Thursday, 7 June 2018

छोटी छोटी बाते

काही दिवसांपूर्वी सकाळी एक मॅडम वन वे तून रॉंग साईडने वेगाने गाडी चालवत समोरून आल्या. सकाळची वेळ त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक नव्हते त्यामुळे माझ्याही गाडीचा स्पीड काही कमी नव्हता. पण सुदैवाने माझी गाडी कंट्रोल झाली आणि अपघात टळला. गाडी थांबवल्यानंतर त्या मॅडम चिडून मलाच म्हणतात, "किती स्पीडमध्ये गाडी चालवता?"
  यावर मी शांतपणे म्हटल, "तुम्ही रॉंग साईडने गाडी चालवताय मॅडम.. "
    यावर मात्र मॅडम गप्प राहिल्या आणि शांतपणे निघून गेल्या.
    घरी आल्यानंतर हे सगळ अहोंना सांगत असताना, मी रागारागाने म्हणाले, एवढ्या महागड्या गाड्या घेतात पण साधे ट्रॅफिक रुल्स फॉलो करता येत नाहीत या माणसांना.. आणि वरती मलाच म्हणते, "गाडी स्पीडमध्ये चालवता...म्हणून
     यावर बाजूला बसलेली माझी लेक मला म्हणाली, "आई, तू कधीच ट्रफिक रुल्स तोडले  नाहीस आजपर्यंत?"
      या प्रश्नाने मात्र माझ्या डोक्याचा चढलेला पारा झटकन खाली आला. खरतर मी नेहमी ट्रॅफिक रुल्स फॉलो करते. पण कधीकधी घाईगडबडीत असताना सिग्नल लाल झाला तरी बाकीच गाड्यांबरोबर मी माझीही गाडी दामटवते.
      कॉलेजला असताना मैत्रीणीशी गप्पा मारत गाडी चालवत असताना  नव्यानेच चालू झालेला सिग्नल तोडला होता. ट्रॅफिक हवालदारने थांबवल्यावर मनातून खूप भीती वाटली होती. टॅफिक हवालदारने लायसन ताब्यात घेतल. पोलिसांनी पकडण्याची पहिलीच वेळ. त्यामुळे प्रचंड घाबरले होते. तेव्हा मोबाईलही नव्हते की सहज कोणाला फोन करु शकेन. त्यावेळी प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे अस सांगून कशीबशी स्वतःची सुटका करुन घेतली होती.  बाकी कुठल्या गोष्टीपेक्षा घरचे ओरडतील आणि गाडीची किल्ली काढून घेतील; ही भीती जास्त होती.
    एकदा एका मैत्रीणीची गाडी बंद पडली म्हणून कॉलेजला जाताना तिलाही गाडीवर घेतल. एक मैत्रीण आधीच माझ्याबरोबर होती. सकाळी कुठे असतात पोलिस असा विचार करुन  एका गाडीवर तिघीजणी बसून  कॉलेजला जात असताना नेमका ट्रॅफिक पोलिस समोर. खरतर एवढ्या सकाळी कधी ट्रफिक पोलिस नसायचे रस्त्यावर. पण म्हणतात ना, 'अपना तो बॅडलक ही खराब हैं ... ..
 पोलिस काही बोलणार इतक्यात मी म्हटल,  "ओ काका जाऊद्या ना परीक्षा चालू आहे."
   यावर ट्रॅफिक पोलीसही वैतागून म्हणाले, "जा आणि जाताना अजून दोघींना गाडीवर बसवून घेऊन जा... "
    खरतर परीक्षा वगैरे काही चालू नव्हती पण जरा साळसूदपणाचा आव आणून रडवेल्या चेहऱ्याने बोलले इतकच.
     एकदा ट्रॅफिकमधून  रॉंग साईडने ओव्हरटेक करताना अचानक सिग्नल पडला. गाडी थांबवताना एका कोऱ्या करकरीत होन्डा सिटीच्या आरशाला माझ्या गाडीचा आरसा लागला. सुदैवाने काही झाल नाही पण ड्रायव्हिंग सीटवरच्या माणसाने माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. तो काही बोलायच्या आधीच मी शांतपणे 'सॉरी' म्हणाले. सॉरी ऐकून तो ही  हसून हात करुन, "नो प्रॉब्लेम" म्हणाला. एका 'सॉरी' या शब्दामुळे त्याच्या रागाचा पारा खाली होता.

काही दिवसांपूर्वी भाजी घ्यायला गेले होते. भाज्या भरपूर महाग झाल्या होत्या.
"फ्लॉवर कसा?"
"४० रुपये पाव", भाजीवाला
"काय स्वतःसकट रेट लावलास की काय?" माझ्या बाजूच्या मॅडमनी विचारल.
     यावर मात्र भाजीवाला भडकला आणि भाजीच्या दरांपासून पेट्रोल, ट्रान्सपोर्ट, ट्रॅफिक प्रॉब्लेम्स, राजकारणी यावर तावातावाने बोलू लागला. आता हा इकॉनॉमिक्समध्ये घुसतोय की काय या भीतीने मी विचारल.
" गवार कशी ?"
"६० रुपये पाव"
"काय ?" माझ्या बाजूच्या मॅडम जवळपास किंचाळल्याच.
  " गवारीला बहुदा बायको पोरांसकट रेट लावलाय". मी
यावर मात्र भाजीवाल्यालाही हसायला आल आणि तो इकॉनॉमिक्सपर्यंत पोचता पोचता वळून पुन्हा भाजीपाशी आला.
 
 आमची कन्यका खेळता खेळता भांडण झाल म्हणून चिडून घरी निघून आली. घरी आल्यावर भांडणाचा इतिवृत्तांत कथन करुन झाल्यावरही मॅडम काही शांत बसत नव्हत्या. शेवटी वैतागून मी म्हटल,  "बास ग जाऊदे आता शांत बस."
   यावर आधीच चिडलेली लेक अजून चिडली आणि म्हणाली, "नाही मला खूप राग आलाय मी शांत बसणार नाही".
   यावर अहो पटकन म्हणाले, "बरं शांत बसू नकोस, शांत उभी रहा." 
    त्याच्या या बोलण्यावर मात्र आम्हाला दोघींनाही हसायला आल.
     आयुष्याच्या प्रवासात अशी अनेक छोटी छोटी बाते घडत असतात. जी आठवून नेहमीच चेहऱ्यावर हसू उमटत.
©मानसी जोशी
 




No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...