Sunday, 19 August 2018

पेरेंटिंग डायरी

"चल आवर पटापट, उशीर होतोय...
किती पसारे करतेस ग घरात....
अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी आवडतात ....
मुलांना जवळपास रोजच या ना त्या कारणाने आपण ओरडत असतो. पण काही वेळा मुल इतक चांगली वागतात की आपण सहज बोलून जातो, "I am proud of you".
    आईचे कानातले, गळ्यातले अशा वस्तू वापरणाऱ्या मुली जेव्हा, "आई तुझा टॉप मला होतो मला देशील वापरायला ?" अस म्हणतात तेव्हा मात्र आपली लेक आता मोठी होतेय अशी जाणीव होते. अशावेळी मन मात्र म्हणत असत, "नको ग मोठी होवूस इतक्या लवकर. ही दुनिया इतकी साधी नाहीये. तुझी छोटीशी दुनियाच खूप छान आहे". अशावेळी काही प्रसंग मात्र या दुनियेत जगायला आपली मुल सक्षम बनत आहेत याची जाणीव करुन देतात.
    लेकीच्या शाळेत परवा युनिट टेस्टचे पेपर्स मिळाले. सायन्सच्या पेपरमध्ये नेहमी पैकीच्या पैकी मार्क मिळवणाऱ्या कन्येला यावेळी 20 पैकी 18 मार्क्स मिळाले होते. यावर लेकीने सांगितले आई आज टिचरनी माझ खूप कौतुक केल.
"का Highest आहेस का तू ?" मी
"नाही ग.  मी डायग्रामला लेबलिंग केल नव्हत तरी टिचरनी मला डायग्रामचे सगळे मार्क्स दिले होते आणि बाकिच्यांचे मार्क्स कट केले होते. मी टिचरना सांगितल्यावर त्यांनी माझे दोन मार्क्स कट केले आणि म्हणाल्या 'clap for Chinmayee for her honesty”
     लेकीच हे बोलण ऐकून तिचा खूप  अभिमान वाटला. आजपर्यंत आपण केलेल्या संस्कारांच चीज झाल्यासारख वाटल. खूशीतच तिला  कॅडबरी सिल्क मंजूर करुन टाकली.
    फ्रेंडशिप डे च्या दिवशी आणलेल्या फ्रेंडशिप बॅंडच्या रोलचे बारीक बारीक तुकडे करत होती. मी ओरडून विचारल, "बॅंडच बंडल आण म्हणून  हट्ट केलास आता आणून दिला तर त्याची अशी वाट लावायची का?"
"आई वाट नाही लावत ग हे बॅंड मी कुंडीतल्या झाडांना बांधणार आहे. झाडे आपली मित्र असतात ना म्हणून.” हा विचार माझ्या मनातही आला नाही.
    "आई शनिवार वाड्यात भूत असत का? "
असे प्रश्न आले की जरा विचारपूर्वकच उत्तरे द्यायला लागतात.
"तू बघितल आहेस का भूत?" मी
"नाही."
"मग जी गोष्ट बघितली नाही ती आहे अस कस म्हणायच ?"
"आई, मग देव तरी कुठे बघितलाय आपण ? तरी आपण तो आहे अस मानतोच ना ?"
हे वाक्य ऐकून कितीतरी वेळ चर्चा झाली.  शेवटी या जगात जशा चांगल्या  शक्ती  असतात तशा वाईटही असतात आणि वाईट शक्तींना भूत अस म्हणतात. हे वाक्य बोलून मी वादातून सपशेल माघार घेतली.
    कालपरवा पर्यंत भातुकली घेऊन खेळणारी , ओढणीची साडी नेसून बाहुलीशी खेळणारी आपली मुलगी कधी एवढा विचार करायला लागली हे कळलच नाही. मन मात्र अजूनही  लहानपणी आईच्या कूशीत झोपणाऱ्या, मऊ भाताचे चार घास जेवताना  घरभर फिरणाऱ्या, खेळून आल्यावर इवलेसे हात गळ्यात टाकून गोड गोड पापा घेणाऱ्या चिन्मयीमध्येच अडकलय.
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...