने दारातच त्याला मीठी मारली आणि रडत रडत म्हणाली, "बर झाल अभी तू आलास मला खूप भीती वाटत होती".
     "इट्स ओके रेवा, आता आलोय ना मी. प्लिज, डोन्ट क्राय डिअर." अभी तिला समजावत म्हणाला.
      रेवा काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. ती  अभिच्या मीठीत रडतच होती. त्याने तिला हळूवार थोपटलं. काही क्षण तसेच शांततेत गेले. रेवा शांत झाल्यावर अभिजीत हसून म्हणाला, "रेवा घरात घेशील का ग मला आता? का दारातच सगळा रोमान्स करायचा आहे?"
   त्याचं मिश्किल बोलणं ऐकून त्याच्या छातीवर डोक घुसळत रेवा म्हणाली, "मोस्ट वेलकम माय स्वीट हार्ट!".
    आत आल्यावर अभिजीतने रेवाला विचारले, "रेवा काय झालंय? एवढी डिस्टर्ब का आहेस?"
    "अभी आपण ही जागा बदलूया. खूप एकाकी वाटतं इथे. तू नसलास की एखाद्या हॉंटेड हवेलीसारखा वाटतो हा बंगला. वारंवार लाईट्स जातात. तो नाईट वॉचमन विचित्र नजरेने माझ्याकडे आणि आपल्या घराकडे बघत असतो. बाजूच्या बंगल्यातले आजी आजोबा सुद्धा विचित्रच वाटतात मला. आपण बाजूच्या शहरामध्येच एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बघूया. रेंट आपल्याला भरायला लागल तरी चालेल, जागा छोटी असली तरी चालेल मला. पण आपण इथून जाऊया." अस म्हणून रेवा पुन्हा रडू लागली.
        "इट्स ओके रेवा. आपण बोलू उद्या. तुला इथे नाही ना रहायचं मग बघू आपण दुसरी जागा. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी बोलतो सरांशी. ओके?" अभिजीतने रेवाला समजावले.
     जागा बदलायला अभी लगेच तयार झाला म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. इतक्यात तिच्यासमोर खिशातला टिशू पेपर धरून अभिजीत म्हणाला, "रेवा आता जर का तुला रडू आलं ना; तर या पेपरला डोळे पुस हा. तोपर्यंत तुझ्या अश्रूंमूळे ओला झालेला हा शर्ट मी बदलून येतो."
     त्याचा हा मिश्किलपणा बघून रेवाला हसू आलं.  रेवाने त्याच्या हातातला टिशू पेपर हातात घेतला आणि बाजूच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवून लटक्या रागाने म्हणाली, "अभी चेष्टा करतोयस ना माझी? पण खरच भीतीमूळे मला खूप एकाकी वाटत होतं. तुला समोर बघितल आणि जीवात जीव आला माझ्या."
    "हो हो रडूबाई कळल मला आता. मी पटकन आवरुन येतो. तोपर्यंत शांत बस घाबरु नकोस अजिबात", अभिजीत.       त्यानंतर  मात्र अभिजीतच्या  कुशीत रेवाला शांत झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा बाहेरच वातावरण एकदम स्वच्छ दिसत होतं. गेले आठ दिवस अविरत बरसणारा पाऊस थांबून सूर्यदर्शन झाल होत. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. रेवाला खूपच प्रसन्न वाटत होतं. बाजूला शांत झोपलेल्या अभिजीत आणि आभाकडे बघून तिला समाधान वाटले. तितक्यात डोअरबेल वाजली.  रेवाने दार उघडले तर समोर तिच्या सासूबाई, तिची नणंद मेघा आणि काही माणसे उभी होती. रेवाला आश्चर्य वाटले. "आई तुम्ही आत्ता इथे कशा काय"? आणि ही सगळी माणसे कोण आहेत?नकळतपणे रेवाने विचारले. "सगळ सांगते. आम्हाला आत तर येवूदे." सासूबाई शांतपणे म्हणाल्या.
   रेवा खूपच गोंधळून गेली होती. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत तिच्या सासूबाई म्हणाल्या, " रेवा मला खूप महत्वाचं बोलायच आहे."
     "बोला ना आई काय झालंय? तुम्ही अशा अचानक इथे आणि मेघाला(अभिजीतची बहीण) घेवून कशा काय आलात? तिचं कॉलेज नाही का? मला खूप भीती वाटतेय बोला ना लवकर काय झालय ते.  ऱेवाने घाबरून विचारले.
  "रेवा अभिजीत कुठे आहे? सासूबाईंनी शांतपणे विचारलं.
  "आत बेडरूममध्ये झोपलाय. थांबा मी बोलावते" अस म्हणून रेवा बेडरूमकडे जायला वळली तेवढ्यात तिच्या सासूबाई तिला थांबवत म्हणाल्या, "रेवा थांब, आम्ही दोघी पण येतो तुझ्याबरोबर." त्या
      तिघी बेडरूममध्ये गेल्या तेव्हा फक्त आभा शांत झोपली होती. अभिजीत तिथे नव्हता. गोंधळलेल्या रेवाने बेडरुमभर फिरत त्याला हाका मारायला सुरवात केली. तिच्या आवाजाने आभा दचकून उठली आणि रडू लागली. पण रेवाचे तिकडे लक्षच नव्हते. ती अभिजीतला शोधत होती. रेवाच्या सासूबाईनी आभाला जवळ घेवून थोपटलं आणि ती शांत झाल्यावर तिला म्हणाल्या, "आभा आत्येबरोबर जरा फिरून येतेस? आत्येने तुझ्यासाठी खूप सारी चॉकलेट्स आणली आहेत”. समजूतदार आभा चटकन तिच्या आत्येकडे गेली.  मेघा आभाला घेउन बाहेर गेली.
     अख्खा बंगला फिरुन रेवा पुन्हा बेडरुममध्ये आली. अभिजीत कुठेही न दिसल्यामुळे ती डिस्टर्ब झाली होती. तिच्या सासूबाईंनी तिचा हात धरुन तिला बेडवर बसवले आणि शांतपणे म्हणाल्या, रेवा हे काय आहे सगळं? माझ्या बरोबर जी माणसे आली आहेत ना; ती म्हणजे अभीच्या ऑफिसमधले त्याचे सहकारी आहेत. त्यांनीच आम्हाला बोलावून घेतलंय. त्यांना अभिबद्दल काहितरी महत्त्वाचे बोलायचे आहे, असं काहीसं म्हणत होते फोनवर".
      रेवा हताश होवून बसली होती. सासूबाईंच्या बोलण्यामुळे अजूनच गोंधळली होती. अभिजीतच्या ऑफिसमधील मि. साने आणि अजून काही सहकारी आतमध्ये आले. काही क्षण तसेच शांततेत गेले. काय बोलाव कोणालाच काही कळत नव्हत.अखेर शांततेचा भंग करत मिस्टर साने म्हणाले, " मॅडम, अभिजीत कुठे आहे? गेले काही दिवस तो ऑफिसला का येत नाहीये?
      "What? How can it possible Mr. Sane?काल अभिजीत ऑफिसच्या कामासाठी बाजूच्या शहरात क्लाएंट मीटिंगसाठी गेला होता ना?तुम्हांला तर माहितीच असेल तूम्हीच तर पाठवल होत त्याला. रात्री उशीरा परत आला तो." रेवा संतापून म्हणाली.
 "मग तो आत्ता कुठाय?" सानेंनी रेवाला विचारल.
रेवा आता पूर्णपणे गोंधळली होती कसंबसं स्वतःला सावरत ती म्हणाली, "मी खरं तेच सांगतेय प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. काल मी स्वतः दार उघडून त्याला घरात घेतल. लाईट गेले होते म्हणून त्याने मला कॉल केला आणि......; एक मिनिट! काहीतरी आठवल्यासारख करत रेवा क्षणभर थांबली आणि म्हणाली, "काल रात्री अभीने दार उघड म्हणून सांगायला मला कॉल केला होता. Just wait for a second..... ",असं म्हणत तिने बाजूच्या ड्रेसिंग टेबलवरचा आपला मोबाईल घेवून कॉल हिस्ट्री चेक केली आणि रिसीव्ड कॉलमध्ये असलेला अभीचा नंबर मि. सानेना दाखवला. सानेनी कॉल हिस्ट्री चेक केली आणि ते रेवाला म्हणाले, "मॅडम रिसिव्ड कॉल हिस्ट्रीमध्ये अभिजीतचा नंबर आहे. अगदी बरोबर; पण तो कॉल काल रात्री आलेला नव्हता, तर आठ दिवसांपूर्वी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी आला होता."  रेवाने अविश्वासाने सानेंच्या हातून मोबाईल जवळपास ओढून घेतला आणि कॉल हिस्ट्री पुन्हा बघितली. सानेंचं म्हणण बरोबर होतं. कॉल आठ दिवसांपूर्वीचाच होता.
    रेवाचा गोंधळलेला चेहरा बघून साने म्हणाले, "रेवा मॅडम, तुम्हाला अभिजीतचाच काय कोणाचाच फोन काल येणं शक्य नव्हत कारण आठ दिवसांपूर्वी या सोसायटीच्या परिसरात वीज पडल्यामुळे सगळे मोबाईल्स आणि लॅंडलाईन सध्या बंद आहेत. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, अभिजीत काल नव्हे तर आठ दिवसांपूर्वीच म्हणजेच गेल्या मंगळवारीच बाजूच्या शहरात मिटिंगसाठी गेला होता. त्यांच्याबरोबर ऑफिसचे क्लार्क मि.सावंतही होते. पण त्यांचं घर त्याच शहरामध्ये असल्याने ते परत येणार नव्हते.  पण अभिजीत परत येणार होता आणि ते ही क्लाएंटने दिलेले २५ लाख रुपये घेऊन. बुधवारी सकाळी अभिजीत ऑफिसला आला नाही. त्याचा फोनही नाही म्हटल्यावर आम्हाला आश्चर्यच वाटल. पण नंतर थोड्या वेळातच कळलं की वीज पडल्यामूळे सगळे मोबाईल आणि लॅंडलाईन बंद आहेत. इतकंच नव्हे तर केबल तुटल्यामूळे त्या दिवशीपासून MSEB च्या काही लाईन्सही बंद आहेत. मंगळवारी अविरत पडणाऱ्या पावसामुळे अभिजीतला मिटिंग आटपून परतायला उशीर झाला असेल व दगदगीमूळे आज ऑफिसला यायचा कंटाळा आला असेल शिवाय फोन बंद असल्यामूळे त्याला ऑफिसमध्ये कळवताही आलं नसेल असा विचार करुन आम्ही त्याचं न येणं फारस गांभीर्याने घेतलं नाही. परंतू  दुसऱ्या दिवशीही जेव्हा अभिजीत ऑफिसला आला नाही तेव्हा मात्र ऑफिसमधले शिपाई मि. मोरे तुमच्या घरी बघायला आले होते. तेव्हा तुम्ही त्यांना अभिजीत ऑफिसला गेला असं सांगितलंत. पण त्या दिवशीही अभिजीत ऑफिसला न आल्याने मला शंका आली. संध्याकाळी कामे आटपून मी स्वतः तुमच्याकडे यायला निघालो.
      संध्याकाळची वेळ असल्याने दिवसपाळीचा वॉचमन नुकताच आपली ड्युटी संपवून निघाला होता आणि नाइट वॉचमन ड्युटीसाठी आला होता. त्यामुळे दोन्ही वॉचमन गेटजवळच भेटले. दोघांच्याही म्हणण्यानूसार त्यांना मंगळवारनंतर अभिजीत दिसलाच नव्हता. मंगळवारी सकाळी ६ वाजता अभिजीतला जाताना दोन्ही वॉचमननी बघितल होतं. कारण नाइट वॉचमनला लवकर जायचं असल्यामुळे दिवसपाळीचा वॉचमन त्यादिवशी थोडं लवकर आला होता. त्या दोन्ही वॉचमनशी बोलल्यावर माझ्या मनात भलत्याच शंका यायला लागल्या. नक्की कोण खरं बोलतंय काहीच कळत नव्हतं. एकीकडे तुम्ही मि. मोरेंना सांगितलंत, "अभिजीत रात्री परत आला व सकाळीच ऑफिसला गेला." पण अभिजीत ऑफिसला तर आलाच नव्हता. अखेर विचार करुन मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. पोलिसांनीही वेळ न दवडता तपासकार्याला सुरुवात केली. एका हवालदाराला तुमच्या घरावर पाळत ठेवायला सांगून आजूबाजूच्या बंगल्यांमध्येही चौकशी करण्याची सूचना दिली.
     पोलिसांच्या तपासानुसार मंगळावरी मिटिंग आटोपल्यानंतर अभिजीत आणि मि. सावंत   'विसावा' हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. त्या हॉटेलच्या सिसिटिव्ही कॅमेराचे फुटेज पोलिसांनी चेक केले आहेत. मि. सावंताच्या सांगण्यानूसार तिथून अभिजीत मि. सावंतना त्यांच्या घरी सोडून परतीच्या प्रवासाला लागणार होता. पण तेवढ्यात मीटिंगमध्ये झालेल्या काही पॉईंटसवर पुन्हा चर्चा करण्यासाठी क्लाएंटने अभिजीतला कॉल करुन परत येण्याची विनंती केली. त्यामुळे हॉटेलमधून सावंत त्यांच्या घरी गेले व अभिजीत पुन्हा क्लाएंटच्या ऑफिसमध्ये गेला. क्लाएंटच्या ऑफिसमध्ये असलेल्या सिसिटिव्ही फूटेजनूसार संध्याकाळी बरोबर ६:१० वाजता अभिजीत तिथून क्लाएंटने दिलेले २५ लाख रुये घेवून निघाला होता. निघण्यापूर्वी त्याने तुम्हांला फोन केला होता. त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्डनुसार तो त्याने केलेला शेवटचा फोन होता. तोच कॉल जो तुम्ही मला कालचा म्हणून दाखवताय”.
       रेवा आता रडकूंडीला आली होती. ती हतबल होऊन म्हणाली, "हे सारं काय चाललंय? मला नाही माहिती तुम्ही काय बोलताय? पण मला खात्री आहे अभिजीत कोणाचेही पैसे घेवून कुठेही जाणार नाही. तो आत्ता कुठे गेला ते नाही माहिती पण काल रात्री.....
        "काल रात्री तो परत आलाच नाही रेवा मॅडम कारण पोलिसांच्या तपासानूसार त्याच्या मोबाईलच शेवटच लोकेशन मंगळवारी रात्री गाववाडी नावाच्या गावाजवळच्या घाटात ट्रेस झालं. त्याच्याआधारे मुसळधार पावसातही शक्य तेवढी मेहनत घेवून पोलिस अभिजीतला शोधत होते. आम्हाला संशय होता की एकतर अभिजीत पैसे घेवून पळून गेलाय किंवा पैशासाठी अभिजीतचा घातपात करण्याचा प्रयत्न झालाय. पण अखेर दोन दिवसांच्या अथक परिश्रमाने पोलिसांना रविवारी घाटातून खाली कोसळलेली अभिजीतची गाडी आणि तिथूनच थोडया पुढच्या बाजूला एक डेड बॉडी मिळाली. याचा अर्थ त्या रात्री अभिजीतच्या गाडीचा अपघात झाला होता." मि. साने.
"हे काय सांगताय तुम्ही मि. साने"? रेवाला जबरदस्त धक्का बसला होता.
"खरं तेच सांगतोय मॅडम मी. मी हे तेव्हाच तुम्हाला कळवणार होतो. पण जवळपास ४ दिवस मध्ये गेल्यामुळे बॉडी पूर्ण सडली होती. त्यामूळे ती बॉडी अभिजीतचीच आहे हे सिद्ध करावं लागणार होतं. आमच्याकडे असलेल्या अभिजीतच्या मेडिकल रिपोर्टसनूसार ती डेड बॉडी अभिजीतचीच आहे हे सिद्ध झाले.
     नाईट वॉचमनच्या सांगण्यानुसार, "अभिजीत सरांच्या बायकोचं म्हणजे तुमचं वागणं अतिशय संशयास्पद आहे. रात्री साधारणपणे १ ते १.३०च्या सुमारास त्या दार उघडतात. थोडावेळ तिथेच थांबतात रडतात आणि मग हसत हसत दार लावून घेतात."
     तुमच्या बंगल्यावर पाळत ठेवून असणाऱ्या हवालदाराने दिलेल्या माहितीनूसार, "तूम्ही रोज अभिजीत घरी असल्याप्रमाणेच वागत असता. म्हणजे रोज सकाळी तो ऑफिसला जातो असं समजून त्याला निरोप देता. त्याच्यासाठी टिफिन बनवता. आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले, मिसेस रेवा वेडसर असल्याप्रमाणे वागतात. त्या एकट्याच बडबडत असतात. त्यामूळे तुम्हाला ही बातमी देणं आम्हाला योग्य वाटल नाही. म्हणून मग आम्ही अभिजीतच्या बायोडेटामध्ये नमूद केलेल्या नंबरवर संपर्क केला. तेव्हा आम्हाला कळले की अभिजीतच्या  घरी सध्या त्याची आई व बहीण दोघीच असतात. मग आमच्या ऑफिसमधल्या दोन महिला कर्मचारी व दोन पुरूष कर्मचारी त्यांना इथे घेऊन येण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांनी अभिजीतच्या घरी परिस्थितीची सगळी कल्पना देवून त्याच्या आईला व बहिणीला हा धक्का पचविण्यासाठी मदत करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी अगदी उत्तम पार पाडली.
"हे सगळं खोटं आहे. काय सांगताय तुम्ही", रेवा रडत रडत म्हणाली.
       "सावरा स्वतःला मॅडम. हे सगळं खरं आहे. आणि शक्य तितक्या लवकर हे स्वीकारा. कारण मी पुढे जे बोलणार आहे ते तुमच्यासाठी अजून धक्कादायक असेल." मि. साने.
"आता अजून काय बाकी राहीलं आहे? रेवा.
"सांगतो, या साऱ्या प्रकारात सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली ती आमच्या मेडिकल टिमने. तुमच्या एकूणच विचित्र वागणूकीबद्दल जी काही माहिती मिळाली त्यावरुन त्यांनी स्वतःहून तुमची भेट घेऊन खरी परिस्थिती जाणून घ्यायची ठरवली. त्यासाठी त्यांनी मानसोपचारतज्ञ डॉक्टर राव यांची मदत घेतली. तुमच्या घरी आलेल्या मेडिकल टिमला आभाने कित्येक दिवसात तिला तिचे बाबा न भेटल्याच सांगितले. हे सारं काय आणि कसं हे तुम्हांला डॉ. रावच समजावतील.” मि. साने बोलायचं थांबले.
रेवा सुन्न होवून सगळं ऐकत होती.  डॉं राव  रेवाला समजावत प्रेमाने  म्हणाले, "मला कळतंय रेवा आत्ता या वेळी तुमची मानसिकता काय असेल. पण आत्ता जर तुम्ही तुमच्या कल्पनाविश्वातच जगत राहिलात तर वास्तवात येणं तुम्हाला खूप कठीण जाईल. तुमच्याशी बोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गेले काही दिवस तूम्ही रोज एक विचित्र आयुष्य जगताय. तुमची रोजची रात्र म्हणजे अभिजीत मिटींगसाठी बाहेरगावी गेला होता त्या दिवसाची म्हणजेच मंगळवारची रात्र आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे एक काल्पनिक सकाळ. त्या सकाळी अभिजीत ऑफिसला जातो.
       त्या मंगळवारी आठच्या सुमारास लाईट गेले होते. MSEB कडून तात्पुरती व्यवस्था करुन सध्या दिवसभरात फक्त चार तासांसाठी प्रत्येक विभागात वीज पुरवठा केला जातोय. दुर्दैवाने तुमच्या विभागाला केला जाणारा वीज पुरवठा सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळामध्ये केला जातोय. सहाजिकच रोज रात्री आठ वाजताच लाईट जातात. मुसळधार पावसामुळे तुम्ही अगोदरच थोड्या घाबरल्या होतात. त्यात अभिजीतची वाटणारी काळजी, एकाकीपणा यामुळे तुम्ही खूपच निराश झाला होतात. रात्री अचानक लाईट गेले आणि तुमची भीती अधिकच वाढली. त्यानंतर दार वाजविल्याच्या आलेल्या आवाजामूळे तुमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. त्या भीतीवर मात करण्यासाठी तुमच्या मनाने अभिजीत परत आल्याची कल्पना निर्माण केली आणि त्या कल्पनेलाच वास्तव मानून तुम्ही जगू लागलात. तुमच्या दुर्दैवाने गेल्या आठ दिवसातल्या प्रत्येक रात्री जवळपास सारख्याच गोष्टी घडत गेल्या त्या म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस, रात्री आठच्या सुमारास जाणारे लाईट्स, मध्यरात्री ओसरणारा पाऊस,  त्यामुळे तुमच्या मानसिकतेला, तुमच्या काल्पनिक आयुष्याला खतपाणी मिळाले. त्या रात्री तुम्हाला जो दार ठोठावण्याचा आवाज आला त्याचंही स्पष्टीकरण मी देतो.  त्या रात्री नाईट वॉचमनला  तुमच्या बंगल्याबाहेर काही तरी ठोकल्यासारखा आवाज आला. तुमच्या बंगल्यात चोर शिरत असल्याचा संशय आल्यामूळे  तो तिथेच थांबला. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आल, की दाराजवळच्या झाडाची फांदी वाऱ्यामुळे डाव्या बाजूला झुकल्यावर ती दारावर आपटते आणि त्याचा आवाज दार ठोठवल्यासारखा येतो.  त्यानंतर मात्र तो तिथून निघून गेला होता.  रेवा सावरा स्वतःला. मूळात अभिजीत त्या दिवशी रात्री घरी आलेलाच नाही. कारण त्याच रात्री त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या गोष्टीचा स्वीकार करा".
      रेवा स्तब्ध बसली होती. ती काहीच बोलत नव्हती. रेवाच्या सासूबाईंनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण डॉक्टर रावांनी त्यांना खूणेनेच नको असे सांगितले आणि रेवाला एकट सोडण्याची सूचना दिली. त्यांच्या सुचनेनूसार सगळीजण बेडरूमच्या बाहेर गेली. डॉक्टर राव आणि मि. सानेही बाहेर जाण्यासाठी निघाले जाता जाता डॉ रावांनी केलेल्या सुचनेनूसार मि. साने रेवाच्या सासुबाईंना म्हणाले, "सॉरी टू से पण हा बंगला अभिजीतला कंपनीने रहायला दिला होता. आता अभिजीतच या जगात नाही तर......तुम्हाला बंगला खाली करावा लागेल. Don’t  worry. Take your own time. फक्त काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. अभिजीतचा मृत्यू ऑन ड्युटी झाला असल्यामूळे कंपनी नैतिक जबाबदारी स्विकारून तुम्हाला कॉंपेंसेशन देणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रांवर रेवा मॅडमची सही लागणार आहे. कदाचित त्यांना ऑफिसला यावं लागेल.  Take care". अस म्हणून मि. साने आणि डॉ. राव निघून गेले.
   रेवा तशीच शांत बसून होती. तिने ऐकलेल सारं तिच्यासाठी जेवढ दुःखद होतं तेवढच धक्कादायक. ती हतबल होऊन ड्रेसिंग टेबलवरच्या तिच्या आणि अभिजीतच्या फोटोकडे बघत होती. सहजच तिची नजर तिथे ठेवलेल्या टिशू पेपरवर गेली. तिचे डोळे चमकले. तिने चटकन उठून तो टिशू पेपर हातात घेतला. त्यावर लिहिले होते "हॉटेल विसावा".
समाप्त.
©मानसी जोशी


Wednesday, 7 December 2016

सुप्रभात

काल लेकीच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे निवांतपणे खिडकीजवळ बसून चहा घेत बसले होते. सहज उगवत्या सुर्यनारायणाचे दर्शन झाले. डोंगराआडून हळूहळू वर येत जाणारा लाल गोळा बघून वाटल, निसर्गाच्या सौंदर्याचा एक अप्रतिम आविष्कार म्हणजे डोंगराआडून वर येणारा आणि समुद्राच्या पाण्यात हळूहळू बुडत जाणारा सूर्य अर्थात सूर्योदय आणि सुर्यास्त. नकळतपणे मनात विचार आला या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होणारा हा प्रवास माणसाच्या जीवनाशी किती निगडीत असतो. डोंगराआडून हळूहळू वर येणारा सूर्य अगदी निरागस बाळाप्रमाणे भासतो. तो जसजसा वर येत जातो तस तसा त्याचा रंग पिवळा होत जातो आणि निरागसतेमध्ये अल्लडपणा मिसळल्यावर एखाद लहान मुल जस गोड वाटत ना तशीच हि सोनपिवळी सकाळ हवीहवीशी वाटते. हळूहळू लाल रंग जाऊन पिवळसर गोळा दिसायला लागतो.  छान गारवा, पक्षांचा किलबिलाट अगदी प्रसन्न आयुष्य.  जसजशी वेळ धावायला लागते तसतशी निरागसता लोप पावत जाते आणि अल्लडपणाही विरुन जातो. मग हळूहळू मध्यान्हीच्या उन्हासारखे जाणवायला लागतात अनुभवांचे, या निष्ठूर आयुष्याचे चटके. सोनपिवळ्या सकाळच्या शीतल हवेत बघितलेली स्वप्ने हरवून जातात. मग जाणवते ती वास्तवाची प्रखर दाहकता.  अनुभवांचे, नियतीचे टक्केटोणपे खाल्ल्यामूळे आलेल्या परिपक्वतेच प्रखर तेज उरलासुरला अल्लडपणा, निरागसपणा झाकोळून टाकते.  हळूहळू मावळतीची चाहूल लागायला सुरुवात होते. प्रखरतेमूळे हरवलेली निरागसता हळूहळू पुन्हा दिसू लागते. पूर्वीइतका नाही पण थोड्या प्रमाणात शिल्लक असलेला अल्लडपणा आपले अस्तित्व अधूनमधून जाणवून द्यायला लागतो. त्याला जपावस वाटत पण परिपक्व पिवळसर चेहरा त्याला तिथेच थांबवून ठेवतो. उत्तरायण सुरू होत. पुन्हा सूर्य लाल दिसायला लागतो.  उदयाला दिसणाऱ्या सगळ्या रंगछटा पुन्हा मावळतीला दिसू लागतात. या रंगांची पण ना एक गम्मत आहे. दोन्ही  सारख्याच रंगछटा पण दोन्हीमध्ये असतो तो अगदी बारिकसा पण महत्वाचा फरक.  उगवतीचे रंग एक नवा दिवस, नवे आयुष्य घेउन येतात, तर मावळतीच्या रंगात एका परिपक्व पोक्त आयुष्याच्या छटा दिसतात. हळूहळू सूर्य अस्ताला जातो आणि सगळे रंग विरुन अंधार पसरतो. माणसाचही तसच! एकदाचे 'डोळे मिटले' कि पूर्ण अंधार. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्याच वेळी  दुसऱ्या देशात कुठेतरी सूर्योदय होत असतो.  माणसाच आयुष्यसुद्धा असच. एक जन्म संपला कि दुसरीकडे कुठेतरी नव्या जन्माची नव्या आयुष्याची सकाळ होते.  एक सुप्रभात!!
©मानसी जोशी

Tuesday, 6 December 2016

मनमानसी

गेल्या आठवड्यात तो गेला. मला खूप वाईट वाटले. तसा तो आजारीच होता. पण आपले आयुष्य व्यवस्थित जगत होता.  अगदी फार नाही तर गेल्या अडीच वर्षांचा सहवास आमचा. अडीच वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्यामूळे त्याची आणि माझी भेट झाली. सुरुवातीला हाय हॅलो एवढच नात आमच. पण हळूहळू तो मला कळत गेला आणि त्याचा सहवास मला आवडायला लागला. अनेक गोष्टींमध्ये त्याने माझी मदत केली. माझ्या मुलीलाही तो खूप आवडायचा. त्याच्यामुळेच मी लिहायला लागले अस नाही म्हणणार मी हा पण माझ्या लिखाणासाठी त्याने मला खूपच मदत केली होती. त्याच्यामुळेच माझे अनेक कॉंटॅक्ट्स वाढले होते. दोन वर्षांपूर्वी आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता त्यावेळेस त्याने काढलेले आमचे सुंदर फोटोज आजही माझ्याजवळ आहेत. आजकाल त्याच माझ एकत्र असण माझ्या नवऱ्याला खटकायला लागल होत. माझ्या मूलीलाही तो फारसा आवडेनासा झाला होता. पण मला त्याचा सहवास फार आवडायचा. त्याच्याबद्दल फारच आपुलकी वाटत होती.  गेल्या मे महिन्यामध्ये त्याचा एक मोठा अपघात झाला होता त्यातून तो वाचला अगदी जीवावरच्या अपघातातून वाचला. पण तेव्हापासून मात्र तो खूपच अशक्त झाला होता.  त्याच हार्ट तस आधीपासून कमजोर होतच पण अपघातामूळे ते अजूनच नाजूक झाल होत.  गेल्या चार महिन्यापासून तो फारच आजारी होता.  त्याचं आयुष्य फारतर सहा महिन्याच्यावर नाही हे मला आधीच कळल होत.  अखेर गेल्या मंगळवारी तो गेला. त्याच जाण जीवाला चटका लावून गेल. मला खूप वाईट वाटले.  अखेर जाणारा जातोच त्याला काही इलाज नसतो. अहो मंडळी कसला  विचार करताय? तो दुसरा तिसरा कोणी नाही हो माझा मोबाईल होता. माझा पहिला स्मार्टफोन. लोक पण काय काय विचार करतात एकएक. तर मागच्या मगळवारपासून माझा मोबाईल बंद पडल्यामुळे मी फेसबूकवर फारशी फिरकू शकले नाही.  शुक्रवारी  नवीन स्मार्टफोन घेतला. पण जरा एका फॅमिली फंक्शन साठी बाहेरगावी गेले असल्याने थोडी बिझी होते. या दिवसांमध्ये अनेकांनी " काय ग आजकाल तू लिहित का नाहीस? तब्येत ठीकआहे ना? काळजी घे  असे मेसेज करून आपूलकीने चौकशी केली त्या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना रिप्लाय करणे शक्य न झाल्याबद्दल सॉरी.
©मानसी जोशी




Monday, 21 November 2016

डॅडीज गर्ल

डॅडीज गर्ल!! आजकालच्या समस्त पुरुषवर्गाच्या अनेकवेळा ओठावर येणारा पण कदाचित तिथेच थांबणारा शब्द. बायका मम्माज  बॉय, बायकोचा बैल वगैरे विशेषणं अगदी सहज वापरतात पण त्यामानाने डॅडीज गर्ल हा शब्द फारच कमी वापरला जातो. मला मात्र  ममाज बॉय जेवढ पटायचं तेवढ डॅडीज गर्ल पटत नव्हत पण हा डॅडीज गर्ल चा प्रत्यय मात्र मला प्रत्यक्षात माझ्याच घरात आला. माझी ९ वर्षांची मुलगी चिन्मयी आम्ही तिला चिनू म्हणतो. या लहान मुलांच्या डोक्यात कधी काय येईल सांगता येत नाही. त्या दिवशी स्वतःचाच लहानपणीचा फोटो घेऊन आली आणि मला विचारू लागली,"आई सांग तुला कुठली चिनू आवडते मी का हि फोटोतली ?" मी काम करता करताच  काहीस वैतागुनच म्हणाले, "चिनू काय वेडेपणा आहे. त्रास देऊ नकोस ग". पण हि पठ्ठी काही ऐकायलाच तयार नाही. 'सांगा ना आई'  चा हेका चालूच. मग मी हि म्हणाले "दोघीही". "नाही एकच सांगायचं .....चिनू. "नाही एक नाही सांगता येणार हा. तू सांगू शकतेस का जास्त कोण आवडत, आई कि बाबा?" मी माझा हुकुमाचा एक्का काढला. यावर मात्र ती जरा हिरमुसली आणि निघून गेली. मी सुटकेचा निश्वास टाकला. तेवढ्यात परत येऊन म्हणते कशी, " अग तुम्ही दोघ  वेगवेगळी आहात म्हणून मला नाही सांगता येत, इथे दोन्ही मीच आहे ना . इतर वेळेला अभिमान वाटावी अशी यांची हुशारी अशावेळी मात्र आपल्याला त्रासदायक ठरते.माझ्या  हुकुमाच्या एक्क्याचा तिने अगदीच जोकर करून टाकला.  तेवढ्यात तिच्या  मैत्रीणी तिला खेळायला बोलवायला आल्या. इतर वेळीस खासकरून परीक्षेच्या वेळीस मला व्हीलानसाराख्या वाटणाऱ्या या मैत्रिणी त्या दिवशी मात्र मला देवादुतासारख्या वाटल्या. सुटले, विसरेल आता असा विचार करून मी निर्धास्त झाले. दुसऱ्या दिवशी रविवार होता.दुपारी  जेवण झाल्यावर आमचे अहो हक्काची सुट्टी  एंजॉय करणे म्हणजे शक्य तेवढ झोपणे या नियमानुसार बेडरूम मध्ये गेले. चीनुही पाठोपाठ फोटो घेऊन. आता मात्र मला हसू आवरेना माझ्या अपेक्षेनुसार एक तर ती ओरडून घेणार होती किंवा बाबा ignore करतात म्हणून वैतागणार होती. पण हिला अहो काय सांगतायत याची मात्र मला प्रचंड उत्सुकता होती. चला बघुया काय होतंय म्हणून मीही मागोमाग आत गेले.  दोघांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. मी शांतपणे whats ap वरचे messages चेक करत होते. अखेर तो क्षण आला..... मी लक्ष नसल्याचे दाखवत मोबाईल मध्येच डोकं खुपसून बसले.... " सांगा ना बाबा कोण जास्त आवडत तुम्हाला? मी कि हि फोटोतली चीनु? चिनूने विचारलं. क्षणभर विचार करून अहो तिच्याकडे बोट करून म्हणाले "जेव्हा हि चिनू घरात नसते तेव्हा या फोटोतली चिनू आवडते आणि जेव्हा हि चिनू घरात असते तेव्हा हीच आवडते." चिनू खुश झाली. माझ्याकडे कुत्सित नजरेने पाहून बाबांच्या कुशीत शिरली..  मी मात्र विचार करत राहिले  किती सहज समजावलं याने हिला. हे मला का नाही सुचल. असो. कधीतरी whats ap वर आलेला मेसेज आठवला, "
 एक लडकी चाहे कितनी भी कोशिश करे
फिरभी वो अपने पती के लिये रानी कभी नही बन सकती,
लेकीन हजार गलातीयोन्के बावजुद भी
अपने पापा के लिये राजकुमारी जरूर होती है. .....

