काल लेक शाळेतून घरी आली तेव्हा चेहरा पडलेला. मी विचारलं काय झालं कोणी रागावलं का? कोणाशी भांडण झाल का? तर मान हलवून नाही म्हणाली. मग थोडी साखरपेरणी केल्यावर म्हणाली, "आज आमच्या क्लासमध्ये सगळी मुलं मस्ती करत होती त्यामुळे टिचर वैतागल्या आणि शिक्षा म्हणून आम्हाला गेम्सच्या पिरिएडला वर्गातच बसवून ठेवलं."
मला हसायला आलं. शाळेतले दिवस आठवले आणि मनात आल काहीच तर नाही बदलल इतक्या वर्षात.
मागच्या आठवड्यात टर्मिनलचे पेपर्स दाखवले. आमच्या कन्यकेने 'Fill in the blanks' आणि 'Match the pair' ची फक्त उत्तरं उत्तरपत्रीकेत लिहिली. त्यामुळे उत्तरे बरोबर असूनही टिचरनी तिला मार्कस दिले नाहीत. मी टिचरना विचारल्यावर त्या म्हणाल्या, "वर्गात कितीतरी वेळा सांगून झालय fill in the blanks' ची संपूर्ण वाक्य लिहायची. Match the pair ची पूर्ण जोडी लिहायची नुसती उत्तरे लिहायची नाहीत. पेपरच्या दिवशीही या सूचना दिल्या होत्या. तरीही अनेक मुलांनी ही चूक केलेय. आता शिक्षा मिळाल्याशिवाय समज येणार नाही."
मी ठिक आहे म्हणून तिथून निघाले. माझेही मार्क्स असेच एकदा कट झाले होते, हे आठवलं आणि मनात विचार आला, काहीच नाही बदललं.
लेकीची वही चेक करताना मागच्या पानावर 'फुली गोळ्याचे' अनेक चौकोन दिसले. मी काही विचारणार तोच म्हणाली, "ऑफ पिरिएडला खेळतो ग आम्ही.".... काहीच नाही बदललं इतके वर्षात.
आजही शाळांमध्ये तेच घडतं जे पूर्वी घडायचं. खरच काहीच बदललेलं नाही का?
बदललय ! बदलली आहे ती पालकांची मानसिकता. पूर्वी पालक स्वतःहून शिक्षकांना सांगत, " ऐकला नाही तर दोन रट्टे दिलेत तरी चालेल आम्ही कोणीही विचारायला येणार नाही”
पण आता शिक्षक मुलांना ओरडले तरी पालक मारहाण केल्यासारखे रिॲक्ट होतात.
मुलांना मारणं चूक का बरोबर हे मला माहिती नाही. मला त्या वादात पडायचही नाही. पण छडीचे घाव हातावर बसले म्हणून पाढे पाठ झाले. भुमितीतील अनेक सूत्र या छड्यांच्या धाकामुळेच डोक्यात पक्की बसली. '&' आणि 'and' मधला फरक कान पिरगळ्यामुळे लक्षात राहिला. (अनेकांना हा फरक आजही माहिती नसेल.)
शिक्षकांची मानसिकता बदलली आहे / नाही हे मला माहिती नाही. पूर्वी आमचे शिक्षक आम्हाला सांगायचे 'परिक्षार्थी होऊ नका विद्यार्थी व्हा'. आजही शाळेत 'मुलांच्या मार्कांकडे नको तर त्यांच्या चुकांकडे लक्ष द्या. त्या सुधारा" असच सांगितल जात.
माध्यम कुठलंही असूदे. शाळेची फी कितीही असूदे. पण जोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या भल्याचा विचार करतायत तोपर्यंत शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधल नातं टिकून राहील.काही शिक्षक अपवाद असतीलही. हाताची सगळी बोटं सारखी नसतात. असे शिक्षक पूर्वीही होतेच फक्त तेव्हा पालकांची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी होती.
मुलांचे शिक्षक हे मुलांचे शत्रू नाहीत. निदान मुलांसमोर त्यांच्या शिक्षकांना नावं ठेवणं हे टाळलं पाहिजे. मुलांच्या बाबतीत पालक 'प्रोटेक्टिव्ह' असतात. असावच ते आवश्यकच आहे. फक्त 'ओव्हर प्रोटेक्टिव्ह' असू नये. हा ओव्हर बाजूला करा मग तुम्हीही म्हणाल, "खरच काहीच नाही बदललं इतके वर्षात!"
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment