Tuesday, 13 September 2016

कथा- अकल्पित

अकल्पित
"पूर्वी आज ऑफिसमधून येताना हे सामान आण ग आठवणीने. उद्यापासून श्रावण सुरु होतोय त्यात दोनच दिवसात शुक्रवार आहे. सवाष्ण जेवायला बोलावलेय आणि हो बयोलाही आठवणीने निरोप दे."
 सासूबाईंच्या या बोलण्यावर पूर्वीने होकारार्थी मान हलवली आणि सामानाची यादी पर्समध्ये ठेऊन ऑफिसला निघून गेली. पूर्वी सॉफ्टवेअर इंजिनिअर होती आणि ती एका IT फर्ममध्ये जॉब करत होती. तिचा नवरा आदित्य डॉक्टर होता आणि घराजवळच असलेल्या त्यांच्या मालकीच्या हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होता. पूर्वीच घर शहराजवळच्या एका गावात होत.घर कसलं मोठा वाडा होता. तिची थोडीशी शहराबाहेरच असणारी कंपनी मात्र तिला तिथून जवळ पडायची.
         संध्याकाळी ऑफिसमधून पूर्वी जरा लवकरच निघाली. सगळ सामान घेऊन गावाच्या वाटेला लागली. शहराच्या गर्दीतून बाहेर आल्यावर तिने गाडीतला एसी बंद करून काचा खाली केल्या. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी हिरवीगार शेते त्यावर पडलेली मावळत्या सूर्याची किरणे ,नुकताच पाउस पडून गेलेला असल्यामुळे हवेत आलेला गारवा आणि आकाशात दिसणारच्या मावळतीच्या वेगवेगळ्या रंगछटा या सगळ्या वातावरणामुळे पूर्वीचा थकवा कुठल्या कुठे पळाला. तिला हा श्रावण खूप आवडायचा. ऊन पाउस एकत्रित पाहताना ती अगदी लहान मुलासारखी हरखून जायची. तिला आठवल याच श्रावणात आदिने तिला प्रपोज केल होत. अशा या रम्य वातावारणात कितीतरी संध्याकाळी त्यांनी एकत्र घालवल्या होत्या.किती दिवस झाले असतील आपल्याला एकांत मिळून? आठवावच लागेल. ती या विचारात असताना गाव कधी आल तिला कळलाच नाही. जाता जाता बयोच्या घरासमोर गाडी थांबवून तिला शुक्रवारचा निरोप दिला.
बयो आता खूप थकली होती तरी श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवार साठी आदल्या दिवशी येऊन वर्षातून फक्त या चार शुक्रवारी उघडणारी 'बंद' खोली साफ करून जात असे. काय होत त्या बंद खोलीत? तिथे फक्त तिच्या आजे सासूबाई आणि बयो सोडून कोणालाच प्रवेश नव्हता. तिच्या आजेसासूबाई म्हणजे त्यांच्या घराच्या सर्वेसर्वा होत्या. त्यांच्या मर्जीविरुद्ध जायची कोणाचीच हिम्मत नव्हती. आजे सासुबाईनी लग्न झाल्या झाल्या सुरवातीलाच तिला या खोलीबद्दल विचारायचं नाही अस बजावल्यामुळे गेल्या आठ वर्षात याचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न करूनही हातात काहीच पडल नाही पण आता मात्र तिला लवकरच हि संधी चालून आली. १५ ऑगस्ट ला तिच्या नणंदेच्या घरी पूजा होती त्यामुळे घरातली सगळी जण तिच्याकडे जाणार होती अगदी आजे सासुबाइसुद्धा. ऑफिसच्या कामाच कारण पुढे करून तिने घरीच थांबायचे ठरवले. त्या दिवशी घरातून सगळी निघून गेल्यावर पूर्वी त्या कुलुपबंद खोलीजवळ गेली. त्या खोलीत जायचा दुसरा मार्ग तिने शोधायचा प्रयत्न केला पण तो काही तिला सापडला नाही. तिला आठवल या खोलीत येण्यापूर्वी तिच्या आजेसासूबाई देवघरातल्या मागच्या कपाटातून काहीतरी काढून घेत असत. पूर्वी लगेच देवघरात गेली. खरतर त्या कपाटालाही नेहमी कुलूप असे आणि त्याची किल्ली सहाजिकच तिच्या आजेसासूबाईंकडे असे पण त्या दिवशी कस कोण जाणे कपाटाला कुलूप नव्हत. तिने देवघरातल मागच कपात उघडून त्यात किल्ली शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिला काहीच सापडले नाही. तेवढ्यात तिची नजर एका भरजरी साडीवर गेली कुतूहल म्हणून तिने ती साडी हातात घेतली तर त्या खाली तिला एक डबा दिसला. शेवटचा प्रयत्न म्हणून तिने तो डबा उघडला आणि तिला त्यात किल्ल्यांचा जुडगा मिळाला. तोघेऊन पूर्वी त्या बंद खोलीजवळ आली. पुर्वीने अंदाजाने लावलेल्या पहिल्याच किल्लीत कुलूप उघडल.
पुर्वीने जरा घाबरतच खोलीत प्रवेश केला. एका नवपरिणीत दाम्पत्याची असते तशी सजवलेली खोली पाहून पुर्वीला नवल वाटल. खोलीत गुलाबाची फुल असताना मोगरयाच्या फुलांचा सुगंधही तिला जाणवला. अचानक आलेल्या गार वाऱ्याच्या झुळुकेने पूर्वी दचकली. कारण त्या खोलीत वारा यायला कुठलीच खिडकी अथवा दरवाजा नव्हता. तिथलं गूढ वातावरण बघून पूर्वी खरतर घाबरली होती तरीही तिने वारा कुठून येतोय हे शोधायचा प्रयत्न केला. तिला पलंगाजवळच्या टेबलावर एका दाम्पत्याचा फोटो दिसला. तिनेतो फोटो हातात घेतला. तेवढ्यात पुन्हा एकदा आलेल्या वाऱ्याच्या झुळुकेने पूर्वी दचकली. या खोलीत तिला आता कोणाचे तरी अस्तित्व जाणवत होते. पूर्वी आता खूप घाबरली ती खोलीतून बाहेर जायला निघाली पण ती दारापर्यंत पोचेपर्यंत दार आपोआपच बंद झालं. पूर्वीला रडू कोसळलं. तिने दार उघडायचा खूप प्रयत्न केला पण दार काही केल्या उघडत नव्हत. तेवढ्यात मागून आवाज आला, "घाबरू नकोस बाळा मी तुला काहीच करणार नाही."
  पुर्वीने मागे वळून बघितले. तिथे एक नउवारी नेसलेली एक तरुण सवाशीण उभी होती. तिने आंबाडा घातला होता व त्यात मोगऱ्याचा गजरा माळला होता. पण का कुणास ठावूक त्या स्त्री च्या सात्विक चेहऱ्याकडे पाहून पूर्वीची भीती जरा कमी झाली. "बाळ मी तुला बाहेर जायला देईन पण एका अटीवर", ती स्त्री म्हणाली.
"कुठल्या?"पुर्वीने विचारले.
   त्या स्त्रीने पूर्वीचा हात धरून तिला पलंगावर बसवले व म्हणाली, "मला बाकी काही नको फक्त वचन हवय माझ्या मुक्तीच .....मी आज तुला जे काही सांगणार आहे ते निट ऐकून घे आणि मला मुक्त कर. मला खात्री आहे तू ते करशील."
      पूर्वी खूपच गोधाळून गेली होती तरीही ती शांतपणे त्या स्त्रीच बोलण ऐकू लागली.
"माझं नाव सुनंदा .आई, वडील, मी आणि माझी जुळी बहिण उमा अगदी आनंदाने रहात होतो. रूपाने जरी आम्ही दोघी अगदी सारख्या दिसत असलो तरीही स्वभाव मात्र भिन्न होते. ती हुशार, आत्माविशावासी, करारी तर मी शांत, सहनशील. मी शिक्षणात काही फारशी हुशार नव्हते पण उमा मात्र फारच हुशार. ती डॉक्टरकीचा अभ्यास करत होती. आमच्या गावाचे सर्वेसर्वा आणि समाजसुधारक तात्यासाहेब यांचा विलायतेतून डॉक्टरकीच शिक्षण घेतलेला मुलगा दामोदरराव यांनी उमाला पाहिले.त्यांना ती फारच आवडली. तात्यासाहेबांनी दामोदररावांसाठी उमाला लग्नाची मागणी घातली.          तात्यासाहेबांसारख्या बड्या घरातून उमासाठी आलेली मागणी कोणीच नाकारू शकले नाही. उमा तर अगदी हरखूनच गेली होती. दोघांच लग्न ठरल. दामोदररावांच्या आईने उमाची ओटी भरून तिला एक भरजरी साडी भेट दिली. पंचक्रोशीत पत्रिका वाटण्यात आल्या. पण नियतीच्या मनात काही वेगळच होत. उमाचा अपघात झाला आणि त्यात तिने मातृत्व गमावलं. कितीतरी दिवस ती बेशुद्ध होती. तिने गमावलेल्या मातृत्वामुळे दामोदररावांच्या आई व घरातल्या इतर स्त्रियाना हे लग्न होऊ नये असच वाटत होत परंतु तात्यासाहेबांसमोर बोलायची कोणाचीच हिम्मत नव्हती. अखेर लग्नाचा दिवस जवळ येऊन ठेपला तरी उमा शुद्धीवर येण्याचे कुठलेच लक्षण दिसत नव्हते. तात्यासाहेबानी यावर तोडगा काढला आणि ठरल्या दिवशी उमाऐवजी माझं दामोदररावांशी लग्न झालं. आम्ही रूपाने सारख्याच असल्याने आई, बाबा आणि तात्यासाहेबांच्या घराची मंडळी सोडून कोणाला काहीच कळले नाही .लग्नाच्या पहिल्याच रात्री यांनी मला सांगितल त्यांच उमावर खूप प्रेम आहे. ते मला पत्नीचा दर्जा नाही देऊ शकत. तात्यासाहेबांना विरोध करण शक्य नव्हत आणि घराण्याच्या अब्रूचा प्रश्न होता म्हणून त्यांनी माझ्याशी लग्न केल. मी कोलमडून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या चेहऱ्यावरची उदासी कोणालाही जाणवली की नाही काय माहित पण आमच्याकडे कामाला येणाऱ्या बयोच्या नजरेतून काही माझा उदास चेहरा सुटला नाही. अखेर तिच्यासमोर मी माझं मन मोकळ केल. तिने मला हिम्मत दिली.....नवऱ्याला जिंकण्यासाठी.
दिवस असेच सरत होते. यांच मन जिंकण्याचे माझे प्रयत्न चालू होते आणि यांचे उमाला शुद्धीवर आणायचे. दामोदर रावांना जवळ पडाव म्हणून त्यांच्या हॉस्पिटलजवळ तात्यासाहेबांनी एक नवीन घर बांधायचं ठरवलं होत. त्या घराच बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात आल होत. तात्यासाहेबांचा बराचसा वेळ त्यामुळे तिकडेच जायचा. घरात सतत माणसांचा असणारा राबता त्यामुळे जरा कमी झाला होता. अशातच संक्रांत आली. लग्नानंतरचा पहिलाच सण काळा सण असू नये म्हणून तो काही साजरा केला गेला नाही. दिवस असेच जात होते. माझ्या प्रयत्नांना म्हणाव तस यश काही येत नव्हत. हे माझ्याशी मोजकच बोलत होते. बयो मात्र मला हिम्मत देत होती. अशातच सासूबाई आजारी पडल्या. त्यांचा आजार थोडासा गंभीर होता. तात्यासाहेब सतत घराबाहेर त्यांच्या नेहमीच्या कामाबरोबरच घराच्या बांधकामाच्या कामात व्यस्त आणि हे हॉस्पिटलमध्ये. त्यामुळे घराची आणि सासुबाईंची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. एरवीचे करारी तात्यासाहेब पत्नीच्या आजाराने मात्र फार हळवे झाले होते. त्यातच तिला वेळ देता येत नसल्याच शल्य त्यांना टोचत होत. मी मात्र कुठलाही त्रागा न करता सगळी जबाबदारी पेलली. सासुबाईंची मनापासून सेवा केली. यांनी सांगितलेली सगळी औषधं वेळेवर देण, त्यांच पथ्य पाणी सांभाळणे यातच सारा दिवस जायचा. मला सगळ प्रेमाने आणि जबाबदारीने करताना बघून यांना आणि तात्यासाहेबांना मात्र माझं कौतुक वाटल. हे हळूहळू माझ्याशी मोकळेपणे बोलायला लागले. हॉस्पिटलमधल्या गोष्टी, गमती जमती सगळ काही सांगता सांगता मध्येच आपाली सुख दु:ख मला सांगू लागले. घरी आल्यावर हक्काने चहा मागू लागले. मी खूप आनंदात होते तेव्हा बयो म्हणाली अर्धी लढाई जिंकलीस आता अजून अर्धी बाकी आहे, अशीच हिम्मत ठेवलीस तर ती ही जिंकशील.
सासुबाईंची तब्येत हळू हळू सुधारत होती. त्याही माझ्यावर खुश झाल्या. एक दिवस यांच्यासमोर त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं, म्हणाल्या,"नशीब काढलस हो बाळा. अगदी लक्ष्मीसारखी बायको मिळालेय तुला,तिला जप हो."मला त्या त्यांची मुलगीच मानायच्या, म्हणायच्या मुलींची फार हौस होती हो मला पण नाही झाली मुलगी पण तुझ्या रूपाने मला माझी मुलगी मिळाली. सगळ काही सुरळीत होवू लागल होत. सासुबाईंच माझ्याशिवाय पानही हलत नसे. खूप जीव लावला होता त्यांनी मला. अशातच फाल्गुन आला. होळीच्या सणाच्या अगोदर गावातल्या महालक्ष्मीच्या देवळात एक उत्सव असे. त्या दिवशी मात्र देवीची पूजा सवाष्णीच्या हस्ते होत असे आणि तो मान तात्यासाहेबांच्या घराण्याचा होता. सासुबाईंनी त्या वर्षी तो मान मला दिला. मी खुप आनंदात होते. कधी एकदा हे घरी येतायत आणि मी हे यांना सांगते अस मला झालं होतं. पण हे त्या दिवशी आले ते चेहऱ्यावर उदासी घेऊनच. मला कळेनाच काय झालाय.रात्री खोलीत गेल्यावर बोलूया असा विचार करून मी शांत राहिले. आणि त्या रात्री त्यांनी मला सांगितला कि आज उमाने थोडी हालचाल केली मी खूप खुश झालो होतो ग पण तेवढ्यापुरतच. ती शुद्धीवर काही आली नाही. आनंदाच्या लाटेवर बसून हवेत तरंगणारी मी हे ऐकून भानावर आले. मनात विचार आला आजही हे उमावारच प्रेम करतात? मग मी कोण आहे. पण मनातले विचार मनात ठेऊन मी यांना म्हणाले, 'काळजी करू नका होईल सगळ नीट. देवीच्या देवळात उत्सवाच्या पूजेचा मान मला मिळालाय. खूप जागृत देवस्थान आहे म्हणे ते. मी उमासाठी प्रार्थना करेन." हे बोलून यांना तर मी धीर दिला पण मी मात्र मनातून पूर्णपणे कोलमडून गेले होते.
      पूजेच्या दिवशी माझ सजलेलं रूप बघून सासुबाईंनी तर माझी दृष्टच काढली म्हणाल्या साक्षात लक्ष्मी उभी आहे माझ्यासमोर. पण मला ज्यांच्याकडून कौतुकाचे शब्द ऐकायचे होते ते मात्र काहीच बोलले नाहीत. पूजेच्या दिवशी मी देवीला विनवणी केली, उमाच्या दीर्घायुष्यासाठी! मी खूप निराश झाले होते. बयोसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
   रात्री खोलीत गेल्यावर ह्यांनी मला विचारलं ,"तू खरच प्रार्थना केलीस उमासाठी?"
  मी फक्त होकारार्थी मान डोलावली.
  हे म्हणाले," तू खरच खूप मोठ्या मनाची आहेस. मला माफ कर मी तुझा अपराधी आहे."त्यांच्या त्या पाणावलेल्या डोळ्यात का कुणास ठाऊक मला माझ्यासाठीच प्रेम त्या दिवशी पहिल्यांदा दिसलं होत.
त्या दिवसानंतर सगळच चित्र बदललं. हे फारच उदास राहू लागले. माझ्याशी मोजकाच बोलू लागले. होळी, पाडवा, अक्षय तृतीया सारे सण रीतीनुसार पार पडत होते .आणि आम्ही दोघही उसन हसू चेहऱ्यावर आणून त्यात सामीलही झालो होतो. हळू हळू एका नविन चर्चेला वाट फुटत होती. लग्नानंतर प्रत्येकाला अपेक्षित असणाऱ्या गोड बातमीची चर्चा. हळदीकुंकू, पूजा अशा ठिकाणी गेल्यावर आडून आडून चर्चा होत होती. काहींजणी तर" असेल पण सांगत नसेल हो" अस म्हणून अंदाज बांधायचा प्रयत्न करीत होत्या. माझा धीर खचत चालला होता आणि अशातच वटपोर्णिमा आली. लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा!
   मनात येत होत का पूजा करू मी वडाची? पत्नीचा अधिकार न देणारा, पत्नी म्हणून स्वीकार न करणारा नवरा सात जन्मासाठी कसा मागू? पण मनातले विचार मनातच राहिले. पूजेच्या दिवशी देवाकडे एकच प्रार्थना केली, "देवा मला आता हे सार नाही सोसत. माझ्या सहनशक्तिचा अंत होत चाललाय. या साऱ्यातून माझी मुक्तता कर."
   देवाने माझी प्रार्थना ऐकली म्हणून का कोण जाणे पण संध्याकाळी बातमी आली उमा शुद्धीवर आल्याची. आई, बाबा सारेच खूप खुश झाले होते पण मला मात्र या बातमीवर हसावं का रडावं काहीच कळेना. पण बयोने मला आधार दिला म्हणाली, तुझी पूजा , तुझी आराधना फुकट नाही जाणार. विश्वास ठेव.
उमा जवळपास सहा महिन्यानंतर शुद्धीवर आली होती. पण अजूनही तिच्या जीवाचा धोका काही टळला नव्हता. तिला धक्का बसू नये म्हणून आमच्या लग्नाची बातमी तिच्यापासून लपविण्यात आली. असेच काही दिवस गेले. उमाची तब्येत आता झपाट्याने सुधारू लागली होती. ह्यांच्यातला आणि माझ्यातला संवाद फारच कमी झाला होता. अशातच श्रावण आला. सगळे सणवार, रितीभाती मी निभावत होते पण मनात मात्र विचारांचा गोंधळ चालू होता. त्या दिवशी श्रावणातल्या शुक्रवारची सवाशीण जेवायला बोलावली होती. पंचपक्वान्नाच जेवण करण्याच्या गडबडीत ह्यांचा डबा पाठवायला मी विसरले. सासूबाई म्हणाल्या," अग सवाशीणीला जेवायला वाढून जा तूच हॉस्पिटलात. उमेलाही बघून ये आणि आपलं नव घरही बघून ये आणि हो दामोदर बरोबरच मोटारीने ये हो. तेवढाच जरा लवकर येईल तो आज." मी होकारार्थी मान हलवली. आपल नवीन घर या वाक्यावर पुन्हा मनात विचारांच काहूर माजल.
    मला हॉस्पिटलच्या दाराशी सोडून गाडीवाला निघून गेला . तिथल्या एका नर्सने मला यांची बसण्याची खोली दाखवली. मी खोलीच दार उघडल तर यांच्या बाजूला उमा बसली होती आणि हे तिच्याशी बोलत होते. हे पाहिल्यावर मात्र मी पूर्णपणे खचले. डोळ्यातले अश्रू थांबवून कसबसं ह्यांना सांगितल,  "तुमचा डबा आणला आहे." क्षणभर उमेशी नजरानजर झाली आणि मी धावतच तिथून बाहेर पडले. बाहेर पाऊस मुसळधार बरसत होता. मी तशीच पावसात भिजत चालू लागले.
   माझ्या मागोमाग हे आले म्हणाले," सुनंदा थांब माझं ऐकून तरी घे."
    ह्यांनी मला त्यावेळी पहिल्यांदाच नावाने हाक मारली होती. त्यांची हाक ऐकून मी जागीच थांबले.
       हे धावतच माझ्याजवळ आले आणि म्हणाले,,"अग थांब अशी पावसात भिजू नकोस आजारी पडशील.,चल इथून", अस म्हणून मला जवळच्या आमच्या नवीन घरात घेउन गेले. याच खोलीत घेऊन आले होते ते मला. आम्ही दोघही ओलचिंब भिजलो होतो. माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू स्वतःच्या हाताने पुसून म्हणाले, सुनंदा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. कळलच नाही तू कधी आणि कशी आवडायला लागलीस. पहिल्यांदा जाणवलं ते उमा शुद्धीवर आल्यावर. पण मग ठरवलं आधी उमाला परिस्थितीची कल्पना द्यायची आणि मग तुझा पूर्णपणे स्वीकार करायचा, अगदी मोकळ्या मनाने. आज मी उमाला परिस्थितीची कल्पना दिली. ती खूप दुखावली म्हणून मी तिला समजावात होतो तेवढ्यात तू आलीस. आज मी पूर्णपणे तुझा आहे सुनंदा. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते फक्त आता ते आनंदाश्रू होते. याच खोलीत ह्यांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला. त्या दिवशी मी खऱ्या अर्थाने ह्यांची पत्नी झाले.
       संध्याकाळी ह्यांच्या मोटारीनेच आम्ही घरी आलो. माझ्या उमललेल्या चेहऱ्याकडे बघून सासूबाई म्हणाल्या, "आज तुला अस हसताना बघून मला फार आनंद झाला. किती कोमेजलेली दिसत होतीस." आणि मग ह्यांच्याकडे बघून म्हणाल्या, "जरा वेळ देत जा बायकोला. फार करते हो सगळ्यांसाठी, या घरासाठी, तिला जप हो.अशीच हसत राहु दे नेहमी."
  यावर हे म्हणाले, "हो आई, तू काळजी करू नको मी खूप जपेन हिला, अगदी फुलासारखं".
  मी लाजून आत पळाले. दुसऱ्या दिवशी मी बयोला हे सार सांगितल तिने तर माझी दृष्टच काढली.
