Sunday, 15 January 2017

कथा- सुर्यास्त...... एक प्रेमकहाणी

सुर्यास्त....... एक प्रेमकहाणी
 ती काहीशी आधुनिक विचारांची. तर तो परंपरा जपणाऱ्या घरातला. तिची आई वर्किंग वूमन तर त्याची साधी गृहिणी. त्याचं एकत्र कुटुंब तर ती विभक्त कुटुंबात वाढलेली. तो शांत, समजूतदार तर ती काहीशी रागीट. तरीही दोघांचे सूर जुळतील का कधी? कशा जुळतील यांच्या रेशीमगाठी?
         त्याने तिला पहिल्यांदा बघितले ते कॉलेजमध्ये. ती 'रोझ क्विन' झाली होती आणि ज्याच्यामुळे ती 'रोझ क्विन' झाली होती त्या बड्या बापाच्या मुलाला झापताना ती रागाने लालबुंद झाली होती.
"मला देण्यासाठी या गुलाबांच्या फुलांवर जेवढा खर्च केलास ना तेवढा खर्च जर गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी केला असतास तर मी इंप्रेस झाले असते.”
ती बोलत होती आणि तो बिचारा हे सारं अनपेक्षित असल्यामुळे गोंधळून गप्प बसला होता. खरंतर ज्या गोष्टीसाठी बाकिच्या मुली तरसत होत्या ती गोष्ट तिला अगदी सहज मिळाली होती. पण ती खूप वेगळी होती.  ती एका लहान मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेमध्ये काम करीत होती. बाकीच्या मुली शॉपिंग, फॅशन, बॉयफ्रेंड या सगळ्यासोबत 'कॉलेज लाईफ' एन्जॉय करत होत्या. पण ती अनाथ मुलांच्या, गरीब मुलांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करत होती.
     प्रेरणा तिच नाव. अगदी नावाला शोभेल असं तिचं वागणं. त्याला तिचं कौतुक वाटलं. पण तेवढ्या पुरतंच. तिला बघताक्षणी तो तिच्या प्रेमात वगैरे पडला नव्हता. त्या दिवसानंतर तो त्याच्या रुटिनमध्ये बिझी झाला. त्याचं हे 'एमबीए'चं  शेवटच वर्ष असल्यामुळे तो अभ्यासात गढून गेला. अधूनमधून ती कॉलेजला दिसायची. अनेक वेळा लायब्ररीमध्ये दोघं एकमेकांच्या समोरही आली होती. काही वेळा नजरानजरही झाली होती. पण त्याने कधी तिचा विचार केला नाही. पण त्याला तिचं दिसणं, नजरानजर होणं थोडं थोडं आवडायला लागल होतं. हळूहळू कॅम्पसची तयारी प्रोजेक्टस यात तो बिझी होत गेला आणि तिला काहीसं विसरुनही गेला. ती तर त्याला ओळखतच नव्हती.  
        असेच काही दिवस गेले. त्याला कॅम्पसमधून चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली. यथावकाश परिक्षाही पार पडली. त्याच्याबरोबर त्याच्या अजून काही मित्रांनाही मनासारखी नोकरी मिळाली. परीक्षा संपल्यामूळे प्रत्येकाचे वेगवेगळे प्लॅनस ठरलेले होते. बाहेरगावचे रुम घेउन / हॉस्टेलला रहाणारे मित्र दुसऱ्याच दिवशी घरी जायच्या तयारीत होते. कोणी फॅमिली फंक्शनला तर कोणी फॅमिलीसोबत 'व्हेकेशन ट्रिप'साठी जाणार होते. त्यामुळे  "आजकी शाम दोस्तोंके नाम", अस ठरवून तो आणि त्याचे मित्र आयुष्यातला हा 'टर्निंग पॉइंट' सेलिब्रेट करण्यासाठी संध्याकाळी 'सी व्ह्यू' रेस्टॉरंटमध्ये जमले. आज मेनूकार्डवरची उजवी बाजू न बघता मनाला वाटेल ते मागवायचं, धमाल करायची असं ठरवून सगळ्यांनी मेनूकार्ड वाचायला सुरुवात केली. सगळेजण मेनूकार्डवरच्या डीश वाचून त्याच्याबद्दलची माहिती विचारुन वेटरला भंडावून सोडत होते. वेटर वेगवेगळ्या डिश, टेबलावर आणून ठेवत होता. मस्त पार्टी रंगात आली होती. सहजच त्याचं खिडकीबाहेर लक्ष गेलं. बाहेरचं वातावरणही तितकंच मनमोहक होतं. मे महिन्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळ बराच वेळ रेंगाळली होती. अस्ताला जाणारा सूर्य जणू लाटांशी लपंडाव खेळतोय अस वाटत होतं. सूर्याची पिवळसर किरणे हळूहळू लालसर दिसायला लागली होती. एवढ्यात त्याला प्रेरणा दिसली. तिच्या भोवती आजूबाजूला अनेक लहान मुले होती. आपल्या हातातले फूगे आणि चॉकलेट्स ती त्या मुलांना वाटत होती. त्या मुलांना खूष बघून तीच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मुळातच सुंदर असणाऱ्या तिच्या चेहऱ्यावर समाधानाच्या तेजामूळे एक वेगळाच रंग आला होता. बस तिच्याकडे असच बघत रहावं असं त्याला वाटत होतं.  सूर्यास्ताच हे मनमोहक दृष्य सुंदर आहे की प्रेरणामुळे ते जास्त सुंदर वाटतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आज प्रथमच कुठल्यातरी मुलीबद्दल त्याच्या मनात अशा भावना निर्माण झाल्या होत्या. प्रेरणा त्या लहान मुलांसह खेळून त्यांना आनंद वाटण्यात मग्न होती. आपल्याकडे कोणी निरखून बघतय याची तिला साधी जाणीवही नव्हती. "अमित कुठे हरवलास?" मित्राच्या आवाजाने तो भानावर आला.
