झाले मोकळे आकाश
ओपीडी संपवून अदिती राउंडला जायला निघाली. आज खर तर तसा उशीरच झाला होता. रात्रीचे दहा वाजत आले होते. अदिती खरं तर खूपच कंटाळली होती. पण काय करणार न जाऊन पण चालणार नव्हत. राउंडला जायचं म्हणजे आता पुन्हा अवनी आणि आशुतोष देशपांडे भेटणार हा विचार मनात आला आणि अदितीचा कपाळावर किंचितशी आठी आली. अदिती एक हुशार गायनॅक होती आणि अवनी देशपांडे ही तिची पेशंट. पाच महिन्याच्या गरोदर अवनीचा खूप मोठा अपघात झाला होता. अदितीने प्रयत्नांची शर्थ करुन तिचा जीव वाचवला होता. पण तिच्या बाळाला मात्र ती वाचवू शकली नव्हती आणि दुर्दैवाने या अपघातामूळे अवनीचे आई होण्याची शक्यता खूपच कमी झाली होती. अस असूनही अदितीला अवनीबद्दल एक प्रकारची असूया वाटत होती. तस बघायला गेल तर अवनी देशपांडे आणि सुंदर, हुशार अदितीची तुलनाच होवू शकत नव्हती. अवनी एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. शिक्षणही जेमतेम ग्रॅज्युएट. रुपानेही यथातथाच. पण तरीही अदितीकडे जे नव्हतं किंवा अदितीला जे हवं होत ते अवनीकडे होत. ते म्हणजे अवनीला मिळणार आशुतोषच प्रेमं. आशुतोष देशपांडे एक अत्यंत सज्जन माणूस या पलीकडे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं काहीच नव्हत. एका प्रायवेट लिमिटेड कंपनीत साधा अकाऊंटट असणारा आशुतोष रुपानेही अगदी सामान्यच होता. अदिती त्याच्याकडे आकर्षित होईल अस त्याच्याकडे काहीही नव्हतं. अवनीसारख्या कितीतरी केसेस तिने हाताळल्या होत्या तरीही अविनाश ज्या पद्धतीने अवनीची काळजी घेत होत होता, तिला समजून घेत होता ते पाहून अदितीच्या मनात अवनीबद्दल असूया निर्माण होत असे. त्यांच एकमेकांशी असलेलं नातं, एकमेकांवरच प्रेम पाहून अदितीच्या मनात चलबिचल होत असे. अदितीला कळत होत आपलं हे वागणं चुकीचे आहे, आपल्या मनात होणारी घालमेलही चूक आहे पण तरीही ती हे सार थांबवू शकत नव्हती.
अदिती घरी पोचली तेव्हा ११.३० होवून गेले होते. भूक तर कधीच मेली होती. नुसतंच कपभर दूध पिवून अदिती झोपायला गेली. ती खूप दमली होती तरीही खूप प्रयत्न करुनही निद्रादेवी काही तिच्यावर प्रसन्न होत नव्हती.मनात विचारांच काहूर माजलेलं असताना ती तरी कशी प्रसन्न होणार म्हणा. तिच्या डोळ्यासमोर सतत अवनीचा चेहरा येत होता. तिने अवनीला जे सांगितल ते नक्कीच खोट नव्हत पण त्यात सत्यता किती होती हे खर तर अदितीलाही ठावूक नव्हत. आज ज्या ठिकाणी अवनी आहे काही वर्षांपूर्वी अदिती त्याच जागेवर होती. अदिती विचार करत होती आज या परिस्थितीतही अवनीसोबत तिच प्रेम, तिचा समजूतदार नवरा आशुतोष आहे आणि त्यावेळी माझ्यसोबत गौरांग कधीच नव्हता. गौरांगच्या आठवणीने तिच्या मनात एक सूक्ष्म कळ उठली. "का वागलास गौरांग तू माझ्याशी अस किती प्रेम केल होत मी तुझ्यावर आणि तू मात्र........ अदितीच मन आक्रोश करीत होत. आठ वर्ष होवूनही अदिती 'तो' दिवस विसरू शकत नव्हती.
गौरांग पटवर्धन; पटवर्धन ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज च्या मालकांचा म्हणजेच नानासाहेब पटवर्धनांचा मुलगा. घरात लक्ष्मी पाणी भरत असताना गौरांगला मात्र त्यात काहीही रस नव्हता. घरचा बिझनेस सांभाळण्यापेक्षा त्याला डॉक्टर गौरांग ही ओळख मिळवण्यातच जास्त रस होता. अदिती एम.डी गायनॅक झाल्यानंतर एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नोकरी करत होती. गौरांगची आणि तिची तिथेच भेट झाली. गौरांगही हार्ट स्पेशॅलिस्ट म्हणून तिथेच नोकरी करत होता. सुंदर, हुशार अदिती त्याला प्रचंड आवडली होती. अदिती मात्र आपलं काम बरं की आपण बरं या विचारांची होती. ती गौरांगशी मोजून मापूनच बोलत असे. एक तर गौरांग तिला जवळपास २ वर्षांनी सिनिअर होता आणि दुसरं म्हणजे त्याच्यासारख्या बड्या घराणातल्या मुलांपासून लांबच राहत असे. पण गौरांग मात्र सतत तिच्या अवती भोवती राहायचा प्रयत्न करीत असे. खर तर त्या दोघांची ही भेट फार कमी होत असे. अशातच एक दिवस गौरांगने तिला प्रपोज केल. अदितीला काय बोलाव काहीच सुचेना. तरीही तिने धीर करुन स्पष्ट शब्दात नकार दिला. गौरांगने मात्र तरीही मैत्रीचा हात पुढे केला आणि अदितीला म्हणाला, "अदिती मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तरीही तुझ्या मताचा मी आदर करतो जर तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर ठिक आहे, पण निदान आपल्यामध्ये सहज निर्माण होवू शकणाऱ्या मैत्रीच्या नात्याला तरी नाकारु नकोस".
का कुणास ठावूक पण अदिती नकार देवू शकली नाही आणि तिनेही मैत्रीचा हात पुढे केला.
हळूहळू गौरांग तिला आवडायला लागला. ती कधी त्याच्या प्रेमात पडली ते तिच तिलाच कळलं नाही. गौरांगच्या घरी मात्र अदिती कोणालाच मनापासून पसंत नव्हती. गौरांगचं लग्न त्यांच्यासारख्याच एखाद्या बड्या घराण्यातील मुलीशी व्हावे अशी त्याच्या आई वडीलांची इच्छा होती. पटवर्धनांच्या घरात बायकांना कधी कमावण्यासाठी बाहेर जावं लागल नाही आणि तसही बायकांनी चूल आणि मुलच सांभाळावे या मताच्या त्याच्या आईला अदितीसारखी करिअर ओरिएंटेड मुलगी आपली सून होणं हे फारसं पटलेलं नव्हतं. परंतू निव्वळ गौरांगच्या सुखासाठी म्हणून या लग्नाला कोणीच विरोध केला नाही. आणि मिस अदितीची मिसेस अदिती गौरांग पटवर्धन झाली. लग्नानंतरही अदितीने नोकरी चालूच ठेवली होती.
