Sunday, 30 July 2017

आजोबा - बालपणीची एक आठवण

"प्रभाती सूर नभी रंगती दश दिशा भूपाळी म्हणती"

    लहान असताना माझी सकाळ बऱ्याचदा या अशा सुरेल  गाण्यांनी व्हायची. रेडिओवर एकापेक्षा एक सरस गाणी चालू  असायची. बाबा  अंगणात पेपर वाचत बसलेले असायचे. आई किचनमध्ये पोळ्या करत असायची. आई पोळ्या करायला लागली कि लगेच आमच्याकडच्या मनीमाऊला कसं कळायचं कुणास ठावूक? पण ती  कुठेही असली तरी पळत घरात यायची आणि   'म्याव म्याव' करत आईच्या पायाजवळ घुटमळायची.  आईने गरमगरम पोळी तिला तुकडे करुन घातली कि ती खाऊन मिटक्या मारत बाहेर जायची. तेव्हा आम्ही रत्नागिरीजवळच्या कोतवडे या गावात रहात होतो.आई तिथल्याच शाळेत शिक्षिका होती त्यामुळे बालपणाचा बराचसा काळ या गावात घालवला आहे. आमच्या घराजवळच रहाणारे एक आजोबा रोज न चुकता आमच्याकडे चहा प्यायला यायचे. पु. ल. देशपांडेंच्या अंतू बर्वा या व्यक्तिरेखेशी बरचसं साधर्म्य असलेले हे आजोबा तिथले खोत म्हणून प्रसिद्ध होते. निटसं आठवत नाही पण या आजोबांना बहुदा मुलबाळ कोणीही नव्हत. एक पुतण्या होता पण तो ही मुंबईला  रहायचा. एका मोठ्या घरात ते एकटेच रहायचे.घर कसलं मोठा वाडाच होता तो. त्यांच्या घराजवळ दोन विहिरी होत्या. त्यातल्या एका विहिरीवर वाडीतली लोकं पाणी भरण्यासाठी जात असत. दिवसभर या विहिरीवर पाणी भरायला येणाऱ्या माणसांशी गप्पा मारण्यातच आजोबांचा वेळ जायचा. गावात त्यांना बऱ्यापैकी मान होता. या आजोबांना चहासोबत  पेपर लागायचा. त्यामुळे आजोबा यायच्या आधी बाबा घाईघाईने पेपर वाचून घ्यायचे. कारण आजोबा एकदा पेपर  वाचायला बसले की मग ते  जवळपास अर्धा पाऊण तास पेपर वाचत बसायचे. वाचता वाचता प्रत्येक बातमीवर मार्मिक टिपणी असायची. पेपर वाचून झाला कि मग एखादी गरमागरम पोळी खाऊन ते आपल्या घरी जायचे. क्वचित कधी पेपरवाल्याला उशीर झाला आणि आजोबा आलेले असले की मग ते त्या पेपरवाल्याची 'अंतूबर्वा' स्टाइलमध्ये उलटतपासणी घेत असत. अर्थात त्यांना ना पेपरवाल्याने  कधी  उलट उत्तर दिलं ना बाबांनी . हे आजोबा रोज घरी यायचे पण  याबद्दल कधी आई बाबांनी तक्रार केल्याचं आठवत नाही. उलट एखाद्या दिवशी आजोबा आले नाहीत किंवा त्यांना यायला  उशीर झाला तर आईला काळजी वाटायची. बाबाही मग म्हणायचे 'थोडा वेळ वाट बघूया नाहीतर जाऊन येतो त्यांच्या घरी'. आमच्या घरातलेच होवून गेले होते ते एक. कधी ते आजारी असले कि मग आई त्यांच्यासाठी जेवणाचा डबा द्यायची. कधीतरी त्यांना गरम मसाल्याची आमटी खायची लहर यायची.  संध्याकाळी आई शाळेतून येताना दिसली की लगेच पुढे होवून तिला सांगायचे, 'सूनबाई, चुलीत कांदे टाकलेत हो भाजायला....’ त्यांच्या या वाक्यावरुन आई समजून जायची 'आज गरम मसाल्याची आमटी करायचा बेत आहे'.
      काही कारणांनी नंतर आम्ही घर बदललं. आम्ही जाताना आजोबांचे डोळे पाणावले होते. आजोबांचं  सकाळी येणं बंद झालं असलं  तरीही ऋणानुबंध संपले नाहीत. आईने कधी भजी , थालीपीठ असले काही खास  पदार्थ केले की आठवणीने त्यांना डबा पाठवून द्यायची. अधूनमधून ते ही आमच्याकडे येत असत.येताना आठवणीने आमच्यासाठी चणे शेंगदाणे किंवा लिमलेटच्या गोळ्या आणायचे.हळूहळू वयोमानानुसार त्यांचं बाहेर फिरणं कमी झालं. नंतर आम्हीही रत्नागिरीला शिफ्ट झाल्यामुळे फारसा संपर्कही उरला नाही. हे आजोबा ना आमच्या नात्याचे ना गोत्याचे पण तरीही त्यांच एक वेगळच नातं जुळलं होतं आमच्या घराशी . काही माणसांशी कुठलंही नातं नसतं पण त्यांच्याशी कुणास ठावूक कसे पण छान ऋणानुबंध जुळतात. जगाच्या पाठीवर  कुठेही गेलं तरी या माणसांच्या आठवणी नेहमी आपल्या स्मरणात रहातात.

©मानसी जोशी
३१/०७/२०१७

फोटो: गुगलवरून साभार

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...