"काही नाही सहज ..." असं म्हणून त्याने वेळ मारून नेली. पण मनाच्या एका कोपऱ्यात ती कधीच जाऊन बसली होती. त्यानंतर अनेकदा प्रयत्न करुनही मनात येणारे तिचे विचार तो थांबवू शकत नाही. त्याच्याही नकळत तो तिच्यात गुंतत जातो. 
   असेच अजून काही दिवस सरतात.  नोकरीच्या व्यापात हळूहळू तिचा विचार मागे पडत जातो. तो त्याच्या रुटिनमध्ये व्यस्त होतो. एखाद्या संध्याकाळी ऑफिसच्या खिडकीतून दिसणारा सूर्याचा लाल गोळा पाहिल्यावर त्याने जपलेली तिची आठवण हळूच डोकं वर काढत असे. त्या दिवशीही तसंच झालं, ऑफिसच्या खिडकीतून दिसणाऱ्या सुर्यास्ताच्या मोहक दृष्यावरून त्याची नजर हटत नव्हती. त्याला तिच्या विचारांमध्ये हरवून जावंस वाटत होतं. पण टेबलावरच्या फाईल्स त्याला तसं करायची परवानगी देत नव्हत्या. सगळे विचार झटकून त्याने कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. ऑफिसमधून निघेपर्यंत नेहमीप्रमाणे संध्याकाळ उलटून गेली होती. खिडकीबाहेर अंधार पडलेला होता. त्याने मनातून झटकलेला तिचा विचार आता पुन्हा त्याच्या मनात डोकावू लागला होता. नकळत त्याने गाडी समुद्राच्या दिशेने वळवली. समुद्रकिनारी गर्दी थोडी कमी होती. सहज त्याची नजर समुद्राच्या किनाऱ्यावरच्या 'सी व्ह्यू' हॉटेलवर पडली. त्याला त्या संध्याकाळी झालेली पार्टी आठवली. गेल्या कित्येक दिवसात व्हाट्स अप ग्रूपवरचे बोलणे सोडले तर मित्रांशी आपलं फारसं बोलणंच होत नाही हे त्याला प्रकर्षाने जाणवलं. लाटांचे गुज ऐकून आणि आकाशातल्या चंद्राकडे बघून त्याला जाणवलं, हे सगळं आपण कित्येक दिवसात अनुभवलंच नाही. नोकरी लागल्यापासून ऑफिस आणि घर हेच आपलं विश्व बनलंय.  संपूर्ण आठवडा ऑफिसच्या कामात जातो आणि वीकएन्डचे दोन दिवस घरात लोळत पडण्यात नाहीतर मूव्ही बघण्यात संपतात. विचारांच्या तंद्रीत असतानाच त्याचा फोन वाजला.
"दहा मिनिटात घरी पोचतो आई" एवढं बोलून फोन कट करून नाईलाजनेच तो तिथून निघाला.
"काहीही झालं तरी उद्या ऑफिसची कामं लवकर आटपून संध्याकाळी सुर्यास्ताच्या वेळी समुद्रावर यायचं. असा विचार मनाशी पक्का करत त्यांने गाडीला किक मारली. "कदाचित 'ती' दिसेल" हा विचार मनात येताच, त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटते. 
     दुसऱ्या दिवशी तो जरा लवकरच ऑफिसमधून निघला. गाडी घेऊन सरळ समुद्राच्या रस्त्याला लागला. पून्हा त्याला त्या दिवशीची संध्याकाळ आठवली, पण क्षणभरच. खरंतर त्याची नजर तिला शोधत होती. उगाचच वेळ दवडायचा म्हणून तो हॉटेल 'सी व्ह्यू' मध्ये जाऊन बसला आणि त्याने कॉफी मागवली.  अस्ताला जाणारा सूर्य नारायण बघत आणि समुद्राच्या लाटांकडे बघत तिच्या विचारात हरवून गेला.  पण ती काही दिसली नाही. त्याचा मूड गेला. बिलाचे पैसे देऊन तो हॉटेलमधून बाहेर पडला. सूर्याचा गोळा आता लालबुंद झाला होता. तो जायला निघणार इतक्यात त्याला ती दिसली; एकटीच! वाळूत शांत बसून सुर्यास्ताच सौदर्य आपल्या सुंदर डोळ्यात साठवून घेताना. तिला बघून तो सुखावला. आज कितीतरी दिवसांनी ती त्याला दिसली होती. तो तिला डोळे भरुन बघत होता. वाऱ्यावर उडणारे तर कधी मध्येच तिच्या गालावर रेंगाळणारे तिचे केस बघून क्षणभर त्याच्या मनात आलं, नक्की काय सुंदर आहे? हिचे बोलके काळजाचा ठाव घेणारे डोळे, का वाऱ्यावर उडणारे तिचे हे केस?  त्याच्या मनात त्याला एक अनामिक पण हवी हवीशी वाटणारी धडधड जाणवू लागली. कितीतरी वेळ तो तिच्याकडे एकटक बघत होता. शेवटी हिम्मत करुन त्याने तिच्याशी बोलायला जायचं ठरवलं. पण तेव्हढ्यात कुठलातरी मुलगा तिच्या बाजूला येवून बसला. ती बहुदा त्याचीच वाट बघत असावी. त्या मुलाच्या एकंदरीत हावभावांवरुन तरी त्याला असंच वाटत होतं.
"तो उशीर झाल्याबद्दल तिची माफी मागत असावा. या मुलाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पण आठवत नाहीये. तो स्वतःशीच बोलत होता.