दिवस असेच मजेत जात होते. सासुबाईंची तब्येतही बरीच सुधारली होती. आणि अशातच 'ती' गोड बातमी समजली. मी आई होणार होते. घरातली सगळी खूप खुश झाली. 'नव्या बाळाचे आगमन नव्या घरातच होईल', अस म्हणून तात्यासाहेबांनी सगळ्यांना सामानाची बांधाबांध करायला सांगितली. जवळचा चांगला मुहूर्त बघून तात्यासाहेबांनी नवीन घराची वास्तुशांत करून घेतली. आणि दुसऱ्याच दिवशी आम्ही तिथे रहायला गेलो. ह्यांनी आमच्यासाठी खोली निवडली होती. याच खोलीत आमच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली होती. याच खोलीत आमचा संसार फुलू लागला होता. आमची स्वप्न आकार घेऊ लागली होती. हे माझी खूप काळजी घेत असत. सुखाच्या चिंब वर्षावात मी न्हावून निघत होते. उमानेही डॉक्टरकीचा अभ्यास पुन्हा सुरु केला होता. हळूहळू सगळ सुरळीत होवू लागलं होत. असेच महिने सरले. अक्षय तृतीयेच्या दिवशी आम्हाला एक गोंडस मुलगा झाला. आम्ही त्याच नाव विनायक ठेवले. सगळे त्याला प्रेमाने विनू म्हणायचो. घरात सारेच खूप आनंदात होते. ह्यांच माझ्यावर आणि बाळावर खूप प्रेम होत. पण कसला माहिती नाही पण मला कुठलासा आजार जडला. त्यामुळे माझी काळजी घेण्यासाठी उमा आमच्याकडे रहायला आली. मला खर तर हे पटल नव्हत पण माझा नाईलाज होता. ह्यांच्यावर माझा खूप विश्वास होता तरीही उमाच्या येण्याने मला असुरक्षित वाटत होत. त्या प्रसंगानंतर आम्ही तशा दुरावल्या होतो. पण उमा मात्र सगळ विसरून माझी काळजी तर घेतच होती पण बाळाचही फार प्रेमाने करत होती. बाळाच्या जन्मानंतर जेमतेम दीड दोन महिने बाळ माझ्या कुशीत खेळल होत. त्यानंतर मात्र उमाकडेच असायचं. मला फार वाईट वाटे पण माझा नाईलाज होता. हे मात्र माझी समजूत घालत. म्हणत लवकर बरी हो मग तुझ बाळ तुझ्याच कुशीत असेल. अशातच सासुबाईंच्या भावाची तब्येत खालावाल्याची तार आली. मला अशा अवस्थेत सोडवून त्याना जाववेना पण त्यांचा नाईलाज होता. तात्यासाहेब त्यांना सोडायला म्हणून त्यांच्यासोबत गेले. त्यानंतर काहीच दिवसात माझी तब्येत जरा जास्तच खालावली. मला त्या जीवघेण्या वेदना सहन होईनात.
 ह्यांना माझे हाल बघवत नव्हते. मला बर करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत होते. मी मात्र खचत चालले होते. हळूहळू माझ्या अंगावर जखमा व्हायला लागल्या मला हालचाल करणेही शक्य होईना. उमा मात्र माझ सगळ करत होती. तिलाही माझे हाल बघवत नव्हते. मला उमेसाठी मनातून अपराधी वाटायला लागलं होत. माझ्यामुळे आणि बाळामुळे तिचा डॉक्टरकीचा अभ्यास पुन्हा अर्धवट राहिला होता.
तात्यासाहेब सासुबाईंना सोडून परत आले होते. त्या निदान अजून महिनाभर तरी तिथेच रहाणार होत्या. त्यांच्या धाकट्या भावाचे निधन झाले होते. माझी दिवसेंदिवस खंगत चाललेली प्रकृती बघून ह्यांनी माझ्यासाठी खास विलायतेतून डॉक्टर बोलावला होता. त्या दिवशी ते डॉक्टर आले आणि मला तपासताना ते काहीस इंग्रजीतून बोलत होते. काय बोलत होते मला काहीच कळत नव्हत. पण ह्यांना आणि बहुदा उमेलाही सगळ कळलं होत. त्या नवीन डॉक्टरांच्या सूचनेनुसार माझं पथ्यपाणी आणि ओषध चालू झाली. पण माझ्या वेदना काही कमी होत नव्हत्या. दिवसरात्र त्या वेदनेने तळमळत रहायचे. झोप नाही की शांतता नाही. त्या दिवशी श्रावणी शुक्रवार होता सवाशीण जेवायला घालून उमेने मला जेवण आणून दिले. तिची ओटी भरण्यासाठी तयार केलेल्या ताटाला मी हात लावला आणि उमेने ते ताट सवाशिणीला नेऊन दिले. जेवायची इच्छाच नव्हती. माझं डोक प्रचंड दुखत होतं. कसेबसे चार घास खाल्ले. सवाशीण गेल्यानंतर उमा माझ्या खोलीत आली आणि मला कसलस इंजेक्शन दिल. मग मात्र मला शांत झोप लागली ती कायमचीच. माझ्या खूप उशीरा लक्षात आलं, माझ्या बहिणीनेच माझा घात केला होता. पण त्याबद्दलही माझी काही तक्रार नव्हती. तिने जीवघेण्या वेदनेतून माझी मुक्तता केली होती. माझ्या मृत्यूच्या बातमीने हे अगदी सैरभैर झाले. तात्यासाहेबांनी मात्र हा प्रसंगही अतिशय विचारपूर्वक हाताळला. सासुबाई नुकत्याच गंभीर आजारातून सावरल्या होत्या. त्यात त्यांच्या धाकट्या भावाच्या निधनाने त्या पूर्णपणे खचल्या होत्या. अशा परिस्थितीत माझ्या मृत्यूची बातमी त्यांच्यापर्यंत पोचली तर त्या हा धक्का सहन करू शकणार नाहीत. म्हणून तात्यासाहेबांनी त्यांच्या विश्वासातल्या ब्राह्मणाकडून कोणालाही कळू न देता माझं क्रियाकर्म उरकलं. सासूबाई यायच्या आत त्यांनी माझ्या आई वडिलांना विश्वासात घेऊन परिस्थितीची कल्पना दिली आणि त्यांच्या संमतीने ह्यांचा आणि उमेचा विवाह अतिशय गुप्तपणे पार पाडला. लग्नाच्या वेळी उमेने तात्यासाहेबांकडून एक वचन घेतलं होत, ती विनूची खरी आई नाहीये हे ते त्याला कधीही कळू देणार नाहीत किंवा त्याला कळेल अस काहीही वागणार नाहीत आणि असा कोणताही निर्णय कोणत्याही परिस्थितीत ते तिच्यावर लादणार नाहीत. नियतीचे फेरे उलटे फिरले होते. ज्या तात्यासाहेबांनी उमेच्या जागी लग्न मंडपात मला उभं केल होतं त्यांनीच आज माझी ओळख उमाला दिली होती. ह्यांनी काही उमेचा पत्नी म्हणून स्वीकार केला नाही. शिवाय या खोलीत यायलाही तिला मनाई केली. माझ्या निधनानंतर हे पूर्णपणे खचले होते. फक्त विनूकडे बघूनच ते दिवस काढत होते. या खोलीत येऊन ते तसबिरीतल्या सुनंदेशी बोलत बसत. माझा आत्मा तळमळत होता. ह्यांची अवस्था मला बघवली नाही. त्या दिवशी न रहावून मी यांच्यासमोर गेले. ह्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण हे माझं काहीच ऐकत नव्हते. मला म्हणाले, "तू या जगात येऊ शकत नसशील तर मी तुझ्या दुनियेत येतो.मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत."
 मी रोजच ह्यांना भेटू लागले ह्यांना समजाविण्यासाठी! आणि हे मी भेटते म्हणून याच खोलीत दिवस घालवू लागले.                    तात्यासाहेबांना ह्यांच्या वागण्यातला बदल जाणवला त्यांना ह्यांच वागणं वेडेपणाचा वाटलं आणि परिस्थितीची कल्पना आल्यावर त्यांनी या खोलीला कुलूप लावलं. ह्यांनी खूप त्रागा केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. काही दिवसानंतर सासूबाई परत आल्या पण त्यांची तब्येत पुन्हा खालवली. त्यांच सगळ जागेवरच कराव लागे. उमा बाळाच सगळ सांभाळून त्यांचीही काळजी घेत होती.
उमा आता सगळ्या सणांना ह्यांची पत्नी आणि विनूची आई म्हणून मिरवत होती. माझी ओळख तिला मिळाली होती. एके दिवशी कसलीशी कागदपत्र शोधताना ह्यांना उमेच्या कपाटात तिने मला दिलेल्या इंजेक्शनची बाटली दिसली. ती बघून हे संतप्त झाले.त्यांनी उमेला जाब विचारला आणि म्हणाले, "म्हणजे तू मारलस माझ्या सुनन्देला? अग चांडाळणी का केलस असं? माझा सगळा पैसा सगळी विद्या पणाला लावली असती आणि बर केलं असतं मी तिला.पण तू सारच संपवलंस. स्वतःच्या सख्या बहिणीचा जीव घेतलास? कुठे फेडशील हे पाप? जा इथून निघून जा. माझ्या नजरेसमोरून चालती हो."
   उमेने ह्यांना समजविण्याचा खूप प्रयत्न केला पण ह्यांनी तिचं काहीच ऐकल नाही. हा धक्का ह्यांना सहन झाला नाही. ह्यांनी तात्यासाहेबांकडे जाऊन कुलपाची किल्ली मागितली. सुरुवातीला त्यांनी नकार दिला पण ह्यांच्या दुखाचा आवेग बघून अखेर नाईलाजाने त्यांनी ती किल्ली दिली. हे खोलीत येऊन माझ्याजवळ बसून खूप रडले आणि म्हणाले, "सुनंदा मला नाही राहायचं आता या निष्ठूर जगात. मला तुझ्याजवळ यायचय."
   मी ह्यांना विनूची आठवण करून दिली आणि म्हणाले, "अहो, आई नाही निदान त्याचे वडील तरी त्याच्याजवळ असूदेत अगदी आयुष्यभर."
    पण हे माझं काहीच ऐकायला तयार नव्हते. त्यांच्या दुखाचा आवेग कमी होत नव्हता. तात्यासाहेबांनी हा सारा प्रकार बघून ह्याना खोलीच्या बाहेर न्यायचा खूप प्रयत्न केला पण हे तयार झाले नाहीत आणि या साऱ्या प्रकारातच ह्यांनी या खोलीतच आपले प्राण सोडले. ह्यांच्या निधनामुळे तात्यासाहेब मात्र पूर्ण खचले. हे माझ्याजवळ आले होते अगदी कायमसाठी. मला म्हणाले, "चल आपण दोघही पुढच्या प्रवासाला निघूया." पण माझा जीव मात्र माझ्या मातृत्वाच्या प्रेमासाठी तडफडत होता. मी ह्यांना नकार दिला आणि सांगितल," जोपर्यंत माझ्या विनूशी माझी भेट होत नाही तोपर्यंत मी पुढच्या प्रवासाला येणार नाही."
    हे सुद्धा फार हट्टी. मला म्हणाले, "आता मी काही तुला सोडून कुठे जाणार नाही. एकत्र फारस जगू नाही शकलो निदान आता मृत्यूनंतरचा प्रवास तरी एकत्र करूयात."
    ह्यांची दिवसकार्य उरकल्यावर घर आवरताना झाडलोट करण्यासाठी उमा बयोबरोबर या खोलीत आली होती. मी तिच्यासमोर येऊन तिला विनवले आणि म्हणाले, "फक्त एकदा माझ्या विनूला माझ्याजवळ दे. मरणापूर्वी त्याला जवळ घ्यायची खूप इच्छा होती माझी. मला दुसर काही नको फक्त माझ्या विनूला माझी; त्याच्या खऱ्या आईची ओळख कळूदे." उमाने मात्र ठामपणे नकार दिला आणि ही खोली कायमची कुलूपबंद झाली.
          त्या दिवशी तात्यासाहेबांच्या परिचयाचे कोणी केशव भटजी त्यांना काशीहून भेटावयास आले होते. त्यांना या घरात काही वेगळे जाणवल्याचे त्यांनी तात्यासाहेबांना बोलून दाखविले. तात्यासाहेबांनीही कसलाही आडपडदा न ठेवता सारी हकीगत केशवभटांना सांगितली. ते या बंद खोलीजवळ आले आणि खोली उघडण्यास सांगितले. खोलीत आल्यावर त्यांना सारे काही समजले. त्यांनी उमेकडे बघून म्हटले, "तुमच्या सुनेची आणि पर्यायाने मुलाचीही मुक्ती हिच्याच हातात आहे." उमेने मात्र ठाम नकार दिला. वचनात अडकलेले तात्यासाहेब हतबल होते. केशवभट गंभीरपणे म्हणाले," तात्यासाहेब तुमची सुनबाई फार सात्विक होती, पुण्यवान होती. तिचं निधनही श्रावणातल्या शुक्रवारी झालय, ती कोणालाही त्रास देणार नाही पण तिची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय इथून जाणारही नाही. तुम्हाला ही खोली बंद ठेवायची तर ठेवा. पण श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारच्या आधी ही खोली झाडून स्वच्छ करा अगदी एखाद्या सणाला अथवा नवपरिणीत दाम्पत्याची असते तशीच ही खोली सजवून ठेवा आणि शुक्रवारच्या देवीच्या नेवैद्याबरोबरच या खोलीतही नेवैद्याच ताट ठेवा.पण हे काम फक्त तिच्या खास मर्जीतली व्यक्तीच करू शकते. कोणी आहे का अस?" केशवभटांच्या या प्रश्नावर तात्यासाहेबांसमोर फक्त एकच नाव आलं ते म्हणजे बयोच. तेव्हापासून बयो प्रत्येक श्रावणी शुक्रवारच्या आधी येऊन खोली सजवून जाते. मला बाकी काही नको फक्त मला माझ्या विनूला आणि आता त्याच्या नांदणाऱ्या गोकुळाला एकदा डोळे भरून पहायच आहे. विनूच्या तोंडून आई अशी हाक ऐकायची आहे. माझ्यासाठी एवढ कर बाळा आणि मला मुक्त कर".
पूर्वीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू ओघळत होते . हे सारच तिच्यासाठी अकल्पित होत. या खोलीतली स्त्री सुनंदा म्हणजे तिच्या खऱ्या आजेसासूबाई आहेत आणि तिच्या आताच्या आजेसासूबाई म्हणजे ह्या स्त्रीची जुळी बहिण उमा आहे, हे आत्तापर्यंत तिच्या लक्षात आल होत. तिच्या आजे सासूबाई करारी होत्या पण खूपच चांगल्या होत्या. सगळ्यात महत्वाचे म्हणजे विनायाकरावांच्या म्हणजेच तिच्या सासऱ्यांच्या बाबतीत त्या खूप पझेसिव्ह होत्या. आदित्यच्या आईच्या म्हणजेच तिच्या सासूबाईंच्या बोलण्यातून आणि एकंदरीतच त्यांच्या वागण्यातून हे तिला अनेकदा जाणवलं होत. शिवाय तिच्या सासऱ्यांचही त्यांच्या आईवर फार प्रेम होतं. त्यांना हे सगळं सांगण म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारख होतं. पूर्वीला ह्या स्त्रीबद्दल म्हणजेच सुनंदाबद्दल खूप वाईट वाटत होतं. तिच्याबद्दल सहानुभूतीही वाटत होती. पण हे वचन देणं म्हणजे तिच्या भरल्या घरात वादळ निर्माण करण्यासारख होतं .आणि जर ते दिल नाही तर याच खोलीत अडकून पडण्याची भीती. शिवाय तिने हे सारं सांगितल्यावर घरातलं कोणीही तिच्यावर विश्वास ठेवायला तयार झालं नसत,अगदी आदित्यसुद्धा. पूर्वी आता धर्मसंकटात अडकली होती. कुठून आपण या खोलीत आलो असा तिला आता वाटू लागलं होतं.
"कसला विचार करतेयस बाळा?" अचानक आलेल्या या प्रश्नाने पूर्वी भानावर आली आणि सुनंदाला म्हणाली," तुम्ही जे वचन मागताय ते देणं खूप कठीण आहे. या साऱ्यामुळे माझ्या घराची बसलेली सगळी घडी विस्कटून जाईल. त्यातूनही मी जरी हे करायचं ठरवलं तरी माझ्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही."
