Saturday, 5 August 2017

राग आसावरी

राग आसावरी

   आभाळ मायेचे ओथंबून येइल, सुगंधवारे आर्त होतील
    माझा पत्ता विचारत तुझी सर्व दाने आपसूक येतील
    कोण जाणे भविष्यात असेलसुद्धा स्वप्नांची पूर्तता
    या क्षणी मात्र कोमल धैवतांची असीम आर्तता
    भक्ती असो, प्रीती असो, बाण लागतोच जिव्हारी
    जीवाला जडते अनिवार ओढ
     तिचच नाव आसावरी....

      कॉलेजला असताना मला डायरी लिहायची  सवय होती. डायरीमध्ये मी माझ्या मनातलं किंवा कुठेतरी वाचलेलं आणि मनाला भावलेलं असं काहीही लिहित असे. मध्यंतरी माहेरी गेले तेव्हा येताना ती डायरी घेउन आले होते. पण वाचायला वेळच मिळाला नव्हता. काल सहज त्या डायरीची पाने चाळली. त्यातच एका पानावर  'आसावरी' रागाबद्दल लिहिलेल्या या ओळी सापडल्या. दुर्दैवाने लेखकाचं नाव नव्हतं. पण हे ज्यांनी कोणी लिहिलं आहे ते अतिशय अप्रतिम लिहिलं आहे. सहज कुतुहल म्हणून मी गूगलवर 'आसावरी' रागाची माहिती सर्च केली. एका वेबसाईटवर  पंडित भीमसेन जोशींनी या रागाबद्दल सांगितलेली सविस्तर माहिती मिळाली.
    राग आसावरीला 'आसावरी' हे नाव 'सौवरी' हया जवळपास १५०० वर्षांपूर्वीच्या एका प्रदेशाच्या नावावरुन पडले असावे असे म्हणतात.हा प्रदेश दक्षिण सिंध व कच्छची भूमी हयांच्या सान्निध्यात अस्तित्वात होता. या  प्रदेशाची संस्कृती प्राचीन भारतीय संस्कृतीला खूपच जवळची होती.
    आसावरी हे मूळ रागाचे नाव आहे, परंतु पं. विष्णू नारायण भातखंडे हयांनी 'आसावरी' हे थाटवाचक नाव म्हणून पुढे आणले ".
    थाट आसावरीपासून निर्माण झालेल्या राग आसावरी, राग जौनपूरी, राग दरबारी कानडा, राग अडाणा, व राग गंधारी ह्यावर आधारीत एक कथा-सूत्र आहे. सुरांतून जाणवणारी कल्पनाचित्रे अशी-

राग आसावरीचे सूर :  प्रेयसी, म्हणजे आसावरी. साजश्रृंगार करुन अगदी आतुरतेने आपल्या प्रियकराला भेटायला गेलेल्या प्रेयसीला काही कारणावरुन तिचा प्रियकर  निर्भत्सना करुन परत पाठवितो. त्यामुळे आसावरी खिन्न व उदास होऊन माघारी फिरते.

राग जौनपूरीचे सूर : निराश झालेल्या आसावरीच्या मनात आपल्या प्रियकराला भेटण्याची जागृत झालेली आस, त्यामुळे पुन्हा शृंगार करण्याची तीव्र इच्छा  आणि तो परत आपल्याला नाकारेल ही भीती ह्या भावनांचा ऊन-पावसाचा खेळ तिच्या मनात चालू राहतो.
     राग जौनपुरी हा शास्त्रीय संगीत सादर करणा-या गायकांचा आवडता राग! आकाशवाणीवरील गाण्याच्या कार्यक्रमातून सकाळच्या वेळेस हमखास हा राग तुम्हाला ऐकावयास मिळेल. परंतु असे असले तरी राग जौनपुरीत स्वरबध्द झालेली नाटयगीते किंवा चित्रगीते बघावयास मिळत नाहीत.

राग दरबारी कानडा : चंद्रोदय झाल्यावर प्रियकराच्या मनात आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते. तो प्रेयसीकडे जाऊन तिची परत चलण्यासाठी मनधरणी करतो. परंतु प्रेयसी त्याला नकार देते.
   राग 'दरबारी कानडा' हा आसावरी थाटापासून निर्माण झालेला एक सुप्रसिध्द, प्रचलीत व मनमोहक राग. 'मृगनयना रसिक मोहीनी' तसेच, 'रजनीनाथ हा, नभी उगवला' अशी नाटयगीत अथवा झनक झनक, 'ओ दुनियाके रखवाले 'तोरा मन दर्पन कहलाए' अशा अनेक गाण्यांमधून राग 'दरबारी कानडा' हा एकच राग आपल्याला निरनिराळया प्रकारचे रस व भाव व्यक्त करताना दिसतो आहे. जसे श्रृंगार-रस, भक्ती रस, विरह-भावना, इ.

राग अडाणा :प्रेयसीने आपल्या बरोबर चलावे म्हणून उदासीन झालेला प्रियकर तिच्यावर काहिशी बळजबरी करु बघतो परंतु प्रेयसी त्याला झिडकारुन तिच्या सख्यांसमवेत ओढयावर पाणी भरायला निघून जाते.
    राग 'अडाणा' हा आसावरी थाटातील तसा काहीसा अनवटच राग. क्वचित प्रसंगी एखाद्या मैफिलीतून तो गायला गेलेला  आढळेल.

राग गंधारी :प्रियकर आणि प्रेयसीमध्ये गैरसमजाचे वादळ शमून त्यांचे पुनर्मिलन होते.

        मी वाचलेल्या लेखातील माहितीपैकी  काही महत्वाची आणि मला आवश्यक वाटलेली माहिती मी इथे लिहिली आहे. सगळ्याच गोष्टी लिहायला गेले तर ही पोस्ट क्रमश: ठेवून दोन भागांमध्ये लिहावी लागेल. म्हणून मी इथेच थांबते. एका अतिशय सुरेल रागाच्या माहितीसोबत पुन्हा एकदा तुम्हां सर्वांना सुप्रभात!!!

रागाची माहिती:आंतर्जलावरुन साभार
विशेष संदर्भ: www.marathiworld.com
फोटो: गूगलवरून साभार

©मानसी जोशी
०५/०८/२०१७

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...