एव्हाना सूर्य अस्ताला गेला आणि अंधाराचे जाळे पसरू लागले. त्याला घरी जायची घाई होती. तरिही त्या मुलाला आठवायचा प्रयत्न करत तो काही क्षण तिथेच रेंगाळला. अचानक त्याला आठवलं, हा तोच मुलगा आहे ज्याच्यामूळे ती "रोझ क्वीन' झाली होती. एका क्षणात त्याचा सगळा उत्साह मावळला. तो तसाच घरी जायला निघाला. वाटेत त्याच्या मनात विचार आला, "का या मुलीबद्दल मी इतका विचार करतो? का मला तिला सतत बघावंसं, तिच्याशी बोलावंसं वाटतं? शेवटी सगळ्या मुली सारख्याच. वाटलं होतं ही वेगळी असेल पण नाही. शेवटी काय तो बड्या बापाचा बेटा, त्याच्या हातात हात देणारच ती. उगाचच आधी नखरे करायचे. सवयच असते या मुलींची."  त्याच्या मनात विचारांच वादळ उठलं होतं. कधी त्याला स्वतःचा तर कधी तिचा राग येत होता. त्याला काय होतंय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं. हे सारं काय चाललय? त्याच्या मनात पुन्हा प्रश्न निर्माण हो होते. "मला का वाईट वाटतय पण?  मी का तिच्यासाठी इतका बेचैन होतो नेहमी?" मी तिच्या प्रेमाबिमात तर पडलो नाही ना?" या विचारासरशी त्याने करकचून गाडीचा ब्रेक दाबला आणि तसाच थांबला. तेव्हढ्यात मागून येणाऱ्या एका फोर व्हिलरच्या ड्रायव्हरचा आवाज त्याच्या कानावर पडला, अरे ए XXXX मरायच आहे काय रे XXXX? अशी वाटेत गाडी काय थांबवतोस? मी स्पीडला असतो तर तू वरती आणि मी तुरुंगात गेलो असतो XXXX." तो भानावर येतो आणि सॉरी म्हणून गाडी स्टार्ट करतो. आता मात्र तो मनाशी पक्क ठरवतो, घरी जाईपर्यंत कुठलाही विचार करायचा नाही.
       तो घरी पोचतो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेलेले होते. तो आवरुन कसेबसे चार घास पोटात ढकलतो आणि खूप दमल्याचं कारण सांगून कोणाशीच काहीही न बोलता आपल्या खोलीत जाऊन बसतो. खरंतर त्याला या क्षणाला रडावंस वाटत होतं. पुन्हा पुन्हा तिचाच विचार मनात येत होता. त्याचं त्यालाच कळत नव्हतं त्याला तिचा राग का येतोय? आपल्याला नक्की कशाच वाईट वाटतंय? खरंतर  जे त्याच्या मनाला जाणवत होतं ते त्याची बुद्धी मानायला तयार नव्हती. त्याची बुद्धी त्याला सांगत होती, "असं कधी घडतं का? तिला धड ओळखतही नसताना तिच्यावर प्रेम करणं कसं काय शक्य आहे? प्रेम नाही हे निव्वळ आकर्षण आहे." पण त्याच वेळी त्याचं मन त्याला सांगत असतं, "अरे हेच तर प्रेम आहे. उगाच का ओळख नसताना तिची हुरहूर लागते."
    तो काही वेळ सुन्न होऊन बसून रहातो.  थोड्यावेळाने मनाची घालमेल कमी होते. तो शांतपणे विचार करतो, "प्रेम असेल किंवा नसेल आता या गोष्टींना काहीच अर्थ नाही. तिच्या आयुष्याचा जोडीदार बहुदा तिने निवडला आहे. आता तिचा विचार न करणे हेच योग्य आहे." आजपासून तिचा विचार करायचा नाही, अस मनाशी पक्क ठरवून तो शांतपणे झोपायचा प्रयत्न करतो. 
   त्यानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे कामामध्ये झोकून दिलं. खूप काम झाल्यावर थकलेल्या मनाला कधीकधी तिची आठवण क्षणभर आनंद देउन जात असे. पण दुसऱ्या क्षणाला ती मन बेचैन करत असे. मग ही बेचैनी दूर करण्यासाठी तो पुन्हा स्वतःला कामामध्ये झोकून देतो. या चक्रात अजून दोन वर्ष सरतात. कधीकधी येणारी तिची आठवण आता क्वचितच कधीतरी येवू लागते.  पण या साऱ्यामध्ये त्याला त्याच आयुष्य अगदीच निरस वाटू लागत. अशातच त्याच्या आयुष्यात एक आनंदाची घटना घडते. त्याचं प्रमोशन होतं. चांगल्या इन्क्रीमेंटसह चांगला बोनसही मिळतो. त्याला त्याच्या मेहनतीच फळ मिळतं. तो खूप खूष होतो. 
       दिवस असेच पुढे जात होते. मेहनतीच्या आणि हुशारीच्या जोरावर तो यशस्वी होत होता. दुचाकीसोबत चारचाकीही येते. इनव्हेस्ट्मेंट म्हणून एक टू बिएचकेही तो बूक करतो.  त्याच्या घरी हळूहळू त्याच्या लग्नाची बोलणी सुरु होतात. पण तो त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो.  अशातच त्याचा मित्राच संकेतच लग्न ठरत आणि सगळ्या ग्रूपचं पुन्हा एकदा हॉटेल 'सी व्ह्यू' मध्ये एकत्र जमायच अस ठरतं;  संकेतच्या आयुष्याचा दुसरा टर्निंग पॉइन्ट एन्जॉय करण्यासाठी!
  दुसऱ्याच दिवशी संकेतचा फोन, "अरे यार जरा लवकरच जमुया. संध्याकाळी समुद्रकिनारी मस्त भटकूया. खूप दिवसात हिरवळ पण बघितली नाही, ती ही बघुया, काय कशी वाटते कल्पना?"
संध्याकाळी समुद्रकिनारी जायच्या नुसत्या कल्पनेनेही तो खूष झाला. पण स्वतःला सावरत तो संकेतला म्हणाला, "संकेत XXXX  लग्न ठरलय तुझं आता. हिरवळ कसली बघतोस?" त्याच्या या बोलण्यावर मात्र दोघेही खळखळून हसले. फोन ठेवल्यावर मात्र आपण संध्याकाळसाठी उगाचच 'हो' म्हटलं अस त्याला वाटू लागलं.
     "पुन्हा ती दिसणार, मग काही दिवस तिची आठवण आपल्याला छळणार. छे, या चक्रातून बाहेरच पडता येत नाहीये मला. कितीही ठरवलं तरी ती काही मनातून जात नाही. खरंतर एव्हाना लग्नसूद्धा झालं असेल तिचं... त्याच्याबरोबर!मी मात्र उगाचच वेड्यासारखा तिच्यासाठी  झुरतोय."