असच वर्ष निघून गेल. या वर्षभरात तिच्या अनेक रजा झाल्या होत्या. सुरुवातीला हनीमूनसाठी आणि नंतर कधी वर्षभरातले सणवार म्हणून तर कधी घराण्यातील परंपरा म्हणून असणाऱ्या विविध पूजा आणि कार्यक्रम म्हणून. तरीही अदितीने कसलीही तक्रार केली नाही. त्या दिवशी गौरांगच्या आईने तिला लवकरच गोड बातमी मिळूदे वर्ष झाल आता अस सुचवलं, सुचवलं कसलं फर्मावलच. अदिती त्यांच्यासमोर काहीच बोलली नाही पण रात्री गौरांगजवळ मात्र तिने आपली नाराजी व्यक्त केली. तिला वाटलं होत गौरांग तिला समजून घेईल पण झाल मात्र उलटच त्यानेही त्याच्या आईचीच री ओढली. त्यावेळी अदितीने मात्र ठामपणे नकार देउन गौरांगला स्पष्टपणे सांगितले, माझं करिअर ही माझी प्रायॉरिटी आहे आणि ही गोष्ट मी लग्नाआधीच तुला सांगितली होती आणि तेव्हा तू हे मान्यही केल होतस तर आत्ता का असा आग्रह करतोयस?"
यावर गौरांग तिला समजावण्याचा सुरात म्हणाला होता, "अग तुला करिअर नको करुस अस मी म्हणतच नाहीये पण मलाही आता अस वाटतय आपल्या घरात एक छोटं बाळ यावं. मला खूप आवडतात लहान मुलं प्लीज तू विचार कर ग जरा. तू नंतर पुन्हा हॉस्पिटल जॉईन करु शकतेस.
यावर मात्र अदिति संतापली आणि गौरांगला म्हणाली, "Please Gaurang dont be emotional. Be practical. मी आत्ता ब्रेक घेणं हे माझ्या करिअरसाठी किती रिस्की आहे हे तुला चांगलंच कळतंय. मला समजावण्याचा प्रयत्न करु नकोस. काहीही झालं तरी मला निदान अजून दोन वर्षे तरी मुलाचा विचार करायची इच्छा नाहीये."
गौरांग काही बोलणार इतक्यात अदिती म्हणाली, "No more discussion please, its over now"
त्या दिवसानंतर मात्र गौरांगच वागणं पूर्णपणे बदललं. पूर्वी अदितीच्या केसेस उत्साहाने ऐकणारा, त्यावर चर्चा करणारा गौरांग तिच्या केसेस बद्दल बोलणं टाळू लागला. त्यांच्यातील संवाद कमी होवू लागला. अदितीला या साऱ्याचा खूप त्रास होत असे. याचा परिणाम सहाजिकच तिच्या कामावर होवू लागला होता. तिच्या हातून छोट्या छोट्या चुका होवू लागल्या. तिच्या सिनिअर डॉक्टर माया यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी अदितीला विश्वासात घेऊन खर काय आहे ते जाणून घ्यायचं ठरवलं. अदितीनेही इतके दिवस मनात साठलेलं सार त्यांच्याजवळ बोलून दाखवलं.
डॉक्टर माया अतिशय हुशार आणि प्रेमळ होत्या. त्यांनी अदितीला सांगितले, "अदिती कुटुंब आणि करिअर यामध्ये सुवर्णमध्य साधायचा असेल तर कुटुंबातल्या सदस्यांच्या इच्छा, त्यांच्या आवडी निवडीही जपाव्या लागतात. तू चार पावले पुढे जा गौरांग आणि त्याच्या घरातलेही चार पावले पुढे येतील. गौरांग शिकलेला आहे डॉक्टर आहे, त्यामुळे मला नाही वाटत तो तुझ्या करिअरच्या आड येइल. अग करिअर या एकमेव कारणासाठी तुला आई न होण्याचा निर्णय घ्यायचा नसेल तर तसा विचार करु नकोस. अगदी डिलिवरीच्या दिवसापर्यंत तू काम करु शकतेस. राहता राहिला प्रश्न नंतरच्या तीन/चार महिन्यांचा तर तू त्याची काळजी करु नकोस मी आहे ना ? मी सांभाळून घेईन सगळं. ते माझ्या हातात आहे. पण जर तुझ्या संसाराची घडी जर विस्कटली तर ती मात्र मी काय कोणीच नाही सावरू शकत. हा पण तू आई होण्यासाठी जर मानसिकदृष्ट्या तयार नसशील तर मात्र तू हा निर्णय न घेतलेलाच बरा. आणि तस असेल तर मला गौरांगशी बोलाव लागेल. तुझ आयुष्य तुझ्या पद्धतीने जगण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे."
डॉ. मायांशी बोलल्यावर अदितीच्या मनातला गोंधळ अजूनच वाढला. आपल्याला नक्की काय हवं आहे हेच तिला कळत नव्हतं. असेच २/३ महिने गेले. तिच्यातला आणि गौरांगमधला संवाद अलीकडे खूपच कमी झाला होता. अखेर अदितीने माघार घेऊन आपला संसार आणि आपलं करिअर दोन्हीचा सुवर्णमध्य साधायचा ठरवले.
त्या दिवशी पटवर्धनांच्या बंगल्यात जणू आनंदोत्सव साजरा होत होता. अदितीने ती गोड बातमी दिल्यावर गौरांग तर खूश झालाच होता पण तिच्या सासूबाईसुद्धा खूप खूश झाल्या. नव्या जीवाच स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. तिच्या सासूबाईंनी स्वतःजवळचा हिऱ्यांचा हार तिला भेट दिला. तिच्यासाठी खास तिच्या आवडीचे जेवण बनविण्यात आले. हे सगळं कौतुक बघून अदिती हरखून गेली होती. पण तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, "अदिती आता हॉस्पिटलमध्ये जाणं बंद बरं का ? आता तू फक्त तुझ्या स्वतःच्या बाळंतपणाची काळजी करायची."
अदितीच्या सगळ्या आनंदावर जणू विरजण पडले. तिने आशेने गौरांगकडे बघितले पण तो काहीच बोलला नाही. अदिती खूपच चिडली होती. बेडरुममध्ये गेल्यावर तिने आपली नाराजी गौरांगसमोर व्यक्त केली. त्यावर गौरांग काहीच बोलत नाही म्हटल्यावर अदिती रागाच्या भरात बोलून गेली, "तुझ्यासाठी आणि तुझ्या फॅमिलीसाठी मी आत्ता माझी इच्छा नसताना बाळाचा विचार केला पण आता हे फार होतय हा गौरांग, तुझ्या आईच अस माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खूपसणं मला मान्य नाही. काहीही झालं तरी मी हॉस्पिटलला जाणार.....