"घाबरू नकोस बाळा मी तुला इथे ठेऊन घेणार नाही फक्त एवढच सांगते तू सुद्धा एक आई आहेस, फक्त एकदा माझ्या जागी स्वतःला ठेऊन बघ आणि मग तुझा निर्णय तू घे."       सुनंदाच्या या बोलण्याने मात्र पूर्वी पुन्हा विचारात पडली. तिच्या डोळ्यासमोर क्षणात स्वरा आणि साहिल आले. वास्तवाच भान आलं.
    आपण इतका वेळ एका मृत व्यक्तीशी बोलत होतो या जाणीवेने ती दचकली. तिची अवस्था बघून सुनंदा म्हणाली, "जा बाळा दरवाजा उघडा आहे."
      पूर्वीने दाराकडे बघितले, दार खरोखरच उघडलेल होत. पूर्वी पळतच दाराकडे गेली पण अचानक दारातच थांबली आणि मागे वळून सुनंदाकडे बघून ठामपणे म्हणाली, "मी तुम्हाला वचन देते आजी तुमची इच्छा मी लवकरच पूर्ण करेन."
पूर्वी दाराबाहेर आली तिने दाराला कुलूप घालून किल्ली जागेवर नेऊन ठेवली आणि देवघरातल्या देवाला नमस्कार करून तिच्या वचनपूर्तीसाठी आशीर्वाद मागितले. संध्याकाळी तयार होऊन पूर्वी तिच्या नणंदेच्या; रमाच्या घरी पूजेसाठी गेली. स्वरा आणि साहिलला बघून तिच मन भरून आल. दोघही आई अस आनंदाने ओरडत तिला बिलगली. या साऱ्या प्रेमाच, स्पर्शाच एक नव रुप आज ती प्रथमच अनुभवत होती. तिचे डोळे भरून आले. तिने या साऱ्या सुखासाठी देवाचे आभार मानले.
     रात्री घरी आल्यावर तिने आदित्यला सारे काही सांगितले. आदित्यने शांतपणे कपाटातली एक  टॅबलेट काढली व तिच्यासमोर धरून म्हणाला, "पूर्वी ही टॅबलेट घे आणि शांत झोप, खूप जणांना स्ट्रेसमुळे असे वेगवेगळे भास होतात हे भास ते वास्तव मानू लागतात आणि शेवटी वेडे होतात IT इंडस्ट्रीत जॉब करणारयांच प्रमाण त्यामध्ये जास्त आहे. तुझही बहुदा तसच झालय."
     "आदी मी वेडी नाहीये",पूर्वी चिडून म्हणाली.
  आदित्यने मात्र तिच्याकडे दुर्लक्ष केल. पूर्वी खूपच वैतागली. तिला समजून घेण्याऐवजी तो तिला वेड ठरवायला निघाला होता. " उगाच बोलले मी याच्याशी, असल्या गोष्टीवर आदित्य सहजासहजी विश्वास ठेवणार नाही हे मला आधीच कळायला हव होतं. एकतर हा डॉक्टर आणि त्यात बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचारांवर ठाम असणारा हा हि गोष्ट सहजी मान्य करणार नाही ", पूर्वी स्वताशीच म्हणाली.
   दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्वी तिचे सासरे विनायकराव मॉर्निंग वॉकला गेल्यावर सासूबाईना भेटायला त्यांच्या खोलीत गेली. पूर्वीने त्यांना सारी हकीगत सांगितली पण यावर त्या गंभीरपणे म्हणाल्या, "पूर्वी तू सांगतेस त्याच्यावर विश्वास ठेवण कठीण आहे आणि जरी मी तुझ्यावर विश्वास ठेवला तरी तू जे म्हणते आहेस ते करणे शक्य नाही. सासुबाईंनीमुळेच मी नोकरी करू शकले. त्यांनी रमा आणि आदित्यला सांभाळून त्यांच्यावर चांगले संस्कार केले. हा त्या ह्यांच्याबाबातीत पझेसिव्ह असल्यामुळे मला त्याचा थोडा त्रास झाला पण म्हणून त्यांनी माझ्यासाठी केलल मी नाकारू शकत नाही. झालं गेलं गंगेला मिळालं.तू ही सगळ विसरून जा".
        पूर्वीची दुसरी आशाही संपली. पण पूर्वी गप्प बसणार नव्हती. शुक्रवारसाठी अजून तीन दिवस बाकी होते. तिने शांतपणे विचार केला. दोन दिवस ती या विषयावर कोणाशीच काही बोलली नाही. गुरुवारी रात्री जेवणाच्या टेबलावर तिने सगळ्यांना सांगितले "उद्या सकाळी ११.३० वाजता प्लीज सगळ्यांनी घरात थांबा कितीही महत्वाचं काम असेल तरी ते कॅन्सल  करा. मला एक महत्वाची अनाऊन्समेंट करायची आहे. मी रमा ताईलाही बोलावलं आहे. कृपया आता मला या विषयावर कोणीही काहीही विचारू नका. मी काहीही सांगू शकणार नाही". पूर्वीचं हे बोलणं ऐकून सगळीच आश्चर्यचकित झाली.    
      जेवण झाल्यावर सगळी आपआपल्या खोलीत गेल्याची खात्री झाल्यावर पूर्वी तिच्या आजेसासूबाईंच्या खोलीत गेली. पूर्वीने विचारले,  "आजी येऊ का आत?".
 "पूर्वी आज तू माझ्या खोलीत कशी काय?"आजीनी आश्चर्याने विचारले.
  "आजी आमच्या कंपनीमध्ये पुढच्या आठवड्यात ट्रॅडिशनल ड्रेस घालून यायचं ठरलय. तुमच्याकडे एखादी भरजरी नऊवारी साडी असेल तर मला द्याल का?"
    यावर मात्र आजेसासूबाई जरा दचकल्या पण स्वतःला सावरत म्हणाल्या, "नाही ग पूर्वी ह्यांच्या निधनानंतर मी फक्त साध्या सुती साड्याच वापरल्या."
    "एखादी असेल तर आठवा ना तुम्हाला कोणी दिलेली, तुमच्या सासूबाइनी किंवा अजून कोणी?" पुर्वीने विचारले.         "नाही ग नाहीये माझ्याकडे", अस म्हणून आजीनी तिला टाळायचा प्रयत्न केला.
    पूर्वीने हिम्मत सोडली नाही. "आजी आपल्या घरात कोणी जूळ होतं का? सहजच विचारलं. मला मैत्रिणी म्हणतात तुझ्या माहेरी जुळ्यांचा इतिहास नाही मग सासरी तरी असेल अन्यथा तुला जुळी मुलं कशी काय झाली?"पूर्वी.
      तिच्या या प्रश्नावर मात्र तिच्या आजेसासूबाई पूर्ण दचकल्या. कसबस स्वतःला सावरत म्हणाल्या,"नाही अस काही नाही"
     खरं सांगताय का तुम्ही आजी? सॉरी आजी म्हणू कि मावशी आजी?"
  पूर्वीच्या या बोलण्यावर मात्र तिच्या आजेसासूबाई खूपच गोंधळल्या. पूर्वीने अतिशय हुशारीने विषयाला हात घातला होता. "मला सगळ कळलय उमा आजी. " पूर्वी आत्मविश्वासाने म्हणाली.
  आजेसासूबाईना मात्र खूप मोठा धक्का बसला. त्या शांत झाल्या. "तुम्ही सगळी रमा ताईंकडे पूजेला गेला होतात तेव्हा मी ती खोली उघडली होती.  तिथे मला सुनंदा आजी भेटल्या. आदिच्या खऱ्या आजी त्याच्या बाबांच्या खऱ्या आई."
   पूर्वीने सारी हकीगत त्यांना सांगितली. आजी आता पूर्णपणे हतबल झाल्या होत्या. या साऱ्यावर काय बोलावे त्यांना काहीच कळत नव्हते. "आजी उद्या सकाळी सगळी ११.३० वाजता घरात एकत्र जमतील, मी बयोलाही बोलावलं आहे. त्यावेळी तुम्ही सगळ्यांसमक्ष त्या खोलीच दार उघडणार आहात आणि हो आता इथे आपलं जे काही बोलणं झालं ते तुम्ही कोणालाही सांगणार नाही. तुम्हाला स्वरा आणि साहिलची शपथ आहे." अस बोलून पूर्वी तिच्या खोलीत निघुन गेली. तिला खात्री होती स्वरा आणि साहिलची शपथ घातल्यावर आजी कोणाशीही काहीही बोलणार नाहीत. कारण स्वरा आणि साहिलवर त्यांच प्रचंड प्रेम होतं. रात्रभर पूर्वीला झोप लागली नाही.