तो खूपच अस्वस्थ होतो. काही केल्या आज त्याचं कामात लक्ष लागत नव्हतं. एकीकडे कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि समुद्रावर जातोय असं त्याला वाटत होतं तर दुसरीकडे तिच्या आठवणीत हरवून जायची किंवा आपण तिच्या प्रेमात पडलोय हे मान्य करायची त्याला भीती वाटत होती.       
      सध्याकाळी सगळे मित्र जवळपास दोन अडीच वर्षांनंतर  एकत्र जमले होते. सुरुवातीला थोडा वेळ कोणाचं काय आणि कसं चाललंय हे जाणून घेण्यात जातो.  मग हळूहळू एकमेकांच्या जुन्या 'क्रश'बद्दल चर्चा चालू होते आणि गप्पा, हास्यविनोद याला उधाण येतं. तो मात्र या साऱ्यामध्ये सामील असूनही नसल्यासारखा होता. त्याची नजर नकळतपणे तिलाच शोधत होती. सहज त्याची नजर किनाऱ्याकडे जाते आणि ती त्याला दिसते. वाळूत बसून समुद्राच्या लाटांमध्ये हरवून गेलेली. सुर्यास्ताच्या सुर्याची किरणे आणि लाटांचा लपंडाव बघणं जेव्हढ सुंदर वाटतं ना तेव्हढंच सुंदर तिला सूर्यास्त बघताना बघणं.  त्याच्या छातीत धडधडू लागलं. पण दुसऱ्याच क्षणात त्याच्या मनात विचार आला,  "ती नक्कीच त्या बड्या बापाच्या मुलाची वाट बघत असणार. त्याने तिचा विचार झटकायचा आणि मित्रांच्या गप्पात रंगण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला. कितीही नाही बघायचं ठरवलं तरी त्याची नजर अधूनमधून तिच्याकडे जात होती. हळूहळू सूर्य अस्ताला जात होता क्षणाक्षणाला बदलणारं त्याचं रुप अधिकच विलोभनीय दिसत होतं. बघता बघता अंधारुन आलं तरी ती मात्र तशीच शांत बसून होती. त्याच्या मनात विचार आला, "त्या बड्या बापाच्या मुलाने हिला फसवलं तर नसेल? हिचं ब्रेकअप तर झालं नसेल? का आज येतो सांगून तो आला नसेल? एक क्षण त्याला वाटलं सरळ जाऊन बोलावं तिच्याशी पण मग नंतर वाटलं तिला चालेल का असं मी तिच्याशी बोलायला गेलो तर? ती तर धड ओळखतही नाही मला? जाउदे तिच्या विचारात हरवून न जाणं हेच योग्य आहे.  तिचा विचार झटकायचा प्रयत्न करुन तो पुन्हा गप्पांमध्ये सामील होतो.
 "काय मग अमित तुझं काय? कोणी आवडली का नाही? का अजूनही तसाच आहेस?" संकेत
क्षणभर त्याला वाटलं संकेतला कळलं की काय तिच्याबद्दल? पण मग स्वतःला सावरत म्हणाला, "अरे यार मी पण तुझ्याच ग्रूपमधला आपण ॲरेंज्ड मॅरेजवाले आपल्याला नाही झेपणार ते क्रश, लव वगैरे काही." त्याच्या या बोलण्यावर सगळे खळखळून हसले.
  "बरं चला आता आपण जेवायला जाऊया आता साडेसात वाजत आले आहेत. उगाच पुढे उशीर होइल नाहीतर", संकेत.
"बरोबर रे नंतर तुला महत्वाचा फोन करायचा असेल त्यामुळे घाई असणारच रे", असं म्हणून सगळ्यांनी संकेतची चेष्टा सुरु केली.
   त्याची नजर पुन्हा ती बसलेली होती त्या ठिकाणी गेली. पण ती तिथे दिसत नाही.  "ओह शीट गेली वाटत ती", तो मनातल्या मनात म्हणत आणि काहीसा नाराज होतो.
       पार्टी आटपून घरी पोचायला त्याला काहिसा उशीरच झालेला होता. पण तरीही तो खूप फ्रेश होता.  खूप दिवसांनी मित्रांबरोबर घालवलेली संध्याकाळ आणि बराच वेळ दिसलेली 'ती' यामुळे तो चांगलाच सुखावला होता.  काही दिवस असेच सरले. तो पुन्हा रुटिनमध्ये बिझी झाला. संकेतच्या लग्नानंतर त्याच्या घरीही त्याच्या लग्नाचा विचार जोर धरु लागलेला होता. आई, आजी, काकू जोमाने या कामाला लागलेल्या होत्या.  तो मात्र या साऱ्यातून शक्य तितकं अलिप्त रहायचा प्रयत्न करत होता. त्याच्या घरी सगळ्यांना एकत्र कुटुंबात रहायला तयार असणारी मुलगीच सून म्हणून हवी होती. ओळखीतून, नात्यातून त्याला काही स्थळे सांगूनही येत होती पण काकू, आई, आजी हे टप्पे पार करण्यात यशस्वी न झाल्यामुळे ती स्थळे त्याच्यापर्यंत पोहचतच नव्हती. तो अलिप्त राहूनही हे सारं खूप एंजॉय करीत होता. सहज त्याच्या मनात आलं,  "तिचंच स्थळ आलं तर? या नुसत्या कल्पनेनेही तो मनोमन सुखावला. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या मनात आलं असं होणं शक्य तरी आहे का? तिचं तर .......पण मग त्या दिवशी ती एकटी का बसली होती? त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरु झाला. तेवढ्यात लंचब्रेक झाल्यामुळे कलिग लंचसाठी बोलवायला आला. "चला काही क्षण तरी सुटलो तिच्या विचारातून", असं स्वतःशीच म्हणून तो लंचसाठी जायला निघाला. 
       संध्याकाळी घरी पोचला तेव्हा घरी उत्साहाचे वातावरण होतं.  हॉलमध्ये सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र बसून गप्पागोष्टी करत होते.
तो आल्याचं पाहून त्याची काकू लगबगीने पुढे आली आणि त्याला म्हणाली, "अमित लवकर फ्रेश हो तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे.
फ्रेश होऊन अमित हॉलमध्ये आला. सगळ्यांचा उत्साह बघून त्याने विचारलं, "काय स्पेशल काय आहे आज?"
"सगळंच स्पेशल आहे", आई हसून म्हणाली.
अमित गोंधळून गेला. त्याला असं गोंधळलेले बघून त्याचा काका म्हणाला, अरे आपल्या घरातल्या महिला मंडळाने एक मुलगी पसंत केलेय तुझ्यासाठी. चक्क एकमत झालंय त्यांचं. हा बघ फोटो मुलीचं नाव प्रेरणा देशमुख."
मुलीचं नाव ऐकून अमित दचकला आणि काकाच्या हातातला फोटो जवळपास ओढूनच घेतला.  अरे ही तर तिच आहे. आपण स्वप्नात तर नाही ना अस वाटून तो स्वतःलाच एक चिमटा काढून बघितला.
"काय रे मुलीच्या फोटोवरुन नजर हटत नाही वाटतं", काकूने हसून विचारलं.
यावर तो जरा ओशाळला आणि म्हणाला, "नाही काकू तसं नाही ...."
म्हणजे मुलगी पसंत नाही का?" काकाने मिश्किलपणे विचारलं.
"आवडली ना खूप आवडली."तो नकळतपणे अगदी सहज बोलून गेला आणि घरात चेष्टा मस्करीला उधाण आलं. 
       रात्री जेवण आटपल्यावर तो आपल्या रुममध्ये गेला. खरंतर आज त्याला खूप आनंद झालेला होता. सगळंच अनपेक्षित पण सुखद होतं. तरिही त्याच्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती. नक्की काय चूकतंय? कुठे चुकतंय? त्याला काहीच कळत नव्हतं. पण कुठेतरी मन उदास होत होतं. सगळ्या गोष्टी तिला प्रत्यक्ष भेटूनच कळतील असा विचार करुन त्याने मनाची घालमेल थांबवण्याचा प्रयत्न केला. 
    सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी त्याने घरच्यांना सांगितलं, "कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी मला एकदा मुलीला प्रत्यक्ष भेटायचं आहे. तेव्हा प्लीज आत्ताच काही ठरवू नका."
तुझ्या मर्जीशिवाय लग्नाची बोलणी पुढे सरकणार नाहीत हा विश्वास घरच्यांनी दिल्यावर निश्चिंतपणे तो ऑफिसला निघून गेला. ऑफिसला पोचल्यावर कामाच्या गडबडीत तिचा विचार पुन्हा मागे पडला. दुपारी लंच टाईमच्या आधी त्याचा मोबाईल वाजला. लवकर कामे आटपून जेवायला जायच्या विचारात  असलेल्या त्याने काहिशा नाराजीनेच फोन घेतला. पलिकडून एका मुलीने गोड आवाजात विचारलं, "हॅलो मिस्टर अमित कुलकर्णी का?
तो: हो बोलतोय. 
ती: सॉरी आपण ओळखत नाही एकमेकांना. मी प्रेरणा देशमुख बोलतेय. ॲक्चुली तुमचं स्थळ सांगून आलंय माझ्यासाठी. बिझी नसाल तर दोन मिनिटे बोलू शकते का?
आता तर तो क्लिन बोल्ड झाला होता. हृदयाची धडधड वाढयला लागली होती. कसंबसं स्वतःला  सावरत तो म्हणाला- "हो बोला ना." 
ती: सॉरी डिस्टर्ब नाही ना केलं तुम्हाला?
तो: नाही इट्स ओके. बोला तुम्ही 
ती: आपण भेटू शकतो का?
 तो: (स्वतःला चिमटा काढून स्वप्नात तर नाही ना याची खात्री करुन घेत) हो चालेल. कधी आणि कुठे भेटायचं?
ती: संध्याकाळी ६ वाजता हॉटेल 'सी व्ह्यू', चालेल?
तो: हो चालेल ना. अगदी माझ्या मनातल बोललीस सॉरी बोललात 
ती:  इट्स ओके.  चालेल अगं तुगं केलंत तरी.
तो: थॅंक्यू.
ती: ठेवू मग मी फोन. संध्याकाळी भेटूच 
तो:  ओके बाय. 
खरंतर त्याला फोन ठेवू नकोस असं म्हणावंसं वाटत होतं पण त्याने धावणाऱ्या मनाला तिथेच थांबवलं. तिचं स्थळ येणं, तिचा फोन येणं या साऱ्या गोष्टी त्याच्यासाठीच जेवढ्या अनपेक्षित होत्या तेव्हढ्याच आनंददायी. आज संध्याकाळी तिला भेटायला जायच; ज्या 'सी व्ह्यू' हॉटेलमधून तिला बघत बसायचो त्याच सी व्ह्यू हॉटेलमध्ये आज तिच्यासमोर बसायच या कल्पनेने तो खूश झाला होता. पण अचानक मनात विचार आला, "कशासाठी बोलावलं असेल तिने? तूम्ही मला नकार द्या असं तर सांगणार नाही? जाऊदे आता काहीही झालं तरी दुसरा कुठलाही विचार न करता आलेला क्षण एन्जॉय करायचा. कुठल्याही कारणाने का असेना तिने आपणहून फोन करून भेटायला बोलावलं आहे आणि ते ही हॉटेल 'सी व्ह्यू'मध्ये! आता फक्त तिचा विचार करायचा असं मनाला दटावून तो चक्क हाफ डे घेऊन घरी गेला. जाता जाता संध्याकाळच्या भेटीसाठी नवा शर्ट खरेदी केला. तिच्यासाठी काहीतरी खरेदी करायच्या विचारात असतानाच त्याला 'रोझ डे' च्या दिवशीची ती आठवली त्यामुळे तो तिच्यासाठी फक्त एक कॅडबरी विकत घेतो. अगदीच तिने नाही घेतली तर निदान आपण ती खाऊ तरी शकतो हा सूज्ञ विचार करून! त्याच्या घरापासून समुद्रावर जायला अवघा १५ ते २० मिनिटांचा रस्ता. पण उगाच ट्रॅफिकमूळे उशीर नको म्हणून तो सव्वापाचलाच घरातून निघाला. 