©मानसी जोशी 

माहेरुन निघताना

#माहेरुननिघताना
मंगळवारी रात्री माझ्या माहेरहून म्हणजेच रत्नागिरीहून पुण्याला परत यायला निघाले. लग्नाला १२ वर्षे होवून गेली तरी आजही माहेरहून निघताना मन हळव होतं. बसमध्ये बसल्यावर हात हलवून बाबांना निरोप दिला. त्या स्लिपर कोच नामक सुपरफास्ट बैलगाडीत बसल्यावर जणू जगाशी संपर्कच तुटतो. गाडी पुढे जात होती आणि डोळ्यासमोर गेल्या आठ दिवसातील सगळ्या घटना तरळत होत्या. यावेळी सगळ्यात जास्त धमाल आली ती माझ्या सव्वा वर्षांच्या भाचीमूळे - नीरजामूळे. तिच्या बाललीला बघून मन सुखावून गेले. डोळ्यासमोर सतत तिचा चेहरा येत होता. तिने आsssत्या अशी मारलेली गोड हाक सतत कानात घूमत होती. निघायच्या दिवशी मी तिला सांगत होते, " मनू आज जाणार आहे हा मी ............"  तिला काही कळत होत का ते माहिती नाही पण शांतपणे सगळ ऐकत होती. ते आठवून हसायला आलं. मनात आल, 'पुढच्या वेळी मी हिला बघेन तेव्हा किती बदललेली असेल ही.' या आठ दिवसांमध्ये काय काय करायच ठरवल होतं ते आठवल पण बरचस राहून गेल होत.
बरेचसे नातेवाईक रत्नागिरीमध्येच रहात असल्यामुळे "यावेळी नक्की येते तुमच्याकडे" अस सांगून ज्यांच्याकडे जायला जमल नाही असे नातेवाईक; "काय ग कधी येणार आहेस अस मेसेज करून विचारणारे पण या वेळेसही ज्यांना भेटायला जमल नाही असे मित्र मैत्रिणी सारे डोळ्यासमोर आले. आपल्या नोकरीमुळे जास्त वेळ देता येत नसल्याच शल्य बोलून दाखवणारे भाऊ भावजय आठवले. प्रत्येक खेपेला आपल्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून भेटणारे मित्र मैत्रीणी आणि त्यांची भेट आठवली. "काय ग पुणं मानवल हा तुला  किंवा "सॉलिड आहेस हा तू अगदी आहेस तशीच आहेस, पूर्वीइतकीच बारिक असतीस तर कॉलेजची स्टुडंटच वाटली असतीस. अशा शब्दात तारीफ(?) करणारे मित्र मैत्रिणी, त्यांची काही तासांची पण काही मिनिटांतच संपली अशी वाटणारी भेट; निघताना "परत कधी भेटू काय माहिती" अस म्हणून नाराजीने एकमेकांचा घेतलेला निरोप; हे सार आठवून डोळ्यात पाणी तरळल. मनात आल; एक काळ असा होता जेव्हा सगळे रोज भेटत होते. तेव्हा मोबाईल नव्हता; फेसबूक, whats ap, काहीच नव्हत. फक्त लॅंडलाइन फोन होता. कॉलेजमध्ये भेटूनही पुन्हा तासनतास फोनवर गप्पा मारल्या आणि त्यावरुन घरच्यांची किती बोलणी खाल्ली होती. आज जवळ मोबाईल आहे त्याच बिल भरायला हातात पैसा आहे पण कोणाशी कित्येक दिवसात साध दोन मिनिटेही बोलणं होत नाही. फोनवर तासनतास बोलायचे म्हणून ओरडणारे आई बाबा आजही सारखा मोबाईल हातात असला की ओरडतात फरक फक्त एवढाच; तेव्हा त्यांच्या ओरडण्यामुळे चिडचिड व्हायची आणि आज खूप बरं वाटत. निदान काही क्षण तरी आपल्याच घरी असल्यासारख वाटत. लग्नानंतर आपल्याच एके काळच्या हक्काच्या घरी आपण चार दिवस पाहुणी म्हणून जातो; जिथला कोपरान् कोपरा आपल्या परिचयाचा असतो अचानक  तिथली दारे खिडक्याही काहीशी अनोळखी भासतात.  आज इतक्या वर्षानंतरही मनात येतं, "का मुलीना आपल घर सोडून जावं लागत? का आपल्याच घराला आपण परके होवून जातो?" प्रत्येकवेळी माहेरी गेल्यावर वार्धक्याकडे झुकणारे, तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरु झालेले आई बाबा बघितले की अचानक आपल्या वयाच्या  मोठेपणाची जाणीव होते. वाटत लहान होवून आईच्या कुशीत शिराव, बाबांकडे हट्ट करावा पण ......आपण मोठे झालो ना आता.  तस फोनवर रोजच बोलण होतं कधीकधी अगदी दोन तीन वेळा पण प्रत्यक्ष भेटीच समाधान त्यात नसतं. जायच्या दिवशी बॅग भरायची गडबड. बाबांचे नेहमीच बोलणं,"नारळ नेणार आहेस का? आमसूल देवू का? कढिपत्ता काढून ठेव आत्ताच नाहीतर विसरशील, एक ना अनेक. किचनमध्ये आई खाऊची, पीठांची एकएक पुडी गुपचूप बांधत असते.  क्षणाक्षणाला मन उदास होत असत. घरातून निघताना माहेरच्या देवासमोर हात जोडले; पुण्यातून निघताना नेहमी ठरवते, ज्या देवाने लहानपणापासून जे जे  मागितले ते सर्व दिलं  त्याच्यासमोर आपल्या काही मागण्या मागाव्यात; त्याला आपले प्रॉब्लेम्स  सांगून ते दुर करायला सांगावेत पण नेहमी निघताना फक्त एकच मागणं मागते, " या घरातल्या सगळ्यांना नेहमी सुखात ठेव."डोळ्याच्या कडा ओलावतात सगळ्यांच्या नकळत त्या पुसून हसत हसत बॅग घेवून दारापर्यंत जाते. आपले अश्रू डोळ्यातच थांबवणारी आई आणि हळवे झालेले बाबा बघून क्षणभर पाय तिथेच थांबतात. पण शेवटी निघावच लागत कारण गाडीची वेळ झालेली असते. निघताना सगळ्यांना आणि घरालाही मी पुन्हा एकदा डोळे भरून बघते आणि जड झालेली पावलेही भराभर टाकत पुढे जाते. पळणाऱ्या गाडीबरोबर माझ शहरही मागे मागे जात असत.
विचारांच्या तंद्रीत असतानाच बाजूला झोपलेली लेक हात गळ्यात टाकून म्हणाली, "आई उद्या सकाळी बाबा येतील ना आपल्याला न्यायला. माझे सगळे फ्रेन्ड्स पण भेटतील उद्या." मी हसून हो म्हणाले. मनात आलं, मी माझ्या हक्कच्या घरीच तर चाललेय. जिथला प्रत्येक कोपरा मी सजवलाय. माझं घर माझी वाट बघतय. माझं हक्काच घर माझ्या मुलीच उद्याच माहेर!
©मानसी जोशी

Sunday, 6 November 2016

कथा - स्वरप्रीती -एक विलक्षण प्रेमकहाणी

स्वरप्रीती - एक विलक्षण प्रेमकहाणी

 “Ajay we are going to visit Ganesh Temple please join us”.  अनिल अजयला हाक मारून म्हणाला.
    अजय हसून म्हणाला, “No No तुम्ही जा मला थोडा वेळ इथेच थांबायचं आहे and please  speak  in Marathi .  I can  understand Marathi  ......
    "ok boss! sorry next time sure ...." त्याच बोलणं मध्येच तोडत अनिल म्हणाला. यावर दोघेही खळखळून हसले..
    "बर ऐक समुद्रामध्ये  जास्त आतमध्ये जाऊ नकोस आणि हो त्या पडक्या वाड्याजवळ बिलकुल जाऊ नकोस ती जागा ठीक नाहीये." अनिल जाता जाता अजयला समजावत म्हणाला.
     अजयने उत्तरादेखल फक्त मान हलवली आणि दूरवर अथांग पसरलेल्या  समुद्राकडे शांतपणे एकटक बघू लागला.

   अजय हा US मधून आलेला अनिलचा मित्र. उच्चशिक्षणासाठी US ला गेलेल्या कोकणातल्या अनिलची ओळख अजयशी होते. अजय हा भारतीय वंशाचा अमेरिकन मुलगा. त्याची आई मराठी आणि शास्त्रीय संगीत शिकलेली पण NRI  असणाऱ्या आणि पैसा हेच सर्वस्व असणाऱ्या माणसाशी नाईलाजाने लग्न केल्यामुळे तिची कला तिच्यापुरातीच मर्यादित राहिलेली. घरातल वातावरण कधीच खेळीमेळीच नाही. अजयला मात्र त्याच्या आईने लहानपणापासूनच मराठी आणि थोडफार शास्त्रीय संगीत शिकवलं होत. सहाजिकच मराठी भाषा आणि एकूणच मराठी संस्कृती याबद्दल त्याल प्रेम आणि आकर्षण दोन्ही होते. अनिल हा महाराष्ट्रातील आहे हे कळल्यावर अजयने त्याच्याशी मैत्रीचा हात स्वतःहून पुढे केला. नवख्या देशात अनिललाही त्याचा आधार वाटला. बघता बघता मास्टर्स पूर्ण झाल. समजायला लागल्यापासून भारतात कधीही न गेलेल्या अजयला भारत विशेषकरून महाराष्ट्र बघायची खूप इच्छा होती. त्यामुळे परीक्षेनंतर इतर कुठेही न जाता तो आणि त्याचे मित्र अनिलबरोबर त्याच्या गावी आले होते.
   कोकणात आल्यापासून अजयला हे सार आपल्या ओळखीच आहे अस वाटत होत. विशेषकरून हा समुद्र. या समुद्रावर आल्यापासून त्याला सतत वाटत होत हा अथांग सागर जणू वर्षानुवर्ष त्याची वाट बघतोय. त्या अथांग सागराकडे  तो भान हरपून पहात होता. त्याच्या मनात विचार आला. काय नातं असेल या सागराच माझ्याशी? हा काय त्याच्या आयुष्यातला त्याने पाहिलेला पहिला समुद्र नव्हता पण तरीही जी ओढ त्याला या समुद्राबद्दल वाटत होती ती या आधी कधीच वाटली नव्हती. एक अनामिक हुरहूर लागली होती त्याच्या मनाला.

"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

         अजयच्या कानावर आलेल्या गाण्याच्या मंजुळ सुरांनी अजय विचारांच्या तंद्रीतून बाहेर आला. त्याने इकडे तिकडे बघितलं तर त्याला कोणीच दिसलं नाही. गाणं मात्र ऐकू येत होत.

आइयेsssss मेहेराबां ......

गाण्याच्या सुरांनी व्याकुळ होवून तो आवाजाच्या दिशेने चालू लागला. चालता चालता तो पडक्या वाड्याजवळ गेला. तिथे एक सुंदर तरुणी दिसली. अजय त्याच्याही नकळत तिच्याकडे खेचला जात होता. तिच गायन चालूच होत. तो मुग्धपणे ते ऐकत होता.. गाता गाता तिच अजयकडे लक्ष गेल आणि ती एकदम शांत झाली. “का थांबलात  गा ना! खूप छान म्हणताय तुम्ही गाणं”, अजय नकळतपणे बोलून गेला. ती तरुणी काहीही न बोलता जायला निघाली. तिला थांबवत अजय म्हणाला, “तुझ नाव काय ते तरी सांगून जा.” ती न थांबताच म्हणाली.......मुग्धा.अजयही तिच्यामागून चालत तिला म्हणाला, प्लीज  थांब ना तुझ्याशी बोलायचं आहे. “आज नको उद्या संध्याकाळी भेटू आपण, मला आता निघायला हव खूप उशीर झालाय. तुम्हीही घरी जा”’ एवढ बोलून ती धावतच पडक्या वाड्याच्या दिशेने निघून गेली.           "अजय..........अजय ........... "अनिलची हाक ऐकू आली आणि अजय भानावर आला.
    “आलो”, असा प्रतिसाद देवून तो पळतच गेला.
   अनिल म्हणाला, "अजय त्या बाजूला कशाला गेलास? मी सांगितलं होत ना जाऊ नकोस तिकडे? I know you  don’t believe in such things but still....... अरे तू कोकणात आला आहेस इथे तुला खूप haunted  places बद्दल ऐकायला येईल. Please you are my guest;  my responsibility. ...... "
    अनिल वैतागून बोलत होता. अजयच मात्र त्याच्याकडे लक्षच नव्हत त्याला सतत मुग्धाच आठवत होती. तिचे भावूक डोळे, मुग्ध पण आर्त करणारे सूर, पहिल्याच भेटीत तो तिच्या प्रेमात पडला होता. “अजय काय सांगतोय मी?” अनिलने वैतागून विचारले.
      "सॉरी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन." अजय कसबस म्हणाला. एक क्षण त्याला वाटलं कि अनिलला सांगाव त्या मुलीबद्दल पण नकोच उगाच तो काहीतरी भलतच सांगेल, असा विचार करून तो गप्प राहिला.
    घरी गेल्यावर अजय एकदम गप्प गप्प होता. कोणाशी बोलायची त्याची इच्छाच नव्हती. त्याला फक्त मुग्धा आठवत होती. बाकी सगळेही फिरून दमले असल्यामुळे तसे गप्पच होते. त्यामुळे तसा कोणालाच संशय आला नाही. पटापट जेवण उरकून सगळे झोपायला गेले आणि अंथरुणावर पडल्या पडल्या सगळ्यांना गाढ झोप लागली. अजय मात्र जागा होता. मुग्धाच्या आठवणीत तळमळत होता. दुसऱ्या दिवशी आजूबाजूच्या गावातली काही मोजकी ठिकाण पाहून संध्याकाळी सगळे घरी आले. सगळे खुप दमले होते. अजय मात्र खूप उत्साही होता कारण त्याला मुग्धा भेटणार होती. फ्रेश होवून तो समुद्रावर जायला तयार झाला. पण त्याच्याबरोबर जायची कोणाचीच इच्छा नव्हती. अजय एकटाच जायला निघाला ते पाहून  अनिलच्या बाबांनी त्यांच्याकडच्या गड्याला विसूला त्याच्याबरोबर पाठवलं.  अजय मनातून वैतागला पण त्याचा नाईलाज होता. समुद्रावर पोचल्यावर अजयने विसूला  घरी जायला सांगितले. त्यालाही घरी जायची घाई असल्याने तो निघून गेला. तो गेल्याची खात्री झाल्यावर अजय पळतच त्या पडक्या वाड्याच्या दिशेने निघाला. त्याला आसपास मुग्धा कुठेच दिसत नव्हती . त्याने तिला हाक मारली पण तिचा काहीच पतिसाद आला नाही. इतक्यात त्याला आठवलं काल ती पडक्या वाड्याच्या दिशेने धावत आतमध्ये गेली होती. तो हि धावत तिकडे गेला. वाड्याच्या गंजलेल्या  गेटमधून आत गेल्यावर तो क्षणभर थांबला. त्याला अनिलचे शब्द आठवले. नाही काही झाल तरी अनिलाशी बोलल्याशिवाय इथे जाण योग्य नाही, त्याच्या मनाने त्याला कौल दिला आणि तो परत जाण्यासाठी निघाला. गेटमधून बाहेर आल्यावर त्याला पुन्हा गाण्याचे तेच सूर ऐकू आले.

"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

........एका अनामिक ओढीने तो वाड्याकडे खेचला गेला.
अंधार पडून गेला तरी अजयचा पत्ता नाही म्हटल्यावर अनिल थोडा घाबरला. पण गडी बरोबर असल्यामुळे तशी भीती नाही असा विचार करून तो गप्प राहिला. त्याने अजयचा मोबाईल ट्राय  केला पण तो स्विच्ड ऑफ  लागत होता. अखेर साडेआठ वाजून गेल्यावर अनिल  आणि त्याचे मित्र अजयला शोधायला समुद्रावर जायला निघाले. अनिलच्या बाबांनी त्यांच्या घराजवळच्या गड्याला सखारामला  त्यांच्या सोबतीला पाठवलं. अनिल मनातून खूप घाबरला होता. तेवढ्यात त्याला त्याच्या बाबांनी अजय बरोबर पाठवलेला गडी विसू भेटला. तो पहिल्या धारेची मारून चांगलाच तर्र झाला होता. त्याला अजयबद्दल विचारल्यावर कसबस हेलकावे खात त्याने खर काय ते सांगितलं. अनिल विसुवर चांगलाच वैतागला. पण त्याच्यावर चिडण्यात काहीच अर्थ नव्हता. अजय आज एकटाच समुद्रावर गेला या विचाराने अनिलच्या काळजात धस्स झाल. सगळे पळतच समुद्राकडे निघाले. समुद्रावर आल्यावर सगळ्यांनी अजयला खूप हाका मारल्या पण त्याचा काहीच पत्ता नव्हता. अखेर सगळे धावत पडक्या वाड्याच्या दिशेने निघाले. अजय कुठेच दिसेना . ना हाकेला ओ देईना अनिलने हिम्मत करून वाड्यामध्ये जायचे ठरवले. सखारामने त्याला अडवायचा प्रयत्न केला पण अनिल काहीच ऐकायला तयार नव्हता. अनिल आणि अजयचे मित्रही त्याच्याबरोबर वाड्यात गेले.
          वाड्याच गेट उघडून आत गेल्यावर दोन चार वटवाघुळे पंख फडफडवीत त्यांच्या डोक्यावरून गेली. मनातून सगळेच घाबरले होते. कधी रामरक्षा म्हणत तर कधी अजयला हाक मारत त्यांनी वाड्यात प्रवेश केला. पडका जरी असला तरी वाडा अतिशय सुंदर असावा. पौर्णिमेच्या चंद्राच शुभ्र प्रकाश सर्वत्र पसरला होता. त्यामुळे मनातली भीती थोडी कमी झाली होती. तेवढ्यात एक उंदीर अनिलच्या पायाजवळून गेला आणि भीतीने अनिल जोरात  ओरडला. तो उंदीर होता हे कळल्यावर सगळ्यांनाच हसू आले. सगळे अजयला हाका मारत अख्खा वाडा फिरून आले तरी अजय कुठेच दिसत नव्हता. अखेर निराश होवून सगळे वाड्याबाहेर जायला निघाले. तेवढ्यात अनिल कशालातरी अडखळला. बॅटरीच्या उजेडात त्याला अजयचा मोबाईल दिसला. तो पाहून सगळ्यांची खात्री झाली कि अजय इथेच आला होता. मोबाईल डिसचार्ज होवून स्विच्ड ऑफ झाला होता. आता जास्त वेळ वाड्यात थांबण्यात काहीच अर्थ नव्हता म्हणून सगळे वाड्याच्या बाहेर आले. वाड्याबाहेर सगळा गाव जमा झाला होता. अनिलला आणि त्याच्या मित्रांना पाहून अनिलच्या बाबांचा जीव भांड्यात पडला. अनिल आणि त्याचे मित्र त्याच्या बाबांसोबत पोलीस स्टेशनला गेले. तिथे रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी जुजबी चौकशी करून अजयचा मोबाईल ताब्यात घेतला. आणि सगळे आपआपल्या घरी निघून गेले. अनिलला खूप अपराधी वाटत होत. आपण अजय बरोबर गेलो असतो तर बर झाला असत अस प्रत्येकालाच वाटत होत. दिवसभराचा थकवा आणि अजयच्या गायब होण्याच टेन्शन यामुळे बसल्या जागीच सगळ्यांचा डोळा लागला. पहाटे चारच्या सुमारास अनिलच्या  मोबाईलच्या  मेसेज टोनच्या आवाजाने सगळे दचकून उठले. अनिलने झटकन  'व्हॉट्स ॲप' ओपन केले. त्यावर अजयने पाठवलेली एक 'ऑडिओ'  पाहून सगळ्यांच्याच चेहऱ्यावर आनंद तरळला. अनिलने क्लिप डाऊनलोड केली. सगळे शांतपणे क्लिप ऐकू लागले. अजय बोलत होता.

      “अनिल मला माफ कर मी तुझ्यापासून मुग्धाच सत्य लपवल. पण मी सत्य लपवल्यामुळे मला माझ्याबद्दलच एक मोठ सत्य कळल; माझ्या गतजन्मातल सत्य. या पडक्या वाड्यात आल्यावर मला माझा गतजन्म अगदी जशान  तसा आठवला. कोणी विश्वास ठेवा अगर ठेऊ नका पण मी जे सांगतोय तेच सत्य आहे.

   "मी निशिकांत – या वाड्याच्या मालकांचा म्हणजेच गायक पंडितशास्त्री जोशींचा मुलगा. आपल्या पत्नीशी म्हणजेच सिनेतारका कामिनिशी असलेले वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यावर आपल उर्वरित आयुष्य फक्त आणि फक्त संगीत साधना करण्यात घालवायाच अस ठरवून पंडितशास्त्री आपल्या कोकणातल्या मूळ गावी परत आले. समुद्राजवळची जागा विकत घेवून त्यांनी हा वाडा बांधला. त्यांच्याकडे संगीत शिकण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळाले. त्यांचे नियमच तसे जाचक होते. अस्सल जवाहिऱ्यासारखे ते आपला शिष्य पारखून घेत असत. मी माझ्या आईजवळच असायचो. पॉप म्युझिकच शिक्षण घेतलेला मी तसा शास्त्रीय शिक्षणासाठी कधीच उत्सुक नव्हतो. माझ्या आई आणि वडिलांमध्ये कितीही मतभेद असले तरी मला मात्र कुणाजवळही रहायची मुभा होती. त्यांच्या वादात मी कधीच भरडलो गेलो नाही. मला कोकणातल्या या गावाच आकर्षण नव्हत पण बाबांच्या ओढीने मी अधूनमधून येत असे. माझ आणि बाबांचं खूप जमायचं. त्यावर्षी मात्र मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर कोकणातल्या या वाड्यात भरपूर दिवस रहाण्यासाठी आलो होतो. बोलता बोलता एक दिवस मी बाबांना पॉप म्युझिक ऐकवलं यावर हसून ते म्हणाले, “तू फक्त गाण म्हटलस, श्रोते तुझ गाण ऐकतील, त्यावर थिरकतील पण तुझ्या सुरांनी मंत्रमुग्ध होणार नाहीत.” यावर मी चिडून म्हणालो होतो, सगळेच श्रोते काही शास्त्रीय सुरांनी मंत्रमुग्ध होत नाहीत. मी जर मुग्ध झालो तर मी मान्य करेन.” यावर ते हसून म्हणाले, “बाळा मी तुझ्या सुरांबद्दल बोलतोय तुझ्या गाण्याच्या प्रकाराबद्दल नाही.  गाणं मग ते कुठलही असो त्याला शास्त्रीय सुरांचा रियाज असेल तरच त्याचे सूर मंत्रमुग्ध करतात. मला मनातून राग आला होता पण मी काहीच बोललो नाही. त्या दिवशी संध्याकाळी बाबा पाय मोकळे करण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडले. मी घरात एकटाच होतो. खिडकीत उभा राहून एकटक या समुद्राकडे पहात होतो तेवढ्यात माझ्या कानावर गाण्याचे काही सूर पडले.
 
