निरोप
चहा करण्यासाठी तिने पातेल्यात पाणी ओतून गॅसवर ठेवलं. सहज कानावर रेडिओवरच्या गाण्याच्या ओळी आल्या
"निरोप कसला माझा घेता..."
तिच्या मनात आलं; "आज अचानक गीत रामायण मधलं गाणं कस काय लागलं?"
तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, तिने फक्त पातेल्यात पाणी घालून पातेलं गॅसवर ठेवलंय. गॅस लावलाच नाहीये. तिने पटकन लायटर हातात घेऊन गॅस लावला.
मनातले विचार अजूनही चालूच होते. "खरंच निरोप घेताना जीव व्याकूळ होत असेल का? पण आपलं काय होणार आहे? एखादं गाणं ऐकून जीवाला जशी अनामिक हूरहूर लागते; अगदी तशीच हूरहूर लागलेय आज आपल्याला. 'तो' जाणार आहे आज; खूप दिवसांसाठी! क्षणभर तिच्या मनात आलं; थांबवावं त्याला आणि सांगावं, "असा जाऊ नकोस ना मला एकटीला सोडून...".
डोळ्यात टचकन पाणी आलं. समोर चहाच्या पातेल्यात पाणी उकळत होतं. तिने चटकन गॅस लहान करुन त्यामध्ये आलं आणि साखर घातली.
आत्तापर्यंतचं तिचं आयुष्य अगदी साधं सरळ होतं. अल्लड, अवखळ अशी ती आता मोठी झाली होती. तिचं लग्नही ठरलेलं होतं. आणि आज 'तो' त्याच्या कामाच्या ठिकाणी परत जाणार होता. बसस्टॉपजवळच तिचं घर असल्यामुळे त्याच्या घरचे त्याला निरोप द्यायला तिच्याकडेच येणार होते. अर्थात 'तो' ही येणार होता. तिच्या हातचा 'आलं घातलेला चहा' ही खास त्याची फर्माईश होती.
पाण्यात विरघळणारी साखर बघून तिच्या मनात आलं; "त्याच्यावर कितीही चिडले, तरी त्याने गोड हसून मारलेल्या प्रेमाच्या हाकेने मी अगदी सहज विरघळून जाते, अगदी या साखरेसारखंच! पण 'तशी' हाक परत कधी ऐकेन मी? आता त्याच्या आठवणी छळतील मला. त्याला पण येईल ना माझी आठवण? येईलच की! कशी नाही येणार? इतकं प्रेम करतो माझ्यावर. आठवण कशी येणार नाही."
पाण्यात साखर पूर्णपणे विरघळल्यावर तिने पटकन चहा पावडर घातली. चहा उकळू लागला. सगळीकडे चहाचा सुगंध दरवळायला लागला.
"असाच सुगंध दरवळूदे आमच्या नात्यामध्येही; अगदी हवाहवासा!
छान उकळी आल्यावर तिने चहामध्ये दूध घातलं. दूध घातल्यानंतर येणारा चहाचा रंग तिला प्रचंड आवडायचा.
"असा परफेक्ट रंग आला पाहिजे तरच चहा पिण्यात खरी मजा!" असं म्हणत ती स्वतःशीच हसली.
तो खरच परत येइल ना? मनात आलेल्या या विचारासरशी तिला धडकी भरली. रेडिओवरच गाणं कधीच संपलेल होतं. तिच्या कानावर आता हॉलमधल्या टीव्हीवरच्या न्यूज चॅनेलवर लागलेल्या बातम्यांचे आवज येत होते. मृत्यू पावलेल्या जवानांची नावं कानावर पडली आणि तिच्या मनात आलं; त्याचंही नाव असंच ऐकू आलं तर? ......क्षणभर काळजाचा ठोका चुकला. नकळत डोळ्यातून अश्रू ओघळले. समोरच्या पातेल्यातला चहा उतू जाणार तेवढ्यात पटकन तिने गॅस बंद केला.