तिचं बोलणं मध्येच तोडत गौरांग म्हणाला, "अदिती प्लीज शांत हो आई तुझ्या काळजीपोटीच बोलतेय ना?" "कसली काळजी गौरांग? मला वाटतय तू विसरलास बहुदा मी स्वतः एक गायनॅक आहे." अदिती आता खूपच संतापली होती. शब्दाला शब्द वाढत गेला आणि वाद विकोपाला गेला. अखेर गौरांग वैतागून खोलीबाहेर निघून गेला. अदिती हतबल झाली होती. आत्ता या क्षणी तिला गौरांग तिची बाजू समजून घेईल अस वाटत होत. पण नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या आईचीच बाजू उचलून धरली होती. पण अदिती मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. काहीही झाल तरी ती तिची नोकरी सोडणार नव्हती. बाकी कोणी नाही पण डॉक्टर माया तिला समजून घेवून तिला सपोर्ट करतील अशी तिला अपेक्षा होती.
यावेळी मात्र गौरांगने माघार घेतली आणि अदितीची माफी मागीतली. शिवाय आईशी बोलून तिला अदितीची बाजूही पटवून दिली. अखेर गौरांगच्या आईने अदितीला काम सुरू ठेवण्यासाठी काही अटिंवर परवानगी दिली. अदितीनेही या अटी मान्य केल्या त्यात सर्वात महत्वाची अट होती ती म्हणजे 'नो नाईट शिफ्ट्स'. डॉक्टर मायानी कसलेही प्रश्न न विचारता तिला फक्त डे शिफ्ट्समध्ये काम करायची परवानगी दिली. एरवी वेळ मिळेल तेव्हा जेवणारी अदिती आता प्रयत्नपूर्वक जेवणाच्या वेळा पाळू लागली. तिच्यासाठी रोज खास तिच्या डाएट प्लॅननुसार ठरलेल्या वेळात घरुनच गरमागरम जेवणाचा डबा येऊ लागला. अदिती, गौरांग आणि घरचे नाराज होणार नाहीत याची तिच्या परीने शक्यतो सगळी काळजी घेत असे. असेच चार महिने गेले. सुरुवातीला बाळ नको म्हणणारी अदिती आता तिच्या बाळाच्या आगमनाची तयारी उत्साहाने करु लागली. घरी तर सगळेजण तिची काळजी घेत होतेच पण हॉस्पिटलमधला स्टाफही आपाआपल्यापरीने तिची काळजी घेत होता. गौरांग आणि आदितीने बाळासाठी खूप स्वप्न रंगवली होती. सासूबाईंचा कल थोडा मुलगा व्हावा असा असला तरी गौरांगला आणि अदितीला मात्र मुलगीच हवी होती. खर तर अदितीपेक्षा गौरांग या बाळाची खूपच आतूरतेने वाट बघत होता.
त्या दिवशी डॉक्टर माया एका क्रिटीकल केसाविषयी अदिती आणि इतर ज्युनियर डॉक्टर्ससोबत चर्चा करीत होत्या. डॉक्टर माया खूप हुशार गायनॅक होत्या कितीतरी क्रिटीकल केसेस त्यांनी अत्यंत हुशारीने सोडविल्या होत्या. त्यांच व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. अदिती त्यांनाच आपला आदर्श मानत असे. चर्चा करता करता संध्याकाळचे ७ वाजून गेलेलेही कोणाला कळले नाही. तितक्यात रिसेप्शन काउंटरवरुन अदितीसाठी फोन आला. अदितीचा ड्रायव्हर ६ वाजल्यापासून तिची वाट बघत पार्किंगमध्ये थांबला होता. सुरुवातीला रिसेप्शनिस्टने मिटींग चालू आहे अस सांगून फोन करण्यास नकार दिला. ड्रायव्हरही समजून घेवून थोडा वेळ शांत राहिला होता. पण पटवर्धनांच्या घरून सतत येणाऱ्या फोनमूळे तो ही वैतागला आणि त्याने गौरांगला फोन केला. खुद्द डॉक्टर गौरांग सरांचा फोन आल्यावर मात्र रिसेप्शनिस्टचाही नाईलाज झाला आणि तिने फोन केला. डॉ. मायानी अदितीला जायची परवानगी दिली पण अदितीने मात्र मिटींग संपेपर्यंत थांबायचं ठरवले. तिने ड्रायव्हरला फोन करुन घरी जायला सांगितले. मिटींग संपायला उशीर झाला. अदिती घरी जायला निघाली तेव्हा रात्रीचे ९.३० वाजले होते. घरी काय वाढून ठेवले असेल या विचाराने ती जरा धास्तावलीच. पटापट सामान आवरुन ती धावतच लिफ्टजवळ गेली. नेमकी लिफ्ट त्याचवेळी वरती गेली. एवढा वेळ थांबण्यापेक्षा जिन्याने जाऊया असा विचार करुन ती पळतच जिन्याकडे गेली. गडबडीत जीना उतरत असताना तिचा पायरीचा अंदाज चुकला आणि ती घरंगळत खालच्या पायरीपर्यंत गेली. त्यानंतर तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. तिने तिच बाळ गमावले होते. गौरांग आणि डॉ. मायाही तिथेच होत्या.
"थँक गॉड अदिती तु शुद्धीवर आलीस. काळजी करु नकोस हळूहळू होईल सगळं नीट",असं म्हणून डॉ. मायांनी अदितीला तपासले आणि गौरंगकडे बघून म्हणाल्या Don’t worry she is fine now take care both of you."
अदितीच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवून "उद्या सकाळी येते" अस म्हणून निघून गेल्या. अदितीला खूप दुख झाले तिने गौरांगकडे बघितले तो काहीच बोलत नव्हता. "I am sorry Gaurang", अदिती रडतच म्हणाली. तिला त्याच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा होती. पण झाल उलटच गौरांग तिला म्हणाला, "आता सॉरी म्हणून काय उपयोग अदिती तुला जे करायच होत ते तू केलसच ना".
"मी हे मुद्दाम केल का गौरांग? It was just an accident", अदिती त्याला समजावण्याचा सुरात म्हणाली.
अदिती तू जर ड्रायव्हर बरोबर घरी गेली असतीस तर हे अस काही घडलंच नसत. पण नाही तुला प्रत्येक वेळी तुझं स्वतःचच म्हणणं खर करायच असतं हे अस काही होवू नये ना म्हणून आईने तुला हॉस्पिटल बंद अस सांगितल होत. पण तुझं करिअर ही तुझी प्रायॉरीटी आहे. हे मुल जन्माला घालायचा निर्णय घेउन तू आमच्यावर उपकारच केले होतेस ना. तुला काय फरक पडतोय? फरक तर आम्हाला पडलाय आमची सगळी स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाली. अग आईची काय अवस्था झाली आहे हे माहित आहे का तुला काल रात्रीपासून ती जेवलीसुद्धा नाहीये."
गौरांग बोलत होता. त्याचा प्रत्येक शब्द अदितीच्या मनाला असंख्य जखमा करत होता. एक हार्ट स्पेशॅलिस्ट असून स्वतःच्या बायकोचे मन मात्र त्याला कधीच कळले नव्हते.
