Friday, 2 February 2018

अ - अध्यात्माचा


आजकाल "अध्यात्म" हा शब्द अनेकांच्या तोंडून ऐकायला येतो. अनेक ठिकाणी "अध्यात्म सेंटर्स" चालू झाली आहेत. काही दिवसांसाठी हजारो रुपये फी आकारुन 'जगण्यातलं अध्यात्म' शिकवलं जातय. काहीजण अध्यात्म मानतात काही जण नाही मानत. पण अध्यात्म म्हणजे नक्की काय? हा प्रश्न विचारल्यानंतर मात्र अनेकांना उत्तर सूचत नाही. किंवा एखाद्याने उत्तर दिलं तरी अगदीच पुस्तकातलं पाठ केल्यासारखं तांत्रिक उत्तर असतं.  खरच काय आहे अध्यात्म म्हणजे? अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायच तर, "चांगल्या विचारांमुळे मनात निर्माण होणाऱ्या चांगल्या इच्छा म्हणजे अध्यात्म".  अध्यात्म या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे. फक्त नामस्मरण, जप, पूजाअर्चा म्हणजे अध्यात्म नव्हे. फार फार तर आपण असं म्हणू हे सारे  अध्यात्मापर्यंत पोचण्याचे काही मार्ग असू शकतात किंवा आहेत.  या साऱ्यामुळे मन शांत व स्थिर होतं. मनातले नकारात्मक भाव दूर होतात आणि त्याची जागा सकारात्मक विचार घेतात.  या सकारात्मक विचारांमधून चांगल्या इच्छा जन्म घेतात. चांगल्या इच्छा म्हणजे ज्या मनाला फक्त समाधानच देतात त्यांचा दुष्परिणाम नसतोच. अशा सर्व इच्छापूर्तीचा मार्ग म्हणजे अध्यात्म.
      ज्या सृष्टीमध्ये आपण जन्म घेतला, त्या सृष्टीप्रती परोपकाराचा भाव मनात ठेवून  त्या सृष्टीचा आदर ठेवणे, ज्या समाजामध्ये आपण रहातो त्या समाजाच्या हितासाठी आपण काहीतरी केले पाहिजे हा भाव मनात असणे म्हणजेही  आध्यात्म आहे. या जगात शाश्वत असं काहीच नसतं. अगदी हे जगही अशाश्वत आहे. मग तरीही आपण  राग, द्वेष असे वाईट भाव आयुष्यभर जपत असतो. आपल्यातल्या 'मी' कुरवाळत बसतो. अध्यात्म या साऱ्याच्या पलीकडे आहे. तरीही ते खूप कठीण नाहीये. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातही जगण्यातलं अध्यात्म शोधता आलं पाहिजे. त्यासाठी ग्रंथ, पोथी किंवा जपमाळ घेऊन बसायची गरज नाही. आपल्या चांगल्या वर्तणूकीतूनही आपल्याला आध्यात्मिक समाधान मिळू शकतं.
   भिकाऱ्याला भिक्षा देणं चुकीचं की बरोबर हा विचार काही क्षण बाजूला ठेवूया. पण उपाशी असणाऱ्याला अन्न देणं किंवा समोरचा संकटात असताना त्याला आधार देणं या गोष्टी आपण अगदी सहज करु शकतो.
     "दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती" बाबा आमटे, प्रकाश आमटे, गाडगे महाराज अशा अनेक व्यक्तींच नाव जरी कोणी उच्चारलं तरी मनात आपोआपच आदर दाटून येतो. याच कारण म्हणजे त्यांनी जगण्यातलं अध्यात्म खऱ्या अर्थाने आपलसं केल होतं. भगवी वस्त्र घालून, जटा वाढवून आणि हातात कमंडलू घेऊन कोणीही अध्यात्मिक होईलच अस नाही. आध्यात्मिकता ही आत्म्याशी / मनाशी निगडीत आहे. दिखावूपणाशी नाही.  आपलं मन नेहमी शुद्ध हवं. निरपेक्ष भावनेने अगदी छोटीशी का होईना पण कोणालातरी मदत केल्यावर जे समाधान मिळतं ते लाखो करोडो रुपये खर्च करुनही कोणीही विकत नाही घेऊ शकत. निर्मळ, निरपेक्ष मन हि परमेश्वराची देणगी आहे. ती जन्मजातच आपल्याला मिळालेली असते. पण आपण मात्र आपल्या विचारशक्तीच्या जोरावर दुसरं मन तयार करतो आणि छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद हिरावून बसतो.
     एखादं लहान बाळ हसताना किंवा शांतपणे झोपलेल असताना किती गोड आणि निरागस दिसतं. हि निरागसता असणे हे सुद्धा एक प्रकारच 'अध्यात्म'च आहे. ज्या गोष्टींमधून मनाला 'सात्विक आनंद' मिळतो, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये अध्यात्म आहे. मग तो विस्तीर्ण पसरलेला सागरकिनारा असो वा बागेत उमललेलं एखाद सुंदर फूल असो किंवा एखाद्या गायकाने गायलेल मत्रमुग्ध गाणं असो वा एखाद्या चित्रकाराने रेखाटलेलं एखाद सुंदर चित्र असो; गोष्ट निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित ते महत्वाच नाही. महत्वाच असतं ते आनंद मिळणं. छोट्या छोट्या गोष्टीत जगण्यातलं खरं आध्यात्म सापडतं. परमेश्वराने निर्माण केलेलं जग हे फार सुंदर आहे; फक्त आपला   दृष्टीकोन बदलायला हवा; सकारात्मक विचारसरणी आचरणात आणायला हवी. हे ज्याला जमलं त्यालाच खऱ्या अर्थाने   'अध्यात्म' म्हणजे काय हे समजलं. तुझे आहे तुजपाशी... आणि हे आपल्यापाशी असणारं  आपल्यालाच शोधावं लागतं.
©मानसी जोशी





No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...