Sunday, 10 December 2017

कथा - आरोह

आरोह

मध्यरात्र उलटून गेली होती. आरोही खिडकीत बसून समोर दिसणाऱ्या ऋषीच्या घराकडे मूकपणे पहात होती. रात्र सरुन पहाट सुरु होणार होती. "आता थोड्याच वेळात ऋषी रियाजासाठी उठेल तेव्हा त्याला गाताना बघता येईल, कदाचित शेवटचं! कदाचित!"
    आरोहीच्या मनात आलेल्या या विचाराने आत्तापर्यंत शुष्क झालेले तिचे डोळे पाणावले.  मी इथून गेले तर ऋषीला आठवण येइल का माझी? आरोहीच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. तिची आणि ऋषीची ओळख होऊन वर्षही झालं नव्हतं. पण असं वाटत होतं की दोघं वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतात. ऋषीच्या पहिल्या भेटीपासूनचा प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यासमोर आला.
       आरोहीचा फ्लॅट शहरातल्या मध्यवर्ती भागातल्या एका बिल्डींगमधे होता. पण ती बिल्डींग रिडेव्हलप्मेंटला गेल्याने आरोही तिच्या कुटुंबासह शहराबाहेर असणाऱ्या या बंगलो सोसायटीमध्ये शिफ्ट झाली होती. अगदी ऋषीच्या बंगल्याच्या समोरच्या बंगल्यात. तिला या एरियाबद्दल तशी फारशी माहिती  नव्हती. आजूबाजूचे बरेचसे बंगले बंदच होते. कोणाशीतरी ओळख करुन घ्यावी या हेतूने ती समोरच्या बंगल्यात गेली. कुत्रा नाही ना याची चाहूल घेत जरा घाबरतच तिने बेल वाजवली.
"नमस्कार! मी आरोही इथे समोरच्या बंगल्यात नवीनच  राहिला आलो आहोत आम्ही. सहजच ओळख व्हावी म्हणून तुम्हाला चहाला बोलवायला आले होते." आरोही आपली ओळख करुन देत म्हणाली.
 "मी शालिनी. मला शालिनीताई म्हटलस तरी चालेल. मी चहाला येईन तुझ्याकडे त्याआधी आमच्याकडची कॉफी टेस्ट करावी लागेल", शालिनीताई हसून म्हणाल्या.
    आरोही आतमध्ये आल्यावर तिला बसायला सांगून शालिनीताई कॉफी करण्यासाठी किचनमध्ये गेल्या. आरोही सोफ्यावर बसणार तेवढ्यात तिला तानपूऱ्याचे स्वर ऐकू आले आणि तिची पावले नकळत आवाजाच्या दिशेने वळली. ऋषी त्याच्या खोलीमध्ये भान हरपून रियाज करत होता. आरोही दारातच थांबली. तिचं ऋषीकडे लक्षही गेलं नाही. ती डोळे भरुन तानपूऱ्याकडे बघत होती. मुग्ध करणाऱ्या ऋषीच्या स्वरांना आपल्या कानात साठवत होती. त्या दिवशी कितीतरी वर्षांनी ती तानपूरा बघत होती. तिला तिचा गाण्याचा क्लास आठवला. ती ही असच भान हरपून रियाज करत बसायची. पण बाबा गेले मग क्लास सुटला आणि गाणंही.
     "स्वर चुकतोय तुमचा 'म' शुद्ध लागतोय. 'यमन' रागामध्ये 'म' तीव्र असतो. आरोही नकळतपणे बोलून गेली. तिचा आवाज ऐकून ऋषी भानावर आला. इतका वेळ कोणी सुंदर तरुणी आपल्या दाराबाहेर उभी राहून आपलं गायन ऐकतेय याची साधी जाणीवही त्याला नव्हती. क्षणभर काय बोलावं हे दोघांनाही कळलं नाही. आरोहीला तर अगदीच शरमल्यासारखं झालं होतं. एका अनोळखी बंगल्यात, अनोळखी पुरुषाच्या खोलीबाहेर त्याच्या परवानगीशिवाय उभं राहून ती त्याचा रियाज ऐकत होती.
  "इथे आहेस होय तू मी म्हटलं  कुठे गायब झालीस?" शालिनीताईंच्या आवाजाने आरोही भानावर आली. 
