Tuesday, 3 October 2017

सनसेट पॉईंट

हिमाचल प्रदेशातल्या एका नदीवरच्या उंच पुलावर उभं राहून 'ती' त्याची वाट बघते असते. अंगावर शाल, मेंदीने भरलेले दोन्ही हात, डोळ्यात प्रचंड विश्वास आणि ओढ. सूर्य हळूहळू डोंगराआड जात असतो. एक क्षण तिच्या मनात विचार येतो,'आता झोकून द्यावं या पुलावरुन स्वतःला!' पण अचानक तिची नजर समोरच्या डोंगरावर जाते आणि ती तशीच शांत उभी रहाते.

तिला तिची आणि त्याची पहिली भेट आठवते.

  तिने त्याच्याकडे मागीतलेली लिफ्ट, पंक्चर झालेला गाडीचा टायर, गाडी स्टार्ट करताना तिच्या तोंडावर उडालेला चिखल आणि मग त्यानंतरचा दोघांनी एकत्र घालवलेला वेळ. याचवेळी त्यांना जाणवलेलं एकमेकांबद्दलच प्रेम आणि नंतरची निरोपाच्या वेळची तगमग. असे एकएक प्रसंग तिला आठवत असतात.

   तिचं लग्न ठरलेलं असतं. तिच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू असतो. तिचे डोळे त्याच्या आठवणींनी भरुन आलेले असतात.

  त्यानंतर कपातून त्याने पाठवलेली अंगठी. हिने बहिणीच्या हातावर मेहेंदीने लिहून दिलेला "sunset point" असा निरोप आणि मग घरातून तिचं पळून येणं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं.

सुर्यास्ताची वेळ अगदीच जवळ येउन ठेपते. त्याच्या येण्याची कुठलीच शक्यता तिला दिसत नाही. आता अंगावरची शाल बाजूला काढून ती पाण्यात उडी मारणार इतक्यात तिला त्याच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. तिचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर हसू येतं आणि मग गुलजार सरांच्या आवाजातली एक अप्रतिम ओळ ऐकू येते-

#वो_देर_से_पहूँचा_था_लेकीन_वक्तपे_पहूँचा...

 #Sunset_point या अल्बममधील कच्चे रंग या गाण्यामध्ये एक रोमॅन्टिक स्टोरी दाखविण्यात आली आहे. अतिशय सुंदर ग्रीनरी, चांगले कलाकार, गुलजार यांचे शब्द, भूपिंदरसिंग आणि चित्राचा आवाज; या सगळ्यामूळे हे गाणं नुसतच श्रवणीय नाही तर प्रेक्षणीयही झालं आहे.   

    मला  #sunset_point लक्षात राहिला तो खास करुन या शेवटच्या ओळींमुळे! "देरसे पहुचा था मगर वक्त पे ...." दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात वापरून किती सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आहे. यासाठी गुलजार सरांना हजारो Hats offfff!!!!!!

     आम्ही कॉलेजला असताना हा अल्बम खूप फेमस झाला होता. त्यावेळी गाण्याचे अनेक चांगले अल्बम्स आलेले होते. त्यावेळचे अल्बम्स ऐकले की nostalgic व्हायला होतं.

    आजकालची गाणी ऐकवत नाहीत. कानठळ्या बसवणारं म्युझिक आणि अर्थहीन शब्द; असली गाणी ऐकून कानावर हात ठेवावासा वाटतो. (अर्थात प्रत्येक पिढीला हे असच वाटत असतं.)  काही गाणी अपवाद असतात पण त्यांच प्रमाण फारच थोडं. आजकालचे अल्बम्स येतात कधी आणि जातात कधी तेच कळत नाही. कधीतरी मिरवणूकीत, दांडियामध्ये ही गाणी ऐकायला येतात. पण तेवढ्यापुरतीच. ती काही संस्मरणीय वगैरे होत नाहीत.

©मानसी जोशी






No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...