"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

मी मत्रमुग्ध होवून ते गाणं ऐकू लागलो आणि माझ्याही नकळत त्या आवाजाच्या दिशेने खेचला गेलो. चालत चालत मी अंगणात आलो ती गातच होती.....
"आईयेsssss  मेहेरबा ....." आणि अचानक तीच माझ्याकडे लक्ष गेल ती क्षणात गायची थांबली.
     मी म्हणालो, “का थांबलात? गा ना! खूप छान म्हणताय तुम्ही गाणं” यावर काहीही न बोलता जायला निघाली.
    तिला थांबवत मी विचारल, “तुझ नाव काय ते तरी सांगून जा.” ती न थांबताच म्हणाली.......मुग्धा.
     ती पाहताच बाला........अशी माझी अवस्था झाली होती. तिच्या सौंदर्याने आणि सुरांनी मला घायाळ केला होत.  बाबा घरी आल्यावर मी त्यांना मुग्धाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले ती आपल्याकडे कामाला येणाऱ्या  सदू काकांची नात. तिचे आई वडील लहानपणीच वारले. त्यामुळे ती  लहान असल्यापासूनच कामाला येताना ते मुग्धाला बरोबर घेऊन येत आता ती मोठी झालेय तर बागेच सगळ काम तीच बघते. यावर बाबांना मी हसून म्हणालो, “बाबा मी हरलो! नकळतपणे तुमच्या स्वरांचे संस्कार झालेल्या मुग्धाच्या गाण्याने आज मी खरोखरच मुग्ध झालो आणि बाबांना सगळी हकीगत सांगितली. त्यांनाही खूप आश्चर्य वाटल. दुसऱ्या दिवशी मुग्धाच गाण ऐकून अस्सल हिऱ्याची पारख करण्यात आयुष्य गेलेल्या त्यांच्यासारख्या गायकाला घरात रोज येणाऱ्या कोहिनूर हिऱ्याची पारख करता आली नाही याच प्रचंड दुख झाल. सदुकाकांच्या परवानगीने मुग्धाची शिकवणी सुरु झाली. तिच्याबरोबर माझीही. तीच मन हेलावून टाकणार गाण लाघवी स्वभाव  आणि मंत्रमुग्ध करणारा चेहरा यामुळे मी कधी तिच्या प्रेमात पडलो तेच मला कळल नाही. संगीताच्या सुराबरोबर सुरु झालेली आमची प्रेमकहाणी हळूहळू बहरू लागली होती. असेच दोन महिने सरले आणि एक दिवस माझ्या आईचा म्हणजेच सिनेस्टार कामिनीचा निरोप घेवून मुंबईवरून एक माणूस आला होता. मला एक चांगला ब्रेक मिळणार होता. मी मुंबईला जायचे ठरवले माझ्या आग्रहावरून बाबाही माझ्याबरोबर मुंबईला यायला तयार झाले.  त्यादिवशी संध्याकाळी मुग्धा खुप उदास झाली होती मी जाणार होतो.........खूप दिवसांसाठी. तिला समजावता समजावता मीसुद्धा खूपच भावूक झालो आणि प्रेमाच्या त्या आवेशात आम्ही कधी एकरूप झालो ते आम्हालाच कळल नाही. जेव्हा शुद्द आली तेव्हा लक्षात आल कि जे घडू नये ते घडल होत. मुग्धासारख्या संस्कारी मुलीने हि गोष्ट फारच मनाला लावून घेतली. पण मी तिला समजावले आणि लवकरच परत येऊन तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. तिने रडतच मला विचारले, “तू नाही आलास तर?”
     त्यावर  मी हसून म्हणालो, "तू तेच मंत्रमुग्ध करणार गाण म्हण, मी कुठेही गेलो तरी तिथून परत येईन. तिचा निरोप घेऊन मी निघालो पण वाटेतच आमचा अपघात झाला आणि त्या अपघातात आम्ही दोघेही मारले गेलो. मुग्धाला हा धक्का सहन झाला नाही. तिने या विशाल समुद्रात आपल्या शरीराला झोकून दिल. पण मी तिच्याकडे परत येणार हा विश्वास तिला होता म्हणूनच  इतकी वर्ष “त्या” गाण्याचे सूर आळवत ती माझी वाट बघत माझ्यासाठी थांबून राहिली आणि अखेर तिच्या गाण्याच्या सुरांनी पुन्हा व्याकुळ होवून मी तिच्याजवळ परत गेलो. आता आम्ही एकत्र निघालोय खूप दूरच्या प्रवासासाठी आणि एकमेकांपासून कधीही विलग न होण्यासाठी. ............... "अजयच बोलण थांबल आणि गाण्याचे सूर वाजू लागले..........

"देखा मचलते जिधर , बिजली गिरा दी उधर...
किसका जला आशिया.... बिजली को ये क्या खबर..?"

समाप्त
©मानसी जोशी
   

Thursday, 3 November 2016

कथा - तो आणि ती

 #तो आणि ती
तो आणि ती. जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यात येणार कोणीतरी खास. प्रत्येकाची पद्धत वेगळी, प्रत्येकाची कहाणी वेगळी; पण भावना मात्र एकच, प्रेम!! हि कहाणी आहे अशाच एका त्याची आणि तिची म्हणजेच राजीव आणि नेत्राची.
      ऑफिसच्या कामासाठी US ला गेलेल्या राजीवला तिथे नेत्रा भेटते. सुरुवातीला दोघही एकमेकांना ओळखत नाहीत. पण तिच्या गालावरची ती गोड खळी बघून झटक्यात त्याला तिची ओळख पटते. आणि तो स्वतः तिच्यासमोर जावून तिला विचारतो, "Excuse me!! Are you Netra Sabanis? आपल माहेरच नाव ऐकून नेत्रा क्षणभर गोंधळते पण क्षणात स्वतःला सावरुन म्हणते, "Yes right.....
ते ऐकून राजीव उत्साहाने विचारतो, "अग नेत्रा मला नाही ओळखलस मी राजीव.........राजीव किल्लेदार"
"राजू तू इथे कसा? किती वर्षानी भेटतोय आपण?" नेत्रा.   
  दोघांमध्ये संवाद चालू होतो. काही मोजक्या गप्पा आणि कॉफी होते. एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन टाटा बायबाय करुन दोघेही घरी जातात पण जाताना मात्र प्रत्येक पावलागणीक  अंतर्मनात दडलेल्या भूतकाळातील आठवणी जाग्या होत जातात.

'त्या'च्या नजरेतून ती-
     आजची अनपेक्षितपणे  झालेली नेत्राची भेट दुनिया गोल आहे हेच सिद्ध करते. आजही आपल्या भेटीचा पहिला दिवस आठवतोय नेत्रा ....... गुलाबी रंगाचा साधासा फ्रॉक घातलेली तू  आमच्या  सोसायटीमध्ये रहायला आलीस अगदी आमच्या फ्लॅटसमोर...... तुझ्या  गालावर पडणारी खळी बघून सुरुवातीपासूनच आवडायला लागलीस. त्यावेळेस तू तिसरीत आणि मी  पाचवीत. प्रेम या भावनेपासून दोघही  कोसो दूर. पण तरीही खूप आवडायचीस तू मला. खेळताना कोणी तूला रडवल, चिडवल की मी नेहमी तुझीच बाजू घेतली. तू  रडलेली मला अजिबात आवडत नसे. माझी  सगळी  'सिक्रेट्स' मी फक्त तुझ्याशी  शेअर करत असे. आपल्या दोघांच्या शाळा वेगवेगळ्या  होत्या पण शाळेची वेळ आणि वाट मात्र एकच असायची. तुझ्या  शाळेच्या आधीच्या गल्लीत माझी शाळा. त्यामूळे शाळा सुटली की मी  धावत जावून गल्लीच्या तोंडाशी  येवून तुझी  वाट बघत थांबात असे. दिवस मजेत चालले होते. तुझ्या  वाढदिवसाला मी तुला माझ्याजवळच एक मोरपीस भेट दिल होत. आणि तू  वाढदिवसाला भेट दिलेल पिंपळपान आजही मी माझ्या डायरीमध्ये जपून ठेवल आहे. अशातच एक दिवस अचानक कळल की तूझ्या बाबांची बदली झालेय दुसऱ्या शहरात.आजही आठवतोय तो दिवस तू जाणार या कल्पनेने उदास झालेल्या मला समजावत तू म्हणाली होतीस, "मी काही लगेच नाही जाणार. माझी वार्षिक परिक्षा झाल्यावर मग जाणार मी आणि आई".
  ते ऐकून क्षणात माझा चेहरा खूलला होता माझा .पण लगेच डोळ्यात पाणी आणून मी तुला विचारल होत, "तुला आठवण येइल का ग माझी? तू विसरणार नाहीस ना मला?"
   तू गोड हसून म्हणाली होतीस, "नाही रे तुला कशी विसरेन?" ए पण तू रडू नकोस हा. तू रडलास की मला खूप वाईट वाटत आणि मग मलाही रडू येत. मग मात्र आपण दोघही हसलो होतो. आजही आठवतोय तू गेलीस तो दिवस मी स्तब्ध आणि तू  प्रवाही. तू निघून गेलीस . सुरुवातीला दर महिन्याला  येणारी तूझी पत्र, प्रत्येक सणाला येणारी ग्रीटिंग्ज हळूहळू कमी होवून कधी बंद झाली ते काही कळल  नाही. मी ही मग  इतर मित्रमैत्रीणिंच्यात मिसळून गेलो. पण आजही मनातला एक कप्पा मात्र फक्त आणि फक्त  तूझ्यासाठीच आहे.

      अशीच काही वर्षे सरली. त्याने बारावी होवून दुसऱ्या शहरात इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. आणि एक दिवस ती त्याला कॉलेजमध्ये दिसली. "हो तिच आहे ती...  त्याच्या मनाने कौल दिला. गालावरची खळी बघून खात्री पटली आणि तो खूश होवून तिच्याशी बोलायला गेला. तिनेही त्याला पटकन ओळखले. ती आता पूर्वीपेक्षाही खूप सुंदर दिसत होती आणि तो रुबाबदार.
"तू इथे कशी? तो.
   "उद्या इथे Inter college Dance  competition आहे त्यात मी सुद्धा भाग भाग घेतला आहे. तू येशील का माझा डान्स बघायला?" ती उत्साहाने सांगत होती आणि तो तिच हे मोहक रुप आपल्या नजरेत साठवून ठेवत होता.
     तिचा डान्स बघायला जायला त्याला काही जमल नाही. नंतर अधूनमधून ती भेटत राहिली. तिच कुटूंब मूळचे याच शहरातील असल्यामूळे ते याच शहरात स्थायिक झाल होत. एक दोन वेळा तो तिच्या घरी पण जाऊन आला होता. तेव्हा तिने त्याला त्याने दिलेल मोरपीस दाखवल होत. ती भरतनाट्यमच्या परीक्षा देत होती. नृत्य विषय घेवूनच  B.A. करायच तिने ठरवल होत. अधूनमधून ती तिच्या कार्यक्रमांना, स्पर्धा बघायला बोलवायची पण त्याला काही जमल नाही. दिवस भरभर जात होते. त्याची आणि तिची होणारी प्रत्येक भेट त्याला नव्याने तिच्या प्रेमात पाडत होती.
     त्या दिवशी ती खूप आनंदात होती तो इंजिनिअर झाला होता आणि त्याला नोकरीही मिळाली होती; तिच्याच शहरात. आता भेटिंच प्रमाण थोड कमी झाल होत. पण ओढ मात्र कायम होती. हळूहळू तो ऑफिसच्या कामात बिझी होत होता. त्यादिवशी तिचा फोन आला, "काहीही कर पण उद्या माझ्या कार्यक्रमाला ये. उद्या खूप मोठा सांस्कृतीक कार्यक्रम आहे. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत. प्लीज तू ये. केवळ कार्यक्रमासाठी म्हणून नाही तर खूप महत्वाच बोलायच आहे तुझ्याशी अस समज की माझ्या आयुष्यातला एक महत्वाचा निर्णय घ्यायचाय."
   त्याने 'ओके' म्हणून तिला येण्याच वचन दिल. पण त्यादिवशी ऑफिसमध्ये हेड ऑफिसचे साहेब आल्यामुळे बॉसने अर्जंट मीटिंग बोलावली आणि नेमकी ती बराचवेळ चालली होती. तो घरी पोचला तेव्हा रात्रीचे १० वाजत आले होते. त्याला फार वाईट वाटल. पण एवढ्या रात्री तिला फोन करण त्याला योग्य वाटल नाही.उद्या बोलू असा विचार करुन तो झोपी गेला. सकाळी जाग आली तेव्हा साडेआठ होवून गेलेले. भराभर आवरून तो ऑफिसला पोचला. तो स्वतःवरच वैतागला. नेमकी काल मिटिंग लागली. तिला काय वाटल असेल माझ्याबद्दल? काय बोलायच असेल तिला? काहीही झाल तरी संध्याकाळी फोन करायचाच ... अखेर मनातले विचार थांबवून त्याने ऑफिसच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. संध्याकाळी तो घरी आल्यावर  थोड्या वेळातच घरचा फोन खणखणला ..... फोन तिचा होता.
    तो तिला 'सॉरी' म्हणतो आणि अजून काही बोलण्यार एवढ्यात ती सांगते "माझ लग्न ठरल!!! "
    हे ऐकून तो स्तब्ध होतो. पण क्षणात स्वतःला सावरुन तिच अभिनंदन करतो. जुजबी बोलून झाल्यावर  फोन ठेवून खूप रडतो. तिच्या लग्नालाही तो जातो पण त्या रात्री स्वतःला हतबल समजून खूप रडतो. सतत त्याच्या मनात येत रहात मी का बोललो नाही तिच्याशी. पण त्याने काय फायदा झाला असता? एक ना अनेक प्रश्न. कदाचित त्याची कधीच उत्तरे मिळणार नाहीत. कधी स्वतःला दोष देत तर कधी नशिबाला अनेक रात्री हे प्रश्न त्याला छळत रहातात. हळूहळू तो त्याच्या दिनचर्येमध्ये व्यस्त होतो. कधीतरी येते तीची आठवण! मनात एक कळ उठते आणि मग काही क्षणांसाठी तो हळवा होतो. दिवस असेच सरत असतात. एक दिवस त्याच्याही आयुष्यात भयंकर उकाड्यानंतर गार वाऱ्याची झुळूक यावी तशी वसुधा आली. लग्नासाठी आलेल्या या पहिल्याच स्थळाला तो होकार देतो. वसुधा त्याला आवडते म्हणण्यापेक्षा ती त्याच्या अपेक्षांमध्ये फिट बसलेली असते. त्याची निवड सार्थ ठरवत वसुधा त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देते. गोड स्वभावाची लाघवी वसुधा त्याला आवडायला लागते. हळूहळू वसुधाच्या प्रेमात तो तिला विसरायला लागतो पण हृदयाच्या एका कोपऱ्यात तीची जागा अजूनही तशीच असते. स्वतःच्याही  नकळत त्याने ती जपलेली असते कदाचित आयुष्यभरासाठी!