डिसचार्ज मिळाल्यानंतर अदिती तिच्या आई बाबांकडे गेली ती कायमचीच. गेल्या आठ वर्षात ना गौरांगने तिला कॉन्टॅक्ट केला ना तिने त्याला.
अदितीला डीसचार्जपूर्वीचा तो दिवस आजही जसाच्या तसा आठवत होता त्या दिवशी डॉक्टर मायांनी तिला सांगितल होतं की ती कधीही आई होऊ शकणार नाही. पण त्याहीपेक्षा जास्त दु:खद होतं ते गौरांगच वागणं. खर तर या बातमीमूळे दोघही खूप दुखावली गेली होती. त्या वेळेस दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायची, एकमेकांना आधार द्यायची गरज होती पण गौरांगने आधार देणं तर दूरच उलट अदितीला दुखावलं होत.
तो अदितीला दोष देत म्हणाला होता, "सगळं संपवलस तू अदिती, तुझ्या हट्टापाई सारं काही गमावलस. करिअर करायचं होतं ना तुला? या शहरातील नामवंत गायनॅक व्हायचं होतं. होशील नक्कीच होशील तू नामवंत गायनॅक, पण एक चांगली आई कधीच होऊ शकली नसतीस अग चांगली तर दूरच तू तर आता आईसुद्धा होऊ शकणार नाहीस. करिअरच्या हव्यासापाई सारं गमावलस तू अदिती, जोडीला आम्हालाही खूप मोठं दु:ख दिलस तू. मी तुला कधीही माफ करणार नाही अदिती. मला आता एकच प्रश्न आहे हे सार आईला कस सांगायचं? तिने खूप स्वप्न पाहीली होती आपल्या संसाराची. माहित नाही ती हा धक्का कसा पचवेल."
त्याचं बोलणं ऐकून अदिती खूप दुखावली होती. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. जीवावरच्या संकटातून ती वाचली होती. तिला गौरांगच्या प्रेमाची त्याच्या सहानुभूतीची खूप गरज होती. पण त्याला मात्र या साऱ्याचं काहीच वाटत नव्हत. अदितीला दोष देण्यातच तो धन्यता मानत होता. काय तर आईची काळजी, मग माझ काय? अदितीच्या मनात विचारांचं वादळ घोंघावत असताना तिला अचानक आठवलं तिच्या सासूबाई तिला साध बघायलाही आल्या नव्हत्या किंवा त्यानी तिला फोनही केला नव्हता. अदितीला या साऱ्याचं खूप आश्चर्य वाटत होतं. दुसऱ्या दिवशी डीसचार्ज मिळाला तेव्हा अदितीच्या बाबानी गौरांगला विचारले, "अदितीला आम्ही आमच्याकडे नेऊ का ?"
तेव्हा, "तुमची मुलगी स्वतःचे निर्णय स्वतः घेते, मला कशाला विचारताय तिलाच विचारा" अस उद्दामपणे बोलून गौरांग रुमच्या बाहेर निघून गेला होता.
आजही सगळं व्यवस्थित आठवत होत तिला. त्या घटनेनंतर खर तर अदिती पूर्णपणे कोलमडली होती पण तिचे आई बाबा आणि डॉ. मायानी तिला समजावले. तिच्या मनातली अपराधीपणाची भावना काढून टाकून तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळवून दिला. जवळपास महिनाभर अदिती घरीच होती. या महिनाभरात ना गौरांगने तिला फोन केला ना तिला भेटायला आला.
अदितीने स्वतःला सावरून हॉस्पिटल पुन्हा जॉईन केले. हॉस्पिटलला गेल्यावर तिला कळलं की गौरांगने राजीनामा दिला आणि तो दुसरीकडे जॉईन झाला आहे. अदिती काय समजायचं ते समजली. अदितीने घडलेल्या घटनेचा कुठलाही परिणाम तिच्या कामावर होवू दिला नाही. जवळपास सहा महिने असेच गेले. त्यानंतर डॉ. मायानी स्वतःच हॉस्पिटल सुरु केल आणि अदितीही त्यांना जॉईन झाली.
बघता बघता आठ वर्ष सरली. तरीही अदितीच्या मनाला झालेली जखम आजही भरुन आलेली नाही. अवनी आणि आशुतोषकडे बघून तिला नेहमी अस वाटे, "जर गौरांगने तिला समजून घेतले असते तर......" तिच मन तिच्याही नकळत नेहमी गौरांग आणि आशुतोषची तुलना करायच. खर तर हुशार, श्रीमंत आणि देखण्या गौरांगच्या आसपासही आशुतोष पोचू शकत नव्हता. पण आशुतोषचा समजूतदारपणा, त्याने अवनीला दिलेली साथ, प्रेम हे सार गौरांगला कधीच जमले नाही. डॉक्टर असली तरी अदिती एक स्त्री होती आणि एका स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून प्रेमासोबत जो आधार, जो सन्मान हवा असतो तो अदितीला गौरांगकडून कधीच मिळाला नाही. आणि यामुळेच तिच्या मनात अवनीविषयी किंचितसी असूया वाटत होती. एवढ्यात मोबाईलच्या मेसेज टोनचा आवाज ऐकू आला आणि अदिती भानावर आली. तिने मेसेज बघितला "Reached safely at home will call you later". मेसेज डॉ. मायांचा होता. आपल्या Ph.D. च्या कामासाठी ३ महिने अमेरिकेला गेलेल्या डॉ. माया आज परत आल्या होत्या. हे ३ महिने हॉस्पिटलची संपूर्ण जबाबदारी अदितीने अगदी समर्थपणे सांभाळली होती. अदितीने घड्याळात बघितले पहाटेचे साडेचार वाजले होते. रात्रभर न झोपलेल्या अदितीने मनातले सगळे विचार झटकून झोपायचा प्रयत्न केला. तिला झोप लागली असेल नसेल तेवढ्यात साधारण साडेसहाच्या सुमारास तिला हॉस्पिटलमधून फोन आला, "मॅडम एक इमर्जन्सी आली आहे. आपल्या हॉस्पिटल बाहेरच एक अपघात झालाय. एका मॉर्निंगवॉकला गेलेल्या गरोदर तरुणीला एका मोटारसायकलने धक्का दिला. पेशंटची ट्रिटमेंट आपल्याकडे चालू नाहीये पण चार महिन्याची गरोदर आहेत."
"ओके", असं म्हणून अदितीने नाइट ड्युटीच्या डॉक्टरांना योग्य त्या सूचना करून फोन ठेवला आणि आवरुन लगेचच हॉस्पिटलला गेली.
सुदैवाने या वेळेस अदिती आई आणि मुल या दोघांनाही वाचविण्यात यशस्वी झाली. साडेसातच्या सुमारास पेशंटचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोचले. तोपर्यंत ती स्त्री शुद्धीवर आली होती. सगळ्या फॉरमॅलिटिज पूर्ण करून आणि असिस्टंट डॉक्टरना योग्य त्या सूचना करून अदिती घरी जाण्यापूर्वी पुन्हा एकदा पेशंटला तपासण्यासाठी तिच्या रुममध्ये गेली तेव्हा त्या स्त्रीचा नवरा तिला, "योग्य काळजी घेता येत नाही का?" अस म्हणून तिच्यावर ओरडत होता. त्याचा प्रत्येक शब्द तिला गौरांगची आठवण करून देत होता.
