ट्रिपचं प्लॅन करत असताना नेटवर अचानक एक ठिकाण दिसतं आणि ते ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये must visit place मध्ये ऍड केलं जातं.अगदी तसंच झालं…
हिमाचल प्रदेशमधील टुरिस्ट प्लेसेस नेटवर सर्च करत असताना ज्वालामुखी मंदिराची माहिती मिळाली. का कुणास ठाऊक पण या मंदिराबद्दल मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि नेटवरून त्याबद्दलची अजून माहिती मिळवली. जितकी माहिती मिळत गेली तितकी उत्सुकता वाढत गेली आणि काही झालं तरी या ठिकाणी जायचंच असं ठरवलं.
ट्रिपच्या सुरुवातीच्या दोन दिवसांचं प्लॅनिंग पाऊस आणि स्नो फ़ॉलमुळे विस्कळीत झालं होतं. मी नेटवर सतत तिथलं वेदर फोरकस्ट बघत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथलं वेदर फोरकस्ट अगदी परफेक्ट येत होतं. तिसऱ्या दिवशी ऊन पडावं म्हणून सतत मनात देवाला प्रार्थना करत होते. पहिल्यांदा बघताना स्नो फॉल कितीही आनंददायी वाटत असला तरी सततच्या स्नो फॉलमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मनात एक प्रकारचं डिप्रेशन येतं. त्यात तिकडचं मायनस टेम्प्रेजरही सोसवत नव्हतं. ही ट्रिप अशीच फुकट जाणार असा निगेटिव्ह विचार सतत मनात येत होता.
तिसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर सर्वात आधी रूममधल्या खिडकीचे पडदे बाजूला करून बाहेर बघितलं आणि तिथलं सुंदर दृष्य बघून हरखून गेले. बर्फाची शाल पांघरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणे. सृष्टीच्या सौंदर्याचा अवर्णनीय नजारा! तब्बल दोन दिवसानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले होते. क्षणात रूमचा दरवाजा उघडून गॅलरीत गेले आणि सर्वात आधी सूर्यनारायणाला नमस्कार केला. सूर्य म्हणजे ऊर्जेचा स्रोत! मनातली सगळी मरगळ दूर करण्याचं त्या कोवळ्या किरणांमधील सामर्थ्य बघून नकळतपणे या सृष्टीच्या निर्मात्यासमोर मी नतमस्तक झाले. जणू काही खूप वर्षांनी सूर्योदय बघतेय असं वाटत होतं. नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये उगवत्या सूर्याचे रूप साठवून लगेच मोबाईलकडे धाव घेतली.
त्यानंतर त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं. रात्री रूममध्ये आल्यावरही फ्रेश वाटत होतं. रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीचं वेदर फॉरकस्ट बघितलं आणि mostly sunny हे शब्द बघून मन सुखावलं. आत्तापर्यंतचं सगळं फोरकास्ट अगदी बरोबर येत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ऊन असणार याबद्दलचा विश्वास हळूहळू वाढू लागला होता. तरीही मनातून मात्र कुठेतरी भीती होतीच. अपेक्षेनुसार दुसऱ्या दिवशीही ऊन पडलं. मनातून खूप आनंद झाला कारण त्या दिवशी या ट्रिपमध्ये must visit लिस्टमध्ये ऍड केलेल्या ठिकाणी म्हणजेच ज्वालामुखीला जायचं होतं.
सगळं आवरून निघालो आणि नेमकं बाहेर पडायच्या वेळी अचानक कंबरेतून जोरात कळ आली. ज्वालादेवीची माहिती मिळाल्यापासून काहीही झालं तरी ज्वालादेवीला जायचंच हा निश्चय मनात केला होता. पण कंबरेतून आलेल्या कळीमुळे मला जागेवरून हलताही येत नव्हतं. बाम, तेल लावून थोडं बरं वाटलं. पण तरीही अधूनमधून कंबरेतून जोरदार कळा येतच होत्या. शेवटी पेनकिलर घेतली. खरंतर पेनकिलर घेणं मी नेहमी टाळत असते. पण त्या दिवशी काहीच पर्याय नव्हता
मी आस्तिक किंवा देवभोळी नाही आणि नास्तिकही नाही. माझा कर्मावर प्रचंड विश्वास आहे. पण काही काही वेळा मात्र मी प्रचंड धार्मिक होते. त्या दिवशीही तसंच झालं. दर्शनाची ओढ एवढी तीव्र होती की शारीरिक त्रासावर तिने सहज मात केली. का माहिती नाही पण त्या जागेविषयी मला प्रचंड ओढ वाटत होती. अगदी नेटवर जेव्हा हे ठिकाण पहिल्यांदा बघितलं तेव्हापासूनच तिथे जायची जबरदस्त आंतरिक ओढ मनात निर्माण झाली होती.
