Tuesday, 22 August 2017

संपूर्ण स्त्री

"संपूर्ण स्त्री फार कमी लोकांना मिळते.... !!!"
अमृता प्रीतम यांच्या या वाक्यावर आधारीत  अनेक पोस्ट्स वाचनात आल्या आणि माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, 'संपूर्ण' म्हणजे नक्की कशी?" गेले काही दिवस याच प्रश्नाचा विचार करत होते मी. 'संपूर्ण' म्हणजे परिपूर्ण! पण या जगात १००% परफेक्ट असं कोणीच नसतं. 'संपूर्ण स्त्री'  ही  केवळ शारीरिक सुखापूरतीच मर्यादित नाही तर मानसिक तसच बौद्धिक सुखाशीही निगडीत आहे. खरच अशी परिपूर्ण स्त्री अस्तित्वात असेल? माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिसापेक्ष तर  आहेच पण त्या ही पुढे जाऊन मी म्हणेन ते कालसापेक्षही आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आवडीनिवडी, विचार सारं काही बदलत असतं. लहान वयात आदर्श वाटणारी स्त्री म्हणजे आई, मावशी,  मामी, काकू किंवा अगदी आपल्या टिचर, अशी कोणीतरी जवळची स्त्री ज्या स्त्रीविषयी आपल्याला प्रचंड आदर वाटतो, विश्वास वाटतो. अर्थात त्या वयात बाकी इतर कुठल्याही भावना नसतात.  पुढे थोडं मोठं झाल्यावर एखाद्या चित्रपटातील  किंवा टिव्ही  मालिकेतली नायिका अथवा एखाद्या कथेमधली एखादी नायिका /व्यक्तीरेखा मनाला आवडून जाते आणि मग तिच आदर्श वाटायला लागते. उमलतं तरुण वय असतं. या वयातच  'अपॉझिट सेक्स ॲटरॅक्शन' हळूहळू निर्माण होत असतं. मग नकळतपणे डोक्यात फिट बसलेल्या व्यक्तिरेखेचा शोध घेतला जातो.त्यावेळेस एखादी मुलगी आवडून जाते. आणि काही काळासाठी तरी का होईना ती परिपूर्ण वाटू लागते. पुढे शिक्षण, अनुभव यामुळे विचार प्रगल्भ होत जातात आणि 'परिपूर्ण अथवा संपूर्ण स्त्री'ची व्याख्या बदलत जाते. पुढे जाऊन वाढतं वय, अनुभव, पैसा, स्टेटस या गोष्टीही 'संपूर्ण स्त्री' ची व्याख्या बदलायला कारणीभूत ठरतात. कारण ही संपूर्णतेची अपेक्षा  निव्वळ शारीरिक नसते तर ती मानसिक आणि बौद्धिकही असते. या तिन्ही पातळ्यांवर परिपूर्ण ठरणारी स्त्री अस्तित्वात असणं हेच मुळात कठीण आणि जरी एखादी अशी समोर असलीच तरी तिला आपलसं करणं तर महाकठीण. थोडक्यात काय तर आयुष्यभरासाठी संपूर्ण  स्त्री लाभणे हे जवळपास अशक्यच! कारण एखाद्या वयात परिपूर्ण वाटणारी स्त्री काही वर्षांनंतर अपूर्णही वाटू शकते.
      जो नियम 'स्त्री'च्या बाबतीत तोच पुरुषांच्या बाबतीत. परिपूर्ण पुरुष मिळणंही तसं कठीणच.कारण परिपूर्णतेची व्याख्याच मुळात व्यक्तीपरत्वे आणि कालपरत्वे बदलत जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर, माझी एक मैत्रीण आहे. कॉलेजला असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता. तो मुलगा म्हणजे अगदी 'आयडिअल' या कॅटेगरीतला. सिन्सिअर, हुशार, हॅन्डसम, निर्व्यसनी, वगैरे. दोघांच्याही घरी माहित होतं. पुढे तो ME करण्यासाठी दुसरीकडे गेला. त्याचं ME पूर्ण होवून त्याला चांगली नोकरीही मिळाली. पण हिला लवकर लग्न करायचं नव्हतं. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ती पुण्याला गेली. तिथे तिला त्यांच्याच ग्रूपमधला एक मुलगा आवडला. तो याच्या बरोबर विरुद्ध. आधीच दोन गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झालेला. ड्रिंक पार्टीज,पब, फ्लर्टिंग हे सारं काही करणारा. थोडासा आधुनिक विचारांचा बिनधास्त मुलगा.