तो बोलत होता आणि अपघातामुळे घाबरलेली ती शांतपणे आसवं गाळत बेडवर पडून होती. त्याला ना तिची भीती कळत होती ना आसवं दिसत होती.
तो बोलतच होता "It's enough now. What's your problem. Why you don't understand? नशीब चांगलं म्हणून बाळाला काहीही झाल नाही. काय गरज होती तुला एवढ्या सकाळी वॉकला जायची? किती वेळा सांगितलय तुला घरी एवढं मोठं गार्डन आहे तिथे वॉकला जात जा पण नाही, का तर बाहेर मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात जास्त फ्रेश वाटत .प्रत्येक वेळी स्वतःचा विचार. स्वतःचा फिटनेस स्वतःचा जॉब या पलीकडे दुसरं विश्व नाही तुझं. पण आता हे सगळं बंद. आजपासून तुझं एकटीने घराबाहेर पडणं बंद आणि तुझा तो जॉब सोडून द्यायचा आता. जहांगीरदारांच्या घराला तुझ्या जॉबची आणि तुझ्या पैशांची गरज नाहीये." 'Enough!' Mind your language Mr. …… तुम्ही जे कोणी आहात. अदिती खड्या आवाजात म्हणाली. "मी अभय जहांगीरदार आणि मी माझ्या पत्नीशी काय आणि कसं बोलायचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला त्यात पडायची गरज नाही", तो उद्दामपणे म्हणाला.
"गरज आहे मिस्टर अभय तुम्ही जे बोलताय ते अत्यंत चुकीच आहे. तुमची बायको तुमची गुलाम नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे हॉस्पिटल आहे तुमची बेडरुम नव्हे आणि तुमची बायको माझी पेशंट आहे. माझ्या पेशंटची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणं ही माझी आणि या हॉस्पिटलची नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटत? तुमच्या पत्नीचा जो अपघात झाला त्याला फक्त ती जबाबदार आहे? तिने फिटनेस मेंटेन करण हे चुकीच आहे? उलट तिच्या आत्ताच्या अवस्थेत तिला याची जास्त गरज होती. आणि तुम्ही काळजीचा फार मोठा आव आणता मग तुम्ही का नाही जात तिच्याबरोबर? आणि तुम्ही आत्ता जे काही बोलताय त्यामुळे तुमची पत्नी किती दुखावली गेली आहे हे कळतय का तुम्हाला? तिची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार केलाय तुम्ही? एक डॉक्टर म्हणून नाही एक स्त्री म्हणून सांगते, एक स्त्री आपल्या पोटातल्या बाळाची जेवढी काळजी घेते, जेवढा विचार करते ना तेवढा कोणीच करत नाही. अगदी त्या बाळाचे वडीलसुद्धा नाही. सुदैवाने तुमचं बाळ वाचलय. पण या हॉस्पिटलमध्ये असेही पेशंट आहेत कि ज्या स्त्रियांनी त्याच बाळ गमावलय आणि सोबत त्यांचं मातृत्व. पण त्या स्त्रीच्या पतीने तिला ज्या पद्धतीने समजून घेतल; तिची काळजी घेतली; ते बघता एक आदर्श पती कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते चूकीचं ठरणार नाही. आणि हो यापुढे आपल्या पत्नीला विनाकारण दोष देण्यापूर्वी तुमचं काही चुकत नाही ना, याचा विचार करा. जमलं तर तिचा सन्मान करायला शिका. आत्ता या क्षणाला तुमच्या पत्नीला तुमच्या सल्ल्यांची नाही तुमच्या प्रेमाची तुमच्या आधाराची जास्त गरज आहे."अदिती.
अभय जहांगीरदारला बहुदा त्याची चूक कळली होती म्हणूनच तो सार काही शांतपणे ऐकून घेत होता. अदितीचं बोलून झाल्यावर अभयने म्हणाला, "थॅंक्स डॉक्टर....
"डॉक्टर अदिती जोगळेकर. अदितीने आपली ओळख सांगितली. तितक्यात अदितीला एक नर्स सांगत आली, “मॅडम त्या विमलताईंच्या मुलीला कळा यायला लागल्या आहेत".
"ठिक आहे तिला लेबर रुम मध्ये घे मी आलेच असं म्हणून अदिती जायला वळली तर समोर गौरांग आणि त्याची आई उभी होती. क्षणभर काय बोलावं, काय करावं कोणालाच काही कळत नव्हत. तेवढ्यात मगाचचीच नर्स परत बोलवायला आली आणि अदिती लगबगीने तिथून निघून गेली.
विमलताईंच्या मुलीला जुळ्या मुली झाल्या. अदितीने बाहेर येवून त्यांना ही गोड बातमी दिली. पण बातमी ऐकून आनंद होण्याऐवजी विमलताई कपाळावर हात मारून मोठमोठ्याने रडू लागल्या. अदितीला कळेच ना त्यांना काय झाल? अदिती विमलताईना म्हणाली, "अहो असं रडताय का तुम्ही? सगळं व्यवस्थित झालय तुमची मुलगी अगदी सुखरूप आहे.
"तस न्हाय व डाक्टर तै आव मागल्या खेपस बि मुलगी झालीया आता या येळीस लई आशा व्हती मुलगा हुइल म्हुन पर समदच अक्रित झाल बगा. आता तिला तिच्या सासरची मानसं काय हिथुन न्येत नाइत. मागल्या खेपेलाच सांगुन ठिवल व्हतं त्यानी कि पुढल्या येळी मुलगा झाला तरच घरला यायच न्हायतर म्हाहेरीच राहायच." असं म्हणून विमलताई अजूनच रडू लागल्या.
"अहो रडू नका मी बोलू का तिच्या सासरच्यांशी? आदितीने विचारलं.
"नग तुमी नग बोलू काय भी लै वंगाळ मानस हायत ती", विमलताई.
अदितीला काय बोलाव काहीच कळेना. ती काही न बोलता तिथून निघून तिच्या केबिनमध्ये गेली. आज २१ व्या शतकात काय परिस्थिती आहे आपल्या देशात. ती विचार करत होती तिचं डोकं सुन्न झाल होत. एकीकडे अवनीची केस; तिला मुल व्हायची कुठलीच शक्यता नाही म्हणून ती दु:खी आणि एकीकडे विमलताईंची मुलगी तिला दोन मुली होवूनही मुलगा न झाल्याने दु:खी. आधीच रात्रभर न झोपलेल्या अदितीला सकाळपासून घडणाऱ्या घटनांमुळे खूपच थकवा आला होता. तिने घड्याळात बघितले ११ वाजत आले होते. आता ओपीडीला जायची वेळ होत आली होती. तेवढ्यात केबिनमधला फोन खणखणला. "मॅडम डॉ. माया आल्या आहेत. त्यानी तुम्हांला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे."
'ओके' म्हणून अदितीने फोन ठेवला. तिला आश्चर्य वाटलं. आज पहाटेच यु एस वरुन आलेल्या डॉ. माया आज हॉस्पिटलमध्ये आल्यासुद्धा? मला कॉल कसा केला नाही त्यांनी?", असा विचार करता करता तिने बघितलं तर सकाळपासून डॉ मायांचे ४ मिस्ड कॉल होते. सकाळपासून अदिती इतकी बिझी होती कि तिने मोबाईल बघितलाच नव्हता.
अदिती डॉं.मायांच्या केबिनमध्ये जाताना अवनी देशपांडेची फाईल घेऊन गेली. कारण तिला माहित होत डॉ माया याच केससाठी आज हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत. डॉ. मायांना भेटल्यावर अदितीला खूप बरं वाटलं. डॉ. मायानी अदितीची ओपीडी दुसऱ्या असिस्टंट डॉक्टरना हॅन्डल करायला सांगितली. हॉस्पिटलची चौकशी आणि काही जुजबी बोलण झाल्यावर डॉ. मायानी अवनीची फाईल उघडली. सगळी फाईल व्यवस्थित वाचून झाल्यावर त्यांनी एवढी क्रिटीकल केस हाताळल्याबद्दल अदितीच खूप कौतुक केलं.
"अवनी आई होण्याचे काही चान्सेस आहेत का?" अदितीने डॉ. मायांना विचारले.
अदितीच्या प्रश्नावर डॉ. मायानी नकारार्थी मान हलवली आणि अदितीला म्हणाल्या, "अदिती अग अवनी वाचली ती निव्वळ तुझं कौशल्य आणि तिच नशीब दोन्ही चांगलं होतं म्हणूनच. माझा इतक्या वर्षांचा अनुभव आणि अभ्यास हेच सांगतोय की ती आई होणं शक्यच नाही.
"मला अंदाज होताच तुम्ही हेच सांगाल याचा", अदिती म्हणाली.
"ठिक आहे मग त्यांना या परिस्थितीची पूर्ण कल्पना दे. आत्ताच मनाची तयारी झालेली चांगली. समजदार असतील तर उगाच कुठेतरी आपला वेळ आणि पैसा वाया घालवणार नाहीत." डॉ. माया म्हणाल्या.
"तुम्ही सांगाल का? कारण माझ्यापेक्षा तुम्ही छान पद्धतीने समजावू शकता", अदितीने विचारले.
'ओके' म्हणून डॉ माया अदितीला म्हणाल्या, "अदिती डॉक्टरने पेशंटमध्ये जास्त गुंतू नये. मी निघते आता. तू ही घरी जा सकाळपासून खूप दगदग झालेय तुझी. तुझा चेहराच सांगतोय तू किती थकली आहेस ते".
"हो खरच खूप थकलेय आज. सकाळीच एक इमर्जन्सी आली तेव्हापासून चालूच आहे एकएक. अदिती म्हणाली.
"काही खाल्ल आहेस का सकाळपासून? नसेलच बहुदा" डॉ. माया.
डॉ.मायांच्या या प्रश्नाने अदितीला जाणवलं खरच तिने सकाळपासून काहीच खाल्ल नव्हत.
"अदिती काळजी घेत जा ग स्वतःची." डॉ मायानी तिला प्रेमाने दटावलं.
"हो राउंडला जाऊन येते आणि निघतेच घरी असं म्हणून अदिती राउंडला जायला निघाली. जाता जाता तिला अचानक सकाळचा प्रसंग आठवला. जहांगीरदारांच्या खोलीतून निघताना आज जवळपास ८ वर्षांनी ती आणि गौरांग समोरासमोर आले होते. "कशासाठी आले असतील ते तिथे? त्यांचा आणि जहांगीरदारांचा काय संबंध असेल. नशीब तेव्हा नर्स बोलवायला आली नाहीतर......" अदितीच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता.
सगळे पेशंट तपासून अदिती जहांगीरदारांच्या रूममध्ये गेली. सुदैवाने गौरांग तिथे नव्हता. तिला हायसं वाटलं. "कसा आहे पेशंट?" अदितीने हसून विचारलं.
"थॅंक्स अदिती वहिनी आज तुझ्यामुळे अभयला त्याची चूक कळली. मला ओळखलं नाहीस? मी मिताली गौरांगची आत्ये बहीण", मिसेस जहांगीरदार म्हणाल्या.
"मिताली अगं किती मोठी झालीस तू? आमचं लग्न झाल तेव्हा बारावीला होतीस." अदिती आश्चर्याने म्हणाली.
मिताली गौरांगची खूप लाडकी बहीण होती. बारावीच्या परिक्षेनंतर ती जेव्हा त्यांच्या घरी आली होती तेव्हा तिघांनी मिळून खूप धमाल केली होती.
"वहिनी गौरांग दादा खूप चांगला आहे ग. काहीतरी समजुतीचा घोटाळा झालाय", मिताली.
मितालीच्या बोलण्याने अदिती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. "वहिनी प्लीज एकदा भेटून गैरसमज मिटवत का नाही तुम्ही?" मिताली खूप मनापासून विचारत होती.
"मिताली सॉरी आपण नंतर बोलूया आत्ता मला राउंडला जायचं आहे", असं बोलून अदिती तिला तपासून व नर्सला योग्य त्या सूचना करून तिथून निघाली.
"आज काय घडतय सगळं? सकाळपासून सगळं अनपेक्षित समोर येतय." विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या अदितीसमोर अचानक विमलताई आल्या आणि म्हणाल्या, "डाक्टर तै जरा बोलायचय."
'बोला', अदिती थोडी त्रासूनच म्हणाली. "तै लेकिला नांदवायस तयार हाइत तिच्या घरचे पर पोरिस्नी आनायच न्हाय म्हणत्यात. कुट तरी आश्रम असल येखादा तर सांगता का मला." विमलताई
"अहो काय बोलताय तुम्ही? नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईपासून तोडून दुसरीकडे ठेवायचे? आणि तुमची मुलगी तयार आहे का यासाठी?" अदितीने आश्चर्याने विचारलं.
"हाय ती तय्यार. नांदवणार हायत ना सासरी? मग काय भि प्राब्लेम न्हाय बगा", विमलताई म्हणाल्या.
"ठिक आहे, चौकशी करून सांगते नंतर," असं म्हणून अदिती घरी जायला निघाली.
अदिती घरी गेली तेव्हा तिचे आई बाबा जेवायलाच बसत होते. अदिती पटकन आवरुन त्यांच्याबरोबर जेवायला बसली. आज कितीतरी दिवसानी दुपारी घरी होती आणि आई बाबांसोबत जेवत होती. जेवण झाल्यावर अदिती तिच्या खोलीत झोपायला गेली. तिने मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला. मनाने आणि शरीराने थककेल्या अदितीला अंथरुणावर पडताक्षणी झोप लागली.