दुसऱ्या दिवशी पुर्वीने लवकर उठून सगळा नेवैद्य करून ठेवला. स्वरा आणि साहिल शाळेत गेले. अखेर ठरल्याप्रमाणे सगळी एकत्र जमली. पूर्वी आजेसासूबाईना घेऊन आली.      "पूर्वी काय आहे कशासाठी बोलावलं आहेस? रमाने तिला विचारले."
 "आजी आज आपल्याला त्या कुलपबंद खोलीत घेऊन जाणार आहेत." पूर्वी शांतपणे म्हणाली. आदित्य काही बोलणार तेवढ्यात बयो आली आणि आजीनी खोली उघडली. नेवैद्याच ताट त्या खोलीत ठेवून आजी तिथेच बाजूला उभ्या राहिल्या.त्या खोलीबद्दल सगळ्यांच्याच मनात एक सुप्त आकर्षण होत. सर्वजण खोलीत गेले आणि खोलीच निरीक्षण करू लागले. जसे भास पूर्वीला झाले तसेच साऱ्याना होत होते. खोलीच वातावरण खूप गूढ होतं. तेवढ्यात एक गार वाऱ्याची झुळूक आली .आणि खोलीच दार अचानक बंद झाल. आता मात्र सगळेच घाबरले. आजी मात्र शांतपणे उभ्या होत्या. आदित्यला हा सगळा प्रकार बघून खूप आश्चर्य वाटले.त्याला पूर्वीचे बोलण आठवायला लागल.
  "प्लीज कोणीही घाबरू नका फक्त मी सांगते ते सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्या", असं म्हणून पूर्वीने सगळी हकीगत सांगितली. ती तसाबिरही दाखवली. विनायकराव हे सारं ऐकून स्तब्ध झाले. इतक्यात सुनंदा त्यांच्यासमोर आली आणि त्यांच्या तोंडातून अचानक आई असा शब्द बाहेर आला. सुनंदाला खूप आनंद झाला. विनायकरावांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांनी सुनंदाच्या पायावर डोकं ठेवल. सुनंदाला खूप आनंद झाला ती पुर्वीजवळ जाऊन म्हणाली,"तू तुझा शब्द पाळलास आज मी मुक्त झाले आता मी पुढच्या प्रवासाला जायला मोकळी झाले".
     "थांब सुनंदा", पूर्वीच्या आजेसासूबाई खड्या आवाजात म्हणाल्या. ते ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. "तुम्ही सुनंदेची कहाणी ऐकलीत आता उमाचीही बाजू ऐका. तू ही ऐक सुनंदा आणि मला माहितेय हे सुद्धा इथेच आहेत त्यांनाही ऐकायला सांग. मला मान्य आहे मी सुनंदाला मरणाच इंजेक्शन दिल पण तसं करून मी तिचा घात केला नाही. ते करताना मला किती यातना झाल्या ते माझं मलाच माहितेय. पूर्वी, सुनंदाला असा आजार झाला होता ज्याचा इलाज इतक्या वर्षानंतर आजही डॉक्टरांना सापडलेला नाही. ब्लड कॅन्सर झाला होता तिला. त्यातून वाचण्याचा कोणताही मार्ग नव्हता. विलायतेतून आलेल्या डॉक्टरांनी फक्त मला सांगितले होते कि ज्या दिवशी सुनंदाच्या डोक्यात जखम दिसेल त्या दिवशी तिला हे इंजेक्शन दे कारण त्यानंतरच्या वेदाना ती सहन करू शकणार नाही आणि ती कधीही बरीही होऊ शकणार नाही. सुनंदा अग मी तर २४ तास तुझ्या आणि बाळाच्या सेवेत असायचे मी कुठून आणणार ते इंजेक्शन? एवढा साधा विचारही तुम्ही केला नाहीत? फक्त तात्यासाहेबांना ही गोष्ट माहिती होती. आम्ही विनूच्याही सगळ्या तपासण्या करून घेतल्या सुदैवाने त्याचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल होते. हे तर काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुनंदा मी तुझी जागा घेतली नाही. ती माझीच जागा होती. नियतीने ती माझ्यापासून हिरावून घेतली आणि तुझ्या पदरात टाकली. तरीही मी शांत होते. डॉक्टर होऊन समाजसेवा करायची हे एकच ध्येय मनात ठेवून मी जगत होते पण ते ही जमल नाही. सुनंदा तुझ्या खोलीत बाळाला नेऊ नकोस अस खुद्द डॉक्टरांनीच मला सांगितलं होत. हा रहाता राहिला प्रश्न मातृत्वाच्या अधिकाराचा तर मी मान्य करते की या बाबतीत मी तुझ्यावर अन्याय केला. पण माझ्या आयुष्यात विनूशिवाय काहीच नव्हत. माझा मेडिकलचा अभ्यास अर्धवट राहिला होता. अपघातात मातृत्व गमावल्याने कोणीही माझ्याशी लग्न केलं नसत. मी हयाच्याशी लग्नाला तयार झाले पण फक्त विनूसाठी. ह्यांनी मला लग्नाच्या पहिल्या रात्रीच अव्हेरल अर्थात मला त्याचा अंदाज होताच. मी फक्त विनूसाठीच जगत होते आणि मला कुठल्याही परिस्थितीत त्याला गमवायच नव्हत म्हणून त्याला गमावण्याची प्रत्येक शक्यता मी मुळापासून उपटून टाकली. मी तुझी जागा घेतली नाही सुनंदा नियतीने माझ्यापासून हिरावून घेतलेली माझी जागा मला परत दिली. पण ते देताना माझ अस्तित्वच माझ्यापांसून हिरावून घेतलं." अस म्हणून उमा ढसाढसा रडू लागली.
    "रडू नकोस आई. कोणी काहीही सांगितलं तरी तुच माझी आई आहेस. मी तुला सोडून कुठेच जाणार नाही. तू कधी चुकीची असूच शकत नाहीस आई."विनायकराव आईला समजावण्याच्या सुरात म्हणाले.
    सगळ्यांच्याच डोळ्यात आसवं जमा झाली होती. "आजी मला माफ करा मी तुम्हाला खूप चुकीचं समजले", पूर्वी रडत म्हणाली.
   "नाही बाळा यात तुझा काही दोष नाही. उलट आज तुझ्यामुळे इतके दिवसाच डोक्यावरच ओझ उतरलं " आजी म्हणाल्या.
    "उमा मला माफ कर मी तुला खूप चुकीच समजले. तू खूप केलस माझ्यासाठी, विनूसाठी, या घरासाठी. पण मी तुला कधी समजूनच घेतलं नाही. तू खूप मोठ्या मनाची आहेस उमा. खर तर माझीच चूक आहे. मिच अडकून पडले. कृष्णाची माता म्हणून आजही लोक देवकीच्या आधी यशोदेचाच उल्लेख करतात, हे मला कळायला हवं होतं. पण आता मला जायला हवं हे केव्हाचे खोळंबलेत माझ्यासाठी", अस बोलून सुनंदा दिसेनाशी झाली. ती खोली आज पूर्णपणे कुलूपमुक्त झाली होती. पण जे काही घडल ते सगळ्यांसाठीच अकल्पित होतं.

