Wednesday, 6 September 2017

एक जगावेगळी प्रेमकहाणी

एक जगावेगळी प्रेमकहाणी

ती आज खूपच छान दिसत होती. तशी ती नेहमीच छान दिसते पण आज तो तिला पहिल्यांदा साडीमध्ये बघत होता.  लंच ब्रेक संपता संपता तिला एकटीला बघून तो तिच्या समोर आला आणि तिला म्हणाला, "आज खूप छान दिसतेयस.
 ती हसून "थॅंक्स" म्हणाली.
तो म्हणाला, "तू आवडतेस मला खूप, I really love you very much"
त्याच्या या वाक्यावर ती म्हणाली, "अरे काहीतरीच काय बोलतोयस ? इतकं पण फ्लर्ट करु नकोस माझ्याशी.
"फ्लर्ट  करत नाहीये मी, अगदी मनापासून सांगतोय. तुला पहिल्यांदा बघितलं होतं ना तेव्हाच आवडली होतीस तू. तुझ्या  मोहक हसण्याची भूरळ पडली होती मला. नंतर तुझ्याशी ओळख झाली, आपली मैत्री झाली आणि तू मला समजत गेलीस. तू जितकी जास्त समजत गेलीस तितकीच मला आवडत गेलीस. तू सुंदर तर आहेसच पण तेवढीच हुशार आणि समजूतदारही आहेस.जेवढी विचारी तेवढीच निरागस आहेस. थोडी इमोशनल आहेस पण तेवढीच खट्याळपण आहेस. कुठे थांबायचं हे तुला बरोबर कळतं.  Beauty with brain च एक परिपूर्ण उदाहरण आहेस तू." तो हे सगळं अगदी सहज सांगत होता तिला.
        ती मात्र गप्प होती. हे सगळं तिच्यासाठी अनपेक्षित होतं. तरीही स्वतःला सावरत ती म्हणाली, तू काय बोलतोयस हे ? मी मॅरीड आहे आणि एका आठ वर्षाच्या मुलीची आईसुद्धा आहे.
   "मग काय झालं ? मॅरीड आहेस म्हणजे कोणाला आवडू नयेस असा नियम आहे का? प्रेम फक्त लग्न या एकमेव उद्देशानेच करतात का ग ? एखादी व्यक्ती आवडते म्हणून तिच्यावर प्रेम करणं  आणि लग्नासाठी प्रेम करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ग. तुझं सौंदर्य, तुझं व्यक्तिमत्त्व  यावर अगदी निरपेक्ष प्रेम करतो मी.
"अरे पण ....", ती
"हा 'पण' खटकतो ग मला खूप. मला आवडलं असतं रे लेट नाईट मूव्हीला यायला पण..... मुलगी झोपणार नाही माझ्याशिवाय. पावसात भिजायला खूप आवडतं पण.... लोकं  काय म्हणतील? पबमध्ये आले असते मी पण ... नातेवाईक काय म्हणतील ? मला खूप आवडतात वेस्टर्न ड्रेस घालायला पण...... सासू सासऱ्याना आवडले नाहीत तर ? मला डान्सच्या क्लासला जायचं होतं मनापासून पण.... बाबांना नसतं आवडलं. असे कितीतरी 'पण' तू मनात पक्के बांधून ठेवले आहेस. अगं किती दिवस असं मन मारुन जगणार आहेस? निदान कधीतरी स्वतःसाठी जगून बघ. अगदी थोडीशी का होईना मनमानी  करायला शिक. नेहमी नको करुस पण निदान एखाद्या वेळी तरी स्वतःचा विचार कर. स्वतःवर थोडसं प्रेम कर. तुझा नवरा खूप चांगला माणूस आहे. तू जर ठरवलस ना तर नाही अडवणार तो तुला. करेल ॲडजस्ट तुझ्यासाठी. फक्त तू या कोषातून बाहेर ये. हा 'पण ...' बाजूला ठेव. बस बाकी मला काही नको. तुझ्यावर दुरुनच प्रेम करतो मी आणि तसच प्रेम करायला आवडतं मला." एवढं सगळं एका दमात बोलून 'तो' जायला निघाला.
 "एक मिनिट थांब",  ती
'तो' गोड हसून म्हणाला, "बोल ! एक  मिनिट कशाला? तू म्हणशील तितका वेळ थांबतो मी. फक्त  तू मोकळेपणाने बोल."
  "मला  पण आवडतोस तू. तुझ्या गालावर पडणारी खळी आवडते. तुझ्याशी बोलायला आवडतं.  तुझं फ्लर्ट करणं आवडतं. तू नेहमी माझी तारीफ करतोस ते  आवडतं आणि माझी चेष्टा करतोस ते सुद्धा आवडतं. तुझं बिनधास्तपणे मनातल्या गोष्टी सांगणं आवडतं आणि सगळ्यांसमोर मला सांभाळून घेणं पण आवडतं मला. पण......"ती.
   आता हा 'पण'.... नको ना प्लीज. एवढं छान मनमोकळं बोलल्यावर आता कुठलाही 'पण.....' नको. जे तुला सांगायच आहे ते मला माहिती आहे. फक्त ते आत्ता ऐकायचं नाही मला. मूळात त्याची गरजच नाही. मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे तुझ्या नवऱ्यावर. अगं माझ्याबद्दल तुला जे वाटतं ते  बोलून तू त्याच्याशी प्रतारणा नाही ग  केलीस. आपण ज्याच्याशी कमिटेड असतो तो आपल्याला आवडतोच पण म्हणून जो आवडतो त्या प्रत्येकाशी आपण कमिटेड तर नाही होत ना. काय कळतय का काही?" तो
       तिने हसून मान हलवली आणि त्याला म्हणाली, "आयुष्याच्या या वळणावर तुझ्यासारखं कोणी  भेटेल असं  मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. तू मला जगण्याचा नवा दृष्टीकोन दिलास  आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवलस. तू खरच खूप छान आहेस. तुझ्यामुळेच मी मनमोकळं बोलायला शिकले आणि...
   "आणि खूप काही सांगायचं आहे तुला पण.. आता लंच ब्रेक संपत आलाय त्यामुळे आपल्याला इथून निघावं लागणार आहे." त्याच्या या वाक्यावर दोघही मनमोकळं हसली.
©मानसी जोशी
फोटो - गूगलवरून साभार



 

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...