ज्वालामुखीला जायला धरमशालाहुन थेट बसेस आहेत. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस बरोबरच प्रायव्हेट बसचा पर्यायही आहे. पण तरीही डायरेक्ट बसची संख्या मर्यादित आहे. सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे धरमशाला वरून कांग्राला जायचं. कांग्रा बस स्टँडवरून स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट बसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हिमाचल प्रदेशमधील जवळपास सर्व बस स्टँडवर आलेला सुखद अनुभव म्हणजे तिथे चौकशी केल्यानंतर अगदी शांतपणे सविस्तर माहिती सांगितली जाते. बसमध्येही कंडक्टर अगदी व्यवस्थित माहिती सांगतात. विशेष म्हणजे इथल्या बस स्टँडवर स्टेट ट्रान्सपोर्ट बससोबतच प्रायव्हेट बसही लागतात. स्थानिकांना दोन्हीतला फरक पटकन ओळखता येत असला तरी बाहेरच्या लोकांना मात्र सहजी कळत नाही. टुरिझम हा तिथला मुख्य व्यवसाय असल्यामुळे असेल कदाचित पण तिथली माणसं मुळातच अगत्य करणारी वाटली. दुसरी नोटिस करण्यासारखी गोष्ट म्हणजे बसमध्ये अगदी शेवटच्या सीटवर जरी बसलं तरी उडायला होत नव्हतं. अगदी वळणावळणाचे छोटे छोटे रस्ते असूनही प्रवासाचा त्रास अजिबात जाणवत नाही. तिथले रस्ते बघून मला आमच्या कोकणातले रस्ते आठवले. “हिमाचल म्हणजे कोकणचा मोठा भाऊ आहे.” माझं हे वाक्य अनेकांना अतिशयोक्ती वाटेल किंवा पटणार नाही. पण तिथले रस्ते आणि एकंदरीतच सगळं वातावरण बघुन काही क्षण कोकणचा फील आल्याशिवाय रहात नाही. कोकणात सह्याद्रीच्या डौलदार रांगा तर इथे हिमालयाच्या पर्वतरांगा. कोकणात उंच उंच वाढणारी नारळ, पोफळी तर इथे देवदार आणि ओकचे वृक्ष. समुद्रकिनारी वसल्यामुळे कोकणातली हवा दमट तर इथली प्रचंड थंड. वातावरणातील हा मुख्य फरक हिमाचल आणि कोकणास वेगळे करतो. तसं बघायला गेलं तर हिमालयाची निर्मिती समुद्रापासूनच झाली आहे. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत क्षणभर का होईना कोकणचा भास होणं, यामध्ये काहीच विशेष नाही.