 "सॉरी पण तानपुऱ्याचे स्वर ऐकले आणि नकळत पाय इकडे वळले." आरोही म्हणाली. 
"ठिक आहे ग हरकत नाही. कॉफी घे आधी थंड होईल नाहीतर." शालिनीताई हसून म्हणाल्या.
    त्यानंतर मात्र शालिनीताईंची आणि आरोहीची छान ओळख झाली. त्यांना आरोही खूप आवडली होती. आरोहीचंही त्यांच्या घरी जाणं येणं वाढलं. संगीताच्या आवडीमुळे सहाजिकच तिची आणि ऋषीची ओळखही वाढली.
    ऋषी हा शालिनीताईंचा भाचा आणि त्यांच्या जगण्याचा एकमेव आधार होता. साधारण दहा वर्षांपूर्वी शालिनीताई, ऋषी आणि त्यांचे सगळे कुटूंबीय फिरायला जात असताना त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातामध्ये ऋषीचे आई-बाबा, शालिनीताईंचे पती व त्यांच्या दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. ऋषी आणि शालिनीताई मात्र वाचले होते. ऋषी तेव्हा बारावीला होता. या धक्क्यातून सावरणं दोघांनाही कठीण गेलं होतं पण शालिनीताईंनी मात्र हिम्मत दाखवून स्वतःला सावरलं आणि ऋषीलाही या धक्क्यातून बाहेर काढल. त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. दोघंही एकमेकांचा आधार झाले होते.
      ऋषी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत होता. पण त्याला म्हणावं तसं यश येत नव्हतं. म्युझिक इंडस्ट्रीशी कनेक्टेड असल्यामुळे ऋषीला अनेक कार्यक्रमांचे पासेस मिळत असत. शालिनीताई क्वचितच कधीतरी त्याच्याबरोबर जायच्या. पण बरेचदा ऋषी एकटाच जायचा. एक दिवस ऋषीला पंडित जगन्नाथांच्या कार्यक्रमाचे दोन पासेस मिळाले होते. शालिनीताईंना शक्य नव्हतं म्हणून त्याने आरोहीला विचारलं. आरोहीला जायची खूप इच्छा होती पण कार्यक्रम रात्रीचा असल्यामुळे तिला जमणं शक्य नव्हतं. कारण तिचा सव्वा वर्षाचा मुलगा मिहिर तिच्याशिवाय झोपत नसे.
     आरोहीच्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे तिचा मुलगा मिहीर. आरोहीला कितीही इच्छा असली तरी मिहीरला सोडून कार्यक्रमाला जायला तिचं मन तयार होईना. पण तिच्या सासूबाईंनी मिहीरला सांभाळण्याची जबाबदारी घेतली आणि तिला आग्रहाने ऋषीबरोबर पाठवलं. त्यानंतर मात्र आरोही आणि ऋषीमध्ये जवळीक निर्माण झाली. कधी कार्यक्रम, कधी ऋषीला काम मिळाल्याचं सेलिब्रेशन तर कधी शॉपिंग,  यासारख्या अनेक कारणांनी ऋषी आणि आरोही एकत्र बाहेर जाऊ लागले. दोघंही त्यांची सुख-दु:ख एकमेकांशी शेअर करत असत. हळूहळू नकळतपणे दोघं एकमेकांमध्ये गुंतत गेले. मिहीरचीही ऋषीबरोबर चांगली गट्टी झाली होती. ऋषी अनेकदा मिहीरला फिरायला घेऊन जात असे. तर कधी आरोही, मिहीर आणि ऋषी तिघंही एकत्रीत फिरायला जात असत. त्या तिघांना एकत्र बघून शालिनीताईंच्या मनात मात्र कालवाकालव होत असे. ऋषीनेही आता लग्न करुन सेटल व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. शिवाय त्यांना ऋषी आणि आरोहीची जवळीकही खटकायला लागली होती. एकदा त्यांनी तसं आरोहीच्या सासूबाईंजवळ हे बोलूनही दाखवलं होतं पण त्यांनी मात्र 'आजकाल स्त्री पुरुषामध्येही निखळ मैत्री असते' असं बोलून विषय तिथेच संपवला होता.