'ती'च्या नजरेतून तो-
    काही गोष्टी आयुष्यात अचानकच घडतात तशीच आजची तूझी भेट. क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. आज इतक्या वर्षांनी तू समोर आलास. आणि जूनं सार काही आठवल. लहानपणीची आपली मैत्री, ती लुटूपुटूची भांडणं, आपल शाळेत एकत्र जाणं, शाळेतून येताना तूझ माझ्यासाठी थांबून रहाणं सार काही अगदी अलिकडेच घडल्यासारख आठवतय. तू दिलेल ते मोरपीस आजही माझ्याजवळ आहे. आम्ही दुसऱ्या शहरात गेलो पण मी मात्र तुला खूप मिस केल. जेवढी मैत्री तुझ्याशी होती तेवढी नंतर कधीच कोणाशी झाली नाही. खूप वर्षांनी जेव्हा डान्स कॉम्पिटिशनच्या आदल्या दिवशी तू भेटलास तेव्हा पूर्वीचा राजू एकदम राजबिंडा दिसू लागला होता. त्यानंतर आपल्या वारंवार भेटी होत होत्या. नकळतपणे बालपणीच मनात रुजलेल्या प्रेमाची उमलत्या वयात जाणीव होवू लागली होती. मला वाटत होत तुझही माझ्यावर प्रेम आहे पण ......... माझ्यावरच तुझ प्रेम व्यक्त होणाऱ्या त्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होते मी. पण तो क्षण आयुष्यात कधी आलाच नाही. माझ्या नृत्याच्या प्रत्येक स्पर्धेला, प्रत्येक कार्यक्रमाला मी तुला बोलावत होते; पण तू मात्र कधीच आलाchq नाहिस.त्या दिवशी मी तुझी आतुरतेने वाट बघत होते. मी तुला सांगितलही होत कि प्लीज तू ये मला तुझ्याशी खूप महत्वाचे बोलायचे आहे. पण तू आला नाहिस. आणि मी शशांकशी लग्नाचा निर्णय घेतला.
      शशांक;  कॉलेजमधला, हुशार, अतिशय साधा सरळ मुलगा. तिला तिन वर्षांनी सिनिअर. तिच्यावर त्याच जिवापाड प्रेम. कॉलेजमधल्या मैत्रिणी तिला  नेहमी म्हणायच्या असा मुलगा शोधूनही सापडणार नाही. त्याला होकार दे. पण ती मैत्रिणींना कस सांगणार होती की तिच्या मनाला साद घालणारा 'तो' कोणीतरी वेगळा आहे. कॉलेजमध्ये असतानपासून तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा शशांक MBA झाला आणि छान नोकरीही मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर शशांकच्या आईने तिच्या घरी जावून तिला मागणी घातली. मुलगा चांगला असल्याने तिच्या घरी सगळेच खूष होते. पण अंतिम निर्णय त्यांनी तिच्यावरच सोपवला. 'त्याच्याकडून' काहीच प्रतीसाद न मिळाल्याने तिने विचार केला, "जर आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्यावर प्रेम करत नसेल तर निदान जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याशीच जन्माच नातं जोडाव. आणि तिने शशांकला होकार दिला.
   शशांकच्या आईला मात्र मनापासून ती पसंत नव्हती. तिला  शशांकसारखीच हुशार मुलगी सून म्हणून हवी होती. केवळ मुलाच्या सुखासाठी तिने नेत्राला स्विकारल होत. शशांकचे वडील तो लहान असतानाच गेले होते. त्यामुळे सहाजिकच त्याची आई त्याच्याबाबतीत जरा जास्तच पझेसिव्ह होती. या सगळ्याचा थोडाफार त्रास नेत्राला होत होता. पण शशांकच्या प्रेमामुळे ती सार काही सहन करीत होती.लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यातच कंपनीने शशांकला दोन वर्षांसाठी US ला पाठवल. सुरुवातिला  नेत्राला त्याच्याबरोबर पाठवायला तयार नसणाऱ्या तिच्या सासूने अखेर शशांकची
खाण्यापिण्याची आबाळ होवू नये म्हणून तिलाही परवानगी दिली.
    शशांकच्या सहवासात US मधले दिवस जणू स्वप्नवत होते. मुख्य म्हणजे तिला तिथे भरतनाट्यमची प्रॅक्टिसही मोकळेपणे करता येत होती.तिथे तिची रोझीशी ओळख झाली. तिला  भारताबद्ल, भारतीय संस्कृतीबद्दल प्रचंड आकर्षण होते.तिने तिच्या 10 वर्षांच्या मुलीला; जेनीला भरतनाट्यम शिकविण्यासाठी नेत्राला आग्रह केला. दोन वर्षे नेत्राने कसलाही मोबदला न घेता जेनीला भरतनाट्यम शिकवले. जेनीही मनापासून शिकत होती. बघता बघता दोन वर्षे सरली आणि नेत्रा भारतात परतण्यासाठी निघाली तेव्हा जेनी खूप रडली होती. नेत्रालाही खूप वाईट वाटले होते.  रोझीने तिला मोबदला घेण्याची विनंती केली तेव्हा नेत्रा सांगितल, मी इथे नसेन पण तू जेनीच भरतनाट्यमच शिक्षण अर्धवट सोडणार नाहीस. बस मला अजून काही नको.
    दोन वर्षांनंतर US मधल्या सोनेरी क्षणांच्या आठवणी घेवून शशांक आणि नेत्रा भारतात परत येतात. भारतात आल्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच नेत्राने गोड बातमी देते. सगळी खूश होतात. ९ महिन्यानंतर नेत्राच्या आणि शशांकच्या आयुष्यात एक गोंडस परी येते. मुलगी झाल्यावर नाराज झालेल्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये नेत्राला बघायलादेखिल जात नाहित. शशांक मात्र आनंदात असतो. शशांकच्या इच्छेनुसार मुलीच नाव जाई ठेवल जात. दिवस मजेत जात असतात.  पण नेत्राच्या सुखाला दृष्ट लागावी तस घडत. शशांक आजारी पडून त्याला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि पुढच्या सहा महिन्यातच तो तिला  सोडून कायमचा निघून गेला . त्याच्या आजारपणात बराच पैसा खर्च झालेला होता. जवळपास सगळी सेविंग्ज संपलेली होती. शशांकच्या जवळपास सगळ्या विमा पॉलिसीज या लग्नाच्या आधी काढलेल्या असल्याने त्या पॉलिसीसाठी नॉमिनी म्हणून त्याच्या आईचे नाव होते. नाही म्हणायला जाईसाठी काढलेल्या पॉलिसीची नॉमिनी नेत्रा असल्याने ते पैसे मात्र नेत्राच्या नावावर जमा झाले. नेत्राच्या सासूबाई शशांकच्या पॉलिसीजचे मिळालेल्या पैशांपैकी एकही पैसा नेत्राला देत नाहीत. उलट तुझ्या मुलीच्या पायगुणामूळेच माझा मुलगा गेला अस सतत म्हणून तिचा छळ सुरु करत होत्या. या  छळाला कंटाळून नेत्रा मुलीसह माहेरी निघून गेली. माहेरीही पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नव्हती. तिचे बाबा रिटायर झालेले होते. त्यांच्या पेंशनवरच त्यांच घर चालत होतं.. वयोमानानुसार आलेल्या आजारपणावरची औषधे, दैनंदिन खर्च या साऱ्यामध्ये नेत्रा आणि तिच्या मूलीची भर पडते. त्यांची आर्थिक ओढाताण सुरु होते. नेत्रा हतबल होते तिच्याकडे एवढी हुशारीही नव्हती की एखादी नोकरी करून ती स्वावलंबी होवू शकेल. अखेर तिच्या मैत्रिणिंच्या सल्ल्यानुसार ती भरतनाट्यमचे क्लासेस सुरु करते. सुरुवातिला  खूप कमी प्रतीसाद मिळाला. पण तिची नृत्यनिपूणता, शिकविण्याची पद्धत, तिचा गोड स्वभाव या साऱ्यामुळे हळूहळू तिच्या क्लासची लोकप्रियता वाढत जाते. शशांक जावून ४ वर्षे होत आलेली असतात. नेत्राच्या घरचे तिला दुसर लग्न करण्यासाठी आग्रह करत असतात पण ती मात्र  ठाम नकार देते.
     एके दिवशी एका सांस्कृतीक कार्यक्रमासाठी परदेशातून काही मुले आलेली असतात. अचानक तिथे नेत्राला  रोझी आणि जेनी भेटतात. भरतनाट्यमच शिक्षण जेनीने चालूच ठेवल आहे हे कळल्यावर नेत्राला फार आनंद होतो. रोझीला नेत्रा आग्रहाने घरी घेवून जाते शशांकबद्दल आणि नंतरची सारी हकीगत कळल्यावर रोझीला खूप वाईट वाटते. ती नेत्राला US ला यायचे सुचवते आणि मदत करण्यचेही आश्वासन देते. हो नाही करत अखेर नेत्रा तयार होते आणि रोझीच्या मदतीने तिथे भरतनाट्यमचे क्लासेस सुरु करते.
        आज सहा वर्षानंतर ती यशस्वी आहे. पैसा, स्टेटस या साऱ्या गोष्टी तिच्याजवळ आहेत. पण कमी आहे ती एका जोडीदाराची.
    ती राजीवच्या आठवणीत हरवलेली असतान अचानक तिचा फोन वाजला. फोनच्या आवाजाने क्षणभर ती दचकते पण फोनवर राजीवच नाव बघून सुखावते आणि चटकन फोन घेते. थोड्या जनरल गप्पा होतात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजीवच्या रुमवर भेटायचे ठरते. फोन ठेवल्यानंतर नेत्रा लगेचच उद्याच्या तयारीला लागते. राजीवच्या भेटीच्या नुसत्या कल्पनेनेच तिच मन हळव होतं. काहीही झाल तरी राजीव हे तिच पहिल प्रेम होतं.
   इकडे राजीवची अवस्थाही काही वेगळी नव्हती. जिच्याशी बालपणी सगळी सिक्रेट्स शेअर केली तिच्यापासून लपवलेल आयुष्यातल एक मोठ सिक्रेट या वेळी मात्र तो तिला सांगायच ठरवतो. दोघांना एकमेकांशी खूप काही बोलायच असत; एकमेकांना खूप काही सांगायच असत. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी नेत्रा राजीवच्या रुमवर पोचते. कॉफी घेता घेता एकमेकांच्या आयुष्यातील घटना शेअर होतात. नेत्राच्या आयुष्यात तिला किती दु:ख सहन कराव लागल हे कळल्यावर राजीव अस्वस्थ होतो. बोलता बोलता तो तिला  सांगतो की त्याच तिच्यावर खूप प्रेम होत. ती हतबल होवून रडू लागते आणि त्याच्यावरच तिच प्रेम व्यक्त करते. रडणाऱ्या तिला तो मिठित घेतो.
    "का अस घडल? तू का आला नाहिस त्या दिवशी? ती रडतच विचारते.
   आता बोलून काहिच उपयोग नाही हे माहिती असल्याने तो गप्प रहातो आणि तिला  मिठीत अजूनच घट्ट पकडतो. त्याच्या स्पर्शाने ती ही मोहरते. मनात एक अनामिक धडधड होत असते. तिच्या मनात येत बस आता अजून काही नको पण ही मिठी सुटू नये. त्याचे थरथरणारे ओठ तिच्या ओठांजवळ जाणार इतक्यात त्याचा फोन वाचतो. ती दचकते क्षणात तिला वास्तवाचे भान येते आणि ती त्याच्यापासून दूर होते.
   फोन त्याच्या बायकोचा होता. त्याच्या लहान मुलीला बर नसत हे कळल्यावर तो हळवा होतो. तिला तिचा बाबाच हवा असतो. लेकीशी बोलता बोलता तो रुमच्या गॅलरीमध्ये जातो. बराच वेळ बोलून तो फोन ठेवतो. पण काही क्षण तो गॅलरीतच रेंगाळतो. त्याच्या मनात येत बर झाल आत्ता फोन आला नाहीतर खूप मोठी चूक घडली असती माझ्याकडून. तस झाल असत तर माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या बायकोला माझ्या वसूला मी काय तोंड दाखवल असत. आणि माझ्या मुली ?......... नाही नाही. ज्या वसूने माझ्यावर जिवापाड प्रेम केल, माझी प्रत्येक सुखदुःखात साथ दिली तिच्याशी प्रतारणा नाही करु शकत मी. मला नेत्राशी बोलायलाच हव. आजची भेट ही आमची शेवटची भेट ठरली पाहीजे. मनाचा निश्चय करून तो आतमध्ये येतो तर नेत्रा कुठेच दिसत नाही. एवढ्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो ....... आपण यापुढे कधीही भेटणार नाही......... ज्या शशांकने माझ्यावर जिवापाड प्रेम केल त्याच्याशी तो गेल्यानंतरही मी प्रामाणिक राहिले. पण आज ...... आज जर तुझा फोन वाजला नसता तर आपल्याकडून जे घडू नये ते घडल असत...... मनाच्या एका कोपऱ्यातली  तुझी जागा आजही तशीच कायम आहे आणि राहिल पण माझ्या शशांकची जागा मी कोणालाच नाही देवू शकत .... Good by forever. तो मंद हसून मेसेज डिलिट करतो आणि तिचा नंबरही.
   मनात येत, माणसाला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळतात फक्त त्याची वेळ चूकलेली असते!

समाप्त.

©मानसी जोशी












Wednesday, 26 October 2016

गुडमॉर्निंग

गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला जाताना नेमक  इअरफोन न्यायला विसरले. तशी सकाळची वेळ म्हणजे घाई गडबडीचीच वेळ असते कारण लवकर उठून पोळी भाजीचा डबा तयार करुन लेकीच आवरुन तिला  ६.४० ला येण्याऱ्या स्कूलबससाठी बसस्टॉपवर सोडायला जायच. बस आली कि टाटा बायबायचे सोपस्कार करुन मस्तपैकी गाणी ऐकत मॉर्निंग वॉक करुन ७.३० पर्यंत घरी परत यायच. पण इअरफोन घरी विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागले आणि त्याचा राग लेकीवर काढत म्हणाले, "किती रेंगाळत रहातेस ग आवरत जा ना पटापट, तुझ्यामुळे मी घाईघाईत इअरफोन विसरले. आता मी चालायला कशी जाणार?"
   यावर लेक म्हणाली, "अग आई चालायला जायचा आणि इअरफोनचा काय संबध? तू पाय घरी विसरल्यासारख काय करतेस?"
   यावर मात्र माझ मलाच हसू आल. तेवढ्यात स्कूल बस आली आणि ती निघून गेली. मीसुद्धा वैतागून चालायला सुरुवात केली.
 "आज काय मॉर्निंगच बॅड झालेय पुढे दिवस कसा जाणार कुणास ठावूक?"असा विचार करतच चालत होते. माझ्या पुढे एक जोडप  हातात हात घेउन अगदी हळू आवाजात गप्पा मारत चालत होत. बहुदा नवीन लग्न झालेल असाव. चालायला येणाऱ्या बहुतांश रणवीर दीपिकांच त्यांच्याकडे अगदी बारीक लक्ष होत. त्यांना क्रॉस करुन मी थोडी पुढे गेले तर माझ्या पुढे एक मध्यमवयीन जोडप चालत होत. बहुदा त्यांच्या मुलाच दहावी च वर्ष होत. त्यामुळे त्याच्याबद्दलच त्यांची काहितरी चर्चा चालू असावी. क्षणात टेंशन आल. "अजून लेक चौथीमध्ये आहे तर तिच्या अभ्यासाची लढाई लढवताना माझी ही हालत होतेय, तर पुढे  काय होइल?" बोलता बोलता ते कपल दुसरीकडे वळल आणि माझ विचारचक्रही थांबल.
   थोड पुढे आल्यावर दोन रिटायर्ड(बहुदा) आजोबा एकमेकांशी बोलत होते
पहिले आजोबा विचारत होते, "मग दिवसभर काय करतो? बोअर नाही होत घरात?"
दुसरे आजोबा अगदी सहज सांगत होते, "नाही बसून असतो कधी हॉलमध्ये बसतो कधी किचनमध्ये. पण  त्रास नाही देत कोणाला."
  ते बहूदा रिटायर्डमेंट नंतरच्या दिनचर्येबद्दल बोलत असावेत अस मला वाटल.
   तेवढ्यात पहिल्या आजोबांनी दुसऱ्या आजोबांना विचारल, "कोणी आल की अंगावर वगैरे धावून जातो की नुसताच भुंकतो?"
यावर दुसरे आजोबा उत्स्फूर्तपणे म्हणाले, "भुंकतो फक्त पण आम्ही समजावल की गप्प बसतो, सगळ ऐकतो अजिबात हट्ट करत नाही अगदी गुणी आहे."
    हे ऐकून माझ्या लक्षात आल की मगाचपासून हे दोघे एका कुत्र्याबद्दल बोलतायत. मला हसू आवरल नाही. कसबस हसू दाबत मी माझा चालायचा स्पिड वाढवून त्यांच्या पुढे गेले.         थोड पुढे गेल्यावर ज्येष्ठ नागरिक महिलांचा एक ग्रूप माझ्या पुढे चालत होता. एक खमकी आजी दुसऱ्या खमक्या आजीला समजावत होती, "अहो अस करुन सवरुन ऐकून नाही घ्यायच. आपल्या पिढीच हेच दुर्दैव आहे. आधी सासुच ऐकायच आणि आता सुनांच ......" त्यांच बोलणं खर तर इंटरेस्टींग होत पण त्यांचा स्पीड कमी असल्याने मी कधीच त्यांच्या पुढे निघून गेले होते.
    थोड पुढे आल्यावर  समोरुन एक गोंडस छोट बाळ येताना दिसल  माझ्याकडे बघुन गोड हसल. मी ही त्याच्याकडे पाहून हसले. दोन मिनिटे थांबून त्याच्याशी गप्पा मारल्या खर तर हे बाळ मला जवळपास रोजच दिसत पण इअरफोन असल्यामूळे कधी त्याच्याकडे लक्षच गेल नाही. या सगळ्या प्रकारात घरी पोचायला मात्र उशीर झाला. चला आता पुढे सगळ्याला उशीर होणार असा विचार करुन घरी आले तर मस्त आलं घालून गेलेल्या चहाचा वास दरवळत होता. अहोंनी वाट बघून चक्क चहा केला होता. कितीतरी दिवसांनी सकाळी असा मस्तपैकी आयता चहा मिळाला आणि एकूणच बॅड वाटणारी माझी मॉर्निंग एकदम गुडमॉर्निंग झाली.
    काही गोष्टी आपण मनाशी पक्क्या ठरवलेल्या असतात आणि आपल्याला वाटत त्या तशा असतिल तरच छान असतात. जरा बदल झाला की आपण वैतागतो. जस माझ झाल इअरफोन न वापरतासुद्धा मॉर्निंग वॉक खूप छान होवू शकत हा  विचारच मी केला नव्हता. अर्थात बाकी काहीही असलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र  मी न विसरता इअरफोन घेतले.. काय करणार ? आदत से मजबूर...
©मानसी जोशी
सदरचा लेख म.टा च्या ठाणे आवृत्तीमध्ये(२२ नोव्हेंबर २०१६) छापून आला आहे.


एक्झॅम फिव्हर आणि ए. सी.

