Thursday, 3 August 2017

मांडवाखाली

मांडवाखाली !फार पूर्वीच्या काळी वधूच्या घरासमोरच्या अंगणातच लग्न लागत असत. अंगण सारवून मांडव म्हणजेच मंडप घातला जात असे. काळानुसार घरं लहान होत गेली, फ्लॅट सिस्टिम अस्तित्वात आली. अंगणं नष्ट झाली आणि विवाहकार्यासाठी कार्यालय, हॉल, लॉन या संकल्पना अस्तित्वात आल्या. लग्न कुठेही झालं तरीही लग्नमंडपात घडलेल्या घडामोडींना आजही 'मांडवाखाली' घडलेल्या घटना असच म्हटलं जातं.
        किती वेगळं असतं लग्नमंडपातलं वातावरण. सनईचे मंजूळ स्वर कानावर पडत असतात. वरपक्षाच्या आणि वधूपक्षाच्या खोलीत नटणाऱ्या मुलींची, स्त्रीयांची  धावपळ चालू असते. नटलेल्या करवल्या उगाचच  इकडून तिकडे फिरत असतात. चहा कॉफीच्या स्टॉलजवळ गप्पांचा फड रंगलेला असतो. रात्रभर प्रवास करुन खास लग्नासाठी आलेला एखादा पाहुणा, 'यायलाच हवं! आलो नसतो तर मला जिवंत सोडलं नसतं तिने/त्याने' असं म्हणत उत्सवमूर्तीशी असलेली आपली जवळीक दाखवून देत असतो. लहान मुलांना खेळायला भरपूर जागा आणि समवयस्क मित्र मंडळी मिळाल्याने मुलं प्रचंड आनंदात इकडून तिकडे धावत खेळत असतात. त्यातलच एखादं मुल धडपडतं. त्या मुलाची आई मग आतल्या खोलीतून बाहेर येते आणि  गप्पांचा फड जमवून बसलेल्या त्या मुलाच्या बाबांवर वैतागते, 'एक दिवस पण नीट लक्ष ठेवता  येत नाही का? असं म्हणून त्या  मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून वैतागून पुन्हा आत निघून जाते. चिडलेलं ते मुल आणि त्याचे  'बिचारे' बाबा मग शांतपणे बसून रहातात.
     एखादा तरुणांचा ग्रूप कार्यालयात नटून सजून फिरणाऱ्या  करवल्यांकडे बघत आपल्या  सौदर्यदृष्टीला आव्हान देत त्यामध्येच कोणी 'खास' दिसतेय का ते शोधत असतो. या सगळ्या गदारोळात मात्र एखाद्या 'त्याची' नजर आदल्या दिवशीच मनात भरलेल्या 'तिला' शोधत असते. 'ती' दिसल्यावर मात्र तो मनोमन सुखावतो. लग्नातच लग्न जमतात ती अशी.
      सगळे जण आपाआपल्या परीने एंजॉय करत असताना मात्र ज्यांच लग्न आहे ते 'वर आणि वधू' मात्र भटजी सांगतील तसं करत, मख्ख चेहऱ्याने विवाहविधी पाडत असतात.
      हळूहळू हॉलमधली गर्दी वाढायला लागते. वेगवेगळ्या ठिकाणी गप्पांचा फड रंगलेला असतो. अचानक खूप वर्षांनी भेटलेल्या सग्या सोयऱ्याशी हितगुज सुरु होतं. नाष्ट्याच्या टेबलाजवळची गर्दी वाढायला लागते. तर दुसरीकडे नवऱ्या मुलासाठी रुखवताच्या जेवणाचं ताट सजवलं जातं. या रुखवताच्या जेवणाच्या वेळची एक गम्मत आठवली.
       आमच्या ओळखीतलं एक लग्न होतं. मुलीकडची मंडळी फार हौशी. त्यांनी अनेक वेगवेगळे पदार्थ  अतिशय उत्कृष्टरित्या एका सुबकदार ताटात  मांडून ठेवले होते. ताटाभोवतीची सजावटही अतिशय सुंदर होती. नवरा मुलगा येउन बसणार तोच दिड पावणे दोन वर्षाचा एक छोटा मुलगा पळत येउन त्याच्या जागेवर बसला आणि काही केल्या तिथून उठेना. अखेर नवऱ्या मुलाने गोड बोलून त्याला मांडीवर बसायला तयार केलं आणि त्या मुलाला मांडीवर घेऊन जेवायला बसला. तेवढ्यात मुलाचा एक मित्र आला आणि म्हणाला, 'काय हे लग्नाआधीच प्रॅक्टिस सुरु ?' तेवढ्यात वराचा  दुसरा एक मित्र आला आणि म्हणला, 'ये कब हुवा? ते पण लग्नाआधी?' त्या दोघांचं  हे बोलणं ऐकून सगळे हसायला लागले. पुढे जेवण होइपर्यंत तो मुलगा नवऱ्या मुलाच्या मांडीवर बसून  होता. अशा अनेक गमतीजमतीने सजलेली असते लग्नमंडपातली सकाळ. आणि हो सकाळच हा! कारण एकदा का लग्न लागलं कि हळूहळू सगळा उत्साह आणि करवल्यांचा मेकअपही ओसरत जातो. आलेल्या पाहुण्यांना जेवून ऑफिसला किंवा घरी जायची घाई असते.नवरा नवरी फोटोसेशनमध्ये व्यस्त होतात.या जेवणाची घाई आणि फोटोसेशनच्या गमतींबद्दल बोलायचं तर एक वेगळी पोस्टच लिहावी लागेल त्यावर. बाकी या सगळ्या कार्यक्रमांनंतर शेवटी होणारा पाठवणीचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा. सगळं हसरं वातावरण एकदम गंभीर होवून जातं. आसू आणि हसू डोळ्यात घेउन नववधू एक नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी पुढे पाऊल टाकते. हसत हसत सुरु झालेला हा विवाहसोहळा डोळ्यात आनंदाचे आणि दु:खाचे अश्रू एकत्रीत करुन संपन्न होतो.
     

©मानसी जोशी


No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...