ज्वालादेवी मंदिर परिसरातच बस स्टॉप असल्यामुळे बसमधून उतरल्या उतरल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रसाद, पूजेची थाळी, देवतेवतांच्या मूर्ती, कीचेन इत्यादींची दुकाने दिसत होती. मला वाटतं भारतातल्या कुठल्याही प्रदिद्ध मंदिरात अथवा मठात जाताना सर्वप्रथम रस्त्याच्या दुतर्फा मांडलेली ही दुकाने आपलं स्वागत करतात. संपूर्ण प्रवासात कंबरेतून येणाऱ्या कळा अधूनमधून त्रास देत होत्या. ज्वालामुखी मंदिरात जाताना थोडं चढावं लागतं. त्यामुळे पायऱ्या चढतानाही थोडासा त्रास होत होता. पण हा त्रास सहन करण्यासारखा होता. खरंतर दर्शनाची आंतरिक उर्मी होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होती. थोडंस चालून गेल्यावर डाव्या बाजूला चपला स्टँड आहे. विशेष म्हणजे तिथे आपल्या चपला ज्या कप्प्यात ठेवलेल्या असतील तो नंबर आपण लक्षात ठेवायचा. तिथे कोणीही माणूस उपलब्ध नसतो. इतर ठिकाणी असतात तशी पूजेच्या थाळीच्या बदल्यात चपला ठेवून घेणारी दुकानेही तिथे आहेत. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला ‘लंगर’ आहे. तिथे एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांना मोफत भोजन दिले जाते. हॉलमधून सरळ आत गेल्यावर आतमध्ये ताट, वाटी, भांड, चमचे सर्व ठेवलेलं असतं. त्यामधलं आपल्याला जे हवं ते घेऊन हॉलमध्ये अंथरलेल्या बैठकांवर जेवायला बसायचं. जेवण वाढतानाही शांतपणे वाढलं जातं. जेवणानंतर आपलं ताट, वाटी जे काही असेल ते स्वच्छ धुवून जागेवर ठेवायचं. एकंदरीत स्वावलंबन हा या मंदिराचा पहिला नियम आहे असं वाटत होतं आणि हे नक्कीच कौतुकास्पद होतं.
ज्वालादेवी मंदिर प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. प्रजापती दक्ष यांच्याकडून एक यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी भगवान शंकर सोडून इतर सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या अशा वागण्यामुळे अपमानित झालेल्या सतीने स्वतःला हवनकुंडात झोकून दिले. हे कळल्यावर अतीव दुःख आणि रागामुळे वेडेपिसे झालेले भगवान शंकर सतीचे जळलेले शरीर घेऊन त्रैलोक्यात धावू लागले. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णुंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पृथ्वीवर जिथे जिथे हे तुकडे पडले ती जागा शक्तीपीठ समजली जाते. ज्वालामुखी मंदिराच्या जागी सतीची जीभ पडली अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मुख्य मंदिरामध्ये देवीची मूर्ति नसून देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. खड्डयाच्या आंतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणींहि डाव्या व मधल्या खडकांतून अशाच तर्हेच्या ज्वाला बाहेर पडतांना दिसतात. मुख्य मंदिर आणि आणि परिसर मिळून एकूण सात ज्वाळा आहेत. या ज्वाळा सात देवीचं प्रतिनिधित्व करतात.
मुगल सम्राट अकबरने मुख्य मंदिरामधील ज्वाळा विझवायचा खूप प्रयत्न केला होता. ज्वाळेवर सतत पाण्याचा मारा होईल अशी व्यवस्था केली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यावर लोखंडाची मोठी ढाल ठेवून ज्वाळा विझवायचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात ते लोखंड वितळून ढालीला भोक पडलं. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या अकबर राजाने आपले प्रयत्न थांबवले. ही ढाल परिसरातील एका मंदिरात काचेच्या बंद पेटीत ठेवण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या मुख्य मंदिरात फोटो काढायला मनाई असल्यामुळे तिथला फोटो काढता येत नाही. पण आजूबाजूच्या इतर मंदिरांमध्ये तसेच या ढालीचा फोटो काढायला मात्र परवानगी आहे.
मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरेही आहेत. यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे गोरखडीब्बी. निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक चमत्कार इथे पहायला मिळतो. येथील एका कुंडात पाणी उकळत असल्यासारखे वाटते पण प्रत्यक्षात हात लावल्यावर मात्र हाताला थंडगार पाण्याचा स्पर्श होतो. याबद्दलची आख्यायिका अशी आहे की, गोरखनाथांच्या तपश्चर्येने देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एक दिवस गोरखनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी मातेला पाणी गरम करायला सांगितले व स्वतः भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत आणि देवी माता आजही त्यांची वाट बघते आहे. याबद्दल असंही सांगितले जाते की कलियुग संपून सत्ययुग सुरू झाल्यावर गोरखनाथ परत येतील.
सर्वात वरती शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जायला पुन्हा काही पायऱ्या चढून जाव्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर माझ्याबरोबरची सगळीजणं देवळात आतमध्ये गेली पण नेमकं त्याचवेळी माझ्या कंबरेतून जोरात कळ आली आणि मी तिथेच खाली बसले. समोरच्या होमकुंडाजवळ बसलेल्या पुजाऱ्यांनी दुरूनच मला बघितले. त्यांच्यासमोर बसलेली लोकं उठून गेल्यावर त्यांनी दुरूनच विचारले, “ कुछ तकलीफ हो रही है क्या बेटी?”
“नहीं ठीक हैं बस कमरमें थोडी मोच आ गयी..” असं म्हणून पुन्हा देवळात जायच्या उर्मीने मी त्या अवस्थेतही पटकन उठून उभी राहिले. नंतर आम्ही दर्शन आटपून होमकुंडाजवळ गेलो. तिथल्या पुजाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली व म्हणाले, “रुको चाय लेके जाओ.” आम्ही नको म्हणत असतानाही आग्रह करत म्हणाले, “भगवान का प्रसाद हैं बेटा, मना मत करो.” या वाक्यामुळे मात्र आम्ही नाही म्हणू शकलो नाही. त्या दिवशी प्रत्यक्ष देवीच्या द्वारी जेवण आणि चहा दोन्हीचा योग होता. चहा घेऊन गुरुजींना नमस्कार करून आम्ही तिथून निघालो. तिथल्या बस स्टँडवर गेल्या गेल्या लगेचच धरमशालाला जाणारी बसही मिळाली. वाटेतच संध्याकाळ झाली होती. परतीच्या प्रवासात मात्र कंबरदुखीचा जराही त्रास झाला नाही आणि मावळत्या सूर्याच्या दर्शनाने मनही तृप्त झाले. जवळपास तीन चार दिवसांनी मी सूर्यास्त बघत होते. सूर्यास्त म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा एक अप्रतिम नजारा असतो. अनेकांना संध्याकाळ आणि सूर्यास्त निराशाजनक वाटतात. पण मला मात्र या दोन्हीही गोष्टी खूप आवडतात. खरतर सूर्यास्त आणि सूर्योदय यामध्ये मुळातच इतके सौंदर्य आहे की ते बघण्यासाठी कुठल्याही ‘पॉईंट’वर जायची गरज नाही. ते कुठूनही पाहिलं तरी सुंदरच दिसतात.
सकाळी झालेलं सुर्यनारायणाचे दर्शन आणि त्यानंतरच्या ज्वालादेवीच्या दर्शनाने मन शांत झालं होतं. या ज्वाळांमागील भौगोलिक किंवा शास्त्रीय कारण शोधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. सतराव्या दशकात भारत सरकारने यामागील भौगोलिक कारण अथवा तेथील नैसर्गिक वायूच्या साठ्याची शक्यता शोधण्याचे काम एका परदेशी कंपनीला दिले होते परंतु अनेक वर्षे काम करूनही न त्यांना कोणता गॅस सापडला ना या ज्वाळांमागचे भौगोलिक कारण. काही जणांच्या मते लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवून ‘नैसर्गिक गॅसचं’ सत्य लोकांपासून लपविण्यात येत आहे. काय खरं, काय खोटं, हे सांगता येणं कठीण आहे. नेटवर सर्च केल्यास ज्वालादेवीचे अनेक थक्क करणारे अनुभव वाचायला मिळतील. तसंही सगळ्या गोष्टी मानण्यावर असतात. माझा अनुभव मी सांगितला तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण ही पोस्ट लिहायला घेतल्यावर माझ्या कंबरेतून तशाच कळा येत होत्या जशा दर्शनाच्या दिवशी येत होत्या. आत्ता हा शेवटचा परिच्छेद लिहताना मात्र कंबरदुखी पुर्णपणे थांबली आहे. हे काय आहे? का आहे? मला खरच काही कळत नाही. पण हा योगायोग नक्कीच नाही. शेवटी काय, मानला तर देव नाहीतर दगड. तसच मानली तर देवी नाहीतर नॅचरल गॅसची ज्वाळा. जे काही नाव असेल ते चमत्कारी आहे हे मात्र नक्की.




No comments:
Post a Comment