एक्झॅम फिव्हर
सद्ध्या ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवायला लागलेय. अशातच चढलेल्या Exam fever ने समस्त 'आई' वर्ग चांगलाच वैतागलेला आहे. आमच्याकडे तर अगदी भयानकच परिस्थिती आहे. आमची कन्यका या सहामाही परिक्षेच्या पेपर्समध्ये  वेगवेगळे शोध लावून घरी येत आहेत. इतिहासात लागलेला नवीन शोध म्हणजे 'भारुड रचण्याच श्रेय चक्क ज्ञानेश्वर महाराजांना मिळाल आहे. जीथे त्यांना इतिहासच चुकीचा शिकविला जातोय तिथे तिची ही चूक म्हणजे अगदिच सामान्य आहे असा विचार करून मि उदार मनाने तिला माफ केल. "Shahaji Raje had appointed some teachers for Shivaji to teach him warfare". हे इतिहासाच्या पुस्तकातील वाक्य वाचून यापुढे कन्येने लावलेल्या  इतिहासातील प्रत्येक शोधासाठी तिला माफ करण्याचा निर्णय मी घेतला आहे. असो. तर इतिहासाची लढाई लढून झाल्यावर. काल इंग्लिशची लढाई लढववायची होती. संध्याकाळी अहो जरा लवकरच घरी आले. जरा लवकर आलेत तर लेकीचा अभ्यास घेतील अशी उगाचच एक वेडी आशा होती मनाला. आवरुन चहा वगैरे झाल्यावर  मी लेकिला म्हणाले. आता मी जरा बाहेर जावून येते बाबा घेतिल पुढचा अभ्यास, "छे छे अग मला बाहेर जायचय मित्राकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणत होता परवा. बघूया भेटून येतो त्याला". आयुष्याच्या जोडीदारच अस एकटिला लढायला सोडून गेला म्हटल्यावर काय बोलणार? असो.. बाहेर जायचा बेत रद्द....... काय करणार? रात्रीच जेवण आणि किचनचची काम  आवरुन बेडरूममध्ये गेले. फारच उकडत होत म्हणून AC ऑन केला तर रीमोट बिघडलेला. आता रिमोट दुरुस्त करुन आणणे  हे जणू फक्त माझच काम आहे ते उद्या करायलाच हव असा मनात विचार करुन बेडवर आडवी झाले आणि थोबाडपुस्तिका चाळू लागले. गौरी ब्रम्हेची पोस्ट वाचली त्यातल शेवटच वाक्य काळजाला भिडल....... आयुष्य खूप सुंदर आहे फक्त....................... .................................... मुलांची परिक्षा संपली पाहिजे. तेवढ्यात मैत्रिणिचा फोन आला, "अग  तो Rivision चा question 6B लिहिलाय का चिन्मयीने?"  थांब चेक करते अस म्हणून कन्येची वही हातात घेतली तर त्याच्यात 6B हा प्रश्नच अस्तिवात नव्हता. मी मैत्रिणीला तस सांगितल्यावर ती मोठ्या मनाने  म्हणाली, "असूदे  मी Whats ap करते तुला जमल तर घे करुन उद्या पेपरला विचारतील बहुदा." चला लढाई पुन्हा सुरू ..... तासभर डोकफोड करुन अखेर साडेदहा वाजता झोपायला बेडरूममध्ये गेले. झोपताना गौरीच्या पोस्टमधले शब्द थोडा बदल करुन  ओठांवर आले ...... आयुष्य सुंदर आहे  फक्त ................ मुलांचा अभ्यास घ्यायला लागता कमा नये. यावर अहो म्हणाले ....... आणि AC चा रिमोट बिघडता कामा   नये. कोणाच काय तर कोणाच काय असा विचार करुन मी शांतपणे झोपी गेले ...
©मानसी जोशी


Wednesday, 19 October 2016

मनमानसी

कुठे आहेस रे तू? किती मस्त संध्याकाळ आहे. सकाळच्या पावसानंतर आलेल्या सोनेरी किरणांनी सगळा चिखल वाळून गेलाय आणि सगळ कस लख्ख झालय. आकाशात पावसाळी ढग जमा झालेत. पावसापुर्वीचा गारवा जाणवायला लागलाय त्यातच सकाळी पडलेल्या पावसानन्तरचा गारवाही मिसळलाय सगळ कस अगदी छान वाटतंय. घरी परतणारे पक्षांचे थवे मला वाकुल्या दाखवतायत असं उगाचच वाटतंय.
आठवतंय अशाच अनेक संध्याकाळी आपण एकत्र घालवल्यात कितीतरी स्वप्न बघत. आज जवळ सगळ आहे, स्वप्न आहेत, आठवणीही आहेत पण तू कुठे आहे रे? हरवलायस तू या मायावी जगात. तेव्हा मला नुसत बघण्यासाठी सगळी शेड्युल्ड कॅन्सल करुन मी गेलेल्या पावसाळी पिकनिक स्पॉटला अगदी आवर्जून मित्रांबरोबर यायचास. त्या गर्दीतही तू मला शोधून काढायचास आणि उगाचच ,"तू इथे कशी? अस आश्चर्याने विचारायाचास. 
सगळ माहित असायचं एकमेकांना तरी अचानकच भेटल्यासारख दाखवायचं आणि निघताना एकत्रच निघायचं. त्याच रोडवर जर "ट्राफिक जॅम" झालं तर तू खुशच. तेवढाच वेळ एकत्र घालवायला मिळेल म्हणून. 
आज मात्र तुला तिथल्या गर्दीचा वैताग येतो, ते ट्रॅफिक बोअरिंग वाटत. अशा स्पॉट वर जाण्यापेक्षा घरात पांघरून घेऊन लोळत पडायचं आणि मुसळधार पाउस सुरु असेल तर भजी आणि गरमागरम चहाची फर्माईश करायची . तेवढच काय ते गोड बोलण. अन्यथा लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये डोक घालून बसायच आणि तेही कमी पडल तर टिव्ही असतोच जोडीला. बर टिव्हीवर तरी छान रोमॅन्टिक गाणी एकत्र बसून बघावी तर ते नाही कुठले तरी साऊथचे पिक्चर बघत बसायचं. How unromantic!!!
एखाद्या दिवशी सकाळी लवकर उठून किवा अगदी पहाटेच मस्त टेकडीवर फिरायला जाव. पक्षांचा किलबिलाट, दुरूनच कुठून तरी एखाद्या मंदिरातून येणारा मंजुळ घंटानाद, मंद गार वारा; हे सार अनुभवत एखाद्या दगडावर शांतपणे हातात हात घेऊन बसून रहाव. हळूच तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन तुझ्यावरील माझा अधिकार व्यक्त करावा तर नाही...
तुझी सुट्टी म्हणजे उशिरापर्यंत झोपण्याचा हक्काचा दिवस आणि ऑफिस म्हणजे दिवसभर दगदग असते ऑफिस मध्ये जरा तरी रेस्ट घेउदेना अस वैतागून म्हणायचं आणि पांघरूण डोक्यावर ओढून झोपून रहायचं.
घाई तर नेहमीचीच...
बर संध्याकाळी तरी निवांतपणा...
मस्त मावळत्या सुर्यानारायचे रंग बघत गरमागरम कॉफीचे घोट घेत; दिवसभरच्या गोष्टी एकमेकांशी बोलत बसाव. पण घरी येईपर्यंतच अंधारून आलेलं असत. आल्यावर फ्रेश होऊन सोफ्यावर किवा बेडवर स्वत:ला झोकून द्यायचं आणि हो टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप यातलं काहीतरी जवळ हवच. अन्यथा तू तर अपूर्णच. किती रुक्ष झालायस रे तू. कधी जाणवत तरी असेल का तुला माझ्या मनात काय चाललय? कुणास ठाऊक? 
   पण असा दूर नको जावूस रे. जवळ असून दुरावा सहन करण आता कठीण जातंय. ये ना तू परत. बरसणाऱ्या पावसासारखा बेभान बेधुंद होऊन, उमलणाऱ्या रातराणीसारखा गंध घेऊन, ओघळणाऱ्या प्राज्क्तासारखा अलगद, हळुवार होऊन; येशील? तुझी वाट बघतेय.......
©मानसी जोशी 