     दिवस भराभरा जात होते. आरोही आणि ऋषी एकमेकांमध्ये अधिकच गुंतत चालले होते. अशातच राहुलचा म्हणजेच आरोहीच्या नवऱ्याचा अमेरिकेहून फोन आला. तो दहा दिवसांनी भारतात परत येणार होता. त्याने आरोहीला व्हिसाची प्रोसिजरही सुरु करायला सांगितली. आरोही भानावर आली. त्या रात्री ऋषी आणि आरोही कॉन्सर्टसाठी म्हणून घरातून बाहेर पडले. पण कॉन्सर्टला न जाता दोघही लॉंग ड्राईव्हला गेले. आरोही ऋषीच्या मिठीत भरपूर रडली. बाबा गेल्यानंतर कितीतरी वर्षांनी ती अशी रडत होती. ऋषी तिला लहान बाळासारखं थोपटत होता. खरंतर तो ही आज भानावर आला होता. आरोहीचं लग्न झालंय हे माहिती असूनही तो तिच्यामध्ये गुंतला होता. त्या रात्री दोघांनाही त्यांचं एकमेकांवर असलेल्या प्रेमाची जाणीव झाली होती.
    आरोही आणि ऋषीची अवस्था तिच्या सासूबाई आणि शालिनीताई या दोघींच्याही नजरेतून सुटली नाही. पण कोणीच काही बोललं नाही. त्या दिवशी पहाटेच घराची बेल वाजली. राहुल आला होता. त्याला बघून आरोहीला कणभरही आनंद झाला नाही. कसा होईल म्हणा सतत पैशाची भाषा करणाऱ्या, आपल्या स्टेटसची घमेंड असणाऱ्या राहुलमध्ये आणि तिच्यामध्ये भावनिक नातं कधी निर्माणच झालं नव्हतं. आरोहीच्या सासूबाईंनी आरोहीला एका लग्नात बघितलं आणि त्यांनी तिला राहुलसाठी मागणी घातली. काका काकूच्या उपकाराच्या ओझ्याखाली जगणाऱ्या आरोहीला नाही म्हणण्याचा अधिकारच नव्हता. तसं सुरवातीला उच्चशिक्षित देखणा राहुल तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार वाटला होता. पण राहुलने मात्र कधीच तिच्या मनाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला नाही. तिचं आणि राहुलचं लग्न झालं त्या रात्री राहुलने फक्त तिचा नवरा होण्याचा हक्क बजावला होता. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांतच राहुल अमेरिकेला निघून गेला. जाताना मात्र आपल्या पुरुषत्वाची निशाणी आरोहीला देऊन गेला होता. आरोही गरोदर होती पण त्याचं कुठलंच कौतुक राहुलला नव्हतं. राहुल क्वचितच आरोहीच्या मोबाईलवर फोन करत असे. आईच्या मोबाईलवर मात्र रोज फोन करत असे. तेव्हा त्या राहुलला आरोहीशी बोलायला लावत असत. आरोहीला सगळं कळत होतं पण ती काहीच बोलत नव्हती. लग्नानंतर अवघ्या दहा दिवसांत अमेरिकेला निघून गेलेला राहुल मिहीरच्या जन्मानंतर एका महिन्याने भारतात परत आला होता. मिहीरचा मात्र त्याला चांगलाच लळा लागला होता. जवळपास महिनाभर राहून जेव्हा राहुल पुन्हा अमेरिकेला जायला निघाला तेव्हा मात्र त्याचा पाय निघत नव्हता. त्या दिवशी प्रथमच आरोहीला राहुलच्या डोळ्यात 'अहं' न दिसता भावना दिसल्या होत्या.  मिहीरसाठीचं प्रेम दिसलं होतं. आजही राहुल आला तेव्हा मिहीरला डोळे भरुन बघत होता. जवळपास सव्वा वर्षाने तो मिहीरला बघत होता. त्या रात्रीही राहुलने आरोहीला जवळ घेऊन फक्त आपला नवरा असल्याचा हक्क बजावला. आरोहीला त्याच्या स्पर्षाची घृणा वाटली. राहुल झोपल्यावर मात्र खोलीच्या बाहेर येऊन ती भरपूर रडली. तिला क्षणाक्षणाला ऋषी आठवत होता.