©मानसी जोशी






















Sunday, 4 September 2016

कथा - फेसबूकमॅनिया

फेसबूकमॅनिया

कोकणातल्या एका गावात एक सदानंदराव नावाचे सद्गृहस्थ रहात होते. कोकणात असतं तसं मोठं कौलारू घर, मागच्या दारी नारळा पोफळीच्या बागा आणि दूरवर नजर जाईपर्यत दिसणारी आंब्याची बाग. या सगळ्या वैभवाचे ते एकटेच मालक. कोकणात दिसते तशी भाऊबंदकी यांच्या वाट्याला कधी आली नाही. शिवाय चांगली सरकारी नोकरी. लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही यांच्यावर खुश होत्या. लोकं त्याना अण्णा म्हणत.  तर अशा या अण्णानी व्हीआरएस घेतली. घरी दारी सतत गडी माणसांचा राबता. बागेतही कामाला बारा महिन्याचे गडी ठरलेले.  ऑफिसमध्ये सतत कामाची सवय असणाऱ्या अण्णांचं मन काही घरात रमेना. सहाजिकच त्यांची चीडचीड वाढली. या साऱ्याचा परिणाम म्हणजे गडी माणसे तर वैतागलीच पण त्यांची  बायकोही कंटाळली. ऑफिसला जात होते तेच बरं होतं असं काहीसं पुटपुटत बसायची. त्यांच्या कॉलेजला शिकणाऱ्या मुलाचा तर त्यांनी जीव नकोसा करून टाकला होता.
      एक दिवस त्यांचा मोबाईल हौदात पडला आणि त्याने मान टाकली. पण त्यांच्या कॉलेजकुमार मुलाने मात्र या संधीचा फायदा उठवत आपला स्मार्टफोन त्यांना देण्याचा मोठेपणा दाखवला. अण्णांना सुरुवातीला हा स्मार्टफोन काही वापरता येईना . चिरंजीव येथेही मदतीला धावाले. फोन वापरायला तर शिकवलाच शिवाय व्हॉट्स ॲप, फेसबुकची ओळख पण करून दिली. अण्णा खुश झाले. त्यांना हे व्हॉट्स ॲप, फेसबुक फारच आवडले. चिरंजीवानी संधी साधून नवीन फोनची डिमांड केली आणि खुश झालेल्या अण्णानी ती लगेच पूर्णही केली. अण्णाना फेसबुक मात्र फारच आवडले. सहाजिकच मोबाईल डेटा पुरेना त्यामुळे घरात इंटरनेट आले. चिरंजीव  सुखावले, गडी माणसेही कटकट बंद झाल्याने खूश झाली. अण्णाची बायको तर फेसबुकला देवच मानू लागली. एकंदरीतच सगळी सुखावली.
      अण्णांनी फेसबुकवर एक ग्रुप तयार केला. त्या ग्रूपवर ते काही बाही लिहू लागले. मुळात हुशार असणाऱ्या अण्णांचे लेखनकौशल्यही अगदी उत्तम होते. त्यांचे लेख खूप जणांना आवडू लागले. शेअर होऊ लागले. हळूहळू अण्णांच्या ग्रूपमध्ये मेम्बर्सची संख्या वाढत गेली. त्यात तरुण तरुणींचीही संख्याही लक्षणीय होती. अण्णांची लोकप्रियताही वाढत होती. असंच वर्ष सरलं. अण्णांचा मुलगा शिक्षणासाठी मुंबईला निघून गेला. घरात काही मदत लागली तर ती करणारा मुलगा मुंबईला गेल्याने अण्णांच्या बायको बिचारी एकटी पडली. हाताशी मदतीला कोणीच नव्हते.  त्यात अण्णा सदानकदा मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेले. बिचाऱ्या मनातल्या मनात मोबाईल आणि फेसबुकला शिव्यांची लाखोली वाहत असत. कालचा देव त्यांना आज दानव वाटू लागला. अण्णा वयाने मोठे असल्याने आणि फेसबुक ग्रूपमध्ये लोकप्रिय असल्याने अनेक तरुण तरुणी मेसंजरवर आपले प्रोब्लेम्स त्यांच्याशी शेअर करत, सल्लेही मागत. अनेकांच्या प्रेमकथा अण्णांना ठाऊक होत्या. अण्णांनी ग्रूपचे संमेलनही भरावले. त्यात मात्र त्यांच्या पत्नीला मिरवायला मिळाले. पण अण्णांभोवती पडलेला तरुणींचा गराडा बघून मात्र त्या संतापल्या आणि घरी गेल्यावर ब्रम्हास्त्र काढलं (आता ते कोणतं हे काही सांगायची गरज नाही).
    अण्णांचा फेसबुकवरचा वावर कमी झाला. पण अण्णांना काही चैन पडेना. ते चोरून लपून शक्य तेव्हा फेसबुक चेक करायचे. हळूहळू रात्री पत्नी झोपाल्याची खात्री करून निर्धास्तपणे फेसबुक  वापरू लागले. काही दिवसाने त्यांच्या मुलाने त्यांना कॅम्पसमधून सिलेक्शन झाल्याची बातमी दिली व कॉलेज मधलीच एक मुलगी पसंत केल्याचेही घाबरत घाबरत सागितले. हा धक्का पचातोय न पचातोय तोच दोन दिवसात तिला घरी घेऊन येत असल्याचेही सांगितले. अण्णांच्या पत्नी तर डोक्याला हात लावून बसल्या.
    "मुलगी कोकणस्थ असेल का हो?' सौभाग्यवतीच्या या प्रश्नावर अण्णा उखडलेच.
  "अग कोकणस्थ कुठली घेऊन बसलीस आपल्या धर्मातली असली तरी खूप झालं." अण्णा गरजले.       "काय???.........." सौभाग्यवतीना रडू आवरेना.
    दोन दिवस स्मशान शांततेत गेले. अण्णांनी दोन दिवसात फेसबुकला हातही लावला नाही. अखेर दोन दिवसांनी अण्णांचे  चिरंजीव एका हाफ पॅन्ट घातलेल्या तरुणीला घेऊन आले. तिला बघून तर अण्णांच्या पत्नीने तोंडाला पदर लावला. "हे आमचे अण्णा ...चिरंजीवांनी ओळख करून दिली.
    "तुम्ही xxxx ग्रुपचे ॲडमिन सदानंदराव ना? त्या तरुणीने विचारताच सगळ्यांचेच डोळे विस्पारले. सौ नी तर अण्णांकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला.
  अण्णांनी होकारार्थी मान हलवली.
   "wow........thats great ". मला तुम्हाला भेटायची खूप उत्सुकता होती. तुमचं प्रोपिक बघितलेलं असल्यामुळे मी आज तुम्हाला चटकन ओळखल. मी संमेलनाला पण नाही येऊ शकले."
 ती तरुणी उत्साहात बोलत होती. बोलता बोलता अण्णांच्या चिरंजीवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, "डार्लिंग यांच्यामुळेच आपल जुळलं .....तुला पटवायचे सगळे सल्ले यांनीच मला दिले....
   परत अण्णांकडे बघत म्हणाली ,"मी तुम्हाला परवा रात्रीपासून किती मेसेजेस केले. हे सांगायला की मी आज माझ्या बॉयफ्रेंडच्या घरी जाणार आहे. मला काही टिप्स हव्या होत्या तुमच्या. पण दोन दिवस तुम्ही ऑनलाईन आलाच  नाहीत. खूपच अपसेट झाले होते मी. but ......I am so happy now . ohh  God I cant believe its you .......तुम्ही माझे  "फादर इन लॉ" होणार...........हाऊ स्वीट! असं म्हणत त्या तरुणीने चित्कारत अण्णांना जवळपास मिठीच मारली.
   थोबाडीत मारल्यासारखी अण्णांची अवस्था झाली होती . सौभाग्यवतीच्या नुसत्या जळजळीत कटाक्षाने अण्णांचं अंग होरपळून गेलं. याक्षणी त्या अण्णाना पारावरच्या जखिणीप्रमाणे भासत होत्या. चिरंजीव मात्र बिचारे  या साऱ्याकडे आवासून बघत राहिले.

©मानसी जोशी 

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...