कथा - नि:शब्द

नि:शब्द 
सलोनासा सजन है ओंर मै हू......रेडीओवर लागलेल्या या गाण्यामुळे सायली कॉफीचा घोट घेता घेता तशीच थांबली. खर तर आज खूप दिवसांनी तिला अशी निवांत संध्याकाळ मिळत होती. मुसळधार पाऊस, गार झोबणारा वारा, वाफाळलेली कॉफी...आणि टेरेसमध्ये रेडीओवरची गाणी ऐकत बसणे ...... खूप आवडायचं तिला. आज कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी हे सगळ जुळून आल होत. घरी कोणीच नव्हते आणि ६.३० वाजल्याशिवाय कोणी येणारही नव्हते. पण या गाण्यातल्या सुरांबरोबर ती भूतकाळातल्या सुरात कधी हरवली ते तिच तिलाच कळल नाही
          फर्स्ट इअरला असताना सिंगिंग कॉम्पीटीशनमध्ये तिने हेच गाणं म्हटलं होत. तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या सेकंड इअरच्या सागरने तिला स्वतः भेटून सांगितल होत, "तुझ गाण खूप छान झाल."
किती खुश झाली होती तेव्हा सायली...."बस आता फर्स्ट प्राईज नाही मिळाल तरी चालेल", असा विचार तिच्या मनात आला.
प्राईजडिस्ट्रिब्युशनच्या वेळी जेव्हा सिंगिंग कॉम्पिटिशनच फर्स्ट प्राईज मिळाल, तेव्हा तर सागरने हात मिळवून अभिनंदन केल होत तिचं, तेव्हा तर हवेतच होती ती . हात धुवूच नये अस वाटत होत.....
कॉफीचा घोट घेता घेता या वेडेपणाच तिला हसू आल.
    त्यानंतर तर ती जणू फक्त सागर साठीच कॉलेजमध्ये जात होती. तो दिसला नाही तर मन बेचैन व्हायचं. तो दिसला कि त्याला नजरेत साठवून ठेवावस वाटायचं..
         दिवसामागून दिवस जात होते. FY ची परीक्षा संपली. आता तर दोन महिने सुट्टी म्हणजे दोन महिने सागर दिसणार नाही . ती उदास झाली. सागर होस्टेलमध्ये रहायचा म्हणजे सुट्टीत तो गावी जाणार हे निश्चितच होतं. ती उदासपणे बसून होती तेवढ्यात तिची मैत्रीण नेहा आली आणि म्हणाली,  "गुड न्यूज आहे सायली! सागर १५ दिवसातच परत येईल. अग तो TY ला गेला ना आता त्यांचे व्हेकेशन्स क्लासेस सुरु होतायत २ मे पासून."
    सायली मनातून खुश झाली. तिचा आणि त्याचा क्लास एकाच ठिकाणी होता. तिची व्हेकेशन बॅच नसली तरी क्लास तिच्या घराजवळच होता.
         सुट्टी संपून कॉलेज सुरु झाल. दिवस मजेत जात होते. आता तर सागरची क्लासरूम तिच्या क्लासरूमच्या बरोबर समोरच होती. सतत जाता येता सागर दिसायचा. त्या दिवशी सायली कॅन्टीन मध्ये तिच्या मैत्रिणीची; नेहाची वाट बघत बसली होती. मुसळधार पाऊस पडत होता. लेक्चरला बसायचा तिचा अजिबात मूड नव्हता. कॅन्टीन मध्ये २/३ जुनिअर मुले सोडली तर बाकी कोणीच नव्हत. तेवढ्यात सागर तिथे आला. तिच्याकडे बघून नेहमीप्रमाणे गोड हसला. "लेक्चर नाही का आज ?" त्याने विचारले .
     "नाही आज मूड नाही. बोअर होता सावंत सरांच्या पिरिअडला." ती म्हणाली.
   "तुझ्याशी बोलायचय थोड - सागर म्हणाला.
    क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती गप्पच बसली छातीतली धडधड अजूनच वाढली होती.
    "वेळ कधी आहे तुला?" सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि कसाबसं स्वतःला सावरत म्हणाली ....बोल.
    "नाही इथे नको... .सागर. 
      मग कुठे ?कधी? .... सायली. 
     सागरचा क्लास संपल्यावर सायलीचा क्लास असे. त्यामुळे तो म्हणाला... माझा क्लास सुरु झाल्यावर बरोबर १५ मिनिटांनी , क्लासच्या समोरच्या गल्लीतल्या गणपतीच्या देवळाजवळ भेटशील?"      पण तुझा क्लास ... सायली 
   "मी क्लास बुडवणार आहे आज" तिचं बोलण मध्येच तोडत सागर म्हणाला . 
     तिने होकारार्थी मान डोलावली. 
    ठीक आहे भेटू मग संध्याकाळी .... अस म्हणून सागर निघून गेला. तिचा विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना? तिने स्वतःलाच चिमटा काढून पहिला.
         घरी गेल्यावर सायली फ्रेश होऊन जेवायच्या आधी कितीतरी वेळ आराशासामोरच उभी होती. तिला सतत सकाळचाच प्रसंग आठवत होता . लाजत, हसत, स्वप्न रंगवत ती संध्याकाळची वाट बघत होती. जेवायचाही भान नव्हत तिला. कुठला ड्रेस घालू ? सागरला कुठला रंग आवडत असेल? कितीतरी प्रश्न ....पण सगळे सागर भोवती फिरणारे. पिंक कलरचा ड्रेस, नाजुकसे मोत्याचे कानातले, पिंक कलरची हलकीशी लिपस्टिक आणि मोकळे सोडलेले केस .. सायली खूपच सुंदर दिसत होती. देवळाजवळ स्कूटर पार्क करून ती देवळात गेली सागर अगोदरच आला होता. त्याला बघताच तिच्या छातीत धडधडायला लागल. तिने देवाला नमस्कार केला. "एक दिवस मी आणि सागर जोडीने येऊ इथे",  मनात विचार आला आणि ती लाजली. "सायली बाहेरच्या कट्ट्याजवळ ये."
    सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि प्रदक्षिणा घालून बाहेर कट्ट्याजवळ गेली. सागर वाटच बघत होता.
"बसना ...." सागर म्हणाला.
 "नाही नको, तू बोल काय बोलायचय", सायली.
       सागरने बोलायला सुरुवात केली... "सायली, मी माझ्या आयुष्याचा खूप वेगळा विचार केलाय. मी जे करायच ठरवलंय ते मी कोणालाच सांगितल नाहीये आणि सांगाणारही नाहीये. मी खूप प्रॅक्टिकल आहे. भावनांनी विचार करणं म्हणजे मला मूर्खपणा वाटतो. माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुठली मुलगी नव्हती आणि नसेल. मुळात प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी मला फाल्तू वाटतात. या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये. ................सायलीचे डोळे पाण्याने डबडबले होते. सागरचे लक्षच नव्हते तो बोलतच होता पण सायलीला काहीच ऐकू जात नव्हत. तिचा स्वप्नांचा मनोरा क्षणा क्षणाला कोसळत होता. त्याच्या प्रत्येक शब्दाचा तिच्या मनावर आघात होत होता.
      सायलीने डोळ्यातल पाणी डोळ्यातच थांबवल. कितीतरी वेळ बडबड करून तो थांबला. त्याने तिच्याकडे बघितलं.ती शांतपणे उभी होती. त्याचं बोलणं थांबल्याची खात्री झाल्यावर ती म्हणली ...."पण हे सगळ तू मला का सांगतोयस?"
    तिच्या या प्रश्नावर तो चकित झाला, काय बोलावे त्याला काहीच सुचेना.आता तो नि:शब्द झाला होता. थोडावेळ कोणीच काही बोलत नव्हतं. मग स्वतःला सावरत तो कसबस म्हणाला, "मला वाटल तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस. आय मिन  तू माझ्यावर प्रेम करतेस." 
    पुन्हा शांताता. तो अस डायरेक्ट बोलेल असं सायलीला वाटलं नव्हतं. ती जरा गोंधळली. थोडा विचार करून आणि मनाची तयारी करून ती म्हणाली ...."हो, आवडतोस तू मला, खूप आधीपासून, तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हापासून ..पण मी तुझ्यावर प्रेम करते का नाही ते नाही सांगता येणार. एवढच वाटतं, सतत तू जवळ असावास सुखात, दुःखात, बरसणाऱ्या पावसात, रणरणत्या उन्हात, कडाक्याच्या थंडीत सतत तुझा हात हातात असावा ,हे प्रेम असेल तर हो करते मी तुझ्यावर प्रेम."
    आता मात्र दोघही नि:शब्द. बराच वेळ तसाच शांततेत निघून गेला. कोणीच काही बोलले नाही. "मी निघते", शांततेच भंग करीत सायली म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ती निघून गेली.
         घरी आल्यावर सायलीने स्वतःला बेडवर झोकून दिले, इतकावेळ थांबवलेला अश्रूंचा महापूर ओसंडून वाहू लागला. ती दुखावली गेली होती. घरी कोणीच नव्हते. तिचे आई बाबा दोघही नोकरी करायचे त्यामुळे दिवसभर सायली घरात एकटीच असे. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. दुःख, संताप, अपेक्षाभंग या साऱ्या भावना अश्रूवाटे वाहून जात होत्या. एवढ्यात डोअरबेल वाजली...त्या सवयीच्या आवाजानेही सायली दचकली. तिने घड्याळात बघितले तर ६.४५ होत आले होते. "बापरे ६.४५ वाजले म्हणजे आई आली असेल", ती स्वतःशीच म्हणाली. डोळे पुसून तिने दार उघडले. एवढ्यात फोन वाजला. सायलीने फोन घेतला.. 
      "हॅलो...सायली ....क्लासला का आली नाहीस?, काय म्हणाला सागर? फोन नेहाचा होता. 
"नेहा , तू आत्ता माझ्या घरी येऊ शकतेस?" ...सायली. 
  "ओके येते", कुठलाही प्रश्न न विचारता नेहा म्हणाली. 
नेहा घरी आल्यावर त्या दोघी टेरेसवर गेल्या. सायलीने घडलेली सगळी घटना नेहाला सांगितली. त्या दोघी कितीतरी वेळ टेरेसवर होत्या. सायलीच दुःख नेहाला बघवत नव्हत. 
     रडणाऱ्या सायलीला ती मायेने थोपटत म्हणाली, "सायली होईल सगळ नीट, रडू नकोस ना प्लीज."
      "नाही नेहा , आजपासून सागर हा विषय माझ्यासाठी संपला", सायली म्हणाली. 
      "हे बघ सायली उगाच रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस", नेहा . 
     "नाही नेहा माझा निर्णय झालाय", सायली. 
       नेहा आणि सायली बालपणापासूनच्या मैत्रिणी. सुरवातीला एकाच शाळेत- एकाच वर्गात आणि आता एकाच कॉलेजमध्ये पण दोघीही विरुद्ध स्वभावाच्या सायली हुशार, आत्मविश्वासी , ठाम पण थोडी तापट , कोणालाही फाटकन बोलणारी, तर नेहा शांत, संयमी, कोणालाही न दुखावणारी. 
     "सायली... ८ वाजून गेले किती वेळ टेरेसवर थांबणार आहात?" आईच्या हाकेने दोघीहि टेरेसवरून खाली आल्या आणि नेहा तिच्या घरी निघून गेली. 
          दिवस भराभर जात होते. सायलीचं आयुष्य पूर्वीसारखच चालू होतं पण आता त्यात एक पोकळी निर्माण झाली होती ....सागर नावाची. सायलीने स्वतःला अभ्यास आणि गाणं यात गुंतवून घेतले. क्लासच्या वेळी अनेकदा तिची सागरशी नजरानजर व्हायची पण ती नजर फिरवून दुसरीकडे बघायची. नेहा हे सार बघत होती पण काहीच बोलत नव्हती. तिला सागरच्या डोळ्यात सायालीसाठी प्रेम दिसत होतं.  पण तिला माहित होत, सायलीची समजूत घालणे शक्य नाही. बघता बघता वर्ष संपल. फायनल एक्झॅम्स संपून व्हेकेशन्स सुरु झाले. दरवर्षीप्रमाणे TY ची व्हेकेशन्स बॅच २ मे पासून सुरु झाली. सायलीला SYला डिस्टिंगशन मिळाली होती. सहाजीकच ती आता स्कॉलर बॅच स्टुडंट होती. आता तर तिला वेळच नसायचा क्लासेस, कॉलेज, गाण्याचा रियाज यातच तिचा सगळा वेळ जायचा. अशातच TY चा रिझल्ट लागला. सागरला सेकंड क्लास मिळाला. सागरने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. 
      सागर आणि सायली आता फारसं समोरासमोर येत नव्हते. त्यांच्या क्लासच्या, कॉलेजच्या सगळ्याच वेळा आता बदलल्या होत्या. लास्ट इअर असल्याने सायली खूप मेहनत घेत होती. खर तर सुरुवातीपासूनच सायली खूप करिअर ओरिएंटेड आणि महत्वाकांक्षी होती, अर्थात तिच्या घरातही तसच वातावरण होत. तिची आई बॅंक मॅनेजर तर वडील क्लास वन ऑफिसर होते. सायलीला नेहमीच मेट्रो सिटीजच खुप आकर्षण होतं. त्यामुळेच तिने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला जायचं ठरवलं होत. मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, गाडी, हाय लाईफस्टाईल, स्टेटस ,..या सगळ्याच गोष्टींच तिला प्रचंड आकर्षण होतं. 
      बघताबघता वर्ष संपल आणि फायनल एक्झॅम पार पडली. फायनल रिझल्ट अपेक्षेप्रमाणे लागला, सायली फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन मिळवून पास झाली होती आणि नेहालाही फर्स्ट क्लास मिळाला होता. रिझल्टनंतर नेहाने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. सायली अर्थातच पुण्याला जाणार होती. पुण्याला जाण्यापूर्वी सायली आणि नेहा एकमेकींना भेटल्या. त्याचवेळी नेहाने सायलीजवळ पुन्हा एकदा सागरचा विषय काढला. त्यावर सायली चिडून म्हणाली....."नाही नेहा, मला त्याच्यासारख्या भावनाशुन्य माणसाबद्दल काहीही सांगू नकोस, प्रेमाचा अर्थ तरी कळला असेल का कधी त्याला? काय तर म्हणे या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. अग प्रॅक्टिकल असणं म्हणजे काय भावनाशून्य असणं का?" सायली संतापून बोलत होती, मनात इतके दिवस धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. 
"सायली, अस एकाच भेटीत त्याच्याबद्दलच मत बदललं तुझं? अग असं तडकाफडकी कोणाबद्दल मत बनवू नये ग. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का? नेहा.
      "मला तो करायचाही नाहीये. काय गरज होती त्याला मला असा भेटायला बोलावून हे सगळ सांगायची? मी काही बोलले होते का त्याच्याशी? .....सायली.
    "तू खरच विसरू शकतेस त्याला?"...नेहाने शांतपणे विचारलं. 
    नेहाच्या या प्रश्नाचं सायलीकडे काहीच उत्तर नव्हत. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, ते तसच थांबवत सायली म्हणाली, "मला आता या सगळ्याचा विचार करायचाच नाहीये आणि प्लीज हा विषय नको. मी आज खूप खुश आहे .माझं इतक्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झालय. मला जिथे हवी होती त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेय. पण तिथे तू माझ्याबरोबर नसशील याचच वाईट वाटतंय." 
    "मी ही तुला खूप मीस करेन सायली", नेहा रडवेली होवून म्हणाली. सायालीलाही खूप वाईट वाटलं. दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.
         MBA च कॉलेज सुरु झाल होतं. नवीन कॉलेज, नवीन शहर सायालीसाठी सगळच नवीन होत. या सगळ्या नव्या वातावरणात ती नेहाला खूप miss करत होती. सहाजिकच होतं, आतापर्यंतच त्यांच सगळ शिक्षण एकत्रच झाल होतं. हळूहळू सायली या नव्या वातावरणात रुळू लागली होती. नवे मित्र मैत्रिणी जोडताना हळूहळू ती सागरपासून दुरावत चालली होती. बघता बघता दोन वर्ष सरली. नेहाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल आणि तिचं लग्नही ठरलं. सायलीचं मात्र अजून एक वर्ष बाकी होतं. नेहाच्या लग्नाच्या बातमीने सायली खूप खुश झाली होती आणि थोडी उदास पण. कारण आता सुट्टीत ती घरी जाईल तेव्हा तिला नेहा भेटणार नाही. नेहाच्या लग्नाच्या धमाल आठवणी घेऊन सायली पुन्हा पुण्याला आली. आता MBA च लास्ट इअर होतं. त्यात कॅम्पसच टेंशन. सायली खूप मेहनत घेत होती. लास्ट इअरच पाहिलं सेमिस्टर संपत आल होतं. अशातच एक दिवस आईचा फोन आला. "सायली अग स्थळ आलय तुला पुण्याचं....मुलगा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करतो. MBA झालाय. पुण्याला बंगला आहे त्यांचा आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." .... आई       "आई अग आत्ता कुठे लग्न? अजून माझ MBA  कंप्लीट व्हायचंय. कॅम्पससाठी खूप मेहनत घेतेय मी. मला चांगला जॉब मिळवायचा आहे....." सायली वैतागून बोलत होती. 
     "अगं नुसत बघायला काय जातंय? आणि मी कुठे आताच मुहूर्त काढायला निघालेय , आत्ता नुसता बघण्याचा कार्यक्रम करुया, तुम्ही एकमेकांना पसंत केलत तरच लग्न ठरेल...असं म्हणून आईने फोन ठेवला. 
    सायली मनातून वैतागली होती. पण नन्तर तिने विचार केला की जाऊदे , आई बाबांची इच्छा आहे तर बघायचा कार्यक्रम करुया तसही मी नाहीच म्हणणार आहे. क्षणभर मनात सागरचा विचार आला. पण तिने तो लगेचच झटकला. 
     सायली तयार झाली. खूप सुंदर दिसत होती ती आज. तिचा 'तो' बघायचा कार्यक्रम होता. ती आई बाबांबरोबर जायला निघाली. गाडीत बसल्यावर तिच्या लक्षात आलं आपण ज्याच्यासाठी जातोय त्या मुलाचं नावसुद्धा आपल्याला माहिती नाहीये. "आई, नाव काय ग त्या मुलाचं?" सायलीने विचारलं.                                                                             "लवकर विचारलास", आई हसत म्हणाली. सायलीलाही हसू आल. एवढ्यात एका बंगल्यासमोर गाडी थांबली. तो बंगला बघून सायली तर हरखून गेली. गाडीचा आवाज ऐकून त्या बंगल्यातून कोणीतरी गेटजवळ येऊन अगदी अदबीने त्यांना बंगाल्यामद्धे घेऊन गेले. तिच्या आई बाबांच्या आणि त्या मुलांच्या आई बाबांच्या गप्पा चालू झाल्या. सायलीला खरतर खूप ऑकवर्ड वाटत होत.
            आतल्या खोलीतून एक हॅन्डसम मुलगा बाहेर आला. त्याला कुठेतरी पाहील्यासारखा वाटलं सायलीला. "हा माझा मुलगा निखिल" ..त्याच्या बाबांनी ओळख करून दिली. 
        थोडी बोलणी झाल्यावर निखिल तिला बंगला दाखवण्यासाठी म्हणून घेऊन गेला आणि दोघाना जरा एकांत मिळाला.सगळा बंगला फिरून दोघही गार्डनमध्ये गेले. गार्डन छोटं होतं पण खूप सुंदर होत. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात तर ते अधिकच आकर्षक दिसत होत ....अगदी सायालीसारख. 
      "तुमचं घर आणि गार्डन दोन्ही खूप छान आहे." सायली म्हणाली.          "Thank God तुम्हाला बोलता येतं", निखिल गोड हसत म्हणाला. सायालीही मंद हसली कारण आल्यापासून खरच ती काहीच बोलली नव्हती. काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत.काहीतरी बोलायचं म्हणून सायली म्हणाली," तुमच्याबद्दल काहीतरी सांगाना." "काय?"..निखिल." 
     "काहीही तुमची लाईफस्टाईल, तुमचा जॉब, तुमचे मित्र मैत्रिणी, कॉलेजमधल्या गोष्टी, आयुष्यातलं कोणी खास न विसरता येण्यासारखं", सायली.
       तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेत निखिल म्हणाला, "कोणीतरी खास असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. हा एक मुलगी आवडायची कॉलेजला असताना पण ती आधीच एंगेज्ड होती. नंतर MBAला असतानाहि एक मुलगी आवडली होती. आवडली कुठली मी तर प्रेमातच पडलो होतो तिच्या".
       "मग तिचं काय झालं? का ती पण एंगेज्ड होती", त्याच बोलणं मद्ध्येच तोडत थोडस वैतागूनच सायलीने विचारलं. 
      "नाही नाही , ती एंगेज्ड नव्हती, म्हणूनच तर आजचा बघण्याचा कार्यक्रम होतोय"' निखिल हसत म्हणाला. 
      क्षणभर सायलीला काहीच कळल नाही. तिने गोंधळून निखीलकडे बघत विचारलं.." म्हणजे? मी समजले नाही?"
     "अग तूच होतीस ती मुलगी! आपण एकाच कॉलेजमद्ध्ये होतो तेव्हा, आठवतंय का? पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, लायब्ररीच्या बाहेर चिखलात पडलेल्या तुझ्या नोट्स, त्यावरून तुझ माझं झालेल भांडण..." निखिल      "येस! म्हणजे कॉलेज किंग निखिल साने ?...TY MBA Finance, कॉलेज टॉपर, करेक्ट?" सायलीने विचारलं. 
    "करेक्ट! मेमरी चांगली आहे हा तुझी." निखिल हसत म्हणाला. 
    "तरीच मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होत...सायली.
    बोलता बोलता ती दोघं एकेरीवर कधी आली ते त्यांनाच कळल नाही.
 "खर तर मला तेव्हा खूप राग आला होता तुझा मी मेहनतीने काढलेल्या सगळ्या नोट्स तुझा धक्का लागल्यामुळे चिखलात पडून खराब झाल्या होत्या". सायली हसत म्हणाली.
   "मलाही! मी सॉरी म्हणून पण तुझी बडबड चालूच होती. पण मग नंतर कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनला तुझ गाणं ऐकल आणि तुझ्या आवाजाबरोबर तू पण आवडायला लागलीस. 'बेदर्दी बालमा तुझको ,मेरा मन याद करता है.......काय गाणं म्हटलयस तेव्हा? त्यानंतर तुझं आवडण प्रेमात कधी बदललं तेच कळल नाही. तेव्हाच ठरवलं तुझ्याशीच लग्न करायचं. नशिबाने तू एंगेज्ड नव्हतीस." निखिल हसत म्हणाला. 
     " हे तुला कस कळलं?" सायलीने आश्चर्याने विचारले. "
     "मुलांना मुलींबद्दल सगळ्या बातम्या काढता येतात मॅडम", त्याशिवाय का तुझ्या घरी डायरेक्ट मागणी घातली?" निखिल हसत म्हणाला. 
       "पण मग तेव्हा का नाही विचारलंस?........ सायली. 
    "तेव्हा मी लास्ट इअरला होतो शिवाय कॅम्पसचं पण टेंशन होतं आणि मुख्य म्हणजे मी काहीच कमवत नव्हतो आणि सेटल झाल्याशिवाय कुठल्या मुलीला प्रपोज करण मला पटणार नव्हतं. पण तेव्हाच ठरवलं होतं;  सेटल झाल्यावर डायरेक्ट लग्नाचीच मागणी घालायची. सेटल झाल्यावर मी माझ्या घरी आई बाबांना सगळं सांगितलं आणि त्यांनी तुझ्या आई बाबांना."निखिल म्हणाला. 
    "काय? आई बाबांना हे सगळ आधीपासूनच माहिती होतं? पण मला काहीच बोलले नाहीत, सायली आश्चर्याने म्हणाली. 
    "कारण मी तस सांगितल होतं, हे सगळ मला स्वतःहून तुला सांगायचं होत"...निखिल.
   "अच्छा असं आहे तर" ....सायली गमतीने म्हणाली.
     "तर मग तुझा होकार समजू का? निखिलने गुलाबाचं फुल तिच्यासमोर धरत विचारलं. 
     सायलीला खर तर निखिल आवडला होता. पण तरीही असा डायरेक्ट लग्नाचा निर्णय घ्यायला तिचं मन तयार होत नव्हतं. "मला विचार करायला थोडा वेळ हवाय", सायली निखिलला म्हणाली.  
 "ok take your own time", निखिल शांतपणे म्हणाला. 
      काही वेळ तसाच शांततेत गेल्यावर सायलीने निखिलला विचारलं, "तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यावसं नाही वाटलं?
 "नाही! अग मला तुझ्याबद्दल अगोदरपासूनच माहिती आहे. मी सांगितल ना तुला मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसतं",निखिल. 
 "पण माझ्या भूतकाळाबद्दल.... "सायली.
"भूतकाळाबद्दल? म्हणजे त्या बेदर्दी बालमाबद्दल?" मिश्किलपणे हसत  निखिलने विचारलं.  
"तुला कस माहित? आश्चर्यचकित होत सायलीने निखिलला विचारलं. 
 "मला काहीच माहित नाही, पण तुझ्या गाण्यातून तुझ्या भावना कळत होत्या. तू गाणं नुसतं गात नव्हतीस तर ते जगत होतीस. त्यावरूनच मी अंदाज केला. तसंही तुझ्या भूतकाळापेक्षा मला वर्तमान आणि तू हो म्हणालीस तर आपल भविष्य जास्त महत्वाचं आहे. आणि तुझ्या त्या बेदर्दी बालमाला मी थॅंक्सच म्हटलं पाहिजे. तो बेदर्दी नसता तर तू तेव्हा एंगेज्ड असतीस." निखिल हसत म्हणाला.