"त्याच्याशिवाय जगायची कल्पनाही सहन होत नाहीये मला. सांगू का त्याला नको जाऊस? पण तो ऐकणार आहे थोडंच. युद्ध सुरु झाल्यावर तातडीने रजा कॅन्सल करुन बॉर्डरवर हजर रहायचा आदेश मिळालाय त्याला. हा आदेश म्हणजे तो स्वतःचा सन्मान समजतो. मातृभूमीवर त्याचं जिवापाड प्रेम आहे आणि आपला देश संकटात असताना तो इथे स्वस्थ बसूच शकणार नाही. का करतात युद्ध? काय मिळतं यातून? फक्त सर्वनाश... आर्थिक नुकसान तर होतंच. पण ते भरुन निघतं. पण माझ्यासारख्या अनेकांच नुकसान झालं तर काही लाखांनी भरुन नाही निघू शकत. सैनिक तर त्यांचेही मरतात आणि आपलेही. त्यांचेही जीवलग दु:खी होतात आणि आपलेही. मग हा सगळा अट्टाहास कशासाठी? तो तिकडे बॉर्डरवर डोक्यावर टांगती तलवार घेऊन जगणार. कुठल्यातरी गोळीवर त्याच नाव लिहिलेल असेल तर ? नाही नाही असं होणार नाही....".
एव्हाना कपात चहा ओतून कप ट्रेमध्ये ठेवून ती सगळ्यांना चहा नेऊन देते. तेवढ्यात दरवाज्यातून 'तो' आत आला; निरोप घेण्यासाठी! चहा घेऊन दोघंही घराच्या गच्चीवर गेली.
काही क्षण दोघंही नि:शब्द. तिचे डोळे एव्हाना शुष्क झाले होते. "सैनिकाच्या जीवनसंगिनीने रडायच नसतं." त्याने आधीच बजावलं होतं तिला.
"परत कधी येशील?" तिने आर्त स्वरात विचारलं आणि संभाषण सुरु झालं.
"माहिती नाही! पण मी येईन हे नक्की. मी येइपर्यंत आपली सगळी स्वप्न, सगळ्या आठवणी जपून ठेव; माझी ठेव म्हणून!" तो.
तिने फक्त मान हलवली. बसची वेळ झाली. घराजवळ असलेल्या बस स्टॉपवर ती त्याला सोडायला गेली. तिथे गेल्यावर ती त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, "लवकर ये मी वाट बघतेय...".
आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवून तो मंद हसला आणि तिला डोळे भरुन बघू लागला. तिचं रुप आपल्या नजरेत साठवून घेत होता. तेवढ्यात बस आली. तिने घट्ट धरून ठेवलेला त्याचा हात अलगदपणे सोडवून तो बसमध्ये जाऊन बसला.
"नेमका हाच क्षण नको होता; जीवाला चटका लावणारा निरोपाचा क्षण. ती स्तब्ध तो प्रवाही.
"तिने हात हलवून त्याला निरोप दिला. बस निघून गेल्यावरही कितीतरी वेळ ती दूरवर पसरलेल्या एकाकी रस्त्याकडे बघत तिथेच उभी राहिली. इतका वेळ डोळ्यात साचलेले अश्रू गालावरुन घळाघळा ओघळत होते.
"आता उरला तो फक्त विरह! आठवणींच्या जीवावर किती दिवस जगायचं? या आठवणी खूप त्रास देतील. बेचैन करतील. पण तरीही मी त्या जपेन, त्याची ठेव म्हणून! पुन्हा भयंकर उकाड्यानंतर पावसाची सर बरसावी तसा तो येइल. कधी वळवाचा पाऊस बनून तर कधी मान्सूनच्या पावसासारखा! पण त्यानंतर काय ? पुन्हा हा जीवघेणा क्षण निरोपाचा! आता मात्र तिला त्याचं म्हणणं पटत होतं, "सहवासातल्या आनंदापेक्षा विरहाचं दु:खच आंतरीक ओढ निर्माण करतं."
"नाही, पण आता मी रडणार नाही. 'सैनिकाच्या जीवनसंगिनीने रडायचं नसतं त्याने बजावलय मला", असं मनाशी पक्क ठरवून डोळे पुसून ती बस स्टॉपवरुन घरी जायला निघाली. सहज तिची नजर बाजूच्या चहाच्या टपरीवर गेली. तिथे चहा उकळत होता. टपरीवाला पातेल्यातला चहा चमच्याने ढवळत होता. त्यातून निघणाऱ्या वाफांमधून हवेत चहाचा सुगंध दरवळला आणि ती मंद हसली. चहाचं अस्तित्व नसणाऱ्या वाफेतून दरवळणारा गंध आणि प्रत्यक्ष भेट नसताना निव्वळ आठवणींतून भेटणं दोन्ही जवळपास सारखंच. दोन्हीमध्ये प्रत्यक्ष भेटीचं समाधान नसलं तरी अस्तित्वाचा गंध दरवळतो, तो ही अगदी हवाहवासा!
©मानसी जोशी
No comments:
Post a Comment