दोघांचे विचार जुळले, मनं जुळली आणि दोघं जवळ आली. तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिलाही नोकरी मिळाली. तिने या दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय तिच्या घरच्यांसकट सगळ्यांनाच धक्कादायक होता. घरच्यांनी तिला  समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर नाईलाजाने घरच्यांनी होकार दिला आणि तिचे लग्न झाले. या घटनेला जवळपास ७/८  वर्ष होवून गेली. मध्यंतरी ती मला भेटली होती. फारशी खूष दिसली नाही. विचारलं तर म्हणाली, 'कधीकधी वाटतं ग मी चूक केली. बाकी सगळं व्यवस्थित चाललं आहे आमच्या दोघांमध्ये पण कधीकधी काही गोष्टी खटकतात. त्याचं  बिनधास्त नोकऱ्या बदलणं, समाजाचे नियम धाब्यावर बसवणं; हे सारं खटकतं.  माहिती नाही काही पण काहीतरी अपूर्ण वाटतं संसारात. मग मन नकळत दोघांची तुलना करतं आणि भानावर आल्यावर अपराध्यासारखं वाटायला लागतं. त्यावेळी मी लग्नाचा निर्णय घेतला कारण,  त्याच्या सहवासात मनाचं मोहरुन जाणं, त्याचा स्पर्श हवाहवासा वाटणं, त्या स्पर्शामुळे अंगात सळसळणारी लहर, या साऱ्या भावना मी अनुभवल्या ज्या मी पूर्वी कधीच अनुभवल्या नव्हत्या. इतकच नव्हे तर त्याचे आणि माझे विचार जुळत होते. कोशात राहून विचार करणाऱ्यातला तो नव्हता. या साऱ्यामुळे  माझं मन त्याच्याकडे ओढ घेत गेलं. आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलो. असं असताना मनाविरुद्ध लग्न नव्हतं करायचं मला....." खूप वेळ बोलून ती शांत झाली आणि मग तिने मला  विचारलं, "तुलाही असच वाटतं का ग की मी तेव्हा चुकीचा निर्णय घेतला?".तिची अवस्था बघून मला खरं तर वाईट वाटलं. तिला समजावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे आहे ते स्विकारायला हवं, हे पटवून देणं मला जास्त महत्वाच वाटलं. म्हणूनच कुठलाही दोषारोप न करता मी तिला सांगितल, "त्यावेळी तुझा निर्णय चुकीचा होता असं मलाही वाटलं होतं. पण आता नाही तसं वाटत. कारण त्यावेळी तुला तुझ्यासाठी जो सुयोग्य किंवा परिपूर्ण वाटला, तू त्याची निवड केलीस. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली परिपूर्णतेची व्याख्या बदलत जातात. निर्णय हा चूक किंवा बरोबर हे येणारा काळ ठरवतो. आपल्या आयुष्याचा निर्णय आपण मनापासून घेणं हे आवश्यक असतं.  त्यावेळी तू जो निर्णय घेतलास तो तुझ्या दृष्टीने योग्य होता. तेव्हा जर  मनाविरुद्ध निर्णय घेउन लग्न केलं असतस तर तू कधीच सुखी झाली नसतीस आणि स्वतःलाच दोष देत बसली असतीस. ही नकळत होणारी तुलना कदाचित त्या परिस्थितीतही झालीच असती. तेव्हा चूक बरोबर या चक्रात न अडकता घेतलेला निर्णय योग्यच आहे  असा विचार कर. त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी बघ. परिपूर्ण कोणीच नसतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मर्यादा पुरुषोत्तम राम हाच आदर्श वाटेल असं नाही. कधीकधी खट्याळ कृष्णही तेवढाच आदर्श वाटू शकतो".
   तिच्या मनातला सगळा गोंधळ दूर झाला .मला थॅंक्स म्हणून ती समाधानाने घरी गेली. तिच्या प्रश्नाला उत्तर देताना, मला माझ्या मनातल्या 'संपूर्ण किंवा परिपूर्ण' म्हणजे नक्की कसं? या प्रश्नाचं उत्तरही मिळालं.
©मानसी जोशी
   

   

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...