     सायलीही निखीलकडे बघून मंद हसली. आता तर तो तिला अधिकच आवडायला लागला होता. निखिल आणि त्याच्या  फॅमिलीचा निरोप घेऊन सायली आई बाबांबरोबर रूमवर आली. आई बाबा दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जाणार होते.  सायलीला त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही म्हणून ती मनातून थोडी नाराज झाली होती. रात्री मात्र तिला सारखा निखिल आठवत होता. तिला आठवत होतं कॉलेजमध्ये कितीतरी मुली निखिलच्या मागे होत्या, पण निखिल मात्र तेव्हापासून फक्त आपल्यावर प्रेम करतो हे ऐकून ती सुखावली होती. 
       सायली आणि निखिलच्या आता वारंवार भेटी होऊ लागल्या होत्या. ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. अखेर विचार करून तिने आपला निर्णय सांगितला, "मी लग्नाला तयार आहे. पण मला आधी माझं करिअर करायचं आहे. त्यामुळे MBA पूर्ण झाल्यावर किमान १ वर्ष नोकरी करूनच मी लग्न करेन."
     निखिलने अर्थातच ही अट मान्य केली. दोघांच्याही घरी आधुनिक वातावरण असल्यामुळे तसा प्रोब्लेम नव्हता. पण MBA च अर्ध वर्ष आणि त्यानंतर अजून १ वर्ष हे दोघांच्याही मातोश्रीना पटत नव्हतं. अखेर आधी साखरपुडा करायचा ठरवून सगळ्याचीच मर्जी राखण्यात आली. लग्न ठरल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सायलीच्या आई बाबांनी तिला मोबाईल भेट दिला. त्या काळात मोबाईल नुकतेच सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले होते. निखीलकडे तर अगोदरपासूनच मोबाईल होता. दिवस असेच मजेत चालले होते. मोबाईलमूळे तिचं आणि निखिलचं दिवसातून अनेक वेळा बोलणं व्हायचं आणि जवळपास रोजची संध्याकाळ दोघं एकत्रच घालवत होते. सायली निखिलच्या प्रेमात हळूहळू सागरला विसरत चालली होती. हुशार, सुंदर आणि आत्मविश्वासी सायलीचं कॅम्पसमधून एका चांगल्या कंपनीत सिलेक्शन झालं. सगळ तिच्या मनाप्रमाणे घडत होतं. निखिलसारखा रिच, हॅन्डसम, वेल सेटल्ड, संस्कारी आणि मुख्य म्हणजे तिच्यावर खूप प्रेम करणारा लाईफ पार्टनर, कॅम्पसमधून मिळालेला हाय प्रोफाइल जॉब; सायली जणू हवेत तरंगत होती. माझ्यासारखी भाग्यवान मीच अस तिला आता मनोमन वाटत होतं.
       यथावकाश ठरल्याप्रमाणे निखिल आणि सायलीचा साखरपुडा अगदी साधेपणाने पार पडला. साखरपुड्याला दोन्ही घरचे अगदी जवळचे नातेवाईक सोडून फारस कोणाला बोलावलं नव्हत. नेहा मात्र खास बॅंगलोरहून तिच्या साखरपुड्यासाठी आली होती. सायलीला खुश बघून नेहाही सुखावली. कितीतरी वर्षांनी ती सायलीला इतकी आनंदी आणि समाधानी बघत होती. साखरपुडा झाल्यावर मात्र त्याच दिवशी नेहा बॅंगलोरला परत गेली कारण ती ही नुकतीच बंगलोरच्या एका कॉलेजला लेक्चरर म्हणून नवीनच रुजू झाली होती. त्यामुळे तिला जास्त रजा घेणे शक्य नव्हते. निखिलच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी सायलीला नेहाशी प्रत्यक्ष भेटून बोलायच्या होत्या, पण नेहाच्या अशा लगेचच जाण्याने सहाजिकच सायली थोडी हिरमुसली.
       सायलीची परीक्षा जवळ आली होती त्यामुळे सायलीला आता पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. अर्थातच तिला निखिलला जास्त वेळ देणे शक्य नव्हते. म्हणूनच त्या दोघांनी एक पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचा ठरवलं. दिवसभर भटकंती, लॉंग ड्राइव्ह आणि मग फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॅन्डललाईट डिनर, निखिलने तिच्यासाठी अशी एक खास 'रोमॅन्टिक डेट' प्लॅन केली होती. ते सगळ बघून सायली खूप खुश झाली होती. त्याच दिवशी निखिलने तिला सांगितल की कंपनी त्याला तीन महिन्यांसाठी US ला पाठवतेय. सायली तर हरखूनच गेली. तिच्या महत्वाकांक्षी स्वप्नाना आता नवे पंख लाभले होते.
      पंधरा दिवसांनी निखिल US ला निघून गेला. त्याला एअरपोर्टवर सोडायला सायली गेली होती. जाता जाता सायलीपेक्षा तोच जास्त भावूक झाला होता. "बघ मलाही नेल असतस तर आज असं एकट्याला नसतं जायला लागलं." सायली मिश्किलपणे म्हणाली. 
    "अच्छा मॅडम, साखरपुड्याऐवजी लग्न केलं असतं तर जाडीने गेलो असतो आज "निखील हसत म्हणाला. एवढ्यात अनाऊन्समेंट झाली आणि सायलीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला. निखिल गेल्यानंतर सायलीला खूपच एकटेपणा जाणवायला लागला.       "निखीलवर इतक प्रेम करते मी की त्याच्याशिवाय जगणं कठीण जातंय?' सायली स्वतःशीच म्हणाली. कुठेतरी वाचलेलं तिला आठवलं 'सहवासातल्या आनंदापेक्षा विरहातील दुःखच एखाद्याबद्दल आंतरिक ओढ निर्माण करतं'. अखेर सगळे विचार झटकून सायली परीक्षेच्या तयारीत गर्क झाली. यथावकाश परीक्षा पार पडली. प्रोजेक्ट्सच कामही पूर्ण झाल. रिझल्ट लागल्यानंतर १५ दिवसांनी ती नवीन कंपनीत रुजू होणार होती. तोपर्यंत तिच्याकडे मोकळा वेळ होता. पण या वेळेचे सगळे प्लॅन्स तिने आधीच ठरवले होते. कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिक, भटकंती, गेट टुगेदर यासाठी ती निदान १५ दिवस तरी पुण्यातच थांबणार होती. त्यानंतर ती घरी जाणार होती कारण नेहाही त्याच सुमारास माहेरी येणार होती. 
           एक महिना तर गेला आता १५ दिवस सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर मजेत जातील मग फक्त दीड महिन्याचा प्रश्न मग निखिल परत येईल. ..सायली स्वताशीच म्हणाली. तो परत आल्यावर काय काय करायचे हे प्लॅन्स ती ठरवत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. 
"हॅलो सायली" ....पलीकडून आवाज आला ...
"हो मी सायलीच बोलतेय".....सायली. 
"सायली मी तुषार बोलतोय. तुषार देशमुख ....GJ कॉलेज..... आठवतंय का?"
 पलीकडचा आवाज ऐकून सायली दचकलीच कारण तुषार हा सागरचा रुममेट आणि बेस्ट फ्रेंड होता.
 स्वतःला सावरत सायली म्हणाली .."हो ओळखल,बोल" 
"सायली तुला आत्ता आपल्या गावी येणं शक्य आहे का? शक्य असेल तर आजच निघ....तुषार.
"पण काय झालय?" सायलीने गोंधळून विचारले.
"ते फोनवर नाही सांगता येणार पण अस समज कि खूपच महत्वाच काम आहे आणि तुझ्याशिवाय ते अडलंय".....तुषार म्हणाला. 
"ठिक आहे मी प्रयत्न करते ...सायली 
"प्रयत्न नको सायली कन्फर्म सांग....तुषार काकुळतीला येऊन म्हणाला. 
"ओके, बुकिंग मिळालं तर आजच निघते मी" ...एवढ बोलून तिने फोन ठेवला. तुषारच माझ्याशी काय काम असणार? आणि त्याला माझा मोबाईल नंबर कसा मिळाला? सायली विचार करत होती, तेवढ्यात तिला निखिलचे शब्द आठवले, 'मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसतं.' पण विचार करत बसण्यापेक्षा तिने बुकिंग ऑफिसला फोन करून आजच्या रात्रीच्या गाडीच बुकिंग कन्फर्म केलं. तिच्या आणि निखिलच्या घरीही फोन करून तसं कळवल. 
     घरी आल्यावर सायलीने तुषारला फोन केला. तुषार म्हणाला आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया. कुठे भेटायचं ते तू सांग, मी तुझ्या घरी येऊ कि तू माझ्या रूमवर येशील?, कि कुठे बाहेर भेटूया?तू ठरव आणि मला तस कळव पण एक मात्र लक्षात ठेव कि मला तुझ्या एकटीशीच बोलायचय. बाहेर भेटण्याचा पर्याय तिला कधीच मान्य नव्हता, त्यापेक्षा त्याच्या रूमवर जाऊन त्याला भेटणंच तिला जास्त सोयीस्कर वाटलं. तुषारच्या रूमचा पत्ता घेऊन ती त्याला भेटायला गेली. 
       सर्वसामान्य मुलांची असते तशीच त्याची रूम होती अस्ताव्यस्त पसरलेली. सायली येणार म्हणून त्याने रूम आवारण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न सायलीच्या नजरेतून सुटला नाही. 
"ये बस ना".... खुर्ची सरकवत तुषार म्हणाला. 
"काय झालय तुषार एवढ कसल महत्वाच काम आहे ?" ...सायलीने विचारले. 
     कुठलीही प्रस्तावना न देता तुषार म्हणाला, "सागरबद्दल बोलायचं आहे" 
    "काय??? मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं आणि ऐकायचं नाहीये....सायली चिडून म्हणाली. 
     "सागरचा ॲक्सिडेंट झालाय सायली, गेले १५ दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. बेशुद्ध आहे .त्याला ICU मध्ये ठेवलय.. डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये. त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे म्हणून मी तुला बोलावलंय ",...तुषार भावनाविवश होत म्हणाला. 
     तुषारचं बोलणं ऐकून सायली निरुत्तर झाली होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत. तेवढ्यात तुषारने तिच्यासमोर एक डायरी धरली आणि म्हणाला' " हि डायरी वाच सायली म्हणजे तुला आपोआपच कळेल कि तुला का बोलावलंय.            "कसली आणि कोणाची डायरी आहे हि?", सायलीने विचारले. "         "सागरची! खर तर मलाही या डायरीबद्दल काहीच माहिती नव्हते. तुझा साखरपुडा झाल्याच कळल्यावर एक दिवस सागर माझ्याकडे आला होता. खूप उदास दिसत होता तो. त्याचवेळी एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स माझ्या हातात ठेवून म्हणाला, 'माझा आता यावर काहीही अधिकार नाही, मी आता या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ ठेऊ शकत नाही. पण हि माझी आयुष्याची ठेव समजून तुझ्याजवळ जपून ठेव आणि शक्य असेल तर हा बॉक्स कधीही उघडून बघू नकोस.' त्या दिवशी तो मला भेटला ते शेवटच, त्यानंतर दोनच दिवसांनी त्याचा ॲक्सिडेंट झाला. समोरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्याला उडवले आणि तेव्हापासून तो ICU मध्ये ॲडमिट आहे . डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये म्हणून मग मी न राहवून तो बॉक्स उघडला,कारण मला वाटत होतं की कदाचित त्या बॉक्समध्ये सागरला वाचवण्याचा मार्ग सापडेल. तो बॉक्स उघडताना सतत मनात येत होत कि मी हे चुकीच तर करत नाहीये ना? . पण हि डायरी वाचल्यावर माझी खात्री झाली की माझा बॉक्स उघडण्याचा निर्णय चुकीचा नव्हता." तुषार न थांबता बोलत होता आणि सायली सुन्नपणे सगळ ऐकत होती. तिचे डोळे पाणावले होते. थरथरत्या हातांनी तिने डायरी उघडली. 
        डायरीच्या पहिल्याच पानावर मोठ्याअक्षरात लिहील होत ..to my sweet love Sayali....त्याच्यासोबतच सिंगिंग कॉम्पिटिशनच्या वेळेचा तिचा एक फोटो आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेचे दोन फोटो; एक तिचा प्राईज घेतानाचा आणि दुसरा तिच्या आणि सागरच्या हस्तांदोलनाचा. त्यानंतरच्या प्रत्येक पानावर सायलीच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लिहिलेल्या होत्या. प्रत्येक पान त्याच्या प्रेमाचा पुरावा देत होत. वाचता वाचता सायली त्या देवळातल्या भेटीच्या दिवसापर्यंत आली. 
            सागरने लिहिल होतं..... "दुरूनच तू मला कॅन्टीनच्या दाराशी उभी दिसलीस , नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होतीस. पाऊस असाच मुसळधार कोसळत रहावा आणि मी तुझ्याकडेच असच बघत रहाव असं मनोमन वाटत होतं. तू ही माझ्यात गुंतत चालली आहेस हे मला माहित होत. सगळं कळत होतं, पण नाही हे सगळ कुठेतरी थांबायला हवं. हे शक्य नाहीये. माझा मेंदू माझ्या मनाला समजावत होता. तू माझ्यात जास्त गुंतण्याआधीच तुला थांबवायला हवं. मग विचार करून आणि मनाची पूर्ण तयारी करून मी तुला भेटायला बोलावले. मी जे करायच ठरवल होत ते माझ्या मनाला पटत नव्हत पण आपल्या दोघांसाठीही तेच योग्य होतं. देवळात झालेल्या आपल्या भेटीचा क्षणन् क्षण मी माझ्या नजरेत साठवून ठेवलाय कारण कदाचित ती आपली शेवटची भेट होती. मी बोलत असताना तुझ्या डोळ्यात साठलेले अश्रू मला जाणवत होते पण तरीही मी कठोर झालो होतो. मला तस होणंच भाग होतं. तू निघते म्हणून निघून गेलीस क्षणभर तुला थांबवावस वाटल, वाटलं मनातलं सगळं तुफान तुझ्यासमोर उधळून द्याव, तुला मिठीत घेऊन तुझे डोळे पुसावेत आणि तुला सांगाव कि खूप प्रेम करतो सायली मी तुझ्यावर अगदी वेड्यासारख, पण तरीही मी शांत राहिलो. मला माहितेय घरी जाऊन तू खूप रडली असशील पण मला खात्री होती कि तू माझ्यापासून दुरावशील. आपण दोघेही वेगळ्या वाटेचे प्रवासी आहोत सायली . या वाटा एकत्र येणच शक्य नाहीये. तू हुशार, कॉन्फिडंट, करिअर ओरिएंटेड आणि महत्वाकांक्षी. तुझ्यासमोर भव्य दिव्य आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि मी मात्र साध आयुष्य जगण्यातच समाधान मानणारा. माझ्या अगदीच पुराणमतवादी नाही पण आधुनिक नसणाऱ्या कुटुंबात तुला सामावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्या कुटुंबासोबत तुझीही फरफट करण्यासारख. तू मेट्रो सिटीच्या झगमगाटात रमणारी आणि मी गावातल्या हिरवळीत. तुझं मल्टिनॅशनल कंपनीमध्ये हाय प्रोफाइल जॉब करण्याचं स्वप्न तर मी गावातल पिढ्यान पिढ्या चालत आलेलं दुकान सांभाळणार. तुला स्टेटसचंआकर्षण तर मला घरातल्या आंब्याच्या आणि नारळी-पोफळीच्या बागांच . कसं जमणार सायली आपल? माझ्या खेडेगावातल्या घरी तुझी घुसमट झाली असती. मला माहित होतं, तू खेडेगावातल्या एखाद्या परंपरा पाळणाऱ्या घरात कधीही सामावून जाऊ शकत नाहीस. म्हणूनच मी ठरवलं स्वतः थांबायचं आणि तुलाही थांबवायचं. आमच्या पिढीजात श्रीमंत घराला पैशाची काहीच कमी नाहीये पण त्यातून तुझी स्वप्न , तुझ सुख नाही विकत घेऊ शकत मी. कारण त्याच्या बदल्यात मला माझ्या कुटुंबाच्या अपेक्षाना तिलांजली द्यावी लागेल. कुटुंबातला एकुलता एक मुलगा आहे ग मी त्याना दुखावून कस चालेल? सायली खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर पण कधीच ते व्यक्त नाही करू शकत. तुझ्याबरोबरच्या क्षणांची खूप स्वप्न बघितली होती मी, पण कधीच प्रत्यक्षात नाही आणू शकत. एक मात्र नक्की सांगतो माझ्या हृदयातील एक कोपरा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असेल....आयुष्यभरासाठी. ती जागा फक्त तुझी असेल तिला कधीच कोणी धक्का लावू शकणार नाही. तू कायम सुखात रहावस एवढीच माझी इच्छा आहे. कुठेतरी वाचलेल्या कवितेतल्या काही ओळी आठवतायत सायली ....
          एक सांगशील,
          आपले रस्ते अवचित कुठे; असे जुळले?
          आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले?
           क्षणाभोवती, हि कसली अनोखी रंगत खुलते आहे?
           जगणे व्हाव गाणं, अशी सुरांची रंगत जुळते आहे
          पण खरं सांगू ?
            या वाटांच हे अस भेटणं बर नव्हे ,
            जीवघेणं उत्कट असेल पण ते खर नव्हे.
            तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलणं हिताचं नाही
            माझ्यापुरत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही
            तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे
            माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वास आहे
         म्हणून म्हणतो,
          अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
          जीव जडवून चटका लाऊन निदान दूर होणं तरी असू                          नये.........................
    वाचता वाचता सायलीने इतका वेळ डोळ्यात साठवलेलं पाणी तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहू लागलं. किती चुकीच समजत होती ती सागरला. खर तर तिने सागरला ओळखलच नव्हतं. त्याच प्रेम तिला कधी समजलच नव्हतं. ती नेहमी स्वतःच्या विश्वातच दंग असायची. आता मात्र तिला नेहाचे शब्द आठवत होते," कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात सायली. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का?" तिला नेहाची खूप आठवण येत होती. आत्ता या क्षणी ती आपल्याजवळ असावी अस तिला सारख वाटत होत. खरच मी प्रेम केल होत सागरवर? सायलीच्या मनात द्वंद्व चालू झालं. तिचच मन आता तिच्याविरुद्ध उभं ठाकलं होतं. स्वतःला सावरत सायली म्हणाली, "मला सागरला भेटायचंय" मला त्याच्याकडे घेऊन जाशील ?
   तुषारने फक्त होकारार्थी मान हलवली. हातातली डायरी बाजूला ठेऊन सायली त्याच्याबरोबर जायला निघाली. तुषारने मात्र आठवणीने डायरी बरोबर घेतली.
             सायली आणि तुषार हॉस्पिटल मध्ये गेले. सुदैवाने ती दोघं विजिटिंग अवर्समद्धेच तिथे गेली होती. ती दोघं गेली तेव्हा सागरची आई बाहेरच भेटली. तुषारने त्यांची आणि सायलीची ओळख करून दिली. तुषार आणि सायली ICU मध्ये गेली. दोघं आत जाताच सागरचे वडील बाहेर जावून थांबले. कारण ICU मध्ये फक्त दोन माणसांनाच थांबायची परवानगी होती. आत गेल्यावर मात्र सागरला पाहुन तिला रडूच आल. कितीतरी दिवसांनी ती सागरला बघत होती ते हि अशा अवस्थेमध्ये. हिम्मत करून ती सागरजवळ जाऊन बसली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, " सागर काय अवस्था करून घेतलेयस स्वतःची? का सांगितल नाहीस मला सगळं? का एकट्यानेच सगळं  ठरवलस? why saagar why? असं म्हणून सायली रडू लागली. तुषार शांतपणे मागे उभा होता. त्याच्याही डोळ्यात पाणी तरळले. दु:खाचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, "तू खूप मोठ्या मनाचा आहेस सागर, किती ओळखलस तू मला, माझी सगळी स्वप्न, माझे विचार, माझ्या आवडी निवडी सगळ तुला माहिती होते आणि मी मात्र तुला समजून घ्यायचा साधा प्रयत्नही केला नाही कधी. मला माफ कर सागर. मी तुझं प्रेम कधी समजूच शकले नाही. पण तू हे सगळं मला का सांगितल नाहीस? एकदा सांगून तरी बघायचास....आणि ठिक आहे मी नव्हते ॲडजस्ट होऊ शकत तुझ्या कुटुंबात पण तू तर माझ्याबरोबर ॲडजस्ट होऊ शकला असतास ना?  मेट्रोसिटीमध्ये राहून गावाकडची शेती, व्यवसाय सांभाळणारे कितीतरी लोकं आहेत. मी ही मदत केली असती तुला.
     सायलीच्या या वाक्यावर मात्र तुषार चमकला. तो काही बोलणार इतक्यात नर्स आली व वेळ संपल्याच सांगून त्याना बाहेर जायची विनंती केली. बाहेर जाऊन सागरच्या आई बाबांचा निरोप घेऊन दोघही जायला निघाली. तेवढ्यात ICU जवळ कसलीतरी धावपळ चालू झालेली दिसली. काय झालं काहीच कळत नव्हत. इतक्यात तुषारला ती मगाचचीच नर्स दिसली. तिच्याजवळ चौकशी केल्यावर कळलं १५ दिवसानंतर सागरने हालचाल केलेय. अजून पूर्ण शुद्धीत नाही आलाय पण डॉक्टर प्रयत्न करत आहेत. हे ऐकून सायली आणि तुषार दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद तरळला. डॉक्टर बाहेर येईपर्यंत दोघांनी थांबायचे ठरवले. सागरचे आई बाबा ICU बाहेरच थांबले. तुषार आणि सायलीला मात्र नर्सने वेटिंगरूममध्ये थांबायची विनंती केली. वेटिंग रुममध्ये विशेष गर्दी नव्हती पण बसायला मात्र जागा नव्हती. तुषारने सायालीसमोर डायरीचे एक पान काढून ते वाचायला सांगितले. तेवढ्यात तुषारचा मोबाईल वाजला तुषार बोलण्यासाठी म्हणून बाजूला गेला. सायलीने हातातल्या डायारीकडे बघितले तुषारने काढून दिलेले पान तिने उभ्याउभ्याच वाचायला सुरवात केली. ते वाचल्यावर मात्र सायलीचे डोळे अश्रुंनी डबडबले आणि आधारासाठी म्हणून मागच्या भिंतीला टेकली. पुढच काहीच ती वाचू शकली नाही. सागरने त्यात लिहील होतं," मला माहित आहे मी माझ्या भावना कधीही तुझ्यासमोर व्यक्त करणार नाही सायली कारण मला खात्री आहे तू माझ्यासाठी माझ्या गावात रहायला कधीच तयार होणार नाहीस उलट तू मला मेट्रो सिटीमध्ये रहावूनच गावाकडचं सगळं मी कसं सांभाळू शकतो हेच पटवून द्यायचा प्रयत्न करशील. पण ते मला शक्य नाही. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. तेवढ्यात तुषार तिथे आला रडणाऱ्या सायलीकडे बघून तो पळतच तिच्याजवळ गेला. तुषारने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ती आता पूर्णपणे नि:शब्द होती.
        "सायली, कॉफी!" निखिलच्या आवाजाने सायली भानावर आली.
 "अरे तू कधी आलास? आज लवकर ?"सायलीने आश्चर्याने विचारलं. "जेव्हा तू सागरच्या आठवणीत होतीस, निखिल म्हणाला.
  ते ऐकून सायली दचकून म्हणाली. "पण तुला....
 तिचं बोलण मध्येच थांबवत निखिल म्हणाला , "मी आलो तेव्हा रेडीओवर सलोनासा सजन है...चालू होतं आणि तू कॉफी तशीच ठेवून शांतपणे बसली होतीस, त्यावरूनच ओळखल मी." सायलीला उदास झालेली बघून निखिलने तिला जवळ घेतले आणि म्हणाला, "Its ok सायली, येणाऱ्या आठवणी थांबवता येत नाहीत.
     "मी खूप हर्ट केलं ना तुला?" सायलीने रडतच विचारलं.
"नाही ग राणी", तिचे अश्रू पुसत निखिल म्हणाला. तरीही ती उदासच होती. निखिलने तिचा हात हातात घेऊन तिला जवळ घेतले आणि आकाशाकडे बोट करून म्हणाला," त्या तिथे आकाशात खूप तारे असतात ढग दाटून आल्यावर ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण मात्र त्यांना दिसत असतो. सागरही त्यातलाच एक तारा बनलाय आता, तिथून कुठूनतरी तो तुला नक्की बघत असेल , त्याला अशी रडणारी, उदास सायली नाही हा आवडणार. सायलीने नेहमी सुखात रहाव हीच त्याची इच्छा होती. त्याच्या या बोलण्याने सायलीला अधिकच रडू आलं ती स्वतःला सागर आणि निखिल या दोघांचीही अपराधी समाजत होती. त्यांच्या प्रेमापुढे,त्यांच्या मनाच्या मोठेपणापुढे ती पूर्णपणे नि:शब्द होती आणि पाउस मात्र मुसळधार बरसत होता.
समाप्त.
©मानसी जोशी

(सदर कथेतील सागरच्या डायरीमधील कविता मी लिहिलेली नसून एका अपरीचित कवीची आहे. निव्वळ कथेचा भाग म्हणून मी ती माझ्या कथेत वापरली आहे.)


Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...