      तो समुद्रावर पोहचतो तेव्हा साडेपाच झाले होते. सुर्याची किरणे शांतपणे लाटांवर विसावलेली होती. संध्याकाळ व्हायला अजून थोडा वेळ होता. सुट्टीचे दिवस नसल्यामुळे फारशी गर्दीही नव्हती. त्याने विचार केला, "हॉटेलमध्ये बसून सुर्यास्त बघण्यापेक्षा वाळूत किंवा एखाद्या खडकावर बसून तो अनुभवावा. जर सगळं ठिक असेल तर सुर्यास्ताच्या साक्षीनेच तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यावी."
त्याने तिला मेसेज केला, आपण हॉटेलमध्ये न बसता किनाऱ्यावरच्या वाळूत बसून बोलूया का? दुसऱ्या मिनिटाला तिने रिप्लाय केलं. "Ok Thanks. मला पण हेच वाटत होतं.१० मिनिटांत पोचते."
खरोखरच १० व्या मिनिटाला ती तिथे हजर होती. त्याच्याशेजारी बसता बसता ती म्हणाली, "फारच लवकर आलास तू.”
उत्तरादाखल तो फक्त हसला. ती बाजूला बसलेय, हे स्वप्नही त्याने कधी पाहिलेलं नव्हतं पण आज प्रत्यक्षात ती बाजूला बसलेली बघून त्याच्या छातीतली धडधड अजूनच वाढली. काही क्षण तसेच जातात. ती लाटांकडे आणि पाण्यात बुडणाऱ्या सुर्याकडे बघत शांत बसली आणि तो तिला बघत सूर्यास्त अनुभवत होता.
अचानक तिची नजर त्याच्याकडे  जाते. चोरी पकडल्यासारखी त्याची अवस्था होते. काहीतरी बोलायचं म्हणून तो उगाचच विचारतो, " तुला खूप आवडतं का सुर्यास्त बघायला?"
ती गोड हसून म्हणते, "सॉरी मी हरवून गेले या सुर्यास्ताच्या देखाव्यामध्ये. जगातील सर्वात सुंदर गोष्ट कुठली असेल, तर ती समुद्रात बुडणारा सुर्य पहाणे. बरं झालं तू इथे वाळूत बसूया म्हणालास. मी दर बुधवारी संध्याकाळी येते इथे आणि काय योगायोग बघ आजही बुधवारच आहे".
काही क्षण पुन्हा शांततेत गेले. मग हिम्मत करुन त्याने विचारलं, तुझ्या आयुष्यात कोणी आहे का?"
तिने काहीसं आश्चर्याने त्याच्याकडे बघितलं.
"तू रागवू नकोस पण मला वाटतं की आपण एकमेकांपासून काहीही लपवू नये. तुझा भूतकाळ माझ्यासाठी महत्त्वाचा नाहिये पण मला माहिती असावा एवढीच माझी अपेक्षा आहे”, तो.
ती: नाही रागावले नाही मी. तुझं म्हणणंही पटतंय. मी आज त्यासाठीच तुला भेटायचं ठरवलं होतं. तुला जे काही सांगावंसं किंवा विचारावंसं वाटतंय त्याबद्दल तू मोकळेपणाने बोल.
तो: मी ओळखतो तुला आधीपासून. GS कॉलेजची रोझ क्वीन झाली होतीस ना तेव्हापासून! त्या वेळी मी MBA च्या फायनल इअरला होतो.  त्या दिवशीनंतर तू दोन तीन वेळा समुद्रावरही दिसलीस. कधी लहान मुलांना फुगे आणि चॉकलेट्स वाटताना, कधी एकटीच बसून सुर्यास्त बघताना तर कधी ..... (बोलता बोलता तो तसाच थांबतो.)
ती:  तर कधी? काय बोलना....... थांबलास का?
तो: नाही काही नाही.
ती: तर कधी एका मुलाबरोबर right? 
तो: (काही क्षण गप्प राहून) हो बरोबर! तो तोच मुलगा होता ज्याच्यामूळे तू 'रोझ क्वीन' झाली होतीस आणि त्याला तू झापलंही होतस.  
ती: (मंद हसून) हो तोच होता तो. मंदार! त्याला खूप झापलं होतं मी. पण त्याचा इतका मोठा परिणाम त्याच्यावर होइल असं मला वाटलं नव्हतं तेव्हा. 
तो: म्हणजे?
ती: त्या दिवशीनंतर मंदार एकदम बदलला. त्या दिवशी मी सगळ्यांसमोर त्याला झापल्यामूळे तो माझ्यावर खूप चिडला होता. रागारागानेच तो कॉलेजमधून बाईक घेवून निघाला. डोक्यात राग घालून गाडी चालवत होता त्यामुळे सहाजिकच गाडी स्पीडमध्ये होती. त्यातच त्याने सिग्नल तोडला आणि त्याला ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं. पोलिसांना काहिशी उर्मट उत्तरे दिल्यामुळे त्यांनी त्याला तिथेच उन्हात ताटकळत उभं ठेवलं. त्याचवेळेस त्याने पहिल्यांदा अनुभवलं ते सिग्नलला छोट्या वस्तू, खेळणी,  फुले विकणाऱ्या मुलांचं, तिथे भीक मागणाऱ्या मुलांच दु:ख. त्याच्या मनाला कुठेतरी माझं म्हणणं बरोबर वाटू लागलं होतं. त्या दिवसानंतर तो अंतर्मुख झाला. विचार करु लागला. स्वत:च्या श्रीमंतीचा माज हळूहळू उतरु लागला. त्यानंतर जवळपास दोन महिन्यानंतर त्याने स्वतःहून माझी माफी मागितली आणि आमच्या NGO साठी काम करायची इच्छ व्यक्त केली. मला त्याच्यातला बदल जाणवला आणि मी त्याला आमच्या संस्थेत घेऊन गेले.  त्यानंतर आमची छान मैत्री झाली. पूर्वी बुधवारी मी एकटीच यायचे पण नंतर तो ही अधूनमधून येऊ लागला.
