एका जंगलात अनेक प्रकारचे प्राणी रहात होते. वाघ, सिंह, कोल्हा, लांडगा, तरस, ससा, इतकंच काय तर आजूबाजूच्या जंगलातून आलेले मायग्रेटेड’ पक्षीही रहात होते. जंगलात लोकशाही होती त्यामुळे जंगलात ‘सर्वाना समान अधिकाराचा’ कायदा होता. हा कायदा म्हणजे जंगलातील सर्वात मोठा विनोद होता. कारण वाघ आणि सिंह सोडले तर इतर प्राणी (जंगलातील शासनाच्या मते) तुलनेने कमी ताकदीचे असल्यामुळे त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या सोई सुविधा होत्या. सुरुवातीला कमी ताकद असणाऱ्या प्राण्यांची संख्या मर्यादित होती. पण नंतर मात्र या मोफत मिळणाऱ्या सुविधांच्या मोहाला भुलून अनेक प्राण्यांनी स्वतःला कमी ताकदवान असल्याचं सिद्ध करत ‘कमी ताकदवान’ प्राण्यांच्या गटात स्थान मिळवले. हे सगळं हास्यास्पद असलं तरीही ते खरं होतं. इतर जंगलांमधील सर्व प्राणी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून गुण्या गोविंदाने समानतेच्या अधिकाराने जगत होते. त्यामुळे ती जंगले ‘प्रगत’ जंगलांच्या यादीत अव्वल क्रमांकावर होती. पण या जंगलातले मात्र सगळे नियमच वेगळे होते.
एक दिवस काय झालं, वाघाला वाटलं बाकीच्या प्राण्यांना एवढ्या सुविधा आहेत मग मला का नाहीत? वाघ ताकदवान होता. खरं तर त्याला अशा मोफतच्या सोईसुविधांची गरजच नव्हती. पण तरीही त्याने या सुविधा मिळविण्याचा चंगच बांधला. यामागे दोन कारणे होती. पहिली म्हणजे बाकीच्या प्राण्यांना विनाकारण मिळणाऱ्या सोई सुविधांची किंमत त्याला त्याच्या कमाईतून चुकवावी लागत होती आणि दुसरं म्हणजे इतरांना मिळणाऱ्या या मोफत सुविधांमुळे मनात निर्माण झालेली असूया.
जंगलाच्या शासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला. कारण वाघ पडला ताकदवान प्राणी. त्याला कमी ताकद असलेल्या प्राण्यांच्या गटात कसं टाकणार? इकडे कमी ताकद असलेले काही प्राणी विनासायास सगळं मिळत असल्यामुळे ताकदवान होऊ लागले होते. वाघाला ते सहन होत नव्हतं. त्यामुळे वाघही जिद्दीला पेटला. काहीही झालं तरी त्याला या सुविधा हव्याच होत्या. खरंतर अशा परिस्थितीत आपल्या समूहाच्या ताकदीचा वापर करून वाघाने ‘इतर प्राणी ताकदवान झाले आहेत’, हे सिद्ध करून प्राण्यांच्या गरजेनुसार सोई-सुविधा पुरविण्याची मागणी करायला हवी होती. परंतु वाहत्या गंगेत हात धुवून घेण्याची इच्छा एवढी तीव्र होती की मूळ मुद्दा बाजूलाच राहिला आणि मग त्याने साम, दाम, दंड, भेद असे सारे मार्ग अवलंबत आपल्याला हवं ते मिळवलं.
इकडे सिंह मात्र शांत होता. त्याचा नेहमीच स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास होता. कुठल्याही सोई सुविधा न मिळवता आपली प्रगती करत होता. वाघासकट जंगलातले बरेचसे प्राणी सिंहाचा दुस्वास करत असत. सतत सिंहाला बदनाम करायचा प्रयत्न करत असत. पण सिंह त्यांना कमी ताकदवान आणि मंद बुद्धीचे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असे. क्वचित कधी स्वाभिमानाला आव्हान मिळाल्यावर नीतिमत्तेच्या मार्गाने या साऱ्याला उत्तरही देत असे.
आता जंगलातले सगळेच प्राणी ‘कमी ताकदवान’ झाले होते. त्या जंगलात एकमेव ‘ताकदवान’ प्राणी होता तो म्हणजे सिंह! या सिंहाला मोफतच्या सोई सुविधांची कधीच अपेक्षा नव्हती पण जंगलात चाललेल्या ‘जंगल राजचे’ परिणाम बघता सिंहांची इतर सर्व प्राण्यांच्या सोई सुविधांचा खर्च उचलायची तयारी नव्हती. पण कर्तुत्वावर विश्वास ठेवणाऱ्या सिंहाला मोफतच्या सुविधांची भीक मंजूर नव्हती.या साऱ्यामध्ये सिंहाची फक्त एकच अपेक्षा होती; ती म्हणजे ‘कमी ताकदवान’ प्राण्यांनी ‘ताकदवान’ प्राण्यांच्या गटात (म्हणजे फक्त एकट्या सिंहाच्या गटात) येऊ नये. आता मला सांगा यामध्ये सिंहाच काय चुकलं?
तळटीप: सदर गोष्ट ही निव्वळ मनोरंजनासाठी लिहिलेली असून याचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक अशा कुठल्याही गोष्टीशी संबंध नाही. असा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment