Tuesday, 5 February 2019

अलक

अलक १

बिझनेस पार्टी आटपून घरी आल्यावर तिच्या इच्छेचा विचारही न करता आपल्या शरीराची भूक भागवून झोपलेला नवरा पाहून तिला त्या बेडरूमचीच किळस आली आणि रात्री 12 वाजता तिच्या आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत जाऊन ती उभी राहिली. सहज तिची नजर समोरच्या सर्व्हर्ट कॉर्टर्सकडे गेली. तिच्या घरात काम करणाऱ्या जोडप्याला एकमेकांशी समाधानाने हितगुज करताना बघून नकळतपणे तिच्या मनात असूया दाटून आली. तिला त्यांच्या सुखाचा हेवा वाटू लागला. त्याचवेळी पलीकडच्या सर्व्हन्ट कॉर्टर्समध्ये राहणारी वॉचमनची तरुण मुलगी मात्र लग्नानंतर अशाच बंगल्यात राहायचं स्वप्न बघत तिच्या सुखाचा हेवा करत होती.

©मानसी जोशी

अलक २
ब्रेकअप नंतरही त्या संध्याकाळी तो त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी गेला. एकत्र बसून घेतलेली वाईन, तिचं लाडिक बोलणं सगळं आठवून तो काहीही न घेता तिथून निघाला. बाहेर आल्यावर मात्र नेहमीच्या रस्त्याने न जाता मुद्दाम  तिला न आवडणाऱ्या आणि जिचा उच्चार ती नेहमी ‘लोअर क्लास गल्ली’ असा करायची त्या
गल्लीकडे त्याने गाडी वळवली. तिथल्या बकाल वस्तीत संध्याकाळच्या थंडीत फाटक्या कपड्यात कुडकूडणारी मुलं बघून अचानक त्याचा मूड बदलला आणि त्याने गर्रकन गाडी वळवली. काही मिनिटातच तो त्या मुलांसाठी स्वेटर आणि गरम खाणं घेऊन परत आला. आजच्या डेटसाठी जो खर्च झाला असता त्यामध्ये थोडीशी भर घालून कित्येक मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसलेलं लाख मोलाचं समाधान बघून त्याला खूप शांत वाटत होतं. एका तुटलेल्या नात्यामुळे त्याची माणुसकी नावाच्या नव्या नात्याशी ओळख झाली होती.
©मानसी जोशी


अलक ३
जबरदस्त अपघातात जखमी झालेल्या तिच्या नवऱ्याला डॉक्टरांनी अखेर ब्रेनडेड जाहीर केले. एक क्षण ती मटकन खाली बसली पण दुसऱ्या क्षणाला तेवढ्याच आत्मविश्वासाने उठून तिने आपल्या नवऱ्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नवऱ्याला केवळ आठवणीतच नाही तर अनेकांच्या हृदयातही जिवंत ठेवले.

भाग २
अलक १

जीवन से भरी तेरी आँखे मजबूर करे जिने के लिए…त्याने तिला डेडीकेट केलेलं हे एकमेवं गाणं. एवढा मोठा सिंगर असूनही खास आपल्या पत्नीसाठी म्हणून त्याने गायलेलं हे एकमेव गाणं. तो नेहमी म्हणायचा, गाणं केवळ गायचं नसतं तर गाताना ते जगता आलं पाहिजे.  त्याचं हे वाक्य खरं ठरलं ‘त्या’ अपघातात तिचे डोळे गेले आणि त्याचे श्वास थांबले.

अलक २

समोरच्या झाडावरच्या चिमणीच्या रिकाम्या घरट्याकडे उदासापणे बघत असलेल्या आपल्या पतीला पाहून ती म्हणाली, “दोन महिन्यांपूर्वी चिमणीने किती मेहनतीने हे घरटं बांधलं होतं. त्यानंतर त्यात अंडी घातली, पिल्लं जन्माला आली, त्यांना चोचीने भरवलं, उडायला शिकवलं. आता पिल्लं उडून गेल्यावर ती चिमणीही आपल्या मार्गाने उडून गेली. परत या घरट्याकडे फिरकलीही नाही. माणूस कितीही हुशार असला तरी आयुष्य जगण्याची कला त्याच्यापेक्षा पक्षांना जास्त चांगली जमते.” आपल्या पत्नीचं हे बोलणं ऐकून त्याचं मुलाच्या वेगळं राहण्याच्या निर्णयाचं दुःख हलकं झालं आणि उतारवयात पत्नी पुरुषाची आई होते, हे त्याला मनोमन पटलं.

अलक ३

कोर्टाचा निर्णय झाला आणि संपत्ती बरोबर आईच्या जबाबदारीचीही वाटणी झाली. ज्या मुलांची वाटणी होऊ नये म्हणून एके काळी तिने याच कोर्टात ‘सेटलमेंट’ करून मन मारून संसार करायचा निर्णय घेतला होता. आज त्याच कोर्टात तिच्या मुलांनी तिची वाटणी केली होती.


©मानसी जोशी



No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...