तो: त्याचं प्रेम होतं तुझ्यावर? 
ती: हो. आमच्यात खूप छान मैत्री निर्माण झाली होती.  तो मला नेहमी म्हणायचा, "तू मला माणूस म्हणून जगायला शिकवलंस."  अशाच एका संध्याकाळी त्याने मला प्रपोज केल. तेव्हा तो म्हणाला, "आधी मला फक्त तुझा चेहरा आवडला होता पण आता मी त्या चेहऱ्यामागच्या खऱ्या प्रेरणावर प्रेम करु लागलोय. तू नाही म्हणालीस तरी हरकत नाही कारण आता मला प्रेमाचा खरा अर्थ कळला आहे. तुझ्या होकाराने किंवा नकाराने मला काहीच फरक पडणार नाही 
तो: तुझं प्रेम होत त्याच्यावर?
ती: माहिती नाही. 
तो: म्हणजे? नक्की काय म्हणायचं आहे तुला? तुझं हे उत्तर पूर्णपणे अनपेक्षित आहे माझ्यासाठी.
ती: मला कळतंय की आत्ता या क्षणाला तुला माझ्याबद्दल काय वाटत असेल ते. पण प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न कर.
तो: कसं आणि काय समजून घेऊ मी? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 'हो' किंवा ‘नाही' एवढंच असू शकतं. निदान मला तरी तेच अपेक्षित होतं. 
ती: हो बरोबर आहे तुझं. पण मी खरंच सांगतेय मला नाही माहिती आमच्यात नक्की काय होतं. पण जे होतं ते नक्कीच मैत्रीच्या पुढे काहीतरी होतं. त्याने प्रपोज केलं त्या दिवशी माझ्या मनात त्याच्याबद्दल मैत्री व्यतिरिक्त कुठल्याच भावना नव्हत्या. त्यानंतरही आम्ही पूर्वीसारखच भेटत होतं. अगदीच दर बुधवारी संध्याकाळी नाही पण शक्य असेल तेव्हा तो माझ्याबरोबर समुद्रकिनारी यायचा. इथे आल्यावर संस्थेचा विषय काढायचा नाही असा एक अलिखित करार झाला होता आमच्यामध्ये. इथे फक्त काही क्षण स्वतःच्या आयुष्याबद्दल बोलायचो आम्ही. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनी त्याची आई आली होती मला भेटायला. त्यांच्याशी बोलल्यावर तो पूर्वी जसा होता तसा का होता हे कळल. श्रीमंतीच प्रदर्शन, पैशाची मगरुरी सारं काही त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. त्यांना किंबहुना मंदारच्या घरच्या कोणालाही त्याचं NGO मध्ये काम करणं पसंत नव्हतं. त्याने आपलं शिक्षण पूर्ण करुन घरचा बिझनेस सांभाळावा हीच त्यांची अपेक्षा होती. अर्थात त्यात काही चूकही नव्हतं. तो कोल्हापूरचा. त्याचे आजोबा म्हणजे कोल्हापूरातील एक बड प्रस्थ. हजारो एकरांमध्ये शेती, प्रिंटिंग प्रेस, साखर कारखाना एक ना अनेक. त्यांनी मला स्पष्टच सांगितलं, " तुमच्या सस्थेला जमेल तेवढी आर्थिक मदत आम्ही देऊ पण आमचा मुलगा नाही देवू शकत. तुझ्यामुळेच तो या नको त्या गोष्टीत अडकला आता तूच यातून त्याला बाहेर काढ”.
     त्याची आई मला येऊन भेटून गेल्याचं कळल्यावर मात्र तो खूप चिडला होता. त्यानंतर आम्ही जेव्हा इथे भेटलो तेव्हा त्याने त्याच्या घरातल्या त्याला न पटणाऱ्या अनेक गोष्टी सांगितल्या. त्या दिवशी 'बडा घर पोकळ वासा' या म्हणीचा खरा अर्थ मला समजला. तो खूपच भावूक झाला होता. खूप रडला तेव्हा आणि माझा हात हातात घेऊन म्हणाला, "तुझ्यामुळे मला जगण्याचा खरा अर्थ कळलाय आता मला पुन्हा त्या नरकात जायची इच्छा नाही. आपल्या संस्थेत काम करुन मला खूप समाधान मिळतंय. मी माझं आयुष्य फक्त संस्थेसाठीच द्यायचं ठरवलं आहे.  त्यानंतर आम्ही फारच कमी वेळा भेटलो.  जवळपास दोन महिन्यानंतर त्याने मला सांगितलं की त्याने वैशालीशी लग्न करायच ठरवलं आहे. त्याच्या या निर्णयाचं मला खूप आश्चर्य वाटलं. त्याला कारणही तसंच होतं.  वैशाली आमच्याच संस्थेत काम करते. उत्तम पगार असलेली नोकरी सोडून तिने तिचं आयुष्य संस्थेला वाहायचं ठरवलं होतं. 
तो: मग त्यामध्ये काय वावगं आहे? मंदारनेही तसंच ठरवलं होतं ना?
ती: दोन वर्षांपूर्वी वैशालीवर बलात्कार झाला होता आणि त्या घटनेमध्येच तिने दुर्दैवाने आपल मातृत्वही गमावलं. ती कधीही आई होऊ शकत नाही.
तो: काय?