  "अजून किती दिवस सत्यापासून दूर पळणार आहेस आरोही?" सासूबाईंच्या आवाजाने आरोही दचकली.
"का निभावते आहेस हे नातं? मला माहिती आहे तू आणि ऋषी एकमेकांमध्ये गुंतला आहात. खरंतर माझच चुकलं. आज माझ्यामुळे तुझी ही अवस्था झालेय. राहुलला लग्नच करायचं नव्हतं ग. तो तिकडे अमेरीकेत रिटा नावाच्या मुलीसोबत 'लिव्ह इन' मध्ये रहात होता. पण माझ्या इच्छेसाठी त्याने तुझ्याशी लग्न केलं. मला वाटलं होतं लग्नानंतर आपोआपच संसाराची गोडी निर्माण होइल त्याला. पण तसं झालं नाही. आजही रिटाने त्याला सोडलं म्हणून तो तुला तिकडे घेऊन जातोय. मला माफ कर आरोही. झालेलं बदलता येणार नाही पण नशीबाने ऋषीच्या रुपाने तुझ्या आयुष्यात सुख आणलंय. तू राहुलला घटस्फोट देऊन ऋषीशी लग्न कर आणि सुखी हो. आरोही फक्त आठ दिवस आहेत तुझ्या हातात. अशी शांत राहू नकोस लवकर विचार कर." सासूबाई तिला समजावत म्हणाल्या.
       आज आठ दिवसांनंतरही आरोही शांतच होती. घटस्फोट घेऊन ऋषीशी लग्न करण्याची हिम्मत तिच्यामध्ये नव्हती. कॅन्सरच्या वेदना आणि उपचाराच्या खर्चाने हतबल होवून गेलेले बाबा,  त्यानंतरच काका काकूच्या उपकाराखाली जगणं, अगतिक झालेली आई हे सारं आठवलं.  तिच्या मोठ्या बहिणीचा घटस्फोट झालेला होता. त्यावरून तिची आई काकूचे टोमणे सहन  करत होती. धाकटी बहीण अजून शिकत होती. दोन बहि‍णींचा घटस्फोट झाल्यावर धाकट्या बहिणीचं लग्न कसं होणार? पण मग माझं काय? मी अशा व्यक्तीसोबत का राहू ज्याचं माझ्यावर प्रेमच नाही. प्रत्येकवेळी मी माझ्या स्वप्नांचा त्याग का करू? आधी गाणं आणि आता ऋषी. सगळ्यांच्या सुखासाठी मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या प्रेमाचा बळी का देऊ?
      पण मग मिहीरचं काय? राहुल कसाही असला तरी त्याचं मिहीरवर प्रेम आहे. पित्याचं प्रेम हा मिहीरचा अधिकार आहे. ऋषीही मिहिरला जीव लावतो पण कशावरून स्वतःच मुल झाल्यावर ऋषी मिहीरला अंतर देणार नाही? आज ना उद्या ऋषी हा त्याचा खरा बाप नाही हे सत्य मिहिरला कळेलच. राहुलचा स्वभाव आणि मिहिरवरचं प्रेम बघता काहीही झालं तरी तो मिहिरला स्वतःपासून दुरावू देणार नाही आणि मी मिहिरशिवाय जगूच शकत नाही. अजूनही स्वतःच्या करीयरसाठी स्ट्रगल करणारा ऋषी मिहीरला काय भविष्य देणार? कितीही नाकारलं तरी पैसा हेच अंतिम सत्य आहे. माझं जे झालं ते झालं पण निदान मिहीरला तरी उत्तम भविष्य मिळायला हवं जे ऋषी नाही राहुल देऊ शकतो.
    अखेर खूप विचार करुन आरोहीने राहुलबरोबर अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिच्या मनात आलं, "प्रसन्न भूपाळी असो वा धीरगंभीर मालकंस, जीवाला हूरहूर लावणारा आसावरी असो वा शृंगारीक काफी स्वरांचा आरोह हा चढताच असतो; माझ्या आयुष्यातल्या दु:खासारखा!" तिच्या डोळ्यातून बरसणारे अश्रू थांबतात आणि ऋषीचे आर्त स्वर तिच्या कानावर पडतात-
"रातभर आपकी याद आती रही...आपकी याद आती रही रातभर.."
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...