अदितीला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंथरुणातून उठूच नये असं तिला वाटत होत. सहज तिची नजर खिडकीबाहेर गेली. डिसेंबर महिना असल्याने सूर्य जरा लवकरच मावळतीला चालला होता. मावळतीच्या रंगछटा आकाशात पसरल्या होत्या. पक्षांचे थवे आपआपल्या घरट्यांकडे परतत होते. हवेमध्ये चांगलाच गारवा जाणवत होता. कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी ती हे सार अनुभवत होती. ती उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळाला होता. अचानक तिच्या मनात एक विचार आला आणि अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये मिळाली. तिने बाहेर जाऊन आई बाबांना आपल्या मनातला विचार बोलून दाखवला आणि पटवूनही दिला. खूप दिवसानी अदिती खूष दिसत होती.
संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिने अवनी देशपांडेची चौकशी केली. "मॅडम त्यांचे डिसचार्ज पेपर तयार आहेत फक्त तुमची सही राहिली आहे", नर्सने माहिती पुरवली.
"ठिक आहे पेपर माझ्या केबिनमध्ये पाठवून दे आणि अवनी आणि आशुतोष देशपांडे दोघांनाही आत पाठव आणि हो डॉ.राजेशना आजची माझी ओपीडी घ्यायला सांग." अदिती.
अवनी आणि आशुतोष केबिनमध्ये गेल्यावर अदितीने त्यांना विचारले, "डॉं मायांशी तुमच बोलणं झालच असेल पण मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही सत्य स्विकारले आहे कि तुम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे?"
"आम्ही जे आहे ते स्वीकारुन आनंदाने जगायचं ठरवलं आहे", आशुतोष म्हणाला.
अदिती: गुड, मग मी आत्ता जे काही सांगते ते शांतपणे ऐका. अवनी तू जर ठरवलस तर तु एका बाळाची आई होऊ शकतेस.
अवनी: म्हणजे मी समजले नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे?
अदिती: सांगते, सगळं सांगते. फक्त मी सांगते त्याचा तुम्ही दोघांनीही शांतपणे विचार करा आणि मगच आपला निर्णय सांगा. मी फक्त माझा विचार मांडतेय. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. असं म्हणून अदितीने विमलताईंच्या मुलीची परिस्थिती सांगून त्यातली एक मुलगी दत्तक घ्यायचे सुचवले.
अदितीच बोलणं ऐकून आशुतोष आणि अवनी विचारात पडले" मॅडम हे सगळं आमच्यासाठी अनपेक्षित आहे. आम्ही विचार करून सांगतो" आशुतोष म्हणाला.
"Take your own time. फक्त एवढंच सांगते की त्यातली एक मुलगी मी स्वतः दत्तक घेणार आहे." अदिती
अवनी आणि आशुतोष निघून गेल्यावर अदितीने विमलताईना बोलावून सारी कल्पना दिली. विमलताईंनी तिचे आभार मानले. अदितीने डॉ. मायांना फोन करुन सारी कल्पना दिली. तितक्यात अदितीच्या केबिनमधला फोन खणखणला, "मॅडम मिताली जहांगीरदारच्या नातेवाईकांना तुम्हाला भेटायचं आहे”.
"ठिक आहे त्यांना आत पाठव", असं म्हणून अदितीने फोन ठेऊन दिला आणि काही क्षणातच गौरांग आणि त्याची आई तिच्या केबिनमध्ये होते. त्या दोघांना पाहून अदितीला धक्का बसला. काय बोलाव तिला काहीच कळेना. थोडा वेळ तसाच शांततेत गेला.
"आम्ही बसू का?" गौरांगने विचारले.
"हो बसा ना", अदिती स्वतःला सावरत म्हणाली.
काही क्षण केबिनमध्ये शांतता पसरली. या शांततेचा भंग करत गौरांग म्हणाला, "अदिती मला माफ कर, खूप चुकलं माझं. काल तू अभयला जे काही सांगत होतीस ते सार ऐकलं आम्ही. ते ऐकून मला माझ्या चुकीची जाणीव झाली. खर तर ही जाणीव आधीच माझ्या मनाला झाली होती पण माझा इगो मला पुढे येऊ देत नव्हता. पण कालच तुझं बोलणं ऐकून ठरवलं, नाही आता बास, खूप झाल पश्चात्तापाच्या आगीत होरपळणं. आता इगोला मागे ढकलून पुढे व्हायच. अदिती मी आजही तुझ्यावर पूर्वीइतकच प्रेम करतो. प्लीज तू परत ये माझ्या आयुष्यात"
अदिती शांत होती काहीच बोलत नव्हती. पुन्हा शांतता पण यावेळी मात्र शांततेचा भंग करीत गौरांगची आई म्हणाली, “अदिती तुमच्यातल्या दुराव्याला खरं तर मी कारणीभूत आहे. त्याची शिक्षा तु गौरांगला नको देवूस ग! बायको आणि आई यांच्यातल्या शीतयुद्धात तो होरपळत होता. त्याला लहान मुलांची खूप आवड आहे म्हणूनच भावनिक होवून तो तुझ्याशी अस वागला. पण खर सांगते अदिती गौरांगच तुझ्यावर खूप प्रेम आहे. गेल्या आठ वर्षात आम्ही कितीतरी वेळा त्याला घटस्फोट घेण्याविषयी सांगितले पण त्याने काही ऐकलं नाही. अदिती आम्हाला माफ कर प्लीज घरी परत ये. माझ्या गौरांगला पुन्हा मनमोकळं जगताना बघायचं आहे मला. ते फक्त तुझ्या हातात आहे."
"मी माझ्या आयुष्याचा वेगळा निर्णय घेतलाय आता मी एक बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. उद्या सकाळीच सगळ्या फॉरमॅलिटिज पूर्ण होतील. Now its too late", अदिती ठामपणे म्हणाली.
"तुझ्या दत्तक बाळासकट मी तुला स्वीकारायला तयार आहे अदिती. तू पूर्ण विचार करुन निर्णय घे. त्यासाठी तुला हवा तेवढा वेळ तू घे. आम्ही निघतो आता." अस म्हणून गौरांग व त्याची आई जायला निघाली. निघताना गौरांग अदितीला म्हणाला, "अदिती तू कितीही वेळ घे फक्त एक लक्षात ठेव मी तुझी वाट बघतोय, अगदी आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत!"
ती दोघं निघून गेल्यावर डोळ्यात साठलेल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली. तितक्यात तिच्या मोबाईलवर वकिलांचा फोन आला, "मॅडम तुम्ही सांगितलेली सगळी कागदपत्रे तयार आहेत. उद्या ११ वाजता मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो.
"ओके थँक्स", अस म्हणून अदितीने फोन ठेवला आणि राउंडसाठी जायला निघाली. पण मनात गौरांगचाच विचार चालू होता.
हॉस्पिटलमधून आल्यावर अदिती शांतपणे काहीही न बोलता जेवून आपल्या खोलीत झोपायला गेली. तिने ठरवलं होत आता शांत रहायचं कसलाही विचार करायचा नाही. उद्या सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन ती एका छोट्याशा बाळाला घरी आणणार होती. तिच्या आयुष्यातल्या एका नवीन पर्वाची सुरुवात होणार होती.