ती: हो. मी मंदारला या निर्णयापासून थांबवायचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझं ऐकलं नाही. त्याने मला सांगितल, "आता तू जरी हो म्हणालीस ना तरीही मी माझा निर्णय बदलणार नाही. तुला काय माझ्यासारखा किंबहुना माझ्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला जोडीदार मिळेल पण वैशालीच काय? कोण स्विकारणार तिला अशा परिस्थितीत? माझं तुझ्यावर प्रेम होतं, आजही आहे आणि कायम राहील. वैशालीलाही मी तुझ्याबद्दल सारं काही सांगितलं आहे.  आपल्यातली मैत्री अशीच कायम राहिल. पण आता काहीही झालं तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. पूर्ण विचार करुन निर्णय घेतलाय मी. काळजी नको करुस."  त्या दिवशी पहिल्यांदा हातून काहीतरी निसटत तर नाही ना? असं वाटत होत मला. कळतच नव्हतं नक्की काय चुकतंय? मला तो खरंच आवडत होता, का त्याच्या मनाच्या मोठेपणामूळे भारावून गेल्यामूळे असं होतय? त्यानंतर महिन्याभरातच मंदार आणि वैशाली लग्न करुन संस्थेच्या एका प्रोजेक्टसाठी नागालँडला निघून गेले. ते निघून गेल्यावर अनेकदा एकटेपणात मी विचार केला. पण तू विचारलेल्या प्रश्नाच खरं उत्तर मला कधीच मिळालं नाही. आज पहिल्यांदाच मी माझ्या मनाची घालमेल कोणाजवळतरी बोलून दाखवतेय. प्लीज तू गैरसमज नको करुन घेऊस."
       काही क्षण शांततेत जातात. कोणीच काही बोलत नाही. तिने सांगितलेलं सारं ऐकून त्याला मंदारबद्दल चूकीचा विचार केल्याचा पश्चात्ताप होतो. तिने 'हो' म्हणावंसं त्याला मनापासून वाटत होतं. तिच्या नकारासाठीही त्याने मनाची तयारी केली होती. पण हे असलं काही समोर येइल ही त्याने अपेक्षाच केलेली नव्हती. पण काहीही न लपवता तिने सगळं खरं सांगितलंच आहे, तर आपणही सगळं खरं सांगावं असा विचार करुन त्याने तिला विचारलं, "तू रागावणार नसशील, तर मी एक गोष्ट सांगू?"
तिने मान हलवून होकार दिला.
 "मी तुला आधीपासूनच ओळखत होतो हे तर मी तुला सांगितलंच आहे पण त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं तर तू मला आवडायचीस, तुला बघण्यासाठी अनेकदा मी या समुद्रकिनारी यायचो. त्या दिवशी तुला मंदारबरोबर बघून मी खूपच अपसेट झालो होतो. पण तरीही तुझ्या ओढीने मी इथे यायचो. तुझ्यामुळेच इथला सुर्यास्त आवडायला लागला मला. अनेकदा वाटायचं तुझ्याशी बोलावं पण कधी हिम्मतच झाली नाही. तुझं स्थळ मला सांगून आलं तेव्हा मला खूप आनंद झाला होता. पण कुठेतरी काहीतरी चुकतंय असं सारखं वाटत होतं. पण काय ते मात्र कळत नव्हतं. तुला भेटून तुझ्याशी बोलायचं मी ही ठरवलं होतं. पण त्याआधीच तुझा फोन आला. मी सुद्धा तुझ्यासारखंच एका प्रश्नाच उत्तर शोधतोय; 'तू मला फक्त आवडतेस का मी प्रेमही करतो तुझ्यावर? खूप प्रयत्न करुनही या प्रश्नाच उत्तर मला मिळाल नाही."  
    काही क्षण पुन्हा शांततेत गेल्यावर कोणीच काही बोललं नाही.  खरंतर काय बोलायचं हे कोणालाच सुचत नाही. अखेर त्याने न राहवून तिला विचारलं,"तू रागावलीस का माझ्यावर?"
ती: नाही रे खरं सांगू मी सांगितलेल जसं तुझ्यासाठी अनपेक्षित आहे तसंच तू सांगितलेलं माझ्यासाठीही अनपेक्षित आहे.
तो: तू मला इथे भेटायला का बोलावलंस?
ती: म्हणजे?मला कळल नाही तुला काय म्हणायचं आहे?
तो: तू आत्ता मला जे काही सांगितलंस ते फक्त मलाच का सांगितलंस? तुला स्थळ म्हणून मी आवडलो होतो का?  
   त्याच्या या प्रश्नावर मात्र ती जराशी लाजली.  तिला असं लाजलेलं बघून तो म्हणाला,  "तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळेल की नाही मला माहिती नाही. पण मला मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर आज इथेच मिळालंय. खूप आवडतेस तू मला आणि मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुला तुझ्या प्रश्नासकट स्विकारायला तयार आहे मी. लग्न करशील माझ्याशी?"
 त्याच्या या प्रश्नावर ती लाजली. तिच्या छातीत अनामिक धडधड सुरु झाली ती स्वतःला सावरत म्हणाली, "स्थळ म्हणून खरंच चांगलं होतं तुझं स्थळ पण तू ही खूप चांगला आहेस. कदाचित मलाही माझ्या प्रश्नाच उत्तर मिळालंय, तू प्रपोज केल्यावर माझ्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या तशा भावना माझ्या मनात मंदारबरोबर असताना कधीच निर्माण झाल्या नव्हत्या. आज अजून एक गोष्ट कबूल करते तुझ्यासमोर 'कॉलेजमध्ये असताना तू खूप आवडायचास मला अनेकदा लायब्ररीमध्ये आपली नजरानजरही व्हायची. पण नंतर तुझ कॉलेज संपल आणि तू निघून गेलास. उगाच मृगजळामागे धावायला नको म्हणून मग मी सुद्धा सगळं विसरायचं ठरवलं. 
"काय? तू खरं सांगतेयस का? त्याने आनंदमिश्रित आश्चर्याने विचारलं.
तिने मानेनेच होकार दिला आणि ओंजळीत आपला चेहरा झाकून घेतला.  सुर्यास्ताच्या साक्षीने दोघांनी एकमेकांशी एकनिष्ठ रहायचं वचन एकमेकांना दिलं. त्यांना एकत्र बघून सूर्यही समाधानाने लाटामध्ये बुडून गेला. 
समाप्त.
©मानसी जोशी 









Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...