Friday, 18 August 2017

कथा - एक साधीशी लव्हस्टोरी

एक साधीशी लव्हस्टोरी

त्याने तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती कुठल्यातरी मैत्रीणी बरोबर चक्क भांडत होती.  चिडलेली ती त्याला आवडून गेली. त्याला आवडलेली ती पहिली मुलगी. अगदी त्याच्या मनात होती तशीच होती ती. गोरी, भावूक डोळे, स्टेप कट मारलेले कुरळे केस... .अगदी माधुरीसारखीच..... त्याला माधुरी दीक्षित खूप  आवडायची. कुठेतरी त्याला 'तिच्या' आणि माधुरीच्या चेहऱ्यामध्ये साम्य जाणवलं.  त्याच्या मनात असणाऱ्या 'त्या' खास प्रतिमेमध्ये  ती परफेक्ट बसली.
      तो तेव्हा FYBSC ला होता. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये  प्रॅक्टिकल करताना सहज त्याची नजर खिडकीबाहेर गेली.  लॅबच्या खिडकीसमोरच्या पॅसेजमध्ये ती त्याला दिसली. तिच्या एकंदरीत हावाभावांवरुन  ती भांडतेय हे त्याच्या लक्षात आलं होतं. केमिस्ट्री लॅबसमोरच तिची  क्लासरुम  म्हणजे  ती बारावीला होती हे कन्फर्म होतं. त्यानंतर केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल त्याने कधीही चुकवलं नाही.तेव्हापासून त्याला केमिस्ट्री हा विषय प्रचंड आवडायला लागला होता. तिचं नाव गाव माहिती करायला त्याला फार वेळ लागला नाही. तिला बघता बघता वर्ष कधी सरलं हे पण त्याला कळलं नाही.
    सेकंड इअरचं कॉलेज चालू झालं तेव्हा तो उत्साहाने कॉलेजला गेला पण ती काही दिसली नाही. 'पहिला दिवस म्हणून नसेल आली', असा विचार करुन तो गप्प बसला. पण कॉलेज सुरु होवून महिना झाला तरी तिचा पत्ता नाही म्हटल्यावर तो जरा नाराज झाला. अशातच एक दिवस 'ती' त्याला दिसली.  ती आता त्याची 'ती' राहिली नव्हती. ती पूर्णतः बदलून गेली होती. स्लिव्हलेस टि-शर्ट, थ्री फोर्थ जीन्स आणि मुख्य म्हणजे स्ट्रेट करुन घेतलेले केस;  हा तिचा अवतार बघून तर त्याचा मूडच गेला. नंतर त्याला कळलं, तिची फॅमिली मुंबईला शिफ्ट झाली होती आणि तिने मुंबईच्याच कुठल्यातरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती आणि जाण्यापूर्वी मैत्रीणीना भेटायला म्हणून ती कॉलेजला आली होती. तिच्यानंतर त्याला फारशी कोणी आवडलीच नाही .
     ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यावर MSC साठी तो मुंबईला गेला. तिथे मात्र त्याला एक मुलगी आवडली. त्याच्याच वर्गातली!  लांबसडक केस, गोरी, नाजूक, उंच; अगदी सोनाली बेंद्रेसारखी.... त्याला सरफरोश बघितल्यापासून सोनाली बेंद्रे फार आवडायला लागलेली होती. निदान हिच्याशीतरी बोलायला हवं; म्हणून  काहीतरी कारण काढून त्याने  तिच्याशी ओळख वाढवली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये होइपर्यंत फर्स्ट इअर संपल. सेकंड इअरच्या  पहिल्या सेमिस्टरपर्यंत दोघांची छान मैत्री झाली. पण तिला विचारायची त्याची हिम्मतच झाली नाही. पहिल्या सेमिस्टरचा शेवटचा पेपर झाल्यावर त्याने  तिला विचारायचं ठरवलं. पेपर संपल्यावर तो काही बोलणार इतक्यात तिने त्याच्या हातात एक पाकिट दिल आणि म्हणाली, "माझं लग्न ठरलं! पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे तू नक्की ये हा....". त्याने उसनं हसू चेहऱ्यावर आणून तिचं अभिनंदन केलं. ती निघून गेल्यावर कितीतरी वेळ तो तिच्या साखरपुड्याची पत्रिका बघत राहिला. कसबसं उदासीन झालेलं सेकंड सेमिस्टर पण संपलं. बाकी काही असलं तरी अभ्यासात तो हुशार होता. फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवून तो MAC झाला.
    MAC पूर्ण झाल्यावर सुदैवाने त्याला लगेचच नोकरी मिळाली. हळूहळू तो बिझी होत गेला. इनक्रीमेंट, प्रमोशनच्या चक्रात इतर भावना हळूहळू धुसर होत गेल्या. याच चक्रात काळ वेगाने फिरल्यासारखा वाटला त्याला. नोकरी, प्रमोशन, स्वतःच घर, गाडी या साऱ्यामध्ये चार वर्ष निघून गेली. आता त्याच्या घरी  वेध लागले होते ते त्याच्या लग्नाचे. अधूनमधून स्थळं येत होती. पण  कधी पत्रिका जुळत नव्हती; तर कधी फोटो आवडत नव्हता. अशातच एक स्थळ आलं. मुलगी फोटोवरुन बरी वाटली. पत्रिकाही जुळली. बघण्याचा कार्यक्रम ठरला. त्याने तिला प्रत्यक्ष बघितली आणि ती त्याला आवडली. खरं तर ना ती माधुरीसारखी गोरी होती; ना तिच्यासारखा स्टेप कट होता. ना ती सोनालीसारखी उंच गोरी होती; ना तिचे केस सरळ होते. ती अगदी साधीशी मध्यम उंचीची काहीशी गव्हाळ वर्णाची, केस ना धड  सरळ ना धड कुरळे; ना नाजूक ना गोरी. पण तरीही ती त्याला आवडली ते तिच्या मोहक हसण्यामुळे आणि प्रीती झिंटासारख्या गालावर पडणाऱ्या खळीमुळे ! नाही नाही.....  त्याला प्रीती झिंटा आवडायला लागली नव्हती. त्याला ती आवडली होती आणि तिच्यामुळे प्रीती झिंटा आवडायला लागली. ती त्याच्या आयुष्यात प्रीती घेउन आली आणि त्याची सौ. झाली. बाकी त्याच्या आयुष्यात आलेल्या माधुरी, सोनालीपेक्षा 'ती' त्याला जास्तच आवडली कारण ती एकमेव अशी मुलगी होती, जी कोणासारखी असल्यामुळे नव्हे तर ती जशी आहे तशीच त्याला आवडली आणि मुख्य म्हणजे तो ही तिला आवडला. लव्ह मॅरेज  प्रत्येकाचच होतं असं नाही पण अशी एखादी (बहुदा अनेकांची ) अरेंज्डवाली लव्ह स्टोरीसुद्धा खूप काही सांगून जाते.
©मानसी जोशी
फोटो - गूगलवरून साभार


2 comments:

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...