दुसऱ्या दिवशी अदिती हॉस्पिटलमध्ये जायला निघणार तेवढ्यात डॉ. माया तिच्या घरी आल्या. त्यांना बघून अदितीला आश्चर्य वाटलं. "अदिती बस मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." डॉ माया म्हणाल्या.
"काय झालय मॅडम?" अदितीने विचारलं.
डॉ. माया: अदिती अवनी आणि आशुतोषने बाळाला दत्तक घेण्यासाठी नकार दिलाय. माझं आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालय."
अदिती: ठिक आहे आपण विचार करु दुसऱ्या बाळाच काय करायच याचा.
डॉ. माया: नाही कसलाही विचार करायची गरज नाही. दोन्ही बाळं त्यांचा आई बाबांजवळच राहतील.
अदिती: हे तुम्ही काय बोलताय मॅडम?
डॉ. माया: खर तेच बोलतेय मी अदिती. आज सकाळीच मी विमलताईंच्या जावयाला आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं. त्याला समजावलं. मुलींसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना सांगितल्या. मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करायची तयारी दाखवली तरी तो ऐकत नाही म्हटल्यावर मी शेवटी ACP गोखलेंना फोन केला. तशी त्यांना मी आधी कल्पना दिली असल्यामुळे ते आधीच हॉस्पिटलमध्ये येवून थांबले होते. पोलीसी खाक्या दाखवल्यावर मात्र सगळी घाबरली आणि सुतासारखी सरळ झाली. मुलींना स्विकारून बायकोला नांदवायलाही तयार झाला. ACP साहेबानी त्याच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतलय. अदिती बाळ नेहमी आई वडीलांबरोबरच राहिलेलं चांगल नाही का? माझं वकिलांशी बोलणं झालं आहे. त्यांना मी येऊ नका म्हणून सांगितल आहे. त्या बाळांना त्यांच्या आई वडीलांकडे रहाण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना सांभाळणे हे त्यांच्या आई वडीलांचे कर्तव्य आहे."
अदिती शांतपणे सगळं ऐकून घेत होती. तिला डॉ. मायांच बोलणं पटलं होत. डॉ माया तिला समजावत म्हणाल्या, "अदिती मुल दत्तक घेणं सोपं वाटलं का तुला ? तू खूप हुशार डॉक्टर आहेस, एक चांगली व्यक्ती आहेस पण अनेकवेळा निर्णय घेताना भावनेच्या भरात निर्णय घेतेस. तु प्रेग्नंसीचा निर्णयही असाच भावनेच्या भरात घेतला होतास आणि आता हा मुल दत्तक घेण्याचा. अग ती अवनी देशपांडे अजून मानसिक धक्क्यातून सावरलीही नाही आहे आणि तू तिच्यासमोर दत्तक मुलाचा पर्याय ठेवलास? मान्य आहे तुझा हेतू वाईट नव्हता पण अदिती तुला वाटत होतं तेवढं हे सगळं सोपं नव्हतं गं. ना तुझ्यासाठी आणि ना अवनीसाठी. तरीही तुला बाळ दत्तकच घ्यायचं असेल तर एखाद्या अनाथ बाळाला घे ज्याला कोणाचा आधार नसेल. ज्याला आई वडीलांच्या प्रेमाची गरज असेल. माझ्या माहितीत अशी एक संस्था आहे जिथे जवळपास आठवड्याला एखादं नवजात बालक अथवा लहान मुलं भरती होत असतात. तुला माहित आहे ती संस्था कोण चालवतं? ती संस्था चालवणाऱ्या माणसाचं नाव आहे डॉ गौरांग पटवर्धन!"
गौरांगच नाव ऐकून अदितीला आश्चर्य वाटलं. पण क्षणात तिने स्वतःला सावरलं.
"काल गौरांग आला होता ना तुला भेटायला अदिती? काय निर्णय घेतला आहेस तू? डॉ मायांच्या या बोलण्यावर अदितीने दचकून तिच्या आई बाबांकडे बघितले कारण तिने त्यांना गौरांगच्या भेटीबद्दल काहीच सांगितले नव्हते. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून डॉ माया म्हणाल्या, "मी त्यांना सगळं सांगितल आहे आहे अदिती. तू काय निर्णय घेतला आहेस ते सांग. अदिती मी तुला मागेही सांगितल होतं; तू चार पावलं पुढे जा मग गौरांगही चार पावले पुढे येइल. तेव्हा तू पुढाकार घेतलास, आज तो घेतोय. मान्य आहे मला चूक त्याची होती. पण तू चुकली नसलीस तरी बरोबरही नव्हतीस. तो चुकला आणि तू ती चूक त्याला दाखवून द्यायचा प्रयत्नही केला नाहीस? जी गोष्ट तू अभय जहांगीरदारला समजावलीस ती गौरांगलाही सहज समजावू शकली असतीस. त्याची चूक मान्य करुन स्वत:चा इगो विसरुन आज तो तुझ्याकडे परत आला आहे. मग तू का तयार नाहीस? अदिती सायन्सने कितीही प्रगती केली तरी नात्यांना जोडणारा धागा नाही बनवता आला कोणाला. त्यासाठी कुठलीही टेक्नॉलॉजी कुठलंही ॲप नाही बनवू शकत कोणी. ते काम तुमचं तुम्हालाच करावं लागतं. नशीबाने तुला एक संधी दिली आहे. अदिती नको आता हट्ट करुस. यापूर्वी तू जे केलस तो तुझा स्वाभिमान होता आणि आत्ताचं तुझं वागणं तुझा इगो आहे. तुझ्या इगोला इतकं पण महत्व देवू नकोस की तो तुला तुझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घेईल. अग गौरांगच खरच खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणूनच इतके दिवस त्याने तुला घटस्फोट दिला नाही. त्याच्यासारख्या श्रीमंत देखण्या हुशार मुलाला दुसरी कुठलीही मुलगी सहज मिळाली असती पण तो आजही तुझी वाट बघतोय. स्वतःची चूक मान्य करुन त्याने तुझी माफी मागीतली आहे. जे दु:ख आठ वर्ष तूं भोगलंस ते त्यानेही भोगलय; आत्ताही तो तुझ्या घराबाहेर उभा राहून तुझ्या होकाराची वाट बघतोय. अदितीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मला माझ उत्तर मिळालं अदिती असं म्हणून डॉ मायांनी गौरांगला आत बोलावलं आणि अदितीच्या आई वडिलांना घेऊन बाहेर निघून गेल्या.
गौरांग समोर आल्यावर अदितीने धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोघही काही न बोलता फक्त रडत होते. एकमेकांशी न बोलताही त्यांना एकमेकांच्या मनातले भाव कळले होते.
त्या दिवशी पटवर्धनांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत होता. अदितीच्या निघून जाण्याने उदास झालेलं घर उत्साहाने तिच्या स्वागताची तयारी करत होत.
सुरु झाला एका जुन्या नात्याचा
एक नवीन प्रवास
गैरसमजाचे काळे ढग विरुन
झाले मोकळे आकाश.
समाप्त .
©मानसी जोशी

No comments:
Post a Comment